अर्थक्षेत्र भाग - ४ - गुंतवणुक करण्यापूर्वीची तयारी.

Primary tabs

ज्ञानव's picture
ज्ञानव in अर्थजगत
4 Jan 2014 - 1:05 pm

साधारण काही हजार वर्षांपूर्वी माणूस शेती ह्या विषयाच्या संपर्कात आला. (नक्की किती हजार वर्षापूर्वी ते आमचे इ.ए. साहेब सांगू शकतील.) तिथून तो स्थिरावला. वस्ती करून राहू लागला. तेव्हा त्याला शेतीचे नियम, थिअरीज काहीहि माहित नव्हते. त्याला फक्त एक जाणवले असावे की इथे तिथे शिकार करत पळत राहण्यापेक्षा हे च्यामारी बरय झाडे आहेतच, फळे येताहेत असेच राहू झाल! जमल्यास अगदी सहज शक्य झाल्यास ज्या बाबतीत आपण पारंगत आहोत ती शिकार हि करू पण आता ती दगदग, धावपळ थोडी कमी करू..... खूप रिस्क होती...... कारण जे येतंय ते कमी करून किंवा त्यावरचे अवलंबून राहणे कमी करून नवीन विषय ज्याबद्दल फारशी माहिती नाही; त्यात स्थिरावण्याचा प्रयत्न करणे हि रिस्कच.
पण कदाचित पाउस पडल्यावर जे सगळे हिरवे गार होते ते साधारण काही दिवस पुरते हे त्याचे "निरीक्षण" आणि शारीरिक मेहनत कमी करू आणि रेडीमेड फळफळावळ खाऊ असा तद्दन माझ्यासारखा आळशी विचार त्याला शेती ह्या विषयाकडे खेचून घेण्यास पोषक ठरला असेल का? असा प्रश्न मला नेहमी पडतो. म्हणजे शेती ह्या विषयाचा शोध त्यातील रिस्क हे सगळे त्या काळी कसे जमवले असेल त्याने. त्यादिवसापासून ते आज मनुष्य ५-७ मजली शेती करायला शिकेपर्यंतचा काळ हा मानव प्रगतीचा केवळ थक्क करणारा आलेख आहे. आज माणूस ५ एकर ७ एकर असे न सांगता ५ मजली ७ मजली शेती शहराच्या मधोमध करू लागला आहे. हे कसे शक्य झाले ? माझ्यापुरते त्याचे उत्तर "निरीक्षण" आणि "बुद्धीची मेहनत" हे आहे.
त्याचे पहिले निरीक्षण.. कुठले फळ... केव्हा झाडावर आपल्या आगमनाची चाहूल पांघरते आणि तेव्हा पासून त्याचे फळात रुपांतर व्हायला किती वेळ लागतो? हे असावे. ह्या सगळ्याच्या नोंदी आधी मनात ठेऊन नंतर जेव्हा भाषेची लिपीची ओळख झाली तेव्हा लिहून ठेऊन त्यांनी ते ज्ञान पुढच्या पिढीत भक्कमपणे झिरपत ठेवले.
आता ह्याचा गुंतवणुकीशी काय संबंध ? बराच आहे. निसर्ग नियम जो शेतीने शिकवला तो असा की बी पेरल्यापासून त्याचे झाड होई पर्यंत एक वेळ लागतो...झाडाला फळ येईपर्यंत आणि ते पिके पर्यंत एक वेळ लागतो. गुंतवणुकीचे हि तसेच आहे. तुम्ही गुंतवणूक केल्या पासून तिला फळे यायला एक महिना, एक वर्ष की अनेक वर्ष लागतील ते "निरीक्षणाने" किंवा "अभ्यासाने " प्रत्येकाला जाणून घेणे आवश्यक असते. आणि ते वैयक्तिक प्रत्येकानेच जाणून घेतले पाहिजे. ब्रोकर, तज्ञ हे फक्त मृद परीक्षा करतील म्हणजे कुठली माती कुठल्या पिकाला योग्य आहे बास्स इतकेच सांगू शकतील त्यावर त्यांनी जर एकरी इतके पिक घेतलेत तर इतका फायदा होईल हे सांगितले तर थोडे कठीण आहे. कारण पाउस पडलाच नाही तर? गुरांनी-हत्तीने पिक नासवले तर ? कीड पडली तर ? हे सारे समजून घेणे हे ज्या त्या शेतकऱ्याला माहित. उदा. कर्नाटकातले