भाग-१ - निशाचर
भाग-२ - डुकराची शिकार
भाग-३ - कोरियन गाव
भाग-४ - लेफू नदीतून
भाग-५ - दलदलीत
६
हान्का तलावावरचे वर्फाचे वादळ.
देरसू हान्का लेकला केन्का लेक म्हणतो. याला तलाव म्हणणे धाडसाचे होईल. याचा आकार एखाद्या अंड्यासारखा असून वर तो ३७ मैल आहे तर निमुळत्या भागात तो जवळजवळ याच्या अर्धा आहे. याची लांबी समुद्राच्या बाजूला १६२ मैल आहे तर आतील बाजूला ५० मैल असेल.
तयारी झाल्यावर मी व देरसूने हान्काच्या दिशेने कूच केले. संध्याकाळी परत यायचे असल्यामुळे आम्ही विशेष सामान बरोबर घेतले नव्हते. लागलेच तर म्हणून मी माझे जॅकेट घेतले व देरसूने त्याचा तो प्रसिद्ध तंबू व हरणाच्या कातड्याच्या बुटाचे दोन जोड घेतले. मधे मधे देरसू सारखा आकाशाकडे बघत होता व पुटपूटत होता शेवटी तो मला म्हणाला, ‘कपितान, लवकर परत येणार की नाही ? वाटते रात्र खराब असणार !’ मी त्याला सांगितले की हान्का काही फार दूर नाही आणि आपण काही तेथे राहणार नाही, त्यामुळे काळजीचे कारण नाही. माझ्या उत्तराने त्याचे काही समाधान झालेले दिसले नाही. देरसूचा हा स्वभाव होता. वाद न घालता तो फक्त त्याची काळजी बोलून दाखवायचा. जर बाकिच्यांना पटले नाही तर तो शांतपणे त्यांच्याबरोबर चालायला लागायचा.
‘ठीक आहे कपितान, तुला जर ठीक वाटत असेल तर ठीक आहे.’ देरसू म्हणाला.
हे सगळे मी भारावून बघत असतानाच देरसूने माझे लक्ष पक्षांकडे वेधले. पक्षांची लगबग वाढली होती. नेहमीप्रमाणे ते आरामात न उडता घाई असल्यासारखे उडत होते. सगळ्यात गंमत म्हणजे त्यांनी त्यांचे थवे सोडून उडण्यास सुरुवात केली. गुज तर आम्हाला न घाबरता आमच्या उंचीवर उडत होते. हे असे आम्ही कधी बघितले नव्हते. एवढ्या जवळून ते अवाढव्य वाटत होते. पंख जोरजोरात फडकवत ते वेगाने अंतर कापत आमच्या दिशेने येत होते. आमच्या जवळ येताच ते परत वर जात होते पण थोडे पुढे गेल्यावर परत खाली येऊन उडत होते.
आम्ही दुपारी हान्कावर पोहोचलो. त्या गोड्या पाण्याच्या समुद्राचे रौद्र स्वरुप आता आमच्या लक्षात येऊ लागले. पाणी उकळत्या पाण्यासारखे उसळत होते व त्याचा फेस होत होता. त्या करवती गवतातून मार्ग काढत आम्ही जवळ गेल्यावर त्या पाण्याच्या दर्शनाने आमची छाती दडपून गेली. त्याचा अंतच दिसत नव्हता. मी वाळूत बसलो आणि अनिमिष नजरेने तो देखावा बघत राहिलो.
त्या समुद्रावर एकही बोट किंवा जहाज दिसत नव्हते. आम्ही त्याच्या काठावर एक तासभर फेरफटका मारला व काही बदके मारली.
‘बदके थांबली’ देरसू म्हणाला.
बघितले तर खरोखरच बदके उडायची थांबली होती. मगाशी जे धुरकट धुके मी क्षितिजावर बघितले होते ते आता एकदम आकाशात चढले होते व त्यामागे सूर्य पूर्णपणे झाकला गेला. त्या काळवंडलेल्या आकाशात पांढरे ढग पाठशिवणीचा खेळ करत होते व एखाद्या फाटक्या कापडाप्रमाणे त्यांचे भाग खाली लोंबत होते.
‘कपितान, परत जाऊ. मला भीती वाटते’ देरसू म्हणाला.
