जून महिन्यापासून माझा चातुर्मास सुरु होतो. रोजचे काम आटपून घरी जायला उशीर होतो. आहे त्या वेळात जास्तीतजास्त विद्यार्थी आणि पालकांना मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करत असतो. शिक्षकदिनाच्या आसपास व्याख्यानांची मागणी वाढते.मुंबईतल्या अशा एका शाळेत माझा रतीब ठरलेला आहे.गेल्या आठवड्यात मुख्याध्यापकांचा फोन आला तेव्हा मी सवयीनी उत्तर दिलं,
हो लक्षात आहे .सालाबादप्रमाणे यंदाही ....वगैरे वगैरे..
मुख्याध्यापकांनी माझं वाक्य अर्धवट थांबवलं..
फोन त्यासाठी केला नाहीय्ये...तुमच्यासाठी एक भेटवस्तू शाळेच्या एका माजी विद्यार्थ्यानी पाठवली आहे ती कशी आणि कुठे पाठवू ?
भेटवस्तू आणि विद्यार्थ्यानी ?
माझी पहिल्यापासून एक सवय आहे मी अशा विद्यार्थ्यानी पाठवलेली वस्तू स्विकारत नाही.
सर हे प्रकरणजरा वेगळं आहे.
म्हणजे? सर आठवतं का तुम्हाला २००० सालच्या बॅचचा तो विद्यार्थी?
नाही बा. मी स्पष्ट कबूली दिली.
सर ती कविता आठवते का?
आता जरा जरा धूसर काहीतरी आठवायला लागलं .खरं सांगायचं तर कविता या प्रकाराच्या वाटेला मी आणि कविता सुद्धा माझ्या वाट्याला जात नाही.कायमचा एक समांतर प्रवास.
तरीपण ही कविता माझ्या डोक्यात बरेच दिवस घर करून छळ करत होती.
ओके. ओके .तो विद्यार्थी?
होय तोच.
मुख्याध्यापकांचा निश्वास फोनवर ऐकू येण्याईतपत मोठा होता.
----------------------------------------------------------------दहावीचा अभ्यास ह्या व्याख्यानाचा शेवट मी करत होतो.
दहा मिनीटे आई वडील यांचा आदर ,कुटुंब आणि त्याची अभ्यासातली आवश्यकता , कौटुबीक सामंजस्य असा काहीसा भाग यात असतो . एक वजन येण्यापलीकडे या मुद्द्याचा फारसा उपयोग नसतो पण आवश्यकता डावलूनही चालत नाही.
सर... एक मिनीट असं काहीसं ओरडत एक विद्यार्थी ताडताड चालत हॉलच्या बाहेर पडला. जाता जाता एक जळजळीत कटाक्ष माझ्याकडे टाकायला विसरला नाही.
मी कार्यक्रम संपल्यावर मुख्याध्यापकांकडे सहज हा विषय बोललो. ते किंचीत हसले.
"हे अपेक्षीत होतं मला . "हा कागद वाचा. एक मुक्त कविता होती. दहावीच्या विद्यार्थ्याकडून एव्हढी सिरीयस कविता ...
खुळा अश्वत्थामा
कळत नकळत झालात पालक
पालकाचे आता झालात मालक.
वासनेचा रोजचा खेळ
निपचीत पडून वाहिले अंधाराचे बेल.
उपाशी पोटाला शेंगदाण्याचा घास
तरीसुद्धा थांबली नाही भावंडाची रास.
पिंजरा वितांचा झुरळांच्या रिंग मास्तरचा
तोरा मात्र ब्रुनीईच्या सुलतानाचा.
पोटुश्या आईने करपवली ताई
ताई ..छे तीच तर खरी आई.
शपथ तिच्या विझल्या डोळ्याची
वाकल्या कण्याची
संधी मिळता रास ओतीन मोत्यांची
खाल्लात आबांचा रुपया बंदा
राख विझायच्या आत सावकारी दांडा
तुमचे शोक माज मुजोरी
कमी पडली असती कुबेराची तिजोरी.
गुरांना गोचिडाची भिती
आम्ही सुद्धा झेलू
तुमची रक्तपिती.
चारच वर्षे सक्तीची
वाट बघतोय मुक्तीची.
करीन जखमांची ढाल
येईल माझी वेळ
खुळ्या अश्वत्थाम्यासारखे
मागणार नाही तेल.
