म्हणे चोख्याची महारी
भारतातील सर्वांत जास्त अन्याय झालेला समाजाचा वर्ग कोणता? (टारगटपणा नकोय, "नवरे" कोण म्हणाला तिकडे? आणि तेही इकडेतिकडे बघत, तोंडातल्या तोंडात पुटपुटत? गप बसा! हा धागा गंभिर आहे)
अर्थात दलित. त्यांना ना शिक्षणाचा अधिकार, ना आर्थिक सुबत्ता मिळवावयाला वाव, नाही सामाजिक समतेचा वारा आणि नाही ज्या धर्मात त्यांनी जन्म घेतला त्या धर्मातील देवाला बघण्याचीही परवानगी. शेतात राबणारा बैल बरा, त्याला वर्षातून एकदा कां होईना गळ्यात माळा घालून रस्त्याने मिरवत जाता यावयाचे, मोठ्या घरची मालकीण त्याला ओवाळून, पुरणपोळीचा घास भरवावयाची! आणि बैलाचा स्पर्श झाला म्हणून कोणी अंघोळ करत नव्हता. पण दलितांचा या बाबतीत पहिला क्रमांक लागेल कां? मला खात्री नाही. दलित निदान चार वर्णातील एका वर्णाचे होते पण चारही वर्णात त्यांच्या सारखाच एक अतिशोषित, दुर्लक्षित, निराधार, असहाय्य वर्ग होताच (व आजही आहे) ... स्त्रियांचा.
फार पुरातन काळापासून हे चालू आहे. सीता निर्दोश आहे हे माहीत असूनही श्रीरामाने सीतेचा त्याग केला. युधिष्ठिराने द्रौपदी पणाला लावली. बुद्धाने नवप्रसुत बायकोला न सांगता घर सोडले. सतीची प्रथा रुढ केली. ज्याना जाळले नाही त्यांना मुंडन करून घरात जनावराप्रमाणे राबविले. त्यांना शिक्षण नाकारले. त्यांचा संपत्तीमधील हक्क नाकारला. सकाळपासून कामाला जुंपले. अगदी लहान भाऊ-बहीण यांच्यांमध्ये भेदभाव निर्माण केला. तो पुरुष आहे, त्याने काम केले नाही तरी चालेल, तू मुलगी आहेस, तू काम करावयासच पाहिजे असे तिच्यावर बिंबवले. असो. किती सांगणार? मुद्दा हा की या दोन गटांत तरतम ठरवणं कठीणच. मग विचार करा, दलितांमधील स्त्रीयांची गत काय?
समाजात काही विचारवंत असतातच ज्यांना ही चूक कळली. म.फुले, आगरकर, कर्वे, डॉ. अंबेडकर, म.गांधी इ. थोर लोकांनी ही परिस्थिती बदलण्याकरिता जीवापाड प्रयत्न केले. मध्यकाळातही मध्वाचार्य, बसवण्णा, चक्रधर इ.. यांनीही ही रुढी फोडावयाचा प्रयत्न केला. ज्ञानेश्वरांचे या क्षेत्रातले काम उल्लेखनिय आहे. मृदु स्वभावाचे ज्ञानेश्वर बंडखोर नव्हते. चालू चौकट मोडणे त्यांना मान्य नव्हते. आपल्याला विहित कर्मे ही ईश्वराने दिलेली आहेत, ती सोडून न देता कशाप्रकारे करावीत हे त्यांनी सांगितले.आज आपल्याला करावे लागणारे काम,भोगावा लागणारा त्रास, हे पूर्वसंचिताचे फळ आहे यावर सर्वांचा विश्वास होता. ज्ञानेश्वरांनी काय केले, हे काम चांगल्या प्रकारे पण निष्काम बुद्धीने कर, त्यात उच्चनीचपणा नाही, तीच देवाची सेवा, पूजा आहे असे त्यांनी सांगितले
विहित कर्म पांडवा ! आपुला अनन्यु वोलवावा !
आणि हे चि प्रेमसेवा ! सर्वात्मकाची !! १८.९०२
तेया सर्वात्मका ईश्वरा ! स्वकर्मकुसुमाची वीरा !
