मुंबई ते काश्मीर... दुचाकीच्या संगे.. .भाग 4

शशिकांत ओक's picture
शशिकांत ओक in जनातलं, मनातलं
18 Feb 2015 - 6:31 pm

मुंबई ते काश्मीर... दुचाकीच्या संगे.. .भाग 4
जम्मू श्रीनगर बस प्रवास
1979-80 सुमारास हा प्रदीर्घ प्रवास माझ्याप्रमाणे अनेकांनी अनेकदा केला असेल. पण अरूणच्या शब्दांकनाची हातोटी विलक्षण आहे. त्याचा मासला अनुभवा...
‘सार्वजनिक संडास ही राष्ट्राच्या संकृतीची कसोटी आहे!.’ ... हे पु लंचं चपखल वाक्य नेमकं आठवत उरातील सल पोटाकडे कळ बनून सरकते... लाईन लांब व्हायच्या आत तिथे टॅक्स भरून मोकळा झालो!... तिथला ‘एकांत-वास’ सुद्धा... लोकांच्या बेशिस्तपणामुळं अत्यावश्यक आणि चांगल्या सोयीसुविधांचा सुद्धा कसा फज्जा उडतो त्याचा धडधडीत पुरावा होता!....
(जरी सायकलवरून हा प्रवास अपेक्षित असला तरी तसे न करता तो बसने करावा असा विचार पक्का करून... बस स्थानकावरील चौकशी खिडकीत तोंड घातले...)
एरव्ही माणूस कितीही प्रेमळ, परोपकारी, विनयशील, सज्जन किंवा गोड स्वभावाचा असो, एकदा का तो चौकशीच्या पिंजऱ्यात शिरला की मगच त्याची खरी ‘चव-कशी’ कळते. त्यांच्या दोन-चार उत्तरानंतर नरभक्षक वाघ होत जातो. मुळातच आपल्याला रक्तात सौजन्य कमी ... त्यात कामचुकारपणाची भर! अशा बेजार माणसांना माणसांचाच आजार असतो....
भारतीय प्रमाणवेळेनुसार 7.30 बस बरोबर 7.30 लाच सोडतात की काय अशी भिती वाटली! पण ती 7.50 ला सोडण्यात आल्याने परंपरा कायम राखल्याचा आनंद झाला. बसमधे म्हाताऱ्यामंडळींचाच जास्त भरणा होता. परंतु एकाच्याही चेहऱ्यावर प्रवासाचा आनंद दिसत नव्हता. सगळेच ‘येरवड्याहून तिहारला’ हलवले जात असलेल्या कैद्यांसारखे उदास...!
अर्ध्या तासात जम्मू शहराचा देखावा दिसू लागला. हवा इतकी गार झाली की विश्वास बसेना. उन्हानं दिलेल्या असह्य चटक्यांचा सूड म्हणून ती थंड हवा मी आधाशासारखी पिऊन घेतली! ... पण आणखी काही वेळच. कारण नंतर दातांमधे शीतयुद्ध सुरू झालं... कोवळ्या किरणांनी पर्वत-शिखरांना न्हाऊ घालत होते तेवढेच ....रक्तचंदनाचे टिळे लाऊन सारे पर्वत निसर्गदेवतेची पूजाच कर असावेत! आश्चर्य असे की त्या दृष्याच्या प्रभावाने शब्दांच्या दोन स्त्रैण ओळी पटकन मनात अवतरल्या ....
....प्रथम कृपा किरणांची होई पर्वती उंच आभाळी
खुजा टेकड्या खोल दऱ्यांच्या भाग्य नसे भाळी...
