आजतागायत मानवप्राणी जे काही साध्य करू शकलाय ते त्याच्या 'कुतुहल' या गुणामुळेच, असं अनेक विचारवंत म्हणतात. पण माझा मात्र यावर काडी इतकाही विश्वास नाही. खरंतर माझा 'विचारवंत' या जातीवरच विश्वास नाही. मुळात डोक्यावरचं जंगल अन दाढीचे खुंट अस्ताव्यस्त वाढवून लोकं विचारवंत होतातच कशाला?? हा प्रश्न मला नेहमी पडतो.हे असले अवतार करून लोकांची टरकवण्यापेक्षा स्वत:च्या डोक्याला अधून मधून 'कंगवा' दाखवून ते 'विंचारवंत' का होत नाहीत ? हे माझं आपलं एक कुतूहल आहे. असो... कोणाच्याही डोक्यापर्यंत पोहचण्याचा हक्क आपल्याला नसल्यामुळे आय रेस्ट माय 'केस'!!: :)
तर मला म्हणायचय काय, की कुतुहलापोटी केलेल्या कुठल्याही कामाचा चांगला परिणाम होऊ शकतो ही गोष्ट तद्दन खोटी आहे असा माझा दावा आहे.
कित्ती ही नाही म्हटलं तरी ऐन वेळी माझं भाबडं मन त्या कजाग कुतूहलाच्या कचाट्यात सापडतच बघा.आता परवाचीच गोष्ट घ्या, "तुम्ही स्वतः हसरे, प्रेमळ, आणि सकारात्मक झालात कि समोरचाही आपोआप तसा होतो" असं मी कुठल्याशा अध्यात्मिक कार्यक्रमात ऐकलं होतं. आता ते खरच तसं होत असेल का याच कुतूहल मला लागून राहील होतं.मानगुटीवर येउन बसलेल्या सकारात्म्कते च्या कुतूहलाला शमवण्यासाठी, चिडून अमाप खळखळ करणाऱ्या म्यानेजरणी कडे मी शांत मंद हसत पाहून बघितलं.पण त्याच्या बदल्यात मिळालं काय ?? तर , " आधी चुका करता आणि वर निर्लज्जपणे दात काढता" ही दात !! हे आप्लं दाद!! आता या मेलीलाच हसरी बनवण्यासाठी केलं न मी हे? पण तिने त्याची भलतीच पोचपावती दिलीन.. तर असा हा सगळा माझा खटाटोप वाया गेला असला तरी एक गोष्ट मात्र मला पक्की कळलिये , की 'हे अध्यात्म वगैरे माणसांवर परिणाम करतात. "हिडींबा राक्षसणिवर" नाही!!.
या कुतूहलाविषयी माझ्या आईच हि तितकसं चांगलं मत नसावं बहुतेक. कारण लहानपणापासून च्या माझ्या सर्व कुतुहलांना तिने 'आगाऊपणा' हे एकमेव संबोधन बहाल केलय!. फक्त आईचंच नाही सरकारी कॉलनीत राहणाऱ्या आम्हा मुलांबद्दल गावातल्या एकुनेक माणसाचं हेच मत होतं. "कुतूहल ही विज्ञानाची जननी आहे" हा सुविचार भल्या मोठ्या अक्षरात आमच्या शाळेच्या प्रयोगशाळेवर लिहिला होता. पण त्याचा अर्थ आमच्या पालकांच्या (आणि शिक्षकांच्या ही) टकुर्यात काही शिरत नव्हता. आणि हेच आम्हा सर्व निरागस, अजाण बालकांचं दुखः होतं. त्यामुळे हा कुतुहलचं काही 'फळ' मिळो ना मिळो पण अंगावर 'वळ' मात्र जरूर उठायचे!!.
या कुतुहलापायी लहानपणी असंख्यवेळा मी मार खात खाता वाचले आहे.... (अन तेवढयाच वेळा खाल्ला ही आहे!!) उगाच कशाला खोटं बोला. शेजारच्या फरांदे काकुंच्या पेरूचे पेरू कसे लागत असतील बरे याच कुतूहल मला त्यांच्या कंपाउंडवर चढवून गेलं.. शिंदेकाकांनी फेकून दिलेल्या अर्धवट सिगारेटी गोळा करून नाकातून धूर काढायचा सामुहिक कार्यक्रम आम्ही सर्व पोरांनी मोठ्या उत्साहाने केला होता. नंतर लागलेल्या ठसक्यांनी अख्खी कॉलनी दणाणून गेली हे सांगायला नकोच. सदानकदा रांगत इकडेतिकडे हिंडणारं बोरकरांचं बाळ त्याच्या पायाला रिबीन बांधून खांबाला बांधल्यास एका जागी शांत बसतं का?? वगैरे वगैरे.. बाबांच्या कलापाने देशमुखांच्या पामेरियन 'चिनू' चे पण केस रंगवले जातात का याची एकदा हळूच चाचणी घेणं चालू होतं.तेवढ्यात आत्तापर्यंत शांतपणे हे सगळं बघत असणारा बुलडॉग 'दिग्या' अचानक भो भो करीत आमच्या अंगावर आला. आपल्या दोस्ताच्या देखण्या रुपाची वाट लावली जात आहे हे त्याला कळल्यावर त्याला आमचा फार राग आला... दिग्या च्या बांधलेल्या साखळीच्या परिघाबाहेर कसंतरी भिंतीला चिटकून उभ्या असलेल्या मला या कुतूहलाने, भेदरून ए 'कुतु' 'हल' ना असे म्हणायला लावले!! घाबरून बेहाल झाल्यावर कशीतरी जीव वाचवून घरात पोचले. पाणी पिऊन जरा निश्वास टाकणार इतक्यात बाबांना 'कलापाच्या ब्रश मध्ये कुत्र्याचे केस सापडल्याने' घरात हलकल्लोळ माजला. पुढचे काही दिवस मात्र देश्मुखांनी घरी छोटा 'झेब्रा' आणलाय अशी अफवा गावात पसरली.
