अखेर

आतिवास's picture
आतिवास in जनातलं, मनातलं
20 Jun 2014 - 11:21 am

मी तिला पाहते तेव्हा सकाळचे नऊ वाजले आहेत. अर्थात लाकडाची मोळी डोक्यावर वाहताना तिचा चेहरा खाली झुकला आहे त्यामुळे मला तो दिसत नाही.

stree

तिची आणि माझी ओळख नाही आणि मी तिच्याशी बोलत नाही, त्यामुळे ती ओळख होतही नाही. स्वत:च्या कामात मग्न असणा-या त्या अनोळखी स्त्रीचा फोटो काढणं खरं तर योग्य नाही, ते एका अर्थी तिच्या खासगीपणावर आक्रमण आहे याची मला जाणीव आहे. पण तरीही मी हा फोटो काढते. माझ्या सभोवतालच्या अनेक स्त्रिया रोज अशा ओझ्यासह जगतात याची मला आठवण रहावी म्हणून मी हा फोटो काढते आहे.

मी बिहारमधल्या मुंगेर जिल्ह्यातल्या एका आदिवासी पाड्यावर चालले आहे. वाटेत एका ढाब्यावर आम्ही नाश्ता करायला थांबलो आहोत. रस्त्यावर काही ’स्वच्छ’ खायला मिळणार नाही हे माहिती असल्याने माझे सहकारी खाण्याची तजवीज करून आले आहेत. ब्रेड, बटर आणि जाम असा सुखासीन नाश्ता आम्ही गरीबीने वेढलेल्या वातावरणात करत आहोत. आमची चारचाकी एअर कंडिशन्ड आहे. माझ्याजवळ बाटलीबंद पिण्याचे पाणी आहे; हातात मोबाईल आहे आणि डिजीटल कॅमेराही आहे. माझ्या खिशात पुरेसे पैसे आहेत. मला उद्याची चिंता करण्याचं काही कारण नाही. माझ्या समोरून चाललेल्या स्त्रीचं जगणं आणि माझं जगणं यात प्रचंड अंतर आहे. तिला त्याची जाणीव आहे की नाही मला माहिती नाही, पण मी मात्र त्या विरोधाभासाने, त्या अंतराने अस्वस्थ आहे.

आम्ही पुढे जातो. एका टेम्पोच्या टपावर बसून माणस प्रवास करताना दिसतात.

tempo

मग ते चित्र सारखं दिसत राहतं. या भागात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नावाची काही गोष्टच नाही, त्यामुळॆ लोकांना मिळॆल त्या वाहनातून आणि मिळेल त्या सोयीने प्रवास करावा लागतो. गाडीच्या आत खचाखच गर्दी आहे. इतक्या उकाड्यात त्या आतल्या लोकांच काय भरीत होत असेल याची कल्पनाही करवत नाही. अनेक स्त्रिया त्या आतल्या गर्दीत कशाबशा उभ्या आहेत. त्यांना बसणारे धक्के कसे असतील याची मला जाणीव आहे. हेही त्यांच्या जगण्याचं एक प्रकारचं ओझं आहे. माझा सुखासीन प्रवास आणि त्या स्त्रियांचा प्रवास यातला विरोधाभास, त्यातल अंतर मला पुन्हा एकदा जाणवतं.

एका ठिकाणी रस्ता अचानक संपतो आणि आमची गाडी तिथं थांबते. एक संथाल तरूण आमची वाट पहात तिथं थांबलेला आहे. त्याच्या वस्तीत आम्हाला घेऊन जायची जबाबदारी त्याच्यावर आहे. तो एकदम व्यवस्थित हिंदी बोलतोय आणि मुख्य म्हणजे अजिबात लाजत नाही. भाताच्या खाचरातून त्याच्या मागोमाग, अगदी त्याच्या पावलांवर पावल ठेवत मी चालले आहे. माझं पूर्ण लक्ष पायवाटेवर आहे. तो बिचारा सारखा मागे वळून पहात माझ्याकडे लक्ष ठेवून माझी काळजी घेतो आहे. तो तरूण भरभरून बोलतो आहे, मी प्रश्न न विचारता ते ऐकते आहे. सभोवतालची हिरवाई मनमोहक आहे.पण इकडे तिकडे पहायची काही सोय नाही – कारण थोडं दुर्लक्ष झालं की मी थेट खालच्या भाताच्या खाचरात जाणार अशी मला भीती आहे. त्या आदिवासी तरूणाच्या आणि माझ्या जगण्यातल्या विरोधाभासाचा मी विचार करते आहे. मी ’माझ्या समाजासाठी’ असं काही स्वयंसेवी काम करत नाही. माझा वेळ खर्च करून मी काही समाजपयोगी काम करत नाही. या तरूणाला त्याच्या वस्तीची जेवढी माहिती आहे तेवढी मला मी राहते त्या परिसराची माहिती नक्कीच नाही.

