एक भारुड

अनिवासि's picture
अनिवासि in जनातलं, मनातलं
26 Feb 2013 - 4:18 pm

नुकतेच सन्त एकनाथाचे 'भवानीमाते रोडगा वाहीन तुला' हे भारुड वाचनात आले. हे खुप जुने आहे ह्याची कल्पना आहे. प्रथम वाचनानतर विनोद म्हणुन खुप हसलो पण नन्तर एक सन्त असे का लिहितील असा प्रश्न पडला. एक्-दोन जाणत्या लोकाना विचारले असता ' हे प्रतीक आहे' असे सान्गीतले पण कशाचे प्रतीक हे मात्र सान्गु शकले नाहीत. शेवटी मिपा वर विचारा असा सल्ला मिळाला. ह्यावर पुर्वी चर्चा झाली असेल तर क्षमस्व- link - द्या, नाहीतर जाणत्यानी मदत करावी. मुळ कवीता मला एका व्यनीतुन आली व ती इथे डकवीण्याचा प्रयत्न केला पण जमले नाही- जसा अजुन अनुस्वार पण जमत नाही.
प्रतिसादाची वाट पहात आहे

वावरप्रकटन

प्रतिक्रिया

राही's picture

26 Feb 2013 - 4:52 pm | राही

"हे भवानी आई,मला या सर्व मायापाशांतून सोडव. मी तुला एक रोडगा वाहीन.(रोडगा म्हणजे जाड रोटी,रोट.)सासू,नणंद,पती,इतर आप्तस्वकीय ही नाती क्षणभंगुर आहेत.एकदा तुझ्याशी समरस झाल्यावर या नात्यांची काय तमा?"

एकनाथ व अन्य संतांना टी पी करण्याचा हक्कच नाही का? केला असेल थोडा टी पी, त्यातही आपण गर्भीतार्थ शोधणार की काय ;)

स्पंदना's picture

27 Feb 2013 - 4:04 am | स्पंदना

सत्वर पाव ग मला भवानी आई
रोडगा वाहीन तुला

सासरा माझा गावी गेला
तिकडेच खपवी त्याला
भवानी आई, रोडगा वाहीन तुला

सासू माझी जाच करिते
लवकर न्येई ग तिला
भवानी आई, रोडगा वाहीन तुला

जाऊ माझी फडाफडा बोलते
बोडकी कर ग तिला
भवानी आई, रोडगा वाहीन तुला

नणंदेचं कार्टं किरकिर करतं
खरूज येऊ दे त्याला
भवानी आई, रोडगा वाहीन तुला

दादला मारून आहुति देईन
मोकळी कर ग मला
भवानी आई, रोडगा वाहीन तुला

एका जनार्दनी सगळेच जाऊ दे
एकटीच राहू दे मला
भवानी आई, रोडगा वाहीन तुला

ई-पूर्वाई's picture

27 Feb 2013 - 11:33 am | ई-पूर्वाई

मी एकदा असे वाचले होते की यातून एकनाथ महाराजांना षड्रिपू अभिप्रेत आहेत. पण कुठल्या रिपु चे कोण प्रतिक आहे हे मात्र मला ही समजलेले नाही.

अनिवासि's picture

28 Feb 2013 - 1:18 am | अनिवासि

प्रतिसाद देणार्या सर्वान्चे आभार.

शुचि
कोणीहि TP करण्यास माझा काहीच विरोध नाही. मी पण प्रथम हे भारुड विनोद म्हणुनच वाचले अणि हसलो. नन्तर कोणीतरि ह्यात मोठा गर्भीतार्थ आहे- प्रतिके आहेत असा किडा सोडला आणि म्हणुन हा धागा! मी तर नेहमीच चान्गल्या TP ची वाट पहात असतो.

अपर्णा

मुळ भारुड दिल्याबद्दल धन्यवाद. ज्यानी वाचले नसेल त्याना उपयोग होइल अणि कदाचीत आणखी प्रतिसाद येतिल.

