कोकणातली भुतं

कल्पतरू's picture
कल्पतरू in जनातलं, मनातलं
7 Sep 2014 - 8:48 pm

कोकण, या नावात भरपूर काही साठवलय. त्या महासागरांच्या पोटात ज्या गोष्टी दडल्यात ना त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त गोष्टी आमच्या कोंकणात आणि इथल्या माणसांमध्ये दडल्यात. आता कोकण म्हणजे नदी नाले डोंगर दऱ्या हे सगळं आलंच पण या सगळ्याबरोबर एक इनबिल्ट गोष्टंसुद्धा येते ती म्हणजे कोकणातली भूतं. लहानपण गेलं ते यांच्या गोष्टी ऐकण्यातच आणि अनुभवण्यातपण त्यातलेच काही मोजके गमतीदार किस्से खाली दिलेत.

रात्रीची वेळ होती आणि अचानक वीज गेली. आता कोकणात पाऊस कधी पडेल आणि वीज कधी जाईल याचा काही भरवसा नसतो. तर उन्हाळ्याचे दिवस होते त्यामुळे लगेचच घामाच्या धारा लागल्या. इथे वर्षाचे १२ महिने धाराच असतात घामाच्या नाहीतर पावसाच्या. आमचा पप्या उकडतंय म्हणून बाहेर आला इतक्यात, अचानक समोरच्या सुध्याच्या घराच्या छतावर काहीतरी दिसलं. एकतर रात्र त्याच्या जोडीला वीज न्हवती त्यामुळे ते अंधुक दिसत होतं. वेगळीच आकृती होती कोणीतरी माणूस बसल्यासारखं वाटत होतं पण काय आहे हे कळायला नक्की मार्ग न्हवता. बस्स, माणसाना विषय भेटला. लाईट गेल्यामुळे करण्यासारखंसुद्धा काही नव्हतं. माणसं आपापल्या-परीने अकलेचे तारे तोडू लागले. कोणी म्हटलं हा भानामातीचा प्रकार आहे. कोणी म्हटलं कोणीतरी करणी केली, तर कोणी रेकी. सगळ्या गूढ विद्या होत्या नव्हत्या त्या सगळ्यांची नावं त्या ५ मिनिटांमध्ये माझ्या कानावरून गेली. एकाने तर कहर केला त्याच्या मते सर्वपित्री नुकतीच होऊन गेलीय आणि आणि घरावर जे सूप ठेवतात त्यामध्ये सुध्याच्या बापाचा आवडता मेनू चहा बटर नव्ह्ता. त्यामुळे तो सुध्याचा बापच आहे त्याला चहा बटर द्या मग तो निघून जाईल. दोन दिवसांपूर्वी सुध्याच्या बापाला घराच्या अंगणात काठी घेऊन बसलेला पाहिला अशी दुसऱ्याने री ओढली. एव्हाना बर्यापैकी गर्दी जमली होती आणि उलट सुलट चर्चा सुरु होत्या, इतक्यात दामू वायरमन समोरून आला. उत्सुकता म्हणून तो पण गर्दीत सामील झाला. आणि जसा त्याला विषय समजला तसा तो एकेकाला लाखोली वाहायला लागला. पलीकडच्या घरी पूजा होती आणि ज्याला माणसं सुध्याचा बाप समजत होती ते दोन स्पीकर होते जे दामू वायरमनने सुध्याच्या घराच्या छपरावर लावले होते. एक दोन मिनिट स्मशान शांतता आणि नंतर जो तो जोर जोरात हसू लागला. या सगळ्या गोंधळात पप्याने कधीच पोबारा केला होता.