पूजा केली होये अपारा ! तोखालागी !! १८.९१३
यामुळे काय झाले, काम कमी झाले नाही, त्यातील कष्ट कमी झाले नाहीत, पण मनाला एक उभारी आली. मांगाला मृत ढोरे ओढतांना "मी जगण्याकरिता हे हीन काम करत आहे " अशी खंत न वाटता " ही तर ईश्वराची सेवा आहे, मी त्याची पूजा केल्याने मला त्याचा या जन्मी व पुढील जन्मी फायदा होईल ’ असा आनंद मिळू लागला. ही एक प्रकारची फसवणूकच आहे असे आज तुम्ही म्हणू शकता पण त्या काळी हा एक फार, फार मोठा दिलासा होता. आणि हे ज्ञानेश्वरांसारख्या "महाविष्णूचा अवतार" मानल्या गेलेल्या मान्यवराने सांगितल्यामुळे अल्प काळांत जनी सारखी दासी त्यांना "सखा माझा ज्ञानेश्वर" असे अभिमानाने म्हणू लागली तर कोणत्याही जातीतला त्यांना "माउली माझी" असे सहजपणे मॊठ्याने गर्जू लागला. आता चोख्याला देवळांत जाऊन विठोबाचे दर्शन घेता येत नाही याची खंत वाटेनाशी झाली, नव्हे आता त्याची गरजच उरली नाही.आता विठोबाच त्याच्या झोपडीत आला. त्याच्या हातचे खाऊ लागला. जनीला पाणी भरावयाला,आणि शेण्या गोळा करावयाला एक मदतनीस सखा मिळाला. सावता माळ्याला ’कांदा मुळा भाजी ! अवघी विठाबाई माझी" याचा साक्षात्कार झाला. भक्ती सगळ्या समाजात होतीच. आता हळुहळु ज्ञानही पाझरू लागले. अद्वैत आजही आपणास समजून घेण्यास अवघड वाटते. तेही समोर चालताबोलती उदाहरणे असल्यामुळे असेल म्हणा सोयरेसारखी एक महारीण सहजपणे अभंगात गुंफू लागली. कोण ही सोयरा?
नामदेवांच्या घरातील सर्वजण अभंग रचत. तीच गत चोखा मेळा याच्या महार कुटुंबातील लोकांची. त्याची बायको, मुलगा, बहीण, मेहुणा सगळे अभंग रचू लागले. सोयरा चोख्याची बायको. चोख्याच्या ५००-५५० अभंगांच्या मानाने तिचे अभंग कमी आहेत. पण त्यातील भाव मनमोहक आहेत. आज तिचा एक अभंग आपण पहाणार आहोत. तिला लिहता-वाचता येत नव्हते हे लक्षणीय आहे. तिला ज्ञानेश्वरी वाचता येत नव्हती. कोणी वाचत असेल तेव्हा ऐकणे एवढेच शक्य. तरीही त्या ग्रंथातील सार ती चार ओळीत सांगू शकते ! ज्ञानेश्वरांनी रेड्याच्या मुखी वेद वदविले, भिंत चालवली या चमत्कारांना तुम्ही आम्ही नाकारू शकतो पण निरनिराळ्या खेडेगावातील, निरनिराळ्या व्यवसायातील, जातीजमातीतील, बहुजन समाजातील स्त्री-पुरुषांना काव्य लिहण्यास उद्युक्त करणे हा केवढा चमत्कार ! चला तर सोयराबाईचा अभंग पहा
अवघा रंग एक झाला ! रंगी रंगला श्रीरंग !!१!
मी तूं पण गेले वाया ! पाहता पंढरीच्या राया !!२!!
नाही भेदाचे ते काम ! पळोनी गेले क्रोध काम !!३!!
देही असूनी तू विदेही ! सदा समाधिस्त पाही !!४!!
पाहते पाहणे गेले दुरी ! म्हणे चोख्याची महारी !!५!!
ज्ञानेश्वरीत काय सांगितले आहे ?
(१) सर्व भूतांच्या ठाई एकच परमामा वसतो, अवघे प्राणीमात्र एकाच ब्रह्माचे अंश आहेत.
(२)"अहं", मी म्हणजे माझे हे शरीर, हा भाव परमात्म्याची ओळख झाली की सुटतो.
