"अरविंदनेच मला चंदेरी किनार दाखवली,आणि आता मी ती अल्यागेलेल्याला दाखवते."
असं, ज्यावेळी मला स्मिता अध्यारत बोलली,त्यावेळी मला पण तिची गोष्ट जास्त आत्मीयतेने ऐकावीशी वाटली.
स्मिता म्हणाली,
"त्याच कारण असं आहे.मोठ्या भिंगातून सर्व काही पहायची मला सवंय लागली आहे.अठ्ठावीस वर्षाच्या लग्नगांठी नंतर माझे पति मला दुरावले.त्याना फुफ्फुसाचा कॅनसर झाला.अतोनात सिगारेट ओढल्याचे हे कारण होतं."म्यां मरण पाहिले" असे म्हणण्या ऐवजी "म्यां मरण आणिले " असं त्यांच्या बाबतीत म्हणावं लागेल.अर्थात ती आता होवून गेलेली गोष्ट असल्याने
त्याची चर्च्यापण निष्फळ आहे."
मी म्हणालो,
"स्मिता,आयुष्याचा जोडीदार अशातर्हेने सोडून जातो ही पण एक मोठी धक्कादायक घटना आहे नाही काय?"
त्यावर स्मिता म्हणाली,
" तुझं म्हणणं अगदी बरोबर आहे.पण हे बघ,एकच घटना असेल तर तशी वाटेलही,पण आणखीनही तशीच घटना झाली तर कुणाला मोठी म्हणायचं आणि कुणाला छोटी म्हणायचं हेच समजत नाही.आता मला संसारात गम्य वाटत नाही.
अरविंद, माझा सगळ्यात धाकटा मुलगा, एकवीस वर्षावर ज्यावेळी ही दुनिया सोडून जातो अशावेळेला माझ्या मनोमनी मी ह्या येणार्या सर्व घटनांची एकप्रकारची उपकृतच झाली असं म्हटलं पाहिजे. आणि म्हणून मी मघाशी म्हणाले, मोठ्या भिंगातून सर्व काही पहायची मला सवंय लागली आहे.
हल्ली मी प्रत्येक घटनेत चदेरी किनार पहाण्यात राजी होते.मी यापुढे माझा मुलगा बरोबर घेत असते.कुठची आई असं करणार नाही.? सांग मला.हा एव्हडाच पर्याय माझ्याजवळ राहिला आहे.त्याचं जड ओझं माझ्या डोक्यावर घेवून तरी फिरावं किंवा त्याच्या आठवणी काढून समारंभ करावे.
अगदी प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर,काही महिने मी हा दुःखाचा डोंगर घेवून राहिल्यावर नंतर लक्षात आणलं आणि विचार केला दुःख आणि आनंद ह्यात कुणाशी समझोता करूं?.
आणि त्यामधूनच ह्या काळ्याकुट्ट ढगासभोवतीची चंदेरी किनार पाहू लागले.
आता मी लोकांत मिसळू लागले,मी लोकांची झाले.पण खरं सांगू का अरविंदच खरा लोकांचा झाला होता.
मला एकदां म्हणाला,
"मला ज्यांच्याशी बोलायला हवं त्या प्रत्येकाशी मी बोलत असतो."
मी त्याला माझी खात्री होत नाही अशा ढंगात विचारलं,
"प्रत्येकाशी बोललास?"
त्यावर म्हणाला,
"हो खरंच!पण कोण जर चुकला तर माहित करायला हवं"
स्मिता नंतर म्हणाली,
"पांच वर्षा नंतर त्याच्याच तत्वाशी मी चिकटून आहे"
मी स्मिताला विचारलं,
"घरातले सगळे तुझ्याशी सहमत आहेत का?"
त्यावर ती मला म्हणते,
"माझी मुलगी मात्र जास्त जागृत असते.एखाद्दया अनोळखी व्यक्तिला मी कसं काय? विचारण्यापुर्वीच मला ती चूप करते. माहित असून सुद्धा, की मला तसं करून आनंद होत नाही."
"आल्यागेलेल्या असं विचारुं नकोस "असं वर अर्धवट हंसून मला समजावते.
स्मिता मला म्हणाली,
"अरविंद सुंदर मुरली वाजवायचा.त्याची ती लांबसडक बोटं,मुरलीवर फिरताना त्याने दोन ओठांचा चंबू करून मुरली फुंकताना त्याचा तो सुंदर चेहरा आठवतो.माझ्या तिनही मुलांमधे अरविंद स्मार्ट आणि मस्कर्या होता.
पण त्याच्या त्या अकाली निधनाच्या कारणाचा सुरवातीला मला अचंबा वाटायचा.