राहि

प्रतिसादाबद्दल धन्यवाद. आयुष्याच्या क्षणभन्गुर्तेबद्दल आपल्याकडे बरेच काही लिहले आहे. यत्कदाचीत तो आपल्या
धर्माचा,तत्वज्ञानाचा गाभाच आहे असे म्हट्ले तरी चालेल. पण स्वतःच्या सुटकेकरता इतर सर्वाना दु:ख दे अशी प्रार्थना बरोबर वाटत नाही.

इ-पुर्वाइ
अणखी काही माहिती मिळाल्यास जरुर लिहावी.

स्वतःच्या सुटकेकरता इतर सर्वाना दु:ख दे अशी प्रार्थना बरोबर वाटत नाही.

मला हे स्वतःच्या सुटकेकरता आहे असे वाटत नाही, तर ज्यांनी मला दु:ख दिले त्यांना दु:ख दे असे मागणे असावे असे वाटते.
अर्थात हा सामान्य, संसारी मनानी काढलेला अर्थ. याचा पारमार्थिक अर्थ कदाचित वेगळा असेल.

प्यारे१'s picture

28 Feb 2013 - 3:29 pm | प्यारे१

पैसातैने दिलेला अर्थ बरोबर आहे.

अर्थातच एकनाथ महाराजांनी रचलेली भारुडे अत्यंत विनोदी नि मार्मिक शैलीत, सोप्या शब्दात परमार्थ सांगतात!

विकास's picture

28 Feb 2013 - 2:14 am | विकास

या संदर्भात काहीप्रमाणात आधी उपचर्चा झाली होती... ... वरच्या प्रतिसादांमध्ये सांगितलेला षड्रीपूंचा अर्थ पण काहीसा पटतो. पण मला वाटलेला अर्थ काहीसा वेगळा आहे:

एकनाथ हे समाजात राहून समाजसुधारणा करत होते. त्याच संदर्भात, त्यांनी जनसामान्यांना समजेल करमणूक होईल अशा पद्धतीने भारूड तयार करून लोकशिक्षणाचा प्रयत्न देखील केला. सांस-बहूच्या नेहमीच्या कटकटींनी संसारात कंटाळलेल्या गृहीणीचे रुपक घेऊन नवस वगैरेंची त्यांनी एकीकडे खिल्ली उडवली आहे. त्याच बरोबर कटकट होते म्हणून प्रत्येकाचेच तळपट करणारीस शेवटी "..एकटीच राहू दे मला..." अशी अवस्था येते, असे त्यांना कुठेतरी सांगायचे असावे असे वाटते.

त्यांचे अजून एक भारूड...

भूत जबर मोठे ग बाई । झाली झडपड करु गत काई ॥१॥
सूप चाटूचे केले देवऋषी । या भूताने धरिली केशी ॥२॥
लिंबू नारळ कोंबडा उतारा । त्या भूताने धरिला थारा ॥३॥
भूत लागले नारदाला । साठ पोरे झाली त्याला ॥४॥
ऊत लागले ध्रूवबाळाला । उभा अरण्यात ठेला ॥५॥
एकाजनार्दनी भूत । सर्वांठायी सदोदित ॥६॥

अनिवासि's picture

28 Feb 2013 - 5:12 am | अनिवासि

विकास
प्रतिसादाबद्दल धन्यवाद. जुन्या धाग्याची link फारच महत्वाची आहे. माझ्या बर्याच प्रश्नान्ची उत्तरे मिळाली पण त्याच बरोबर नवे प्रश्नही सुरु झालेत. पण निदान विचाराला चालना मिळत आहे. चर्च्या चालु राहील हे अपेक्षा.

पैसा's picture

28 Feb 2013 - 10:24 am | पैसा

लोकसत्ताच्या http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id...

या लिंकवर डॉ. रजनी जोशी यांनी पुढीलप्रमाणे अर्थ दिलेला आढळला.