एक शेतकरी केळी लावण्याच्या बेतात होते त्यांना एकरी उत्पादन किती येईल वगैरे सगळा प्रोजेक्ट रिपोर्ट शेतकी अधिकाऱ्याने दिला पण तिथे हत्ती हैदोस घालतात हे त्याला माहित नव्हते त्यामुळे तो रिस्क factor कसा कव्हर करायचा हे त्याला माहित नव्हते. परंतु पाणी किती लागेल किती वेळा लागेल खते कोणती आणि केळ्याच्या झाडांवर कोणती कीड पडू शकते ह्या आणि इतर अनेक गोष्टी तसेच रिस्क त्याने त्याला समजावल्या होत्या पण हत्तीची रिस्क त्याला माहित नसल्याने ती राहून गेली पण शेतकरी ते जाणत होता. हत्तीचा बंदोबस्त कसा करायचा ते हि जाणत होता त्यामुळे तो केळ्याचे उत्पादन यशस्वीपणे घेऊ शकला. थोडक्यात काय की ब्रोकर्स- विश्लेषक -तज्ञ आहेतच ते तुम्हाला योग्य ती मदत करताच पण त्यामागे त्यांचा अनुभव त्यांचे दृष्टीकोन आणि त्यांचा स्वार्थ हे घटक जास्त असतात. (बिझिनेसमन ह्या शब्दात आधी बिझिनेस येतो मग "मन" ) तुमच्या तब्येतीची ओळख त्यांना नसते किंवा काही प्रश्न विचारून ते तुमच्या तब्येतीचा "अंदाज" घेतात. आणखी सोप्या शब्दात सांगायचे तर तुम्ही किराणा मालाच्या दुकानात जाऊन त्या दुकानदारालाच विचारता का कि काय घेऊ? तो म्हणेल घ्या सगळे...तसेच तज्ञाकडे जाण्या आधीच तुम्ही अभ्यास करून मग त्याला चार प्रश्न विचारणे योग्य. अन्यथा, जर तुम्ही मुळातच शेतकरी नसाल तर शेतकी अधिकारी काय सांगतोय हे जसे तुम्हाला समजणार नाही तसेच ब्रोकर्स- विश्लेषक -तज्ञ तुम्हाला काय सांगताहेत ते समजणे कठीण. त्यामुळे जर काही चुकले तर तो दोष फक्त त्यांचा नाही. मग जर एखाद्याने मला सांगितल,,"अरे रत्नागिरीस राहतोस ना मग सफरचंद लाव मस्त पिक येईल!!" आणि मी लावली पण आजबाजूच्या लोकांचा घसघशीत फायदा झाला त्यांचे शेअर्स चालतात माझेच नाही ह्या चालीवर त्यांनी आंबे लावले हो मी सफरचंद कधी पिकतंय रत्नागिरीत त्याची वाट पाहतोय....हि गत होते. तर थोडक्यात काय कुणीतरी सफरचंदाची दिलेली "टीप " मी मुळात रत्नागिरीत राहत असेन तरीही आणि नसेन तरीही पडताळून पाहणे महत्वाचे आहे.
आणि हे फक्त शेअर्स पुरते मर्यादित नाही कुठलीही गुंतवणूक हि एखाद्या फळ झाडासारखीच असते आणि तिचे स्टेट्स हि त्यानुसारच असते म्हणजे सीताफळ कलिंगड जी कधी काळी वर्षातून एकदाच मिळत होती आणि आंबा हि वर्षातून एकदाच मिळत होता तेव्हाही आणि आताही फळांचा राजा आंबाच का ? तसेच गुंतवणुकीत स्थावर मालमत्ता, सोने, हिरे, anticks, पेंटींग्ज, बँकेच्या योजना, सरकारी योजना की एखाद्या मोठ्या धंद्यात केलेली गुंतवणूक ह्या पैकी "राजा" गुंतवणूक कोणती ? आंबा हे सगळ्यात नाजूक फळ आहे. पण उठाव त्यालाच आहे. पैसे त्यातच आहेत. उस हे थोडे खर्चिक असू शकेल कारण पाणी नसेल तर उस व्यर्थ आहे. तसेच गुंतवणुकीला पोषक घटक कोणते? काय केले तर गुंतवणूक टिकते वाढते आणि काय केले तर ती व्यर्थ जाते ? हे जाणून मग ह्या क्षेत्राकडे वळल्यासच फायदा होईल.