गणपतीचे दिवस होते आणि हे दिवस म्हणजे रात्र आणि दिवस सारखेच. माणसं रात्रभर जागी असतात आणि वेगवेगळे विषय सुरु असतात. असाच एका रात्री स्मशानातल्या भूतांचा विषय निघाला आणि पैज लागली. स्मशानात जायचं आणि तिथल्या शंकराच्या देवळात एक लहान पणती आहे ती घेऊन यायची. राजाने विडा उचलला. समशान एक दीड किलोमीटर अंतरावर होतं आणि तो रस्ता आमच्या बाळू काकाच्या घरासमोरून जात होता. राजा निघाला, खूप धीट माणूस आणि त्यापेक्षाही धीट आमचा बाळू काका. बाळूकाकाने नेमका त्याला स्मशानात जाताना पाहिला. राजा गेला आणि त्याने ती पणती आणली, आणि गणपती जवळच्या माणसाना दाखवली. आता ज्याने पैज लावली होती त्याचे पाचावर धारण बसली. खात्री करण्यासाठी त्याने ४-५ माणसं बरोबर घेतली आणि स्मशानाकडे निघाला. बाळू काकापण त्याचीच वाट पाहत होता. त्याने घोंगडी घेतली आणि या सगळ्यांच्या अगोदर स्मशानात जाऊन दबा धरून बसला. हे चार पाच जण स्मशानात पोहचले आणि नेमका त्याच वेळी विचित्र आवाज काढत बाळू काका घोंगडी अंगावर घेऊन त्यांच्या पुढ्यात. सगळ्यांची फे फे उडाली, पायातल्या चपला तिथेच टाकून जो तो वाट मिळेल तिकडे धूम पळत सुटला. हे चार जण पुढे बाळू काका त्यांच्या एकटा त्यांच्या पाठीवर. प्रत्येकाला मंदिर गाठायची घाई होती. शेवटी कसेबसे मंदिराजवळ पोहचले. पाठीमागून बाळू काका आलाच. खरा प्रसंग समजल्यावर प्रत्येकाची हसून हसून मुरकुंडी वळली होती.

जुनी गोष्ट आहे नुकतीच दोन चाकी गाडी गावात नवीन घेतली होती एकाने. त्याला कंपनीत रात्रपाळी असायची. तसा तो भित्राच होता. त्यात गावातली माणसं फुकटचे सल्ले देण्यात एक्स्पर्ट. त्याला लोकांनी सांगितलं होतं ‘बाबा रे रात्रीचा अमुक अमुक ठिकाणावरून एकटा जातोस सांभाळून येत जात रहा. तो परिसर झपाटलेला आहे. रात्री एखादी पांढरी साडी नेसलेली बाई दिसली किंवा संशयास्पद काही आढळलं तर सरळ त्यावरून गाडी न्यायची आपल्याला काही होत नाही’. ही गोष्ट त्याला पटली होती. असाच एका रात्री बिचारा कंपनीत जायला निघाला, आणि समोर नेमकी एक म्हैस आली. याची भंभेरी उडाली. याला तो कान मंत्र आठवला अंगावरून गाडी न्यायचा. बस्स भाईने गाडी फुल गिअर मध्ये टाकली आणि सुसाट वेगामध्ये त्या जखिणरुपी म्हशीच्या अंगावर घातली. कशात काय आणि फाटक्यात पाय. ती खरोखर म्हैस होती. तो बिचारा दगडू म्हशीला शोधून शोधून दमला होतां आणि याने भूत समजून गाडी अंगावर घातली. साहेबांची स्वारी बरेच दिवस हात पाय गळ्यात अडकवून दवाखान्यात होती. आता दुसऱ्यादिवशी दुचाकीच्या चालकाचा बावळटपणा तिखट मीठ लाऊन सांगीतला जात होतां, आणि यामध्ये ते सल्ले देणारे पण सामील होते हे नवीन सांगायला नकोच.

विनोदलेख

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

7 Sep 2014 - 11:53 pm | मुक्त विहारि

आवडले...

खटपट्या's picture

8 Sep 2014 - 3:10 am | खटपट्या

मस्त !!
अजुन येवुद्यात !!