आम्ही आदिवासी पाड्यावर पोचतो तेव्हा हात पाय धुण्यासाठी आमच्यासमोर बादलीभर पाणी ठेवलं जातं. पाच मिनिटांत तिथल्या समाज मंदिरात स्त्रिया जमा होतात. त्यांच्यासोबत त्यांची लेकरबाळं असतात. पुरुषही जमा होतात – ते मागे बसतात आणि स्त्रिया पुढे बसतात. ती जागा गच्च भरली आहे. माझ्यासाठी एक खुर्ची ठेवलेली आहे. एरवी खरं तर मी एकटीच खुर्चीत बसत नाही, सगळ्यांसाठी पुरेशा खुर्च्या नसतील तर मी पण जमिनीवर बैठक मारते. पण आत्ता मी खाली जमिनीवर बसले तर लोकांचे चेहरे मला नीट दिसणार नाहीत. चेहरा दिसला नाही तर बोलण्यात, ऐकण्यात काही मजा नसते. शिवाय आज आणखी एक अडचण आहे. आम्ही आलो त्या वाटेवर बरेच काटे होते आणि माझी सलवार त्या काट्यांनी भरलेली आहे हे माझ्या लक्षात आलंय. खाली मांडी घालून बसलं, की ते सगळॆ काटे टोचणार …म्हणून आज मला खुर्चीत बसण्याशिवाय गत्यंतर नाही. इथल्या स्त्रिया आणि इथले पुरुष रोज या काटेरी वाटेवरून चालतात. या वस्तीवर दुकान नाही, दवाखाना नाही, प्रत्येक गोष्टीसाठी त्यांना मुख्य रस्त्यापर्यंत चालत जावं लागतं. त्याबद्दल ते तक्रार करत बसत नाहीत, त्यांनी त्यातल्या त्यात स्वत:साठी आनंदाच्या जागा, आनंदाचे क्षण शोधले आहेत. त्यांच्याकडे जे कौशल्य आहे या काटेरी वाटेवरून चालण्याचं, ते माझ्याकडे अजिबातच नाही! मला पुन्हा एकदा त्या आदिवासींच्या आणि माझ्या जगण्यातला विरोधाभास, त्यातलं अंतर जाणवतं.

गावात जाऊन अशा प्रकारच्या बैठका घेणं ही माझी एक जबाबदारी आहे. खरं सांगायचं तर अशा बैठकातून मी त्यांना फारसं काही शिकवत नाही, मला मात्र त्यांच्याकडून बरंच काही शिकायला मिळतं. या वस्तीच नाव आहे ’वन्नारकोला’. इथं अवघी ३६ घरं आहेत. विजेचे खांब दिसताहेत पण प्रत्यक्षात वीज अजून इथं यायची आहे. स्त्रिया आणि लहान मुलं कुपोषित आहेत हे एका नजरेत लक्षात येतं माझ्या. मला त्यांच्या भाषेत – संथाली भाषेत – बोलता येत नाही याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करते – तेव्हा ते सगळॆ समजुतीने मान डोलावतात – ’चालायचंच’ अशा अर्थाने. माझ्या 'अडाणीपणा'मुळॆ त्यांचं काही माझ्याबद्दल वाईट मत होत नाही हे मला विशेष वाटतं. घरटी जमिनीचा छोटा तुकडा आहे – त्यात पोटापुरता भात कसतात. इथल्या स्त्रियांनी ’स्वयंसहाय्यता गट’ स्थापन केले आहेत. काही जण शेती विकासाच्या कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत. साधारण तासभर मी त्यांच्याशी अनेक विषयांवर बोलते आणि माझ्या सहका-याच्या हाती पुढची सूत्र सोपवते.

