व्यवहारज्ञान

मनीषा's picture
मनीषा in जनातलं, मनातलं
18 Apr 2014 - 12:22 pm

आज जेन आत्याचा गोष्टी सांगण्याचा चांगलाच उत्साह दिसत होता.
तिच्या असंख्य भाचे, पुतण्यांपैकी रेमंड हा तिचा सर्वात लाडका होता. का ते तसं सांगता येणार नाही. पण बहुदा दोघांचा आवडीचा विषय समान असल्यामुळे असेल...

मनुष्यस्वभाव, सवयी आणि वर्तणूक हा मिस जेन मार्पलचा आवडीचा विषय . म्हणजे त्यात तिने कॉलेज मध्ये जाऊन कुठली पदवी संपादन केली नव्हती, परंतु जीवनाच्या विशाल शाळेमध्येच ती सारं काही प्रत्यक्ष अनुभवातून शिकली होती. आणि रेमंड हा एक लेखक होता. मिस जेन मार्पल च्या मते त्याचे कथाविषय असलेली माणसे काहीशी वेगळीच असत, म्हणजे तिच्या जुन्या पुराण्या व्हिक्टोरियन जगामध्ये सामावली न जाणारी अशी. पण तरीही तो एक यशस्वी लेखक होता. आणि त्या बद्दल जेन आत्याला सार्थ अभिमान होता. आणि रेमंड ला आपल्या या वृद्ध, अविवाहित आत्याबद्दल विलक्षण आदर आणि आपुलकी होती. सेंट मेरीमीड च्या बाहेरील जगात फारशी न वावरता देखिल तिच्याकडे असणारी समज आणि तर्कशुद्ध विचार पद्धती त्याला चकित करीत असे.

तर असा हा रेमंड. आपला मित्र जोन याच्यासह मिस मार्पलच्या घरी काही दिवसासाठी आला होता. जोन हा एक कलाकार होता. चित्रकार होता तो. विविध प्रकारच्या माणसांची तो चित्रे रेखाटीत असे. अर्थात ती चित्रे मिस मार्पलच्या मते .. काहीशी वेगळीच असत. असणारच ना. तो थोडाच व्हिक्टोरियन युगातील चित्रकार होता?
जेन आत्याने दोघांचे मोठ्या आपुलकीने स्वागत केले. एरवीचे तिचे निरस आणि एकाकी आयुष्य काही दिवसांसाठी का होईना, उत्साहाने हसू लागले होते.

"रेमंड, तुला माझे स्नेही मि. पथेरिक आठवतात का?"
रात्रीच्या भोजनानंतर तिघेजण तिच्या छोटेखानी आणि आरामदायक अशा बैठकीच्या खोलीत कॉफी घेत असताना जेन ने विचारले.
"फारच सज्जन आणि प्रामाणिक माणूस. माझे सर्व कायदेशीर आणि आर्थिक व्यवहार तेच सांभाळत असत. ते असे पर्यंत मला त्या बाबत कधीच चिंता करावी लागली नाही , परंतु दुर्दैवाने दोन वर्षापूर्वी त्यांचा मृत्यू झाला. आता त्यांचा मुलगा माझे सारे व्यवहार बघतो. तो देखील त्याच्या वडिलांप्रमाणेच बुद्धिमान आणि प्रामाणिक आहे. परंतु का कोण जाणे?, मि. पथेरिक असताना मी जितकी निः शंकपणे त्यांच्याकडे सारे व्यवहार सोपवीत असे, तसा विश्वास मला नाही वाटत..." बोलता बोलता सुस्कारा सोडत जेन काही क्षण शांत राहिली. कदाचित आपल्या मृत स्नेह्याची तिला आठवण होत असावी. रेमंड आणि जोन देखिल काही न बोलता कॉफीचे घोट घेत राहिले.

