आता वाजणार की हो बारा बारा बारा ............

आनंद घारे's picture
आनंद घारे in जनातलं, मनातलं
10 Dec 2012 - 2:12 pm

वीसावे शतक संपून सन २००० सुरू होण्याच्या क्षणाला वायटूके (Y2K) असे नाव काँप्यूटरवाल्यांनी दिले होते. वर्ष दाखवणा-या ९७, ९८, ९९ अशा आकड्यांना सरावलेल्या मठ्ठ काँप्यूटरांना २००० सालातला ०० हा आकडा समजणारच नाही आणि ते गोंधळून जाऊन बंद पडतील. त्यामुळे त्यांच्या आधारावर चालणार्‍या सगळ्या यंत्रणा कोलमडून पडतील. हॉस्पिटलमधल्या कुठल्या रोग्याला कोणते औषध द्यायचे किंवा कुणावर कसली शस्त्रक्रिया करायची हे कुणाला समजणार नाही. स्वयंचलित यंत्रांना कच्चा मालच मिळणार नाही किंवा चुकीचा माल त्यात घुसवला जाईल. नोकरदारांना पगार मिळणार नाही, त्यांचे बंकांमधले खाते बंद पडेल आणि एटीएम यंत्रांमधून पैसे बाहेर येणार नाहीत. जमीनीवरली विमाने उडलीच तरी भलत्या दिशांना जातील आणि आकाशात भ्रमण करणारी विमाने दगडासारखी खाली कोसळतील. अशा अनेक वावड्या उडवल्या जात होत्या. सर्वात भयानक बातमी अशी होती की वेगवेगळ्या महासत्तांच्या भूमीगत गुप्त कोठारांमधले अनेक अण्वस्त्रधारी अग्निबाण बाहेर निघून ते भरकटत जातील आणि इतस्ततः कोसळून पृथ्वीवर हलकल्लोळ माजवतील.

असा अनर्थ घडू नये म्हणून सगळे संगणकविश्व कंबर कसून कामाला लागले होते. नव्या भारतातले संगणकतज्ज्ञ प्राचीन काळात भारताने शोधून जगाला दिलेल्या शून्याचा अर्थ जगभरातील संगणकांना नव्याने समजावून देण्याच्या कामाला लागले. त्या काळात ते रात्रंदिवस काम करून निरनिराळ्या सॉफ्टवेअर्सना वायटूकेफ्रेंडली किंवा कंप्लायंट बनवत राहिले. कदाचित त्यांच्या अथक प्रयत्नांमुळेही असेल, पण वायटूकेचा बार फारच फुसका निघाला. त्यातून साधे फुस्ससुध्दा झाले नाही. पण त्याबरोबर आयटीवाल्या कंपन्यांच्या हातातल्या सोन्याची अंडी देणा-या कोंबड्या मात्र नाहीशा झाल्या आणि त्यांच्याकडल्या सगळ्या कोंबड्यांचे भाव धडाधडा कोसळू लागल्यामुळे त्यांच्या धंद्यावर मंदीचे सावट पसरले ते बराच काळ राहिले.

त्यानंतर १ जानेवारी २००१ साली १ वाजून १ मिनिटांनी ०१:०१:०१:०१:०१:०१ हा क्षण येऊन गेला, त्याला फारसे महत्व मिळाले नाही. त्यानंतर दर वर्षी ०२:०२..., ०३:०३... वगैरे विशेष वेळा येत राहिल्या. त्या सगळ्या रात्री झोपेच्या काळात असल्याने कुणाला जाणवल्याही नाहीत. २००७ साली जुलै महिन्याच्या ७ तारखेला युरोपातल्या स्पेन या देशात एक आंतरराष्ट्रीय संमेलन भरवून त्यात ०७:०७:०७:०७:०७:०७ या वेळी म्हणजे सकाळी ७ वाजून ७ मिनिटे आणि ७ सेकंद या क्षणाचा मुहूर्त साधून पुरातनकाळातच माणसाने बांधून ठेवलेल्या जगातील सात जुन्या आश्चर्यांची नवी जगन्मान्य यादी जाहीर करण्यात आली.