माम्लेदारचा पन्खा's picture

8 Sep 2014 - 10:22 am | माम्लेदारचा पन्खा

चाकरमान्याचो जिव्हाल्याचो विषय असा....

....
.
.
.
.
तुम्हाला दिसला का ?

कल्पतरू's picture

8 Sep 2014 - 9:16 pm | कल्पतरू

भेटतो कधीतरी चहा बटर दिला कि खुश होतो

वेल्लाभट's picture

8 Sep 2014 - 3:13 pm | वेल्लाभट

हे तर जाम असतं भाऊ कोकणात. एक मी ऐकलेली पण कधीही न पाहिलेली गोष्ट चटकन आठवली. अशा अनेक आठवतायत... पण ही अशी आहे की, रत्नांगिरीला जयस्तंभाच्या इथे रात्री म्हणे मानकाप्या भूत येतं... येशू ख्रिस्तासारखे हात आडव्या पट्ट्यात फिरवत. त्या हातांच्या 'रेंज' मधे जो येईल त्याची मान कापली जाते म्हणे :) ऐकलंय का कुणी हे.?

हाहाहा, ऐकलंय. रत्नांग्रीस गेलो असताना ऐकलंय.

विटेकर's picture

8 Sep 2014 - 3:20 pm | विटेकर

येशू ख्रिस्तासारखे हात आडव्या पट्ट्यात फिरवत
एकदा पट्ट्यात आलं की गळ्यात क्रॉस घालूनच सोडतयं बघा ... अन ते रत्नागिरीत नाय , सगळ्या जगात असच करतयं

मस्त किस्से आहेत सगळे. पोतडीत असलेले सगळे किस्से बाहेर काढा.

लहाणपणी गावाला रात्री झोपताना अश्याच भूतांच्या कहाण्या ऐकायला मज्जा यायची. गोधडी डोक्यावर ओढून घाबरत घाबरत ह्या गोष्टी ऐकताना कधी झोप लागत असे कळायचं सुद्धा नाही.

कल्पतरू's picture

8 Sep 2014 - 9:36 pm | कल्पतरू

हळू हळू भात्यातले सगळे बाण बाहेर काढणार आहे. रात्री कोकणात शिकारीला जातात त्याचे पण किस्से आहेत. टाकेनच इथे हळूहळू.

उन्हाळ्याच्या सुट्टीत रात्री जेवणं उरकली की अशा गोष्टी लैच रंगायच्या. :)

भिंगरी's picture

9 Sep 2014 - 10:51 pm | भिंगरी

हो,आणि अशा गोष्टी जर बायका सांगत असतील तर सांगताना त्यांचे हावभाव बघण्यासारखे असत.

बहिरुपी's picture

10 Sep 2014 - 8:40 pm | बहिरुपी

मस्त !!
अजुन येवुद्यात !!

मी रोज त्याच रस्त्याने जाते तर लक्ष ठेवता येईल!
मी पण कथा खूप ऐकल्यात. मी रोज कॉलेजहून दुपारी १२ ते १ च्या दरम्यान घरी जायचे, तर किती जणांनी सांगितले होते, त्या वेळी त्या रस्त्यावर भुलीचे झाड असते. त्याच्या कचाट्यात सापडलीस तर घरी यायचा रस्ताच दिसत नाही, एकाच जागी गोल गोल फिरायला होते, मी रोज बघायचे कधी दिसलेच नाही ते झाड!

हे राम.. स्तंभावरुनच जा ये असायची रत्नांग्रीस बारातेरा वर्षे... टावरबागेत रात्रीपण खेळायचो तिथे. मान सुरक्षित आहे त्याबद्दल विश्वेश्वराचे आभार्स.