कोणाच लक्ष नाही असं पाहून मी त्या समाज मंदिराच्या बाहेर पडते.

vannarkola

मला हा आदिवासी पाडा आवडलाय. घरं मातीची आणि छोटी आहेत. सभोवताली भातशेतीतल्या लाटांचा नाच चालू आहे. आकाश एकदम निळं दिसतंय – तो हिरवा आणि निळा रंग आणि भवतालची शांतता यांनी माझं मन एकदम शांत झालंय. शहरात हा निवांतपणा कधी लाभणार नाही हे माहिती असल्याने मी तो क्षण पुरेपूर उपभोगते आहे. अर्थात माझा हा एकांत फार काळ टिकत नाही.

माझे दोन सहकारी माझा शोध घेत येतात. त्यांच्याबरोबर गावातले एक दोन लोकही आहेत. मग आमची ’गावात काय काय करता येईल पुढच्या काळात’ यावर चर्चा चालू होते. मी अनेक प्रश्न विचारते, ते सगळॆ माहिती पुरवतात. आम्ही त्या वस्तीत चक्कर टाकतो. अनेक घरं नुसती बाहेरून कडी लावून बंद आहेत – (ते लोक तिकडे कार्यक्रमात आहेत) – आम्ही त्यांचं घर उघडून आत जातो. घराची पाहणी करतो – चुलीत काय सुधारणा करता येईल, घरात प्रकाश कसा आणता येईल, पिण्याचे पाणी कसे ठेवले आहे, घरात किती ओल आहे …. अशी पाहणी होते, चर्चा होते. ही चर्चा माझे सहकारी नंतर गावातल्या लोकांशी करतील सविस्तर. वाटेत एक दहा वर्षांची मुलगी दिसते. तिला बोलता येत नाही – त्यामुळे तिचे नाव इतरांनी ठेवले आहे ’गुंगी’. तिच्यासाठी काय सरकारी योजना आहेत त्याबद्दल आम्ही बोलतो. एक पुरुष एका छोट्या मुलीला खांद्यांवर घेऊन उभा आहे – त्या दहा महिन्यांचा मुलीचे नाव आहे खुषबू. घरांतली भांडीकुंडी, कपडे सगळं वेगळं आहे. घरातच कोंबड्या आहेत, बक-या आहेत. काही अंगणात गाय आहे, झाडांवर पक्षी आहेत. माझ्या घरापेक्षा या घरांचं चित्र अगदीच वेगळं आहे. मला पुन्हा एकदा माझ्या आणि या आदिवासींच्या जगण्यातला विरोधाभास जाणवतो आहे. इथली शांतता, इथली मातीची घरं … हे सगळं काही काळ चांगलं वाटतं – धकाधकीच्या जगण्यात बदल म्हणून! पण रोज असं मला जगता येईल का? अशा जगण्याची माझ्यावर सक्ती झाली तर आजची माझी शांतता टिकेल का? जर मला जगण्यासाठी अधिक सुखसोयी लागतात तर त्या या लोकांनाही का मिळू नयेत?

कार्यक्रम संपतो. गावातल्या स्त्रियांनी सगळ्यांसाठी चहा आणि बिस्किटांची व्यवस्था केली आहे. बारक्या पोरांना मात्र फक्त बिस्किटं आहेत, चहा नाही हे मला दिसतं. बरोबर आहे, साखर, दूध सगळ्याचा प्रश्न असणार इथं! त्या बारक्या पोरापोरींच्या डोळयांत मला चहाची इच्छा दिसते. मग मी माझा चहाचा कप पुढे करून ’यात बिस्किट बुड्वून खा’ अस त्यांना सांगते. क्षणार्धात माझ्याभोवती पोरं जमा होतात. त्यांचा ’चहा बिस्किटाचा’ आनंद अगदी निरागस आहे. मला त्यांचे चमकते डोळॆ आणि चेहरे पाहून फार बरं वाटतं.

मला पुन्हा एकदा त्यांच्या आणि माझ्या जगण्यातला विरोधाभास जाणवतो. तसं पाहायला गेलं तर आनंद किती छोट्या गोष्टींत दडलेला असतो आणि तो किती उत्स्फूर्त असतो. पण सुख, समाधान, आनंद या सगळ्या बाबी केवढ्या गुंतागुंतीच्या करून घेतल्या आहेत मी स्वत:साठी!