बाकी वर उल्लिखलेल्या शिंदे काकांच्या श्रीमती हि एक ढालगज बाई होती. त्यांच्या घरातून काकुंच गुरकावणं आदळआपटीच्या कोरस मध्ये ऐकू आल की दुसऱ्या मिनिटाला शिंदे काका घराबाहेर येउन तावातावाने फकाफक सिगरेटी ओढत बसणार हे आम्ह्या प्रत्येक पोराला माहित होतं. एकदा काका जोरदार सिगारेटी ओढत असताना आमच्या टोळक्याने त्यांना, "अशा टारगट काकूशी तुम्ही का बरे लग्न केले? हि शंका विचारली" होती. काकांनी आमच्या तोंडावरून मायेने हात फिरवल्याचं अंधुकसं आठवतंय. पुढे कधीतरी काकांनी गोडीत येऊन (किंवा भांडणात हि असू शकेल) काकुना हे सांगितलं असावं बहुतेक. कारण एके दिवशी " दारातून धडधडत पळालात तर तंगडी मोडीन" असा फतवा काकूंकडून उगाचच्या उगाचच जारी करण्यात आला.
आमच्या इथे घोरपडे नावच कुटुंब राहत असे. त्यातले आजोबा रोज दुपारी सामाईक व्हरांड्यात 'घोरत पडत' असत. एकदा त्यांची वामकुक्षी चालली असताना लयीत वरखाली होणारं त्यांचं भलंमोठ्ठ पोट त्यावर सगळ्यानी मिळुन एखादी जड वस्तू(दिन्याच्या घरातला खलबत्ता!)ठेवल्यास हलायचं बंद होतं का हे प्रयोग करून पाहिल्यामुळे जागे झालेल्या त्या म्हाताऱ्याने आमच्या पाठीत मारेलेले गुद्दे अजूनही आठवले की दुखतात. माझ्या दोन्ही शेंड्या धरून "अगं पोरगी आहेस कि अवदसा" असं म्हणत त्यांनी मला गदागदा हलवलं होतं. त्यांच्या हातून शेंड्या कशाबशा सोडवून आम्ही सगळे धावत सुटलो ते "पूढच्या वेळी खलबत्ता ठेवायचा नाही तर 'आपटायचा' हे ठरवूनच. त्या संध्याकाळी ( म्हणजे सगळे बाबा लोक घरी आल्यावर) थोड्या थोड्या वेळच्या अंतराने आजूबाजूच्या घरांमधून भोकाड पसरल्याचे आवाज येऊ लागले. माझे दोस्त आता या वेळी 'असले राग' का आळवत आहेत हे मला लगेच कळाले. नाहीतरी त्या घोरपडे आजोबांना चहाड्या करायची फार सवय.!! त्यामुळे त्यांच्या पावलांना माझ्या घराचा रस्ता दिसायच्या आधीच ताटातलं गबागबा खाऊन मी तीराच्या वेगाने बिछाना गाठला. आणि तोंडावर पांघरून गुरफटून घेऊन झोपी(?) गेले!! नाहीतर लोकांच्या पोटांवर मी खलबत्ता वगैरे ठेवते असं ऐकल्यावर घरातल्या सगळ्यांनी मला नक्कीच कुटलं असतं.
आमच्या कॉलनीत मैदानाच्या नावाखाली रिकाम्या जागेचा एक तुकडा होता. पण तिथे खेळायची संधी आम्हाला फार क्वचितच मिळे. याचं कारण म्हणजे 'मिसाळ काकू'.. याचा अर्थ मिसाळकाकू त्या मैदानात कुस्तीचा सराव वगैरे करत असं नाही. पण त्या बाईला सदानकदा काहीतरी वाळत घालायची फार सवय. धान्य-धुन्य, कुरड्या, पापड, मिरच्या, मसाले असले काहीतरी मैदानात नेहमी वाळवलंच पाहिजे असा काहीसा नियम त्यांनी स्वत:ला घालून घेतला होता. अगदीच काही मिळाल नाही तर घरातले रग काढून त्या वाळवत असत. वाळवण घातल्यावर आम्हा पोरांना त्या तिकडे फिरकू ही देत नसत. लांब कोपऱ्यात खेळलो तरी त्यांना राग येई. बऱ्याचदा चिडून जाऊन त्या काठी घेऊन आमच्या मागे ही लागत. पण असल्या अवजड भोपळ्याला थोडेच आम्ही हातात घावायला. त्यांचं वाळवण कधी निघतंय याची वाट बघण्यात आमचा बराच वेळ खर्ची पडलाय. दुपारची झोप काढून उशिरा त्या ते सगळं उचलून नेत असत. भलामोठा देह , विस्कटलेले केस, लाल भडक डोळे, असं वामकुक्षी नंतरच 'तेजस्वी' रूप घेऊन त्याना पाहिलं कि आम्हाला त्राटिका आठवत असे. त्यावेळी जर देवाने एखादा वर दिला असता तर आमच्यापैकी प्रत्येकाने "मिसाळ काकूंच्या पापडात थयाथया नाचायचीच इच्छा'"पूर्ण करून घेतली असती. काकूं पेक्षा आकाराने निम्मे असणारे मिसाळकाका बिचारे खूप चांगले होते.
