आमच्या शेजारचे आजी-आजोबा…!

वटवट's picture
वटवट in जनातलं, मनातलं
29 May 2014 - 6:15 pm

_____________________________________________________________________________________________

"काय मग?… कसं वाटतंय नवीन घर?"
नुकतंच आम्ही आमचं घर बदललं होतं. घर अजून नीट लावलंही नव्हतं.. हिची आतल्या खोलीत झाशीच्या राणीच्या अवतारात साफसफाई चालू होती आणि आमच्या अंगात नक्षलवादी संचारले होते. अश्या एकंदर युद्धाच्या वातावरणात दारावरची कडी वाजली. साधारण सत्तरीतले आजोबा हातात काठी, डोळ्यावर चष्मा, पांढरा कुर्ता, धोतर आणि चेहर्यावर प्रसन्न हसू अश्या पेहरावात दारात उभे..
"आज उठल्या उठल्या दारात हा टेम्पो दिसला आणि कळालं आपण आलात ते"
"हो ना कालच आलो.. अजून सफाईच चालू आहे.. या ना आजोबा आत… अगं ऐकलंस का? शेजारचे आजोबा आलेत." मी खुर्चीवरची धूळ झटकत आत आवाज दिला.
"नाही नाही.. तुमची मोहीम चालू द्या.. मी असंच फिरता फिरता आत डोकावलो, परत येईन.. बराच वेळ झालाय मी बाहेरच आहे. आमचं सौभाग्य आमची वाट बघत असेल. चालू द्या तुमचं काम.."
हि बाहेर यायच्या आत तर आजोबा गेलेसुद्धा…
"कसं जाऊ दिलंस रे.. निदान चहा तरी टाकला असता ना.. पहिल्यांदा आले होते ना ते?"
"अगं हो.. मी काही बोलायच्या आत तर ते गेलेसुद्धा पण परत येतो म्हणालेत.. आणि आता शेजारीच आहेत ना… येणं जाणं होईलच की."
"तुझं ना…. अवघडे… !" म्हणून ती आत गेली.

______________________________
___________________________________________________

"उठा उठा हो सकळीक…. वाचे स्मरावे गजमुख"… हे नेहमी सकाळ प्रसन्न करणारं गाणं कोण म्हणतंय हे बघायला मी बाहेर आलो तर तो आवाज येत होता आजोबांच्याच घरातून. आजोबांचा आवाज इतका चांगला असेल वाटलं नव्हतं. दारात प्राजक्त सदैव फुललेला.. अंगणात दररोज नवनवीन रांगोळी.. कुठेही साधी रेघ इकडे नाही कि तिकडे नाही.. एकदा आजींना भेटायलाच हवं आणि हिची तर भेट घालून द्यायलाच हवी असा विचार करत असतानाच आतून आवाज आला…
"ऑफीस ला उशीर होत नाहीये का????…. पाणी दोनदा उकळून थंड झालंय.. आज पारोसंच जायचंय वाटतं"
अरे बाप रे भलताच उशीर झालाय… आज परत बॉसच्या शिव्या… पण आजींना भेटायलाच हवं…