जेन मार्पल चे एक वैशिष्ट्य होते. तिच्या बोलण्यात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे इत्थंभूत वर्णन ती ऐकवीत असे. त्याचे दिसणे, सवयी, आवडी-निवडी आणि मग त्या व्यक्ती संदर्भातील तिचे निरीक्षण.. जे सहसा अचूक असे, हे सर्व ती सांगत असे. पण रेमंडला त्याची सवय होती.
रेमंडला अर्थातच मि. पथेरिक आठवत नव्हते. पण तो गप्प बसून राहिला.
"एक दिवस मी जेवणघरातील टेबलवर काही लिहीत बसले होते. वसंतऋतुच्या काळात घरामध्ये दोन दोन फायरप्लेस जळत ठेवणे म्हणजे त्याचा दुरूपयोग आहे असे मला वाटते.म्हणून बैठकीच्या खोली ऐवजी जेवणघराला मी पसंती दिली होती. इतक्यात ग्वेन माझ्याकडे व्हिजिटिंग कार्ड घेऊन आली. ग्वेन तरी आठवते ना तुला रेमंड?" मिस मार्पलने बोलता बोलता अचानक प्रश्न केला.
"नाही, मला नाही आठवत." रेमंड ने उत्तर दिले.
जेन च्या चेहऱ्यावर आश्चर्य उमटले.
"नाही? अरे ती माझी मेड नाही का? लाल, कुरळ्या केसांची..? " जेन ने माहिती पुरवली.
पण रेमंडने परत नकारार्थी मान डोलवली.
"... तर बरं का, ग्वेन ने मि. पथेरिक चे कार्ड मला दिले. रात्रीचे जवळ जवळ नऊ वाजत आले होते. मला आश्चर्यच वाटले. पण मी माझ्या खुर्चीवरून उठून बैठकीच्या खोलीकडे निघाले. जाता जाता ग्वेन ला चेरी ब्रँडी आणि ग्लासेस आणायची सूचना दिली. सोफ्यावर मि. पथेरिक एका अनोळखी व्यक्ती बरोबर बसले होते. मी तिथे जाताच त्याने माझी आणि त्या अनोळख्याची ओळख करून दिली. त्याचे नाव मि ऱ्होडस. तो तसा तरूणच वाटत होता. चाळीशी ओलांडून दोन तीन वर्षे झाली असावी. पण सध्या फारच तणावग्रस्त असावा असेच त्याचा चेहरा सांगत होता. "
"क्षमा करा मि मार्पल तुमच्या घरी न कळविता या वेळी आलो. पण कारणच तसे आहे. तुमच्या सल्ल्याची मि. ऱ्होडस ना फारच जरूर आहे."
मि. पथेरिक म्हणाले.
माझ्या सल्ल्याची याला का आवश्यकता असावी मला कळेना. मी काही कुठल्या विषयातील तज्ञ नाही. मग?
मि. पथेरिक पुढे म्हणाले, " सध्या प्रत्येक विषयातील तज्ञाचा सल्ला घ्यायची पद्धत आहे. पण माझे या संदर्भातील मत काहीसे वेगळे आहे.
आता डॉक्टरचेच उदाहरण घ्यायचे, तर एक एखाद्या विशिष्ट रोगातील तज्ञ असतो, आणि एक तुमचा कौटुंबिक डॉक्टर, ज्याला तुमची सारी माहिती असते. माझ्या नात्यातील एका तरूण मुलीला असा अनुभव आला. तिच्या मुलाला त्वचेचा कसलासा विकार झाला म्हणून ती त्वचारोगतज्ञाकडे गेली. माझ्यामते तिने आधी तिच्या नेहमीच्या डॉक्टरकडे जायला हवे होते. मग त्या तज्ञ डॉक्टरने बरीच महागडी औषधे लिहून दिली, कसल्या कसल्या तपासण्या करवल्या, आणि निष्कर्ष काय निघाला? तर त्या मुलाला एक प्रकारच्या कांजिण्या झाल्या होत्या. आता ती आधीच तिच्या नेहमीच्या डॉक्टरकडे गेली असती तर? काही वेळा ज्ञाना पेक्षा अनुभव जास्त उपयोगी ठरतो. "

मि. पथेरिक ने ऱ्होडस कडे पाहिले. पण त्याच्या चेहऱ्यावर काहीच भाव नव्हते. त्याने ते सारे बोलणे ऐकलेच नसावे असे मला वाटले. त्याच्या चेहऱ्यावरच्या तणावाच्या रेषा तशाच दिसत होत्या. तो एकदम म्हणाला,
"काही दिवसातच, मला गळफास लागून मी मरणार आहे. "
त्याची बोलण्याची पद्धत काहीशी तुसडी होती. पण कुठल्यातरी काळजीमध्ये असलेल्या व्यक्तीकडून सौजन्यपूर्ण वागणुकीची अपेक्षा ठेवणे चूकच.. नाही का? मिस मार्पल म्हणाली. रेमंड आणि जोन ची अर्थातच तिच्या बोलण्याला सहमती होती.
"तर मिस मार्पल. .. मि. ऱ्होडस हे इथून वीस मैल अंतरावर असलेल्या बर्नचेस्टर या गावातून आले आहेत. तुम्हाला आठवत असेल काही दिवसापूर्वी तेथे एक खून झाला होता. तो यांच्या पत्नीचा. " मि. पथेरिक म्हणाले.

आता माझ्या लक्षात आले की मि. ऱ्होडस इतका चिंताग्रस्त का होता. पत्नीचा खून झालेला, म्हणजे पहिला संशयित अर्थात तिचा पती असणार. पण मला काहीसे ओशाळल्या सारखे झाले. ती खूनाची घटना मी ओझरती ऐकली होती. पण त्या बद्दल मला काहीच माहिती नव्हती. मनुष्य स्वभावच असा आहे, की आपल्या भोवताली काय घडते आहे या कडे दुर्लक्ष करून दूरच्या घटनांची नोंद तो घेत असतो. आता माझेच बघा ना... मला भारतात त्यावेळी आलेल्या भूकंपाबद्दल माहिती होती, पण माझ्या इतक्या जवळ घडलेल्या घटनेची गंधवार्ता नव्हती. आणि तसही आमच्या गावात घडलेले ते नर्स चे प्रकरण होतेच. आणि ते मला तरी फारच महत्त्वाचे वाटत होते. त्या मुळे त्या बर्नचेस्टर च्या खूनाकडे माझे फरसे लक्ष गेलेच नव्हते. पण तसे कबूल करणे शहाणपणाचे नव्हते. म्हणून मी घाईघाईने म्हणले,
"हो हो.. मी ऐकले आहे त्या संबंधी. " मी माझे अज्ञान उघड न दर्शविता सावरून घेतले.
रेमंड आणि जोन आता उत्सुकतेने सरसावून बसले. होते.