या काकू रोज वाळवण्यासाठी वस्तू पैदा करतात तरी कुठून हे आम्हा सर्वांच्याच कुतूहलाचा भाग होता. एकदा मला मैदानाजवळ काकू भेटल्या. मी सहजच त्यांना "काय काकू आज काय वाळवताय ?? असं विचारलं. :) अन काय सांगू तुम्हाला माझा तो प्रश्न ऐकून काकू भडकल्याच. माझा कान करकचून ओढून त्या बरच काही बडबडायला लागल्या.माझं सगळं लक्ष त्यांच्या हातातल्या माझ्या कानाकडे केंद्रित झाल्यामुळे मला काही ऐकूच येत नव्हतं, आज काकू माझा कान उपटूनच टाकतायत की काय या विचाराने घाबरून जाऊन मी, कान सोडवायचा शेवटचा उपाय म्हणून काकूंच्या दुसऱ्या हातावर कडकडून "दंतास्त्र" सोडलं. आता काहीतरी दुखायची पाळी काकुंवर आल्यावर मात्र एका झटक्यात त्यांनी माझा कान सोडला. जीवाच्या आकांताने धावत मी घरी पोचले. आणि मला माझी घोडचूक कळाली ( काकूंना चावण्याची नव्हे!) तर चावून घरी धावत यायची... माझ्या मागे काही सेकंदातच मिसाळ काकू उल्केसारख्या आमच्या घरात घुसल्या आणि आईसमोर चावका हात नाचवत धुमाकूळ घालू लागल्या. "आम्ही आमच्या घरचे वाळवतो, तुमच्या घरी मागायला येत नाही , कोणाच्या बापाला हक्क नाही विचारायचा". इकडे आईचे डोळे रागाने गरगर फिरू लागले. विनाकारण ही बाई भांडतेय म्हणून नव्हे तर आपल्या लेकीने 'चावण्याचा' पराक्रम करून बोलायला जागा न ठेवल्यामुळे.. . बराच वेळ काकूंचा थयथयाट चालू होता. इतक्यात आईचे लक्ष माझ्या लाल भडक कानाकडे गेले. तिला काय कळायचं ते कळालं. भांडण परतवायला इतका भारी मुद्दा मिळाल्यावर आई सोडते का काय? " अहो एवढ्याशा कारणासाठी एवढ्याशा पोरीचा कान उपटणार होतात की काय?? बघा तरी कसा लाल लाल झालाय" वगैरे सुरु झालं . बचाव आता आक्रमणात बदलला. माझ्या कानाचा उल्लेख होताच तो पूर्वीपेक्षा कितीतरी पटीनी दुखू लागला. अन मी बेंबीच्या देठापासून भोंगा पसरला. आता मात्र मिसाळ काकूनी काढता पाय घेतला. मग आईचा मोर्चा माझ्याकडे वळला. ती थोडीच बधतेय माझ्या रडण्याला!! असला आचरटपणा परत करशील तर फोडून काढीन म्हणून ती गरजली. एरवी तिने मला खरच फोडून काढलं असतं पण 'लालग्या कानाने' वाचवले बघा.
तर मंडळी तुम्हाला समजलं असेलंच की, या कुतुहलाने माझ्यासारख्या साध्या, सरळ मुलीच्या आयुष्यात कसले कसले प्रसंग उभे केलेत. लहानपणी प्रत्येकवेळी कपाळमोक्षच पदरी पडल्याने मोठ झ्याल्यावर मी नाकासमोरच चालण्याची सवय अंगी बाणवायचा प्रयत्न करते आहे.तरीही 'कुतूहलराक्षस' अधून मधून माझ्या बुद्धीवर झडप घालतोच. आणि त्याला जसं हवय तसं माझ्याकडून करून घेतो. त्याच्या नादात नेहमी आगीतून फुफाट्यात ....अन फुफाट्यातून ...... आईबाबां समोर (त्यापेक्षा फुफाटा बरा !!!)
या सगळ्या गर्तेत मी सापडलेय आणि एक नवंच कुतूहल बरेच दिवस मनात कुचीपुडी करू लागलय. "हे सगळ माझ्याच बाबतीत होतं का?. की तुम्हा सर्वांची ही अशीच अवस्था आहे?. त्या न्यूटनला कुतुहलाने शोध वगैरे लागतात. अन आमच्या नशिबी मात्र वर गेलेला चेंडू सरळ रेषेत खाली न येता फळीवरची सगळी भांडी खाली घेऊन येतो.!! शी... याला काय जीणं म्हणायचं? तुम्हीच सांगा..
प्रतिक्रिया
22 Jan 2013 - 11:39 pm | ठक
मस्त जमलाय लेख !!!!!
22 Jan 2013 - 11:49 pm | योगप्रभू
आनन्दिता,
लेख खुसखुशीत झालाय. असे सहज विनोदी, मिश्किल लेख आणखी येऊ द्यात. :)
22 Jan 2013 - 11:54 pm | अभ्या..
मस्तच आहेत तुमचे उपद्व्याप. छान लिहिलायत.
ए 'कुतु' 'हल' ना ब्येस्ट एकदम.
22 Jan 2013 - 11:54 pm | कवितानागेश
मस्त. मजा आली वाचायला. :)
23 Jan 2013 - 12:45 am | कपिलमुनी
लहानपणचे बरेच किस्से आठवले !! फर्मास लेख जमला आहे
23 Jan 2013 - 1:00 am | शुचि
हाहाहा मस्त रंगतदार लेख.
23 Jan 2013 - 1:10 am | रेवती
छानच. प्रत्येकाला आपापल्या लहानपणीची कुतुहलं आठवत असतील. ;)
23 Jan 2013 - 1:24 am | अभ्या..
ह्यॅ SSS कैतरीच काय
मी फार गुणी बाळ होतो. ;)
23 Jan 2013 - 1:26 am | शुचि
हीच ती "holier than thou" वृत्ती. ;)
23 Jan 2013 - 2:56 pm | बॅटमॅन
+१०००००००००००.
मीपण.
23 Jan 2013 - 1:43 am | अभ्या..
वृत्तीचाच ना?
मग ओक्के. :)
23 Jan 2013 - 2:25 am | स्पंदना
बये! एव्हढ सगळ (कुतु)हलवुनही तू अजुन जीवंत कशी याच कुतुहल मला लागुन राह्यल्यं.
पहिल्या विचारवंताच्या डोक्यापासुन ते घोरत पडलेले आजोबापर्यंत डोक्याला शॉट लागल्या सारखी हसतेय.
23 Jan 2013 - 2:57 am | उपास
नावाप्रमाणे आनंदी लिखाण.. छान जमलय! काही कोट्या विशेषा उल्लेखनिय.
23 Jan 2013 - 3:08 am | आनन्दिता
@ठक ,योप्र, अभिजीत, माउ, कपिल मुनी , रेवती, शुचि अपर्णातै, उपास...
खुप खुप आभार.. खरंतर मिपावर च नाही तर आयुष्यातही पहिल्यांदा काहीतरी लिहायचा प्रयत्न म्हणजे हा लेख!!