आम्ही निघतो. गावातले काही स्त्री पुरुष आम्हाला पोचवायला मुख्य रस्त्यापर्यंत म्हणजे साधारणपणॆ दोन किलोमीटर येतात. हाच तो मघाचा भातखाचरातला आणि काट्यांनी भरलेला रस्ता. आम्ही एकमेकांशी बोलतो आहोत, हसतो आहोत. मी आता चिखलात पडेन अशी भीती मला नाही कारण माझे दोन्ही हात आता दोन स्त्रियांच्या हातात आहेत, आणखी दोघी माझ्या खांद्यांवर हात ठेवून चालल्या आहेत; ती एवढीशी पाउलवाट आता आम्हा सर्वांना सामावून घेते आहे. चालता चालता आम्ही मधेच थांबून हसतो आहोत. आम्ही पुढच्या गोष्टी ठरवतो आहोत. “आमची वस्ती आवडली का तुम्हाला, परत कधी येणार तुम्ही?” असा प्रश्न जवळजवळ सगळॆच जण विचारत आहेत. मला कधी बोलवायचं परत याबाबत त्यांचा आपापसात विचारविनिमय चालू आहे – आणि त्यांचं काही एकमत होत नाहीये.

आम्ही आजच भेटलो, आणि चार पाच तासांचीच काय ती भेट – पण आम्हाला एकमेकांबद्दल आपुलकी वाटते आहे – आमच्यात एक प्रकारची जवळीक निर्माण झाली आहे. आता आमच्यात न भाषेचा अडसर आहे , न वयाचा, न शिक्षणाचा, न परिस्थितीचा, न पैशांचा, न आणखी कशाचा. आमचं एक नाव नसलेलं नातं निर्माण झालं आहे.

परस्परभेटीची इच्छा त्यांना आणि मलाही आहे. एकमेकांना भेटल्याचा आनंद त्यांना झाला आहे, तितकाच मलाही झाला आहे. आमचे एकमेकांच्या हातातले हात, आमचे फुललेले चेहरे, आमचं हसू, आमची परस्पर भेटीची इच्छा … त्यात खोटं काही नाही, वरवरचं काही नाही.

अखेरच्या क्षणी, निरोपाच्या या क्षणी आमच्या जगण्यात काहीही विरोधाभास नाही, काहीही अंतर नाही.

सकाळपासून मला अस्वस्थ करणा-या सगळ्या विरोधाभासाला, अंतराला पेलून कसल्यातरी अनामिक धाग्याने आम्ही एकमेकांशी जोडले गेलो आहोत. कदाचित आम्ही कधीच भेटणार नाही पुन्हा, तरीही …..
**
(अन्यत्र पूर्वप्रकाशित)

समाजजीवनमानआस्वादअनुभव

प्रतिक्रिया

कवितानागेश's picture

20 Jun 2014 - 11:42 am | कवितानागेश

हम्म...
अश्या साध्या सरळ uncopmlicated माणसांना भेटल्यावर खरं तर आपल्यालाच खूप भरीव काहितरी मिळतं.

यशोधरा's picture

20 Jun 2014 - 11:46 am | यशोधरा

सुरेख आणि अत्यंत अस्वस्थ करणारं लेखन. बिहारमध्ये तर परिस्थिती भयानक असेलच, त्याबद्दल प्रश्नच नाही आणि मदतही पोहोचयला हवी, पण अगदी आपल्या आसपास असा विरोधाभास सतत दिसतच असतो, अस्तित्वात असतो, बघायचीच खोटी फक्त.

आयुर्हित's picture

20 Jun 2014 - 11:57 am | आयुर्हित

नेहमीप्रमाणे डोक्यात असंख्य प्रश्न आहेत!
आणि आपल्याही असतीलच....!!!

हे सारे प्रश्न तसेच ठेवायचे की उत्तरे शोधायची हे मात्र आपल्याच हातात आहे.

कार्यक्रम संपतो. गावातल्या स्त्रियांनी सगळ्यांसाठी चहा आणि बिस्किटांची व्यवस्था केली आहे. बारक्या पोरांना मात्र फक्त बिस्किटं आहेत, चहा नाही हे मला दिसतं. बरोबर आहे, साखर, दूध सगळ्याचा प्रश्न असणार इथं! त्या बारक्या पोरापोरींच्या डोळयांत मला चहाची इच्छा दिसते. मग मी माझा चहाचा कप पुढे करून ’यात बिस्किट बुड्वून खा’ अस त्यांना सांगते. क्षणार्धात माझ्याभोवती पोरं जमा होतात. त्यांचा ’चहा बिस्किटाचा’ आनंद अगदी निरागस आहे. मला त्यांचे चमकते डोळॆ आणि चेहरे पाहून फार बरं वाटतं.