त्यानंतर ०८:०८... ०९:०९... वगैरे क्षण येऊन गेले. मागील वर्षी येऊन गेलेल्या ११ नोव्हेंबर २०११ या दिवशी ११ वाजून ११ मिनिटे ११ सेकंद या वेळेत ११ हा आकडा ६ वेळा किंवा १ हा आकडा १२ वेळा येऊन गेला होता. तो याहीपेक्षा जास्त येण्याची वेळ यापूर्वी सन ११११ मध्ये येऊन गेली होती, पण त्या काळात सेकंदांपर्यंत अचूक वेळ दाखवणारी घड्याळेच अस्तित्वात नसल्यामुळे तब्बल अकरा हजार वर्षांमध्ये एकदा येऊन गेलेल्या या क्षणाचे महत्व कोणाच्या ध्यानातही आले नसेल. आता आणखी दोन दिवसांनी १२-१२-१२ हा दिवस उजाडणार असून त्या दिवशी दुपारचे १२:१२:१२ वाजणार आहेत. अशा प्रकारच्या गणिती योगायोगाची ही या शतकातली शेवटची संधी आहे. इंग्रजी कॅलेंडर्समध्ये कधीच तेरावा महिना येत नसल्यामुळे गेली बारा वर्षे दर वर्षी येणारा अशा प्रकारचा योग आता यानंतर एकदम सन २१०१ मध्ये येईल.

गेली अकरा वर्षे हे विशिष्ट वेळांचे क्षण त्यांच्या त्यांच्या ठरलेल्या वेळी येऊन गेले. त्यातल्या कोठल्याही क्षणी नेमके काय घडले? खरे तर कांही म्हणजे कांहीसुद्धा झाले नाही. बाहेर अंधार, उजेड, ऊन, पाऊस वगैरे सगळे काही ऋतुमानाप्रमाणे होत राहिले. कुठे पावसाची भुरभुर आधीपासून सुरू असली तर त्या क्षणानंतरही ती तशीच होत राहिली. तो क्षण पहायला सूर्य कांही त्या वेळी ढगाआडून बाहेर आला नाही. वारा मंद मंद किंवा वेगाने वहात होता आणि पानांना सळसळ करायला लावत होता. सगळे कांही अगदी नेहमीसारखेच चाललेले होते. आणि त्यांत कांही बदल होण्याचे कांही कारण तरी कुठे होते?

निसर्गाचे चक्र अनादी कालापासून फिरत आले आहे. त्या कालचक्राची सुरुवात कशी आणि कधी झाली हे सुद्धा आपल्याला माहीत नाही. माणसानेच कुठून तरी वेळ मोजायला सुरुवात केली आणि आपण त्यातल्या विशिष्ट आकड्यांपर्यंत पोचत राहिलो. तारीख, महिना, वर्ष, तास, मिनिटे, सेकंद हे सगळे माणसाच्या मेंदूतून निघाले आहे आणि त्याच्या सोयीसाठी तो ते पहात राहिला आहे. निसर्गाला त्याचे कणभर कौतुक नाही. गेल्या अकरा वर्षांत अगदी योगायोगानेसुध्दा त्यातल्या अशा प्रकारच्या विशिष्ट तारखांना विशिष्ट क्षणी कोठलीच महत्वाची अशी चांगली किंवा वाईट घटना जगात कुठेच घडली नाही. न्युमरॉलॉजी वगैरेंना शास्त्र समजणार्‍यांनी याची नोंद घ्यावी.