खरेच वातावरण तसेच होते. आम्ही आमचे भिजलेले बूट बदलले आणि परत फिरलो. ओढ्याकडे बोट दाखवत देरसू म्हणाला
‘या माणसाचे पाणी वाढले आहे’
त्याचे बरोबर होते. त्या जोरदार वार्याच्या मदतीने हान्कातील पाण्याने नदीच्या तोंडातील पाणी अडवले होते आणि नदीला पूर आला होता. परतायच्या रस्त्यावर आम्हाला आधी न लागलेला एक मोठा ओढा लागला. आता ही सगळी जागाच आम्हाला अनोखी वाटत होती. माझे जाऊ देत, देरसूलाही ती जागा ओळखू आली नाही. मी क्षणभर विचार केला आणि डावीकडे वळलो. त्या पाण्याने आता वेडीवाकडी वळणे घेण्यास सुरुवात केली. आम्ही त्या ओढ्याचा नाद सोडला आणि दक्षिणकडे सरळ चालायला लागलो. थोडे चालल्यावर आम्हाला गजकण लागले व आम्हाला परत त्या ओढ्याकडे परतावे लागले. मग आम्ही उजवीकडे प्रयत्न करुन बघितला. तेथेही आम्हाला एक पाण्याचा ओघळ लागला. तो पार करुन आम्ही पूर्वेला जाऊ लागलो. पण तेथेही दलदलीने आमचा मार्ग अडविला. नशिबाने एका ठिकाणी जमीन लागल्यावर आम्ही पायाने जमीन चाचपडत ती दलदल त्या जमिनीच्या तुकड्यावरुन पार केली व एका मोकळ्या गवताळ जागेत आलो व सुटकेचा नि:श्वास टाकला.
त्या बाजूला थोडे चालल्यावर आमचे पाय पाण्यात बुडू लागले व थोड्या अंतरावर पाण्याची मोठी मोठी डबकीही दिसू लागली. परिस्थितीने आता गंभीर वळण घेतले. मी सुचविले की आपण त्या कठीण जमिनीवर परत जाऊया. देरसूनेही होकार दिला. पण आम्हाला ती जागा सापडली नाही. आम्ही आता त्या निर्जन व अनोळखी जगात पूर्णपणे हरवलो होतो.
अचानक वातावरण कुंद झाले. वार्याचा आवाजही बंद झाला. त्या शांततेत आम्हाला आमच्या पाठीमागे असलेल्या वाहणार्या पाण्याचा आवाज आता स्पष्ट ऐकू येत होता. अंधार पडू लागला होता व त्यात हवेत उडणारे चमकणारे हिमकण स्पष्ट दिसत होते. ते वातावरण काहीच क्षणात बदलले व हिमवादळाने आक्रमण केले.
‘ आजची रात्र येथेच काढावी लागती की काय ! ‘
मी मनात म्हटले. मी आजूबाजूला नजर टाकल्यावर माझ्या लक्षात आले की त्या छोट्याशा बेटावर लाकडाचा एकही तुकडा नव्हता. फक्त गवत व पाणी ! माझ्या मनात भीतीची एक लहर चमकून गेली.
‘काय करायचे ?‘ मी देरसूला विचारले.
‘मी घाबरलोय ! खूप ! ‘ देरसू म्हणाला.
ते उत्तर ऐकून आम्ही कुठल्या भायानक परिस्थितीत सापडलो आहोत याची मला जाणीव झाली. या ओसाड बेटावर आम्हाला शेकोटीशिवाय, रात्र काढावी लागणार होती. आम्ही गरम कपडेही बरोबर आणले नव्हते. माझ्या सर्व आशा अनुभवी देरसूवर केंद्रीत झाल्या होत्या. आता त्यानेच काहीतरी केले तर.... नाहीतर कठीण होते.
‘कपितान ऐक ! नीट लक्ष देऊन ऐक. आता आपल्याला काम करायचे आहे. खूप काम. न थांबता. नाहीतर आपण मरणार हे निश्चित. गवत कापले पाहिजे. लवकर ! जास्तीत जास्त !’
मी त्याला कारण विचारयच्या भानगडीत पडलो नाही. त्या वेळी कोणीतरी काहीतरी सांगते आहे हेच खूप होते. आम्ही आमच्या पाठीवरुन आमचे पिट्टू खाली फेकले व गवत कापायला लागलो. वेड्यासारखे कापायला लागलो. माझ्या एका काखेत मावेल एवढे गवत कापले तेव्हा देरसूच्या दोन्ही हातात गवत होते. वार्याचे झोत इतक्या वेगाने येत होते की उभे राहणेही कठीण जात होते. माझे कपडे गोठले. हातातील गवत मी खाली टाकल्या टाकल्या त्याच्यावर बर्फ जमले. देरसूने मला काही जागेवरचे गवत कापू नको असे सांगितले. मी चुकीने ते कापल्यावर तो मला ओरडलाही.
