"महाराष्ट्र केसरी" स्पर्धेच्या सुरुवातीचा इतिहास......

psajid's picture
psajid in जनातलं, मनातलं
11 Feb 2014 - 10:28 am

मी.पा. च्या दिवाळी अंकामध्ये शिवोssहम यांनी "तालीम" ही खूप चांगली कथा लिहली. एकेकाळी राजाश्रय मिळालेल्या या उपेक्षित कुस्ती प्रकाराबद्दल त्यांनी खूप चांगले लिहून पुन्हा ते सोनेरी क्षण डोळ्यापुढे उभे केले. आजही "महाराष्ट्र केसरी" "हिंद केसरी" या सारख्या स्पर्धा इथे भरतात. यातील "महाराष्ट्र केसरी" स्पर्धेच्या सुरुवातीचा इतिहास सांगण्याचा हा माझा छोटासा प्रयत्न !

महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर अधिवेशन हि संस्था मामासाहेब मोहोऴ यांनी स्थापन करून ''महाराष्ट्र केसरी '' या कुस्तीक्षेत्रातील मानाच्या स्पर्धेची सुरुवात केली.१९५३ साली हे अधिवेशन सुरु झाले. अधिवेशन हे १९५३,५५,५८,५९ रद्दच झाल्या होत्या.१९६० साली कुस्त्या झाल्या मात्र अनिर्नायीत झाल्या. मात्र १९६१ साली औरंगाबाद मुक्कामी ज्या कुस्त्या झाल्या त्या खर्या अर्थाने महाराष्ट्र केसरीचा श्रीगणेशा करणाऱ्या ठरल्या.औरंगाबाद मुक्कामी झालेल्या या स्पर्धेत एकूण २६
जिल्ह्यांपैकी २३ जिल्ह्यातून ५५० मल्ल सहभागी झाले होते.मानाच्या या पहिल्याच महाराष्ट्र केसरीच्या गदेसाठी ५ सिंह झुंजणार होते.
नागपूरचे राम अग्यारी
मिरजेचे बापू बेलदार
कोल्हापूर( मुळचे सांगली जिल्हा गाव दह्यारी ता. तासगाव आताचा पलूस) दिनकरराव दह्यारी.
मुंबईचे बिरजू यादव
आणि वसंत निगडे.
वजने झाली ,आणि कुस्त्यांच्या फेर्या सुरु झाल्या.पहिली फेरी होती दिनकर दह्यारी आणि नागपूरच्या राम अग्यारी यांच्यात.
या फेरीत शाहूपुरी तालमीच्या उंच्या पुर्या आणि गोर्यापान दिनकर दह्यारी यांनी राम अग्यारी याला चीतपट करून कुस्ती-शौकिनांची मने जिंकली.
दुसरी फेरी होती बिरजू यादव आणि बापू बेलदार.
मिरजेच्या संस्थानाचा मल्ल अशी खाय्ती असणारा बापू आणि बिरजू यांच्यात बिरजू वरचढ ठरत तो अंतिम साठी पुढे आला.
पहिलीच महाराष्ट्र केसरीची गदा कोण जिंकणार म्हणून मैदानाला अक्षरश लोकांचा महापूर आला होता.
कोण होणार पहिला महाराष्ट्र केसरी अशी खुमासदार चर्चा सुरु होती.
कुस्ती-पंढरी म्हणून नावलौकिक असणारे कोल्हापूरचे दिनकर दह्यारी यांनी या गदेसाठी प्रचंड मेहनत घेतलेली सर्वाना ठावूक होते तर दुसरीकडे बिरजूने या गदेसाठी जीवाची बाजी लावली होती.
मागच्या सर्व कुस्त्या अतिशय चटकदार करून तो अंतिम सामन्यात सहभागी झाला होता.
आणि कुस्तीची शिट्टी वाजली ,सलामी झडली.
दोन सिंह त्या मानाच्या आणि प्रतिष्ठेच्या गदेसाठी अक्षरश एकमेकावर तुटून पडले.
अखेर दिनकर दह्यारी यांनी जीवाची बाजी लावून पाटावर हल्ला चढवत पट काढून बिराजुला खाली धरून आणले ,जसे खाली धरून दोन्ही गुडघे मातीला टेकले तितक्याच चपळतेने घिस्सा मारून बिरजूला अस्मान दाखवले.
पंचाने दिनकरराव जिंकल्याची शिट्टी जशी मारली तसा तो माणसांचा लोंढा मैदानात घुसला आणि दिनकर दह्यारी यांना उचलून घेऊन मैदानाला प्रदक्षिणा काढली. दिनकर (दह्यारी)पाटील यांचे वस्ताद स्वातंत्रवीर ज्ञानू जाधव (चौकीवाले) उर्फ वस्ताद आबा हे ही दह्यारी गावचे ! आपल्या गावच्या सुपुत्राने महाराष्ट्र केसरीची कुस्ती मारली या आनंदाप्रीत्यर्थ गावाने आणि आसपासच्या गावांनी अक्षरशः दिवाळी साजरी केली.
दिनकर दह्यारी यांचे मूळ गाव सध्याचे सांगली जिल्हा आणि पलूस तालुक्यातील दह्यारी.
सागरेश्वर महादेवाच्या अतिशय जुन्या पर्वत रांगेच्या पायथ्याला अतिशय निसर्गरम्य असे हे गाव.
इथल्या गावांची नावे अतिशय वैशिष्ट पूर्ण आहेत.
दुधारी,दह्यारी,ताकारी,घोगाव.
ज्या गावातून सागरेश्वर महादेवाला दहि जायचे
ते गाव दह्यारी
ज्या गावातून सागरेश्वर महादेवाला दुध जायचे ते
दुधारी
आणि ज्यातून ताक जायचे ते ताकारी.
आणि हा अभिषेक पूर्ण झाल्यावर जे अभिषेकित मिश्रण डोंगरातून वाहत येउन साठ्याचे तिथे माश्या फार घोन्गावायाच्या.
म्हणून त्या गावाला घोगाव असे नाव पडले.
अगदी २ - ३ किलोमीटर अंतरावर हि सर्व गावे आहेत.
जवळ प्रसिध्द पैलवान विष्णुपंत नागराळे यांचे नागराळे हे गाव.
असा हा तांबड्या मातीतील कुस्तीसाठी संपन्न असणारा हा भाग.
मला अभिमान आहे मी दह्यारी या गावामध्ये जन्मलो याचा !