पूर्ण लेख खुप छान लिहीलाय.

कससच झाल वाचून. बिचारी मुल.

चाणक्य's picture

20 Jun 2014 - 12:00 pm | चाणक्य

सशक्तपणे उतरलंय मनातलं...

आदिवासींमध्ये हे कुपोषण कायमच होतं का? का गेल्या ५०-१०० वर्षात निर्माण झालेली समस्या आहे ही? म्हणजे त्यांचा पारंपारिक आहार घेऊनही हे कुपोषण असतं का?

आतिवास's picture

23 Jun 2014 - 4:54 pm | आतिवास

त्याआधीही काही आदिवासी कुपोषित असतील कदाचित पण ते कुपोषण मोजले जात नव्हते. शिवाय जसजशी जंगलं नष्ट झाली, आहाराच्या सवयी बदलल्या आणि पुरेसे अन्न मिळणे थांबले तसतसे कुपोषण वाढले. बदलत्या जीवनमानाशी याचा संबंध आहे. आत्ता माझ्या हातात तुम्हाला देण्यासाठी उचित असा दुवा नाही, तो मिळाला की जरूर सांगते. तोवर क्षमस्व!

अनुप ढेरे's picture

23 Jun 2014 - 6:12 pm | अनुप ढेरे

शंका निरसनाबद्दल धन्यवाद !
याचा अभ्यास झाला असेल तर नक्कीच वाचायला आवडेल.

माधुरी विनायक's picture

20 Jun 2014 - 12:23 pm | माधुरी विनायक

खूप अस्वस्थ करणारा विरोधाभास. आपल्याकडे मराठवाड्यातही अशी परस्परविरोधी स्थिती दिसते. अस्वस्थ होण्यापलिकडे आपण काही करू शकत नाही, हा विचार आणखी अस्वस्थ करतो... निरागस आनंद मात्र मनाला भिडला. छानच...

विटेकर's picture

20 Jun 2014 - 12:44 pm | विटेकर

निशब्द .

मुक्त विहारि's picture

20 Jun 2014 - 12:48 pm | मुक्त विहारि

+१

सविता००१'s picture

20 Jun 2014 - 12:52 pm | सविता००१

वाचून आपण काही करू शकत नाहीये असं फार वाटलं. अर्थात तुम्हाला जो सुंदर आन्ण्द मिळाला तो आम्हाला इथं बसल्याजागी मिळालाच!

सुबोध खरे's picture

20 Jun 2014 - 1:00 pm | सुबोध खरे

अतिवास ताई,
असेच अनुभव मी जेंव्हा लष्कराच्या भरती साठी बिहार मध्ये गेलो होतो तेंव्हा आले होते. फार निराश आणि उदास करणारे अनुभव असतात. आपल्याला मिळणाऱ्या पैशाची आणि सुख सोयीची लाज वाटायला लागते.
उत्तर बिहार मध्ये गरिबी इतकी आहे कि लोकांना दोन वेळचे खाणे मिळत नाही अंगभर कपडा मिळत नाही. शेकडो किमी दूर परवा करून लष्करात भारती होण्यासाठी आशेने तरुण झुंडी च्या झुंडी नी येत असत. त्यांची वैद्यकीय तपासणी करीत असताना एक जाणवले कि बरेचसे तरुण शर्ट आणि विजारीच्या आत मध्ये कोणतेही वस्त्र घालत नसत कारण त्यांना ते परवडत नसे. बहुसंख्य जण शेतमजूर म्हणून काम करीत असत आणि त्यांना दोन वेळचे जेवून ( लीट्टी आणि चोखा) पंधराशे रुपये पगार मिळत असे. पंधराशे रुपये वर्षाला ( महिन्याला नव्हे). त्यामुळे त्यात त्यांना फक्त बाह्य वस्त्र परवडत असे अंतर्वस्त्र नाही. बरेस्च्से लोक उधार उसनवार करून तेथे पोहोचले होते.
असा पगार आणि त्यांची गरिबी पाहून कुणालाही वैद्यकीय दृष्ट्या नापास करायला फार जीवावर येत असे. पण लष्करासाठी जेवढ्या जागा होत्या तेवढ्याच लोकांना भरती करणे शक्य होते मग त्यातल्या त्यात जो जास्तीत जास्त निरोगी आणि बलवान आहे त्यालाच घेणे हा आमच्या कर्माचा भाग होता.पुढे ओडीसा मध्ये जीवित राहण्यासाठी उंदीर खाऊन जगणारे लोक पाहिले
काही वर्षे असे अनुभव आल्यानंतर हळू हळू तुम्हाला तितके वाईट वाटेनासे होते. म्हणून म्हणतात ना माझ्या मन बन दगड.