__________________________________________________________________________________

आज ऑफिस ला सुट्टी होती म्हणून जरा उशिरा उठलो. बाहेर आलो तर आजोबा दारात उभे.
"काय आजोबा वाट बघताय वाटतं कोणाची… "
"अरे हो रे... देवळात जाऊन हिला बराच वेळ झालाय. अजून आली नाही.. म्हणून.. जरा.. "
"बोलत बसल्या असतील कुणाशी तरी"
"ह्म्म्म… "
"येतील एवढ्यातच… "
आज जरा आवरून वगैरे निवांत बोलू असा विचार करून मी आत गेलो. फ्रेश होऊन आजोबांच्या घरी गेलो तर आजोबा पिशवी घेऊन बाजारात निघायच्या तयारीत.
"काय आजोबा बाहेर निघालात वाटतं?"
"हो रे, भाजी आणायला निघालोय. सौभाग्य आत्ताच आलंय.. आज फर्माईश आलीये… वांगं… तेही भरलेलं"
"क्या बात है आजोबा…"
"कामात आहेस का??"
"नाही.. उलट ऑफिसला सुट्टी आणि त्यात हि नाहीये त्यामुळे निवांत आहे आज.. "
"येतोयेस मग?"
"विचारताय काय आजोबा .. चला"
चालता चालता मग बरेच विषय निघाले. त्यात माझं नुकतंच लग्न झालेलं. त्यामुळे मला त्यांच्या लग्नाबद्दल बरीच उत्सुकता होती. तशी त्यांची पिढी माझ्या आई-बाबांच्याही आधीची पण त्यांच्या बोलण्यात कुठेही किंतुपरन्तु जाणवला नाही. त्यांच्या लग्नापासून आत्तापर्यंत बरेच विषय काढले गेले.. बाकी बायकोवर अफाट जीव.. ही घरात नव्हती हे एक बरं झालं कारण जर हे वांग्याचं प्रकरण तिला कळालं असतं तर माझी जी काही हालत झाली असती.. कल्पना करवली नाही… पण तरीही केवळ बायकोला वांगं हवंय म्हणून ह्या वयात, कसलाही वैताग न वाटून घेता, मंडईत जाणार्याची बायको कशी असेल हे बघण्याची माझी इच्छा मात्र शतपटींनी वाढली..
.
आजोबांसोबत घराकडे परतत असताना कट्ट्यावरचे काहीजण आजोबांकडे पाहून हसताना दिसले. ते मला जर खटकलं. आजोबांना घरी सोडून माझ्या घरी जाणार तेवढ्यात त्यांच्यापैकी एकानं मला हाक मारली…
.
"नवीन दिसताय???"
"हो… आठ - दहा दिवसच झालेत"
"तरीच…"
"काय तरीच…?"
"त्या वेड्या बरोबर होतात…"
"कोणाबरोबर???"
"त्या वेड्या सोबत… "
"… "
"अहो… त्या म्हाताऱ्यासोबत"
"उगा मुर्खासारखं बडबडू नका"
"अहो खरंच… त्याच्या डोक्यावर परिणाम झालाय.."
उगाच ह्यांच्या नादाला लागण्यात काही अर्थ नाही म्हणून मी निघणार एवढ्यात…
"आत्ता तुम्ही कुठे गेला होतात?"
"… "
"सांगा ना कुठे गेला होतात??"
"…"
"भाजी आणायला ना?"
"हो… पण तुम्हाला काय करायचंय त्याच्याशी " माझं टाळकं आता खरंच फिरू लागलं होतं.
"त्याच्या बायकोसाठीच आणायला गेला होतात ना… "
आता मात्र अतीच झालं. मी निघालो.
"पण........ बायको तर असायला हवी ना भाजी आणायला"
माझी पावलं जिथल्या तिथे थांबली.
"काय बोलता आहात… समजतंय का….?"
"अहो खरंच… त्याची बायको गचकून वर्ष केंव्हाच झालंय. पण त्याला वाटतंय ती आहेच अजून … आणि तुम्ही पण नका नादाला लागू त्याच्या, नाहीतर तुमच्याही डोक्यावर व्हायचा परिणाम…आणि तुम्ही पण असेच फिराल मग.. हा.. हा.. हा.. हा.. " एकमेकांना टाळी देत त्यांचं हसणं चालू झालं.
मी मात्र अगदी स्तब्ध. पहिल्यांदाच जोरात धक्का बसतो म्हणजे काय ह्याचा अनुभव येत होता. एखादी सुंदर फ्रेम बघून त्यामध्ये असलेल्या सुंदर चित्राबद्दल उत्सुकता लागून रहावी आणि त्यामध्ये चित्रंच नसावं.. तशीच काहीशी माझी अवस्था झाली. आत्तापर्यंतच्या उत्सुकतेची जागा आता कीव घेऊ पहात होती. जे काही पाहिलं तो सगळा भास होता.. ह्याचाच त्रास होऊ लागला. आता आपण जेवढा त्यांचा विचार करू तेवढा अजून त्रास होईल त्यापेक्षा त्या वाटेला नकोच जायला असं ठरवून मी घरी आलो…

