बाप माणूस

बहुगुणी's picture
बहुगुणी in जनातलं, मनातलं
21 Sep 2012 - 3:51 am

मी आज हे एक बाप म्हणून लिहितोय
तुला स्वतःला मूल होईपर्यंत कळणार नाही,
आनंदापलिकडची अनुभुती, प्रेमापल्याडची प्रीती
जी बापाच्या हृदयात उचंबळते पोराकडे पाहून
नाही कळणार तुला, कसला अभिमान असतो तो एका पुरुषाला
आपण आहोत त्यापेक्षा खूप मोठं होण्याचा आणि ते परंपरेने चालू ठेवण्याचा
काहीतरी चांगलं आणि आशादायी पोराच्या हाती ठेवण्याचा

आणि नाही कळणार तुला त्या वडिलांचा आक्रोश
जेंव्हा कधी त्यांच्या मनातले दैत्य त्यांना 'ते पुरूष' बनू देत नाहीत
जे त्यांच्या मुलाने पहावेत असं त्यांना मनापासून वाटतं

तुला फक्त दिसतोय तो तुझ्यासमोरचा माणूस
जो तुझ्यावर सामर्थ्य गाजवतोय, भल्यासाठी वा बुर्‍यासाठी
ते सामर्थ्य जे तो सहजपणे सोडून देउ शकत नाही
असा तो माणूस असणं, हा आधिकार असेल, पण ते ओझंही आहे रे!

बापाकडून मुलाकडे दिलं जावं असं काहीतरी असतं
पण ते सहज कधी व्यक्त होत नसतं
आपण अशा कालात जगतो आहोत की कसं शब्दांत मांडावं,
मनाच्या गाभार्‍यातून बोलणं कठीण होऊन बसलंय
हजार निरर्थक गोष्टींनी आपलं आयुष्य भरून वाहून चाललंय
आणि हृदयातली कविता अबोल होऊन रहाते

म्हणून मला आज प्रामाणिकपणे बोलायचंय
नाही आहेत माझ्याकडे तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं
पण मला समजताहेत तुझे प्रश्न
तुझी शोधाची धडपड, पुढे जाण्याची ऊर्मी, कळतेय मला
आणि खरं सांगू? तुझ्या डोळ्यात आणि तुझ्या दिवसांत मला माझंच प्रतिबिंब दिसतंय
तुला नाही कळायचं कदाचित, पण मीही तिथून गेलोय

मीही शिकलोय चालायला, पळायला, धडपडायला
मला माहीत आहे भीती, संताप, दु:ख
माझंही हृदय भंगलंय कधी, रडलोय अश्रू आनंदाचे तसंच दु:खाचेही
अशी वेळ होती कधी जेंव्हा पुन्हा उजेड दिसेल असं वाटलं नाही
आणि अशीही, जेंव्हा मला आवेगाने वाटलं
आनंदाने नाचावं, गावं आणि दिसेल त्या प्रत्येकाला कवेत घ्यावं

मला स्वतःला जेमतेम उभं रहायचं बळ असतांना मी इतरांना खांद्यावर घेऊन चाललोय
पण कधी चालण्याच्या नादात इतरांना मागे सोडून पुढे आलोय, त्यांचे आशेने पुढे आलेले हात तसेच ठेवून
कधी कधी मला वाटतं, मी इतरांपेक्षा आधिक काही केलंय
कधी असं वाटतं की मी विश्वासघातकी थापाड्या आहे, म्हणून हरलो आहे
माझ्यात महानतेची चुणुक आहे तसाच निर्दयी अंधारही आहे

थोडक्यात, मीही माणूसच आहे, तुझ्याच सारखा

तू तुझा रस्ता चालशील, तुझ्या पृथ्वीवरून, तुझ्या कालात
पण माझ्यावर तळपला तोच सूर्य तुझ्याही माथ्यावर उगवेल रोज
आणि माझ्या आयुष्यात सरकलेलेच ऋतू तुझ्याही आयुष्यातून सरतील

आपण दोघे वेगळे असू ना, तसेच सारखेही असू

मी तुला हे सांगतोय कारण हा एक प्रयत्न आहे
माझ्या आयुष्याचे धडे तुला काही शिकवतील म्हणून
तुझं माझ्यात रुपांतर व्हावं म्हणून नाही हे
तू वेगळाच वाढ, त्यातच माझं मोठं सुख आहे
पण काळ सत्य दाखवतो, आणि सत्य तुझ्या-माझ्यापेक्षा मोठं आहे

तुझा बाप होणं, हा माझा सर्वात मोठा सन्मान होता
जेंव्हा माझं प्रेम तुझं शरीर बनून समोर आलं, तेंव्हा एका क्षणात एका रहस्याला स्पर्श केला मी!

जर मला एकच वर मिळाला, तर तो हाच असेल,
की माझी माया तू पुढे पोहोचवावीस
कारण अखेर, आयुष्यात याहून आधिक काय आहे?

- मूळ इंग्रजी मुक्तक कुणा मला अनामिक लेखकाचं/कवीचं आहे, मी रुपांतरित केलंय माझ्याकडच्या जुन्या संग्रहातून, शोध घेतला तर आज एका ब्लॉगवर हे मुक्तक वापरलेलं मिळालं, पण तिथेही मूळ कवीचा उल्लेख नाही.
[http://goodmorninggratitude.com/2012/06/17/a-letter-to-my-son-on-fathers...

