क्ष-गफ ला पत्र... २

वडापाव's picture
वडापाव in जनातलं, मनातलं
22 Jan 2014 - 9:09 pm

क्ष-गफ ला पत्र
_____________________________/\_____________________________________

मी ते पत्र ठेवलं. समोर हाताची घडी घालून मस्त पोझ देण्यात आली होती. मला घाम फुटला होता. मी थरथरत्या हातांनी दुसरं पत्र उघडलं. तशी हाताची घडी सुटली.

'एक मिनीट'
'काय झालं?'
'तू हे लेटर वाचलंस ना?'
मी 'हो' म्हटल्यावर तिने ते हातात उचलून घेतलं, आणि माझ्याकडे रोखून बघायला लागली.
'त्यातल्या कंटेंट बद्दल, म्हणजे मेसेजबद्दल आपण नंतर बोलूया.. आधी माझे काही डाऊट्स क्लिअर कर.'
मी आवंढा गिळला.. 'क-क-कोणते डाऊट्स?'
'शिसानविवि म्हणजे काय?' मी निश्वास सोडला. तरी ती कंटेंट बद्दल नंतर बोलणार म्हणाली होती. त्यामुळे छातीतली धडधड काही कमी होत नव्हती.
'अगं शिसानविवि म्हणजे शिर-साष्टांगनमस्कार विनंती विशेषचा शॉर्टफॉर्म आहे तो'
'हो पण... म्हणजे एक्झॅक्टली काय?' तिच्या चेह-यावर वैताग स्पष्ट जाणवत होता. तिला हसवायला हवं होतं.
'म्हणजे एक्झॅटकली...'
'प्लीज... मी जाऊ का घरी?'
'आँ?? चाल्लीयस? ओके!!' ती घरी जात असली तर ते बरंच होतं. त्या पत्रांबाबत काय स्पष्टीकरण द्यावं हे मला अद्याप सुचलं नव्हतं.
'ओके काय?? असले फाल्तू जोक मारू नकोस मी अजिबात लाफिंग मूडमध्ये नाहीये.'
'ओक्के' बापरे! बाईसाहेब भलत्याच तापलेल्या दिसत होत्या.
'हा... आता सांग..'
'काय सांगू??'
'हेच... शिसानविवि म्हणजे एक्झॅटकली काय??' बोलून झाल्यावर तिचं तिलाच हसू आलं. मीही हसायला लागलो. तिने लगेच स्वतःला आवरलं. 'हसू नकोस!! तुझ्यामुळे... तुझ्यामुळे असं बोलली मी'
'म्हणाले!!' ती गप्प झाली. मला खुन्नस द्यायला लागली. 'अगं तुला कितींदा सांगितलं, ली हा प्रत्यय तृतीय पुरुषी - सॉरी. थर्ड पर्सन सिंग्युलर क्रियापदासाठी असतो. फर्स्ट पर्सन सिंग्युलरला 'ले' प्रत्यय लागतो.' ती तरीही गप्प बसून राहिली. मग मी का संधी सोडू? 'आणि बोलली किंवा बोलले असं म्हणायचं नाही. "मी म्हणाले" असं म्हणावं. का? कारण टू से म्हणजे "म्हणणे" आणि टू स्पीक किंवा टू टॉक म्हणजे "बोलणे". तुझं कसं असतं, "मी त्याला बोलली!!" ज्याचं तुला प्राणांहूनही प्रिय असलेल्या इंग्रजीत "आय टॉक्ड हिम!!" किंवा "आय स्पोक हिम!!" असं भाषांतर होईल. कसं वाटतं ते ऐकायला?? तसंच मला तुझं मराठी ऐकताना वाटतं. टू समराईज, "मी म्हणाले!" ओके?'
'(हाताची घडी घालत) झालं तुझं बोलून? सॉरी... म्हणून?'
'नाही इथे "बोलून" म्हटलंस तरी हरकत नाही कारण आय वॉस स्पि-'
'ओ जस्ट शट अप!! तू पुन्हा एकदा मला मराठी टीच करायला गेला ना तर आय स्वेअर मी ही कॉफी ओतेन तुझ्यावर!! इथे मी काय बोलत्येय आणि तुझं काय चालू आहे?'
'सॉरी. तू काय बोलत्येस ते बोल! मी तुला मराठी टिचवणार नाही हं!! प्रॉमिस!'
'टिचवणार नाही काय? इंग्लिशची वाट लावू नकोस.'
'आता कसं वाटतं? आपल्या आवडत्या भाषेची कोणीतरी वाट लावताना कसं वाटतं ते कळलं ना?'
'तू मला आजच्या दिवसात शिसानविवि चा अर्थ सांगणार आहेस?'
'अगं फुल फॉर्म वरून लाव की अर्थ. त्यात काय एवढं? शिर-साष्टांग नमस्कार-विनंती-विशेष!! म्हणजे... अं... (कसं सांगायचं बरं हिला? खरं तर मीच फुल फॉर्म वरून अर्थ लावायच्या प्रयत्नात होतो.) अगं शिर म्हणजे डोकं, ते.. अं.. टेकवून साष्टांग नमस्कार घालायचा. आणि तो समोरच्याने स्वीकारावा, अ‍ॅक्सेप्ट करावा, म्हणून विशेष विनंती करायची. सिम्पल! (हुश्श!!) बरं... साष्टांग नमस्कार म्हणजे माहितीये ना?? की ते ही सांगावं लागेल??'
'ते ना ते टमीवर लाय डाऊन करायचं?? स्ट्रेट एकदम??'
'हा तेच ते'
'ओके आता दुसरा डाऊट! भ्रमणध्वनी काय असतं?'
'भ्रमणाध्वनी म्हणजे मोबाईल गं'
'ओके!! आणि तू मला ४३ प्रेमाच्या किज दिल्या म्हणजे एक्झॅटक- एक्झॅक्टली काय? आणि कधी दिलंस तू ते मला?'
'काय?????' मला चटकन लक्षात आल नाही!
'इथे लिहीलय ना!! प्रेम'चाव्या'!!' हसावं की रडावं ते कळेना. तिला विभक्ती-प्रत्यय, सामान्यरूप कशाशी खातात याचा गंधही नसल्याने खरं तर मी बचावलो होतो. त्यामुळे मी काहीही झालं तरी तिला खरा अर्थ सांगणार नव्हतो.
'अगं... ते असंच... उगाचच लिहीलंय!! त्याच्याकडे एवढं लक्ष देऊ नकोस. ती एक... फ्रेज आहे मराठी मधली.'