दिवसां मागून दिवस गेले… महिने गेले… आमच्या संसाराची वाटचाल आता परिपक्वतेकडे चालू होती (म्हणजे असं वाटत होतं). पण तरीही खटके उडतच होते. एकदातर ह्याचा कडेलोटच झाला…
"सगळी कामं मीच करायची.. तू बाकी काहीच करत जाऊ नकोस." ही.
"केली तरी कुणाला काही आहे त्याचं" मी.
"म्हणजे?.."
"कोणी काही म्हणतं का त्याबद्दल"
"काय म्हणायला पाहिजे"
"जाऊ दे… पालथ्या घड्यावर…. "
"नाही आज तू सांगच… तुझं हे नेहमी चाललंय.. आज होऊन जाऊ दे एकदाचं"
"काय होऊन जाऊ दे एकदाचं?… हे नेहमीचंय… घरं स्वच्छं असली कि, 'छान ठेवतेस हां घर'… तीच घरं जर घाण असतील तर 'काय करणार सगळीकडे बाईनेच किती बघायचं'… डब्यातली भाजी चांगली झाली तर 'सुगरण आहेस ग तू' आणि तीच भाजी जर बिघडली तर 'हां…… नवऱ्याच्या मागं मागं करताना बिघडतो गं बाई कधी कधी पदार्थ'.. कपड्याला इस्त्री नसली तर 'काय.. बायकोला वेळ नव्हता वाटतं?' आणि तीच जर कडक इस्त्री असेल तर 'बायको जरा जास्तच प्रेम करते वाटतं'… नुसतं बाहेरच नाही घरात सुद्धा हेच.. जे काही चांगलं होईल ते तुमच्यामुळे आणि सगळ्या गोष्टी बिघडवण्याचा ठेका आम्हीच घेतलाय ना.." जरा आवाज वाढवत मी म्हणालो.
"जरा हळू… आजूबाजूला काही बहिरे रहात नाहीत…"
"हां………. इथे पण तस्संच… घरातून जर आमचा आवाज वाढला तर.. 'काही अक्कल आहे कि नाही' आणि तोच जर तुमचा असेल तर 'सहन तरी किती दिवस करणार? कधी तरी बांध फुटणारंच'."
"मग मी काय करू अशी इच्छा आहे तुझी?… दरवेळेस गळ्यात पाटी बांधून हिंडू का? कोणी काय केलं ते सांगायला…" ही वैतागून..
"जाऊ दे ना... तुझ्याशी बोलण्यात तसा काहीच अर्थ नव्हता आणि नसणारे…" चिडून मी बाहेर पडलो.
खूप दिवसांची मळमळ बाहेर पडल्यामुळे जरा बरं वाटलं. बाहेरच्या कट्ट्यावर बसून घराकडे एक नजर टाकताच एक विचार आला. लग्नानंतरच्या अपेक्षित अश्या अद्वैताची सांगड घालताना दोन शरीरं, ही दोन राहिली पण मनं अजून एक झालेली नाहीत. अजून मनात सुप्त अशी स्पर्धा जिवंत आहे. अजून दोष दुसर्यावर देण्यात समाधान वाटतंय. तसा विचार करता 'तिची काय चूक होती ह्या सगळ्यात?'.. बोलाणारयांची तोंडं नाही बंद करता येत.. आणि तिनं तरी कितीदा बाजू सांभाळायची....
विचारांच्या तंद्रीत असतानाच पाठीवर एक हात पडला. बाजूला बघितलं तर आजोबा…
"आय अ‍ॅम सॉरी.. पण माझ्या कानावर पडलंय सगळं.. " तसं त्यांचं घर आमच्या शेजारीच असल्यानं ते स्वाभाविकच होतं.
"मला माहितिये कि हा सर्वस्वी तुमचा खाजगी प्रश्न आहे आणि मी त्यात काही बोलणं योग्य होणार नाही. पण तरीही … बरेच दिवस मी ऐकतोय तुमचं थोडंफार... तेंव्हा वडिलकीच्या अधिकारानं थोडं बोलू??"
"त्यात काय आजोबा........ बोला कि…." खरं तर मला तिथून उठून जायचं होतं पण तसं उठून जाणंही बरं दिसलं नसतं, म्हणून मी म्हणालो.
