चांगला चित्रपट हा नेहमी चित्रपटगृहातच पहावा असे माझे आतापर्यंतचे ठाम मत होते. मात्र आता ते बदलावेसे लागणार बहुधा. चित्रपट सिंगल स्क्रीनवरुन मल्टीप्लेक्समधे आलेत, चलतचित्रांचा दर्जा सुधारलाय, ऑडीयो सिस्टीम देखील उत्तम. भिकार ते दर्जेदार असे सगळ्या प्रकारचे चित्रपट बनतायत आणि पिटातलं पब्लीक हाय फाय बनून मॉलमधे २००-२५० रु. चे तिकीट वट्टात फाडतयं.
मात्र "भगवान जब अकल बाँट रहा था तब बहोत सारे लोग घास चरने गये थे" अस वाटतयं. एखादा चांगला चित्रपट बघण्यासाठी जावं, त्यात मनानं गुंगुन जावं आणि मधेच कोणीतरी मोठ्यानं बोलतयं, कोणीतरी नको त्या प्रसंगावर दात काढतयं, कुणाला मधेच कसलेतरी प्रश्न पडतात आणि त्याच उत्तर त्याला अब्बी के अब्बी हवं असतं.
‘फँड्री’ चित्रपट पाहतांना अगदी हेच अनुभव आले आणि आता यापुढे चित्रपटगृहात जाऊन चांगले चित्रपट पहावेत काय ? अशा प्रश्न पडला.
मुळातच संवेदनाशील चित्रपट पाहण्याइतकं भारतीय प्रेक्षकाचं वय वाढलयं का ?
एका प्रसंगात जब्ब्याचा बाप त्याच्या कानफाटात लगावतो तेव्हा बरेच नग खो खो हसत होते.
अरे एखादा माणूस मार खाताना तुम्ही हसुच कसे शकता ?
हाच प्रसंग कोणी पडले तरी हमखास घडतो. अरे ती व्यक्ती पडलीय, त्याला लागलं असेल ह्याचा विचार न करता माणसं पहिली हसून घेतात. ह्यामुळे माणूस पडल्यावर काय करतो माहितीय ? आपल्याला कुठे लागलयं का हे न बघता आपल्याला पडतांना कुणी बघीतलं तर नाही ना याची खात्री करतो.
एका बाईंना ‘फँड्री’ चा अर्थ काय ? याचे उत्तर तिच्या नवर्याकडून चित्रपट सुरु झाल्या झाल्या हव होतं.
अग बाई, चित्रपट संपेपर्यंत तरी थांबायचस ना ? किंवा घरुन गृहपाठ करुन यायचास ना ?
एका साहेबांना फोन आला होता आणि ते चित्रपट सोडून फोनवर बोलण्यात मग्न होते. बरं बोलण्यावरुन लगेचच कुणाची तिरडी उचलायला जायची होती अशी काही इमर्जन्सी जाणवत नव्हती. त्यांच्याच बरोबरचा मुलगा त्यांना फोन ठेवा म्हणुन सांगत होता पण हे महाशय मात्र ऐकायला तयार नव्हते. पण प्रत्येक दहा सेकंदाने ठेवू का ? ठेवू का ? असे विचारत होते.
कॉलेजकुमारांची तर आणखीनच वेगळी गोष्ट. घोळक्यातल्या कुणा ना कुणाला पोरींवर भाव मारण्याची इतकी काही घाई लागली असते की त्यांची सतत काही ना काही रनिंग कॉमेंट्री चालू असते.
खरचं आपण भारतीयांना एटीकेट्स कळत नाहित काय ? कुठे कसे वागावे याचे भान नसावे काय ?
कधी बरे सुधारणार आपण ?
तीर्थयात्रा, पुस्तक वाचन आणी चित्रपट बघणे ही एकट्याने अनुभवायची आहे हेच खरं.