इतिहासमाहिती

प्रतिक्रिया

llपुण्याचे पेशवेll's picture

11 Feb 2014 - 11:32 am | llपुण्याचे पेशवेll

वा वा वा. हा इतिहास पहील्या महाराष्ट्र केसरीचा म्हणता येईल. परंतु अजून इतिहास तपशिलवार लिहावा ही विनंती. त्यात विविध ठीकाणच्या तालमी आखाडे व त्यांचे यशस्वी मल्लं यांचाही मागोवा घ्यावा. कुस्त्यांचे प्रकार, निकाली कुस्त्यांचे नियम यावरही प्रकाश टाकावा ही विनंती.
जरा जालावर शोधाशोध करून फोटो बिटोही लावावेत.

बॅटमॅन's picture

11 Feb 2014 - 12:28 pm | बॅटमॅन

साजिदभाऊ, इतिहास आवडला. याच्याशी थोडाफार परिचय आहे पण प्लीज प्लीज प्लीज तुम्ही शक्य तितका डीटेल्ड इतिहास लिहावा ही विनंती!!! लिहिलेत ते उत्तमच पण पुढील भागांत अजून तपशील असावेत :)

बाय द वे, मिरजेत छोटू पैलवानाचे म्हणून एक मंदिर आहे अन त्याची आरतीही होते. अशा प्रकारचे हे एकमेव मंदिर असावे.