मदनबाण's picture

11 Sep 2014 - 4:58 pm | मदनबाण

मस्त किस्से ! :)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- बोलक्या पोपटांचे राजकारण

कोकणातलं भूतबीत नाही, पण एकदा जाम चकवा लागल्यागत झालं होतं खरं.

साल - १९९५-२००० च्या दरम्यान कधीतरी. रत्नांग्रीहून लोटे परशुराम, गणपतीपुळे, पावस, इ.इ. ठिकाणे बघायला म्हणून नातलगांबरोबर सुमो करून गेलो होतो. हरिहरेश्वर करून वापस येताना वाटेत एके ठिकाणी जरा विचित्र रोड होता. मेनरोडपासून जरा आतल्या बाजूस गेलो होतो. माणसाचे शष्प चिन्ह नव्हते. आणि दिशादर्शक इ. देखील नव्हते. तब्बल तासभर त्याच त्या ठिकाणी प्रदक्षिणा घालत होतो. सर्वांची जाम टरकलेली. अखेर कसा क्लू लागला काय माहिती, शेवटी एकदाचे निघालो तिथनं. तेव्हाची १८० मध्ये फाटलेली अजूनही आठवतेय.

पैसा's picture

11 Sep 2014 - 5:06 pm | पैसा

लै भारी किस्से! शीर्षक वाचून मला वाटलं स्पा सर एवढे सेलेब्रिटी कधी झाले? =))

डॉ सुहास म्हात्रे's picture

11 Sep 2014 - 5:36 pm | डॉ सुहास म्हात्रे

अकरावीत असताना हायर मॅथच्या शिकवणीला रोज पहाटे ४:३० ला गावाबाहेरच्या स्मशानाच्या मध्यातून जाणार्‍या वाटेवरून जावे लागत होते. तिथल्या भुतांच्या अनेक कथा-दंतकथा प्रचलीत होत्या त्यामुळे जीव मुठीत धरून जात असे. पण एकदा का होईना "हे भूत असते तरी कसे" हे दिसावे अशी इच्छाही मनात असायची. पण सगळी भुते एकजात हरामखोर निघाली. आजिबात दिसली नाहीत. कदाचित ४:३० पर्यंत त्यांची झोपायची वेळ होत असावी ;) . नंतर कोणीतरी मी राक्षस गणाचा असल्याने भुते माझ्या समोर येत नाहीत असे सांगीतले :) . मात्र माणसाच्या रुपातली भूते अनेक भेटली आणि अजून भेटत आहेत :) . त्यांनाही बहुतेक मी राक्षस (गणाचा) असल्याचे समजत असावे, तेव्हा डाळ शिजत नाही असे समजल्यावर तीहि माझा पिच्छा सोडतात ;) :)

मात्र भूते असली तर एकदा तरी खर्‍या एखाद्या भूताशी गप्पा मारायची इच्छा अजूनही तेवढीच तीव्र आहे.

भूते अशी दिसतात असे म्हणतात...

अत्रुप्त आत्मा's picture

11 Sep 2014 - 6:43 pm | अत्रुप्त आत्मा

@एकदा तरी खर्‍या एखाद्या भूताशी गप्पा मारायची इच्छा अजूनही तेवढीच तीव्र आहे.>>> काय हे एक्का काका!? :-D किती वेळा गप्पा मारल्यात माझ्याशी! =))

डॉ सुहास म्हात्रे's picture

11 Sep 2014 - 7:36 pm | डॉ सुहास म्हात्रे

+D

तिकडे स्पाच्या कट्ट्यावर पोतडी उघडणारच होतो परंतू "भुतांनी भुतांसाठी काढलेला भुतांचा--"असा "बाई द पिपल फॉर द पिपल --"छाप मंत्र ऐकला आणि बोबडीच वळली. सरळ वरती जाऊन लटकू लागलो. इच्छा बाकी राहिली तर आमचं काय होणार?आम्हाला कल्पतरू नकोय पिंपळच हवाय .पिंपळ पिंपळ पिंपळ