पण तुमच्यापैकी कोणीही " मलाही कुतुहलाचा वाइट अनुभव आलाय " असे न म्हटल्यामुळे, हा राक्षस फक्त मलाच पाताळ धुंडायला पाठवतो की काय? हा प्रश्न पडलाय ,!ं
23 Jan 2013 - 10:41 am | कपिलमुनी
सांगतो .. गाडीच्या काळ्या काचेतुन आतला दिसता का ? हे कुतुहल एकदा वाटले होते..नंतर धमाल आली ..
झोपलेल्या माणसाच्या उघड्या तोंडात पाणी घातले असता तो पितो का ? याची चाचणी घेतली होती ..
बाबा मिशा कापतात म्हणून बोक्याच्या मिशा कापल्या आहेत..
23 Jan 2013 - 11:46 am | तिमा
मलासुद्धा असल्या उपदव्यापांचा 'प्रसाद' मिळाला आहे.
जमदग्नी,आजोबांशेजारी बसून जेवताना, मला एकदा पुरणात हिरवे तिखट कालवले तर कसे लागते याचे कुतुहल उत्पन्न झाले. प्रयोगांती, 'गाढवाला गुळाची चव काय" अशी संभावना झाली.
रांगता असताना, पेटलेला स्टोव्ह म्हणजे निळे फूल आहे असे मला वाटले. कुतुहल शमवण्यासाठी मी त्यालाच हात घातला! नंतर १५ दिवस ते दुखणे पुरले म्हणे! (जुन्या जमान्यात आणि चाळीत ओटा हा प्रकार नव्हता.)
गोगलगाय म्हणजे चिक्कुची फोड आहे असे या रांगत्या बाळाला वाटले, हातात घेऊन चोखून पहात असता आईच्या लक्षांत आले, त्यामुळे लहानपणीच नॉन-व्हेजिटेरीयन झालो नाही.
23 Jan 2013 - 12:59 pm | टवाळ कार्टा
"गोगलगाय म्हणजे चिक्कुची फोड आहे असे या रांगत्या बाळाला वाटले, हातात घेऊन चोखून पहात असता आईच्या लक्षांत आले"
:D =))
23 Jan 2013 - 8:32 pm | आनन्दिता
25 Jan 2013 - 5:25 pm | बॅटमॅन
हे अत्यंत जबरी किस्से आहेत! बाकी खाद्यकुतूहलाचे किस्से अस्मादिकांनीही केलेत पण गोगलगायीचा किस्सा मात्र केवळ अप्रतिम!
23 Jan 2013 - 9:37 pm | रेवती
हा राक्षस फक्त मलाच पाताळ धुंडायला पाठवतो की काय?
नाही नाही. असं नाही.
आईची शाळेतली मैत्रिण अचानक भेटली, गप्पा वगैरे झाल्या.
त्यांच्या बोलण्यात एकदोनदा आलं की त्या बोरं आणि चिंचा घरमालकांच्या नकळत झाडावरून काढून खात. आता चिंचा, बोरं विकत घेऊन खाण्यात मजा नाही. मलाही समोर राहणार्यांची बाग खुणावत होती. काटेरी कुंपण होतेच. एक झेंडूचे फूल चोरून बघावे या हेतूने कशीबशी आत गेले. एक फूल तोडताच बागमालकांच्या लक्षात आले म्हणून घाईघाईने बाहेर येताना फ्रॉक फाटला, फूल कुस्करले गेले. आई रागावली की असले कसले भिकेचे डोहाळे की कायसे. फूल हवे होते पण नवा फ्रॉक मिळाला. जे हवे ते मिळतेच असे नाही. ;) एकंदरीतच माझा स्वभाव कुतुहल मनातच ठेवण्याचा असल्याने कोणाला फारसा त्रास दिला नसावा. ;)
23 Jan 2013 - 3:09 am | टवाळ कार्टा
भारी :)
23 Jan 2013 - 3:34 am | यश पालकर
छान जमलाय लेख!!!!!!
23 Jan 2013 - 3:54 am | इष्टुर फाकडा
बर्याच दिवसांनी इतका मुळापासून हसलो. भारीच खूप मज आली वाचताना :)
फारच गोड लिखाण !
बाकी आमच्या कुतूहलांचे किस्से मोठा झाल्यावरही कोणाला सांगू नकोस असा घरून सज्जड दम भरण्यात आल्याने आमचा पास ;)
23 Jan 2013 - 5:23 am | जेनी...
स्वाल्लिड लेख ....
स्नेहांकिता च्या जोडीला आता आनन्दिता ....
:)
आवडला .
23 Jan 2013 - 8:45 am | अर्धवट
आनंदीतातै.. लेख खूप मस्त जमलाय..
लिहीत रहा..
23 Jan 2013 - 8:52 am | लीलाधर
कर लो दिमाग थंडा जबरदस्त.
23 Jan 2013 - 9:26 am | इरसाल
मस्त लिहीले आहे, वाचुन लहानपणीचे काही धपाटेदार किस्से आठवले.
23 Jan 2013 - 10:23 am | पियुशा
मस्त बालपण आठवले :)
नाकासमोर सरळ चालणारी पियु ;)
23 Jan 2013 - 10:23 am | ऐक शुन्य शुन्य
छानच जमलाय!!!
23 Jan 2013 - 10:33 am | लाल टोपी
खुपच छान आणि खुसखुशीत लिललं आहे. पुलेशु....
23 Jan 2013 - 10:43 am | अर्धवटराव
तुमच्या नावाप्रमाणे अगदी निखळ आनंद देणारा लेख. मजा आली.
अर्धवटराव
23 Jan 2013 - 11:50 am | श्रिया
भन्नाट आहेत तुमचे किस्से. लहानपणी सगळेच "उद्योगपती" असतात. लेख वाचून नॉस्टॅल्जिक व्हायला झालं.
23 Jan 2013 - 11:59 am | इरसाल
नंतर ते पतीउद्योग होतात.
कृ. ह. घे.
23 Jan 2013 - 12:15 pm | अद्द्या
भेदरून ए 'कुतु' 'हल' ना असे म्हणायला लावले!
=)) =))
परत एकदा ..
मिपा मुळे .. हापिसात येड्या सारखा हसतोय ..