प्रतिक्रिया
24 Feb 2014 - 5:14 pm | सुहासदवन
चित्रपट टीवीवर लागल्यावर घरी पहातो.
24 Feb 2014 - 5:19 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
असा अनुभव मी टाईमपास चित्रपट पाहतांना घेतलाय. पब्लिक सारखं सारखं बोलत होतं. सर्वांना ऐकू जाईल एवढ्या मोठ्या आवाजात आणि त्यांच्या डायलॉगला दाद द्यावी असे वाटणा-या पब्लिकचा अनुभव मीही घेतला. उठावं आन दोन तब्येतीने ठेवून द्याव्या असे नक्कीच वाटले होते. असो. बाकी-
>>> खरचं आपण भारतीयांना एटीकेट्स कळत नाहित काय ?
हळुहळु जमतील एटीकेट्स पाळायला. (परदेशात कसं असतं रे कुंद्या सॉरी कुंदन)
>>> कुठे कसे वागावे याचे भान नसावे काय ?
असावे.
>>> कधी बरे सुधारणार आपण ?
हळुहळु होतील हो बदल.
-दिलीप बिरुटे
(आशावादी भारतीय)
25 Feb 2014 - 4:23 am | स्पंदना
बाई बाई!! टाईमपास!
आठवण नको त्या पिक्चरची. अहो, त्या आयटमसाँगवर लग्नात नाचल्यासारखी अक्षरशः शर्ट काढुन मुलं नाचत होती.
कसली ओरडत होती. अचकट विचकट!!
25 Feb 2014 - 8:51 am | कुंदन
आपले काय ठरले आहे डॉ.
तुम्ही आमचे एटीकेट्स काढु नका , अन आम्ही तुमची थकबाकी काढणार नाही. ;-)
24 Feb 2014 - 5:25 pm | पिलीयन रायडर
अगदी मान्य.. वैताग येतो अशा कमेंट्सचा.. आणि असले बावळट लोक भेटतात म्हणजे भे ट ता त च...
24 Feb 2014 - 5:33 pm | आतिवास
त्यांना आपण 'चित्रपटातली आपल्याला न आवडणारी पात्रं' समजायचं थोड्या काळापुरतं!!
24 Feb 2014 - 5:43 pm | सौंदाळा
सहमत
'अलिबाबा आणि चाळीशीतले चोर' बघायला गेलो होतो तेव्हा आनंद इंगळेने नाटक थांबवुन रंगमंचावरुनच फोनवर बोलणार्या माणसाला सज्जड दम दिला होता.
'टाइमपास' बघताना पण काही लोकांचे जोरदार आवाजातले अश्लील कॉमेंट्स ऐकुन वैताग आला होता.
24 Feb 2014 - 6:17 pm | आत्मशून्य
नुसत्याच कलेला दाद देणे हे मुडदयावरच्या लिवाइस जिन्सची तारीफ़ केल्यासारखे वाटते .
24 Feb 2014 - 7:49 pm | वेताळ
जातात असा मला अनुभव आहे.तुम्ही आता गंभीर होता त्याल प्रेक्षक काय करतील?
24 Feb 2014 - 9:24 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
हेही खरंच आहे.
-दिलीप बिरुटे
25 Feb 2014 - 4:25 am | स्पंदना
पण पहिला ती कलाकृती कसल्या मनोरंजनाची आहे हे पाहुन जाव ना?
आता अमिताभच्या बाकिच्या पिक्चरना शिट्ट्य्या मारता म्हणुन "ब्लॅक" ला माराल का?
25 Feb 2014 - 2:55 pm | प्रमोद देर्देकर
मला वाटंलं की तुम्ही विचारताय त्यांना की ते आंत गम्भीर का होतात अन बाहेर.... हे हे हे
24 Feb 2014 - 10:17 pm | lakhu risbud
Nothing tells a man's character more that he laughs at !
