'अमर प्रेम' या चित्रपटामधील 'रैना बीती जाए'या हिंदी भावगीताला मराठीमध्ये साकारण्याचा हा प्रयत्न... काही चुकलं असेलतर सांभाळून घ्या..
अजून जागी दोन लोचने
नाव तुझे अधरांत
सख्या रे सरत चालली रात
कुठे राहिला श्याम सावळा
लागे न डोळ्यासी डोळा
का मजला वचनात बांधुनी
उगा फिरविसी पाठ
सख्या रे सरत चालली रात
झुरते कधिची रात्र बोचरी
दुःस्वप्ने घेतात भरारी
कुठली वैरीण सांग मुकुंदा
तुझी अडविते वाट
सख्या रे सरत चालली रात
बावरलेली प्रीत दिवाणी
अन राधेच्या डोळा पाणी
गेला सोडून श्याम सखा तिज
लोटुनीया विरहात
सख्या रे सरत चालली रात
© अदिती शरद जोशी
http://unaadpaus.blogspot.com
प्रतिक्रिया
23 Oct 2013 - 1:23 pm | धन्या
छान कविता. मात्र पहिल्याच ओळीतील लोचने शब्द पहिल्याच घासाला खडा लागावा तसा वाटला.
23 Oct 2013 - 5:06 pm | अग्निकोल्हा
अजुन येउद्या...!
23 Oct 2013 - 8:57 pm | बहुगुणी
कवितेतली मध्यवर्ती कल्पना अर्थातच मूळ (सुंदर!) हिंदी गीतावर बेतलेली असली तरीही on its own ही जवळजवळ नवीनच आणि चांगली कविता आहे असं वाटलं:
मूळ गीतातली पहिली दोन कडवी अशी आहेतः
"रैना बीती जाए
शाम ना आए
निंदीया ना आए
शाम को भूला, शाम का वादा रे
संग दिए के जागे राधा
निंदीया ना आए
रैना बीती जाए"
तुम्ही केलेल्या रुपांतरात बर्याच वेगळ्या -पण तरीही भावार्थाशी चपखल बसणार्या :-) - ओळी आल्या आहेत, त्यांचा मूळ गीतपंक्तिंशी फारसा संबंध नाहीये असं जाणवलं (अशा ओळी ठळक करून दिल्या आहेत)
अजून जागी दोन लोचने
नाव तुझे अधरांत
सख्या रे सरत चालली रात
कुठे राहिला श्याम सावळा
लागे न डोळ्यासी डोळा
का मजला वचनात बांधुनी
उगा फिरविसी पाठ
सख्या रे सरत चालली रात
"कुठली वैरीण सांग मुकुंदा
तुझी अडविते वाट" या ओळी खास आवडल्या!
आणखी येउ द्यात.
[अवांतरः पहिल्या त्या "अजून जागी दोन लोचने" ओळी वाचून दुसर्या एका अप्रतिम गाण्याची आठवण झाली: 'खुशबू' चित्रपटातलं "दो नैनोंमे आंसू भरे हैं, निंदिया कैसे समाये"]
23 Oct 2013 - 9:54 pm | आनंदमयी
मनापासून आभार!