‘तुला काही कळत नाही. मी सांगतो ते फक्त ऐक आणि तेथील गवत कापू नको. मला माहिती आहे काय करायचे ते !’
मी माझा चाकू हातात घट्ट धरला व सटासट गवत कापत सुटलो. माझ्या शर्टवरील बर्फ वितळायला लागला व त्याचे बर्फासारख्या थंड पाण्याचे ओघळ मला माझ्या पाठीवर जाणवू लागले. मला वाटते आम्ही तासभर गवत कापत होतो. घुसणारे वारे व चेहर्यावर बसणार्या बर्फाच्या सपकार्यांनी मी हैराण झालो. माझी बोटे बधीर झाली. मी हाताला उब आणण्यासाठी त्याच्यावर फुंकू लागलो तर त्या गडबडीत माझ्या हातून चाकू खाली पडला. मी थांबलेलो बघून देरसू ओरडला,
‘कपितान काप, गवत काप, थांबू नकोस. आपण मरणार नाहीतर !’
‘माझा चाकू हरवलाय !
‘हाताने तोड गवत !’ तो वार्याच्या आवाजापेक्षा मोठ्या आवाजात किंचाळला.
मी आज्ञाधारक मुलाप्रमाणे गुढघ्यावर बसलो. मला काही सुधरतच नव्हते. देरसूने त्याच्या तंबूचे कॅनव्हासचे कापड माझ्या अंगावर टाकले व मला गवताने झाकून टाकले. मला एकदम उबदार वाटले. त्या गवतातून आता पाणी ठिबकायला लागले. देरसू आजुबाजूचे बर्फ पायाने तुडवत होता. माझ्या अंगात आता जरा उब आली आणि मी परत एकदा डोळे मिटले. तेवढ्यात मला देरसूचा आवाज आला.
‘कपितान जरा सरक !’
मी जरा सरकून देरसूला जागा दिली. दाटिवाटीने देरसू त्या छोट्या जागेत घुसला व त्याने आमच्या दोघांच्या अंगावर त्याचे जॅकेट पांघरुण म्हणून पांघरले. मी हात लांब करुन चाचपले तर माझ्या हाताला माझ्या पायातील कातडी जोडे लागले. मी ते ओळखले.
‘थँक्यू देरसू ! पांघरुण नीट घे ‘ मी म्हणालो.
‘ आता काळजी नाही. माझे गवत आता पक्के बसले आहे. हे वारे त्याला नाही उडवणार ’ देरसू म्हणाला.
जसा जसा जास्त बर्फ आमच्यावर पडत होता तशी आत उब वाढत होती. थोड्याच वेळात ठिबकणारे पाणीही बंद झाले. बाहेर वादळी वार्याचा भीतीदायक घोंगावण्याचा आवाज येत होता. युद्धात मेलेल्या सैनिकांच्या दफनाच्या वेळी वाजवतात तसा खालच्या पट्टीतील बॅगपाईप्सच्या सुरांची आठवण करुन देणारा आवाज ! माझ्या नजरेसमोर विचित्र आकृत्या फेर धरु लागल्या...त्या बघतांनाच मी एका खोल गर्गेत पडत होतो....शेवटी अनावर झोपेने मला घेरले व मी डोळे मिटले.
आम्ही असे जवळजवळ बारा तास झोपलो असू. अचानक मला जाग आली. त्या भारी जागेत मी एकटाच होतो.
‘देरसू ! मी घाबरुन जोरात हाक मारली.
‘चल ! अस्वला गुहेतून बाहेर यायची वेळ झाली ! या गुहेतून घरी जाऊया आता !’ देरसूचा आवाज आला.
मी धडपडत, सरपटत बाहेर आलो आणि माझे डोळे दिपले. सगळीकडे पांढरेशूभ्र बर्फ पसरले होते. मंद वारा सुटला होता व हवा स्वच्छ होती. गोठविणारी थंडी होती पण काळ्या ढगांच्या चिंध्यांमधून निळेशार आकाशाचे तुकडे डोकावत होते. पहाटेचा अंधार असलातरी आता सूर्य उगवेल असे वाटत होते. बर्फाने झोडपलेल्या गवतांच्या छान रांगा झाल्या होत्या. कुठूनतरी जमविलेला पाचोळा जाळून देरसू माझे बूट सुकवत बसला होता.
