"अजाबात पडून घेवचंय नायं.असात तो पाटील गांवचो.म्हणून काय भर नाटकांत, अर्जूनान हार खांवूक होयी? आणि पडान घेवूंक होयां?महाभारत असो नायतर रामायण असो,पायलीक पांच शेर लेखक मियां पण बघीतलेत."
आता पर्यंत अगणीत लेखक महाभारतकारावर आणि रामायणकारावर टीका करीत आले आहेत.कॉपी-राईटचा हक्क तेव्हा अस्थीतवात नसल्याने,अद्दयाप पर्यंत कोर्ट कचऱ्यात खेचण्यापासून हे लेखक बचावले गेले आहेत.
उदा.
रामाने सीतेला मात्र आपल्याबरोबर वनवासात नेलं
"निरोप कसला घेतां आता
जेथे राघव तेथे सीता"
ह्या गीत रामायणातल्या दोन ओळी कश्या विसरता येतील.हे सीतेचे रामाला उद्देशून म्हटलेलं लक्षात घेवून,
"उर्वशीवर झालेला अन्याय"
असा विषय घेवून बऱ्याच लेखकानी त्यावर खर्डे घासलेत ते काय कमी आहेत? काही कविनी पण उर्वशीवर झालेल्या अन्यायावर काव्ये पण केली आहेत.
उर्वशीची बाजू घेवून कुणीसं म्हटलंय,
"पण म्हणून लक्षमणाने आपल्या- बायकोला उर्वशीला- कां नेलं नाही आपल्याबरोबर रामासारखं वनवासात? .हा तिच्यावर अन्याय नाही काय?
रावणाने सीतेला उचलून नेई पर्यंत रामाला वनवासात पत्नी सूख मिळत होतं मग लक्षमणाने काय गुन्हा केला होता.?"
आणखी कुणीसं रामायणावर टीका करताना आपल्या लेखात म्हटलंय,
"उर्वशी म्हणते,
मला सोडून लक्ष्मण वनवासात निघून गेला.
जाताना माझ्यासाठी लक्ष्मणरेषा आखून गेला सासू-सासऱयांची,कर्तव्याची, अपेक्षांची
"वाट बघ माझी " अशी शिक्षा मला देऊन गेला अनेकदा वाटल, सगळ सोडून वनवासात निघून याव. पती नसलेल्या संसाराला त्यागून जाव,वनवास मीही भोगलाय हया राजमहालात
पण माझा संयम कोणी जाणलाच नाही"
असल्या काहीशा कपोलकल्पीत टीका डोक्यांत आणून बऱ्याच लेखकानी महाभारतकारावर आणि रामायणकारावर रकानेच्यारकाने कागदावर ओढले आहेत.पुर्वी इंटरनेट आणि ब्लॉगवर लिहीण्याची आता सारखी सोय नसल्याने काही लेखक आपले लेख मासिकात फूकट पब्लिश करीत असत. आणि काही मासिके पण असल्या लेखावर जगत असत.
हे सगळं सांगण्याचा मतितार्थ असा की कोकणात "धयकालो" नावाने उस्फूर्त नाटकं व्हायची.
"धारणकाराचो धयकालो ईलो हा रे!"
असं गावातला एक माणूस दुसऱ्याला सांगायचा.आणि बातमी अख्या गावात पसरायची.लहानपणी आम्ही हटकून ह्या धयकाल्याला जायचो.नाटक-पार्टीने कुठे तंबू ठोकले आहेत ते आमच्यापैकी एक शोधून काढायचा.नाटक पाहून झाल्यावर दुसऱ्या दिवशी परत त्या तबूं जवळ घुटमळत रहाण्यात आम्हाला मजा यायची.
त्यावेळी पुरूष, स्त्रीपार्ट करायचे. द्रौपदी,कुंती,गांधारी हे स्त्रीपार्ट करणारे पुरूष सकाळी उठल्यावर दाढीमिशी करताना पाहून जरा गम्मत वाटायची.
" रे मन्या,तो बघ द्रौपदी दाढी करतां!"