24 Feb 2014 - 10:29 pm | प्रसाद गोडबोले
मलाही मुंबै सेम अनुभव आला ..." काळी चिमणी " असा उल्लेख असलेल्या प्रत्येक वाक्यावर पब्लिक हसत होत... त्यांना वाटत होतं की तो तिला उद्देशुन म्हणतोय ...
एनी वे पब्लिकला दोष देता येणार नाही ... पाच दिवस घासा आणि दोन दिवस हसा ही संस्कृती झालिये मुंबै पुण्यातली ... तिथं इतक्या गंभीर विषयावरील चित्रपट अपेक्षितच नसतो हो ...
शिवाय अजुन २ चुका झाल्यात ... अजय अतुलने केलेले प्रोमो सॉन्ग कम्प्लीटली इर्रीलेव्हन्ट होते ... अजय अतुलच्या करीयर मधी शर्वात वाईट प्रयोग / कलकृती म्हणता येईल
आणि सेकन्डली नागराज ने व्हॅलेन्टाईनचा मुहुर्त साधुन चित्रपट रीलीज केला ...अर्थातच त्या मुहुर्तावर फारच थोदे लोक गंभीर काहीतरी पाहु / समजु शकतात
अवांतर :
आमची ही लिस्ट ( म्हणजे एकट्याने अनुभवायच्या गोष्टींची ) खुप मोठ्ठी आहे ;) .... पावसात भिजणे / ध्यानाला बसणे / दारु पिणे / अभ्यास करणे ...
25 Feb 2014 - 4:27 am | स्पंदना
नाही हो!
पावसात एकट्याने नाही भिजायचं. त्यात साथ हवीच.
25 Feb 2014 - 2:32 pm | बॅटमॅन
इट डिपेंड्स, इतकेच नम्रपणे सुचवावेसे वाटते.
24 Feb 2014 - 10:58 pm | आरोही
खरच अगदी असाच अनुभव मला हाच सिनेमा बघताना आला ...सोबत ३ वर्षाचा मुलगा जो अगदी चतुर मागील college च्या कुमारांचे घाणेरडे शब्द ऐकून मला तर भीती होती कि माझा मुलगा मला काही प्रश्न तर नाही विचारणार न ?
म्हणजे काय mommy ??? पण सुदेवाने तसे काही घडले नाही आमची गाडी फक्त तुम्ही पण हसा न , तुम्ही पण हसा न येथ पर्यंत आली होती
25 Feb 2014 - 12:02 am | राजेश घासकडवी
मलाही असाच गलिच्छ अनुभव आला. शेजारच्या माणसाला विनवणी करून सारखं फोनवर व्हॉट्सअॅप करणं थांबवायला लावलं. त्याच्या शेजारचा माणूस रनिंग कॉमेंट्री देत होता. म्हणजे स्क्रीनवर डुक्कर दिसलं की 'हॅ हॅ हॅ डुक्कर! आयला कसं जातंय बघ.' वगैरे मोठ्ठ्याने बोलत होता. त्यालाही जरा कमी बोला अशी विनंती केली. पण बाकीच्या आख्ख्या थिएटरला काय करणार? काही अत्यंत करुण प्रसंगांना हसत होते. म्हणजे तो आपलं मोडलेलं स्वप्न सायकलवर घालून अत्यंत हताशपणे परत येत असतो तेव्हा लोकांना ते विनोदी वाटलं आणि हसले. काहीही किंचित वेगळं दिसलं की हसायच्या तयारीनेच ते आले होते.
25 Feb 2014 - 4:07 am | निनाद मुक्काम प...
हा अनुभव नेहमीच आला आहे , अर्थात लगान सारख्या सिनेमात आपणच त्या सिनेमाचा शेवटी भाग बनतो तेव्हा लोकांच्या कमेंट व आपल्या सुद्धा कमेंट आपसूकच आता आठवून हसू येते विशेतः आपल्या संघाशी गद्दारी करणाऱ्याला आम्ही जडेजा , अझर असे ओरडत होतो , पण काही संवेदनशील सिनेमे हे नक्कीच शांतनेने पाहायचे असतात
लंडन मध्ये एल ओ सी च्या सुरवातीला भारतीय जवानांची प्रेत दिसत असतांना पुढचा समूह आरामात गप्पा मारत होता ,तेव्हा आम्ही त्यांच्यावर खेकचलो होतो.