आपल्या नावा सारखाच लेख ..
बरंच काही आठवलं.. आणि शाळेतल्या एका "बाईंच" वाक्य पण आठवलं .. "parents meeting" मधलं ..
your son is a devil Mrs. Marathe.. as much as that bloody innocent face.... please control him..
23 Jan 2013 - 12:43 pm | सस्नेह
खु..खु...खुसखुशीत लेख..
23 Jan 2013 - 12:49 pm | तर्री
अतिशय आवडले.
23 Jan 2013 - 12:52 pm | गवि
निर्मळ , निरागस, निखळ, नर्मविनोदी.. उत्तम आहे..
23 Jan 2013 - 12:59 pm | बाबा पाटील
माझ्या लेकीला देखील असेच भयानक उद्योग पडलेले असतात त्यामुळे घरातली सगळी १० माणसे आणी दोन कुत्री तिच्यावर डोळ्यात तेल घालुन लक्ष ठेवत असतात.....
23 Jan 2013 - 2:28 pm | बायडी
खुपच छान लेख...
23 Jan 2013 - 2:49 pm | संजय क्षीरसागर
अत्यंत सुरेख शैली आणि जीवनाकडे बघण्याचा मस्त नजरीया लाभलाय. अशीच लिहीत रहा.
23 Jan 2013 - 2:53 pm | चेतन माने
खूप सुंदर आहे लिखाण, खुसखुशीत आणि साधं मज्जा आली वाचताना
पुलेशु :)
23 Jan 2013 - 2:54 pm | मुक्त विहारि
छान लिहिले आहे..
23 Jan 2013 - 3:04 pm | सानिकास्वप्निल
बालपणीचे रम्य दिवस आठवले :)
लेख वाचून हसु आवरेनासे झाले :)
23 Jan 2013 - 3:20 pm | निश
असच काहीतरि लहानपणीच आठवल. असेच चाळीत रहात असताना आम्ही मुल खेळायला लागलो की चाळीतले एक काका आम्हाला ओरडायचे. असेच एकदा ते आम्हाला ओरडत असताना अस्मादिकांनी त्याना चिडुन सांगितले होते, ओ काका आमच्या खेळाकडे बघता कश्याला व ओरडता कश्याला? पुन्हा बघितल तर कानाखाली मारीन. त्या वेळी मी १ल्या इयत्तेत शिकत होतो. काका हा दम ऐकुन बराच काळ धक्क्यात होते. रात्री बाबांनी जबरद्स्त मार दिला अस्मादिकाना काकाना दम दिला म्हणुन तो वेगळाच.
25 Jan 2013 - 10:22 am | इनिगोय
ऐला, भारीच!!
23 Jan 2013 - 6:02 pm | पैसा
मरेपर्यंत हसलेय वाचताना!
23 Jan 2013 - 10:42 pm | स्वाती दिनेश
एकदम खुसखुशीत लेख, आवडला..
स्वाती
24 Jan 2013 - 10:39 am | ५० फक्त
लई म्हंजे लईच भारी, हल्ली मला माझंच बालपण जास्त आवडायला लागलंय, प्रेमातच पडलोय त्याच्या, का माहित नाही, म्हणुनच की काय तुमचं लिखाण खुप खुप आवडलं. खुप खुप धन्यवाद.
24 Jan 2013 - 9:24 pm | निनाद मुक्काम प...
तुमची लिखाणाची पद्धत अत्यंत नैसर्गिक आहे.
आणि तुमच्या खट्याळ बालपणाचे धमाल किस्से वाचून मनमुराद हसलो.
आम्ही एकदा मे महिन्यात उन्हाळ्याच्या सुट्टीत आमच्या इमारती सह आमच्या गल्लीमधील आजूबाजूच्या ५ ते सहा इमारतींच्या घरांना एकाचवेळी कड्या लावल्या.
ह्यामुळे काही तासात आमच्या गल्लीत गोंधळ सुरु झाला.
एका इमारतीत कोणाकडे तरी दूरध्वनी असल्याने त्यांनी सदर प्रकार ही सामूहिक
घरफोडी चे प्रकरण समजून चक्क पोलिसांना फोन लावला ,
गच्ची वरून आम्ही मुलांनी पोलिसांची गाडी पहिली व मग आमची हवा टाइ ट झाली,
मग आम्ही हळूच खाली उतरलो व पोलिसांच्या गाडीसमोर जाऊन खरा प्रकार सांगितला.
त्यांनतर आधी पोलिस मग घराच्या मंडळींनी आम्हाला कणिक तिंबावी तसे तिंबून काढले.
25 Jan 2013 - 10:53 am | धन्या
एकदम हलकं फुलकं लेखन आवडलं.
25 Jan 2013 - 12:37 pm | चैदजा
मस्त लेख.
शेवटचा परिच्छेद म्हणजे एकदम सिक्सर.
25 Jan 2013 - 5:21 pm | यशोधरा
LOL! :D
ए कुतू हल ना! D
25 Jan 2013 - 6:51 pm | मी-सौरभ
आवडेश
अजुन किस्से असतील ते पण सांगा :)
लहानपणचे बरेच उद्योग आता आठवत पण नाहीत. लक्षात आले तर टंकेन.
25 Jan 2013 - 8:10 pm | बाबा पाटील
बायको एकदा अॅक्टीवा वर तिच्या दवाखान्यात जात असताना,एक माणुस राँग साईडने एवुन तिच्या गाडीला धडकला,पिल्लु त्यावेळा माझ्या बरोबर माझ्या दवाखान्यात होत्,तिला स्टाफ कडे सोडुन मी फोन आल्यावर बायकोकडे गेलो,फारस लागल न्हवत व भांडत बसायला वेळही न्हवता त्यामुळे गाडी गॅरेजवाल्याकडे देउन तिला सरळ तिच्या ओपीडीत सोडल व परत माघारी आलो,दुपारी माझे पेशंट संपल्यावर बायकोला घ्यायला गेल्यावर गाडीत पिल्लाने विचारले,"पप्पा तु मघाशी कुठे गेलतास रे ?" त्यावर तिला सगळा किस्सा सांगितला व म्हटले एका वेड्या माणसाने मम्माच्या गाडीला धडक दिली पन मम्माला फारसे लागले नाही.पोरगी त्यावर शांत बसली त्यानंतर आईच्या क्लिनिकला पोहचल्या पोहचल्या पहिल्यांदा आईला विचारले मम्मा बघु दे कुठ लागलय ते,तिने ते थोडस नड्गीवर लागलेल पाहिल आणी साडेचार वर्षाची पोरगी डोळे गरागरा फिरवुन आणी इटुकल्या मुठी आवळुन त्याक्षणी म्हणाली,"पप्पा....,मला आत्ताच्या आता कपाटातली तलवार दे,तो कुठ राहतो,त्याच नाव सांग,बबलु काका,पप्पु काकाला ,जग्गु मामाला पहिला फोन करुन आत्ताचा आत्ता इथ बोलव,नाहीतर तुझी बंदुक तरी मला दे."