आणि उस चांगला कि सीताफळ कि आंबा हि तुलना होऊ शकत नाही तसेच गुंतवणुकीबाबत आहे. वय आणि उद्दिष्ट ह्याची तुलना करून गुंतवणूक होते. गुंतवणुकीची तुलना करून उद्दिष्ट ठरवता येत नाहीत.(मला तरी)

वरील विवेचना मागचा हेतू इतकाच आहे की प्रत्येक गुंतवणूकदाराने आपण आपले पैसे (पर्यायाने बीज )जिथे गुंतवणार (पेरणार) त्या क्षेत्राची व त्या क्षेत्रातील संभाव्य धोके (जमीन, हवा किंवा वातावरण, पाणी, चोर चिलटे, प्राणी गावातले स्थानिक गुंड, पुढारी....आणि बरेच )ह्यांची संपूर्ण माहिती आधी करावी आणि मगच...मगच एखादा तज्ञ गाठावा. (कदाचित तुम्हाला ह्याची गरजच पडणार नाही ).
सामान्यतः मला काहीच येत नाही असे गृहीत धरूनच आपण दुसर्याला "संधी " देतो. त्या ऐवजी आपण स्वतः जर सगळी माहिती काढून सर्वसमावेशक तयारी केली म्हणजेच थोडक्यात स्वतःलाच प्रथम "संधी" दिली तर एक अतिशय मोठा धोका आपण टाळू शकतो आणि पुढचे संभाव्य धोके परतवण्याचा आत्मविश्वास निर्माण होऊ शकतो.

इथून पुढे आपण हि माहिती कुठे कशी गोळा करू शकतो ? कोणत्या संस्था आपणास मदत करतात ? गुंतवणुकीचा धंदा आपण कसे करू शकतो ? वगैरे अनेक बाबी लिहिण्याचा प्रयत्न आहे.

प्रतिक्रिया

तुषार काळभोर's picture

4 Jan 2014 - 3:09 pm | तुषार काळभोर

अ‍ॅनॉलॉजी आवडली.
उदाहरणेही पटली.
ही मालिका चालू ठेवाच. इतरही जाणकारांना विनंती की त्यांनी प्रतिक्रियांमधून हातभार लावावा.

ज्ञानव's picture

4 Jan 2014 - 4:25 pm | ज्ञानव

इतरही जाणकारांना विनंती की त्यांनी प्रतिक्रियांमधून हातभार लावावा.
माझही हेच मत आहे.