तिने माझ्याकडे साशंक नजरेने कटाक्ष टाकला. पण ती त्याच्या जास्त खोलात शिरली नाही. कारण तिला पुन्हा माझ्याकडून 'ती गावटी मराठी लँग्वेज' लर्नायची नव्हती. तिनं नुसतंच 'हं' केलं आणि डोळ्यांनी दुसरं पत्र दाखवलं. थोडक्यात, 'यू मे रीड द सेकंड लेटर'
'अ‍ॅस यू विश युअर मॅजेस्टी!!' मी मस्करीत म्हटलं, तिने पुन्हा माझ्याकडे एक जळजळीत कटाक्ष टाकला आणि मी गपचूप ते पत्र उचललं. तरी तिला मराठी शिकवायला मिळाल्यानं थोडा हुरूप आला होता. का कोणास ठाऊक मी एकदम ताजातवाना झालो होतो. दुस-याला ज्ञानाचे चार डोस पाजल्याने आत्मविश्वास वाढला होता. पण मी दुसरं पत्र वाचायला घेतलं, आणि सगळं अवसान गळून गेलं. हे पत्र शाळेत 'निबंधाधिपती' असा किताब मिळालेल्या माझ्या मित्राने लिहीलं होतं. निबंधपुस्तकातले सगळे निबंध याला तोंडपाठ असायचे. याच्याकडून मला खूप अपेक्षा होत्या. पण पत्र वाचून मला धक्काच बसला :