आयच्या गावात,आम्हा दोघा नवराबायकोची दातखिळीच बसली,ओपीडीतले दोन तिन पेशंट देखिल आवाक.म्हटल हे आज अस आहे,अजुन शाळा कॉलेज सुरु व्हायची आहेत्,आता आपणच पहिले सुधरा....
25 Jan 2013 - 8:22 pm | शैलेन्द्र
+११
28 Jan 2013 - 1:11 pm | संजय क्षीरसागर
तुमच्याकडे इतकी साधनसामुग्री आहे? आता प्रतिसाद जरा जपूनच द्यायला हवेत.
28 Jan 2013 - 8:24 pm | बाबा पाटील
काळजी करु नका...तलवार दसर्याची पुजेची आहे(बिन धारेची),अन पिलस्तुलच लायसन्स मिळवताना आपल्या सगळ्या सरकारी खात्यांनी (महसुल्,पोलिस आणी फॉरेस्ट )एव्हडा जिव काढायला लावला की वेळ आल्यावर ही ते वापरायची हिंमत होईल का नाही काय माहिती!!!
30 Jan 2013 - 9:41 pm | रेवती
बाब्बौ! पळा पळा. ;)
31 Jan 2013 - 6:33 am | सुधीर मुतालीक
पिल्लु पोटात असताना तुम्ही आणि काकुंनी नाना पाटेकरचे खुप सिनेमे बघितलेले दिसतायत बाबाकाका !!! संभाळा !!!!! बंदुक, तलवार आणि रीतसर कपाटात ठेवली असते हे साडेचार वर्षाच्या पिल्लाला माहिती असणे म्हंजे तुमचा 'जोडधंदा' जोरादार सुरू दिसतोय......!
31 Jan 2013 - 1:12 pm | बाबा पाटील
बाय द वे,पिल्लाच टोपन नाव गुंडा पाटील आहे....
31 Jan 2013 - 1:34 pm | बाबा पाटील
मला माझ पिल्लु खुप शिकल नाही तरी चालेल.पन तिने यशस्वी माणुस बनाव,पुस्तकी किडा बनु नये,आणी दुसरी गोष्ट तिला शाळेत(सिनियर के.जी.) घालताना पहिल्याच दिवशी सांगितल होत कुनाला स्वता:हुन त्रास द्यायचा नाही आणी कुणी त्रास दिला तर सहन करायचा .मला निश्चित खात्री आहे माझी पोरगी जेंव्हा मोठ्या शाळा,कॉलेज मध्ये जाईल तेंव्हा कुनी छेड काढली किंवा रॅगिंग घेतली म्हणुन रडत घरात येणार नाही तर जागेवरच समोरच्याचा कानफाटात देउन येईल...
1 Feb 2013 - 1:12 am | आनन्दिता
माझी बहीण डॉक्टर आहे. तीचं ३ वर्षाचं पिल्लु देखिल बर्याचदा अशी कापाकापी ची भाषा करत असल्याने त्या उभयतांची ही अनेकदा दातखीळी बसण्याचा प्रसंग येतो.
ऑपरेशन च्या वेळी पेशंट्च्या शरीराची अन् ऑपरेशन नंतर त्यांच्या खिशाची तुम्हा डॉक्टरांनी केलेली कापाकापी पुढे अशी 'फळाला ' येत असावी बहुतेक..:) :)
25 Jan 2013 - 8:27 pm | मराठे
सुंदर चटपटीत लेख.
लहान असताना आमच्या गल्लीत सगळी मुलं इतका हैदोस घालायची की शेजारचे महाजन भाऊ म्हणायचे 'ह्या पोरांनी प्रशांत नगर चं अशांत नगर करून टाकलंय!'. एकदा हॉटेल-हॉटेल खेळताना त्यांच्याच घराच्या नव्यानेच रंगवलेल्या भिंतीवर हॉटेलचा मेनू लिहून काढला होता.
25 Jan 2013 - 9:32 pm | डॉ सुहास म्हात्रे
हहपुवा :)).
एकदम खुसखुशीत लेख. जगोजागी पेरलेल्या कोट्या वाचताना खूप मजा आली. अजून लेखन येवू द्यात.
27 Jan 2013 - 7:42 am | आनन्दिता
सर्वांचे मनापासुन आभार!!
27 Jan 2013 - 3:59 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
शाळेतल्या एका गुर्जींवर आमचा विशेष राग असायचा कारण पी.टी. चा आणि खेळाचा तास रद्द करुन इतिहास-ना.शा. चा तास घ्यायची ह्या ग्रुहस्थाना वाईट खोड असे. आणि त्यातही वाईट म्हणजे ह्यांना पोरांना घुंगुरकाठीनी मारलं तरचं अक्कल येते असं वाटायचं. एक दिवस भर वर्गात ह्या मास्तुरेंनी पिताश्रींचा उद्धार आणि घुंगुरकाठीचा प्रयोग माझ्यावर करुन दाखवला. :( मग पुढचा आठवडा नं चुकता त्यांची सायकल पंक्चर व्हायची, किंवा मग शाळेच्या मागे खड्डा होता त्याच्यात सापडायची, सायकलचं सीटचं हातात यायचं. मग आमच्या वर्गातल्या एका "हुश्शार आणि चाटुगिरी करणार्या" मुलानी बिंग फोडल हे. मग आई-बाबांना बोलाऊन शाळेत धुलाईचा कार्यक्रम झाला. (घरी जाऊन इस्त्री पण झाली). :(
(नंतर त्या मुलाच्या ग्रुहपाठाच्या वह्या "चुकुन" फाटल्या होत्या आणि चेहेर्याचे रंग बदलले गेले होते, ते पण आठ्वतं आहे.) :) :)
---=---
27 Jan 2013 - 4:09 pm | गब्रिएल
तुमच्यासारख्या कल्पक माणसांच्या क्लुप्त्या पाकिस्तान आणि चीन सरहद्दीवर फार्फार उपयोगी पडतील ;)
27 Jan 2013 - 5:27 pm | अग्निकोल्हा
खल्लास!
