आजोळच्या गोष्टी - ८
सकाळची सी. एस. टी. फास्ट लोकल पकडून डोंबिवलीतून निघालो. तोच रोजच्या प्रवासी मंडळींचा भजनांचा आवाज सुरु झाला. मन लावून मी भजन ऐकले. खरा सांगायचं तर मला भजनाचे बोल ऐकूच येत नव्हते किंवा गाणारे, वाजवणारे लोकही दिसत नव्हते. ऐकू येत होता तो फक्त आवाज, जाणवत होता फक्त उत्साह, सभोतालचे पळणारे जग विसरून, ईश्वर स्मरणात हरवून थोडा वेळ का होईना स्वतःसाठी जगण्याचा एक मनापासून केलेला प्रयत्न. मृदुंगाच्या थापा ऐकून सैरभैर व्हायला झालं. टाळांच्या आवाजाने मन वेडं झालं, बावरं झालं आणि पोचलं थेट कृष्णेच्या काठाशी, उंबराच्या झाडाखाली आणि दत्तमाउलींच्या पायाशी. मनाच्या कप्प्यातील आठवणींच्या मखमली झालरीतील खूप खूप आठवणी जाग्या झाल्या देवाच्या मिरवणुकीच्या, पालखीच्या.
पालखी.
आई शब्द बोलू लागलो त्याच्या आधीपासून मी दत्ताच्या पालखीला जातोय. आधी कोणाच्या कडेवर बसून, मग कोणाचा हात धरून जायचो. मामा मला प्रेमाने धोतर नेसवे, कपाळाला अष्टगंध लावून स्वारी निघायची आणि कळू लागल्यावर मी आपोआपच पालखीचा झालो. दर शनिवारी, पौर्णिमेला आणि एखाद्या भक्ताच्या विशेष विनंतीखातर औदुंबरला पालखी उत्सव साजरा होतो. तयारीपासूनच सांगायचा झालं तर मंदिरात मागच्या बाजूला बांधलेल्या एका खोलीमध्ये पालखीचे सर्व साहित्य असायचे. जादूई वाटायची ती खोली. लहान मुलांना, विशेष आगाऊ मुलांना आत जायला मनाई होती. पालखी सजवून बाहेर येईपर्यंत मी कितीतरी वेळ खोलीबाहेर बसायचो. खिशातले शेंगदाणे खात वाट बघत राहायचो. अचानक एक मंजुळ घंटानाद व्हायचा आणि "गुरुदेव दत्त" असे ऐकू यायचे. ही खूण होती पालखी बाहेर येण्याची. मी पटकन उठून साष्टांग नमस्कार करायचो. असा नमस्कार करणे तेव्हा सर्वसाधारण होते. आजकाल असा नमस्कार केला की टकामका बघतात लोक.
पालखी उठायची आणि जिथून दत्ताचे मुखदर्शन होते त्या चौथऱ्यावर ठेवली जायची. पालखीमध्ये दत्ताचे गोजिरे रूप असे. त्या विशेष रुपाला उत्सवमूर्ती म्हणतात. काही खास समयी मूर्तीची अशी आरास केली जाई. मूर्ती अशी प्रसन्न कि पाहणाऱ्याला असे वाटे कि देव आशीर्वाद देत आहे हसतमुखाने. लगेच देवापुढे लावून तयार अशा ५-१० अगरबत्त्या, कापूर आरत्या लावल्या जात. तसं गावकरी देवाला नमस्कार करत. महिला वर्ग हळदीकुंकू वाहत. नवस फेडायला आलेले, काही मागणे मागायला आलेले, आजारातून बरे झालेले असे वेगवेगळ्या स्तरातील लोक एका पातळीवर येउन हा उत्सव साकार करत.
पालखीसोबत मोठा देखणा सरंजाम असे. दंड आणि चौरी ह्यामुळे पालखीची भव्यता, शोभा अजून वाढे. दंड म्हणजे पंचधातूची भारदस्त काठी ज्यावर सुंदर नक्षी काम केलेले असे. पालखीच्या दोन्ही मुखांना (अग्रांना) पंचधातूमध्ये कोरलेले घाटदार हत्ती असत. हत्तीची सोंड नमस्कार करण्यासाठी वर तयार. अशा आविर्भावातील हत्ती पाहायला सुंदर वाटे. पंचधातूचे असल्याने हे पांढरे हत्ती ऐरावत वाटत. हत्तीच्या सोंडेच्या टोकाला अगरबत्ती खोचण्यासाठी खाशी जागा केलेली तयार असे.
पालखीच्या पुढे १ जण दंड घेऊन चालत असे. चौरी म्हणजे देवाला वारे घालण्यासाठी केलेला पंखा. त्याची मुठ अगदी कोरीव असायची. पालखीच्या मधल्या भागात उभारणारे २ जण चौरी सांभाळत. पालखी पूर्ण होईपर्यंत शक्यतो दंड खाली ठेवायचा नाही आणि चौरी फिरवणे थांबवायचे नाही. पालखी टेकवण्यासाठी २ टेकू असत Y आकाराचे आणि भगव्या रंगाचे.
