अशीच एक फँटसी..(१)
अशीच एक फँटसी..(२)
गुरूदेवांची भेट घेण्यासाठी उर्मीला विषय माहिती असणे गरजेचे होते. शनिवारी संध्याकाळी अर्णवने उर्मीला आपल्या स्मरणशक्ती(?)चे दोन्ही किस्से कथन केले.
...अन त्याच्या कल्पनेप्रमाणेच झाले. उर्मी जे हसत सुटली ते काही केल्या थांबेचना. शेवटी त्याने दोन्ही हातांची घडी घातली अन पायावर पाय टाकून गंभीर चेहेऱ्याने सोफ्यावर बैठक मारली. पाच सात मिनिटे हसून लोळून झाल्यावर अखेर त्याचा चेहेरा बघून उर्मी त्याच्याजवळ जाऊन बसली. त्याच्या डोक्यावर टपली मारून म्हणाली,
'आणि काय काय आठवतंय बरं, माझ्या शोन्याला..?'
मग थोडा वेळ अर्णवचा रुसवा अन तिचे खुदखुदणे यात गेल्यावर उर्मीपण सिरीयस झाली. म्हणाली,
'हे बघ, आपण याचे प्रथम स्टेप बाय स्टेप विश्लेषण करू.
पहिल्या स्वप्नात तुला काही घटना दिसल्या, की ज्यामध्ये तू एक सहभागी व्यक्ती होतास. बरोबर ?'
'होय...'
'पण त्याच्याही आधी पार्श्वभूमीवर काही घटना घडल्या होत्या, ज्या तुला स्वप्नात माहिती झाल्या अन जाग आल्यावरही आठवल्या.'
'होय..'
'सामान्यपणे स्वप्नातल्या घटना जागेपणी आठवतात. पण त्यामागची पार्श्वभूमी, दुवे समजत नाहीत. पण ते सगळे तुला आठवते, होय ना ?'
'बरोबर.'
'आता दुसरे स्वप्न. हां, हां, तेव्हा तू झोपलेला नव्हतास, पण डोळे मिटले होते. तेव्हा, डुलकी लागली असणे शक्य आहे. यालाही आपण स्वप्नच म्हणू. तर यातही तुला काही घटना आणि काही व्यक्ती दिसल्या पण तू त्यात प्रत्यक्ष सहभागी नव्हतास ! बरोबर ?'
'अं, अगदी तसेच काही म्हणता येणार नाही. मी प्रत्यक्ष तिथे हजर तर होतो. माझ्या डोळ्यासमोर ते घडले. अरविंदने त्याला ढकलले...!'
'तू कोण होतास ? कारण ज्याने दुसऱ्या कुणाला ढकलले तो असा पुरावा ठेवणार नाही !'
अर्णवने पुन्हा डोळे मिटले. ते स्वप्न (?) डोळ्यासमोर आणले. कोण होता बरं तो ? डोंगरउताराच्या हिरवळीवर तो स्वत:ला घेऊन गेला. सर्रकन चित्र उलटे व्हावे तसे त्याला ते दृश्य डोळ्यासमोर दिसू लागले. पण त्यात तो स्वत: कुठे होता, कसा साक्षीदार झाला ते काही केल्या उमजेना ! अरविंदशी असलेली भावनिक निकटता त्याला त्या प्रसंगात घेऊन गेली होती का ? की संकेतविषयीच्या सहानुभूतीने कुतूहलाने ती किल्ली खोलली होती ?
काही वेळ असाच गेल्यावर मग उर्मि बोलली,
'पण मग तुला गुरूदेवांची भेट कशाला हवी आहे ?'
'म्हणजे ? हे असं काहीच्या बाही मला आठवत राहिलं तर काय करायचं ?'
'काय करायचं ? काहीच नाही ! दुर्लक्ष करायचं .' उर्मी मान उडवून म्हणाली.
'अगं पण...? छे ! अशक्य आहेस तू !' अर्णव वैतागला.
'बरं, आपण एक काम करू. तुला वॉरचं स्वप्न पडलं होतं ना ?'
'हां..'
'कधी झालं बरं हे वॉर ?'
'अं...अर्णवने पुन्हा डोळे मिटले. युद्धाचा प्रसंग डोळ्यासमोर आणला. कधी अन कुठे बरं झालं हे सगळं ? कसं बॉ आठवायचं ? किल्ली तुझ्याकडेच आहे..गुरुदेव म्हणाले होते. पण कुठं ठेवलेली असते ती ?
अन आश्चर्य म्हणजे अर्णवने काही खास प्रयत्न करण्याआधीच त्याच्या नजरेसमोर ..म्हणजे मनाच्या पाटीवर सरसर काही उमटले...१९६२. चीन बॉर्डर.