टाईमपास पाहताना माझ्या मित्राला त्याच्या बाजूचा इसम आपल्या पत्नीस हे भट लोक असेच असतात असे दरवेळी सांगत होतात ,तेव्हा जातीय अस्मिता उफाळून आली व माझ्या मित्राची व त्या शेजाऱ्याची जुंपली.
भारतात लोकांना एटीकेट्स एका रात्रीत येणार नाही , शाळेत ते बालवयात मनावर बिंबवले पाहिजे. आमच्या देशात शाळेत ह्या गोष्टींना अभ्यासाइतकेच महत्व असते.
मी सिनेमे थेटरात जाऊन पाहणे सोडले आहे ,
फुकटात घरी पाहतो , पण खरे सांगायचे तर अमेरिकन टीव्ही मालिका व त्यांचे सिझन पाहूनच मन तृप्त होते , तीन महिने एखाद्या धारवहिकेमध्ये मन गुंतत जाणे वेगळे ती माझ्या ३ तासात संपणाऱ्या शिनेमात नाही.
25 Feb 2014 - 7:33 am | वेल्लाभट
भारतीयांना मेंदू अॅलॉटच होत नसावेत आता. बघाल तिकडे **च ! चित्रपट्गृहात यांची संख्या लक्षणीय असते.
25 Feb 2014 - 9:56 am | राही
विनोदी आणि लवस्टोरीवाल्या मराठी पिक्चरचे पब्लिक बेकार असते याच्याशी सहमत.
दुनियादारी पहाताना मागील रांगेतल्या एका कॉलेजकुमारीचे 'हात सोड, आधी हात सोड, सोsड, पैले सोड' असे भयाण (भयग्रस्त?) विव्हळणे आणि 'आयला ही यडीच/रडीच हाय' असे हताश उद्गार अधूनमधून (सतत) ऐकू येत होते त्याची आठवण झाली.
25 Feb 2014 - 11:45 am | उदय के'सागर
मिल्टीप्लेक्स नविनच आले होते तेव्हा ते न परवडण्यासारखे होते म्हणून मी सिनेमे साध्या चित्रपट गृहातच पहात असे... हळू हळू असं निरीक्षणात आलं की साध्या चित्रपट गृहात केवळ गुंड नि मवाली लोक येतात आणि सिनेमा कॉमेडी असो, सिरियस असो नाहितर हलका-फुलका असो त्यांना गोंधळ घालायचा तो घालतातच (शिवाय जोडीला ते उग्र गुटख्याचे वास येतच रहातात). पण आपण सोडून ह्यांना कोणी बोलत कसं नाही तर लक्षात आलं की ज्यांना मनापासून सिनेमा पहायचा असतो ते थोडे जास्तं पैसे घालून मल्टीप्लेक्सातच जातात ह्या गुंडांचा त्रास सहन करण्यापेक्षा. म्हणून पहिल्यांदा जेव्हा मल्टीप्लेक्सात सिनेमा पाहिला तेव्हा सुदैवाने अनुभव चांगला होता, वाटले अरे हे चांगले झाले, थोडे पैसे जातात पण सिनेमा शांततेत पहाता येतो... पण हाय रे दैव, २-३ सिनेमे शांततेत पाहिले आणि त्यानंतर अता असा एकही सिनेमा नाही मल्टीप्लेक्सात पाहिलेला की तिथे असा त्रास नसतो... जणू हे जाणून बुजून सोडलेले टवाळके असतात प्रत्येक थिएटर मधे... खरंच कधी थांबणार हे!!! जशी पायरसी बद्दल जाहिरत करतात हे सिनेमावाले लोक तसच त्यांनी ह्या धिंगाण्याबद्दल/व्यत्ययाबद्दल पण काही केलं पाहिजे.. नाटकाच्या बाबतीत जसे कडक नियम असतात प्रेक्षागृहाचे तसेच सिनेमाच्या बाबतित असायला हवे.
