गणेशोत्सवाची धामधूम संपली. आता नवरात्रीची सुरु झाली. नवरात्रीचा संदर्भ प्रभू रामचंद्राच्या चरित्रातील रावणवध व लंकाविजयाशी जोडला जातो, पण तो प्रामुख्याने जोडला जातो तो देवीमहात्म्याशी. ब्रह्मा-विष्णू-महेश या तीन देवांप्रमाणे दुर्गा-लक्ष्मी-सरस्वती या तीन देवतांकडे आपल्या जीवनातील महत्त्वाच्या क्षेत्रांचे कारकत्व जोडले गेले आहे. देवी दुर्गेची उमा, सती, पार्वती, काली, चंडी अशी अनेक रूपे, त्या त्या वेळी तिने केलेले मोठया, बलाढय राक्षसांचे निर्दालन किंवा घोर कठोर तपश्चर्या यांच्या कित्येक कथा-पुराणांतून वर्णन केल्या आहेत. तशाच देवी लक्ष्मीच्या आणि तिच्या भक्तांवरील कृपेच्याही अनेक कथा प्रचलित आहेत. नवरात्रीचा उल्लेख काही ठिकाणी 'शारदोत्सव' म्हणून केला जातो खरा, पण दुर्गा-लक्ष्मी यांच्याप्रमाणे शारदेच्या अवतारकथा प्रचलित नाहीत तिची मंदिरेसुध्दा फार क्वचित आहेत. कारण तिने एक व्यक्ती म्हणून अवतार धारण केलेलाच नाही. दुर्गा-लक्ष्मी यांच्या उपासनेसाठी म्हणून जशी पूजा-अर्चा, नैवेद्याचे विशिष्ट पदार्थ, व्रत-वैकल्ये प्रचारात आहेत, तशी सरस्वतीची उपासना प्रचारात नाही. तेंव्हा आजच्या सरस्वतीपूजनाच्या निमित्तने व नवरात्रीच्या शारदोत्सवाच्या निमित्ताने देवी शारदेचे स्वरूप, तिचे कारकत्व आणि उपासना यांच्याविष्घ्यी थोडे काही जाणून घेणे इष्ट ठरेल.
धर्माचे उद्दीष्ट अभ्युदय व नि:श्रेयस यांची प्राप्ती असे समजते जाते. आपल्यालाही जीवनात प्रेय आणि श्रेय हे दोन्ही हवे असते. प्रेय म्हणजे सुखसंवेदना देणारे सारे; अर्थात् चविष्ट अन्नपदार्थ, उत्तम वस्त्रे, अलंकार, आराम असे मौज-मजा, सुख-चैन देणारे सर्व भोग. तर श्रेयाचा अर्थ घेतला जातो तो चांगुलपणा, मोठेपणा, मान-मरातब या अंगाने. प्रेय शरीराला तर श्रेय मनाला सुखवते, अहं पुष्ट करते, नि:श्रेयसामध्ये मात्र शरीर सुखसंवेदनेची आस नाहीच, पण श्रेयाचीसुध्दा आस मावळलेली असते. तेथे कामनाच नसते. त्यामुळे त्यासाठी काम्यकर्मेही नसतात. कित्येकदा आपल्या जीवनात असे क्षण येतात की त्यावेळी प्रेय आणि श्रेय यांच्यामागे धावण्याचा कंटाळा येतो. ते निरर्थक वाटते किंवा हे सारे आपल्याला कुठे घेऊन चालले आहे या विचाराने मन गोंधळून जाते. देवी शारदेचे कारकत्व जोडले आहे ते या क्षणाशी! या क्षणापासून पळून जाण्याची कोणतीही पळवाट न धरता, नेमका तो क्षण धरून ठेवणे आणि वेगळया दृष्टिकोनातून स्वत:च्या आत अन् बाहेर पाहाणे, या जीवनाकडे नव्या ज्ञानोपासनेच्या दृष्टीने पाहणे हीच शारदेची उपासना. नि:श्रेयस किंवा शारदेची उपासना म्हणजे प्रपंच सोडणे नव्हे, तर जीवनव्यवहाराकडे नव्या दृष्टीने पाहाणे. त्यासाठीच शारदेचे स्वरूप जाणून घेण्याचा हा 'प्रपंच'!
देवी शारदेची जी मोजकी मंदिरे आहेत, त्यापैकी एक महत्त्वाचे स्थान म्हणजे हैदराबादजवळचे बासर. महर्षी व्यासांच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून ती येथे अवतीर्ण झाली म्हणून ही 'बासर'ची-व्यासांची - शारदा. बरीच मंडळी आपल्या अपत्यांच्या विद्याभ्यासाला प्रारंभ करताना तिचे दर्शन तयांच्यासह घेऊन, तिच्या प्रसादाची पाटी-लेखणी मस्तकी लावून त्यांना देतात. प्रस्तुत लेखाच्या प्रारंभी दिलेले छायाचित्र आहे ते याच 'बासरवासिनी'चे. सरस्वतीची ही मूर्ती अत्यंत सुंदर तर आहेच, पण ती खूप काही व्यक्त करणारी आहे. विशेष म्हणजे त्यात परिपक्व, प्रौढ स्त्रीत्वापेक्षा एक बाल्यभाव प्रतीत होतो. तिच्या मुखाची आणि डोळयांची गोलाई, तिची कलती मान अन् तिच्या मुखावरचे मुग्ध हास्य हे सगळे चार-सहा वर्षांच्या बालिकेचे, भातुकलीच्या खेळात रंगलेले रूप असावे तसे आहे. मात्र या हास्यात गमतीबरोबरच एक गूढताही आहे. कारण तिची ही भातुकली म्हणजे काही एखाद्या घरात, कोपऱ्यात मांडलेली चार बोळक्यांची भातुकली नाही, तर ती अनंत कोटी ब्रह्मांडांची भातुकली आहे. त्या भातुकलीचा खेळ मोठा रंगात आल्याचा तो गूढ तितकाच मुग्ध आनंद तिच्या मुखावर दृग्गोचर होतो आहे असे वाटते. ही गूढता हा तिच्या स्वरूपाचा गाभा आहे.