प्रिय जानूस,
अनेक चुंबने.
प्रिये, तुझ्या विरहाने माझं काळीज रोज तीळ तीळ तुटत असतं गं. तू माझ्या जीवनात आलीस, मला मिळालीस हे खरं तर माझं केवढं थोर भाग्य. अगं माझी लायकी ती काय!! तुझ्या नखाचीही सर नसणारी मुलगी सुद्धा मला एरवी गवसायची नाही, पण मी, मी मात्र 'दैव देतं आणि कर्म नेतं' या नियमाप्रमाणे माझ्या हाती आलेलं सूख स्वतःच्याच हाताने घालवून बसलो. मी तुझा रोष ओढवून घेतला. किती मूर्ख असेन मी. एखाद्या नाजूकशा फुलावर बसलेल्या काळाकुट्ट भोंग्यासारखा आहे मी. ज्याला त्या फुलाच्या सौंदर्याविषयी, त्याच्या अस्तित्वाविषयी, त्याच्या स्वतःसंगे चराचराला फुलवणा-या व्यक्तिमत्वाविषयी काही म्हणजे काहीही आदर नाही... त्याला फक्त रस ओढण्यातच रस असतो. [याला मी माझी बाजू मांडणारं पत्र लिहायला सांगितलंय की माझी इज्जत काढणारं? असो. कदाचित स्वतःवर सगळा वाईटपणा घेऊन रूसवा काढायचा हेतू असावा.]

तुझ्याशी मी भांडलो, विनाकारण भांडलो. माझीच चूक असतानाही मी वाद घातला[आमचं भांडण म्हणजे ती वचावचा बोलत्येय आणि मी बोलायची संधी न मिळाल्याने सगळं ऐकतोय असंच असतं नेहमी]. त्याबद्दल मी खरं तर तुझे पाय धरून तुला सांष्टांग नमस्कार घालायला हवा[अरेच्चा! हा सुद्धा साष्टांग नमस्कार घालतोय]. तुझे ते नयनरम्य, मनमोहक पाय... 'त्र' हे अक्षर मला इतकं का आवडतं, ते मी तुला एकावर एक पाय ठेवून बसलेली पाहिलं, तेव्हा लक्षात आलं [व्हॉट द...]. उभी असताना तू जेव्हा एक पाय गुडघ्यात वाकवून ताठ पायाच्या बाजूने कंबर थोडीशी बाहेर काढतेस, तेव्हा तुला पुढून ओवाळू की पाठून न्याहाळू असं होतं. [हरामखोरा तुझी वहिनी आहे ती] तू जेव्हा ती निळ्या रंगाची घट्ट जीन्स परिधान करून येतेस, तेव्हा तुझ्याकडे नुसतं पाहात राहावंसं वाटतं. असं वाटतं, की आयुष्यात अजून काहीच असू नये, फक्त मी, तू आणि तुझी ती जीन्स[३ प्रकट शिव्या]!! आठवतं आपण सगळे त्या वॉटर पार्कला गेलो होतो ते? तिथे रेन डान्स करत असताना तुझ्या कायेवर तू परिधान केलेली सगळी वस्त्रे तुझ्या भिजलेल्या तनूवर एवढी भाळली की ती सर्व बाजुंनी तुला येऊन बिलगली[म्हणूनच मी माझा शर्ट काढून तिला त्यावर घालायला दिला होता] आणि तुझ्या त्या अतुलनीय सौंदर्याचे दर्शन घडून अखिल सृष्टीला तृप्त करायचे सोडून मी मात्र त्यावर माझा सदरारूपी पडदा टाकला. किती प्रतिगामी असेन मी[प्रतिगामी म्हणजे काय? ओरिगामी सारखं काही असतं का? असा डाऊट आस्केल ती आता मला]!! तुझ्या कुरळ्या केसांमध्ये तर मी कधीच गुंतून गेलो होतो, त्यात तू त्यांच्यावर इस्त्री करून, रंगरंगोटी करून त्यांना अधिकच शोभिवंत केलंस. तुझ्या कट्रिनासारख्या बांध्यावर आणि दीपिका सारख्या खांद्यावर झुलणारा तो केशमुकुट किती उठावदार दिसतो, हे पाहिलं की मला मी आयुष्यात फक्त तुला पाहण्यासाठी जन्मलोय असं वाटत राहतं. [अरे पुरे की आता!! किती ते डिटेलिंग??] तुझे ते टप्पोरी डोळे, तुझं ते रेखीव नाक, तुझे ते ओठ... अरे बापरे!! नुसती कल्पना करूनच अंगावर शहारा येतोय गं. तुझ्या ओठांनी तर मला घायाळ करून सोडलंय! तुझा तो खालचा, जर्रासा जाडसर ओठ, कडेच्या बाजूने, आपल्या वरच्या दातांनी तू जेव्हा धरतेस, तेव्हा डोळ्याची पापणीही न लवता मी ते एकटक पाहण्यात गुंग होतो आणि माझे ओठ माझ्याच नकळत आपोआप तुझं चुंबन घ्यायला पुढे सरसावतात. पण तुझा बीएफ तिथे असल्याने मी स्वतःवर आवर घालतो [कल्पना विश्वात वाहवत गेलास आणि पकडला गेलास ना भो{उर्वरित शिवी}च्या]