25 Feb 2014 - 2:24 pm | विटेकर
थियेटर मधल्या एटिकेट्स बद्दल बोलतोय पण ते इतर सार्वजनिक ठिकाणी तरी आहेत का ?
वैकुंठात (तरी)चित्र विचित्र आवजाच्या रिंगटोन्स सायलेंट कराव्यात याची तरी अक्कल आमच्या पब्लिकला आहे का ?
मोबाईल वर कितीही , कुठेही ,कुणाशीही , कितीही मोठ्या आवाजात , कोणत्याही विषयावर बोलायला आम्हाला घटनेनेच परवानगी दिली आहे. ( घडलेली प्रसंग : एक आई आपल्या बहुधा लग्न झालेल्या लेकीला ट्रेनमधून पाककृती समाजावून सांगत होती , मोठ्ठया आवाजात ! सगळ्या डब्याला कळली ती त्यादिवशी ! आता उकळी फुटली का ? आता जरा गॅस कमी कर ..वगैरे वगैरे ..आणि ते सुद्धा सगळे तीव्र स्वर असणार्या ट- कारी टॅमिल भाषेत , असा वैताग आला! या एका कारणासाट्।ई, मोबाईल कंपण्यांनी त्यांचे दर भरमसाठ वाढवावेत म्हणजे हा त्रास जरा कमी होईल.)
आम्ही रस्त्यावर तरी नीट वागतो का ? बस स्टँड वर ? आणि एअरपोर्ट्वर ?
फार कशाला विदेशात देखील भारतीय विमान ज्या गेट ला लागते त्या गेटाचे आपण स्वारगेट करुन टाकतो.
बाकी अचरटपणा आणि आंबट षौक करायला थिञेटर मान्य करायला हवे , शेवटी आमच्या समाजात आलेला हा असला आक्रस्ताळेपणा ही सिनेमाचीच देन आहे.
25 Feb 2014 - 2:36 pm | सुहासदवन
अगदी बरोबर....
25 Feb 2014 - 3:20 pm | प्रमोद देर्देकर
विटेकरांशी सहमत त्यातुन मुंबईच्या लोकलमध्ये तो गुज्जु असला की सालं किमान १/२ तास किंचाळत राहतो.
आणि भैया असला तर डोक्यात जातो. जर माहिती आहे कि चालु गाडीत रेंज मिळत नाहिये तर भ** उतरल्यावर फोन कर ना. पण ऐकतच नाहीत.
नाना पाटेकर ने "पुरुष" नाटक याच कारणास्तव बंद केले. सगळे जण खुर्च्यांवर उभे राहयचे. त्या तुटायच्या.
या मॉलच्या ठिकाणी असणारी जी थिएटर्स आहेत तिथलं पब्लिक वेगळं असतं.
पण मला वाटतं तुम्ही इरॉस, रिगल, कॅपिटल अशा थिएटरांमध्ये गेलात तर काहिच त्रास होत नाही.
25 Feb 2014 - 5:27 pm | महेश रा. कोळी
अतिशय बिभत्स अनुभव येतात....... असो व्यक्ति तितक्या प्रक्रुती.....
25 Feb 2014 - 11:00 pm | सचिन
या व अशा उद्वेगजनक प्रतिक्रिया अनेकदा ऐकल्या आहेत. पुढे काय ?