----------------------------------------------------------------आज मुलगा एका बहुदेशीय कंपनीत इंजीनीयर आहे.
त्या वेळी मी आणि काही इतर मित्रांनी जमा केलेली मदत त्याला किती वर्षं पुरली असेल मला कल्पना नाही.
पण त्याचा मार्ग नक्कीच सुकर झाला असावा.
----------------------------------------------------------------
शैक्षणीक क्षेत्रात सहन करावे लागणारे वार काहीवेळा युद्धात होणार्या जखमांसारखेच
जिव्हारी लागतात.
एक मात्र कळत नाही शिक्षकानी दरवर्षी किती जखमा सहन करायच्या?
प्रतिक्रिया
11 Aug 2008 - 9:33 pm | नि३
विनायकराव
कवीता तर चांगली आहे पण त्याच्या आशयाविशयी पुर्णपणे असहमत.
---नितिन.
11 Aug 2008 - 9:36 pm | विसोबा खेचर
लेखन आणि कविता, दोन्ही सुरेख..!
(बाबूजींचा विद्यार्थी) तात्या.
12 Aug 2008 - 6:54 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
लेखन आणि कविता, दोन्ही सुरेख..!
11 Aug 2008 - 9:50 pm | चतुरंग
बरंच काही समजत असतं, कळत असतं. शारीरिक दृष्ट्या ती बराच काळ असहाय असल्यानं, अवलंबून असल्यानं पालक त्यांचे मालक बनून रहातात!
तसं त्या पालकांनी बनावं की नाही ही सर्वस्वी त्या पालकांची प्रगल्भता किती आहे त्यावर अवलंबून असतं.
विनायकराव, आपले अनुभव असेच येत राहूदेत. धन्यवाद!
तुमची मुलं ही 'तुमची' नसतात ती फक्त तुमच्यामार्फत ह्या जगात व्यक्त झालेली असतात, आणि ती एक स्वतंत्र व्यक्ती असतात अशा आशयाचं खलील जिब्रानचं एक लिखाण आहे.
ते मूळ इंग्रजीतूनच वाचण्यासारखं आहे म्हणून ते इथे देतोय -
On Children
Kahlil Gibran
Your children are not your children.
They are the sons and daughters of Life's longing for itself.
They come through you but not from you,
And though they are with you yet they belong not to you.
You may give them your love but not your thoughts,
For they have their own thoughts.
You may house their bodies but not their souls,
For their souls dwell in the house of tomorrow,
which you cannot visit, not even in your dreams.
You may strive to be like them,
but seek not to make them like you.
For life goes not backward nor tarries with yesterday.
You are the bows from which your children
as living arrows are sent forth.
The archer sees the mark upon the path of the infinite,
and He bends you with His might
that His arrows may go swift and far.
Let our bending in the archer's hand be for gladness;
For even as He loves the arrow that flies,
so He loves also the bow that is stable.
चतुरंग
11 Aug 2008 - 10:31 pm | नारायणी
संग्रही ठेवण्यासारखी कविता. धन्यवाद.
11 Aug 2008 - 10:54 pm | सर्किट (not verified)
अस्वस्थ करणारी कविता.
- सर्किट
12 Aug 2008 - 12:14 am | प्राजु
अस्वस्थ करणारी कविता.
हेच म्हणते.
चतुरंग तुम्ही दिलेली कविता खरंच संग्रहीत करावी अशी आहे.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
12 Aug 2008 - 1:18 am | पिवळा डांबिस
अस्वस्थ करणारी कविता.
आणि
चतुरंग तुम्ही दिलेली कविता खरंच संग्रहीत करावी अशी आहे.
दोन्हीशी सहमत आहे.
12 Aug 2008 - 2:04 am | बेसनलाडू
(सहमत)बेसनलाडू
12 Aug 2008 - 2:44 am | प्रियाली
.
12 Aug 2008 - 2:58 am | धनंजय
अस्वस्थ करणारी कविता.
पण "अश्वत्थम्या"चा संदर्भ समजला नाही. द्रौपदीच्या गर्भातील पुत्र मारून टाकल्यामुळे त्याच्या डोक्यावरचा मणी उपटला गेला, आणि त्या जखमेसाठी तो तेल मागत फिरतो, अशी काही कथा आहे ना?
तेल मागणे खुळ्यासारखे हे मान्य तरी शाहाण्यासारखे वर्तन काय आहे.