आता मला कळत होते की देरसूने मला काही जागांवरचे गवत कापण्यास का बंदी घतली होती ते. त्या न कापलेल्या गवताच्या त्याने वेण्या घतल्या होत्या व त्या आमच्या झोपडीवरच्या गवताला दोर्यांनी व पट्ट्यांने बांधून टाकल्या होत्या. केवळ त्यामुळेच आमच्यावरचे गवत उडून गेले नव्हते.
मी पहिल्यांदा काय केले असेल तर त्याचे माझे प्राण वाचविल्याबद्दल आभार मानले.
‘एकत्र काम करतो, एकत्र चालतो. आभार कसले त्यात !‘ असे म्हणून त्याने पटकन विषय बदलला.
‘काल खूप माणसे मेली बर का !’
आमच्या चालण्याचा वेग वाढला कारण बर्फामुळे जमीन टणक झाली होती. एका तासातच आम्ही आमच्या तळावर पोहोचलो.
ऑलेन्टिएव्ह व मार्चेंको यांना आमची काळजी नव्हती कारण त्यांना वाटत होते की हान्कावर एखाद्या घरात आम्ही आसरा घेतला असणार. मी कपडे बदलले, गरमागरम चहा ढोसला व शेकोटीच्या शेजारी ताणून दिली. मी स्वप्नात परत एकदा बर्फाचे वादळ पाहिले. दलद्लीतमीे रुतलो होतो आणि मी मदतीसाठी हाका मारत होतो. एकच आरोळी ठोकून मी अंगावरचे पांघरुण भिरकावून दिले व जागा झालो. संध्याकाळ झाली होती. आकाशात तारे चमचम करत होते व पांढुरकी आकाशगंगा डोक्यावर पसरली होती. मंद उल्हासित करणारा वारा वहात शेकोटीला प्रज्वलित करत ठिणग्या उडवित होता. देरसू शेकोटीच्या दुसर्या बाजूला झोपला होता तर मार्चेंको जेवणाची तयारी करत होता. आम्हाला तो उठवणारच होत अतेवढ्यात मला जाग आली.
दुसर्या दिवशी पहाटे बर्फ पडला व नदीतील पाणी गोठले. बर्फाचे पुंजके हळू हळू प्रवाहातदो वाहत खाली सरकत होते. आम्ही त्याला शुगा म्हणतो. लेफूचे पात्र पार करण्यास आम्हाला तो आख्खा दिवस लागला. मुख्य पात्र सोडून आम्ही सारखे त्याच्या फुगवट्यात शिरत होतो व परत मुख्य पात्रात येत होतो. यात चिक्कार वेळ गेला. काही मैल प्रवास केल्यावर आम्ही एका वळणे घेत असलेल्या ओढ्यात आलो. जेथे हा ओढा मुख्य नदीला मिळत होता तेथेच एक ओकच्या झाडांचे जंगल असलेली टेकडी होती. आम्ही येताना येथेच मुक्काम केला होता. या टेकडीपासून चेर्निगोव्हकाचा रस्ता तसा सरळ होता. चेर्निगोव्हकाला आमचा मुख्य तळ व घोडे होते.
सकाळी लेफूचा निरोप घेऊन आम्ही त्याच दिवशी दुपारी डिमिट्रोव्हकाला पोहोचलो. हे गाव युसोरियन रेल्वेच्या दुसर्या टोकाला आहे. आम्ही रुळ पार करताना देरसूने थांबून रुळाला हात लावला.
‘हं ऽऽऽऽऽऽ याबद्दल ऐकले होते. खूप लोक बोलतात याबद्दल. आता बघितले’ देरसू म्हणाला.
संध्याकाळी आम्हाला राहण्याची जागा सापडली. देरसूने नेहमीप्रमाणे बाहेरच मुक्काम टाकला. संध्याकाळी उशीरा देरसू दिसला नाही म्हणून मी त्याला शोधायला बाहेर पडलो. अंधार पडला असला तरीही पडलेल्या बर्फामुळे अंधुक अंधुक दिसत होते. सगळ्या घरात चूली पेटल्या होत्या व त्याचा धूर धुराड्यातून आकाशात जात होता. सगळ्या गावात त्यामुळे धूर झाला होता. खिडक्यातून झिरपणार्या प्रकाशात बाहेरचा बर्फ चमकत होता. दुसर्या बाजूला ओढ्याच्या काठी शेकोटी दिसली. बहुदा तो देरसूचा तळ असावा. मी त्या प्रकाशाकडे पावले टाकायला सुरुवात केली. शेकोटीच्या शेजारी देरसू गंभीरपणे बसलेला मला दिसला.