तिच्या नामाभिधानांमधूनही हाच भाव प्रकट होतो. 'सरस्वती' हा शब्द 'सृ-सरति' या धातूवरून साधलेला असून त्याचा अर्थ गतिमती, वेगवती असा आहे. ती परब्रह्माची शक्ती आहे आणि विश्वनिर्मिती करण्यासाठी वेगाने निघाली आहे म्हणून तिला 'सरस्वती' म्हटले आहे. विश्वनिर्मितीपूर्वी परब्रह्म फक्त होते, निराकार, निरवयव, निष्पंद सत्, चित्, आनंद, ज्ञान अशा स्वरूपलक्षणांनी युक्त असे ते केवळ होते. 'एकोडहं' ही त्याची जाणीव आणि त्यापाठोपाठ त्याची 'बहूस्याम' ही स्फूर्ती, यामुळे त्याची शक्ती गतिमान झाली. तीच 'सरस्वती', तीच शारदा, शारदाच्या चांदण्याप्रमाणे शुभ्र, धवल, सात्विक, तशीच आल्हादक, प्रसन्न म्हणून 'शारदा'. तीच 'वाग्विलासिनी'; अत्यंत सूक्ष्म असे सृष्टीतील यच्चयावत वस्तूंना व्यापून उरणारे 'आकाशतत्त्व' तिने सर्वप्रथम निर्माण केले. आकाशाचा गुण शब्द. विश्वातील सर्व वस्तूंचे वाचक शब्द, विश्वाचा प्रलय झाला तरी त्या 'तत्त्वात' सूक्ष्म बीज रुपाने अवस्थित असतात. त्या शब्दांमधून, वाणीमधून विश्व समूर्त झाले म्हणून ती 'वाग्विलासिनी.' (या विधानाची समजूत अधिक स्पष्ट व्हावी यासाठी जिज्ञासूंनी 'स्वामी विवेकानंद ग्रंथावली'च्या खंड तीनमधील पृष्ठ 42 ते 44 हा मजकूर काळजीपूर्वक वाचावा.) पाश्चात्य जगातील ॠषितुल्य तत्त्वज्ञ 'प्लेटो' याने 'आयडियांचे परिपूर्ण जग' ही जी कल्पना मांडली आहे, तिचे इथे स्मरण होते. पाश्चात्य जगाने त्याला 'स्वप्नरंजनाच्या विश्वात रमणारा' ठरवले ती गोष्ट वेगळी, पण विश्वातील यश्चयावत वस्तूंच्या 'आयडिया' त्या कोणा उच्च जगात अस्तित्वात असतात ही त्याला आलेली 'सत्याची अनुभूति' होती हे उपनिषदांच्या अभ्यासकांना पटल्यावाचून राहात नाही. असो.
सर्व विश्वाचे मूळ ॐकार आहे असे म्हटले जाते, त्याविषयीही थोडे चिंतन प्रकट करणे उचित ठरेल. परब्रह्माच्या 'बहूस्याम' या स्फूर्तीतून त्याची निजशक्ती प्रवाहित, गतिमान झाली हे आपण आताच पाहिले. धनुष्यापासून सुटलेला बाण किंवा बंदुकीतून निघालेली गोळी 'सूं सूं' असा नाद करीत सुसाटत जातात हे आपले सर्वांचेच निरीक्षण असते. त्यावरून, गतिमान झालेली ही 'सरस्वती', ही शक्ती जेव्हा आकाश, वायू, वायू, अग्नी, जल व पृथ्वी या पंचतत्त्वांना निर्माण करती झाली तेव्हा ज्या अनाहत नादाने, ज्या गंभीर नादाने अवकाश भरून गेला असेल तोच ओंकार, ओंकारातून विश्वाची निर्मिती म्हटले जाते ते यासाठीच. तेव्हा देवी शारदा ही 'ओंकारस्वरुपिणी'सुध्दा आहे. या गंभीर ओंकाराच्या नादाचे साम्य वीणेच्या गंभीर ध्वनीशी आहे, म्हणून ती 'वीणवादिनी' आहे. विश्वाचे सृजन करणारी ती मूळमाया, विश्वजननी आदिशक्ती आहे. ती हरहरांचीही जननी आहे. म्हणूनच संत जनाबाई विठ्ठलाला उद्देशून 'अरे अरे विठया। मूळमायेच्या कारटया!' असे म्हणतात.
सरस्वतीवंदनेच्या संस्कृत श्लोकांमधून तर तिचे अत्यंत मनोरम वर्णन पाहाण्यास मिळते. आर्यावर्तातील ॠषिगण हे तत्त्वज्ञ होते तसेच शास्त्रज्ञ होते आणि तेवढेच ते कोमल कविहृदयाचेही होते. तशा प्रकारची गुणवत्ता आजही काही व्यक्तींमध्ये काही अंशी तरी दिसून येते. आपल्या देशाचे माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांना अणूंमधील इलेक्ट्रॉन्सची हालचाल व त्यांची अद्भूत गति पाहून त्यात शिवतांडवाचा भास होतो असे ते आपल्या आत्मनिवेदनात म्हणतात. ब्रह्मांडातील ऊर्जेचा मूलस्रोतच अशा देवी सरस्वतीचा, तिच्या तेजोमय स्वरूपाचा जो तत्त्वार्थबोध ॠषींना झाला, तो त्यांनी कसा निवेदन केला आहे, ते पहा -
या कुन्देन्दुतुष्घरहारधवला या शुभ्रवस्त्रावृता।
या वीणावरदण्डमण्डित करा या श्वेतपद्मासना।
या ब्रह्माच्युतशंकर : प्रभृतिभिर्दैवै: सदा वन्दिता।
सा मां पातु सरस्वती भगवती नि:शेष जाडयापहा॥
अर्थ - जी कुन्दपुष्पे, चंद्र व हिमतुषारांप्रमाणे शुभ्र, उज्ज्वल आहे, जिने शुभ्र वस्त्रे धारण केली आहेत, जी वीणाधारिणी असून श्वेतकमलावर आसनस्थ झाली आहे तसेच ब्रह्मा-विष्णु-महेश इत्यादी देव सदैव वन्दन करतात आणि जी जडतेचा नि:शेष अंत करते ती देवी सरस्वती माझे रक्षण करो.