प्रश्नांकित??
12 Aug 2008 - 3:20 am | प्रियाली
धनंजय, कुठे महाभारत युद्धात द्रौपदीला गर्भार ठरवताय? ;) द्रोणाचार्यांच्या मृत्युचा बदला घ्यायला अश्वत्थाम्याने द्रौपदीच्या तरूण मुलांना पांडव समजून रात्रीच्या अंधारात कापून काढले. त्याचा बदला घेण्यासाठी अर्जुन आणि अश्वत्थाम्यात घनघोर युद्ध झाले त्यात अश्वत्थाम्याने ब्रह्मास्त्र सोडले, अर्जुनानेही तेच केले पण मग सर्वनाश होईल असे लक्षात आल्याने ज्येष्ठांच्या आज्ञेवरून अर्जुनाने ते मागे घेतले. अश्वत्थामा ते करू शकला नाही आणि ते ब्रह्मास्त्र उत्तरेच्या गर्भावर, पांडवांच्या एकुलत्या एका वंशजावर आदळले अशी कथा आहे.
या सर्वांची परिणिती अश्वत्थामाच्या कपाळवरील मणी ओरबाडून घेऊन त्याला अमरत्वाची शिक्षा देण्यात झाली. ती जखम कधी भरत नाही आणि अश्वत्थामा आपल्या अमरत्वाची जखम भरून काढण्यासाठी तेल मागत फिरतो अशी आख्यायिका आहे.
12 Aug 2008 - 3:24 am | प्राजु
प्रियाली,
मी तुझ्याच प्रतिसादाची वाट पहात होते. .. मस्त.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
12 Aug 2008 - 3:27 am | प्रियाली
मीही कवितेतील अश्वत्थाम्याच्या संदर्भाबद्दल विचारात आहे. :)
अश्वत्थाम्याला आपल्या वडिलांविषयी थोडा आकस असावा असा माझा कयास (वैयक्तिक मत) इ. आहे. राजपुत्रांकडील वडिलांचे मिंधेपण, अर्जुनावर अतीव प्रेम इ. मधून अश्वत्थामा दुर्योधन, कौरवांकडे अधिक आकर्षित झाला असावा असे वाटते. कदाचित, अजाणतेपणे आपल्या मिंधेपणाला वडिल कारणीभूत असल्याचे त्याला वाटत असावे वगैरे वगैरे परंतु वरील कवितेत अश्वत्थाम्याचा संदर्भ त्या रोखाने आलेला वाटत नाही.
तेलानेही आपली जखम भरणार नाही, ती भळभळा वाहत राहणार हे माहित असले तरी तेल मागण्याचा खुळेपणा अश्वत्थामा करतो असे काहीसे असावे कदाचित.
12 Aug 2008 - 3:41 am | धनंजय
चांगली आठवण करून दिलीत - उत्तरेचा गर्भ. द्रौपदीची मुले.
12 Aug 2008 - 3:44 am | सर्किट (not verified)
अश्वत्थामा हा उल्लेखच अत्यंत अस्वस्थ करणारा आहे.
पालक मालक झालेत म्हणून सूडाने पेटलेला हा मुलगा कुणा निरपराधांची हत्या करणार, असे मला त्या कवितेवरून वाटले. आणि कोलंबाईन च्या त्या दोघांची आठवण झाली.
(द्रौपदीच्या गर्भातले नाही, तर द्रौपदीची पाच जन्म झालेली मुले अश्वत्थाम्याने अंधारात पांडव समजून मारली. महाभारताचे तज्ञ खुलासा करतीलच.)
अर्थात ती जुनी गोष्ट आहे, आणि तसे झालेले नाही, असे प्रभू साहेबांनी म्हटले आहे.
पण आज जर मला अशी दहावीच्या विद्यार्थ्याची कविता वाचायला मिळाली, तर मी त्याला सरळ मानसोपचार तज्ञाकडे पाठवीन.
- सर्किट
12 Aug 2008 - 5:50 am | चतुरंग
कपाळावरची भळभळणारी जखम भरुन काढण्यासाठी तेल घ्यायला इतरांपुढे हात पसरणार्या अश्वत्थाम्याप्रमाणे मी इतरांवर अवलंबून रहाणार नाही स्वतःच काय ती मुक्ती मिळवण्याचा प्रयत्न करीन - असा मी लावलेला अर्थ. शहाण्यासारखे वर्तन ते स्वतःच मुक्ती मिळवण्याचे असावे. कारण आधीच्याच ओळीत तो म्हणतोय की - "चारच वर्षे सक्तीची मग वाट मुक्तीची" - म्हणजे तो काही वेडेवाकडे विचार करीत नसावा असा तर्क.