अन घोगावची व्युत्पत्ती घो-गाव अशी असावी असे वाटते, चूभूदेघे. सांगली-कोल्हापूर हा मल्लविद्येसाठी एकदम खंग्री प्रदेश हे बाकी खरेच.

जेपी's picture

11 Feb 2014 - 2:37 pm | जेपी

एक प्रश्न -गदे साठी 5 सिंह झुंझणार असे लिहिले आहे . पण कुस्ती चार जणात झाली असे दिसते . मग वसंत निगडे यांचे काय झाले ?

(काडी पैलवान) जेपी

पी साजीद,

"महाराष्ट्र केसरी" स्पर्धेच्या सुरुवातीचा इतिहास सांगण्याचा हा माझा छोटासा प्रयत्न !" अगदी चान्गलाच जमलाय, सुन्दर असेच लिहा.

विनोद१८

धन्यवाद तुमचे ! थोडी (?) अवांतर माहिती (मला मिळाली ती ) प्रदर्शित करतोय -
कुस्ती हे महाराष्ट्राला लाभलेलं एक दैवी देणं आहे. जणू महाराष्ट्राच्या मातीलाच कुस्तीचा सुगंध आहे. कुस्तीला महाराष्ट्राने मोठ्या श्रद्धेनेच जपलेले आहे , फुलवलेही आहे . या साहसी आणि मनगटातील रग आणि ताकद, शरीराची चपळ हालचाल आणि डावावर प्रतिडाव टाकताना ज्याचा शीघ्र वापर करावा लागतो ती अचूक युक्ती किंवा निर्णयक्षमता यामुळेच या धाडसी आणि मर्दानी क्रीडाप्रकाराला राजाश्रय मिळाला. महाराष्ट्रामध्ये विशेषतः सांगली, कोल्हापूर ला कुस्तीची पंढरी म्हणून संबोधतात. मात्र अलीकडे कोल्हापूर सांगलीबरोबरच, पुणे, सोलापूर, विदर्भ,मुंबई इथेही याचा वारसा समर्थपणे चालवलेला पाहायला मिळतो.
कुस्ती ही साधारण दोन प्रकारामध्ये मुक्यत्वे खेळल्या जातात म्यट वरील आणि लाल मातीतील ! परंतु कुस्ती आणि तांबडी माती याचं एक अतूट नातं आहे. (कुस्ती वर "जीवा शिवाची बैलजोड... " हे हृदयनाथ मंगेशकर यांनी गायलेले उत्कृष्ट गीत ज्यामध्ये होते तो "तांबडी माती" हा चित्रपट ही निघाला होता.) पूर्वी चे मल्ल बहुतांश तांबड्या मातीमध्ये कुस्ती खेळत. सांगली जिल्ह्यामध्ये विटा पासून पुढे गेले कि लेंगरे जवळच तामखडी नावाचं गाव आहे. या गावाची (लाल) माती ही कुस्तीसाठी विशेषकरून वापरली जात. (अजून कुठची असेल तर ज्ञानामध्ये भर टाकावी ही विनंती)
डाव :-
या खेळात अनेक डाव असतात.उदा. निकाल, धोबी मारणे, एकचाक, ठेप लावणे, घुटना, कलाजंग, ढाक, मोळी, आतील व बाहेरील टांग, एकेरी पट, दुहेरी पट, गदालोट, इ.
निकाल..
निकाल हा उभ्या स्थितीत करायचा डाव आहे.निकाल हे नाव एवढ्यासाठी दिले आहे कि हा डाव मारला कि प्रतिस्पर्धी बरोबर पाठीवर पडतो..म्हणून लगेच निकाल लागतो.
निकाल डावात परत एक दोन डावाचे उपप्रकार असतात ते असे कि निकाल उचलून पुठ्ठी मारत येते.निकाल दाखवून मागे जात येते..!! निकाल या डावाला तशी तोड हि एकाच आहे..ती पण खूप सावध असलेल्या पैलवानाला .करता येते.ति अशी कि प्रतिस्पर्धी ज्यावेळी निकाल काढायला घुसेल त्यावेळी अगदी क्षणात बाहेरची टांग लावता येते.फिरवून प्रतिस्पर्धी पाठीवर पडतो…!!
तर हा झाला निकाल व निकालाची तोड ..!!
धोबी मारणे किंवा धोबी-पछाड