बस हळूहळू हिमालयाच्या अंतरंगात शिरत होती. वर्षानुवर्षे निसर्गाचा अनुपम खजिना सांभाळणारा, धीर गंभीर उग्र तपस्वी म्हणजे हिमालय!.... नजर फेकावी तिथवर एका पलिकडे एक उलगडत गेलेल्या पर्वत रांगामुळे हिमालयाचं कुटुंबही अफाट!... अर्थात कुटुंब प्रमुखाचा मानही एव्हरेस्टलाच!.... जिथं हिमालयाच्या तळाशीही इतका आनंद गवसत होता. तिथं पृथ्वीच्या सर्वोच्च अंगावरून अवघा आसमंत न्याहाळताना तो क्षण किती रोमहर्षक असेल...!
वळणावळणाच्या वाटेनं, धबधब्याच्या सोबतीनं वाटचाल चालू होती. गेल्या 17-18 दिवसातली धूळ, ऊष्मा, रखरखीतपणा, आज कुठल्याकुठं वाहून गेला होता निसर्गातील नानाविध स्पंद, पक्षी, नद्या, डोंगर त्यांची बर्फाच्छादित शिखरं, धुक्याचं आकाश, हिरव्या रंगांच्या अनंत छटांनी नटलेली वनश्री याचं साहचर्य मी बसमधून अनुभवत होतो. डोंगरामागून डोंगर ओलांडले तरी गावाचा पत्ता नव्हता. मी कोट व हातमोजे चढवले. उन्हात गरम होऊन माझ्या पायांची सालडी काढणारे बूटही आता मुडद्यासारखे गार पडले होते!
काही प्रवासी छातीवर हात बांधून मठ्ठासारखे बसले होते. तर कुणी मान टाकून पेंगत होते. ... त्यांच्या अरसिकतेची व मंदपणाची खात्रीच पटली होती!... शेजारच्या प्रवाशाला, मी सायकलनं आलो असल्याची कल्पना दिली असता, त्यानं स्वतः नऊ ग्रह पालथे घातल्याच्या आविर्भावात इतक्या अरुची न मुंडकं हलवलं कि वाटलं त्याला बसमधून ढकलूनच द्यावं...!
फुलामंधी समावला धरित्रीचा परिमय
माझे नाकाला इचारा नथिले काय त्याचं?
बहिणाबाईंनी वर्णिलेल्या ह्या नथी सारखाच हा माणूस ही ‘ऐरा गैरा नत्थू खैरा होता’ यात शंका नव्हती!...
अचानक गाडीच्या टपावर थडथड असा मोठ्ठा आवाज झाला. एके ठिकाणी कड्याच्या वरच्या बाजूकडील खडक बरेच पुढे आलेले होते. नि त्यावरून येणारा धबधबा थेट बसवर फुटला होता. पुढेही काही ठिकाणी लहान-मोठ्या पाणलोटांनी बसच्या टपावर मर्कटलीला केल्या. कधी सपाटी, कधी चढाव तर कधी उतार येत होते. चाकं नीट रस्त्यावर ठेवणाऱ्या ड्रायव्हरचं वळणावरचं कसब खरोखर वाखणण्याजोग होतं. तो होता ही सरदारच...!
9 च्या सुमारास 66 किमीवरील उधमपूर हे ठिकाण आलं...
रस्त्याच्या वळणावळणावर बस खाली चुरल्या जाणाऱ्या गलेलट्ठ ढगांच्या थव्यांनी वेगळीच मजा आणली होती. डोंगर उतारावर धुकं दुधाच्या चिकासारखं घट्ट चिकटून होतं. रोमांचित अवस्थेमुळे सायकल प्रवासाच्या खुमखुमीनं पुन्हा वर डोकं काढलं. खरोखरच आपण सळसळत्या उत्तुंग घाट रस्त्यावर सायकल चालवण्याचा जुगार एकादा खेळूनच पहायला हवा होता. त्यातल्या धोक्यांना हुकावणी देण्यातला आनंद अनुभवायला हवा होता!. .. नाहीतरी आयुष्याचा काय भरवसा या बसला ही अपघात होऊ शकतो! ... अशा विचारांनी एवढी घोर चुटपुट लागली की दृष्यांवरचं ध्यानही विचलित झालं...