काय नव्हतं माझ्याकडे? माझ्याकडे तू होतीस, तुझं प्रेम होतं, पण नियतीला ते पाहावलं नाही [दुसरा महा-खतरनाक डाऊट - ही नियती कोण आता?] तिने माझ्या हातून पातकं घडवली. खरं तर तू असताना मला इतर ठिकाणी पाहायची गरजच काय होती? घोड्याला जशा वाटेत वावरणा-या घोडललनांना पाहताच 'व्हिली' मारायची इच्छा निर्माण होऊ नये म्हणून डोळ्यांच्या बाजूला पट्ट्या लावतात, तशा एकदा तुझ्या प्रेमात पडताच आपोआप माझ्या डोळ्यांच्या बाजूला इतर घोड मुलींसाठी पट्ट्या लावल्या जायला हव्या होत्या... पण स्वतःवर या पट्ट्या न लावण्याची घोडचूक मी करून बसलो ना!! संजू सारख्या गाढवीवर माझी नजर गेली आणि मी चक्क तिच्याकडे आकृष्ट झालो!! [तुझ्या आयचा घोडा तुझ्या... चांगली मदत करतोयस मित्राला] पण लवकरच माझ्या अपराधाची उपरती मला झाली. आणि म्हणून 'यापुढे माझा-तुझा काहीही संबंध नाही, हे शक्य तितक्या गोड शब्दांत समजावून देण्यासाठी मी तिला भेटायला बोलावलं होतं. पण ती चुकून तुझ्या आधी आली. खरं तर मी तिला तू आल्यावर यायला सांगितलं होतं, जेणेकरून तुझ्यासमोरच काय तो सोक्षमोक्ष लावता आला असता. पण ती उतावळी झाली होती, ती लवकर आली आणि माझ्याशी लगट करू लागली. मी तरी काय करू गं, शेवटपर्यंत कसोशीने स्वतःच्या पौरुषत्वावर नियंत्रण ठेवलं पण शेवटी माझा पाय घसरलाच [अरे गाढवा पाय खरोखरच घसरला होता, आणि तोल सांभाळायला संजूला धरलं तर ती संजू सुद्धा घसरून पडली, नेमकी माझ्यावरच!!] तेवढ्यात तू आलीस आणि मला पकडलंस! खरं तर एक महापाप करण्यापासून तू मला वाचवलंस! त्याबद्दल मी तुझा ऋणी आहे!! पण त्यावेळी अपराधी भावनेनं माझ्या मनाला ग्रासलेलं असल्याने मी खोटं बोलून गेलो आणि एक खोटं लपवण्यासाठी शंभर खोट्या थापा माराव्या लागल्या!! [थापा खोट्याच असतात] मी गुन्हा कबूल करत नाही म्हटल्यावर तो सिद्ध करण्यासाठी तू माझा मोबाईल माझ्याकडून हिसकावून त्यातले मेसेजेस तपासण्यास सुरुवात केलीस... माझ्या नशिबाने मी संजू आणि माझ्यातला संवाद आधीच उडवून टाकला असल्याने तुला त्यात काहीही गवसलं नाही... पण तुझ्या तीक्ष्ण मृगनयनी डोळ्यांनी [मृगनयनांनी म्हटलं असतंस तरी पुरलं असतं.] माझ्या गॅलरीमधल्या आक्षेपार्ह बाबी लगेच हेरल्या. त्याबद्दल तू मला जाब विचारायला लागलीस तेव्हा मी भेदरून जाऊन बिचा-या त्या निंधिवर [निबंधाधिपतीचा शॉर्टफॉर्म. आम्ही याला निंधि-चिंधी म्हणायचो] सगळा आरोप टाकायचा प्रयत्न केला. पण तुझ्या चतुर बुद्धीने माझा कावा ओळखला. निबंधाधिपती किती सुसंस्कृत आणि सभ्य मुलगा आहे हे तुला चांगलंच माहित आहे. तो असं काही करणं शक्यच नाही [अरे हराम्या तूच पाठवल्या होत्यास त्या क्लिप्स मला] हे तू जोखलंस आणि माझ्या निर्लज्ज खोटारडेपणाला, चोर तो चोर वर शिरजोर या मगरूर भूमिकेला कंटाळून तू मला आणि संजूला आमचा उर्वरित कार्यक्रम आटपायला सांगून तिथून तडक निघून गेलीस. तू माझी जीएफ आहेस हे लक्षात आल्यावर संजू सुद्धा माझ्यावर चरफडत तिथून निघून गेली. तुला माझ्यापासून दूर जाताना पाहिलं आणि आपण किती मोठा धोंडा स्वतःवर आपटून घेतलाय हे माझ्या लक्षात आलं. मी धावत धावत तुझ्या पाठी आलो, पण तू ऑटो पकडून निघून गेली होतीस. मी तुला कॉल केले, अनेक मेसेजस सुद्धा केले, पण तू त्यांना उत्तरं दिली नाहीस. हताश होऊन मी पुन्हा माझ्या घरी परतलो.

