आय टी मध्ये राजीनामा देणे, या क्रियेला पेपर टाकणे असे म्हणतात, त्यावर हि कविता.
साल्याने पेपर टाकलाय...................
तो रोज ऑफिसला येतो
वेळेत येतो; वेळेत जातो
नऊ तास भरले नाहीत; तर चिंता करतो
कमी भरले तास; तर नंतर भरून काढतो
साहेबाने काम दिले; तर नाश्त्याला पण जात नाही
साहेब जागेवर असताना; जागचा उठत नाही
कितीपण महत्वाचे काम असो; साहेब गायब झाल्याशिवाय हा जागचा हालत नाही
साहेब खुर्चीत यायच्या आत, जागेवर यायची सवय काही जात नाही
जास्त सुट्या घेत नाही,
घेतली तरी अप्रुव्हल घेतल्याशिवाय; कलटी टाकत नाही
ओव्हर टाइम कधी मागत नाही
कॉम्प-ऑफ कधी घेत नाही.
मोबाईल वर फोन आला; तर साहेबासमोर बोलत नाही
लँडलाईनचा वापर; साहेबासमोर करत नाही
साहेबाची नजर चुकवून; एक्सेल मध्ये गेम खेळत नाही
आणि काम संपवले तरी; टाईमपास करत नाही
तक्रार न करता; साहेब टाकेल तेवढे काम करतो
सरकारी रिपोर्ट पण; मागीतल्या मागीतल्या बनवतो
टीम मेंबर आला नाही; तर त्याची पण हमाली करतो
काम संपले तरी; भूरसटलेली ट्रेनिंग करत बसतो
इतका बिचारा साहेबाला घाबरतो
कालपासून एकदम; बदलला आहे
उशिरा येऊन लवकर; जायला लागला आहे
न सांगताच सारखा; फिरायला लागला आहे
नेमका पाहिजे तेंव्हा; गायब व्हायला लागला आहे
साहेबाने काम दिले तर; "आय विल ट्राय" म्हणतोय
कुणाचा फोन आला तर; निवांत आहे म्हणतोय
मित्राला फोन करून; चहा मारू म्हणतोय
"प्रोजेक्ट माझा जाम बोर आहे” असे; बसल्या जागेवर म्हणतोय
साहेब जागेवर आला कि; मुद्दाम उठून बाहेर जातोय
फोन वर; "काही नाही रे टाईमपास चाललाय" म्हणतोय
प्रत्येक मिटिंगला; उशिरा येतोय
मधेच फोन आला तर; बिनधास्त उठून जातोय
त्याच्या प्रत्येक कृतीत; "दिवारमधला" अमिताभ दिसतोय
"खान चाचा; अगले हप्ते और एक कुली; हप्ता देनेसे इन्कार करेगा"; असे सगळे वाटतेय
मला वाटले दोस्त आपला; टेन्शनमधे बसलाय
विचारले तर कळले साल्याने; पेपर टाकलाय
मूळ लिंक - http://www.saarthbodh.com/2011/04/blog-post_29.html
-सार्थबोध
www.saarthbodh.com
प्रतिक्रिया
3 Dec 2014 - 3:50 pm | मदनबाण
वाह वाह... लयं भारी ! :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- पाकमध्ये दहशतवादी हाफिझ सईदच्या सभेसाठी विशेष रेल्वे
3 Dec 2014 - 3:58 pm | टवाळ कार्टा
लय भारी....दिल को छू लिया आज :)
3 Dec 2014 - 6:36 pm | राजेंद्र मेहेंदळे
एकदम जबरा...आवडली
3 Dec 2014 - 6:48 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आवडली कविता.
-दिलीप बिरुटे
3 Dec 2014 - 7:08 pm | कपिलमुनी
चेपु / व्हॉटस अॅप माध्यमातून पूर्वी वाचली होती ! तुमची आह्हे आज कळले :)
छान आहे !