‘चल चहा घेऊ’ मी त्याला म्हटले.
त्याने काही उत्तर दिले तर नाहीच पण मला प्रतिप्रश्न केला.
‘उद्या कुठे जाणार ?’
मी त्याला सांगितले की आम्ही उद्या वेर्निगोव्हकाला जाणार व थेथून व्लाडिओस्टॉकला. त्याला मी आमच्याबरोबर येण्याचे आमंत्रणही दिले. टाईगाला आपण लवकरच येऊ असे सांगून त्याला काही पगारही देता येईल असेही सुचविले. आम्ही दोघेही गप्प झालो. त्याच्या मनात काय विचार चालले होते हे मला माहीत नाही पण देरसूला सोडून जाण्याच्या कल्पनेने माझ्या ह्रदयात कालवाकालव झाली हे निश्चित. मी शहरातील त्याचे आयुष्य कसे आरामदायी असेल हे सांगण्यास सुरुवात केली. देरसू एकही शब्द न बोलता ऐकत होता. शेवटी त्याने एक मोठा सुस्कारा टाकला व म्हणाला,
‘नको . थँक्स कपितान ! मी व्लाडिओस्टॉक नको. काय करणार शहरात? शिकार नाही, प्राण्यांना पकडायचे सापळे नाही, मी लवकरच मरुन जाईन !’
खरेतर मलाही तो जंगलातील माणूस शहरात जगू शकेल असे वाटत नव्हते. मी त्याला शहराचे प्रलोभन दाखविण्यात चूक तर करत नव्हतो ? देरसू गप्प बसला होता. पुढे कुठे जायचे यावर तो विचार करत असणार.
‘उद्या मी पूर्वेला जाईन’ त्याने त्या दिशेला बोट दाखवून सांगितले.
‘चारवेळा सूर्य आला की डॉभी येईल, त्यानंतर उलाहे, नंतर फुझिन. झुबजिन ला आम्ही गोल्डी सिहोते-अॅलिन म्हणतो. तेथे बरेच प्रणी आहेत असे ऐकतो’
आम्ही बर्याच वेळ शेकोटीवर गप्पा मारत बसलो. रात्र स्तब्ध व थंडी मी म्हणत होती. दूरवर न पडलेल्या पानांची सळसळ ऐकू येते होती. गाव केव्हाच झोपले होते. फक्त आम्ही रहात असलेल्या एकाच घरात उजेड दिसत होता. मृगावरुन मध्यरात्र झाली हे समजत होते. शेवटी मी उठलो व त्या गोल्डीचा निरोप घेतला व घरी परतलो. मला एक प्रकारची हुरहूर लागून राहिली होती. अंथरुणावर पडल्या पडल्या मी विचार करत होतो की एवढ्या कमी वेळात त्या मणसाबद्दल मला एवढा जिव्हाळा, प्रेम कसे वाटू लागले..... अर्थात त्याचे श्रेय मी देरसूलाच देऊन डोळे मिटले.
‘देरसू गुडबाय ! ‘मी त्याचा हात हातात घेत म्हणालो. माझ्या मनात भावना दाटून आल्या होत्या.
‘परमेश्वर तुला सुखी ठेवो. तू माझ्यासाठी काय केले आहेस ते मी कधीच विसरणार नाही. आपण परत भेटूच !’
देरसूने सगळ्या सैनिकांचा निरोप घेऊन डावीकडचा रस्ता पकडला. आम्ही त्याच्याकडे बघत तेथेच काही क्षण थांबलो. हळू हळू त्याची आकृती अदृष्य झाली. आमच्या पासून काहीच यार्डावर एक छोटा उंचवटा होता ज्यावर एकुलते एक झाड होते. पाचच मिनिटात तो तेथे पोहोचला. आकाशाच्या पार्श्वभूमीवर त्याची आकृती उठून दिसत होती. पाठीवरील हावरसॅक, हातातील बंदूक व त्याची ती बेचक्याची काठी सारे काही स्पष्ट दिसत होते. त्याचवेळेस मागून सूर्य उगवला आणि प्रकाशात त्याची आकृती उजळून निघाली. तो थांबला व त्याने मागे वळून पाहिले, आमच्याकडे बघून हात हलविला व परत दिसेनासा झाला. मी एक आवंढा गिळला. जवळचेच कोणीतरी गेल्यासारखे माझे मन खिन्न झाले.