(३) एका दुसर्यातील दुराव्यामुळे षड रिपूंना वाव मिळतो, पण जर तुम्हाला कळले की त्याच्यात व तुमच्यात एकरूपता आहे तर लोभ. क्रोध, मत्सर आदि निर्माणच होणार नाहीत.
(४) एकदा आत्म्याची ओळख झाली की नित्यकर्मे करत असतांनाही तुमचे परमात्म्याशी असलेले संधान तुटत नाही.
समाधीत मिळणारी शांती, समाधान तुम्हाला सर्व काळ मिळते.
(५) या नंतर त्रिपुटी,दृष्य-दर्शन-द्रष्टा, ही नाहिशी होते.
आणि हेच तर सोयराबाई अभंगात सांगत आहे. ही बहुरंगी दुनिया एकच आहे व श्रीरंग या आपल्या चित्विलासात रंगला आहे. विठोबाला पहिले की भेदभाव मिटतात. अरे बाबा, या नश्वर देहातील अनश्वर आत्मा तूच आहेस व सदासर्वकाळ समाधीसुख मिळवणे तुला शक्य आहे. चोख्याची महारी सांगत आहे "सांडली त्रिपुटी" (दीप उजळला घटी)
किशोरीताईंनी गायलेला अभंग येथे ऐका.
http://music.ovi.com/in/en/pc/Product/Kishori-Amonkar/Avagha-Rang-Ek-Jha...
शरद
प्रतिक्रिया
12 Jul 2013 - 11:46 am | पैसा
हा अभंग सोयराचा आहे हे माहित नव्हतं. केवळ श्रवणभक्तीच्या जोरावर एक अशिक्षित बाई अशी रचना करू शकते ही चमत्कारच म्हटला पाहिजे. पण तिच्या रचनांना आयुष्यातले कठोर अनुभव आधार देत असणार.
12 Jul 2013 - 12:47 pm | मैत्र
अतिशय सुंदर लेख..
इतका अप्रतिम अभंग चोखा मेळा यांच्या सोयराबाईने लिहिला होता हे माहीत नव्हते..
किशोरीताईंनी तर अजरामर केला आहे ... तुनळीवरचा दुवा
हे पटले नाही. ही फसवणूक कशी.. हा सर्वसामान्यांना समजेल अशा पद्धतीने सत्यापर्यंत नेण्याचा सोपा मार्ग नाही का?
जर ही फसवणूक असेल तर विहीत कर्म मनापासून करणे यात ईश्वर नाही असे विधान करावे लागेल.
माझा शास्त्रांचा अभ्यास नाही पण हाच कर्मयोग नाही का?
12 Jul 2013 - 2:05 pm | सुधीर
सोयरा बाईंचा अभंग आवडला.
12 Jul 2013 - 2:51 pm | कवितानागेश
:)छान.
यात पाहते पाहणे गेले दुरी या ओळींमध्ये खूप खोल अर्थ आहे.
12 Jul 2013 - 2:59 pm | प्यारे१
अप्रतिम! अभंग लाडका आहेच.
13 Jul 2013 - 10:08 am | सस्नेह
भक्ती आणि अध्यात्मानुभूती ही काही कुणा एका वर्गाची मिरासदारी नव्हे हे सिद्ध करणारी अभिव्यक्ती.
12 Jul 2013 - 4:08 pm | संजय क्षीरसागर
(आषयाशी सहमत नसलो तरीही)
12 Jul 2013 - 4:16 pm | पिलीयन रायडर
किती सुरेख..
सगळं वाचत असताना सोयराचे जीवन उभे राहीले समोर.. आणि मग खाली जो अभंग वाचला तो पाहुन तर थक्क झाले. इतका सुरेख अभंग अडाणी बाईने लिहीलाय? तिला अडाणी तरी कसे म्हणावे?
किशोरी ताईंच्या आवाजात अनंतवेळा ऐकलाय.. पण आता त्यातला अर्थ जास्त भावतोय...
12 Jul 2013 - 5:18 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सर, नेहमीप्रमाणेच हाही लेख आवडला. पण सोयराबाईबद्दल अजून लिहायला पाहिजे होतं. सोयरा एक स्त्री आणि जात महार आणि समाजाने भेदांचा उच्चनिच्चतेचा कळस गाठलेला असतांनाही तीला जे वाटतं ते अभंगातून उमटलेलेचं असणार. सर, अजून लिहा....!