4 Dec 2014 - 9:05 am | सार्थबोध
होय, इतके दिवस व्हात्स्प आणि चे.पु. वर होती, काल मिसळपाव वर प्रस्तुत करावी म्हटले
3 Dec 2014 - 7:24 pm | श्रीरंग_जोशी
मा. तं. मध्ये काम करत असल्याने अधिकच भावली.
3 Dec 2014 - 7:40 pm | संचित
मस्त जमलीय
3 Dec 2014 - 8:23 pm | तिमा
ऐला! मी तर सात नोकर्या बदलल्या! राजीनामा वरच्या खिशांत तयारच असायचा.
3 Dec 2014 - 8:50 pm | हाडक्या
असे बोलणार्यांचे कायम अप्रूप वाटतेय कारण आज काल तर सगळे इमेलमार्फत पेपर टाकतात. मग हे लोक खिशातला राजीनामा कोणाला देतात ?
(तीन वेळा इमेलने पेपर टाकलेला)
4 Dec 2014 - 11:05 am | तिमा
जुन्या काळातली जुन्या मानसांची गोस्त हाय.
4 Dec 2014 - 5:12 pm | हाडक्या
बर्रर्र .. अशेल अशेल.. ;)
10 Dec 2014 - 2:05 pm | चिनार
साहेबाकडे डोळे रोखून त्याच्या हातात राजीनामा देण्यात जी मजा आहे ती ईमेल करण्यात नाही… कधी करून बघा
-- ईमेल असुनही लेखी तीन वेळा राजीनामा दिलेला !
3 Dec 2014 - 8:44 pm | यसवायजी
मस्तं हो.
णॉन ऐटीत पण पेपर टाकतात की. टीप कवितेच्या खाली दिली असती तर थोडा सस्पेन्स राखता आला असता.
4 Dec 2014 - 9:06 am | सार्थबोध
यसवायजीजी, म्होरच्या येळेला ध्यानात ठेवतो
3 Dec 2014 - 8:50 pm | पिंपातला उंदीर
आवडल : )
3 Dec 2014 - 8:50 pm | हाडक्या
मस्त हो..
3 Dec 2014 - 10:50 pm | मुक्त विहारि
जुने दिवस आठवले....
आजकाल रोजंदारीवर काम करत असल्याने, पेपर टाकण्यातली मज्जा गेली...
4 Dec 2014 - 6:18 am | खटपट्या
चांगलंय !! आम्ही बाबा पेपर न टाकताही असेच वागतो !!
4 Dec 2014 - 8:47 am | थॉर माणूस
याच आशयाचा एक विनोद वाचला होता कुठेतरी...
बॉस के भयानक चुटकुलेपर सभी लोग जोरसे हसने लगे, सिवाए राहुल के...
बॉसः राहुल तुम्हे मेरा जोक पसंद नही आया?
राहुल: सर, मेरा दुसरी कंपनी मे हो गया. ;)
4 Dec 2014 - 9:07 am | सार्थबोध
सर्वांचे मन:पूर्वक आभार , वेळ काढून वाचल्याबद्दल आणि प्रतिक्रियांबद्दल
4 Dec 2014 - 11:41 am | समीरसूर
खूप छान! आवडली. :-) खुसखुशीत आणि वास्तवाला धरून...
पेपर टाकणारे कंपनीमध्ये एकदम असे खुशनुमा विरक्ती आल्यासारखे वागायला लागतात.
पाण्यातल्या तेलासारखे पाण्यात राहून अगदीच निराळे राहतात.
पेपर टाकला तरी 'मी शेवटच्या क्षणापर्यंत सिन्सीअरली काम करणार' असा मोठा आव आणतात.
चिल्लर कामं करायला कसेबसे तयार होतात; थोडं किचकट काम असलं तर कलटी मारतात.
मॅनेजरने सांगीतलेल्या फीडबॅकमध्ये लक्ष असल्याचं दाखवतात; डोळे मात्र सगळं खरं सांगतात.
अप्रेजल जर असेल तर दिलेली सगळी रेटिंग्ज मान्यच करून टाकतात.