"आपण घरी जायचं?" आजूबाजूला वर्दळ वाढू लागली होती.
"चालेल."
आम्ही दोघंही त्यांच्या घरी गेलो. आजोबांनी माझ्या हातात पाण्याचा पेला दिला आणि दरवेळेस शांत वाटणारे आजोबा आता बोलू लागले…
"जगताना दरवेळेस स्पर्धा असायलाच हवी का? म्हणजे कुणीतरी जिंकण्यासाठी कुणीतरी हरायलाच हवं का? मलातरी हरण्यापेक्षा माघार घेण्याचा पर्याय चांगला वाटतो कि ज्यामध्ये जिंकणार्याला जिंकण्याचं श्रेय तर मिळतंच पण हरणार्याला हरल्याचं शल्य टोचत नाही... अर्थात ह्याची जाण दोन्हीबाजूंनी ठेवायला हवी… आम्ही दोघं एकमेकांना सांभाळतो ते असंच… म्हणजे बघ ना… साधं भाजी आणायला गेल्यावर हिला वांगं घ्यायचं असतं त्याचवेळेस मला कारलं घ्यायची इच्छा असते, तेंव्हा मी काहीच बोलत नाही. अश्यावेळेस ती काहीही न बोलता कारलंच घेते. जास्तीची भाजी आम्ही घेत नाही कारण फ्रीज नाहीये घरात. मुळात कधी फ्रीज घ्यावा असं वाटलंच नाही. फ्रीजमध्ये भाज्या ताज्या राहतात. आम्ही आमचं नातं ताजं कसं राहील ह्यासाठी झटतो.. बाहेर खरेदीला गेल्यावर हिला कधीही मला साडी घ्यावीशी वाटतीये असं सांगायची गरज पडली नाही.. पाणीपुरीची एक प्लेट दोघांमध्ये खाण्यात ब्रह्मांडा एवढा आनंद कसा लपलेला आहे हे तिचेच डोळे मला शिकवतात.. आमच्या दोघांमध्ये फार काही गप्पा होतात अश्यातला काही भाग नाही पण 'मला तुझ्याशी काही बोलायचंय' हे आपण होऊन सांगायची वेळ आमच्यामध्ये कधीच आली नाही.…"
.
आजोबा बोलत होते.. तो तो मलाच रडू यायला लागलं… का हा माणूस वस्तुस्थिती स्वीकारत नाहीये…?
.
"………. तुझ्याशी बोलत कसा वेळ गेला काही कळलं नाही… हिची देवळातून यायची वेळ झालीये. आता हेच बघ .. आपलं वय झालंय.. कान ऐकायला नकार देऊ लागलेत तरीही हिची देवळात जायची सवय काही सुटली नाही .. कीर्तनकाराच्या डोळ्यातले भाव बघूनंच ही तल्लीन होते. कीर्तन संपल्यावर मग कुणीतरी हिला म्हणतं, "आजी कीर्तन संपलं". मग हि भानावर येते.. कीर्तनकाराच्या पायावर डोके ठेवून त्याच्या आत्म्याचे आशीर्वाद घेते.. आणि घराची वाट धरते. मी बर्याचदा सांगयचा प्रयत्न करतो, "असं संध्याकाळच्या वेळी बाहेर पडणं बरं नव्हे.. देवानं आत्तापर्यंत खूप दिलंय अजून काय मागायचंय?".. त्यावर ती म्हणते, "मी काही मागायला थोडीच जाते… मी तर आभार मानायला जाते." अशात मीही नाही तिला काही म्हणत. तिला जे हवं ते करू देतो. तीही नाही हट्ट करत....!" बोलता बोलता आजोबांचं लक्ष घड्याळाकडे गेलं. लगबगीने उठत एका पुड्यातला गजरा पटकन बाहेर काढला.
"हिला गजरा फार आवडतो, मी दररोज न चुकता, ती देवळाकडे गेली कि कोपर्यावरच्या फुलवाल्याकडून एक गजरा आणतो आणि असा आरश्यावर लटकवून ठेवतो. ती आल्यावर, नेहमीप्रमाणे आरश्यासमोर गेली कि हा गजरा माळते आणि सगळं घर सुगंधित होऊन जातं."