संत ज्ञानेश्वरांची भूमिकेबद्दलचे मत तर पटणारेच आहे. विठोबाच्या निमित्तानं सर्व लहान थोर संत एकत्र आले पण काही भेद राहीलेच होते असे दिसते. अर्थात सामाजिक परिस्थिती कठीण असल्यामुळे त्यात काही नवं असं नव्हतं. चोखा मेळ्याच्या अभंगात तो म्हणतो-
हीन याती माझी देवा । कैसी घडे तुझी सेवा ॥१॥
मज दूर दूर हो म्हणती । तुज भेटूं कवण्या रीती ॥२॥
(खापरे वरुन साभार)
अर्थात पुढे...याच्याही पलिकडे जाऊन ते म्हणतात-
''कोण तो सोवळा कोण तो ओवळा, दोहींच्या वेगळा विठू माझा''
समाज जरी भेद पाळत असला तरी आपल्या मनाशी मात्र विठू मात्र त्याहून वेगळा आहे, हे म्हणनं मला आवडते. बाकी, सोयराचा अभंग वाचून आत चाललेली धुसमुस अभंगातून बाहेर आलेली दिसते. चोखा आणि सोयराच्या अभंगावर अजून वाचायला आवडेलच.
सर, तपशिलवार लिहाच सर....!
-दिलीप बिरुटे
(शरदसरांचा जालावरचा विद्यार्थी)
12 Jul 2013 - 9:16 pm | धमाल मुलगा
सुंदरच लिहिताय शरदकाका. येऊंद्या!
13 Jul 2013 - 3:57 am | रामपुरी
असंख्य वेळा ऐकलेला हा अभंग कुणाचा आहे माहीतच नव्हतं आजवर.
13 Jul 2013 - 7:44 am | अर्धवटराव
अदृष्य हातांनी सर्वांचे पोट भरवणारी माऊली. एकदा तो अमृत घास घेतला कि हृदयस्थ सरस्वतीच असे काव्य प्रसवते. चोख्याची महारी देखील त्याला कसा अपवाद असणार.
सुंदर रसग्रहण. चिखलात उमललेलं हे पुष्प त्याच्या अत्यंत विषम परिस्थितीची जाणिव करुन दिल्याने अधिकच खुललं आहे.
अर्धवटराव
13 Jul 2013 - 9:39 am | इन्दुसुता
नेहमी प्रमाणेच लेख आवडला.
दलित निदान चार वर्णातील एका वर्णाचे होते पण चारही वर्णात त्यांच्या सारखाच एक अतिशोषित, दुर्लक्षित, निराधार, असहाय्य वर्ग होताच (व आजही आहे) ... स्त्रियांचा.
पण निरनिराळ्या खेडेगावातील, निरनिराळ्या व्यवसायातील, जातीजमातीतील, बहुजन समाजातील स्त्री-पुरुषांना काव्य लिहण्यास उद्युक्त करणे हा केवढा चमत्कार !
दोन्हींशी सहमत.
13 Jul 2013 - 11:40 am | स्पंदना
अभंग सोयराबाईचा असलेला माहित होता, पण सोयरा कोण हे नव्हत माहीत.
धन्यवाद सर. अतिशय आवडता अभंग अन अतिशय परिपूर्ण माहीती.
13 Jul 2013 - 3:01 pm | अभ्या..
सुरेख लिहितायत तुम्ही शरदबाबू.
धन्यवाद
13 Jul 2013 - 3:28 pm | भावना कल्लोळ
खूप सुंदर लिहिले आहे!!!!
14 Jul 2013 - 1:31 am | पाषाणभेद
फारच छान लेख. नविनच ओळख समजली.
14 Jul 2013 - 9:44 am | प्रकाश घाटपांडे
>>ही तर ईश्वराची सेवा आहे, मी त्याची पूजा केल्याने मला त्याचा या जन्मी व पुढील जन्मी फायदा होईल ’ असा आनंद मिळू लागला. ही एक प्रकारची फसवणूकच आहे असे आज तुम्ही म्हणू शकता पण त्या काळी हा एक फार, फार मोठा दिलासा होता.<<
खर आहे. पण यालाच काही विद्रोही / बंडखोर ब्राह्नणी कावा असे म्हणतात.