शेवटच्या दिवशी 'आय वुईल मिस धिस कंपनी'ची खोटी खोटी धून वाजवतात.
'आय लर्नड अ लॉट फ्रॉम धिस कंपनी' अशी कुणालाच न पटणारी थाप मारतात.
काहीही असले तरी राहणारे त्यांच्याकडे असुयेच्या नजरेने बघतात...
मेरा नंबर कब आयेगा असं पुटपुटत चरफडत पुन्हा कामाला लागतात.
5 Dec 2014 - 9:40 am | विश्वनाथ मेहेंदळे
हे जर खरे असेल तर ours is generation of idiots असे म्हणावे लागेल. नोकरी बदलण्यात काही चुकीचे नाही, मात्र सतत तेच ध्येय असले(जे वरच्या वाक्यातून ध्वनित होत आहे) तर प्रॉब्लम है बॉस. जोवर आनंदात राहता येते तोवर रहावे, आवडेनासे झाले की नोकरी बदलावी. काय कठीण आहे ?
5 Dec 2014 - 10:54 am | समीरसूर
काही अपरिहार्य परिस्थितीमध्ये कर्मचार्यांमध्ये अशी भावना रुजायला सुरुवात होते - जसे की - कंपनीमध्ये अनागोंदी माजणे, पगार कमी होणे, लेऑफची भीती, काम नसणे (बेंच), मनासारखे आणि योग्यतेप्रमाणे काम नसणे आणि बरेच काही. त्यावेळी प्रत्येक सोडून जाणार्याचा हेवा वाटतो. आजकाल असा अनुभव बर्याच कंपन्यांमध्ये येतो. :-) एकूणात कंपनीमध्ये प्रोत्साहनपर वातावरण राहिले नसेल तर हा अनुभव येतो.
आवडेनासे झाले म्हणून लगेच नोकरी बदलता आली असती तर जग खूप सुखी झाले असते. :-) हे वाटते तितके सोपे नाही. किंबहुना हे बर्याचदा कठीण असते आणि अशा काळात कर्मचार्यांची मानसिकता खूप नकारात्मक झालेली असते.
5 Dec 2014 - 8:02 pm | विश्वनाथ मेहेंदळे
अपरिहार्य परिस्थिति ही क्वचित आली पाहिजे. बऱ्याच लोकांचा सूर असा असतो की जणू ते नॉर्मल आहे आणि खुष राहण्याच्या संधि दुर्लभ आहेत.
बरेच निर्णय हे आपले चॉइसेस असतात, नाइलाज नव्हे. हे ज्या दिवशी आपण मान्य करू, त्या दिवशी निम्मे प्रॉब्लम सुटतील.
5 Dec 2014 - 11:02 am | vikramaditya
एकाच ठिकाणी फार काळ काम करणे सध्या बावळटपणा मानले जाते. सतत पगारवाढ, प्रमोशन, ईंसेंटीव्ह च्या अपेक्षा ठेवुन बरेच लोक सारखे एम्प्लॉयरच्या नावाने खडे फोडत असतात. आपल्यावर फार अन्याय होवुन राहीला आहे अशी बॉडी लँग्वेज ठेवुन वावरतात. ह्या पार्श्वभुमीवर तुमचा प्रतिसाद समर्पक वाटला.
4 Dec 2014 - 12:50 pm | वेल्लाभट
पण पेपर टाकणे हा वाक्प्रचार सर्वसाधारणच रूढ आहे. आयटीतून 'आला असावा' कदाचित. म्हणतात मात्र सगळीकडेच.
हो, वागण्यातला हा बदल इतका लक्षात येणारा असतो की बास ! अर्थात. द मूमेट यू रिजाईन; तुम्हाला सावत्र वागणूक मिळू लागते हेही तेव्ढचं खरं आहे.
4 Dec 2014 - 12:51 pm | वेल्लाभट
कंपनी सोडण्याबाबत एक अतिशय खरं वाक्य ऐकलं होतं....
you don't leave the company; you leave the manager.
