जॉली एल एल बी

जयवी's picture
जयवी in जनातलं, मनातलं
19 Mar 2013 - 8:42 am

काल सकाळी ह्या सिनेमाबद्दल बोलणं झालं आणि सिनेमा बघायचाच असं ठरलं. तसा आज सिनेमा बघूनही झाला. आवडला !!

एक कलाकृती म्ह्णून सिनेमा आवडलाच ! कथानक काही वेगळं नव्हतं खरं तर. नेहेमीचेच गरीबांवरचे अत्याचार आणि कायदा आंधळा असल्याचा फायदा घेणारे धूर्त वकील आणि त्याविरुद्ध लढा देणारा नायक !! सोबत एक छान नायिका, साथ देणारे त्याचे मित्र आणि शेवटी त्याला मिळणारा विजय. अगदी नेहेमीच्याच वळणाने जाणारी स्टोरी. पण तरीही काहीतरी वेगळं होतं !!

मला वाटतं, सिनेमा ज्या सहजतेने पुढे सरकत जातो त्यामुळे कथेत पुढे काय होणार हे आधीच समजत असूनही आपण पुढे काय होणार ह्याची वाट बघतो. कुठलाही कृत्रिम प्रयत्न किंवा कुठलेही स्टंट्स, कुठलेही चित्रविचित्र प्रसंग न दाखवता नेहेमी आपल्या आजूबाजूला घडणारे प्रसंग दाखवल्यामुळे चित्रपटातल्या घटनांशी आपण एकरुप होऊ शकतो. विनोदी झालर असूनसुद्धा काही प्रसंग अंगावर येतात. समाजातल्या जळजळीत वास्तवाची जाणीव झाल्यावर अस्वस्थ व्हायला होतं.

ह्या सिनेमात दाखवलेलं कोर्टातलं वातावरण हे ह्या आधी मी कुठल्याच सिनेमात बघितलं नव्हतं. एकीकडे काही वकीलाचं बिचारेपण, अगतिकता तर दुसरीकडे यशस्वी वकीलांची मुजोरी, arrogance !! हा विरोधाभास फार सुरेख दाखवलाय. परीट घडीचा चेहेरा असलेले जजच आपण आतापर्यंत सिनेमात बघितले असल्यामुळे सौरभ शुक्लाचा थोडा मिश्कील, थोडा गबाळग्रंथी जज बघतांना मजा आली.

सौरभ शुक्ला ने केलेला जज मात्र काबिल ए तारीफ !! त्याची शरीरयष्टीच अर्ध काम करुन जाते. एक अतिशय महत्वाची भूमिका त्याच्या वाट्याला आलीये आणि त्याने त्याचं सोनं केलंय.

अर्शद वारसी एक चांगला अभिनेता आहे. फार भूमिका नाही मिळाल्या त्याला पण ज्या काही भूमिका त्याला मिळाल्या त्यात त्याने त्याची छाप नक्कीच सोडली. ह्यातही त्याने सुरेख काम केलंय. तो नायक आहे पण सुपर हिरो नाही. एक सर्वसामान्य वकील, ज्याची वकीली अजिबात चालत नाही. पैशासाठी तो पोलीसांनी पकडलेल्या दहशतवाद्याची भूमिका सुद्धा करायला तयार होतो. प्रसिद्ध होण्यासाठी काहीतरी करायचं म्हणून तो एक बंद झालेली केस पुन्हा उघडतो आणि नंतर विरुद्ध पक्षाच्या प्रसिद्ध वकीलाने दिलेली लाच स्वीकारुन गप्प बसतो. जेव्हा त्याची मैत्रिण, साथीदार त्याला दोष देऊन त्याचे डोळे उघडतात...... तेव्हा तो त्या प्रसिध्द वकीलाला आव्हान देऊन त्याच्यापुढे दंड ठोकून उभा राहतो.

सगळ्यात जास्त भाव खाऊन जातो तो बमन इरानी. एक जबरदस्त ताकदीचा कलाकार !! माझा अतिशय आवडता अभिनेता !! प्रत्येक भूमिकेत तो अगदी खोलवर शिरतो. मग त्यात अगदी कणभर सुध्दा बमन इरानी उरत नाही. तो भूमिका जगतो. ह्या चित्रपटात तो एका अतिशय यशस्वी, Arrogant, कोर्टाला स्वत:चीच मालमत्ता समजणारा, अतिशय shrewd वकीलाची भूमिका साकारतो. त्याच्या हालचाली, त्याच्या चेहेर्‍यावर कायम असणारे बेदरकार आणि बेरकी भाव, मीच सगळ्यात हुशार आणि बाकी सगळे एकजात मूर्ख ही प्रौढी हे सगळं इतकं सहज दाखवलंय ना की आपण मनोमन त्याला दाद देऊन जातो. पुन्हा एकदा बमन इरानीला एक कडक सॅल्यूट !!