परिणामांची पर्वा नसलेलं हे दुसऱं मन म्हणे... ‘पुढे बस थांबली की उतर सायकल सहित...दे खुडुक झालेल्यांच्या बंद खुराडा सोडून... तिकिटाचं काय एवढं पण रस्ताभर साहसांचा अविस्मरणीय आनंद देणारी ही दुर्मीळ संधी सोडू नकोस. उतर!...’
पण कुठतरी ताळयावर असलेलं मन म्हणे... ‘नको... आता अर्थ नाही... लोक हसतील वेडा ठरवतील... आणि हो, दिवसा ठीक आहे पण रात्री रात्री काय करशील हिमालयीन दऱ्याखोऱ्या म्हणजे काय बागबगिच्यातल्या कृत्रिम टेकड्या वाटल्या आणि मुख्य म्हणजे ज्यासाठी एवढा आटापिटा करून इथवर आलायस ती ‘कश्यप भूमी’ बघण्यापुर्वीच जिवार उदार होण्या इतका का तू महामूर्ख आहेस?’
दोन मनांचं हे द्वंद्व काही वेळातच शांत झालं. त्यातल्या त्यात मी बसमधच अधिक सुरक्षित होतो. बस नं उजवीकडे गरकन वळण घेतलं... अंगावर मोरपीस फिल्याचा भास झाला. हा भासही मला एकट्याला झाला असवा. कारण बाकीचे सगळे कावळा शिवल्यासारखे बसून होते. समोर पाहिलं तर बर्फानं झाकलेल्या पर्वत रांगा... बर्फाच्या डोंगरांचं प्रत्यक्ष असं ते आयुष्यातलं पहिलं वहिलं दर्शन! साहजिक अंगावर संक्रांतीच्या हलव्यासारखा तरतरीत काटाच उभा राहिला...!
काही वेळातच मेघांच्या झुंडींनी डोंगरांना चौफेर वेढ दिला. आपले गुबगुबीत हात एकमेकात अडकवून त्यांच्या काही तुकड्या जलास्त्रासह सज्ज असाव्यात. आकाश काळोखत असतानाच क्षणभर डोळे दिपवून टाकणारी वीड चमकली. पर्वत शिखरं आणि मेघांच्या सैन्यात झडू लागलेल्या चकमकीची ती पहिली खूण असावी. आकाश अधिक गडद झालं आणि कुठल्याही क्षणी पाऊस सुरू होईल असं वाटलं असतानाच काचांवर छोट्या छोट्या नाचऱ्या थेंबांचं गमन झालं. तेंव्हा टाळ्यापिटून नाचावसं वाटलं! बाजूचा माणूस नको म्हणत असतानाही मी उन्हात पोळलेले हात खिडकी बाहेर काढण्याचा मोह आवरता आवरत नव्हता. ... ‘बंद करे बाबू. ठंड पवन छे...’ म्हणत जळत्या सिगरेटचं थोटूक बाहेर टाकलं आणि पुन्हा त्यानं डोळे मिटले. ...मी खडकी बंद करताच मान कापलेल्या कोंबडीप्रमाणे फडफडणारी माझ्या कोटाची कॉलर पटकन शांत झाली....
पुन्हा एक चमत्कार झाला. पाऊस पूर्ण थांबला. ‘छे भलतचं! काय कुठाय पाऊस?’ असचं विचारित रखरखीत सूर्य किरणांनी प्रसन्न एन्ट्री घेतली. निसर्गातले हे सारे बदल अर्थात इतक्या जलद होतात की प्रत्यक्ष पाहतानच्या कितीतरी पट वेळ ते सारं लिहिता-वाचताना खर्च होऊ जातो!
पुढे चालू...

प्रवासदेशांतरआस्वादसमीक्षा

प्रतिक्रिया

रेवती's picture

18 Feb 2015 - 7:25 pm | रेवती

वाचतीये. छान वर्णन केलय हिमालयाचं.

एस's picture

18 Feb 2015 - 11:33 pm | एस

वा! भारी!