कधी नाही ते त्या वर्षी आम्ही सर्व कोकणात आजगांवला माझ्या अजोळी गेलो होतो.अरविंद त्या वर्षी एम.बी.बी.एसच्या पहिल्या वर्षात होता.माझ्या आईने त्याला दगडू महाराला बोलावून दोन लाकडाचे ओंडके कुर्हाडीने तोडून मांगरातल्या हंड्यात पाणी गरम करण्यासाठी जळण म्हणून त्या लाकडांचा उपयोग करायला सांगितलं असताना अरविंदने ते स्वतः तोडून जळणाला वापरले आणि घामाघुम झाल्याने विहीरीमधून थंड पाणी काढून न्हाण्यासाठी काय जातो? आणि तिन चार घागरी पाणी न्हावून शेवटची कळशी पाण्य़ात सोडल्यावर धप्पकन आवाज काय येतो? हे पाहून बघणारे सांगू लागले
"जवळ असलेल्या माणसाने त्याला विहीरीत ढकलंले,"
"अरविंद तोल जावून पडला" असं दुसर्याने सांगितलं
तिसरा म्हणाला,
"अरविंदने बहुदा जीव दिला"
ऐकावं तेव्हडं खोटंच वाटू लागलं. अविश्वासनीय वाटू लागलं."
मी स्मिताला मधेच थांबवून विचारलं,
"पण स्मिता खरं काय ते तुला कळलं का?"
ती म्हणाली,
"तेच तर तुला सांगणार आहे.अरे,आजगांवला आमच्या शेजारच्या घरात शिरवईकरांची इंदू राहायची.तो अणि ती एकाच क्लासात पहिल्या वर्षाला होती.खूप दिवसानी मला ती भेटायला आली.
आणि मला म्हणाली,
"अरविंद बद्दलच्या ह्या अफवा ऐकून तुम्हाला काय वाटत असावं हे मी सहनपण करू शकत नाही.पण आता तुम्हाला ह्या मानसिक छळातून मुक्त केल्यास माझी सुटका होईल असं अलिकडे मला वाटू लागलं."
इंदू पुढे सांगू लागली,
" अरविंद्ला एकदा मी क्लासात नीपचीत बसलेलं पाहिलं."
"काय रे तुला बरं वाटत का नाही?"
असं मी विचारल्यावर माझा हात हातात घेत म्हणाला,
"मला वचन दे की तू हे माझ्या आईला सांगणार नाहीस."
मला म्हणाला,
"मला हे कित्येक दिवसापासून होतंय.डोळ्या समोर काळोख येतो,चक्कर आल्यासारखी होते.परत काही दिवस बरं वाटतं.एकदा आपल्या प्रोफेरसना, माझा संदर्भ न देता,सिम्पटॉम्स सांगून पडताळा घेतला.आणि मग इंटरनेटवर जावून ज्यादा माहिती काढली.मला ब्रेन ट्युमरचा संशय येतोय.गुपचूप मी डॉक्टरना दाखवणार आहे.माझ्या आईला याचा मागमूसही लागता कामा नये. समजलं तर ती हाय खाईल,कदाचीत ती सहनही करू शकणार नाही.अलिकडेच माझ्या बाबांच्या जाण्याने ती एव्हडी कोसळली आहे की हे ऐकून ती उठणारच नाही.
पुढे तो म्हणाला,
" तिला जरा बरं वाटावं म्हणून आम्ही आमच्या आजोळी सर्व जाणार आहोत,तिकडून जावून आल्यावर मी डॉ. रांगणेकराना कन्सल्ट करणार आहे."
इंदू पुढे म्हणाली,
"बहुतेक त्याला विहीरीवर पाणी काढताना चक्कर आली असावी,आणि तो विहीरीत पडला असावा."
हे सर्व इंदूचे बोलणं सांगून झाल्यावर
स्मिता मला म्हणाली,
" अरे,इंदूचं हे बोलणं ऐकून मग माझ्या लक्षात आलं की अरविंद त्यावेळी मला म्हणाला होता,
"मला ज्यांच्याशी बोलायला हवं त्या प्रत्येकाशी मी बोलत असतो."
त्याचं काही आता खरं नाही हे त्याला माहित झालं होतं,असं मला वाटतं,म्हणून तो असा बोलत असावा.अरविंदच्या जाण्याने मी पुरी मुग्ध झाली.आयुष्य चाचपडत जाण्य़ाची मला आता संवय झाली आहे.पण माझ्या अरविंदने मला चंदेरी किनार दाखविली आहे.आणि मी ती चंदेरी किनार इतराना दाखवायला सुरवात केली आहे.अरविंद त्याचं गुपीत मला त्रास होईल म्हणून ठेवून गेला,पण इंदू कडून ते बाहेर आलंच."
हे तिचं बोलणं ऐकून मला मालती पांडेचं ते गाणं आठवलं,आणि ते अरविंद्ला उद्देशून होतं.
"लपविलास तू हिरवा चाफा
सुगंध त्याचा छपेल कां?
प्रीत लपवूनी लपेल कां?"
त्या ऐवजी
"लपविलास तू व्याधी तुझा
परिणाम त्याचा छपेल का?
गुपीत लपवूनी लपेल कां?
श्रीकृष्ण सामंत
प्रतिक्रिया
17 Jul 2008 - 11:14 am | स्वाती फडणीस
चंदेरी किनार आवडली
17 Jul 2008 - 9:18 pm | ऍडीजोशी (not verified)
मस्तच
आपला,
ऍडी जोशी
ईथे भेटा एकदा http://adijoshi.blogspot.com/
18 Jul 2008 - 2:58 am | श्रीकृष्ण सामंत
स्वातीजी, ऍडीजोशीजी,
आपल्याला लेख आवडला हे वाचून मला बरं वाटलं.आभार
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com