चौथी सीट
.
नकोच ती सीट चौथी,
हट जाऊ दे..
दाराशी उभे राहूनी,
वारा खाऊ दे!
पाठीचा कणा वाकवूनी,
तोल साधणे..
सरकेल का कुणी म्हणूनी,
वळून पाहणे!
पायात पाय गुंतवूनी,
आक्रसून राहणे..
अवघडलेल्या हातांनी,
आधार शोधणे!
नकोच ती डब्यातली,
घुसमट.. धुसफुसणे..
दाराशी उभे राहूनी
वारा खाऊ दे!
असेल ऊन कधी..
अंग जाळणारे!
झुम्मड पावसाचे कधी..
बसतील तडाखे!
टिपून घेतील भिजल्यावरी,
किरण कोवळे!
उन्हात सुखावतील कधी,
भुरभूर वारे!
मागे मागे धावणारी..
दिसतील स्थानके,
फलाटावर दिसतील थांबूनी..
जिवंत पुतळे!
रोज रोज पटरी वरूनी..
गरगर फिरणारे,
दिसेल चेहर्या चेहर्यावरी,
जीवन जाळे!
दिसतील एकटे झुंडींनी,
गर्दीत हरवलेले..
सापडतील गर्दीतले कधी,
क्षण एकटे!
क्षणात येईल कळूनी,
क्षणातले जगणे...
ऊन, पाऊस, वाऱ्याशी,
सम साधणे!
नकोच ती सीट चौथी,
हट जाऊ दे..
दाराशी उभे राहूनी,
वारा खाऊ दे!
=====================
स्वाती फडणीस............... ३०-०६-२००८
प्रतिक्रिया
12 Jul 2008 - 12:32 pm | विसोबा खेचर
मस्त कविता..अभिनंदन!
दाराशी उभं राहून वारा खाण्याची मौज वेगळीच! :)
आपला,
(मुंबईकर चाकरमानी) तात्या.
12 Jul 2008 - 2:05 pm | स्वाती फडणीस
:)
12 Jul 2008 - 2:53 pm | साती
छान आहे कविता.
साती
12 Jul 2008 - 2:55 pm | बेसनलाडू
मागे मागे धावणारी..
दिसतील स्थानके,
फलाटावर दिसतील थांबूनी..
जिवंत पुतळे!
रोज रोज पटरी वरूनी..
गरगर फिरणारे,
दिसेल चेहर्या चेहर्यावरी,
जीवन जाळे!
हे छान. आवडले.
(मुंबईकर)बेसनलाडू
12 Jul 2008 - 4:54 pm | अविनाश ओगले
मुंबईकरांनी एंजॉय केली असणार... नॉन 'लोकल' गाववाल्यांसाठी जरा चौथ्या सीटची संकल्पना स्पष्ट करा ना...
12 Jul 2008 - 6:17 pm | धनंजय
चवथ्या सीटच्या संदर्भाने चक्रावलो होतो... आता आठवण येउन अर्थ कळला.
छानच आहे कविता.
ठाण्याला शाळेतल्या सुटीत मी जात असे, तेव्हा लोकलचे आकर्षणही वाटे, गर्दीची भीतीही वाटे. मुंबईत न राहाता मध्य रेल्वेची सर्व उपनगरीय स्थानके पाठ होती, कुठल्या स्थानकाचा फलट उजव्या आणि कुठल्या स्थानकाचा फलाट डावीकडे हे सगळे पाठ असण्याइतके चक्रम आकर्षण होते.
12 Jul 2008 - 6:43 pm | ऋषिकेश
वा स्वातीताई,
मस्त आहे कविता.. आवडली :)
मागे मागे धावणारी..
दिसतील स्थानके,
फलाटावर दिसतील थांबूनी..
जिवंत पुतळे!
दिसतील एकटे झुंडींनी,
गर्दीत हरवलेले..
सापडतील गर्दीतले कधी,
क्षण एकटे!
हे विषेश वाटले
-('मिसळ'लेला) ऋषिकेश
12 Jul 2008 - 6:50 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
कविता आवडली !!!
अजून येऊ द्या अशाच सुंदर कविता.
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
12 Jul 2008 - 7:08 pm | स्वाती फडणीस
[:)]
12 Jul 2008 - 7:47 pm | श्रीकृष्ण सामंत
स्वातीताई,
सुंदर कविता लिहिलीत.सुरवाती पासून शेवट पर्यंत लिंक ठेवलेली पाहून मला मी १८ वर्ष मागे घेऊन गेलो.कवितेचा मुख्य गाभा तोच पण मुंबईची वस्ति वाढल्याने ,
"ऊन, पाऊस, वाऱ्याशी,
सम साधणे!"
कसं काय जमत असावं आता लोकांना ह्याच कुतुहल वाटतं.कादाचित माझ्या वयोमानामुळे तसं वाटत असावं.
मनातला आशय समर्पकपणे विशद करायला कविते सारखं दुसरं साधन नाही हेच खरं.
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com
13 Jul 2008 - 7:56 pm | स्वाती फडणीस
:)मनापासून आभार