तुमचा अनुभवही विषण्ण करणारा आहे.

प्रमोद देर्देकर's picture

20 Jun 2014 - 1:10 pm | प्रमोद देर्देकर

अतिवासतै आपले लिखाण खुप छान आहे मागिल सर्व लेखाप्रामाणेच हे सुध्दा मनास भिडले. आपण सरकारी कर्मचारी आहात काय? कारण आपले लिखाण हे अनिल अवचट यांच्या "प्रश्न आणि प्रश्न " या पुस्तकाची आठवण करुन देणारे आहे. हे प्रश्न तुम्ही फक्त लोकांसमोर आपल्या अनुदिनी द्वारे अथवा सार्वजनिक संस्थांळांवर मांडता की त्या समस्यां तुम्ही काही प्रमाणात सोडवण्याचा प्रयत्न करता? करत असल्यास त्या समस्या सोडवताना तुम्हाला कोणत्या अडचणींना समोरे जावे लागले त्याचा ही उल्लेख करावा.

आतिवास's picture

27 Jun 2014 - 9:21 am | आतिवास

अडचणी तर असतातच - त्या सगळ्याच क्षेत्रांत असतात. ते सोडवणारे लोकही सगळीकडे असतात.
या लेखातही काही अडचणींचा आणि त्यावरच्या उपायांचा उल्लेख आहे. सविस्तर लिहायला गेले तर वाचायला कंटाळाल तुम्ही अशी शक्यता आहे - म्हणून थोडक्यात लिहिले आहे :-)

प्रभाकर पेठकर's picture

20 Jun 2014 - 1:19 pm | प्रभाकर पेठकर

एकदा दुसर्‍याला मोठेपणा आणि स्वतःकडे कमीपणा घ्यायचा ठरवला की प्रत्येक बारीकसारीक गोष्टीत तो आपल्याला जाणवायला लागतो. हा अनुभव अगदी देशावर अहमदनगर जिल्ह्यातही येतो आणि कोकणांत एखाद्या खेडेगावातही येतोच. कथेतील मुंगेर पाड्यावरील परिस्थिती आजही महाराष्ट्रात कांही पाड्यावस्त्यांवर असेलच. कुपोषणाचा मुद्दा कदाचित अहमदनगर किंवा कोकणात नसेल पण आपलं जीवन आणि ह्या पाड्यावस्त्यांवरील लोकांच जीवन ह्यात प्रचंड तफावत जाणवते.

हिच गोष्ट इथे आखाती प्रदेशातही जाणवते. आपण भारतातून इथे पैसे कमवायला आलो आहोत, श्रीमंत व्हायला आलो आहोत पण इथेही कित्येक वस्त्या दूर दूर डोंगरात आहेत ज्यांचे जीवन गरीबीने ग्रासलेले आणि आपल्या सुखवस्तू जीवनापेक्षा विपरीत आहे.

मी, कोकणांत मला भेटलेल्या आणि तळातील राहणीमान असलेल्या, अशा कांही जणांना आखातात नोकरीचे आमिष दाखवले पण ते त्यांचे गाव सोडायला तयार नसतात. तसेच, तिथेच कांही स्वतंत्र व्यवसाय करण्यासंबंधी सुचविले आणि आर्थिक मदत देऊ केली तरी, कांही धडपड करण्याविषयी ते उदासीन दिसतात. सरकारी मदतीवर आणि योजनांवर विसंबून राहायचं आणि त्यातच आपलं सुख शोधायचं असाच बहुतेकांचा कल दिसतो.