27 Jan 2013 - 9:52 pm | आनन्दिता
धन्स!!
27 Jan 2013 - 10:13 pm | राघव
मायो.. कसले उद्योग आहेत.. :)
बादवे, तो धम्या कुठल्या गावची कणिक तिंबायला गेलाय कुणास ठाऊक.. त्याचे ते इरसाल किस्से वाचून पोट दुखेतोवर हसलेलो आहे.. तो धागा काही सापडत नाहीये आत्ता.. असो सापडला तर लिंकेन इथे..
28 Jan 2013 - 1:36 pm | सुधीर
खूपच छान जमलाय! पुलंची आठवण आली.
29 Jan 2013 - 12:05 am | कवितानागेश
पुन्हा वाचलं...मजा आली. :)
30 Jan 2013 - 2:40 am | आनन्दिता
पुन्यांदा धन्यवाद!!
31 Jan 2013 - 6:17 am | सुधीर मुतालीक
एकदम फरडू झालाय लेख. एकदम खल्लास. मजा आली. लेखनशैलीही मस्त आहे. खलबरत्ताहा प्रकार सॉलीडच आहे, इन्नोवेटीव !!
31 Jan 2013 - 11:38 am | क्रान्ति
हसून हसून वेड लागेल! काय भन्नाट किस्से आहेत! :)
17 Jan 2014 - 2:02 am | प्यारे१
खिक्क्कुशा!
एकसो एक किस्से.
मुख्य म्हणजे त्यातला निरागसपणा नि लिमिटेड डांबरटपणा... नो छक्के पंजे.
बाबा पाटलांची किरण बेदी कम झाशीची राणी पण आवडली.
(हा लेख मागच्या सुट्टीच्या काळातला दिसतोय. आम्ही 'माहेरी' असलो की मिपावर पडीक नसतो.)
17 Jan 2014 - 6:22 am | चाणक्य
परत वाचला. मजा आली
17 Jan 2014 - 6:39 am | यशोधरा
परत वाचला आणि वाचनखूण साठवली :)
17 Jan 2014 - 8:55 pm | आनन्दिता
प्यारे १ , चाणक्य, यशोताई... खुप खुप आभार!!!
17 Jan 2014 - 9:35 pm | लॉरी टांगटूंगकर
प्लीज प्लीज प्लीज, अजून लिहा.
17 Jan 2014 - 9:53 pm | मधुरा देशपांडे
कुतूहलांनी भरलेलं लहानपण. झक्कास. मजा आली वाचताना.
17 Jan 2014 - 10:49 pm | समीरसूर
बर्याच दिवसांनी मिसाळकाकूंनी वाळायला घातलेल्या पापडांसारखा कुरकुरीत लेख वाचला. खूप छान वाटले. लिहिण्याची शैली खूप मस्त आहे. ओढून्-ताणून जास्त विनोद न करता जे सहज जमतील असे विनोद पेरून लेखाला निखळ बनवले आहे. पुढील लिखाणास शुभेच्छा! आणि नक्कीच लिहित रहा. :-)
18 Jan 2014 - 12:32 pm | जेपी
मस्त लिखाण .
धागावर काढणार्याचे आभार .
18 Jan 2014 - 1:51 pm | राही
सहज सीधेसाधे सरळ लिखाण. 'कुतु, हल ना' तर खासच.
20 Jan 2014 - 8:38 am | आनन्दिता
@ मधुरा, तथास्तु, राही कौतुकाबद्दल आभार!!
@ मन्द्या, समीरसूर लिहायचा प्रयत्न नक्की करेन!! आभार!!
20 Jan 2014 - 2:57 pm | क्रेझी
भन्नाट लेख. ट्रेनिंग रूममधे झोप येत होती म्हणून मिपा उघडलं आणि हा लेख दिसला..हहपुवा झालं आहे आणि माझ्या मॅनेजरचं कुतूहल जागं झालं आहे ;)
21 Jan 2014 - 11:40 am | विजुभाऊ
लय भारी.
पोरं काय काय उचापती करतील काहे सांगता येत नाही.
आम्ही एकदा वर्गाच्या दारात. दोन्ही दारे तिरपी लावुन त्यावर केरसुणी ठेवली होती.दार उघडल्याबरोबर डोक्यात पडावी म्हणून. केरसुणी बरोब्बर मास्तरांच्या डोक्यावर पडली. त्यानंतर मास्तरानी आख्खा वर्ग डोक्यावर घेतला. संध्याकाळी आम्ही सगले डोक्यावर पडल्यासारखे हसत होतो.
21 Jan 2014 - 2:00 pm | वेल्लाभट
हाहाहाहाहाहाहाहाहाहा
खलास! खलास! I could visualize every incident that was narrated... fantastic
22 Jan 2014 - 12:26 pm | मृत्युन्जय
आयला मस्तच.
