जिम कॉर्बेट उद्यानात आमचा फेरफटका

सस्नेह's picture
सस्नेह in जनातलं, मनातलं
18 Sep 2013 - 4:18 pm

कालपासून वर्गावर नवीन सर आले. मराठी विषयाला. आता सातवीचं मराठी म्हणजे काय जादा अवघड नाय. पण त्यांनी एकदम डायरेक्ट निबंधच लिहायला सांगितल्यावर माझी नाही म्हटलं तरी जरा फाटलीच. निबंध म्हणजे माझा वीक प्वाइंट !
सरांनी विषय दिला, ‘शालीमार बागेतील फेरफटका ‘.
शालीमार बाग ? गावातल्या सगळ्या बागा आमच्या पायांना सू-परिचित. त्यातल्या एकाच बागेला नाव आहे. दे.भ. सोमूअण्णा नगरकर बाग. पण ‘शालीमार’ असल्या भारी नावाची बाग आमच्याच काय, पंचक्रोशीतल्या कुठल्याही गावात नाही, हे आम्हाला पक्के ठाऊक आहे.
राजाने नम्रपणे सरांना विचारले ‘सर तुम्हाला शालीमार पिच्चर असे म्हणायचे आहे काय ?’
त्यावर सरांचा चेहेरा भारतमातेच्या नकाशाप्रमाणे लांबोडका झालेला पाहून राजाला राँग नंबर लागल्याचे लक्षात आले.
मग त्याने अधिकच नम्रतेने विचारले, ‘सर, शालीमार बाग कुठे आहे ?’
वाघमारे सरांना भयानक आश्चर्य वाटले.
‘म्हणजे तुम्हाला शालीमार बाग माहिती नाही ?’
आम्ही सातवीत असूनही आम्हाला शालीमार बाग माहिती नाही या गोष्टीचा त्यांना धक्का बसला आहे हे उघडच दिसले.
त्यानंतर त्यांनी सांगितले की भारतमातेच्या नकाशाच्या डोक्यावर एक काश्मीर नावाचे जब्रा गाव आहे अन त्या गावात शालीमार नावाची त्याहून जबराट बाग आहे. मग त्यांनी त्या बागेत बसल्याप्रमाणे तिचे इस्टमनकलर वर्णन केले. ते ऐकून आम्हाला, ‘राम तेरी गंगा मैली’ पासून ते 'कोई मिल गया' हे सगळे त्रेलर एका दमात पहयाला मिळाल्यासारखे वाटले.'