5 Dec 2014 - 2:28 am | खटपट्या
हे खोटेही ठरलेले आहे. माझा मित्र मॅनेजरला कंटाळून ज्या कंपनीत गेला तिथे काही दिवसांनी तोच मॅनेजर त्याच्या डोक्यावर येउन बसला. जग फार लहान असते हेच खरे.
पेपर टाकल्यावर एच आर बरोबर जी एक्झीट इंटरव्यू होते त्यात कोणावरही व्यक्तीगत टीका करण्याचे कटाक्षाने टाळावे. ज्यावर टीका कराल तो परत नवीन कंपनीमध्ये तुमचा सहकारी कींवा बॉस बनू शकतो.
5 Dec 2014 - 10:47 am | vikramaditya
you don't leave the company; you leave the manager.
खरे आहे. तोच मॅनेजर परत बॉस बनला हा भाग वेगळा आहे. वरील वाक्य सुचवते कि बहुतांश लोक त्यांच्या ईमिडिएट बॉसला कंटाळुन जॉब सोडतात. जग लहान आहे आणि परत त्याच लोकांचा सामना करावा लागतो हे ही खरे.
5 Dec 2014 - 12:37 pm | मदनबाण
एकाच ठिकाणी फार काळ काम करणे सध्या बावळटपणा मानले जाते.
अगदी. अगदी ! मला सध्याच्या कंपनीत ७ वर्ष पूर्ण झाली आहेत. पण काही वैयक्तिक कारणांमुळे अजुन इथे टिकुन आहे आणि इथला गाषा गुंडाळायची वेळ आलीली नाहीये. माझ्या कॉलनीतला मित्र काही काळा पूर्वीच माझ्या कंपनीत जॉइन झाला आहे, त्याने बर्याच कंपन्या बदलल्या,तो मला म्हणतो बरे झाले तू अजुन एकाच ठिकाणी आहेस ! अनेक उड्या मारण्याचे जसे फायदे आहेत तसे तोटेही आहेत. ते त्याने मला सांगितले. त्यातले काही मुद्दे पटले देखील.
कंपनीमध्ये अनागोंदी माजणे, पगार कमी होणे, लेऑफची भीती, काम नसणे (बेंच), मनासारखे आणि योग्यतेप्रमाणे काम नसणे आणि बरेच काही. त्यावेळी प्रत्येक सोडून जाणार्याचा हेवा वाटतो. आजकाल असा अनुभव बर्याच कंपन्यांमध्ये येतो.
या बाबतीत देखील सहमत ! असे अनुभव बहुधा प्रत्येकालाच येत असावेत. ड्रीम जॉब मिळणे ही खरचं कठीण गोष्ट आहे. मला वेगवेगळ्या प्रोजेक्ट्स वर आत्ता पर्यंत काम करायला मिळाले आहे,एसएपी मधे मधे येण्याचे माझे ध्येय होते, ते पूर्ण करण्यासाठी अनेक वर्षांची धडपड, मेहनत करावी लागली ! इथे मिपावर देखील मला वाटत काही जणांना फार पूर्वी या बद्धल माहिती विचारल्याचे स्मरते,बहुधा मीनल ताईला सुद्धा या बद्धल विचारण्या केली होती. आता एसएपी मधे येउन बर्यापैकी काळ लोटला आहे,पण जरा आधी संधी मिळाली असती तर अजुन बरेच पुढे जाउ शकलो असतो अशी जाणीव झाली आहे... असो. काही गोष्टी नेहमीच आपल्या नियंत्रणा पलिकडे असतात.नॉन आयटी आणि आयटीचा नोकर्यांचा अनुभव घेतल्यावर अजुन वेगळे काही तरी शिकायला आणि करायला मिळावे असे आता वाटतयं खरं... उलट्या-सुलट्या शिफ्ट, सातत्याने प्रचंड ताणात काम करुन मेंदू बर्यापैकी बधिर झाला आहे, तरी सुद्धा जिद्द अजुन संपलेली नाही ! :)
आयटी कंपन्यांची आपल्या देशातली परिस्थीती बदलायला हवी ! लोक बरंच काही करु शकण्याचे स्कील सेट चे असतात,पण त्यांना योग्य संधी आणि वाव आणि महत्वाचे म्हणजे प्रोत्साहन दिले जात नाही. एक विशिष्ठ वय झाल्यावर आयटीतल्या जुन्या मंडळीचे कठीण असते असं चित्र सध्या तरी डोळ्या समोर निर्माण होत आहे.कारण सातत्याने तरुण मुलांचा भरणा असतो, त्यांच्यात एन्थु भरलेला असतो... दे आर जस्ट लाईक ए ब्लॅक, सिडी ज्यावर काहीही लिहले तरी ती प्ले होते.जुन्या मंडळीना नविन नविन स्कील वाढवण्याच्या नावावर कशालाही जुंपतात !