आजोबा बोलत होते अखंड, जणू एक सुरेल गाण्याची मैफिल सुरु असावी असं. आणि मीही त्यांना थांबवलं नाही. खरंतर डोळ्यातलं पाणी बंड करत होतं बाहेर येण्यासाठी… ते थोपवताना मला मात्र प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागत होती

आजोबा म्हणाले, "किती दिवस राहिलेत हे देवालाच माहित. जोपर्यंत ह्या कुडीत प्राण आहे तोपर्यंत एकत्र आहोत. एकदा का हा पिंजरा तुटला कि आपण मोकळे पुढच्या प्रवासाला. पण हे जे काही शेवटचं स्टेशन आहे, ते हि सुंदर करण्याचा प्रयत्न करायचा, आपल्यापरीने… दुसरं काय… हां आता गाडी सुटण्याचा भोंगा थोडा थोडा ऐकू येतोय. बघायचं गाडी कधी सुटतीये ते… तोपर्यंत त्या भाजीला, साडीला, पाणीपुरीला, ह्या गजरयाला आणि सगळ्यात म्हणजे ह्या सगळ्यात अगदी मिसळून गेलेल्या तिला टाळून कसं चालेल?...
"खरंय… "
"आजूबाजूच्यांना वाटतंय… मी माझा तोल हरवून बसलोय.. मला वास्तवाचं भान नाही.. मुर्खासारखं बोलत बसतो स्वतःशीच.. आज तू होतास म्हणून तुझ्याशी बोललो हे सगळं.. तू ही मनातल्या मनात माझ्यावर हसतच असशील.… पण खरं सांगू जेव्हढा काही थोडा वेळ राहिलाय ना तेव्हढा वेळ...... ती नाहीये म्हणून रडण्यापेक्षा, ती आहे म्हणून काढण्यातच शहाणपण नाही का?........"
.
मी अक्षरशः ताडकन उडालो, "म्हणजे आजोबा…?"
.
"हो, मला पूर्ण कल्पना आहे कि, ती नाहीये ह्या जगात… "
माझा माझ्याच कानावर विश्वास बसत नव्हता.
"आजच्या बरोबर १ वर्ष १० महिने आणि १५ दिवस आधी अश्याच एका संध्याकाळी देवळातून परत येताना तिचा अपघात झाला. त्याच क्षणी तिचा देहांत झाला. मी घरात नेहमीप्रमाणे तिच्यासाठीचा गजरा आरश्याला लटकावून तिची वाट बघत होतो. आणि बातमी आली कि ती गेली. माहित नाही मला काय झालं पण त्या वेळेपासून एकही टिपूस नाही आला डोळ्यातून. ती इतरांसाठी गेली होती माझ्यासाठी नाही.… आमच्यात एकदा विषय झाला होता असाच मरणाच्या संदर्भात, तेंव्हा ती म्हणाली होती कि माझ्याआधी तिचाच नंबर लागावा. तिला माझं कुंकू घेऊन स्वर्गात जायचं होतं. ती कुंकू घेऊन गेली…. पण…. माझ्यासाठी गजरा ठेवला."
असं ते म्हटल्याबरोबर माझा लक्ष आरश्यावरच्या जुन्या गजर्याकडे गेलं तेंव्हा माझ्या लक्षात आलं कि तो गजरा अगदी काळाठिक्कर पडला होता. मुळात तो गजरा नव्हताच तर नुसत्या पाकळ्या होत्या…
"तेंव्हापासून दररोज न चुकता सकाळी तिनं लावलेल्या प्राजक्ताला पाणी घालतो.. तिच्याच हातानं सडा टाकतो… तिच्याच हातानं रांगोळी काढतो… बाहेर गेल्यावर तिच्याच आवडीची भाजी घेतो.. प्रत्येक सणाला तिच्यासाठीची साडी घेणं चुकवत नाही.. पाणीपुरीची अर्धीच प्लेट खातो.. तीच्या नावाचे देवासमोर आभार सुद्धा मानतो.. आणि दररोज संध्याकाळी गजरा तर आणतोच आणतो…"
"तुमची मुलं वगैरे… "
"नाही. आम्हाला एकही मुल नाही. आमची एकही निशाणी मागे ठेवावी असं त्या वरच्याला वाटलंच नसावं. पण हिनं त्याचीही कधी तक्रार केली नाही आणि मलाही तशी संधी दिली नाही. आम्ही दोघांसाठीच होतो… आहोत… आणि… राहू सुद्धा… आता वाट बघतोय कधी गाडी सुटतीये ह्याची. ती माझी वाट बघत असेल…"
जरा खोकल्याची उबळ आली म्हणून आजोबा पाणी प्यायला आत गेले. पाणी पिउन झाल्यावर आतूनच मला आवाज दिला, "चहात साखर किती चमचे… एक कि दोन?"
"एकच".
माझी नजर त्या खोलीतल्या आजींच्या त्याच प्रसन्न फोटोवर गेली. ती जणू मला म्हणत होती, "बघितलंस ना… बरंच झाला ना मी आधी गेले ते? … वेड लागलं असतं… मला नसतंच जमलं ह्यांच्यासारखं वागणं."
सारं जग ज्या माणसाला वेडा म्हणून हेटाळत होतं… होय, तो माणूस खरंच वेडाच होता. कारण कोणावर जर एवढं प्रेम करायचं असेल तर ते शहाण्या माणसाचं काम नाही. त्यासाठी वेडाच माणूस हवा..
.
.
.
.
.
त्यासाठी वेडाच माणूस हवा..