'१९६२, चीन बॉर्डर..' तो अभावितपणे म्हणाला.
उर्मी चाट पडली. 'आर यू शुअर ?'
'येस.'
'ओके, लेटस फाईंडौट..माझा एक क्लासमेट आर्मीत आहे. त्याला शोधायला सांगू.'
उर्मीने आर्मीवाल्या मित्राला लगेच फोन केला. १९६२ च्या रेकॉर्डमध्ये दोन लेफ्टनंटस ची नावे आहेत का ते पाहायला सांगितले.
दुसऱ्या दिवशी आर्मीवाल्या मित्राचा फोन आला. शशांक पांडे अन सुनील मिश्रा , वाराणसी, ही दोन नावे त्याला मिळाली होती. पैकी सुनील मिश्रा ६२ च्या युद्धात शहीद झाला. पांडे ७७ ला रिटायर झाला अन ८५ ला स्वर्गवासी झाला. त्यानंतर त्याची पेन्शनवर सही झाल्याची नोंद नव्हती.
अर्णव अन उर्मी दोघे दिवसभर सुन्न होते !
दोघांनी बरीच चर्चा केली अन अखेर गुरूदेवांची भेट घेणे आवश्यक आहे असे ठरवले. शनिवारी उर्मीने बंगल्यावर फोन केला.
...गुरुदेव पंधरा दिवसांच्या परदेशदौऱ्यावर गेले होते !
झाले. सोमवारपासून दोघांचे बिझी रुटीन पुन्हा सुरु झाले.
दोन दिवस असेच गेले. अर्णवच्या मनाच्या पडद्यावर असंबद्ध व्हिडीओ क्लिप्स बेसावध क्षण गाठून सैरावैरा धावतच होत्या.
दोन दिवसांनी उर्मी म्हणाली, 'अरे, तुझी ही अजब स्मरणशक्ती माझ्या एका स्वप्नाचा छडा लावू शकेल का ?'
'..??'
'मलाही अधून मधून एकाच स्वप्न सारखे पडत असते...
..मी कुठेतरी जात असते ...अचानक उंचावरून कुठून तरी पाण्याचा प्रचंड लोंढा दूरवर कोसळतो अन घोंगावत येऊन मला गिळू पाहतो. मी खूप घाबरते. चारी बाजूंना वाट शोधत पळत सुटते. पण जिकडे जाईन तिकडून पाणी येतच राहते..अन मी जागी होते...'
'हो, तू मागे एकदा रात्री अशीच घाबरून जागी झाली होतीस ! काय थंडगार पडली होतीस तेव्हा ? खरोखरीच पाण्यात भिजल्यासारखी...'
अर्णवने डोळे मिटले अन उर्मीला दिसणारे स्वप्न मन:चक्षुंसमोर आणण्याचा प्रयत्न केला. पण छे ! काही उमज पडेना. थोडा वेळ स्मरणशक्तीशी खेळ करून मग तो रुटीन कामाला लागला.
रात्री झोपेपर्यंत ही गोष्ट त्याच्या मनाने तात्पुरती सायडिंगला टाकली. पण झोपेने जेव्हा एक नेहमीचे ठराविक वळण घेतले अन ती जागृती अन सुषुप्ती यांच्या मधला प्रदेश पार करू लागली, तेव्हा ती कळ पुन्हा कार्यान्वित झाली.
त्याच्या डोळ्या (?)समोर एक दृश्य होते. हिमालयातील एक गुहा. भगवे कपडे धारण केलेला तिशीचा एक तरुण आत ध्यानस्थ बसलेला. एकाएकी बाहेर कडाड असा आवाज झाला. तरुण बाहेर आला. तीन बाजूंनी घेरलेल्या उंच हिमकड्यांच्या मधली ती एक घळ होती. एका बाजूस नदीकडे जाणारा उतार. अन आत्ता, समोरच्या कड्यावरून पाण्याचा एक प्रचंड लोंढा तरुणाच्या दिशेने झेपावत होता. वर कुठेतरी बर्फाचा कडा कोसळून त्याच्या उदरातले पाणी प्रवाही झाले होते. अन प्रचंड वेगाने नदीकडे झेपावत होते. तरुण संन्यासी प्राणभयाने पळू लागला. पण पाण्याच्या लाटेने अखेर त्याला गाठलेच ! तिथेच त्याची अन त्याच्या साधनेची इतिश्री झाली !..त्या जन्मी.