वरील श्लोकात तिच्या वैभवाचे, अलंकारांचे, तिच्या आवडीच्या वस्तूंचे, वाहनाचे असे कोणतेही वर्णन नाही किंवा तिच्या पूजनाने, भक्तीने कोणत्या कामनांची पूर्तता होईल याचेही वर्णन नाही. तर केवळ तिच्या शुभ्र, धवल तेजाचे शीतल, आल्हादक तसेच विश्वाचे धारण, पोषण करणाऱ्या चंद्रासारख्या सौम्य स्वरूपाचे वर्णन आहे. श्वेत वस्त्र व श्वेतकमलासन यांच्याद्वारे तिच्या शुध्दसत्त्वगुणयुक्त स्वरूपाचा निर्देश केला आहे. वस्तुत: वैश्विक ऊर्जेचा मूलस्रोत असणारी ही 'शारदा' म्हणजे कोणी अवतार घेणारी 'व्यक्ती' नाही, तर केवळ 'शक्ती' आहे. पण मानवी मनाला अमूर्त शक्तीवर मन एकाग्र करणे, तशा शक्तीची भक्ती, साधना करणे शक्य होत नाही. ते सदैव आकारांकडे धाव घेते, यासाठी तिची श्वेतवस्त्रधारिणी, सौम्य, वीण-पुस्तक धारिणी मूर्ती पूर्वसुरींनी योजली हे खरे, पण तिचे जे खरे स्वरूप, ते तेजोमेघासारखे असल्याने पुराणांमध्ये शुभ्र मेघ हेच तिचे वस्त्र असे वर्णन केले आहे; त्याला अनुलक्षून तिला वस्त्रहीन देवता समजून, तसेच ओंगळवाणे चित्र काढल्याची घटना काही वर्षांपूर्वी घडल्याचे वाचकांना स्मरत असेलच. या भ्रष्ट बुध्दीच्या विकृत मंडळींना आणि त्यांचे समर्थन करणाऱ्या तथाकथित बुद्धिजीवींना ही गोष्ट पेलली नाही की ती कार्यरत झालेली शक्ती आहे. शुभ्र मेघ हे तिचे वस्त्र आहे आणि अन्य वस्त्राचे तेथे प्रयोजन नाही, कारण ती अशरीरी शक्ती आहे. शक्तींना व्यक्तित्त्व देऊन त्यांचे स्तवन करणे हे मानवी बुध्दीतील कवित्वशक्तीचे निदर्शक आहे. हा बुध्दीविलाससुध्दा त्या शारदेचेच कर्तृत्व! असो.वीणेचा उल्लेख हा ओंकाराच्या गंभीर नादाच्या स्रोताचा निदर्शक आहे आणि विशेष हे की ती जाडयाचा-जडतेचा नि:शेष, म्हणजे समूळ नाश करणारी आहे. आपण सर्वजण देहधारी आहोत. त्या देहालाच 'मी' समजल्याने आणि सतत जड सृष्टीतच वावरत असल्याने आपली बुध्दीही जड होऊन जाते. जड सृष्टीतील अनुभवांच्या मोहाने त्यांच्यामागे आपण सतत धावत असतो आणि याला कारणीभूत असणारे अज्ञान व अहंकार हे जडतेचेच मुख्य आविष्कार आहेत. 'जडतेचा नि:शेष नाश करणारी ती भगवती माझे रक्षण करो' या चरणाने अज्ञान-अहंकार यांच्या अंध:कारापासून ती माझे रक्षण करो असा भाव प्रकट होतो. ती 'सृजन'ता निर्माण करणारी शुध्दसत्वगुणी प्रेरक शक्ती आहे, म्हणून तिची अशी प्रार्थना करणे सयुक्तिक ठरते. अर्थात, प्रार्थित कृपेचे बीज रुजण्यासाठी भक्ताने आपल्या मनोभूमीची योग्य ती मशागत करणे गृहीत धरले आहे. देवीभागवतातील दुसरा एक श्लोक देवी सरस्वतीचे स्वरूप यादृष्टीने आणखी स्पष्टतेने वर्णन करतो -
शुक्लां ब्रह्मविचारसारपरमां आद्यां जगद्व्यापिनीत्।
वीणा पुस्तकधारिणी मभयदा जाडयान्धकारापहाम्।
हस्ते स्फटिकमालिका विदधति पद्मासने संस्थिताम्।
वन्दे तां परमेश्वरी भगवती बुध्दिप्रदा शारदाम्॥
जी शुक्ला म्हणजे सत्वगुणी असून स्वत:च ब्रह्मविद्येचे श्रेष्ठ सार आहे, जी ब्रह्मांडाची आद्य स्फूर्ती ऊर्जा आहे, जिने संपूर्ण जग व्यापलेले आहे, अशी वीणा-पुस्तक अन् स्फटिकमाला धारण करणारी, अभयदा असलेली बुध्दीच्या योगाने जडतेच्या अंधकाराचे हरण करणारी जी भगवती, श्रेष्ठ शक्ती शारदा, तिला मी वंदन करतो.
