आत्ताच एक लेख डोळ्याखालुन गेला, भारतीय सण हे शेतक-यांसाठी नाही...आमचेपण हेच मत आहे,. पण मग हे सण नेमके कुणासाठी असावे, या प्रश्नाचे उत्तर शोधून काढल्याशिवाय आम्हाला चैन पडेना, . अखेर सगळे पट मांडुन ह्या प्रश्नाचे उत्तर आम्ही शोधून काढले आहे. आमच्या घोटुन घोटून, खोदून खोदुन (निट वाचा, पा नाहीये) केलेल्या या अभ्यासावरुन आम्ही जाहीर करतोय की सण हे " आय टी" मधील लोकांना डोळ्यासमोर ठेऊनच योजिले आहेत…
नको नको, एव्हड्यात आम्हाला दंडवत घालू नका व आमचा उदो उदो पण करु नका, आम्ही अतिशय संशोधन करूनच हे भाष्य केलेय बरं का… विचार न करता कोकलायला आम्ही काय दिग्गी आहोत का ? असो… तर समाजाने अत्यंत सुखी ठरवलेला व आतून अत्यंत दुखी असलेला हा "आय टी" इंजीनियर वर्ग,...कामाच्या गाड्याला सदैव जुंपलेला, बॉसच्या हाताखालचे मांजर असलेला, वर्षानुवर्षे A, B का C या एवढ्यात विवंचनेत जगणारा, सोनू, तरन्नूम वा फटका या टोपणनावाने वावरणारा, सण येणार म्हणजे सुट्टी येणार, एक दिवस तरी बॉसच्या कचाट्यातून वाचणार या एव्हड्या तुटपुंज्या आशेवर जीवन व्यथीत करणारा.......
कलियुग येणार म्हणजे भारतात आयटी येणार हे भविष्य आपल्या पूर्वजांनी खुप पुर्वीच जाणले असावे, व त्यानुसारच या “आयटी ईन्जीनियर” नावाच्या सदैव रगडल्या जाणा-या प्राण्याच्या आयुष्यात थोडा आंनद निर्माण करावा म्हणून त्यांची आर्थिक, सामाजिक व भावनिक परिस्थिती लक्षात घेऊन फार पूर्वीच (मग आपले साधुसंत भविष्यात डोकवायचे की फ्री टाईम मध्ये) हे सण योग्य प्रमाणे योजिले असावेत. कसे बघा,
नविन वर्षाची सुरूवात होते गुढीपाडव्यापासून, एप्रिल महिन्याच्या अध्य-मध्य ला येणारा हा सण. तेव्हाच "आयटी" चे पण नविन वर्ष सुरु होते.. साधारणता या सुमारास आयटीवाल्यांचे Apprisal Letter आलेले असतात, सहसा चांगलेच असतात.. चुकुन माकून मंदी असेल तरी एखादी आयटीतलीच मंदा शोधली (यासाठी पाडव्याला पहाटे पहाटे उठून सारसबाग गणपती मंदिरात (?) जायची प्रथा पडलीय ) की ही मंदी झळ मंद होते....
चांगला मोबदला मिळाला तर गरीब बिचारा आपल्या मालकाचा उदो करत कशीतरी "लाकडाच्या जमिनीतली" खेटर घेतो, नायतर "बाणाचा" कापड घेतो, मंदाला छोटिशीच का होईना पण स्कर्ट घेतो, तर कधी कधी "मारुती" उडी मारतो, हेच काय बिचा-याचे सुख. नसेल चांगले तर Nike च्या जागी Action ने काम चालवतो, पहिल्याच सणाला पुर्ण वर्षाचे बजेट समजते, बरोबर आला कि नाही सण ?