सध्या नविन काही घडेल या अपेक्षेवर आहे, आहे ती हमाली नेटाने करतो आहे... येणारा काळच काही नविन लिहील याची खात्री आहे.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- आज स्वाक्षरीचा संप आहे.
5 Dec 2014 - 10:49 pm | खटपट्या
एकदा अनुभव १५ वर्षांच्या वर गेला की नोकरी मिळ्णे कठीण जाते. एकतर मोठे पॅकेज द्यावे लागते. आणी बराच भारतियांचा टेक्नीकल ट्च गेलेला असतो.
परदेशात बरेच लोक आहेत जे २५/३० वर्षे फक्त टेक्नीकल काम करत असतात. पण भारतात मात्र ८/१० वर्षांच्या अनुभवानंतर मात्र मॅनेजरपदाचे डोहाळे लागतात. यात मग ज्यांना टेक्नीकल कामाला चिकटून रहायचे आहे त्यांची हेटाळणी सुरु होते. "बारा वर्ष झाली, अजुन कोड लिवत बसलंय" असे शेरे मारले जातात. एखाद्याला टेक्नीकल काम करत आयुष्य काढायचे असेल तर त्याचा काय दोष? पण तो टीम मॅनेज करु शकत नाही असा ठपका बर्याच वेळेला ठेवला जातो.
टेक्नीकल आदमी कभी भुका नही मरता, अपनी रोजी रोटी कही ना कही ढुंड हे लेता है.
पण "निव्वळ मॅनेजर" ज्यांचा टेक्नीकल ट्च सुटलेला असतो त्यांची मत्र नोकरी मिळवताना मारामार होते.
7 Dec 2014 - 5:30 pm | मदनबाण
एकदा अनुभव १५ वर्षांच्या वर गेला की नोकरी मिळ्णे कठीण जाते.
अगदी खरंय ! थोडक्यात सांगायचं झालं तर आयटी इंडस्ट्रीसाठी युजलेस होणे !
परदेशात बरेच लोक आहेत जे २५/३० वर्षे फक्त टेक्नीकल काम करत असतात. पण भारतात मात्र ८/१० वर्षांच्या अनुभवानंतर मात्र मॅनेजरपदाचे डोहाळे लागतात.यात मग ज्यांना टेक्नीकल कामाला चिकटून रहायचे आहे त्यांची हेटाळणी सुरु होते.
हो... ज्याला जे काम चांगले येत असते त्याला ते कंटिन्यू करायला परदेशात मुभा असते, तर आपल्या इथे अश्या माणसाला अडचण / अडगळ मानण्यातच धन्यता मानली जाते ! मॅनेजर होण्यासाठी धडपणारे अनेक असतात...त्यासाठी ते कोणत्याही थराला जाण्यास मागे-पुढे पहात नाहीत.माझ्या वया एव्हढा अनुभव असणारे पण एकाच प्रकारचे काम करणारे क्लायंट साईडला अनेक आहेत.
एखाद्याला टेक्नीकल काम करत आयुष्य काढायचे असेल तर त्याचा काय दोष? पण तो टीम मॅनेज करु शकत नाही असा ठपका बर्याच वेळेला ठेवला जातो.