प्रस्तुत श्लोकात देवी शारदेचे स्वरूप 'ब्रह्मविद्येचे श्रेष्ठ सार' अशा प्रकारे केले आहे. ती 'पूर्ण ज्ञानरूपा' आहे. विश्वनिर्मिती करणाऱ्या शक्तीचे वर्णन इंग्लिशमध्ये `supreme intelligence' असे केले जाते. तसाच भाव काहीसा येथे आहे, मात्र त्यात सर्वश्रेष्ठ ज्ञानाचे, ब्रह्मविद्येचे स्पष्ट उच्चारण केलेले आहे. जेव्हा काहीही निर्माण झाले नव्हते, तेव्हा स्फुरण पावलेली ही परमतत्त्वाची अंशरूप शक्ती आहे, तिच्यापासूनच सर्व निर्माण झाले; तेव्हा जे म्हणून आहे त्या सर्वांचेच ती आद्यरूप आहे. आद्य ऊर्जा, आद्य स्फूर्ती, आद्य जाणीव, आद्य कोंकार, आद्य वस्तू असे तिचे रूप आहे. ती अभयदा आहे, पण तिच्या हातात कोणतेही शस्त्र नाही, तर वीणा, पुस्तक, स्फटिकमाला अशा वस्तू आहेत. वीणा हे ओंकाररूपी ऊर्जेचे प्रतीक, पुस्तक हे ज्ञानाचे प्रतीक तर स्फटिकमाला हे एकाग्र साधनेचे प्रतीक आहे. पद्मासनाच्या उल्लेखाने देह व मन यांची स्थिरता निर्देशित केली आहे. त्याशिवाय ती जडतेचा अंध:कार नाहीसा करणारी आहे, तशीच बुध्दिप्रदाही आहे. व्यवहारात हे उघडच दिसते की जेथे जडता, केवळ शरीराची नव्हे तर मनाची आणि बुध्दीचीही जडता आणि मलीनता आहे, तेथे अज्ञान आणि अहंकाराच्या आवरणांनी आत्मगन ज्ञान झाकलेले असते आणि त्यामुळेच तेथे अनेक प्रकारच्या भयांचा प्रभाव असतो. स्थिर बुध्दीच्या बैठकीवर ज्याची एकाग्र अशी ज्ञानसाधना निरलसपणे चालू राहाते, त्याच्या आत्मज्ञानावरील मळभ दूर होते, ज्ञानदीप उजळतो आणि त्याच्या प्रकाशात त्याचे सर्व भय, म्हणजेच भयाची कारणे नष्ट होतात. हाच या वंदनेचा अर्थ आहे.
ती 'बुध्दीप्रदा' आहे याचा अर्थ ज्ञानसाधना करणाऱ्यांच्या पाठीशी ती सदैव असते इतकाच आहे. बुध्दी तर प्रत्येक चराचर वस्तूत असतेच. कारण आपण वर पाहिले तसे तिचे स्वरूप जर supreme intelligence असे आहे आणि तिच्या विस्तारातूनच हे विश्व साकार झाले आहे तर केवळ प्रत्येक जीवातच नाही तर कणाकणात बुध्दी ही आहेच. विश्वातील निर्जीव, निरींद्रिय पदार्थांमध्ये ज्या रासायनिक क्रिया बिनचूक घडत असतात, तो त्यातील बुध्दीतत्त्वाचा विलास असतो. अत्यंत सूक्ष्म, तथाकथित अप्रगत अशा जीवाणू-विषाणूंमध्ये, त्यांच्या नाशासाठी योजलेल्या कीटकनाशकांना तोंड देताना जे नवीन बदल घडून येतात (Mutation) तोही त्यांच्यातील बुध्दीतत्त्वाचाच अविष्कार असतो. एकूण काय की, 'बुध्दी दे' अशी प्रार्थना करण्याची खरोखर गरज नसते. सर्व विश्वात, म्हणजे आपल्यातही ही बुध्दी, ज्ञान आहेच, आवश्यकता आहे ती त्या बुध्दीला जडलेल्या 'जडतेचा' नाश होण्यासाठी प्रयत्न करण्याची. ते प्रयत्न केले की देवी शारदा कृपा करतेच करते! आपण जेव्हा विविध विषयांची माहिती गोळा करतो, त्यांचा अभ्यास करतो तेव्हा ही बुध्दी कार्यरत होते. विविध शास्त्रे, विषय यांची ती बुध्दी सांगड घालते तेव्हा ती 'मेधा' म्हणवली जाते. विश्वातील व्यापार-व्यवहारांमागचे गूढ ती उकलू लागते तेव्हा तिला 'प्रज्ञा' म्हटले जाते, तर अदृष्टातले, अपूर्व असे काही तिच्या जाणिवेत प्रकटते, तेव्हा त्या प्रातिभ जाणिव्यांमुळे त्या व्यक्तीला प्रतिभावंत, द्रष्टा म्हटले जाते. आणि शारदेच्या या कृपेला जात, धर्म, लिंग, वय, आस्तिक्यभाव आणि कोणतीही अट नसते हे विशेष!
संत शिरोमणी श्री ज्ञानदेव त्यांच्या 'ज्ञानदेवी'मध्ये देवी शारदेचे स्तवन करताना म्हणतात,
'आता अभिनव वाग्विलासिनी। जे चातुर्यकलाकामिनी।
ते शारदा विश्वमोहिनी। नमिली मिया॥'
तिच्या 'वाग्विलासा'तून विश्व साकार झाले म्हणून, तसेच तिचा वास नवनवोन्मेषेशालिनी प्रतिभेत आहे म्हणून तिला 'अभिनव वाग्विलासिनी' म्हटले आहे. या संपूर्ण, स्वयंपूर्ण, परिपूर्ण अशा विश्वाची निर्मिती करणारी म्हणून ती 'चातुर्थकला-कामिनी' आहे. बुध्दी, चातुर्य, प्रतिभेची विलसिते यांनी ती सर्वांना मोहून टाकते, तसेच सर्व विश्व तिने पंचमहाभूते आणि सत्व-रज-तम या त्रिगुणांच्या क्रीडेने मोहीत केले आहे म्हणून ते तिला 'विश्वमोहिनी' असे संबोधत आहेत. 'ज्ञानदेवी' या ग्रंथातील अपूर्व वाग्विल्स हाही शारदेच्या कृपेचा अविष्कार आहे.
ज्या ज्या संतांना, कवींना हे 'वाग्विलासा'चे वरदान लाभले आहे, त्या सर्वांनीच देवी शारदेचे स्तवन केले आहे, पण समर्थ रामदास स्वामींनी आपल्या 'दासबोधा'च्या प्रारंभी एक संपूर्ण समासच या स्तवनाला वाहिला आहे. त्यातून तिच्या स्वरूपातील सूक्ष्मता आणि व्यापकता अत्यंत मनोरम पध्दतीने विशद केली आहे. आधीच समर्थांची वाणी दिव्य, तेजस्वी, त्यातून ते जेव्हा साक्षत 'वाग्देवते'चे स्तवन करतात, तेव्हा त्या शब्दप्रभूंची शब्दकळा अगदी अमोघ, ओजस्वी आणि सरस्वतीसारखी गतिमती, ओघवती होऊन जाते. देवी शारदेच्या स्वरूपाचे विविध पैलू प्रकाशित करणाऱ्या या सगळयाच ओव्या अप्रतिम आहेत. येथे मात्र त्यातील मोजक्याच ओव्यांचा परामर्ष घेणे आहे.