त्यानंतर वाघमारे सरांनी आम्हाला सांगितले की आम्ही शालीमार बागेच्या सौदर्याचे वर्णन करणारा एक निबंध लिहायचा आहे. आम्ही सर्वांनी मिळून त्यांची समजूत घालायचा खूप प्रयत्न केला, की बाग पाहिलेली नसताना तिचे वर्णन करणे अशक्य आहे. पण वाघमारे सर काही ऐकेनात. वाघमारे सर बंड्या टोणपेच्या मावसभावाच्या काकांचे वर्गमित्र असल्याने बंड्या त्यांच्यावर दबाव आणण्यात यशस्वी झाला अन अखेर तडजोड अशी झाली, की आम्ही ‘शालीमार बागेतील फेरफटका’ या नावाचा निबंध लिहायचा. पण त्यात वर्णन मात्र दे.भ. सोमूअण्णा नगरकर बागेचे करायचे.
हे बरे झाले. बंड्या, राजा, मी अन सुकट्या चौघांनी ताबडतोब ‘शालीमार’ बागेच्या फेरफटक्याचा बेत निश्चित केला. रविवारी जेवणे होताच आम्ही घटनास्थळी उपस्थिती लावली. पाहतो तर आख्खा वर्गच आमच्या आधीच तिथे उपस्थित होता. यानंतर साहजिकच बागेच्या सौदर्याचे वर्णन करण्यापूर्वी क्रिकेट, विटीदांडू इ. साधनांनी तिची चाचणी घेतली गेली. त्यानंतर भेळ, वडापाव इ. साहित्याची चाचणी झाल्यानंतर शालीमार बागेची महती आम्हाला पूर्णपणे पटली. मग शालीमार बागेतील तगरी, कण्हेरी, संकेश्वर, जाई-जुई, झेंडू इ फुले तसेच चिंच, नारळ, पिंपळ, वड इ. वृक्ष आणि चिमण्या, कावळे, पोपट, वटवाघळे इ. पक्षी यांचे यथासांग वर्णन करणारा जंगी निबंध लिहायला आम्हाला मुळीच अडचण आली नाही.
दुसऱ्या दिवशी सर्वांचे निबंध एकसारखे पाहून वाघमारे सरांना अंमळ धक्का बसला. पण बंड्याच्या शिष्टाईमुळे वेळ निभावली गेली. तरीही, शालीमार बागेत नारळ, वड, पिंपळ, कावळे, वटवाघळे इ. वस्तू असण्यास त्यांचा आक्षेप असावा असे दिसले. त्यावर राजाने (नम्रपणे), त्याऐवजी योग्य नावे सुचवण्यास सरांनाच सांगितले, तेव्हा ते काहीसे विचारात पडलेले दिसले. अखेर त्यांनी योग्य नावे देण्यासाठी मुदत मागून घेतली. ती, आमची वार्षिक परिक्षा झाली, तरी पूर्ण झाली नाही.
त्यानंतर साधारण एक महिना बऱ्यापैकी सुखाचा गेला. पण एक दिवशी पुन्हा वाघमारे सरांना अक्काबाई आठवली. अक्काबाई हा आमच्या आजीचा शब्द. आजीकडून ऐकलेला अक्काबाईंचा थोडक्यात इतिहास असा : आमच्या कोल्हापूरच्या खूप जुन्या काळातल्या छत्रपतींची एक मुलगी होती. तिचे नाव अक्काबाई. ती अत्यंत धाडसी अन कडक शिस्तीची . एकटी जंगलात जाऊन वाघाची शिकार करत असे. हो, त्या काळी कोल्हापूरच्या जवळ भरपूर जंगले होती अन त्यात वाघही असत. तर ही अक्काबाई म्हणे रोज सकाळ संध्याकाळ कोल्हापुरातल्या रस्त्यांवरून घोड्यावरून टगडक टगडक करत फेऱ्या मारत असे अन तिच्या शिस्तीच्या विरुद्ध कुणी वागताना दिसले तर त्याला तिथेच चाबकाचे फटके मारी. लोक या ‘अक्काबाईच्या फेऱ्या’ ला जाम टरकून असत म्हणे. आम्हाला कुणाला छळण्याची बुद्धी झाली, की आमची आजी, अक्काबाई आठवली असं म्हणे.
तर वाघमारे सरांना अक्काबाई आठवली. त्यांनी आम्हाला ‘जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यानातील आम्ही पाहिलेले प्राणी’ या विषयावर निबंध लिहायला सांगितला.
याखेपी आम्ही अजिबात डगमगलो नाही. आम्ही आता जिम कॉर्बेटच काय बिल क्लिंटनवरसुद्धा निबंध लिहायला तयार आहोत. जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान हे कुठे आहे हे नकाशात शोधायला आम्हाला एक तास लागला. पक्याने नकाशाला नाक लावून त्यातले प्राणी शोधण्याचा घाईचा प्रयत्न केला. परिणामी त्याच्या डोक्यातले षटपाद प्राणी जिम कॉर्बेटमध्ये शिरू लागले. तेव्हा सुकट्याने कॉलर धरून पक्याला वर खेचले.
तेव्हा आम्ही जिम कॉर्बेट नॅशनल पार्कचा फेरफटका करायला तयार झालो. ... दे.भ. सोमूअण्णा नगरकर झिंदाबाद !
(क्रमशः )

कथाविनोदमौजमजाविरंगुळा

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

18 Sep 2013 - 7:48 pm | प्रचेतस

लै भारी. एकदम खुसखुशीत.

'शालिमार बाग' वाचून नाशिकच्या जॅक्सन्स गार्डनची (हल्लीचे हुतात्मा कान्हेरे उद्यान) आठवण झाली. नाशिकच्या शालिमार परिसरात असल्याने तिलाही आम्ही शालीमार बागच म्हणायचो. लै मजा यायची बागेत खेळायला तेव्हा.

हे हे हे. सू-परिचित बागेचा निबंध आवडला. ;) पुढील लेखन येण्याची वाट पाहते.

मुक्त विहारि's picture

18 Sep 2013 - 8:40 pm | मुक्त विहारि

पुभाप्र

प्यारे१'s picture

18 Sep 2013 - 9:53 pm | प्यारे१

ही स्नेहांकिता आहे?
मस्तच लिहीलंय!

हं! मला वाटलं खरंच जाऊन आलात तुम्ही :-)

स्पंदना's picture

19 Sep 2013 - 7:10 am | स्पंदना

ऑ? बागा फिरायला सांगत्यात मास्तर तुमच?

झक्कास गो स्नेहा! झक्कास!

कवितानागेश's picture

19 Sep 2013 - 8:32 am | कवितानागेश

निबंध द्या की वाचायला. :)

निवेदिता-ताई's picture

19 Sep 2013 - 8:55 am | निवेदिता-ताई

छान

माझीही शॅम्पेन's picture

19 Sep 2013 - 10:07 am | माझीही शॅम्पेन

जबर्दस्त ............झकास पुधच लवकर येवुन दे अक्का-बाऐ

>> ते ऐकून आम्हाला, ‘राम तेरी गंगा मैली’ पासून ते..
हे वाक्य अर्धवट राहिल्यासारखं वाटत आहे. बाकी लेख छानच :)

त्रिवेणी's picture

21 Sep 2013 - 12:32 pm | त्रिवेणी

पुढचा लेख लवकर येऊ द्या

पैसा's picture

22 Sep 2013 - 6:23 pm | पैसा

पुढचा फेरा कधी?

अनिरुद्ध प's picture

23 Sep 2013 - 6:48 pm | अनिरुद्ध प

जिम कोर्बेटवरचा निबंध वाचायला मिळेल ही अपेक्शा.