एक धक्का बसून अर्णवने डोळे उघडले तेव्हा एसी सुरु असूनही तो घामेघूम झाला होता. पाहिलेल्या दृश्याचा संदर्भ त्याच्या साधारण मनाला कळत नव्हता. चित्त जरा स्थिर झाल्यावर त्याने पुन्हा ते दृश्य डोळ्यासमोर आणले, तेव्हा त्याला ते उमगले. कसे ते त्याला सांगता येत नव्हते.
होय, ती उर्मी होती. तिचा तो यापूर्वीचा कितवा जन्म होता, कोण जाणे. पण त्या जन्मात तिचा मृत्यू त्या दुर्घटनेने झाला होता. त्या घटनेचा ठसा ज्वलंतपणे तिच्या अव्यक्त जाणीवेत खोलवर रुजला होता अन स्वप्नरूपाने तिच्या स्मृतींना चेतवत होता.
त्या जन्मी अपूर्ण राहिलेली तिची साधना या जन्मी तिला ओढ लावत होती. नकळत तिची पुन्हा त्या मार्गावर वाटचाल सुरु होती. एक अधुरे कार्य पूर्ततेकडे नेण्यासाठी ती प्रेरणा तिला अध्यात्माकडे खेचत होती. गती दिलेले एक चक्र, गती देणाऱ्याला विविक्षित दिशेने ढकलत होते. ...
पण हे त्याला कुठून अन कसे 'जाणवत' होते ? ही कसली जाणीव ? अदृश्य अव्यक्त अकल्पनीय मार्गांवरून सरसरत येणारी अन व्यक्त मनाला वेढून टाकणारी ? या स्मृती त्याच्या मेंदूमध्ये कुठे रेखांकित झालेल्या होत्या ? मेंदू देहाशी संलग्न . अन देह तर गेल्या तीस वर्षातला. मग वर्षावर्षांच्या काळदऱ्या ओलांडून या स्मृती त्याच्या मेंदूत कशा येत होत्या ?
हतबल होऊन त्याने विचार करणे बंद केले.
दुसऱ्या दिवशी त्याने उर्मीला ते सांगितले. आश्चर्य म्हणजे यावेळी तिने ते हसण्यावारी नेले नाही. उलट ती गंभीरपणे मान हलवून म्हणाली,
'असेल बाई ! मला स्वप्नात बरेचदा आजूबाजूला बर्फ पडलेला दिसतो. मी अजून कधी
बर्फवृष्टी कशी असते ते डोळ्यांनी पाहिलेही नाही ! अन साधनेत असताना विशिष्ट क्रिया आपोआप होतात, कधी केल्या नसतानासुद्धा ! '
आता आश्चर्यचकित होण्याची पाळी अर्णवची होती !
'उर्मी यू टू ?'
अन मग उर्मीला अन त्याला नकळत तो एक छंदच जडला. काही एक अनाकलनीय गोष्ट दृष्टीस पडली की त्यामागची अज्ञात पार्श्वभूमी शोधून काढणे.
त्या दोघांच्या एका स्नेही दांपत्यातील पत्नीची मूल न होऊ देण्यामागची मानसिकता विवाहाच्या आधीपासूनच होती. विवाहाला तीन वर्षे झाली तरी ती मूल होण्याचे मनावर घेत नसे. असेच एकदा त्यांच्याकडे गेले असता अर्णवच्या मनाने ती गोष्ट मनावर घेतली अन स्मृतीशोधातून असे निष्पन्न झाले की की पूर्वजन्मी तिला बाळंतपणात विचित्र पद्धतीने यातनामय मरण आले होते. त्या यातनाचा ठसा तिला या जन्मी त्या गोष्टीपासून दूर ठेवीत होता. अर्णवने ही गोष्ट उघडकीला आणल्यावर त्या दाम्पत्याने मानसोपचाराच्या मदतीने ही समस्या दूर केली.
.या नव्या स्मृती-शक्तीच्या आधाराने उर्मीच्या मैत्रिणीच्या सासुबाईच्या बालिश अन पोरकट वागण्यामागचा कार्यकारणभाव , अर्णवच्या दूरच्या नात्यातल्या एका बहिणीचा लग्न अन पुरुषद्वेष्टेपणा यांचे रहस्य , अशी दोन-तीन कोडी दोघांनी आठेक दिवसात उलगडली. त्या त्या व्यक्तीचा अन समस्येचा विचार मनात खोलवर रुजवला की काम होई. जागृत मनाची पकड सैल होताच धबधब्यासारखा स्मृतींचा लोंढा घोंघावत येई. त्या स्मृतीचित्रांमध्ये अर्णवचा सहभाग असो वा नसो, जाणिवांच्या कक्षेत सर्व क्षितिजे सामावत जात.