वाणीची अधिष्ठात्री देवता म्हणून ती कशी आहे, ते समर्थ दुसऱ्याच ओवीत सांगतात -
'जे उठवी शब्दांकुर। वदे वैगरी अपार। जे शब्दाचे अभ्यंतर। उकलून दावी॥2॥
वृक्षावर येणारी पालवी आणि त्यातून पुढे येणारी फुले, फळे हे सर्व काही त्या वृक्षात, त्याच्या बीजात सूक्ष्म रूपाने सामावलेले असते. तसेच परा, पश्यंती, मध्यमा व वैगरी या चार रूपांनी ती वाणी आपल्यात स्थित असते. एखाद्या अनुभवाने मनात उमटणारे विचार, कल्पना हेच जणू शब्दांकूर; या परावाणीतून पुढे अपार वैखरीचे जे प्रस्फुरण होते तोच शारदेचा 'वाग्विलास'. मानव समाजातल्या विविध भाषा, त्यातली शब्दसंपत्ती ही आपण ध्यानी घेतो, तेव्हा या 'अपार वैखरी'चा नेमका अर्थ ध्यानी येतो. पुन्हा त्या शब्दांचा वाच्यार्थ, लक्ष्यार्थ, भावार्थ, गूढार्थ हे ज्या बुध्दीचातुर्याच्या योगे ध्यानी येतात, ती विचक्षक बुध्दीसुध्दा तिचेच रूप आहे. म्हणजे शब्दाचे मूळ बीजरूप तीच, अक्षरे, वाणी तीच, शब्दांतले विविध अर्थ आणि त्याच्या अमिधा, लक्षण, व्यंजन आदी विविध शक्ती तीच आणि ते अर्थ उकलून दाखवणारी बुध्दीही तीच, म्हणून ती 'वाग्देवता.'
पुढे तिचे आणखी सूक्ष्म रूप समर्थ उलगडून दाखवतात - 'जे योगियांची समाधी। जे धारिष्टांची कृतबुध्दी। जे विद्या-अविद्या उपाधी। तोडून टाकी॥3॥
'समाधी' म्हणजे बुध्दीची स्थिर, समतोल, समाधात अवस्था. जेव्हा योग्याच्या जडतेचा समूळ नाश होतो, तेव्हा ही स्थिती त्याला प्राप्त होते. श्रीमद्भगवत्गीतेत या स्थितीला 'ब्राह्मी स्थिती' असे म्हटले आहे आणि या स्थितीला मनुष्य प्राप्त झाला की तेथून तो ढळत नाही असेही पुढे म्हटले आहे. मनाची ही प्रशांत अवस्था हेसुध्दा तिचेच त्या शारदेचेच रूप आहे, म्हणून जड मन जसे इतस्त: धावते तसे हे प्रशांत मन धावत नाही, शांतीपासून ढळत नाही. कारण त्रिगुणांच्या अतीत असलेल्या त्याच्या बुध्दीचा काही एक कृतनिश्चय झालेला असतो.
सर्वसामान्यांमध्ये या निश्चयाचा अभाव असतो. साध्यासाध्या ऐहिक गोष्टींबाबत निर्णय करताना मन गोंधळते. लोक काय म्हणतील याचा विचार मनुष्य करतो. लोक जे, जसे करतात, तेच केलेले बरे असा तो विचार करतो. 'महाजनो येन गता: स पंथ:' असा तो विचार असतो. 'महाजन' म्हणजे मोठे लोक किंवा बहुसंख्य लोक जो विचार करतात, वागतात त्याला 'जगाची रीत' म्हणतात. तेव्हा त्यानुसार वागायचे वा कोणी हितचिंतक जो सल्ला देतील त्याप्रमाणे किंवा पुस्तकी ज्ञानाच्या आधाराने 'आपले निर्णय' मनुष्य घेतो. पण स्वत: सारासार विचार करणे मात्र कटाक्षाने टाळतो. अशा परिस्थितीत तो 'कृतनिश्चय' कसा होणार? आणि साध्याशा ऐहिक बाबतीत जर ही अवस्था तर विद्या-अविद्या यांची उपाधी तो कसा तोडणार? इथे अविद्येची उपाधी असते हे सहज पटते, पण विद्येची उपाधी? मुंडकोपनिषदात म्हटले आहे त्याप्रमाणे जो अविद्येत रमतो तो अंध:कारात चाचपडत राहतो, पण जो केवळ विद्येत गुंतून पडतो तो त्याहूनही घोर अंध:काराच्या खाईत पडतो. म्हणून विद्या-अविद्या यांची 'उपाधी' न होऊ देता त्या दोहोंचा म्हणजेच अशाश्वत जीवनातील ऐहिकाचे ज्ञान आणि शाश्वत तत्त्वाचे अधिष्ठान यांच्या ज्ञानाने त्यांचा योग्य तो समतोल साधून मनुष्य जे जीवन जगतो, ती कृतबुध्दी, निश्चयात्मिका, व्यवसायात्मिका बुध्दी. या बुध्दीच्या योगानेच तो अखंड शांती प्राप्त करून घेऊ शकतो आणि हे कार्य घडण्यास फार मोठे धारिष्टय लागते. अविद्या म्हणजे ऐहिकाच्या प्रभावाने येणारे अज्ञान, लोभ, मोह यांचे बंध. ते तोडून टाकण्यासाठी, तसेच विद्या म्हणजे अध्यात्मविद्या, साधना यांच्या योगाने निर्माण होणारा अहंकार, दंभ यांचा फणा मोडून टाकण्यास सामोरे येणाऱ्या सिध्दींना बळी न पडता आपले स्वत्व टिकवण्यास जे धारीष्टय लागते ते धारिष्टय, म्हणजेच शुध्द असा सत्त्वगुण, हे शारदेचेच रूप आहे. हा शुध्द सत्त्वगुण आणखी कोणत्या रूपाने आढळतो ते समर्थ पुढे सांगतात -