प्रतिस्पर्ध्याच्या एका हाताच्या दंडाला आपल्या एका हाताने मजबूत धरावे,त्याला पूर्ण ताकतीने मागे रेटावे. मनुष्याचा सहजगुण असतो कि मागे रेटले कि तो पुढे रेटत असतो,नेमक्या याच गोष्टीचा उपयोग करून त्याच्याच ताकतीवर त्याला चित करणे हे धोबी डावाचे साध्य होय.
एकचाक
प्रतिस्पर्धी खाली बसल्यावर त्याच्या एका पायाचा मेटा उचलून आपले दोन्ही हात ,एक हात प्रतिस्पर्ध्याच्या कमरेच्या वरून आणि एक खालून अशा पध्दतीने घालून ,संपूर्ण ग्रीप आपल्या छातीशी मजबूत धरून पूर्ण श्वास घेवून ज्या बाजूला धरले असेल त्या बाजूला आपल्या कमरेला झुकवून प्रतिस्पर्ध्याला संपूर्ण ताकदीनिशी फेकून द्यावे
ठेप लावणे.
मनुष्याचा गुरुत्वमध्य हालवून त्याचा समतोल बिघडवून त्याला जमिनीवर पाडणे हे या डावाचे साध्य होय. एकेरी पट काढल्यानंतर प्रतिस्पर्ध्याचा गुरुत्व दुसर्या पायावर जातो,आणि तो एका पायावर शरीराचा भार तोलतो ,अशावेळी हा डाव करावा.!! एकेरी पट काढून एक पाय हाताने वर उचलावा,अशावेळी प्रतिस्पर्धी दुसर्या पायावर शरीराचा भर तोलतो ,अश्यावेळी आपल्या पायाने त्याच्या पायाच्या पंजाच्या जर वर जोराने आपल्या पायाचा पंजा मारावा ..ज्याला ठेप मारणे असे म्हणतात.
अश्याने प्रतिस्पर्ध्याचा तोल जावून तो जमिनीवर आदळतो.
ढाक
समोरासमोर कुस्ती सुरु असताना ,प्रतिस्पर्ध्याचा दंड आपल्या एका हाताने धरावा ,दुसरा हात त्याच्या मानेला घालून मान आवळावी ,आणि क्षणात आपली कंबर त्याच्या कंबरेला लावावी आणि जोरात त्याला आपल्या अंगावर खेचावे आणि कमरेत वाकावे.
घुटना
प्रतिस्पर्धी खाली धरून आला कि आपल्या पायाच्या गुडघ्याने त्याच्या मानेवर जोरात दाबावे ,समांतर त्याच्या लांघेला धरून पाठीमागून उचलावे ,जितका गुडघ्याचा दाब अधिक,प्रतिस्पर्ध्याचा विरोध तितकाच कमी होतो ,आणि एक क्षण असा येतो कि त्याचा विरोध नष्ट होवून ,तो मागून उचलला जातो .
तोड :- या डावाची तोड म्हणजे मुळात घुटना ठेवून न देणे होय ,समज त्याने घुताना दिलाच तर हाताने तो वारंवार काढून घेणे . पाय पुढे करून बसने , फिरणे हि या डावाची तोड होय
पोकळ घिस्सा
प्रतिस्पर्धी खाली धरून आणला असता त्याच्या लांघेत आतल्या बाजूस आपला हात घालून लंघ बोटाने घट्ट धरावी लंघ,क्षणात पुढच्या बाजूस झुकून ,त्याचा हात ,ज्यावर ज्याचा बोजा पडला असेल तो हात आपल्या हाताने ढकलून ,आतील हाताने प्रतिस्पर्ध्यास पुढे रेटून फिरवावे.
एकचाक
प्रतिस्पर्धी खाली बसल्यावर त्याच्या एका पायाचा मेटा उचलून आपले दोन्ही हात ,एक हात प्रतिस्पर्ध्याच्या कमरेच्या वरून आणि एक खालून अशा पध्दतीने घालून ,संपूर्ण ग्रीप आपल्या छातीशी मजबूत धरून पूर्ण श्वास घेवून ज्या बाजूला धरले असेल त्या बाजूला आपल्या कमरेला झुकवून प्रतिस्पर्ध्याला संपूर्ण ताकदीनिशी फेकून द्यावे