उपाशी बोका's picture

5 Jan 2014 - 1:30 pm | उपाशी बोका

हा भाग चांगला जमला आहे आणि छान सुरुवात आहे.
गुंतवणूकीबद्दल माझे विचारः
१. गुंतवणूक करण्यासाठी भांडवल लागते. जर तुमच्याकडे excess money (बचत) असेल तरच हे शक्य होणार. त्यासाठी काय करावे लागेल? उत्पन्न वाढवावे लागेल किंवा खर्च कमी करावा लागेल. (दोन्ही झाले तर सोन्याहून पिवळे).
२. आयुष्यातली सगळ्यात महत्वाची गुंतवणूक तुम्ही स्वतःमध्ये केली पाहिजे. ती कशी काय? चांगली तब्बेत सांभाळून (सर सलामत तो पगडी पचास) आणि चांगले शिक्षण घेऊन (ज्यामुळे भविष्यातील गुंतवणूक करण्यासाठी, तुम्ही चांगला कॅशफ्लो निर्माण करू शकता). पैसे जास्त कसे मिळतील, याचा विचार करताना बरेच दिसतात, पण आपले शरीर (फुकटात) मिळाले आहे ना, म्हणून त्याच्याकडे पार दुर्लक्ष केलेले पण दिसतात.
३. स्वतःची रिस्क प्रोफाइल ओळखणे महत्वाचे आणि त्याप्रमाणे प्लॅनिंग महत्वाचे आहे. कुणाचा व्यवसाय करण्याकडे कल असतो तर कुणाचा नोकरी करण्याकडे. कुणाला जास्त-रिस्क-जास्त-परतावा (high risk, high returns) हवा असतो, तर कुणाला सेफ गुंतवणूक हवी असते. पैशाची गरज कधी आहे, त्याप्रमाणे पण रिस्क प्रोफाइल बदलते. (शिक्षण, लग्न, जागेची खरेदी यासाठी १-२ वर्षात पैसे लागणार असतील, तर कमी जोखमीची गुंतवणूक लागते.) वयाप्रमाणेसुद्धा रिस्क प्रोफाइल बदलते.
४. चांगला गुंतवणूकीचा प्लॅन हा छोट्या-छोट्या पावलांनी बनत जातो. सुरुवात तर करा.
५. चक्रवाढ व्याज ही अतिशय सुंदर गोष्ट आहे. (Compound interest is a beautiful thing.) त्याची माहिती करून घ्या. बचत करण्याची सवय आयुष्यात लवकर लागली, तर पुढे त्याचा खूप फायदा होतो.
६. त्यानंतर अ‍ॅसेट अ‍ॅलोकेशनची माहिती करून घ्या. गुंतवणुकीत diversification का जरुरी आहे, ते समजून घ्या.
५. गुंतवणुकीत long term view लक्षात घ्या. ही १०० मिटर्सची धावदौड नाही, तर २६ मैलांची मॅरॅथॉन आहे, हे लक्षात असू द्या. Getting there is half the fun.
६. Quality of life is just as essential as a quality portfolio. A fine wine with dinner is just as important as the dinner itself.
७. पैसा कमवून झाला तरी त्याचा कुटुंबियांबरोबर, मित्रमैत्रीणींबरोबर उपभोग घ्या, त्यातून आनंद मिळवा. No one ever said on his deathbed, "I wish I spent more time in the office".

पुढील भागात रिस्क प्रोफाइल, प्लॅनिंग, अ‍ॅसेट अ‍ॅलोकेशन आणि गुंतवणुकीचे वेगवेगळे प्रकार याची माहिती पण येऊ दे.

ज्ञानव's picture

5 Jan 2014 - 4:20 pm | ज्ञानव

साहेब इतके सुंदर मला लिहिता येत नाही कारण डोक्यात बरेच असते शब्दात मांडता येत नाही तुम्ही सुरेख लिहिले आहे तर मूळ धाग्यातच का लिहित नाही? कारण प्रतिसाद पहिल्यापासून शेवटच्या प्रतिसादापर्यंत ह्या पद्धतीने वाचले जातील ह्याची खात्री नाही. (वैयक्तिक मत)
बाकी आवडले .