'जे महंतांची शांती। जे ईश्वराची निजशक्ती। जे ज्ञानियांची विरक्ती। नैराश्यशोभा'॥5॥
ही जी महंतांची शांती, ज्ञानी जनांची विरक्ती, तीच ईश्वराची निजशक्ती आहे. तिच्यासाठी समर्थांनी 'नैराश्यशोभा' हा अत्यंत सुंदर समर्पक शब्द योजला आहे. मात्र आज आपण ज्या अर्थाने नैराश्य हा शब्द वापरतो ते हे नैराश्य नव्हे. आपल्या मनातली काही आशा पूर्ण होत नाही, तेव्हा आपल्याला दु:ख होते, ती दु:खी, उदास स्थिती, ती विफलता 'निराशा' या शब्दाने व्यक्त होते. अशा 'नकारात्मक' अर्थाने नाही तर 'अभावात्मक' अर्थाने तो शब्द अभिप्रेत आहे. तेथे 'हताश' नसून 'निरपेक्षता' आहे. अभिमानाचा अभाव याअर्थी निरभिमान हा शब्द येतो, तसा आशेचा अभाव निस्पृहता या अर्थी येथे तृप्त, शांत, आनंदमय, निरपेक्ष अशा मनासाठी 'नैराश्यशोभा' हा शब्द उपयोजला आहे. ज्याचा देहभाव व अहंता यांचा समूळ उच्छेद झाला आहे, त्याला कसलीही आशा-अपेक्षा-आकांक्षा नसते, म्हणून अपेक्षाभंग नसतो. 'मी-माझे' या उपाधीपासून मुक्त झालेले त्याचे मन 'व्यापकपणे संपूर्ण' अशा ईश्वरी शक्तीशी एकरूप झालेले असते; त्या मनाचे सौंदर्य, वैभव 'नैराश्यशोभा' या शब्दातून व्यक्तविले आहे. याच अर्थाने पुढे समर्थांनी 'मोक्षलक्ष्मी', 'मोक्षश्रिया' असे शब्दही योजले आहेत.
समर्थांनी त्यांच्या पदरी अर्पण केलेले शिवाजीराजांनी दिलेले स्वराज्याचे देणे नाकारले. तसेच पूर्वी मोठा नजराणा अर्पण करण्याच्या तयारीने सम्राट सिकंदर एका महात्म्याकडे कडे गेला असता त्यांनी 'माझ्या अंगावर येणारे उन्ह तू अडवले आहेस तेवढे बाजूला होऊन ते येईल असे कर म्हणजे पुरे' असे जे म्हटले, त्यातून ही जी 'नैराश्यशोभा', तिचे दर्शन घडते. ऐहिक जीवनातील वैभवाला अनुलक्षून जयलक्ष्मी, भाग्यलक्ष्मी, गृहलक्ष्मी, वनश्री यांसारखी कितीतरी लक्ष्मीची रूपे व्यक्त करणारी नावे प्रचारात आहेत, परंतु निरीच्छ, प्रशांत, मुक्त मनाचे वैभव प्रकट करणारे, शारदेचे रूप व्यक्त करणारे असे मोक्षलक्ष्मीसारखे शब्द समर्थांच्याच प्रतिभेतून निर्माण होऊ शकतात. त्यांची ही प्रतिभासुध्दा त्या शारदेचाच आविर्भाव आहे.
देवी शारदेचे सूक्ष्म, व्यापक, तरल असे स्वरूपलक्षण सांगताना समर्थ म्हणतात -
'जे अव्यक्त पुरुषाची व्यक्ती। विस्तारें वाढली इच्छाशक्ती।
जे कळिकाळाची नियंति। सद्गुरुकृपा॥11॥
जे निर्गुणाची ओळखण। जे अनुभवाची खूण। जे व्यापकपणे संपूर्ण। सर्वांघटी॥18॥
परब्रह्म हे अव्यक्त, अविकारी, निर्गुण, निराकार, निरवयव, निष्पंद असे आहे. त्याबाबत दिसणे तर नाहीच, पण त्याची खूण, ओळख तरी कशी पटणार? मात्र त्या अव्यक्ताच्या इच्छेने, स्फूर्तीने विस्तार पावलेली, सर्व विश्वाला व्यापून, पुन्हा स्वत: संपूर्ण असलेली, कळिकाळावरही जिचे नियंत्रण आहे अशी देवी शारदा हीच त्याच्या अस्तित्वाची खूण पटवण्यास समर्थ आहे. योग्यांना मनाच्या ज्या 'भावावस्थेत' हा 'अनुभव' येतो, त्या अवस्थेत केवळ तो 'भाव' आहे, ती 'ओळखण' आहे; तेथे स्वत:चेही 'मी' असे अस्तित्व लोप पावले आहे, इतकेच काय पण 'मला ही खूण पटली आहे' ही जाणीवसुध्दा लोप पावली आहे, ही अशी 'भावावस्था' हेही तिचेच रूप आहे. 'सर्वांघटी' म्हणजे सर्व वस्तूमात्रांना, जीवमात्रांना व्यापूनही ती पुन्हा स्वत: 'परब्रह्मात दडी मारून राहाते' असे समर्थ सांगतात. प्रस्तुत लेखाच्या प्रारंभी बासरवासिनी देवी सरस्वतीच्या मुखावरील हास्यातील गूढतेचा उल्लेख केला आहे, त्या गूढतेचे रहस्य समर्थांच्या शब्दांतून उलगडते.