कथालेख

प्रतिक्रिया

पहिले दोन पॅरा वाचल्यावर कायतरी नस्तलॉजीक लिहलय की काय अस वाटल .
नंतर खाली स्र्कोल केल्यावर .............

जेपी's picture

29 May 2014 - 6:52 pm | जेपी

आणी पुलेशु.

वटवट's picture

30 May 2014 - 11:57 am | वटवट

आभारी आहे...

यशोधरा's picture

29 May 2014 - 6:53 pm | यशोधरा

ह्म्म..

आतिवास's picture

29 May 2014 - 7:06 pm | आतिवास

"आजोबा" आवडले.

वटवट's picture

30 May 2014 - 11:58 am | वटवट

आभारी आहे...

मुक्त विहारि's picture

29 May 2014 - 7:19 pm | मुक्त विहारि

"ती कुंकू घेऊन गेली…. पण…. माझ्यासाठी गजरा ठेवला."

वटवट's picture

30 May 2014 - 11:59 am | वटवट

धन्यवाद…!

बबन ताम्बे's picture

29 May 2014 - 7:39 pm | बबन ताम्बे

छान !

पैसा's picture

29 May 2014 - 10:52 pm | पैसा

आजोबा आजी आवडले.

संजय क्षीरसागर's picture

29 May 2014 - 10:54 pm | संजय क्षीरसागर

शेवट माहिती असून देखिल शेवटापर्यंत रंगत कायम ठेवणारी लेखनशैली सुद्धा आवडली. एखादी व्यक्ती नसतांना देखिल ती आहे असं समजून जगणार्‍याची संवेदनाशीलता मोहवून गेली. लिहीत राहा!

आत्मशून्य's picture

30 May 2014 - 10:40 am | आत्मशून्य

फार मोठी गोष्ट आहे. +१

वटवट's picture

30 May 2014 - 11:59 am | वटवट

खूप खूप धन्यवाद…!

वटवट's picture

30 May 2014 - 12:00 pm | वटवट

खूप खूप आभारी आहे....