काही सीन्स अप्रतिम आहेत. जेव्हा अर्शद वारसी बमन इरानीच्या ऑफीस मधे बॅग ठेवून निघुन जातो. बमन ती बॅग उघडून बघतो तेव्हा त्यातून उंदीर निघतात. ते बघून बमनला बसलेला शॉक !! आता तुझा डोलारा मी पोखरणार ही अर्शद वारसीची थंड धमकी !! शेवटच्या सीन मधे सौरभ शुक्लाने बमनची केलेली कान उघाडणी.....केवळ लाजवाब !! मजा आ गया !!

आपल्या रमेश देव आणि मोहन आगाशेंचं दर्शन सुद्धा सुखावह होतं :) रमेश देवांचं ह्या वयातही ताठ चालणं बघून खूप छान वाटतं. दोघांचेही फार कमी संवाद आहेत पण एकदम जबरी !!

गाणी खरं तर नसती तरी चाललं असतं. फक्त एक ते दारु पिण्याचं गाणं सोडून बाकी १-२ गाणीच आहेत जी सिनेमाला अजिबात बाधा आणत नाहीत. उलट साजेशी साथ देतात.

एक चांगला सिनेमा बघितल्याचं समाधान मिळतं पण हे समाजातलं वास्तव आहे हे जेव्हा जाणवतं तेव्हा अंगावर काटा येतो. कायदा आणि पोलीस हे सामान्य लोकांसाठी कधी काम करणार.... ह्या प्रश्नाने जीव कासाविस होतो. अगदीच रामराज्याची कोणीच अपेक्षा करत नाही पण पोलीस आणि कायदे ह्यांचा सामान्य माणसाला थोडा तरी आधार वाटायला हवा.

मनातल्या निद्रिस्त जाणीवा जागवणारा हा चित्रपट मला तरी आवडला !!

समाजचित्रपटआस्वादविरंगुळा

प्रतिक्रिया

तुमचा अभिषेक's picture

19 Mar 2013 - 9:22 am | तुमचा अभिषेक

या चित्रपटाबद्दल लिहिलेत हे छान केलेत.. बघायची इच्छा होती.. फक्त आधी चारचौघांकडून कसा आहे याचे परीक्षण हवे होते.. सकरात्मक प्रतिसाद आले तर या विकांताला नक्की.. :)

मदनबाण's picture

19 Mar 2013 - 9:49 am | मदनबाण

चित्रपट पहायला हवा... :)

मृत्युन्जय's picture

19 Mar 2013 - 10:45 am | मृत्युन्जय

जॉली एल एल बी हा बघितल्यास हरकत नाही न बघितल्यासही हरकत नाही वर्गातला चित्रपट आहे.

अर्शद वारसी आणि बोमन इराणींनी कामे चांगली केलेली आहेत.पण सगळ्यात भाव खाउन जातो तो सौरभ शुक्ला. केवळ त्याच्यासाठी हा चित्रपट एकदा बघायला हरकत नाही. मोठे वकील आणि सेशन कॉर्टाचे जज यांच्यातले नाते कसे असते हे बघायचे असेल तर हा चित्रपट नक्की बघावा.

गरम तव्यावर पोळी भाजायला हरकत नसणारा पण तरीही न्यायाची चाड असणारा जज म्हणुन सौरभ शुक्ला निव्वळ लाजवाब. ये मेरा कॉर्ट हे तुम्हाला क्लब नही असे बोमन इराणीला ठणकावुन सांगणारा आणि दुसर्‍याच क्षणी एका मोठ्या वकिलाशी जास्त पंगा घेणे योग्य नाही हे लक्षात घेउन त्याच्यासाठीच चहा मागवणारा (आणि हे करताना अर्शद वारसीसाठी साधे पाणीही न मागवणारा) जज अतिशय सुयोग्य रंगवला आहे.

मोठे वकील कधीकधी जजची लाज काढतात हे काही उदाहरणांवौन माहिती आहे. बोमन इराणी असे करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा सौरभ शुक्ला स्वतःच्या पदाची जाण असल्याने जे सडेतोड उत्तर देतो त्याला तोड नाही.

जयवी's picture

19 Mar 2013 - 11:18 am | जयवी

अगदी अगदी..... !!
सौरभ शुक्ला बद्दल मनापासून अनुमोदन :)

सानिकास्वप्निल's picture

19 Mar 2013 - 1:47 pm | सानिकास्वप्निल

हा चित्रपट बघायचा आहे :)

जेव्हा अर्शद वारसीला काही गुंड मारहाण करतात, तेव्हा डाव्या गालावर पट्टी दाखवलीयं, पण पुढच्या सीनमध्ये पट्टी उजव्या गालावर येते............ हा गोंधळ सोडला तर सिनेमा एकदम मस्त, एकदा तरी पाहण्यासारखा...... !!