एटिकेट्स नसणार्या लोकांना सांगण्याचा / सुनवण्याचा प्रयत्न एटिकेट्स असणार्या किती जणांनी केलाय, आणि काय अनुभव आलाय -- हे ही उद्बोधक ठरेल.आणि हो..इकडे एटिकेट्स नसणारे ... तिकडे गेल्यावर मात्र जेट लॅग जायच्या आत सारे एटिकेट्स शिकलेले असतात. तसेच तिथून परत येताना एटिकेट्स तिथेच टाकून येतात.
26 Feb 2014 - 12:01 am | काळा पहाड
चुकताय. ही जी एटिकेट्स नसलेली जमात असते, ती बहुधा राष्ट्रवादीला मतदान करणारी वगैरे असते. बहुतेकांनी कामानिमित्त्/शिक्षणासाठी परदेश पाहिलेला नसतो. बहुधा दुसर्याच्या पैशाने बँकॉक/सिंगापूर करणारे लोक हे. किंवा दुसरी शक्यता म्हणजे नाईलाजाने नोकरी जरी करावी लागली, तरी विचाराने "राष्ट्रवादी"च असतात. त्यामुळे एटिकेट्स तात्पुरते धारण करून "साहेबां"चा आदेशच आपण कसा पाळतो यात धन्यता मानणारे! नवल नाही की हे एटीकेट्स तिथेच सोडतात.
26 Feb 2014 - 12:22 am | यसवायजी
असहमत.
(बाकी मजेत चाललं असेल तर.. चालू द्या.)
26 Feb 2014 - 10:38 am | विटेकर
टाळ्या ..
हेच ते .. धरणात मूत्रदान करणारे ! मातलेत सारे(ले) !
यावेळी यांचा माज उतरलाच पाहीजे ! राष्ट्रवादीचे नेते म्हटले की मला तो " सिंघम " चित्रपटातला प्रसंग आठवतो.. तोच तो कुल्ल्यावर फट्कवण्याचा, तो प्रसंग मनातल्या मनात रंगवून मी अनेकवेळा तुडुंब खूष झालो आहे ..
पण सारे मनातल्या मनात ! हे प्रत्यक्षात घडते तर काय मजा येईल .. पाय शिवशिवतात नुस्ते!
आजचे उद्गार ऐकले का ? .. आम्ही काय साधु-संत नाही .लेको तुम्ही नाहीच ..तुम्ही तर नामचीन गुंड आहात !
26 Feb 2014 - 12:14 am | आत्मशून्य
स्नेक इंद प्लेन पाहात होतो परप्रांतीय तरुणाम्चा घोलका दंगा करू लागला खरे तर धमाल दंगा चित्रपट होता तरीही हुल्लड़ बाजी बघून व्यवस्थापनाने त्यांना अति दंगा टाळा अथवा टिकिट रक्कम परत घ्या व चालते व्हा हां सल्ला दिल्यावर ते शांत झाले.
अशासाठी किमान जास्त स्क्रीन असलेल्या ठिकाणी वराहत नावाचा स्वतंत्र विभागच सुरु केला पाहिजे मग हौदे दंगा इतरां सोबत नकोच व्हायला पंगा...!
26 Feb 2014 - 12:41 am | विकास
एटीकेट्स म्हणजे सभ्यता/शिष्ठाचार. केवळ इंग्रजीत असले की ते पाश्चात्यांकडून आले असा काहींचा झालेला समज पाहून गंमत वाटली...
कधी कधी कुठे हसायचे अथवा ते हसणे देखील असते असे नाही पण भावना कशा व्यक्त करायच्या हे पब्लीकला समजत नाही. वर आनंद इंगोळे आणि नाना पाटेकरचे किस्से आले आहेत. कधीकाळी गडकरी रंगायतनमधे देखील असे झालेले पाहीले आहे. कुठले ते आठवत नाही. अरूण जोगळेकर का रमेश देव का अजून कोणी पण पुढचे वाक्य बघण्याआधी पब्लीककडे करड्या नजरेने पाहून समज दिली होती... अर्थात ते नाटकात शक्य आहे चित्रपटात कसे करणार?