1) पै. गणपतराव खेडकर ( मुळ गाव -जुनेखेड ता.वाळवा जी. सांगली ) साल – १९६४ आणि १९६५. १९६४ सालच्या “महाराष्ट्र केसरी” च्या तिसऱ्या अधिवेशनाचे यजमानपद अमरावतीला मिळाले होते. इतिहास प्रथमच विदुतझोताताच्या प्रकाशात आणि आंतरराष्ट्रीय गादिवर हे सामने हे या अधिवेशनाचे वैशिष्ट्य होते. २६ जिल्ह्यातील एकूण ४१६ मल्लानी या अधिवेशनात सहभाग घेतला होता.अंतिम सामन्यात सोलापूरचे तीपन्ना बिराजदार आणि कोल्हापूरच्या गंगावेस तालमीचे गणपतराव खेडकर हे आलेले होते. आणि झालेल्या या झुन्झीत अवघ्या ४ थ्या मिनिटाला गणपतराव खेडकर यांनी सोलापूरच्या तिपन्ना बिराजदार यांना असमान दाखवून तिसऱ्या गदेवर सांगलीचे नाव कोरले. सांगलीला आलेली हि तिसरी गदा होय. कोल्हापुरात आणि जुनेखेडात जल्लोष साजरा झाला. १९६५ साली झालेल्या महाराष्ट्र केसरी च्या चौथ्या सामन्यात हे सामने नाशिक मुक्कामी झाले होते. या सामन्यात सुद्धा निविर्वाद वर्चस्व राखत गणपतराव खेडकर यांनी सलग दोनदा ”महाराष्ट्र केसरी” होवून विक्रम केला. कोल्हापुर आणि सांगलीचे नाव संपूर्ण महाराष्ट्रभर झाले.
2) पै. दिनानाथ सिंग - १९६६ साली मुबई मुक्कामी महाराष्ट्र केसरीचे मैदान भरले होते. जन्मभूमी महाराष्ट्र नसलेल्या काही मल्लांनी महाराष्ट्र केसरीजिंकून नाव अमर केले त्यापैकी आदराने एका कुस्ती भिष्म्चार्याचे नाव घेवू वाटते ते म्हणजे ‘दिनानाथ सिंग ” यांचे. दिनानाथ सिंग हे मुळचे वाराणसी चे. बालपणीच ते विडलांच्या व्यवसायामुळे मंबुईत आले. महाराष्ट्रतील लोकांनी त्यांच्यावर एवढे प्रेम केले कि ते कधी परकीय राज्यातून आलेत असे वाटूही दिले दिले नाही. पुढे त्यांनी महाराष्ट्रचे पलैवान म्हणून भारतात प्रतिनिधित्व केले. मंबुईचे प्रतिनिधित्व करत दिनानाथ सिंग अंतिम सामन्यात आले होते. आणि कोल्हापूरचे चंबा मुतनाळ यांच्या विरुद्ध हा अंतिम सामना होणार होता. शेवटी गुणावर दिनानाथ सिंग ”महाराष्ट्र केसरी” चे दावेदार झाले
3) पै. हरिश्चंद्र बिराजदार (लातूर) साल – १९६९ साली लातूर मुक्कामी हे महाराष्ट्र केसरीचे १४ वे अधिवेशन होते. या गदेसाठी साऱ्या महाराष्ट्रातून एकाच नावाची चर्चा होती. दादु चौगुले कोल्हापूर. ताकतीने आणि अनुभवाने दादु मामानी अल्पवधीतच नाव कमावले होते. दादु मामा अंतिम सामन्यात पोहचले. मात्र प्रतिस्पर्धी कोण याची चर्चा सुरु झाली. आणि नवल घडले ,एका सडपातळ बांध्याच्या नवख्या मल्लाने धडाधड आक्रमक कुस्त्या करत परेशुराम सागावकर,संभाजी पवार यासारख्या दिग्गज पैलवानांना पराभूत करत अंतिम सामन्या प्रवेश मिळवला. तो नवखा होता डबल महाराष्ट्र केसरी गणपतराव खेडकर यांचा पठठा आणि मुळचा लातूर चा असणारा पैलवान हरिश्चंद्र बिराजदार मामा. सगळ्यांचे लक्ष्य अंतिम सामन्याकडे लागले होते. हि झंजु अटीतातीची आणि मान अपमानाची होती. दादु मामा पेक्षा हरिश्चंद्र बिराजदार हे अतिशय लहान आणि अनभुव पण कमी. अंतिम सामन्यात आक्रमक झंजु देत गुणावर हरिश्चंद्र बिराजदार यांनी महाराष्ट्र केसरीची ची गदा प्रथमच मराठवायाला मिळवून दिली .