22 Jan 2014 - 4:01 pm | देवांग
एक नंबर लेख…हसून हसून वाट लागली…आमच्या लहानपणी आम्ही उद्योग करत असू त्यातील काही खाली देत आहे
१. मी जेव्हा लहान होतो तेव्हा मिथुनचा ब्रेक डान्स प्रसिद्ध होता. आणि बरेच कोलेज कुमार त्याचे फ्यान होते. तसाच एक फ्यान आमच्या पेठेत राहत होता. नाव श्रीकांत आमच्या साठी शिक्या. डोल्यावर ९ नंबरचा चष्मा. त्यामुळे मोठे लोक त्याला लॉइड म्हणायचे. तेव्हा आमच्या कोणाच्या घरी टेपरेकोर्डेर न्हवता जो फक्त त्याच्याच घरी होता. कुठला हि मिथुनचा चित्रपट पहिला कि त्याच्या अंगात मिथुन संचारत असे. शाळा सुटली कि आम्ही त्याच्या घरी एका खोलीत खेळायला जमत असू. तेव्हा तो सगळ्या दारे खिडक्या बंद करून घेत असे. फक्त झिरोचा बल्ब चालू. त्याच्या बटनावर बोट ठेवून एकाला थांबावे लागे. नंतर मोठ्या आवाजात मिथुनची "डान्स डान्स" मधली गाणी लावत असे. आम्हाला सांगायचा कि हा डान्स क्लब आहे. तिकडे असेच असते. जो लाईटच्या बटनावर बोट ठेवून थांबत असे त्याने गाण्याच्या चालीवर बल्ब बंद चालू करायचा. आम्ही आम्ही सगळे त्याच्या वर नाचत असू. ह्या नाच कामामुळे बर्याच वेळा मार मिळाला आहे.
२. शिक्याला असले बरेच उद्योग लागत. तेव्हा कोणाच्या घरी फोन नसत. त्याच्या घरी हि नव्हता. पण त्याच्या काकांचे कपड्याचे दुकान होते तिथे फोन होता. दुपारचे काका झोपत असत. ते झोपले कि आमचे उद्योग चालू. आम्हाला शाळेत जाताना एक महाराष्ट्र बँकेची शाखा लागत असे. त्याच्या बोर्डावर त्याचं फोन नंबर लिहिला होता. काका झोपले कि तो त्या बँकेच्या नंबरवर फोन करत असे. आणि मोठ्या माणसाचा आवाज काढून त्यांना संगे कि " आज रात्री तुमच्या बँकेवर दरोडा पडणार आहे तेव्हा सांभाळून राहा" आणि जोरजोरात आम्ही पण हसत असू. जसे आम्ही त्याचे साथीदार. ह्याची आम्हाला फार गम्मत वाटत असे.
३. घराजवळ एक पोस्त पेटी होती दुपार झाली कि रस्तावर जास्त गर्दी नसे. आम्ही लहान असल्याने त्या मध्ये आमचा हाथ जात असे. आम्ही त्यातून पत्र(फक्त पोस्त कार्ड) काढत असू. ती काढली कि ती शिक्याला आणून द्यायची. शिक्या त्यावरच मनाचे काही हि लिहत असे. समाज कोणी लिहिले असे कि "बाबांची तब्येत ठीक आहे काळजी नसावी" तर शिक्या त्यात लाएन टाकणार "बाबांची तब्येत ठीक आहे. कधी हि जातील. तेराव्याला या. काळजी नसावी". नंतर आम्ही ती पत्र परत पेटीत टाकत असू. त्यांचे पुढे काय होत असे हे समजले नाही.
४ . अजून असाच फेकू होता त्याचे नाव मुन्ना. माझ्या लहानपणी स्पाईडर म्यान सेरियल जोरात चालू होती. आणि त्यामुळे आम्हाला स्पाईडर म्यान बनण्याची इच्छा होती. एक दिवस सिरिअल संपल्यानंतर मुन्ना म्हणाला तुम्हाला जर स्पाईडर म्यान बनायचे असेल तर एक काम करावे लागेल. आम्ही विचारले काय ? तर म्हणाला एक खास गवत असते त्याचा रस करायचा आणि हाताला एक खिळा ठोकून एक भोक पडायचे आणि त्यात तो रस ओतायचा. आणि तळहातावर एक लाईटचे बटन लावायचे. बटन दाबले कि लगेच त्या गवताच्या रसामुळे दोर्या निघतात. आणि आपण जगात कुठे हि जावू शकतो ते पण ढगातून. पण लाईटचे साधे बटन नाही लावायचे डोर बेल ला जे बटन असते ते लावायचे. कारण झोपेत जर चुकून लाईटचे बटन दाबले कि इतक्या दोर्या निघतात कि आपणच अडकून बसतो. आम्ही त्यानुसार ते गवत उपटून आणले(काही वर्षाने कळले कि त्याला कोन्ग्रेसचे गवत म्हणतात) घरच्यांनी विचारले कि हे घाणरडे गवत कश्या साठी आणले. आम्ही आमचा प्लान सागितलं आणि वडिलांना म्हणालो कि तुम्ही पण हाताला भोक पाडून स्पाईडर म्यान व्हा. जी धुलाई झाली म्हणून सांगू .....असो
५ जेव्हा सुपर म्यान पहिला तेव्हा आमच्या अंगामध्ये सुपरम्यान चे भूत संचारले. वडिलांचा टॉवेल गळ्याला बांधायचा आणि उडण्याची पोज घ्यायची आणि पळत सुटायचे. एकदा असेच आम्ही सुपरम्यान सुपरम्यान खेळत होता पण माझ्या चुलत भावाकडे टॉवेल नव्हता. पण त्याने तो १० मिनिटात कुठून तरी मिळवला. आमचे तासाभराने खेळून झाले आणि आम्ही घरी आलो. तर शेजारचे आजोबा येवून बसले आणि माझ्या काकांशी काही तरी बोलत होते. त्यांना बघितल्या वर भावू घाबरला. मला काहीच माहित नव्हते. नंतर कळले कि त्याने शेजारचे आजोबा अंघोळीला गेल्यावर टॉवेल बाहेरच्या दोरीवर ठेवत असत. माझ्या भावाने घरात टॉवेल न मिळाल्यामुळे त्यांच्या बाथ रूमची बाहेरून कडी लावली आणि टॉवेल घेवून आमच्याबरोबर आला. ते आजोबा १५ मिनिट आतून बोम्बलत होते तेव्हा कोणी तरी दार उघडले. बिचारे आजोबा आणि बिचारा माझा भावू.
असे अजून बरेच किस्से आहेत ....आठवले कि छान वाटते