फेसबुकवर कधी कधी हृदयद्रावक कथा / बातम्या कोणी पोस्ट केल्या तर त्याला देखील "लाईक" क्लिक करून मोकळे होणारे असतात.
कालच एक या संदर्भात सांगता येईल असा (बॉस्टन भागातील) अनुभवः एका कार्यक्रमास गेलो होतो. बहुतांशी गोरे लोकच होते. बरं हे सगळे प्रतिष्ठीत नागरीक होते... सुरवातीस तेथे एका पॅलेस्टाईन युवकाचे भाषण झाले. मुलगा २५शीतला, अत्यंत हसरा पण त्याची स्वतःची कहाणी अतिशय करूणा आणणारी होती. ती कधीतरी नंतर परत... पण सगळेच श्रोते (साधारण २५ एक लोकांचा लहानसा गट) आवाक होऊन आणि डोळे ओले तर होत नाहीत ना याचे कुठेतरी भान राखत ऐकत होते. नंतर प्रश्नोत्तराच्या वेळेत एका बाईने त्या मुलाचे सार्थ कौतुक केले. आणि म्हणाली की you should write book on this. आता असे कधी कधी कोणी उपहासाने कुणाला म्हणू शकते. पण हा उपहास नव्हता याचे सगळ्यांनाच भान होते / असायला हवे होते. तरी देखील अनेकजण जोरात हसली. शेवटी त्या बाईला जरा रागावून सांगावे लागले की हा जोक नव्हता!
असो.
26 Feb 2014 - 11:47 am | चलत मुसाफिर
सार्वजनिक जागी काय तारतम्य बाळगावे याची बहुतेक भारतीयांना पर्वा नसते. विशेष म्हणजे इतरांना यावरून शिव्या घालण्यातही भारतीय पुढे असतात.
मान्यवर लेखिका कविता महाजन यांनी फेसबुकवर नुकताच अशा धर्तीचा विचार मांडला आहे की अशा हैदोशी लोकांना चित्रपट पाहण्यापासून रोखावे (त्याही 'फँड्री'बद्दलच बोलत होत्या.) याच्याशी मात्र मी सहमत नाही. चित्रपट हे मुळात एक 'मास मीडियम' आहे. हजारो लोकांनी पाहिल्याशिवाय चित्रपटाला अर्थ (म्हणजे पैसा नव्हे!) प्राप्त होऊ शकत नाही. कुणाला तो भावेल, कुणाला नाही. ज्यांना गर्दीचा त्रास होतो, त्यांनी पैसे देऊन स्पेशल शो करून घ्यावा, किंवा घरी बसून टीव्हीवर पहावा.
कविता महाजनांना एकाने (फेसबुकवरच) समर्पक उत्तर दिलं आहे: "जेव्हा तुम्ही देमार मसाला सिनेमे पाहायला जाता आणि त्यांना शिव्या घालता, तेव्हा पिटातल्या गर्दीलाही तुमच्याबद्दल असेच वाटत असेल की!"
1 Mar 2014 - 5:47 pm | पैसा
मला वाटतं मराठी प्रेक्षकांची आवड बेर्डे आणि मंडळींनी बिघडवून ठेवली आहे.
1 Mar 2014 - 5:58 pm | अनुप ढेरे
बेर्डे आणि मंडळी (अशोक सराफ, महागुरु महेश कोठारे) यांना दोश लिल्याबद्दल असहमत !
6 Mar 2014 - 4:34 pm | बाळ सप्रे
महागुरु आणि महेश कोठारे यांच्यामधे एक स्वल्पविराम हवा :-)
6 Mar 2014 - 5:05 pm | सुहासदवन
महागुरु महेश कोठारे इथे(यांना) स्वल्पविरामापेक्षा अकलेची जास्त गरज आहे.