बाकी सर्किट म्हणतात त्या प्रमाणे अशा प्रकारचे बिथरलेले विचार करुन कविता-बिविता करणारा दहावीतला मुलगा इतरांचे खून वगैरे करण्याच्या विचाराप्रत पोचला असावा असे वाटत नाही.
चतुरंग
12 Aug 2008 - 6:58 am | सर्किट (not verified)
बाकी सर्किट म्हणतात त्या प्रमाणे अशा प्रकारचे बिथरलेले विचार करुन कविता-बिविता करणारा दहावीतला मुलगा इतरांचे खून वगैरे करण्याच्या विचाराप्रत पोचला असावा असे वाटत नाही.
नक्की ?? नक्की ??????
पुन्हा एकदा विचार करा. नक्की ???????????
बेटर सेफ दॅन सॉरी, हा वाक्प्रचार आपल्याला ठावूक असेलच.
उद्या अशा प्रकारची दहावीतल्या मुलाने केलेली कविता तुम्हाला सापडली, तर तुम्ही काय कराल, हा मुख्य प्रश्न.
- सर्किट
12 Aug 2008 - 5:35 pm | चतुरंग
आणि मला परिस्थितीने शक्य असेल तर सर्वप्रथम त्या मुलाला भेटेन त्याची त्याच्या घरातल्या इतरांची माहिती घेईन. त्याची मनस्थिती जाणून घ्यायचा आटोकाट प्रयत्न करीन.
समुपदेशनाची आवश्यकता कोणाला जास्त आहे हे अशा ठिकाणी सहज कळते - वरच्या उदाहरणात त्याच्या घरातल्या मोठ्यांना समुपदेशनाची जास्त गरज आहे हेच दिसते.
मुलगा खून करणारच नाही असे १००% मी म्हणू शकत नाही पण शक्यता अत्यंत कमी आहे.
त्यापेक्षा मोठे धोके मला जाणवतात ते वडीलधार्यांची मनोवृत्ती झापडबंद असल्याचे. आणि हे पिढ्यानपिढ्यांचे मुके खून माझ्या दृष्टीने जास्त घातक आहेत!
मोठे हे फक्त वयाने मोठे म्हणून शहाणे हे तत्त्व अशा ठिकाणी कुचकामी असते, अनुभवानेही माणसे फार शहाणी होत नाहीत असेही मला बर्याचवेळा लक्षात येते. मोठ्यांना लहानांनी सांगितलेले चार शहाणपणाचे शब्द ऐकून घ्यायचीसुद्धा तयारी नसते, कितीही पटले तरी अहं आड येतो आणि नुकसान माहीत असले तरी माणसे वेडी वाटचाल करीत रहातात, फक्त 'मोठी' म्हणून!
चतुरंग
12 Aug 2008 - 2:39 pm | प्रियाली
खूनच करेल असे मलाही वाटत नाही पण करणार नाही याची ग्यारंटी का द्यावी? हल्लीच आसारामबापूंच्या आश्रमात ९वीतील मुलाने खून केल्याची घटना घडलेली आहे.
सदर मुलाचे मानसिक स्वास्थ ठिक नाही हे या कवितेवरून सहज कळते आहे. मानसोपचारांची खोलवर गरज आहे का ते सांगता येत नाही परंतु समुपदेशनाची गरज नक्कीच आहे. वयाच्या १५-१६व्या वर्षी सर्वसामान्य मुलं अशा कविता करत नाहीत आणि त्यांच्यावर ती करण्याची वेळही येऊ नये.
आणखी एक गोष्ट, या वयांत (टिनएजमध्ये) मुलांना आपले बरेचसे फ्रस्ट्रेशन पालकांवर काढण्याची सवय लागते. जे अशा कविता करत नाहीत ते घरांत भांडणे काढणे, घरांत न सांगता बाहेर काहीतरी उद्योग करणे, प्रेमात पडणे, खोटे बोलणे इ. करत असतात. यापैकी खोटे बोलणे हे कमी-अधिक प्रमाणात सर्वांनी केले असावे. त्यामुळे वरील कविता सर्वस्वी खरी कशावरून?