टेक्नीकल आदमी कभी भुका नही मरता, अपनी रोजी रोटी कही ना कही ढुंड हे लेता है.
पण "निव्वळ मॅनेजर" ज्यांचा टेक्नीकल ट्च सुटलेला असतो त्यांची मत्र नोकरी मिळवताना मारामार होते.
१०० % सत्य ! सध्या मी जे काम करतो त्यात चेंज मॅनेजमेंट्,रिलीज मॅनेजमेंट,इंसिडंट मॅनेजमेंट तसेच अनेक टिमशी कोऑर्डिनेट करण्याचे काम असते,जवळ ९५% पेक्षा जास्त दिवसाचे काम हे फक्त मेलवरव चालते.यात अर्पुव्हल्स देणेही आले. या कामाच्या स्वरुपामुळे आधी जे बेसिस आणि सिक्युरिटीचे काम करायचो,ते आता जवळपास विसरलो आहे.त्याचे मुख्य कारण रोजच्या वापरातल्या टी-कोडचा वापर कमी होणे,कारण मुळातच सर्व्हरवर लॉगिन करुन हे कोड रन करण्याची वेळच कमी येते ! क्लायंट साइडने जरी इएम असलो तरी कंपनी साईडने एम चे पद नाही. त्यामुळे टेक्निकल आणि मॅनेजर यांच्या मधल्या अवस्थेत आहे. मध्यंतरी झालेल्या एका कॉल मधे तुमचा टेक्निकल टच जाउन देउ नका अशा स्वरुपाचे बोलणे आणि इतर गोष्टी झाल्या ! आता जी गोष्ट वापरली जाणार नाही त्याचा टच राहणार कसा ? बरं उध्या हा प्रोजेक्ट संपला की परत नव्याने जुन्या गोष्टी शिकणे आलेच...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी:- RJ Dhvanit on Guitar Guruwar Ahmedabad with Aishwarya Majmudar { Cool Video,Must Watch }
9 Dec 2014 - 3:15 pm | कपिलमुनी
कधी कधी हे डोहाळे कंपनीला पण लागतात.
माझ्या इथे मीच सांगतो , गप कोड लिहू द्या तर मॅनेजर म्हणतो, यु नीड टू ग्रो !
9 Dec 2014 - 3:47 pm | टवाळ कार्टा
अगदी अगदी.... :(
10 Dec 2014 - 9:39 am | थॉर माणूस
माझ्या मते त्याला वेरीएबल पे काँपोनंट नावाचं एक कारण असावं. ;)
डॅमेजर झालात की झपकन वाढतं म्हणे ते...
10 Dec 2014 - 9:57 am | खटपट्या
असे काही नाही हो. नोन मैनेजरला पण वेरिएबल कंपोनन्ट असतेच की. सुरवातिला आपण किती बारगेन करतो त्यावर आहे.
4 Dec 2014 - 1:10 pm | सुबोध खरे
मी अठरा वर्षे सरकारी नोकरी केली. तेथे कोणीही मला नोकरीवरून काढू शकत नव्हते त्यामुळे वरिष्ठाला खुश करण्याची गरज भासली नाही. उलटे एखाद्या वेळेस त्यांनी छळ केला तर I am putting up papers म्हटल्यावर त्यांचीच तारांबळ उडत असे कारण असा तरुण चांगले काम करणारा वैद्यकीय अधिकारी सोडण्याचा विचार का करत आहे याची दिल्लीतून "विचारपूस" होत असे. त्यामुळे वरिष्ठ लोक काळजी घेत असत.
माझ्या एम डी साठीच्या प्रवेश परीक्षेसाठी मी ६० दिवसाची रजा मागत होतो. ती काही मिळत नव्हती सारखी काही तरी करणे सांगितली जात होती शेवटी एक दिवस ४२ दिवस बाकी असताना मी चिडीला येउन वरिष्ठाला सांगितले कि मी आजच राजीनामा देत आहे. माझी सुट्टी दुसर्या दिवसापासून मंजूर झाली.