आता या वर्षी या शतकातले १२:१२:१२:१२:१२:१२ असे सहावार बारा वाजणार आहेत. तेंव्हासुध्दा त्यामुळे काही विशेष घडण्याची कणभर शक्यता मला दिसत नाही. पहायला गेल्यास 'बारा वाजणे' या वाक्प्रचाराला मराठी भाषेत (आणि कदाचित हिंदीतसुध्दा) वेगळा खास अर्थ आहे. दोन हजार बारा या वर्षात त्या अर्थाने अनेकजणांचे 'बारा' वाजून गेले. भारतीय क्रिकेट टीम त्या बाबतीत आघाडीवर दिसते. इंडियन ऑलिंपिक समिती, बॉक्सिंग फेडरेशन वगैरेंचेही असेच हाल झाले आहेत. भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे बाहेर आली म्हणून संबंधित लोकांचे बारा वाजले म्हणावे तर त्यासाठी सुरू झालेल्या लढ्यातच फाटाफूट पडून त्याचेही बारा वाजल्यागत झाले आहे. हे वर्ष संपेपर्यंत उरलेल्या तीन आठवड्यात आणखी कोणाकोणाचे काय काय होणार हे पहायचे आहे.

दक्षिण अमेरिकेतल्या कुठल्याशा जमातीच्या ऋषीमुनींनी प्राचीन काळात लिहून ठेवलेल्या भविष्याप्रमाणे सगळ्या जगाचेच आता बारा वाजणार आहेत असा धाक काही लोक दाखवत आहेत. २००० साली वायटूकेमुळे होऊ पहाणारा अनर्थ किंवा त्याचा केला गेलेला बाऊ मानवनिर्मित होता आणि माणसांच्याच सावधगिरीमुळे किंवा हुषारीने तो तर टळला, आता हे 'दैवी' सिध्दी प्राप्त झालेल्या लोकांनी वर्तवलेले इंकांचे तथाकथित भविष्यही काही दिवसांनी टाईमबार्र्ड होईल.

ते काही का असो, परवा येणा-या बारा तारखेला दुपारी बारा वाजून बारा मिनिटे आणि बारा सेकंद हा फक्त त्यातल्या संख्येच्या दृष्टीने विलक्षण असा क्षण तुम्ही आपल्या घड्याळात पाहून टिपू शकता आणि मनातल्या मनात त्यातला काल्पनिक थरार अनुभवू शकता. या क्षणी जन्माला आलेला एकादा महाभाग त्यामुळे अचाट सामर्थ्यवान झाला आणि तो सगळ्या जगाचे बारा वाजवणार आहे असे भविष्य कदाचित उद्या कोणी सांगेल आणि भोळसट लोक त्यावर विश्वासही ठेवतील. पण त्याचा पराक्रम किंवा ते भविष्य खोटे ठरलेले पहायला खूप वर्षे वाट पहावी लागेल.

विनोदमौजमजालेखविरंगुळा

प्रतिक्रिया

दादा कोंडके's picture

10 Dec 2012 - 2:39 pm | दादा कोंडके

दरवर्षी अशी एखादी वेळ कितीतरी (शे/हजार) वर्षांनी येते म्हणून ढकलपत्र फिरत असतात. पहिल्या एक-दोन पत्रांनंतर पाठवणार्‍याची कानउघडणी केली पण नंतर कंटाळा आला. मी म्हणतो, ठिक आहे. आकड्यांच्या गमती ना, पण मग अशावेळी लो़क २०१२ मधल्या २० कडे का दुर्लक्ष करतात? थोडसं पुढं जाउन अजून एका अंकाकडे दुर्लक्ष केल्यावर ती गंमत जास्त वारंवारीतेने अनुभवता येइल. असो.

आनंद घारे's picture

11 Dec 2012 - 10:30 am | आनंद घारे

१९९९ सालापर्यंत कुठल्याही वर्षाचा उल्लेख फक्त शेवटून दोन आकड्यांमध्येच होत होता. "अमक्याचा जन्म ४५ साली झाला, त्याचं लग्न ७१ साली झालं, भारताला स्वातंत्र्य ४७ साली मिळाले, आणीबाणी ७५ साली लागली, जनता पार्टीचं राज्य ७७ साली आलं" असेच उल्लेख बोलण्यात येत होते. काँप्यूटर मेमरी कमी असल्यामुळे त्यात तारीख घालतांना वर्षाची नोंद फक्त दोन आकड्यांमध्ये होत असे. यामुळे वायटूके हा प्रॉब्लेम निर्मांण झाला.
२० या आकड्याकडे मुद्दाम दुर्लक्ष केले जाते असे म्हणता येणार नाही.