घरी जाऊन बसलो, तेव्हा माझ्या लक्षात आलं की आत्तापर्यंत मी तुला किती त्रास दिला, तुझा किती छळ केला ते. तुला सतत माझ्या मित्रांसमोर घालून पाडून बोलायचो आणि तुझ्या मराठी भाषेच्या तथाकथित अज्ञानाला नावं ठेवून त्याची टर उडवायचो. आपल्या बीएफला आपली लाज वाटू नये, म्हणून स्वतःची मराठी वाणी सुधारण्याच्या उद्दात हेतूने तू मजजवळ आलीस निंधिजवळ गेलीस, [काय?? कधी?? हे नव्यानेच कळतंय मला] आणि त्याने उदारमनाने तुझं आणि त्याच्या नालायक मित्राचं भलं चिंतून तुला मराठी शिकवायला सुरुवात केली. त्याने बिचा-याने तुझ्यापायी स्वतःच्या मित्रापासून ही गोष्ट लपवून ठेवण्याचा कसोशीने प्रयत्न केला, पण मला सुगावा लागलाच!! खरं तर यात मी आडकाठी करण्यासारखं काय होतं? पण जर तुझं मराठी सुधारलं असतं तर मी टर कोणाची उडवणार गं? मला आयती बकरी मिळाली होती ती जाईल ना हातातून!! त्यातच तो निंधि एवढा देखणा, रुबाबदार [उगाचच?? कित्ती लाल करावी स्वतःची? सुजेल अशानं] त्याचा मला हेवा वाटायला लागला आणि तुझ्या शुद्ध चारित्र्यावर मी शंका घेऊ लागलो. पण तुझ्यासमोर हे प्रकटपणे मांडण्याचा पुरुषार्थही माझ्यात नव्हता गं. तेव्हा निंधिला तुझ्यापासून दूर लोटण्यासाठी मी एक दुष्ट डाव खेळलो.[अरेच्चा?? काहीही खपवतो माझ्या नावावर] तू त्याच्या घरी जायच्या वेळीच नेमका मी तुला भेटायला येऊ लागलो [घरी??? आता या निंधिची खैर नाही] आणि तुझ्या मराठी सुधारण्याच्या स्वप्नांवर पाणी पाडलं[नशीब मी भेटायला जायचो त्या वेळी तिला... नाहीतर काही खरं नव्हतं. माझं]