असं म्हटल्यावर आम्ही त्या न्हाव्याला कौतुकाने नटाच्या गम्मती विचारायचो.
पुरूष असून स्त्रीपार्ट करण्याची जबाबदारी असल्याने डोळ्यात काजळ घालून,लांब लांब केस ठेवून स्टेजवरची चाल बायकी राहण्याची संवय म्हणून दिवसा पण तसेच चालताना ह्या नटाना पाहून जरा कुतुहल वाटायचं.
नेहमीच्या व्यवहारात बोलताना सुद्धा ते बायकांसारखे लाडिक हावभाव करून बोलायचे हे पाहून सुद्धा हसूं आवरंत नसायचं.
कधी कधी एखादा नट आयत्यावेळी हजर नसायचा.कधी कधी दारू झोकून तर्र असायचा ,अशावेळी त्याच्या कडून ऐनवेळी काम करून कसं घ्यायचं हे नाटकाच्या मालकाला संकट व्हायचं.
"मेल्या ही काय वेळ दारू पिवची?.अरे,तुझो पार्ट येवची वेळ आयली मरे."
असं दिगंबर गुरुजी - नाटकाचे डायरेक्टर -वैतागून म्हणायचे.पण दुसरा काही उपाय नसल्याने कोण जवळपास दिसेल त्याल तो पार्ट करावा लागायचा.
तेच तेच नाटक बरेच वेळां पाहिल्याने डायलॉग सर्व पाठ झालेले प्रेक्षक कमी नसायचे.
असंच एकदा दुर्योधन दारू पिवून आयत्यावेळी तर्र झाला होता.दिगंबर गुरूजीने गावातल्या पाटलाला दुर्योधनाची भुमिका करायला विनंती केली,नव्हे तर ते त्यांच्या गळीच पडले.
धयकाल्याची आयत्यावेळी लाज राखावी म्हणून बाबलो पाटील - गावातला प्रतिष्टीत आसामी- कुरकुरून का होईना तयार होतो.गुरुजी,त्याचा पार्ट येण्यापुर्वी थोडेसे संवाद बाबल्या पाटलाला येतात याची खात्री करून घेवून त्याला दुरयोधनाचे कपडे चढवायला सांगतात.
अर्जून दिगसकर दिसायला स्मार्ट, तरतरीत नाक,आणि नाटकाचे संवाद स्पष्ट बोलायला तत्पर असल्याने त्याला गुरुजी अर्जूनाची भुमिका देतात. अर्जून दिगसकर गावातली एक सर्वसाधारण व्यक्ति असते. तसंच दुर्योधनाची भुमिका करणारा बाबल्या पाटील दुर्योधनाला शोभेल असा दंडकट, राबस-रोबस्ट-आणि काळसावळा दिसायला असतो.
अर्जूनाचा आणि दुर्योधनाचा वाद होवून लढाई होते असा सीन असतो.दोघांच्या वाद-संवादाच्या ओळी बोलून झाल्यावर घनघोर युद्ध व्हायचं असतं.म्यानातून तरवारी काढून दोघे ही एकमेका वर तरवारीने वार करण्याचा पार्ट करतात. सीनच्या शेवटी दुर्योधनाने पडायचं, असा सीन असतो.आणि मग अर्जून त्याच्यावर शेवटचा वार करण्यापुर्वीत्याला लाथेने ढकलतो.आणि ठार मारण्या ऐवजी माफ करून सोडून देतो.
अर्जून हा पांडवातला एक पांडव अज्ञातवासात असल्याने दुर्योधनाला हा अर्जून आहे हे खऱ्या
गोष्टीत माहित नाही असं समजायचं असतं.
काही झालं तरी दुर्योधन खाली स्टेजवर पडण्याचा सीन करत नाही हे पाहून गुरुजी आतून प्रॉम्ट करतात आणि दुर्योधनाला-म्हणजे बाबल्याला- सांगतात,
"लढाई खूप झाली आता तू जमिनीवर पड."