‘मस्त माणूस होता नाही ?’ मार्चेंको म्हणाला.
‘दुर्दैवाने अशी माणसे या निष्ठूर जगात फारशी राहिली नाहीत.’ऑलेन्टिएव्ह म्हणाला.
‘देरसू सुखरुप जा. तू माझे प्राण वाचविलेस हे मी कधीच विसरणार नाही’ मी मनात म्हटले.....
संध्याकाळी आम्ही चेर्निगोव्हकाला पोहोचून आमच्या उर्वरित पलटणीला मिळालो. त्याच संध्याकाळी आमच्या मुख्यालयात रुजू होण्यासाठी मी व्लाडिओस्टॉकसाठी प्रस्थान ठेवले............
समाप्त.
जयंत कुलकर्णी
प्रतिक्रिया
18 Oct 2013 - 10:22 am | खटपट्या
देरसू मनातून जात नाही आहे
18 Oct 2013 - 10:31 am | पैसा
देरसू शहरात जाणे अशक्यच होते. हाच शेवट अपरिहार्य होता. देरसूबरोबर एका वेगळ्याच जगाची सफर घडली. धन्यवाद!
18 Oct 2013 - 10:39 am | पद्माक्षी
मस्त ले़खमाला.. धन्यवाद.
18 Oct 2013 - 10:43 am | मृत्युन्जय
खुप सुंदर.
18 Oct 2013 - 11:30 am | डॉ सुहास म्हात्रे
देरसूवरून हंटर-गॅदरर माणसांच्या जीवनपद्धतिची आठवण झाली. भन्नट कथा. शेवटपर्यंत उत्सुकतेने वाचली. पुलेप्र.
18 Oct 2013 - 11:46 am | अनिरुद्ध प
सुन्दर्,शेवट्पर्यन्त खिळवुन ठेवणारी ओघवती लेखनशैली आवडली.
18 Oct 2013 - 1:36 pm | अनुप ढेरे
मस्तं
18 Oct 2013 - 2:16 pm | लाल टोपी
सर्वच चराचर सृष्टीला 'माणूस' संबोधणारा देरसू खरोखरीच भावला. वेगात पूर्ण केलेली मालिका आवड्ली. अतिशय ओघवत्या भाषेतील लिखाणामुळे कोठेही संथपणा जाणवला नाही मूळ लेखक आणि भाषांतरकार या दोघांचेही हे यश आहे. अभिनंदन!.
18 Oct 2013 - 3:19 pm | कोमल
असेच म्हणते..
+१
18 Oct 2013 - 4:51 pm | प्यारे१
+२
असेच म्हणतो.
18 Oct 2013 - 4:06 pm | जयंत कुलकर्णी
सर्वांना धन्यवाद !
18 Oct 2013 - 4:22 pm | लॉरी टांगटूंगकर
मस्त ले़खमाला..
18 Oct 2013 - 4:44 pm | असा मी असामी
मस्तच...
18 Oct 2013 - 6:09 pm | कपिलमुनी
देरसूच्या कथेशी पूर्ण अॅटॅच झालो आहे !!
पुन्हा पहिल्या भागापासून वाचली ..
अशी सुंदर कथा दिल्याबद्दल खुप खुप धन्यवाद !!
18 Oct 2013 - 6:47 pm | आतिवास
पाच वर्षांनी कापितान आणि देरसू यांची पुन्हा भेट होते - त्याही भागाचा अनुवाद सवडीने लिहा इथं.
19 Oct 2013 - 12:38 am | विनोद१८
<
good
विनोद१८
19 Oct 2013 - 12:52 am | रामपुरी
एवढयातच निरोपाची वेळ आली देखील???
लवकर आवरते घेतल्याबद्दल निषेध... लेखमाला आवडली हे. वे. सां. न.
19 Oct 2013 - 2:17 am | अर्धवटराव
वेळ काढुन परत परत वाचावी आणि मन फ्रेश करुन घ्यावं अशी लेखमाला.
23 Oct 2013 - 1:43 am | कंस
व्वा मस्त लेख माला