तर अशी ही मी माझ्या सर्व गुन्ह्यांची कबुली दिलेली आहे. तुझ्या निरागस, सरळ साध्या प्रेमळ स्वभावाचा मी वेळोवेळी दुरुपयोग करत आलो आहे, पण आता मला माझ्या चुका लक्षात आल्या आहेत. गमावल्याशिवाय किंमत कळत नाही हेच खरं. तू तुझ्या नेहमीच्या दयाळू आणि निर्मळ स्वभावाला अनुसरून यावेळीही मला क्षमा करावीस, अशी मी तुला विनंती करतो आणि माझ्या हलकट स्वभावावर शक्य तितके नियंत्रण ठेवायचा मी पूर्ण प्रयत्न करेन याची खात्री देतो. [आत्ता कळलं या कुत्र्याने परस्पर तिला पत्र का नेऊन दिलं ते]

तुझ्या उत्तराच्या आणि मुख्यतः तुझ्या प्रतीक्षेत,
तुझा पश्चात्तापग्रस्त बीएफ...

[माझं नाव लिहीणं जीवावर आलं असणार मेल्याच्या!! स्वतःचं नाव घालायचंय साल्याला!! आता भेटच तू फक्त!!]

मी ते पत्र रागाच्या भरात चुरगाळलं आणि टेबलवर टाकलं. मॅडम कॉफीचे शेवट-शेवटचे झुरके घेत होत्या. त्या थांबल्या आणि पर्सशी चाळे करायला लागल्या. ती माझ्या 'व्यक्त' प्रतिक्रियेची वाट पाहत होती. आणि मला नेमकी कोणती शिवी हासडून सुरुवात करावी हे कळत नव्हतं.

(क्रमशः)

कथाविनोदमौजमजा

प्रतिक्रिया

हे पत्र अतिशय बोअर आहे. सॉरी.

निबंधाधिपति किताबाला शोभेलसं पत्र. मित्रा सिस्टीम लॉग आऊट करत होतो. तुझा धागा पाहून थांबलो. पुभाप्र. पुढलं पत्र कोण लिहीतंय ते बघू आता.

खटपट्या's picture

22 Jan 2014 - 10:29 pm | खटपट्या

आवडलं, आता तुम्ही काय स्पष्टीकरण देणार या प्रतीक्षेत !!!

इनिगोय's picture

12 Feb 2014 - 6:05 am | इनिगोय

पुभाप्र.

कवितानागेश's picture

23 Jan 2014 - 12:30 am | कवितानागेश

कैच्या कै. :D

प्यारे१'s picture

23 Jan 2014 - 4:42 am | प्यारे१

+१ (स्मायलीसकट)

बोअर झालं वाचतांना बघू पुढचं पत्र कसं आहे ते..

Mrunalini's picture

23 Jan 2014 - 4:59 pm | Mrunalini

हा हा हा... खुप मस्त. :D पुभाप्र.

मिंग्लिश लिहून हसवण्याचा प्रयत्न आहे का ?
तर मग हसलो .

दादा, फार दिवस झाले..पुढचा भाग टाका ना जरा लवकर!