मग येतो पोळा. येथे तर प्रचंड गफलत आढळते. अहो पोळा शेतक-यांचा सण कसा ? हा दिवस कोणाचा? बैलाचा ना ? मग आजच्या काळात बैल कोण आहे म्हणतो मी ? बैलाच्या गळ्याच्या दावणाला आणि यांच्या गळ्यातल्या पट्ट्यात काही फरक असतो का ? एक दिवस पाऊस आला म्हणून वरिजनल बैल आराम करू शकतो, आयटीतल्या बैलाला बसवून दाखवा, च्यालेन्जच समजा जणू .... कमी का राबतात ईथले बैल ? दिवस म्हणू नका, रात्र म्हणू नका, तीन तीन पाळ्यांमध्ये काम करतो बिचारा... कधी बघितलाय का वरिजनल बैलाला पण ईव्हड काम करतांना ? मुळात मी तर म्हणतो हा सण प्रचंड जलोश्यात साजरा करावा आयटीवाल्यानी. उशिरा कामावर जावे, किंवा "घरूनच काम" करतो म्हनून हात पाय झाडावे, वा हापासातल्या पारावार बसावे, ,Treditional Day च्या नावावर पोरीबारींनी सजावे. तेव्हडच सुख डोळ्यांना.... काय ? तेव्हडेच काय तो बैलाना आनंद...
आता आली नागपंचमी, आता यावर आम्ही काय बोलावे, शेतातला साप दिसतो हो, मनातला कसा दिसणार ? आजूबाजूला तर नुस्त साप असतात यांच्या, सापाच्या बिळातच असतात म्हणा ना, उशिरा आला का ? चाव, Dilevery देत नाही का ? चाव.. थोडे ईकडे तिकडे झाले तर फणा काढुन तयार चावायला, आणि बॉस नावाचा नाग,,. आरारा नाव काढू नका, पंचधारी जणू , जालीमच ते, लय डूख धरत बेणं,... चुकून चावला ना, माणूस मरत नाही, नुसता तडफडत राहतो, मी म्हणतो काय बिघडले अश्या सापांना थोड्या पिज्झारुपी लाह्या, व कॉफी डे ला नेऊन दुध पाजले तर ? असायाला नको का त्यांना खुष करायला सण ?
दसरा हा सण सिमोलंघनाचा, निदान या सणाच्या निमित्ताने यांना Onsite जाता यावे म्हणून या प्रथा.... नायतर कोण ईचारत यांना ? सिमोपार जावे, थोडे डॉलर लुटावे व परत यावे, या एव्हढ्या शुध्द हेतूने या सणाचे आयोजन केले गेले, आता शेतक-याजवळ कुठून येणार डॉलर ? ते बसले बापडे आपले पाने वाटत .. आणि तुम्ही म्हणता शेतक-यांचा सण. पण हा खरा आयटीचाच….
आयुष्यात हे दळभद्री प्राणी कसलेच दिवे लावणार नाही, व यांचे जीवन अन्धारमयच असणार आहे, हे आपल्या पूर्वजांनी केव्हाच ताडले असावे, म्हणून ह्यांच्यासाठी दिवाळसण डिझाईन केला गेला असावा. एक दिवस तर धड आंघोळ करा, व कर्माचे नाही तर तेलाचे तरी दिवे लावा हे सांगायला....
आणि आत्ता खरे गणित बघा, आहे का आता मोठे सण ? कसे असणार ? आणि बरोबर आहे, कशाला हवे डिसेम्बर नंतर सण ? वेळ आणि मानसिक तयारी तरी असते का यांची ते साजरे करायची? ढिगा-याएव्हडे काम देऊन बॉस लम्पत होतो, आणि हे बसतात त्याची सुट्टितली उष्टावळ काढत… मग त्यांचा मस्त नाताळ सण साजरा करुन मालक धष्टपुष्ट होऊन आलेले असतात , आणि सुट्या भरुन काढायच्या म्हणून राब राब राबवतात जानेवारीत , म्हणुन असते ती संक्रांत .आणि ते बकरे को काटने से पहिले खिलाते ही ना च्या धर्तीवर तीळगुळ… त्यात मार्च येतोय म्हंटल्यावर हयावर्षी तरी बॉस ची वक्रदृष्टी आपणावर पडू नये, म्हणून गोड गोड बोला (मालकाशी) हा ईशारा असतो. उगाच नाही काही हा रिवाज पडलाय...