नाथांनी परमार्थपर विनोदी भारूड रचले आहे. ते रोडग्यावरचे रूपक ! ही विनोदी भूमिका नाथांच्या बहुरुपीपणाची साक्ष देणारी आहे.

सासूरवासाने गांजलेली एक सून भवानीला रोडगा वाहण्याचा नवस करीत आहे, असा भारुडाचा विषय आहे.

‘सत्वर पाव गं मला । भवानी आई रोडगा वाहिन तुला ।।
सासरा माझा गावी गेला । तिकडच खपवी त्याला ।।
सासू माझी फार गांजिते । मरिआई येऊ दे तिला ।।
जाऊ माझी फडफड बोलती । बोडकी कर गं तिला ।।
नणंदेचे पोर किरकिर करते । खरूज येऊ दे त्याला ।।
दादला मारुनि आहुती देईन । मोकळी कर गं मला ।।
एका जनार्दनी सगळेच जाऊ दे । एकटी राहू दे मला ।।

ज्या काळात स्त्रियांना सासरी असह्य़ जाच होत असे, त्या काळात नाथाचे हे गीत ऐकताना ‘सून’ या भूमिकेचा नाथांनी मनोरंजक पद्धतीने विचार केला आहे. दादल्यासकट सर्वाना दूर सारू पाहणारी नाथांची ही सून साधीसुधी नाही. जशी दिसते तशी नाही. तिचे मूळ आध्यात्मिक रूप नाथांनी येथे वर्णिले आहे.

इथली सून म्हणजे ‘बुद्धी’ असून, ती चिच्छक्तीची प्रार्थना करीत आहे. ‘प्रपंच’ हे सासर असून ‘हरिपद’ हे माहेर आहे. ‘अहंकार’ हा सासरा आहे. अन ‘कल्पना’ ही सासू आहे. ‘इच्छा’, ‘निंदा’ या जावा असून, ‘काम’ हा दादाला व ‘क्रोध’ हा दीर आहे. ‘ममता’ ही नणंद असून ‘दु:ख’ हे तिचे पोर आहे. सुनेचा नवस ऐकून भावनिक प्रार्थना करावी वाटते. भवानि आई, सत्वर पाव गं तिला

दादला नको ग बाई हेही असेच एक भारूड. वरवर जाणवणारा अर्थ हा त्या काळच्या मानाने विपरीतच.नाथाघरची उलटी खूण म्हणतात ती अशी. नवरा नको,दीर नणंदा नकोत,एका ईश्वराखेरीज इतर कुणाचेही स्वामित्व नको.हे सर्व मायापाश,हा भवताप असह्य झाला आहे, यातून मला सोडव.'एका जनार्दनी समरस झाले', पण तरीही,'तो रस येथे नाही' सरूपता आहे, पण सायुज्यता पाहिजे.येथे नाथांनी आपल्या मनातली (ईश्वरभेटीसाठीची) तळमळ व्यक्त केली आहे. नवर्‍यालादेखील स्वामी न मानणे हे थोडेसे मीरेच्या मधुराभक्तीसारखे वाटते. 'मेरे तो गिरिधर गोपाल,दूसरो न कोय' ईश्वराला प्रियकर मानून त्याच्याशी एकरूपतेची आस धरणे हा सूफी प्रभावही असू शकेल. चाँद बोधले हे एकनाथांचे परात्पर गुरू होते.
अवांतर- येथे भा.रा.तांब्यांच्या 'कळ पळभरमात्र, खरे घर ते' या पंक्तीची आठवण येते. पण थोडा फरक आहे. तांब्यांची नववधू माहेरी रमलीय,माहेर सोडताना तिचा गळा दाटतोय. नाथांचे तसे नाही. ते या भवसागरात मनोमन रमलेलेच नाहीत. शेवटी तांबे हे कितीही महान असले तरी एक कवी आणि एकनाथ हे साक्षात्कारी पुरुष, हा फरक आहेच.