पालखी उचलण्यासाठी मागे आणि पुढे १-१ जण असे. त्यांच्या हाती टेकू असे. पालखीच्या मधल्या भागात दोन्ही बाजूला १-१ माणूस सज्ज असे. पुढचा माणूस आपल्या अंदाजाने ठरलेला टप्पा घेतो आणि त्यानुसार मागच्याला वेग आणि तोल सांभाळावा लागतो. त्याने सभोवती असलेली गर्दी भेदून पुढे चालत राहायचे. मागून पालखी उचलणाऱ्याला मदत म्हणून एक-दोन जण नेहमी तत्पर असत. मागून पालखी उचलणे थोडे कठीणच. मधल्या भागात पालखी उचलणाऱ्यांना पालखीचा तोल सांभाळावा लागे. तसेच मार्गात काही अडथळा येत नाही ना ह्यावर नजर ठेवावी लागे.
३-४ पिढ्यापासून पालखीपुढे दिवटी उचलणारे मामा येत. पालखीपूर्वी तासभर येउन दिवटीला कापड-चिंध्या एकदम घट्ट बांधून तयारी करत. तयार झालेली दिवटी तेलाने माखली जाई आणि पालखीला सुरु व्हायचा अंदाज आला की प्रज्वलित केली जाई. आरतीचे तबक उचलायचा मान देशमुख काका यांचा. प्रत्येक उत्सवात त्यांची उपस्थिती अपरिहार्य. ज्यांना पालखी उचलायची आहे त्यांना धोतर आणि उपरणे घ्यावं लागे.
पालखी मंदिराला ३ प्रदक्षिणा पूर्ण करे आणि एका प्रदक्षिणेमध्ये ४ टप्पे/थांबे असत. प्रत्येक प्रदक्षिणेच्या २ टप्प्यांना दत्तगुरूंची ठरलेलीच गीते-पदे गायली जात. बाकीच्या २ टप्प्यांच्यावेळी हौशी लोकांना गाणी गीतगायन, दत्तस्तुती करण्याची संधी दिली जाई. माणसे अगदी मन लावून गाणी म्हणत. पालखीपुढे गायनसेवा करण्यात सर्वात अग्रेसर नाव कै. राम काका यांचे. ते म्हणजे दत्त दरबारातील आद्य गायक. अतिशय गोड आवाजात गाण्याचे एक-एक कडवे खुलवून गाण्यात आणि इतरांना गाण्यात सामावून घेण्यात त्यांचा हातखंडा. जितका मधुर आवाज तितका तबला, हार्मोनियम यावर प्रभुत्व ते इतरांना गाण्यास प्रवृत्त करत आणि लोकांचा सहभाग वाढवत. कवी सुधांशू यांच्या "गीत दत्तात्रय" संग्रहातील सर्व गाण्यांना त्यांनीच लयबद्ध केले होते. टाळ वाजवताना काकांकडे बघत रहावेसे वाटे. मिटलेले डोळे, गाता गळा आणि किणकिण असा प्रसन्न टाळ वाजवताना त्यांना बघणे हा एक सोहळा असे. मला आठवतय, एका पहिलीतील मुलीने गाणे म्हणाले होते तेव्हा काकांनी तिलाही साथ दिली होती टाळ वाजवून. आता काका नाहीत. त्यांचा मुलगा संतोष सर्वार्थाने काकांची उणीव भरून काढतो. माझी लाडकी आदिती मामी गायिका असल्याने दर शनिवारी पालखीपुढे गाणे म्हणे. तिला साथ द्यायला माझी भावंडे जयदेव, भक्ती आणि कीर्ती.
पालखी समाप्त झाल्यावर आरती, प्रसाद पार पडे. तसेच लोकांना आरतीचे दर्शन आणि अंगारा घेता यावा म्हणून तबक फिरवले जाई. प्रसाद वाटण्याचे काम मी घ्यायचो कारण त्यामुळे प्रसाद दोनदा घ्यायला मिळे. प्रसाद म्हणून शिरा, वाटली डाळ कधी केळी, सफरचंद. पालखीच्या वेळी सारा मंदिर, घाट परिसर एक रंगमंच बनून जातो. एक एक टप्पा पार पाडत पालखी पूर्ण व्हायची. मनात असं वाटे की ही पालखी, हे टप्पे कधी संपूच नयेत. त्यात सहभागी होणाऱ्याची तन्मयता, भक्तिभाव पाहून खूप समाधान मिळे आणि आपण ह्या सोहळ्यात सहभागी होऊ शकलो ह्यामुळे कृतकृत्य वाटे.
हृदयी माझ्या नित्य विराजे, दत्त दिगंबर दैवत माझे |
पुनरागमनायचं |
प्रतिक्रिया
19 Jan 2015 - 1:19 pm | बोका-ए-आझम
अतिशय सुरेख वर्णन!
19 Jan 2015 - 1:28 pm | एस
+१
20 Jan 2015 - 6:28 am | मुक्त विहारि
छान लिहीत आहात.
20 Jan 2015 - 7:42 am | अजया
छान लिहिताय.पुभाप्र.