परंतु काही बोजा झालेले अधिकारी बदलीसाठी मी राजीनामा देईन अशा धमक्या देत असत. सहसा हे राजीनामे मंजूर होत नसत. एकदा अशा १० अधिकार्यांनी आपले "पेपर्स पुट अप" केले असताना ते महासंचालकांनी तातडीने मंजूर केले.यानंतर त्यातले ८ लोक दिल्लीच्या वार्या करताना आढळले आपला राजीनामा परत घेण्यासाठी. पण सर्वाना एक महिन्यात नारळ दिला गेलाच. त्यानंतर असे बोजे अधिकारी बरेच दिवस "गप्प" होते.
4 Dec 2014 - 2:35 pm | vikramaditya
हे सगळ्या चाकरमान्यांचे आवडते स्वप्न असावे. 'पेपर पुट ईन' केल्यावर काही दिवस माणुस जणु स्वर्गातच असतो.
कविता छान जमली बरं का!
4 Dec 2014 - 2:38 pm | सिरुसेरि
attrition आणी recession या एकाच नाण्याच्या दोन बाजू असतात . त्यामुळे attrition च्या काळात नवीन offer मिळाली आणी पेपर टाकले तरी शांत राहावे . फार दंगा / शायनींग करु नये . तसेच recession च्या काळात जरी नवीन offer नाही मिळाली तरी खचून जाऊ नये . शांतपणे प्रयत्न चालू ठेवावेत .
10 Dec 2014 - 1:40 pm | आयुर्हित
पण जर recessionproof होता आले तर?
4 Dec 2014 - 9:31 pm | ससन्दीप
याला आम्ही 'हनीमून पिरियड' असे म्हणतो . सर्व काही छान छान वाटते. एकदम रिलैक्सपणा वाटतो.
डेडलाईन चे बंधन नसते. विशेष म्हणजे नवीन जॉबच्या हाइक मधून काय काय करावे हे ठरवताना अजून धमाल येते.
मी सुद्धा खूप दिवस या क्षणाची वाट बघतोय.
5 Dec 2014 - 10:14 am | मदनबाण
बाकी या धाग्यामुळे मला ही जाहिरात आठवली...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- आज स्वाक्षरीचा संप आहे. ;)
5 Dec 2014 - 12:54 pm | चुकलामाकला
मलाही हेच आठवले :).
9 Dec 2014 - 6:44 pm | गणेशा
मस्त कविता ..
10 Dec 2014 - 12:57 pm | कलंत्री
एकदा की भूमिका बदलली की आपोआपच माणसाच्या वर्तनात बदल जाणवतो. माणूस जितका जास्त संधीसाधू तितका तो टोकाची भूमिका घेऊ शकतो. दुसरे म्हणजे गरजवंताला अक्कल नसते किंवा काहीलोकांना शिंगे लवकर फुटतात असे म्हटले जाते.
एकंदरीतच एका छोट्या कवितेतून मोठा विषय मांडला गेला आहे असे नमूद करावेसे वाटते. सर्वच प्रतिसाद सध्याच्या स्थिंत्यतराचे प्रकटन करत आहे असे जाणवते.
10 Dec 2014 - 1:39 pm | आयुर्हित
भावना पोचल्यात.
त्याचे अभिनंदन!
आपण कधी पेपर टाकताय?
10 Dec 2014 - 2:17 pm | विटेकर
फार जिव्हाळ्यचा विषय !
अगदी ड्रिम कंपनीत काम करणार्याला देखील कधीतरी पेपेर टाकावा वाटतो....
मी २६ वर्षांच्या नोकरीत फक्त ३ नोकर्या बदलल्या !! हे आजच्या मानाने अगदीच " हे " आहे . ही माझी फ्क्त ४ थी कंपनी आणि इथे आता १० वर्षे झाली. इथेच नवीन काम शोधतोय ... बाकी सुख आहे इथे!
कविता उत्तम !