पण हळूहळू अर्णवला जाणिवेची ही वाढती व्याप्ती पेलवेना झाली. वेगवेगळ्या जीवांच्या अनेक जन्मांच्या असंख्य चित्रविचित्र अनुभूती अल्पावधीत अनुभवून त्याचा जीव पिचून जाऊ लागला. चार दिवसात शंभर चित्रपट पाहिल्यावर डोके जणू भंजाळून जावे, तशी त्याची अवस्था झाली. एक चमत्कारिक मानसिक थकवा येऊ लागला. ऑफिसात मधेच केव्हाही ते सगळे आठवले, की कामात मन लागेनासे होई. शांत झोप दुर्मिळ झाली. कोणत्या क्षणी आठवणीची भुते डोके वर काढतील नेम नाही, अशा धास्तीने त्याचे डोळे पापणी मिटायला कचरू लागले.
शिवाय आता त्याच्या 'स्मरणशक्ती'ची आसपासच्या जनलोकात अन नातेवाईकात बऱ्यापैकी पब्लिसिटी झाल्याने होतकरू 'गिऱ्हाइके' समस्या सोडवण्यासाठी त्याला शोधत येऊ लागली. त्यामुळे अर्णव अन उर्मी यांचे खाजगी आयुष्य ढवळून निघाले. एकांत दुर्मिळ झाला. अन हे सगळे अवघ्या पंधरा दिवसात झाले.
अर्णव इतका वैतागून गेला की यापेक्षा पूर्वीची विस्मृती बरी असे त्याला थोड्याच दिवसात वाटू लागले ! आता लवकर गुरूदेवांची भेट व्हावी अन या प्रकरणाचा सोक्षमोक्ष व्हावा अशी त्याला निकड भासू लागली.
आणि ते पिसाट पंधरा दिवस एकदाचे संपले !
गुरुदेवांचे परदेशातून बंगल्यावर आगमन झाल्याची खबर आली !!
(क्रमश:)
प्रतिक्रिया
5 May 2014 - 9:49 am | पैसा
कथेने मस्त वेग घेतला आहे!
5 May 2014 - 11:26 am | पिलीयन रायडर
+१
उत्कंठावर्धक!!!
पण लवकर लवकर लिहा !
6 May 2014 - 2:18 pm | दिपक.कुवेत
तीनहि भाग आत्ताच वाचुन काढलेत. आता थांबु नकोस. वेळात वेळ काढुन कथा संपव. पुढे काय होणार आहे त्याची फार उत्सुकता लागुन राहिली आहे.
5 May 2014 - 10:34 am | ज्ञानोबाचे पैजार
सिनेमॅटीक लिबर्टी थोडी जास्तच घेतली आहप, तरी सुद्ध्दा हा ही भाग उत्कंठावर्धक झाला आहे.
पुभाप्र
5 May 2014 - 12:33 pm | काव्यान्जलि
पुढचे भाग लवकर येऊद्या.....
5 May 2014 - 12:44 pm | कुसुमावती
सुसाट चाललिये कथा. पु.भा.प्र.
5 May 2014 - 2:04 pm | प्यारे१
लौकर येऊ द्या पुढचा भाग!
5 May 2014 - 2:20 pm | आतिवास
लिंक तुटली आहे माझी, आता परत दुसरा भाग वाचायला हवा - आणि मग पहिलाही :-)
5 May 2014 - 10:04 pm | सस्नेह
एप्रिल महिनाभर इतर कामांत व्यस्त राहिल्याने हा भाग जरा लांबला.
5 May 2014 - 2:40 pm | आत्मशून्य
.
5 May 2014 - 10:30 pm | सखी
कथेची वळणं आवडत आहेत. लवकर लिही म्हणजे लिंक तुटत नाही. मलाही दुसरा भाग गोष्टीतल्या गोष्टीसाठी परत वाचायला लागला, अर्णव व उर्मी (आणि गुरुदेव!) तसे लक्षात आहे पण बाकीची सगळीच पात्र जी येऊन जाऊन आहेत ती लक्षात रहात नाही.
6 May 2014 - 11:57 am | एस
आउर आन्दो. जलदी.
6 May 2014 - 1:21 pm | कवितानागेश
इन्टरेस्टिन्ग. :)
7 May 2014 - 9:54 am | स्पंदना
एकूण साध्या विसरभोळ्या अर्णवचा पार मेमरी स्पेश्शालिस्ट बाबा होउन गेला. आणा तुमच्या समस्या आम्ही आमच्या मेमरीवर ताण देउ अन झटकन सोडवु!!
चांगल आहे.
स्नेहांकिता मस्त जमलाय भाग हा. बघु आता पुढे काय होतेय.