शेवटी वर्ष संपायला येते, पुर्ण वर्ष बरबाद करुन तुम्ही किती नालायक आहात हे प्रत्येक आयटीवाल्याला त्याच्या मालकाने सांगितले असते किम्बंहूना त्यालाच ते पटले असते, स्व:ताची लाज वाटत असते, मग अश्या वेळी चीड आली की तोंड काळे करावेसे वाटते, म्हणूला असते ती होळी.. काय असेल बाबांनो तुमचे Frustration ते त्या आगीत जाळा व स्वताचे तोंड काळे करा, आणि व्हा परत निगरगट्ट, हे सांगायला…
आणि सणांची मांडणी बघा, जानेवारीनंतर एकसुद्धा खार्चिक सण नाही, कसा असणार ? सण बनवलेच यांच्यासाठी ना, मग त्यांची आर्थिक परिस्थिती नको का विचारात घ्यायला ? जानेवारीपासुन यांचा खिसा फाटायला सुरुवात होते, आतापर्यंत ध्यानीमनी नसलेला लेखानिरीक्षक क्षणांत सावकार झालेला असतो, जाग्गेवर करकपात, ८० अ, ब, क ची बचत, या दुष्टचक्रात बिचारे आयटीवाले फसत जातात, वर्षाअखेर Performance बोनस भेटेल या आशेवर त्यांनी छातीला माती लावत धपाधाप क्रेडीट कार्ड घासले असते, आत्ता Performance बोनस ही काय द्यायची गोष्ट असते का ? ते फक्त दाखवायचे गांजर असते, एव्हडे साधे कळत नाही म्हणजे काय ? कसे परवडणार त्यांना अजून सण ? गरीब बिचारा, देवा पुढच्या वर्षी तरी कोप करू नका म्हणत नविन वर्ष्याच्या सणांसाठी परत सज्ज होतो.
सबब संपूर्ण विचारांती सण हे शेतक-यासाठी नसून आयटी चा विचार करुन बनवले आहे, असे मी परत एकदा जाहिर करतो... अर्थात तुम्हाला हे पटेलच असे नाही, म्हणून म्हणतो, एकदा आयटीवाल्यांना जाणून घ्या, अहो, जावे त्याचा वंशा तेव्हा कळे, यांच्या वेदना तुम्हाला कळल्या ना, तुमच्या नुसत्या आसवांनी नद्यांना पूर येईल, शेतकरी असाल तर स्व:ताबद्दल अभिमान वाटेल ते वेगळेच. … धन्य ते जण ज्यांनी भविष्य जाणले तेव्हाच…
सध्या आम्ही "कर्म करना, फल की इच्छा मत करना" हे कृष्णाने अर्जुनाला भावांशी युध्द करत नाही म्हणुन का "युद्धानंतर आयटीत काम करावं म्हणतो" म्हणुन सांगितलंय यावर संशोधन करतोय…
प्रतिक्रिया
1 Sep 2013 - 5:54 pm | कवितानागेश
मस्त!
एक दिवस तर धड आंघोळ करा, व कर्माचे नाही तर तेलाचे तरी दिवे लावा हे सांगायला.... हे भारीये.
1 Sep 2013 - 5:54 pm | टवाळ कार्टा
झकास ;)
2 Sep 2013 - 6:50 am | स्पंदना
4 Sep 2013 - 10:35 am | डॉ सुहास म्हात्रे
=))
4 Sep 2013 - 10:51 am | क्रेझी
=))
शॉल्लीडच विश्लेषण आहे
4 Sep 2013 - 11:12 am | आशु जोग
>> चांगला मोबदला मिळाला तर गरीब बिचारा आपल्या मालकाचा उदो करत कशीतरी
कितीही मिळाले तरी मालकाला चांगले म्हणणारा आय टी वाला अजून पहायला मिळायचाय.