'जे व्यापकपणे संपूर्ण' या शब्दांमधल्या गूढार्थाचे पदर उलगडताना पुढे ध्यानी येते की पूर्णब्रह्माचे जे वर्णन आहे, ते त्याच्या निजशक्तीलाही नेमके लागू पडते -
'ॐ पूर्णमद: पूणमिदं पूर्णात्पूर्णमुदच्यते।
पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते॥
हे म्हणजे हे विश्व. पूर्ण आहे, ते परब्रह्मही पूर्ण आहे. पूर्णातून पूर्णच उत्पन्न झाले आहे, पूर्णातून पूर्ण निर्माण झाले तरी पुन्हा पूर्णच शिल्लक आहे. परब्रह्माचे हे वर्णनही त्याच्यासारखेच परिपूर्ण आहे. त्याने निर्माण केलेले हे ब्रह्मांड म्हणजे एक संपूर्ण, स्वयंपूर्ण, अखंड व्यवस्था आहे. कोणताही दोष, कमतरता, चूक नसलेली ही परिपूर्ण व्यवस्था आहे. पूर्णापासून पूर्णच निर्माण होणार हे उघडच आहे. मात्र त्याच्या एखाद्या कोटयांशाने हे निर्माण झाले म्हणून त्याच्यात तेवढी घट झाली, असे नाही. ते तसेच, तेवढेच संपूर्ण आहे. त्याच्याप्रमाणेच त्याची ही निजशक्तीसुध्दा संपूर्ण विश्वाला व्यापून स्वत: संपूर्ण आहे हे समर्थ इथे या एका चरणात समर्थपणे व्यक्त करतात. आणि तिचे हे सर्व व्यापित्व कसे आहे तेही आणखी स्पष्ट करतात -
'जे जे दृष्टीने देखिले। जे जे शब्दें वोळखिले। जे जे मनास भासले। तितुके रूप जियेचे॥24॥
समर्थांची प्रतिभा अपूर्व आहे. एका लहानशा ओवीत त्यांनी संपूर्ण ब्रह्मांडाला सामावून घेतले आहे. दृष्टीला दिसणारी यच्चयावत सृष्टी तिने व्यापली आहेच, पण जे दृष्टीला दिसले नाही तरी ते आपण शब्दाने ओळखतो - जसे प्रेम, द्वेष यांसारखे भाव - तेही ती आहे. त्याशिवाय काही गोष्टी अशाही असतात की त्यांना रूप नाही, नामही देता येत नाही, पण ते जाणवते. आपण म्हणतो, 'मला जाणवतेय खरे, पण ते शब्दात मांडणे मात्र शक्य नाही. तेव्हा वस्तूरूप, नामरूप आणि भावरूप या तिन्हींमध्ये येणारे प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष, दिव्य, सूक्ष्म, अनाकलनीय यांच्यापलीकडचे असे काही उरतच नाही आणि असली अनंत कोटी ब्रह्मांडे ती रचते, सहजपणे मोडते आणि स्वत: मात्र आदिपुरुषात दडी मारून राहाते असे तिचे मनोरस वर्णन समर्थ परोपरीने करतात.
तिच्या मायेचेही वर्णन समर्थांनी असेच नेमकेपणाने केले आहे -
'जे अनंत माया वैष्णवी। न कळे नाटक लाघवी। जे थोरथोरास गोवी। जाणपणे॥23॥'
विश्वाचे धारण-पोषण करणारी ही वैष्णवी शक्ती असून तिची माया अनंत आहे. त्रिगुणांची निर्माती तीच आहे. या त्रिगुणांच्या योगाने थोरामोठयांना त्यांच्या जाणतेपणाच्या ज्ञानाच्या अभिमानात ती गुंतवते. मनुष्याला ऐहिक वैभवाप्रमाणे, ज्ञातेपणाची, विद्वत्तेचीसुध्दा आस असते; त्याचा त्याला गर्व, अहंकार होतो तेव्हा त्या गर्वाच्या वेढयातून बाहेर काढायला - त्याला आणि त्याचा उपद्रव होणाऱ्या इतरांना - ती निरनिराळी नाटकेसुध्दा रचते. अशा उन्मत्तांपासून निरपराधांचे रक्षण करणे हेसुध्दा तिचेच कार्य असते ना? देवी शारदेच्या अवतारलीला फारशा प्रचारात नाहीत, पण या संदर्भातली एक कथा विशेष प्रचलित नसली तरी मोठी मजेदार आहे.
रामायण कथा घडण्यापूर्वीची ही कुंभकर्णाची कथा आहे.
रावणाप्रमाणेच कुंभकर्णही महापराक्रमी, शिवभक्त होता. त्याने इंद्रपद लाभावे म्हणून मोठी घोर तपश्चर्या आरंभली. त्या दीर्घ, कठोर तपाने सर्व देवगण चिंताग्रस्त झाले. देवांचा दुस्वास करणारा हा दानव जर इंद्रपदी आरूढ झाला तर देवांचे आणि मानवांचे काय होणार या चिंतेने त्यांनी देवी शारदेकडे धाव घेतली. तिने त्यांना आश्वासित करून पाठवले. कुंभकर्णाचे तप मात्र तिने पूर्ण होऊ दिले. त्याच्या तपश्चर्येत विघ्न तिने आणले नाही. अखेर कितीही वांड झाले तरी तेही तिचेच 'लेकरू' होते ना? तेव्हा त्याच्यावर ती कोणताही अन्याय करणार नव्हती, अन् त्याच्या हाती 'कोलित'ही देणार नव्हती. तिने वेगळेच लीलानाटक रचले. कुंभकर्णाची तपश्चर्या पूर्ण झाली. भगवान शंकर प्रसन्न होऊन त्याला वरदान देण्यासाठी प्रकटले. तेव्हा शारदेने एका क्षुद्र माशीचे रूप घेतले आणि ती त्याच्या तोंडाभोवती गुणगुण करून त्याला त्रस्त करू लागली. एवढा मोठा बलाढय, पराक्रमी दानव वीर, थोर तपस्वी, पण त्या माशीच्या गुणगुणण्याने तो त्रस्त, बेजार झाला, गोंधळला, त्याची जीभ अडखळली अन् तो 'मला इंद्रपद दे' म्हणण्याऐवजी 'निद्रापद दे' असे म्हणून गेला. भगवान शंकरांनी तत्क्षणी 'तथास्तु' म्हटले. काय नाटयमय आहे सारे! या नाटयमय प्रसंगाने, शारदेच्या लीलानाटकाने, तिने हे 'वांड लेकरू' वर्षातले सहा महिने झोपून राहील अशी युक्ती साधली. देवी शारदेसह सर्व देवांनीड अन् मानवांनी सुटकेचा निश्वास टाकला.