मिसळपाव's picture

30 May 2014 - 1:56 am | मिसळपाव

हि गोष्ट असली तर झकास जमली आहे. खरंच हे आजोबा तुझे शेजारी असले तर त्याना माझा दंडवत सांग. काय दॄष्टिकोन आहे आयुष्याकडे बघण्याचा, आयुष्य जगण्याचा.....

वटवट's picture

30 May 2014 - 12:02 pm | वटवट

ही कल्पनाच आहे...प्रतिसादाबद्दल धन्यवाद…

प्रभाकर पेठकर's picture

30 May 2014 - 2:13 am | प्रभाकर पेठकर

जगताना दरवेळेस स्पर्धा असायलाच हवी का? म्हणजे कुणीतरी जिंकण्यासाठी कुणीतरी हरायलाच हवं का? मलातरी हरण्यापेक्षा माघार घेण्याचा पर्याय चांगला वाटतो कि ज्यामध्ये जिंकणार्याला जिंकण्याचं श्रेय तर मिळतंच पण हरणार्याला हरल्याचं शल्य टोचत नाही... अर्थात ह्याची जाण दोन्हीबाजूंनी ठेवायला हवी… आम्ही दोघं एकमेकांना सांभाळतो ते असंच… म्हणजे बघ ना… साधं भाजी आणायला गेल्यावर हिला वांगं घ्यायचं असतं त्याचवेळेस मला कारलं घ्यायची इच्छा असते, तेंव्हा मी काहीच बोलत नाही. अश्यावेळेस ती काहीही न बोलता कारलंच घेते. जास्तीची भाजी आम्ही घेत नाही कारण फ्रीज नाहीये घरात. मुळात कधी फ्रीज घ्यावा असं वाटलंच नाही. फ्रीजमध्ये भाज्या ताज्या राहतात. आम्ही आमचं नातं ताजं कसं राहील ह्यासाठी झटतो.. बाहेर खरेदीला गेल्यावर हिला कधीही मला साडी घ्यावीशी वाटतीये असं सांगायची गरज पडली नाही.. पाणीपुरीची एक प्लेट दोघांमध्ये खाण्यात ब्रह्मांडा एवढा आनंद कसा लपलेला आहे हे तिचेच डोळे मला शिकवतात.. आमच्या दोघांमध्ये फार काही गप्पा होतात अश्यातला काही भाग नाही पण 'मला तुझ्याशी काही बोलायचंय' हे आपण होऊन सांगायची वेळ आमच्यामध्ये कधीच आली नाही.…

संपूर्ण कथेचे सार आणि संदेश वरच्या परिच्छेदात आहे. तो जास्त भावला.

चांगली आहे कथा.

वटवट's picture

30 May 2014 - 12:03 pm | वटवट

आभारी आहे

विजुभाऊ's picture

30 May 2014 - 3:48 am | विजुभाऊ

सुंदर कथा.
ती अधीक सुंदर झाली आहे ती तुमच्या सरळ लिखाणामुळे.

वटवट's picture

30 May 2014 - 12:04 pm | वटवट

आभारी आहे

रेवती's picture

30 May 2014 - 4:46 am | रेवती

बापरे! हे खरे आहे की काय?
कथा असल्यास आवडली.

वटवट's picture

30 May 2014 - 12:05 pm | वटवट

नाही … ही कथाच आहे…!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

30 May 2014 - 5:58 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कारण कोणावर जर एवढं प्रेम
करायचं असेल तर ते शहाण्या माणसाचं काम नाही.
त्यासाठी वेडाच माणूस हवा..

अगदी खरंय !!!!

-दिलीप बिरुटे

nasatiuthathev's picture

30 May 2014 - 11:23 am | nasatiuthathev

अप्रतिम ....

विटेकर's picture

30 May 2014 - 11:49 am | विटेकर

पु ले शु .

माणिकमोति's picture

30 May 2014 - 11:53 am | माणिकमोति

ही कथा आधी कुठेतरी वाचली आहे..