प्रसाद१९७१'s picture

20 Jun 2014 - 1:57 pm | प्रसाद१९७१

मराठवाडा आणि विदर्भाचा आतील भाग बिहार पेक्षा पण मागासलेला आहे असे म्हणतात

जयनीत's picture

20 Jun 2014 - 7:38 pm | जयनीत

'''''''''''''कांही धडपड करण्याविषयी ते उदासीन दिसतात.'''''''''''''''

दुर्गम अविकसीत भागातील लोकांच्या आकांक्षा शहरी भागातल्या लोकांइतक्या मोठया नसल्या तर त्यांना कसा दोष देणार?

असे लोक आपल्याला शहरातही अगदी तथाकथीत सुशिक्षित लोकातही सापडत नाहीत का?
नोकरी मिळण्या पुरतं शिक्षण झालं अन एकदा का ब-या पैकी नोकरी लागली की अजून जास्त काही मिळवण्याच्या मागे किती लोक असतात?
तिथल्या निराशा जनक परिस्थितून पुढे जाण्याची धडपड करणारे काही लोक तिथेही सापडतील.
जर सरासरी काढली तर असल्या गावां मधल्या अन मोठ्या शहरातल्या आकडेवारीत किती फरक येईल?

( तुमची हॉटेल व्यवसायातील कामगिरी वाचली आहे. त्याबद्दल अभिनंदन )

आतिवास's picture

27 Jun 2014 - 9:24 am | आतिवास

सहमत आहे.
दोन्ही प्रकारचे (आकांक्षा नसणारे आणि धडपडणारे) लोक सगळीकडे असतात.
कुणाला संधी मिळते, कुणाला नाही - कुणाला संधी असते हेही माहिती होऊ शकत नाही दुर्दैवाने!

मधुरा देशपांडे's picture

20 Jun 2014 - 1:39 pm | मधुरा देशपांडे

वास्तवदर्शी लिखाण. छान लिहिलंय.

सस्नेह's picture

20 Jun 2014 - 2:32 pm | सस्नेह

अन त्यामागचे सखोल चिंतन विषेश भिडले. यापूर्वीही वाचला होता लेख. पुन्हा वाचताना तितकाच भिडला.
बाकी बिहार, अहमदनगर, विदर्भ किंवा मराठवाडा इथंच जायला हवं असं नाही. मुंबईतसुद्धा धारावी वगैरे भागात यापेक्षा भीषण चित्र दिसते. लेखातील लोकांना सोयीसुविधा मिळत नसतील, पण मोकळी हवा अन इतर नैसर्गिक देणी तरी मिळतात. बुजबुजलेल्या झोपडपट्टीतून टीव्ही इ. सुविधा असूनही, नरकघाणीत सर्व व्यवहार उरकावे लागतात, अन डोळ्यासमोर घडणाऱ्या हत्या अन वासनाकांडात कित्येक बालपणे अकालीच जाळून जातात.

सुहास..'s picture

20 Jun 2014 - 2:36 pm | सुहास..

yaala akher naahi :(

बज्जु's picture

20 Jun 2014 - 2:47 pm | बज्जु

सुरेख लिखाण

राजेंद्र मेहेंदळे's picture

20 Jun 2014 - 3:08 pm | राजेंद्र मेहेंदळे

असे लिहीताना थबकलो :(

नेहमीप्रमाणेच अस्वस्थ झाले.

बाबा पाटील's picture

20 Jun 2014 - 8:15 pm | बाबा पाटील

तुमचे लेख आणी अनुभव नेहमीच काहीतरी ..............

नेहमीप्रमाणेच अस्वस्थ करणारं तुमचं लेखन. ’चहा बिस्किटाचा’ प्रसंग वाचुन कससचं झालं कारण नात्यातल्या अनेक मुलांनाही हे आवडतं असं अनुभवल्यामुळे असेल.

पैसा's picture

20 Jun 2014 - 11:10 pm | पैसा

'त्यांच्या' आणि आपल्यामधले पूल असे कधीतरी सापडतात अचानक..

एस's picture

23 Jun 2014 - 8:04 pm | एस

पूल बांधणार्‍या व्यक्तीला नेहमीप्रमाणेच सलाम. 'आतले' आणि 'बाहेरचे' हा जुना लेख आठवला.