मुक्तकआस्वादअनुभवभाषांतर

प्रतिक्रिया

काय कविता निवडली आहे तुम्ही बहुगुणी! सुरेख हो!
मी आई होताना माझ्या साथीदाराच बापात होणार रुपांतर पाहिलय. आपल वागण चुकल्याची बोचसुद्धा माझ्याकडे बर्‍याचदा उघड होते. अन जस माझ चुकल की मला जाणवुन देतात, तसच त्याच चुकल्यावर माझे फटकारेही तेव्हढ्याच भावनेने खाल्ले जातात.
आईच बर असत हो. नऊ महिने पोटात बाळगल्याचा अधिकार जन्मभर मिरवता येतो, पण बापाला मात्र वेळोवेळी अस सिद्ध कराव लागत आपल ममत्व जे आईपेक्षा कणभरही उण नसत.

फार सुरेख अनुवाद, बहुगुणी!
माझ्या वडिलांची, आजोबांची फार प्रकर्षाने आठवण करुन दिलीत! धन्यवाद.

शुचि's picture

21 Sep 2012 - 7:18 am | शुचि

वा! भारी लिहीले आहे. आवडले.

नगरीनिरंजन's picture

21 Sep 2012 - 7:42 am | नगरीनिरंजन

हृदयस्पर्शी!!

अन्या दातार's picture

21 Sep 2012 - 2:41 pm | अन्या दातार

टोपी काढल्या गेली आहे.

गणपा's picture

21 Sep 2012 - 2:51 pm | गणपा

सुरेख अनुवाद.

प्रभाकर पेठकर's picture

21 Sep 2012 - 3:35 pm | प्रभाकर पेठकर

विषय वेगळा असला तरी का कोण जाणे 'पत्रास कारण की, बोलायची हिंमत नाही' ही हृदयस्पर्षी कविता आठवली.

मुलात आणि वडिलांमध्ये 'संवाद' अत्यंत महत्त्वाचा असतो. प्रेमाची उब, शिस्तीची आवड, जबाबदारीची जाणीव आणि कुटुंब सदस्यांचं स्थान आपल्या पुढे ठेवण्याची वृत्ती वगैरे अनेक जबाबदार्‍या पुरुषांना वडिलांच्या भूमिकेत पार पाडाव्या लागतात. ह्याचा अर्थ वरील सर्व गुणांची आईत उणीव असते असा नाही. आईच्या बाबतीत ही आणि अशा अनेक भावना व्यक्त स्वरूपात असतात. सहज दिसणार्‍या असतात. वडिलांमध्ये त्या अव्यक्त स्वरूपात असतात. समजुन घ्याव्या लागतात. असो.

मदनबाण's picture

21 Sep 2012 - 3:50 pm | मदनबाण

सुरेख... :)
जेंव्हा माझं प्रेम तुझं शरीर बनून समोर आलं, तेंव्हा एका क्षणात एका रहस्याला स्पर्श केला मी!
>>>
अगदी... अगदी ! :)

सस्नेह's picture

21 Sep 2012 - 4:09 pm | सस्नेह

अनुवाद असला तरी भाव सहीसही उतरला आहे.
बाकी बापाला मुलापेक्षा मुलीची माया असते म्हणे.

शैलेन्द्र's picture

23 Sep 2012 - 11:04 am | शैलेन्द्र

असेलही.. बाकी बाप ही एक वृत्ती आहे, काही आयांमधेही ती असते..

पैसा's picture

23 Sep 2012 - 12:50 pm | पैसा

एका भावनापूर्ण मनोगताचा फारच छान अनुवाद!

ज्ञानराम's picture

26 Sep 2012 - 12:41 pm | ज्ञानराम

खूपच आवडले...____//\\_____ आभार

उपास's picture

7 Feb 2013 - 11:55 pm | उपास

बाप लिहिलय..
'मुस्कुरा लाडले मुस्कुरा..' आठवलं.. आमचं (माझ आणि माझ्या मुलाचं) अतिशय आवडतं गाणं.. त्यातलं 'मै तेरे जैसा ही था, ऐसा ही था..' ही ओळ तर कमाल आहे! तोच भाव ह्या अनुवादात मस्त पकडलाय..! मेड माय डे..

वाहीदा's picture

8 Feb 2013 - 6:12 pm | वाहीदा

डोळ्यात पाणी आणलंत, काका !
अन मला आठवतंय तुमचे ईमेल वाचताना देखील अश्याच डोळ्यांच्या कडा ओलावल्या होत्या !!
मला बाबा नाहीत पण बापाचे प्रेम म्हणजे काय हे तुमचे ईमेल वाचुनच कळल होतं ...
खुप खुप धन्यवाद !! आईबध्द्ल सगळेच लिहीतात पण 'बाप माणूस 'म्हणजे काय हे अनुवादातुन फारच छान समजवल तुम्ही ! ___/\____
~ वाहीदा

संदीप चित्रे's picture

9 Feb 2013 - 12:45 am | संदीप चित्रे

हा धागा जपून ठेवणार आहे!
>>तुझा बाप होणं, हा माझा सर्वात मोठा सन्मान होता
जेंव्हा माझं प्रेम तुझं शरीर बनून समोर आलं, तेंव्हा एका क्षणात एका रहस्याला स्पर्श केला मी!

जर मला एकच वर मिळाला, तर तो हाच असेल,
की माझी माया तू पुढे पोहोचवावीस
कारण अखेर, आयुष्यात याहून आधिक काय आहे?
>>
क्या बात है !!

बॅटमॅन's picture

9 Feb 2013 - 12:49 am | बॅटमॅन

जबराट म्हंजे लैच जबराट लिहिलंय. दंडवत स्वीकारावा साष्टांग __/\__

जुग जुग जियो सरजी.