" बरं का ऱ्होडस, मिस मार्पल ने अशा अनेक गुंतागुंतीच्या केसेस आजवर यशस्वीरीत्या सोडविल्या आहेत. ती कदाचित या विषयाची तज्ञ नसेल, पण तिचे अनुभव, व्यवहारज्ञान आणि निरीक्षण शक्ती याच्या भांडवलावर, तज्ञ व्यक्तींना न जमलेल्या केसेस पूर्णत्वास नेल्या आहेत. म्हणूनच मी तुला इथे आणले आहे. कारण ज्ञान आणि व्यवहारज्ञान यात अनेक वेळा व्यवहारज्ञान श्रेष्ठ ठरते. तुझ्याकडे ज्ञान असेल तर तू एखादी समस्या सोडविण्यासाठी सर्वात जवळच्या शक्यतेचा विचार करशील, पण व्यवहारज्ञान मात्र तुला अशा अनेक दुर्लक्षित घटना, व्यक्ती, आणि वस्तू दाखवून देते, ज्या समस्या सोडविण्यासाठी फार महत्त्वाच्या ठरतात. त्यामुळे मिस मार्पल तुझी समस्या सोडवेल याची मला खात्री वाटते."

मि. पथेरिक च्या या स्तुतीने मला छानच वाटत होते, खोटे कशाला बोलू? स्तुती सर्वांनाच प्रिय असते. पण मि. ऱ्होडस कडे बघताना माझा तो आनंद मावळून गेला. कारण मि. पथेरिक च्या शब्दांचा मि. ऱ्होडस वर काहीच परिणाम झालेला दिसला नाही. त्याला माझा अजिबात विश्वास वाटत नव्हता. आणि हे त्याच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होते.

(क्रमशः)

(अ‍ॅगाथा ख्रिस्ती यांच्या, "मिस मार्पल टेलस अ स्टोरी" या कथेचे मराठी रुपांतर )

कथाभाषांतर

प्रतिक्रिया

अभिरुप's picture

18 Apr 2014 - 1:27 pm | अभिरुप

पु.भा.प्र.

आतिवास's picture

18 Apr 2014 - 1:38 pm | आतिवास

वाचते आहे. आवडलं.
पथेरिक, -होड्स, रेमंड. जोन .. ही सगळी नावं जरा गोंधळात पाडणारी - म्हणजे नेमकी कुणाची गोष्ट कुणाला सांगितली जातेय याबाबत संभ्रम निर्माण झाला माझ्या मनात काही काळ ..
पुढील भागाची उत्सुकता आहे.

मुक्त विहारि's picture

18 Apr 2014 - 1:57 pm | मुक्त विहारि

वाचत आहे.

होम्स कथा आणि पायरो कथा, कितीही वेळा वाचल्या तरी, मन भरत नाही.

Prajakta२१'s picture

18 Apr 2014 - 3:47 pm | Prajakta२१

मुक्त विहारींशी सहमत
आणि किती हि वेळा वाचले तरी बोर होत नाही ( विशेषतः होम्स)
फक्त वाचताना थोडा निवांतपणा लागतो :-)
त्या व्हीक्टोरियन काळाची जादूच आहे तशी :-)
पु. भा. प्र .

शुचि's picture

18 Apr 2014 - 7:12 pm | शुचि

आवडले. पुढचा भाग?

सस्नेह's picture

19 Apr 2014 - 12:42 pm | सस्नेह

अ‍ॅगाथा ख्रिस्तीच्या लेखनाचा आशय पुरेपूर उतरला आहे.
पु.भा. प्र.

आत्मशून्य's picture

19 Apr 2014 - 1:46 pm | आत्मशून्य

पुढचा भाग लवकर येउ द्या ... उशीर करू नका ... पटकन टाका..
जिंकलंस ... तोडलंस .. पार चेंदामेंदा केलास ...
विशेषतः शेवटचा आणि तिसरा पॅरा एक नंबर .. आपल्या लेखणशैलीने प्रभावित झालो

मनीषा's picture

20 Apr 2014 - 8:03 pm | मनीषा

@अतिवास : बरोबर आहे तुमचं परत वाचताना मलाही वाटलं की काही वाक्यांमधे अजून एकदोन वाक्ये लिहीली तर कथा अजून स्पष्टं झाली असती

पैसा's picture

20 Apr 2014 - 9:10 pm | पैसा

आता पुढचा भाग वाचते!

कुसुमावती's picture

22 Apr 2014 - 1:40 pm | कुसुमावती

कथा जमलिये. अ‍ॅगाथा ख्रिस्तीचे दोन्हि हेर प्वारो आणि जेन मार्पल यांच्या कथा आवडतात.
पु.भा.प्र.