ही झाली मोठया दानवाची मोठी नाटयमय गोष्ट, पण आपल्यासारख्यांच्या सामान्य आयुष्यातसुध्दा लहान-मोठी नाटके ती घडवीत असते. तोही तिच्याच लीलानाटकाचा भाग आहे. त्यात अनेक पात्रेही आहेत. आपले स्वत:चे प्रारब्ध, आपल्या पूर्वजांचे प्रारब्ध, अन् त्यातला आपला वाटा, आपल्या भावविश्वात चढउतार करणारे त्रिगुण, आपली अभ्युदयाच्या संदर्भातली आकांक्षा आणि नि:श्रेयसाची मधूनमधून डोकावणारी जाणीव, या सगळया पात्रांच्या क्रियाप्रतिक्रियांमधून हे नाटक पुढे चालत राहाते. संत तुकाराम महाराज यांचे वर्णन 'सुख पाहाता जवा पाडे। दु:ख पर्वताएवढा।' असे करतात. आपण मात्र त्याकडे एक अडथळयांची शर्यत अशा दृष्टीने पाहाणे श्रेयस्कर आहे. यात षड्रिपूंचे अडथळे आहेत, सुखोपभोगांचे अडथळे आहेत, गुण-अवगुणांचे, अज्ञानाचे तसेच ज्ञानाचे, त्रिगुणांचे, यश-अपयशांचे असे कित्येक अडथळे आहेत, एवढेच काय पण मोठया पटाईत, पारंगत खेळाडूंसाठी सिध्दींचेसुध्दा अडथळेच आहेत आणि मग असले सारे अडथळे पार करून एखादा तुकाराम, पुंडलिक, ज्ञानोबा त्यांच्या पार पोहोचतो, तेव्हा त्याच्या भेटीसाठी आपले चारही बाहू पसरून तेथे परमेश्वर स्वत: तिष्ठत असतो. ही उदाहरणे खूप दूरवरची झाली. पण वस्तुत: आपण सारे याच वाटेवरचे वाटसरू आहोत. अभ्युदय साधता साधता नि:श्रेयसाकडे जाणे, जात राहाणे हेच आपल्या जीवनाचे प्रयोजन आहे. स्थूल स्वरूपाचे भोग, सुखे चाखताना अपयश, दु:ख, क्रोध यांचे अडथळेही आपल्याला पार करायचे आहेत. तसेच सूक्ष्म स्तरावरचीही सुख-दु:खे जाणीवपूर्वक समजून घ्यायची आहेत. विद्यार्थीदशा सरली तरी ज्ञानसाधनेचे हाती बांधलेले कंकण मात्र सुटू द्यायचे नाही, याची खूणगाठ मनाशी बांधली पाहिजे. चिंता सोडून चिंतनशीलतेची कास धरली पाहिजे. तेव्हाच ती विश्वजननी शारदा आपल्या ज्ञानदृष्टीला उज्ज्वल प्रकाशाचे वरदान देईल.
प्रतिक्रिया
12 Oct 2013 - 1:20 am | प्यारे१
समयोचित, अतिशय अभ्यासपूर्ण नि विस्तृत लेख.
12 Oct 2013 - 1:42 am | अर्धवटराव
असेच म्हणतो.
12 Oct 2013 - 7:08 pm | मूकवाचक
_/\_
28 Sep 2014 - 9:17 pm | vikramaditya
१०० टक्के सहमत
12 Oct 2013 - 1:46 am | रामपुरी
देवी शारदा तुमच्यावर नक्कीच अतिशय प्रसन्न असली पाहीजे. एवढं टायपायचं म्हणजे चेष्टा नाही म्हाराजा. आम्ही एक प्रतिसाद बडवताना फाफलतो...
12 Oct 2013 - 7:57 am | मदनबाण
हेच म्हणतो. लेख परत एकदा सावकाशपणे वाचला जाईल.
12 Oct 2013 - 11:51 am | स्पंदना
हो! परत एकदा सावकाश वाचण्यासाठी ठेवुन देतेय कपाटात. मग उघडुन निवांत वाचेन.
12 Oct 2013 - 3:53 pm | पैसा
अभ्यासपूर्ण उत्तम विवेचन.
तशी सरस्वती ब्रह्म्याची पत्नी आणि नदीरूपात सुद्धा मानली गेली आहे. पण सरस्वती नदी आता लुप्त झाली आणि भोजशाला आणि शारदापीठ ही शारदेची इतर मंदिरे सुद्धा नष्ट करण्यात आली.
12 Oct 2013 - 5:24 pm | चित्रगुप्त
छान विवेचन केले आहे
जगभरातील असंख्य कवी, लेखक, कलावंत, नर्तक, संगीतकार, नाटककार इत्यादिंच्या कल्पनाविलासातून निर्माण झालेल्या निर्मितीतील वैविध्य अफाट आहे, त्यातील एक सुंदर अविष्कार.
12 Oct 2013 - 9:03 pm | प्रचेतस
लेखन आवडले.
ही घ्या खास तुमच्यासाठी सेऊणचंद्र यादवाच्या काळातील सरस्वती
ही अजून एक, पेशवेकाळातली
12 Oct 2013 - 10:12 pm | यशोधरा
सुरेख लिहिले आहे. धन्यवाद.
13 Oct 2013 - 2:08 pm | स्वाती दिनेश
विवेचन फार सुरेख!
धन्यवाद,
स्वाती
13 Oct 2013 - 3:03 pm | मंदार कात्रे
उत्तम लेख .धन्यवाद
28 Sep 2014 - 8:40 pm | सस्नेह
हा सुरेख लेख नजरेतून सुटला होता.
शारदीय नवरात्राचे महात्म्य इतक्या नेमक्या शब्दात याआधी वाचले नव्हते.