संजय क्षीरसागर's picture

30 May 2014 - 11:55 am | संजय क्षीरसागर

मी मराठीवर.

वटवट's picture

30 May 2014 - 11:57 am | वटवट

http://www.maayboli.com/node/47339... ही कथा मी आधी मायबोली वर प्रकाशित केली होती…

माणिकमोति's picture

30 May 2014 - 12:13 pm | माणिकमोति

बरोब्बर.. आणि तेव्हाही खुपच आवडली होती.. म्हणुनच लक्शात राहीली... सुन्दर कथा आहे..

मस्त कथा... आवडली.

पु.ले.शु.

स्वाती दिनेश's picture

2 Jun 2014 - 7:07 pm | स्वाती दिनेश

आजी आजोबा आवडले,
स्वाती

वटवट's picture

3 Jun 2014 - 3:31 pm | वटवट

सर्व प्रतिसादकर्त्यान्चे खूप खूप आभार.... :)

सूड's picture

3 Jun 2014 - 4:47 pm | सूड

ह्म्म !! पुलेशु.

म्हैस's picture

5 Jun 2014 - 3:26 pm | म्हैस

मला तरी हा एखाद्या गोष्टीमध्ये अति गुरफटून जाण्याचा प्रकार वाटतो हा
आजोबांच्या डोक्यावर खरच परिणाम झाला होता का? त्यांना डॉक्टरांची गरज असेल का

वटवट's picture

9 Jun 2014 - 2:36 pm | वटवट

आभारी आहे...

इरसाल कार्टं's picture

18 Sep 2014 - 3:48 pm | इरसाल कार्टं

"सगळी कामं मीच करायची.. तू बाकी काहीच करत जाऊ नकोस." ही.
"केली तरी कुणाला काही आहे त्याचं" मी.
"म्हणजे?.."
"कोणी काही म्हणतं का त्याबद्दल"
"काय म्हणायला पाहिजे"
"जाऊ दे… पालथ्या घड्यावर…. "
..................................
असले अनुभव आम्हीही घेतोय सध्या.
भविष्यात बर पडेल.

बापू नारू's picture

27 May 2015 - 12:28 pm | बापू नारू

खूपच सुंदर..

नितिन५८८'s picture

27 May 2015 - 4:04 pm | नितिन५८८

खूपच सुंदर..

शि बि आय's picture

27 May 2015 - 4:54 pm | शि बि आय

खूप सुंदर !! एकरूप होणे म्हणजे काय आणि तेही अशा प्रकारे ??

खूप धैर्य लागते हसत हसत सोसून कढ आवरण्यासाठी….

मोहनराव's picture

27 May 2015 - 6:39 pm | मोहनराव

छान कथा!

रुपी's picture

28 May 2015 - 12:37 am | रुपी

खूप आवडली कथा! आधी मिपावरच वाचली होती, तेव्हाही आवडली होती, पण बहुतेक प्रतिसाद दिला नव्हता..

चित्रगुप्त's picture

28 May 2015 - 1:02 am | चित्रगुप्त

अतिशय सुंदर, र्‍हदयस्पर्शी कथा.

कोणावर जर एवढं प्रेम करायचं असेल तर ते शहाण्या माणसाचं काम नाही. त्यासाठी वेडाच माणूस हवा..

व्वा.
माझ्या एका जुन्या मित्राचा मोठा भाऊ ... काही वर्षांपूर्वी पत्नी निवर्तली. आता तो एकटा रिटायर आयुष्य जगतोय. खूप पूर्वी माझ्याबरोबर एक -दोनदा गावाबाहेर निसर्ग चित्र रंगवताना सोबत आला होता... तो आता रोज रात्री पेंटिंग करतो. मी विचारले, की हे आता कसेकाय सुचले, तर तो म्हणाला: मी तिच्याशी रोज बोलतो. तिनं सांगितलंय मला पेंटिंग सुरु कर म्हणून. ते आता करतो आणि तिला दाखवतो... सणासुदीला गोडाधोडाचा स्वयंपाक करून तिच्यासोबत जेवतो.