दादा कोंडके's picture

12 Dec 2012 - 2:55 pm | दादा कोंडके

मला वाटतं २००० सालापासून तारखे साठी चार फिल्ड्स ठेवायला सुरवात झाली आहे.

आनंद घारे's picture

13 Dec 2012 - 12:55 pm | आनंद घारे

सन २००० नंतर चार आकडी संख्या लिहिणे सुरू झाले आहे. त्यामुळे आज आपण २०१२ असेही म्हणतो. पण मी मागच्या शतकातला आहे. पत्रात किंवा चेकवरसुध्दा तारीख टाकतांना ती शेवटच्या दोनच आकड्यात लिहिण्याचीच सवय मला जडली होती.

अन्या दातार's picture

11 Dec 2012 - 10:37 am | अन्या दातार

१२/१२ ही बारामतीच्या साहेवांची जन्मतारीख.

आनंद घारे's picture

11 Dec 2012 - 7:36 pm | आनंद घारे

बारा बारा आणि बारामती!

सुनील's picture

11 Dec 2012 - 10:10 pm | सुनील

मजेशीर लेख!

आताच ही बातमी वाचली. मुंबईच्या ब्रॅन्डन परेरा आणि एमिली डिसिल्वा यांनी साखरपुडा केला १०/१०/१० रोजी. कोर्टात रजिस्टर लग्न केले ११/११/११ रोजी. आणि आता चर्चमध्ये देवा-पाद्र्याच्या साक्षीने लग्न करणार आहेत १२/१२/१२ रोजी! (पुढचे प्लॅनिंग माहित नाही ;))

स्लॉट मशिनमध्ये नाणी टाकून किरकोळ जुगार खेळणार्‍यांना ७-७-७ चे महत्त्व वेगळे सांगायला नकोच! जॅकपॉट-जॅकपॉट म्हणतात तो हाच.

तर अशाच ७/७/७ रोजी सॅन डियोगेच्या लग्न कचेरीत एका परिचिताच्या लग्नाला जाण्याचा योग आला होता. विशेष म्हणजे, शनिवार असूनदेखिल ते सरकारी कार्यालय उघडे होते. तब्बल ५० जोडप्यांनी लग्नासाठी नाव नोंदणी केली होती! ती ५० जोडपी अधिक त्यांचे नातेवाईक आणि इष्टमित्र. परिसरात जत्रा उसळली होती! नेमून दिलेली दहाची वेळ केव्हाच टळून शेवटी साडे-अकराच्या सुमारास आमच्या ह्या जोडप्याचा क्रमांक लागला. टेबल बूक केलेल्या खाणावळीला फोन करून वेळ वाढवून घ्यावा लागला.

असा महिमा ७/७/७ चा!

आमच्या एका परिचितांचे लग्न होते, ६ जुलै २००८ ला, मुहूर्त ठेवला होता सकाळी ९ वा. १० मिनिटांचा :)

६-७-०८:९:१० :D

आनंदी गोपाळ's picture

12 Dec 2012 - 1:03 am | आनंदी गोपाळ

वाजून गेले. तारखेचे तरी.;)

ह भ प's picture

12 Dec 2012 - 9:59 am | ह भ प

एक १२:१२:१२ गेलिये.. दुसरी आता येइल..

आनंद घारे's picture

13 Dec 2012 - 12:49 pm | आनंद घारे

आणखी १०० वर्षांनी सन २११२ मध्ये ती (दुसरी) येईल. ती पहाण्यासाठी द्विशतायुषी भव.

आनंद घारे's picture

13 Dec 2012 - 12:46 pm | आनंद घारे

बारा वाजले