12 Aug 2008 - 12:22 pm | विनायक प्रभू
प्रिय चतुरंग्,
बुल्स आय. सुवर्ण पदक. भाग दोन लिहायची गरज उरली नाही. धन्यवाद. जखमांचे भांडवल न करता प्राप्त परिस्थिती वर मात करण्याची जिद्द पुरी करणे सोपे नाही.
आभारी विनायक प्रभु
12 Aug 2008 - 3:33 pm | प्रियाली
खुद्द जन्मदात्यांविषयी लिहिलेली कविता शाळेमार्फत* - आपल्यापर्यंत पोहोचली, हा भांडवलाचा हिस्सा नाही काय?
* शाळेतही अनेकांनी वाचली असावीच.
12 Aug 2008 - 5:01 pm | विनायक प्रभू
प्रियाली,
चुकुन वर्गशिक्षकाला मिळाली. त्यांनी गांभीर्य ओळ्खुन मुख्याधपकाकडे पोचवली. समुपदेशनाची गरज ओळ्खुन त्यांनी मला दाखवली. ती खरी आहे असे मानुन मला जमेल ती मदत केली. उपयोग झाला. Childhood Trauma and Violent Adulthood
ह्या महासागर मंथनात किती जणाना रस आहे? या घर आपलच आसा.
द्रोणाचार्याचे राजघराण्यावरची भक्ती आणि त्यामुळे घराकडे झालेले दुर्लक्ष ही वस्तुस्थिती आहे. आठ्वण केल्याबद्दल धन्यवाद. मुलाबरोबरची वेळ वाढ्वतो.
वि.प्र.
12 Aug 2008 - 5:13 pm | प्रियाली
.
खुलाशाबद्दल धन्यवाद. :)
अहो, इंटरेश्ट नसायला काय झालं? आमची पोरं पण या वयांत पोहोचणार आहेतच कधीतरी, तेव्हा लिहित रहा. जे पटेल ते उचलतो आहोतच.
वस्तुस्थिती आहे खरी. द्रोणाचार्यांना स्वतःलाही अश्वत्थामा हा अर्जुन किंवा इतर पांडवांप्रमाणे समजूतदार नाही याची खंतही असावी आणि एकंदरीत बाप-लेकांचे संबंध फार समजूतीचे नसावेत असे वाटते. मुलांबरोबर वेळ वाढवण्याबरोबरच आपली मुलं आपल्यासाठी खास आहेत ही जाणीव त्यांना करून देणेही महत्त्वाचे असते.
12 Aug 2008 - 7:16 pm | चतुरंग
Childhood Trauma and Violent Adulthood
महासागर मंथन आवडेल. अहो हे पिढ्यानपिढ्या चालणारे प्रश्न आहेत निश्चितच भरपूर शिकण्यासारखे आहे.
तुम्ही लिहीत रहा आम्ही प्रश्न विचारत/उत्तरे देत/चर्चा करत तुम्हाला आणखी लिहिते करु!
चतुरंग
12 Aug 2008 - 8:36 pm | लिखाळ
चांगले अनुभवकथन.
कृपया समुपदेशनाबद्दल आणि त्यामुळे झालेल्या सुधारणांबद्दल विस्ताराने लिहावे. समुपदेशनाची गरज आणि त्याचे फायदे याबद्दल लोकांत फार उदासिनता आणि अज्ञान असते. आपले लेख अनेक जण वाचत असतील. प्रतिसाद न देता वाचनमात्र असणारे आणि लेखाचा दुवा इतरांना देवून त्यांना माहिती देणारे अनेक जण असु शकतात. या तर्हेची माहिती संकेतस्थळांवर असणे फार गरजेचे आहे असे वाटते.
-- लिखा़ळ.
13 Aug 2008 - 10:42 am | विनायक प्रभू
प्रिय लिखाळ,
असे काही होत असेल तर त्याचे सर्व श्रेय रामदासला. खुप त्रास दिला आहे त्याला मी. मराठी टाइपींग चे गुरु आणि म्या बोलकाचे लेखक.
वि.प्र.
14 Aug 2008 - 4:23 pm | भडकमकर मास्तर
उत्तम लेख , त्यावरील चर्चाही उत्तम...
...अशाच अजून अनुभवांच्या प्रतीक्षेत,...
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/