थोडे डोळे उघडून पाहिल्यास असे 'ते' 'आपल्या' अवतीभवतीच दिसतात. त्यासाठी कुणाला असे दूर जाण्याचीही गरज नसते. मान्य आहे की पूल ओलांडून पाऊल टाकण्याचे धाडस आणि क्षमता प्रत्येकात नसते, पण किमान थोडे अंतर्मुख होऊन पुलापलिकडे बघण्याइतपत संवेदनशीलता जरी 'आपल्या'मध्ये आली तरी अशा 'पुलां'चे सार्थक होईल असे वाटते.

पैसा's picture

26 Jun 2014 - 11:17 pm | पैसा

प्रतिसाद आवडला

पूल बांधायची धडपड केली की ते बांधले जातात - आणि नाही समजा यश आलं; तरी तो अनुभव खूप शिकवून जातो आपल्याला!

एस's picture

27 Jun 2014 - 11:12 am | एस

कधीकधी वाटतंही आपण हरलेली लढाई लढतोय की काय. पण या धडपडीला जिवंत ठेवणं, कोसळणारे पूल पुन्हा बांधत राहणं, आपल्या अपयशाचे 'त्यांच्या'वर होणारे परिणाम सहन करणं हे शब्दबंधापलिकडलं आहे. तुमच्या कार्याला सलाम आणि शुभेच्छा!

आतिवास's picture

23 Jun 2014 - 4:36 pm | आतिवास

सर्व वाचकांचे आणि प्रतिसादकांचे आभार.

अतिवासतै म्हणजे संतुलित संवेदनशीलतेचं सुंदर उदाहरण.

आपल्या मताला टाळत केलेलं 'निर्विष' लेखन आवडलं :)
शिवाय वापरलेला चालु वर्तमानकाळही मस्त!

तुमचे अनुभव आणि लेखन कमालीचे वास्तवदर्शी असते........ कधीकधी इतके की माझ्यासारख्या एखाद्याच्या मध्यमवर्गीय मानसिकतेला जोरदार तडा द्यायचे काम तुमचे लेखन अगदी सहज करून जाते. असेच अधिकाधिक अनुभव आमच्यासमोर मांडत रहा.
आणखी एक मुद्दा असा, की अशा परिस्थितीत कसलीही मदत आमच्याकडून होण्यासारखी असेल तरी तुमच्या लेखात तसे लिहा. हळहळण्यापलीकडेही जाऊन काहीतरी करावेसे वाटणारे कितीतरी लोक असतील. त्यांच्याकडून थोडी जरी मदत अशा भागांना, इथल्या लोकांना मिळाली तरी त्यांच्याबद्दल लिहिणारा आणि वाचणारा, दोघांचेही सार्थक होईल.

संस्थेचे नाव लिहिण्याचे मी अनेकदा जाणीवपूर्वक टाळते कारण "मिपा व्यासपीठाचा वापर मी माझ्या हितसंबंधांसाठी (माझ्या अथवा संस्थेच्या जाहिरातबाजीसाठी) करते आहे" असा आरोप माझ्यावर होऊ शकतो. असा आरोप कोणी केला तर त्यात काही गैर नाही असा दृष्टिकोन असल्याने मी संस्थेचे नाव देणे शक्यतो (काही अपवाद आहेत) टाळते. सार्वजनिक जीवनात काही नियम मी पाळते - हा त्यापैकी एक!

पण ज्या वाचकांना संस्थांना आणि पर्यायाने समाजातल्या विविध घटकांना आर्थिक मदत देऊन काही हातभार लावायची इच्छा असेल, त्यांना विनंती. आपल्याला कोणत्या क्षेत्रात मदत करण्याची इच्छा आहे (शिक्षण, आरोग्य, स्त्री सबलीकरण, शेती, पाणी, ....) आणि कोणत्या विशिष्ट भौगोलिक क्षेत्रात (मराठवाडा, विदर्भ, बिहार, छत्तीसगढ ...) मदत करायची इच्छा आहे याविषयी मला 'व्यनि' केल्यास मला माहिती असलेल्या कामांची माहिती मी तुम्हाला व्यक्तिशः कळवू शकेन. अर्थात संस्थेच्या कामाची खातरजमा स्वतंत्रपणे करावी; माझ्या शब्दांवर आंधळा विश्वास ठेवू नये. आणि दुसरे म्हणजे तुम्ही जी काही आर्थिक अथवा इतर मदत कराल त्याला 'मिपा' जबाबदार नाही हेही लक्षात असू द्यावे ही विनंती.