4) पै. दादू मामा चौगुले (अर्जुनवाड कोल्हापूर) – हे सुद्धा दोन वेळचे साल – १९७० आणि १९७१ महाराष्ट्र केसरी किताब मिळवणारे मल्ल आहेत.
5) पै. लक्ष्मण वडार - १९७२ साली कुस्तीपंढरी कोल्हापूर येथे कुस्त्यांचे महाराष्ट्र मैदान भरले. कोल्हापूरच्या काळाइमाम तालमीचे मल्ल पैलवान ”लक्ष्मण वडार” याना हि कुस्तीपंढरीतील मानाची गदा जिंकण्याचे भाग्य मिळाले . आणि १९७३ साली ‘अकोला’ येथेही झालेल्या सामना जिंकून लक्ष्मण वडार हे सलग दुसऱ्यांदा “महाराष्ट्र केसरी” झाले. अगदी गरीब घराण्यातील लक्ष्मण वडार यांनी केवळ जिद्द,
इच्छाशक्तीच्या जोरावर पैलवानकी केली. चिकाटी ,सातत्य आणि खेळावरची श्रद्धा यावर विजयश्री खेचून आणायचे.
6) पै. युवराज पाटील (कोपर्डे कोल्हापूर) यांना वयाच्या केवळ १६ व्या वर्षी 'महाराष्ट्र केसरी' होण्याचे भाग्य १९७४ साली लाभले होते. सतपाल आणि युवराज यांची कुस्ती इतिहासामध्ये खूप प्रसिद्ध आहे. ज्यावर आमच्या शालेय जीवनामध्ये एक धडा अभ्यासक्रमात होता असे आठवते आहे.
7) अस्लम काझी सोलापूर, अप्पालाल शेख (सोलापूर) हे १९९२ मध्ये, संजय पाटील (आटके, कराड) १९९४ मध्ये, शिवाजी केकन (बीड) १९९५ मध्ये, अशोक शिर्के (नगर) १९९७ मध्ये, विनोद चौगुले (कोल्हापूर) २००० मध्ये, राहुल काळभोर(पुणे) २००१ मध्ये, मुन्नालाल शेख (सोलापूर) २००२ मध्ये, दत्ता गायकवाड (पुणे) २००३ मध्ये, चंद्रहास निमगिरे २००४ मध्ये, सईद चाऊस (बीड) २००५ मध्ये, अमोल बुचडे (पुणे) २००६ मध्ये, चंद्रहार पाटील (भाळवणी, सांगली) २००७ मध्ये, चंद्रहार पाटील (भाळवणी, सांगली) २००८ मध्ये, विजय बनकर (पुणे) २००९ मध्ये इत्यादी आजपर्यंतचे महाराष्ट्र केसरी सन्मानाचे मानकरी आहेत.
या बरोबरच या कुस्ती क्षेत्रात आता महिलाही दाखल होऊ लागल्या आहेत. उदा. पै. चंदगीराम यांची कन्या सोनिका कलिरमन, १०-१५ वर्षापूर्वी असा काळ होता कि भारतात एकही महिला कुस्ती खेळत नव्हती. मात्र वडिलांनी दिलेले प्रोत्साहन आणि कुस्तीवरील श्रद्धा यावरून तिने स्वतःची कुस्ती कारकीर्द घडवली. त्या काळी सरावासाठी महिला नव्हत्या म्हणून वडिलांच्या तालमीतील मुलांसोबत सराव करून तिने आपली प्रगती केली. "भारत केसरी” होण्याचा सन्मान सुध्दा तिने मिळवला. प्रसिध्द निवेदक बुर्ली सांगली चे बापुसाहेब राडे सरांची नात कु.ऐश्वर्या राडे, अलका तोमर, रेश्मा माने यासारख्या महिला मल्ल या क्षेत्रात येउन आपल्या नावाचा ठसा कुस्ती सारख्या क्षेत्रात उमटवीत आहेत.

