परतुनी येईन मी....
जीवनाचे युद्ध चालू, कालपुरुषा जिंकण्या
लागली माघार घ्यावी शस्त्र माझे टाकुनी
दैव जरिही रुष्टले, आशा दिली ना सोडुनी
परतुनी येईन मी उरली लढाई खेळण्या ॥१॥
कर्म माझ्या वाटचे, झाले न माझ्या हातुनी
रंगुनी स्वप्नात पुढच्या, आज गमवुन बैसलो
मार्ग माझा उजळण्याची वाट पाहत राहिलो
भाग्य की, झालो शहाणा ठेच एकच लागुनी ॥२॥
अपयशाचा डंख जाणिव देत राही आतुनी
आतल्या ज्वालामुखीची आग पेटवणार मी
शस्त्र जरि गेले तरीही सोडले ना धैर्य मी
जिंकण्या येईन मी ब्रम्हास्त्र सोबत घेऊनी ॥३॥
दौडुनी येईन सारी शक्ति एकवटून मी
नेत्र उघडुन सज्ज होतिल दशदिशा मज पाहण्या
परतुनी येईन मी उरली लढाई खेळण्या
आणि मग जिंकून सारे विश्व हे जाईन मी ॥४॥
प्रतिक्रिया
30 Jun 2008 - 11:26 am | कौस्तुभ
छान आहे कवीता !!