पण ते कसं शक्य आहे.बाबल्या पाटलाला जमिनीवर पडून अर्जूनाची लाथ खावून वर
" जा,तुला जीवदान दिले "
असं म्हणून घ्यायची तयारी नसते.कारण प्रेक्षकात गावातल्या बायका आणि त्याची सुद्धा बायको बसलेली असते. इतर लोकही बसलेले असतात, त्यांच्या पुढे लाज जाईल असं कसं करायचं.असं दुर्योधनाला म्हणजे बाबल्या पाटलाला वाटतं.
अर्जूनाला डोळे करून दुर्योधन सांगतो की तू पड मी पडणार नाही.अर्जूनही त्याला डोळ्याने खुणावतो की सीन मधे तू पडायचं असतं मी नाही.बराच वेळ हा सीन जरूरी पेक्षा जास्त वेळ चाललेला असतो.प्रेक्षकाना सुद्धा स्टोरी माहित असल्याने त्यांचे पण पेशंस संपत येतात.
शेवटी बाबल्या पाटील म्हणजेच दुर्योधन उस्फूर्त गाणे म्हणून गाण्यातून त्याला संदेश देवून चिडून सांगतो,
"अर्जूनग्या माय++ या पडान घे
रे पडान घे.
मी आसंय पाटील गावचो
माकां अपमान नाय करून घेवचो
(प्रेक्षकांत)
चेहरो दिसतां माझ्या बायलेचो
अर्जूनग्या माय++ या पडान घे
रे पडान घे."
( टीप. कर्म धर्म संयोगाने नाटकातल्या अर्जून ह्या भुमिकेचं आणि खऱ्या नटाचं नाव अर्जून (दिगसकर) असणं हा योगायोगच म्हटला पाहिजे)
गाणं ऐकून प्रेक्षक हंसायला लागतात.दिगंबर गुरुजीनां हे सर्व कळल्यावर नाटकाचा पडदा पाडल्याशिवाय त्यांना गत्यंतरच उरत नाही.
पडदा पडल्यावर अर्जून दिगसकर गुरुजीना सांगतो,
"अजाबात पडून घेवचंय नायं.असात तो पाटील गांवचो.म्हणून काय भर नाटकांत, अर्जूनान हार खांवूक होयी? आणि पडान घेवूंक होयां?महाभारत असो नायतर रामायण असो,पायलीक पांच शेर लेखक मियां पण बघीतलेत."
तात्पर्य अ़सं की अनादिकालापासून लिहीलेल्या रामायण आणि महाभारत ह्या दोन असामान्य ग्रंथावर प्रत्येकाने आपाआपले विचार सांगून भरपूर तोंडसूख घेतलं आहे.
कोकणातला धयकाला हा त्यातला अलिकडचा एक प्रकार.
श्रीकृष्ण सामंत
प्रतिक्रिया
15 Jul 2008 - 7:52 am | यशोधरा
काका, ल़क्ष्मणाची पत्नी उर्मिला ना?
बाकी दशावतारी नाटकांची मजा मात्र वेगळीच हां!!
15 Jul 2008 - 11:17 am | श्रीकृष्ण सामंत
यशोधराजी,
होय लक्ष्मणाची पत्नी उर्मिला.तिच्यावरच अन्याय झाला.
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com
15 Jul 2008 - 8:21 am | llपुण्याचे पेशवेll
बाकी दशावतारी बघण्यासारखे असत्तात खास. कोकणात केवळ पानसुपारी आणि १०० रु. दशावतारी घराच्या पुढच्या खळ्यात खेळ करीत. त्या खेळाचा उल्लेख अमुक गावचे खेळे बोलावले आहे असाच असे. बाकी वाडीतली बहुतेक मंडळी येत खेळे बघायला. काळा ड्रेसवाला शंकासुरपण धमाल करीत असे..असे खेळे मी माझ्या आतेभावाच्या मुंजीत बघितले होते.
पुण्याचे पेशवे
15 Jul 2008 - 11:44 am | यशोधरा
काका, तुम्ही उर्वशी लिहिलय वर म्हणून विचारल मी, मला ते काही कळलं नाही.... :(