4 Sep 2013 - 11:34 am | खबो जाप
+१११११११११११
6 Sep 2013 - 1:42 pm | ब़जरबट्टू
आणि कितीही चांगले खायला घातले तरी स्वत:हून जास्त काम करणारा बैल ही.... :-)
4 Sep 2013 - 11:35 am | खबो जाप
हान तेच्या मारी ………
4 Sep 2013 - 11:46 am | जे.पी.मॉर्गन
ळैच भारी बघा !
जे.पी.
4 Sep 2013 - 12:27 pm | बॅटमॅन
=)) =)) =))
4 Sep 2013 - 12:27 pm | मदनबाण
जबराट...
अहो, जावे त्याचा वंशा तेव्हा कळे, यांच्या वेदना तुम्हाला कळल्या ना, तुमच्या नुसत्या आसवांनी नद्यांना पूर येईल, शेतकरी असाल तर स्व:ताबद्दल अभिमान वाटेल ते वेगळेच. … धन्य ते जण ज्यांनी भविष्य जाणले तेव्हाच…
खरयं...
जाता जाता :- माझ्या बरोबर अनेकदा गप्पा मारणे माझ्या कंपनीतले गॄहस्थ जेव्हा ब्रेनहॅमरेजने गेले तेव्हा सॉलिड्ड धक्का बसला होता. साला आयटी वाल्यांना साधी पेंशन सुद्धा नाही ! जितके वर्ष नोकरी करुन पैसा जमवता आला तर तो आणि पीएफ बास्स ! पिंक स्लीपची धास्ती तर सदैव सावली सारखा पाठलाग करते ते वेगळे !
4 Sep 2013 - 1:31 pm | सौंदाळा
खुसखुशीत लेख
4 Sep 2013 - 3:47 pm | पिंगू
हाहाहा. पटलं राव. आपण सगळे बैलच.. म्हणजे आयटीवाले हो..
4 Sep 2013 - 7:00 pm | मुक्त विहारि
दंडवत
4 Sep 2013 - 8:42 pm | डॉ सुहास म्हात्रे
भारतीय सणांमागचे (खरे) शास्त्र !!
म्हणजे हे शास्त्र खरे नावाच्या माणसाने बनवलेले आहे होय? तरीच !(काडी टाकून झाली... आता पळा ;) )
4 Sep 2013 - 10:31 pm | ब़जरबट्टू
अहो , काडीचे कसले घेऊन बसलाय, मशालच पेटवली तुम्ही जणू… वा, याला म्हणतात "निरिक्षण", आजच्या आज शिवाजी साटमच्या जागी तुम्हाला शिआयडीचा कारभार द्यावा असे बक्षिसपत्र धाडलेय पोस्टाने, भेटले की पोच द्या नक्की... ;)
(खोटे असलेले) खरे बजरबट्टू
4 Sep 2013 - 9:42 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
अहो, उगाच का हिंदुस्थान एवढा प्रगत देश समजला जातो! या पाश्चात्यांना आत्ता कुठे गेली १०-१५ वर्ष आयटी-फायटी समजायला लागलेलं आहे. भारतीय सण किती जुने आहेत हे पाहिलंत तर आयटी भारतात किती वर्ष आहे हे समजेल.
आमच्या महान देशाच्या महान परंपरेची अशी पाश्चात्य अंगाने ओळख करून दिल्याशिवाय आजकाल मेलं कोणाला महत्त्व समजतच नाही. ब़जरबट्टू तुम्ही थोर आहात, तुम्ही पपू आहात. तुम्ही खरंतर सनातनी प्रभातझेंडा मिरवण्यास पात्र आहात.
4 Sep 2013 - 11:13 pm | आशु जोग
वेलकम टू इंडिया !