मोरारजी आणि जेठमलानी

अजय's picture
अजय in जनातलं, मनातलं
21 Jul 2008 - 5:36 pm

राजकारण म्हणजे विरोधाभासाचं आगार....
त्यातही दिल्लीतलं राजकारण म्हणजे महाभयंकर...
ही राजकारणीमंडळी एकमेकांवर सदैव कुरघोडी करण्याच्या प्रयत्नात असतात. या नादात तत्वांना कधी तिलांजली दिली जाते, द्यावी लागते हे त्यांनाही कळत नाही. अर्थात, हे आपल्यालाही जाणवते. पण कधीतरी या तत्वच्युतीला आदर्शवादाचं समर्थन घेण्याचा प्रयत्न केला जातो. या साऱ्या प्रकारांना वेगळ्या चष्म्यातून पाहिलं कधी कधी विनोदी चित्र पाहावयास मिळतं.

त्यामुळे बाबूंच्या सरकारीपणाचे किस्से आपल्याला प्रत्यक्ष दिसतात. पण राजकारणीमंडळींचे किस्से कळायला चांगलं माध्यम लागतं. त्याशिवाय ते आपल्यापर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे ते समजण्यासाठी पत्रकारितेपेक्षा उत्तम माध्यम नक्कीच नाही. या माध्यमातूनच एक किस्सा या अस्सल राजकारणी शहरात कळाला. तोही नेहमीच वादग्रस्त राहिलेले हुशार वकील, विधिज्ञ राम जेठमलानी यांच्या तोंडून.

जेठमलानी यांची वेगळी ओळख करून देण्याची गरज नाही. मुद्दाम प्रवाहाविरुद्ध पोहण्याचा प्रयत्न करून चर्चेच्या केंद्रस्थानी राहण्याची धडपड करणारा हा बेधडक माणूस. प्रत्यक्ष गप्पांमध्ये ते अमळ अघळपघळ जाणवले. (कदाचित पत्रकारांशी बोलायचे म्हणूनही असेल.)

दुपारी तीनची वेळ होती. अकबर रोडवरील बंगल्यावर बोलावून त्यांनी पत्रकारांना माहिती दिली. नेहमीप्रमाणे काही खायला देण्याचा जगन्मान्य असलेला शिरस्ता त्यांनीही पाळला. समोसे आणि कोल्ड्रिंक्‍स होते. बोलणे आटोपल्यानंतर त्यांनी खाण्याचा आग्रह धरला.
कोल्ड्रिंक वर त्यांची कोटी भन्नाटच होती.
जेठमलानी म्हणाले, ""अहो, दुपारीच वेळ आहे म्हणून हे कोल्ड्रिंक. नाही तर "वेगळ्याच ड्रिंक'ची व्यवस्था केली असती.''
हा ओला विषया निघाल्यामुळे ते एकदमच मोरारजी देसाईंच्या काळात गेले.

जेठमलानींच्या मते मोरारजीभाई म्हणजे स्वतःच एक संस्था होते. मद्यपानाला नव्हे तर मद्यनिर्मितीलाही त्यांचा कट्टर विरोध सर्वश्रृत होता. 1978 की 79 (वर्ष नक्की आठवत नाही.) त्यांच्या नेतृत्वाखालील जनता पक्षाचे सरकार अंतिम घटका मोजत होते. मोरारजीभाईंसोबत असलेली सर्व मंडळी त्यांच्या विरोधात गेली होती. लोकसभेतही त्यांनी मोराराजींच्या विरोधातच मतदान केले. जेठमलानी मात्र त्यांच्या बाजूने होते.
पराभवामुळे प्रचंड चिडलेल्या मोरारजीभाईंना जेठमलानी भेटले. म्हणाले, ""बघा, तुम्ही दारूचे कट्टर विरोधक. पण, तुमच्या सारखेच दारूचे कट्टर विरोधक तुमच्याही विरोधात गेले. माझ्यासारखा मदिराभक्त मात्र तुमच्या बाजुला आहे.'' त्यावर मोरारजी देसाई हसले.

त्यांचा राग जॉर्ज फर्नांडीस यांच्यावर होता. त्यामुळे ते म्हणाले, "" अहो, त्या बदमाश माणसाने (जॉर्ज) साथ देण्याचे सांगत अगदी शेवटच्या क्षणी दगा दिला.'' त्यावर जेठमलानींच्या उत्तराला मात्र त्यांनी खळाळून दाद दिली.

जेठमलानींचे उत्तर होते, ""अहो, तुम्ही जे रोज घेतात (शिवाम्बू) तेच जॉर्जसुद्धा घेतात.''
----------------------------------------------------
दुसराही एक किस्सा त्यांनी ऐकवला.
मोरारजीभाईंनी दारूबंदी सर्वत्र लागू करावी, यावर विचारविनीमय करत होते. त्यावर जेठमलानी त्यांना म्हणाले, की मला माफक मद्यपान आवडते. मात्र तुम्ही त्यावर बंदी आणणार असाल, तर मला माझे व्यक्तिस्वातंत्र्य (पिण्याचे) टिकविण्यासाठी तरी त्याचे प्रमाण वाढवावे लागेल.
--------------------------------------------

हे किस्से कदाचित कुठे लिहिलेही गेले असतील किंवा कोणी वाचलेही असतील. कदाचित नसेलही. मला तो प्रत्यक्ष ऐकल्यामुळे सर्वांसोबत शेअर करावासा वाटत असल्याने खास आपल्यासाठी..........

राजकारणसंदर्भ

प्रतिक्रिया

llपुण्याचे पेशवेll's picture

21 Jul 2008 - 6:36 pm | llपुण्याचे पेशवेll

पण शिवांबू वरून आठवली एक गोष्ट. पुण्याच्या नू.म.वि. शाळेत मुतारीत भिंतीवर लिहीले होते मोरारजीज् ज्युस बार. मोरारजींच्या नावामुळे ती गोष्ट आठवून अंमळ हसू आले. :)
पुण्याचे पेशवे

प्राजु's picture

21 Jul 2008 - 10:15 pm | प्राजु

मी नव्हते वाचले हे किस्से... धन्यवाद इथे लिहिल्या बद्दल.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

मावळा's picture

23 Jul 2008 - 4:52 pm | मावळा

अजयराव
आतापर्यंत न वाचलेल्या किश्‍श्‍यांसाठी धन्यवाद.
तुम्ही पत्रकार दिसतात.

राजकारण म्हणजे विरोधाभासाचं आगार....
त्यातही दिल्लीतलं राजकारण म्हणजे महाभयंकर...
ही राजकारणीमंडळी एकमेकांवर सदैव कुरघोडी करण्याच्या प्रयत्नात असतात. या नादात तत्वांना कधी तिलांजली दिली जाते, द्यावी लागते हे त्यांनाही कळत नाही. अर्थात, हे आपल्यालाही जाणवते. पण कधीतरी या तत्वच्युतीला आदर्शवादाचं समर्थन घेण्याचा प्रयत्न केला जातो.

याच्याशी शंभर टक्के सहमत. कालच लोकसभेतली भाषणं ऐकली. त्यावरून तर ते खरेच ठरले आहे. त्यामुळे असे काही किस्से कळाले तर आमच्यासाठी नक्कीच लिहा.
पुढच्या लिखाणाची वाट बघतो.

पुलेशु

- मर्द मावळा