सौंदाळा's picture

12 Feb 2014 - 3:31 pm | सौंदाळा

जब्राट लेख + वरील प्रतिसाद.
साजिद्शेठ एक मालिकाच होवुन जाऊ देत यावर. जमेल तसे नक्की लिहा. वेळ लागला तरी हरकत नाही पण लिहाच.

शिद's picture

13 Feb 2014 - 3:05 pm | शिद

असेच म्हणतो...

खूप छान माहिती. मस्त लिहीलंय. आवडलं.

बरेचसे नातेवाईक ह्या भागात आहेत. मावसकाका (ताकारीला वैभव(बहुतेक) मेडीकल स्टोअर आहे).
घोगावच्या देवकुळे वैद्यांकडनं (नातू) औषधसुद्धा घेऊन आलोय.

पैसा's picture

12 Feb 2014 - 10:57 pm | पैसा

लेख आणि प्रतिसाद मस्तच लिहिलाय. सौंदाळा म्हणतात तशी कुस्ती आणि कुस्तीगीरांची ओळख करून देणारी एक लेखमालिकाच लिहा!

psajid's picture

13 Feb 2014 - 11:52 am | psajid

प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद !
आवले साहेब ! माझा तुमच्या मावस काकांशी अर्थात वैभव मेडिकल च्या श्री. हेंद्रे (कुंडल) यांच्याशी परिचय आहे. बाकी कुस्तीविषयी माहितीचा धागा मी भविष्यात गावी गेल्यानंतर गावातील जुने मल्ल / पैलवान आणि वस्ताद यांच्याकडून माहिती घेऊन सविस्तर लिहिण्याचा प्रयत्न करीन. बघू जमतंय का ?

प्यारे१'s picture

13 Feb 2014 - 3:39 pm | प्यारे१

हो, बरोबर.

लेखासाठी शुभेच्छा !

साजिदभाऊ, दुसरा प्रतिसादही लय आवडला. वडिलांना हे दाखवतो, त्यांना यात लै इंट्रेस. :)

अन याबरोबरच विनंतीवजा आवाहन करतो की महाराष्ट्र केसरीबरोबरच हिंदकेसरीबद्दलही थोडे लिहावे. विशेषतः सत्पाल, गणपतराव आंदळकर, युवराज पाटील, मारुती माने, चंबा मुतनाळ, इ. लोकांबद्दल.

मुक्त विहारि's picture

13 Feb 2014 - 5:07 pm | मुक्त विहारि

+ १

मुक्त विहारि's picture

13 Feb 2014 - 5:15 pm | मुक्त विहारि

दोन्ही आवडले...

अनिल मोरे's picture

29 Jul 2014 - 3:22 pm | अनिल मोरे

साजिदभाई, तुम्ही तुपारीचा उल्लेख करायला विसरले आहात.

बोरगांवकर,
अनिल