अनेक व बहुतांशी व्यक्ती कोणाच्या तरी सांगण्यावरुन अथवा उत्सुकता म्हणून शेअर बाजारात पडतात (दोन्ही अर्थाने). मग पस्तावतात, नाद सोडून देतात.
पण खरच शेअर बाजार माझ्यासाठी उपयोगी आहे काय? मी यातून संपत्ती निर्माण करु शकतो काय? या बाबत किती लोकं सिरिअसली विचार करतात. तुम्ही जर असा विचार करत असाल तर तुम्हाला हा लेख उपयुक्त आहे. (मात्र ज्याना अगोदरच शेअर बाजारातले बरेच काही कळते वा जे तज्ञ आहेत त्यांचे साठी हा लेख कवडी मोलाचा आहे, त्यानी म्या पामराला क्षमा करावी).
खरेदी करा व विसरुन जा.
देशातील एनएसीवर लिस्टींग झालेल्या पहिल्या पन्नास पैकी बँकींग सेक्टर मधील एक कंपनी, आयटी मधील एक कंपनी, ऑटो मधील एक कंपनी, पिएसयु मधील एक कंपनी, फार्मामधील एक कंपनी, एफएमसीजी मधील एक कंपनी अशा एकूण ६ प्रमुख आघाडीच्या कंपन्याची निवड करा (कंपन्यांची संख्या वगैरे तुमच्या क्षमतेनुसार कमी जास्त करा, सेक्टरची निवड तुमच्या वयानुसार व जोखिम स्विकारण्याच्या तयारीनुसार करा). या सर्व कंपन्यांचे प्रत्येकी आपल्या गुंतवणूकीच्या क्षमतेनुसार जेवढे खरेदी करता येतील तेवढे शेअर्स खरेदी करा. शक्य असल्यास प्रत्येक कंपनीचा किमान एक तरी शेअर प्रत्येक महिन्याला खरेदी करा व विसरुन जा. तुम्ही प्रथमत: गुंतवणूकीसाठी कंपनी निवडताना ती पहिल्या ५० पैकी असून तिला स्थापना होऊन किमान १५ ते २० वर्षे तरी झालेली आहेत अशीच निवडा. त्या कंपनीचे व्यवस्थापन हे अनुभवी, चांगले व्यावसाइक व पारदर्शी असावे. कंपनी नियमीत नफा मिळवणारी असावी. कंपनीची उलाढाल व नफा सतत वाढता आहे याची खात्री करा. आता तुम्ही त्या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहात म्हणजेच त्या कंपनीचे तुमच्याकडील शेअर्सच्या प्रमाणा इतके भागिदार झाले आहात हे पक्के समजा व सच्चा भागिदार हा वरचेवर शेअर्स विकत नसतो हे लक्षात ठेवा. टाटा, बिर्ला, अंबानी हे कधी त्यांच्या कंपनीचे स्वमालकीचे शेअर्स विकतात काय? तुम्ही सुध्दा त्यांच्याप्रमाणेच विचार करा म्हणजे तुम्हालाही शेअर्स विकण्याची बुध्दी होणार नाही.
हे आवर्जुन करा
जेव्हा जेव्हा बाजारात मंदी येवून तुम्ही घेतलेल्या शेअर्सचे भाव कमी होतील तेव्हा तुमच्याकडे असणारी रक्कम यात अवश्य गुंतवा व शेअर्सची संख्या वाढवा.
नियमीत अथवा जेव्हा जेव्हा शक्य असेल तेव्हा त्याच पुर्वी गुंतवणूक केलेल्या कंपन्यांचेच शेअर्स खरेदी करा.
आपल्याकडील अतिरिक्त रक्कम शेअर बाजारात गुंतवा.
हे करु नका
शेअर्स विकू नका.
वारंवार शेअर्स खरेदी विक्री म्हणजेच ट्रेडींग करु नका.
डे-ट्रेडिंग अजिबात करु नका, हे फक्त ब्रोकरसाठी फायदेशिर व तुमचे नुकसान करणारे होते.
अफवांवर विश्वास ठेवू नका.
लोकांच्या टिपस् वर विसंबू नका.
कर्ज काढून शेअर्स खरेदी करु नका.
लक्षात ठेवा
बाजारात मंदी अथवा तेजी असली तरी या कंपन्या त्यांचा व्यवसाय चालूच ठेवत असतात.
नियमीत नफा मिळवत असतात.
नियमीत लाभांश देत असतात.
हे शेअर्स बाजारात मंदी आली व शेअरची किंमत कमी झाली तरी अथवा तेजी आली व किंमत वाढली तरी तुमच्याकडील असणारे शेअर्स विकू नका.
आंबा, नारळ इ. दिर्घकाळ चांगले व नियमीत उत्पन्न देणारी बहुतांशी झाडाना फळ धारणा होण्यासाठी १० ते १५ वर्षे लागतात, तसेच तुम्ही गुंतवलेल्या शेअर्सवरचा लाभ चांगला मिळण्यासाठी काही वर्षे द्यावीच लागतील.
लवकर सुरुवात करा
तुम्हाला नोकरी अथवा व्यवसायातून नियमीत दर महा उत्पन्न मिळू लागले कि लगेचच तुमच्या उत्पन्नापैकी काही ठरावीक रक्कम नियमीतपणे कंपन्यांच्या शेअर्समध्येच गुंतवावयास सुरुवात करा. लवकर व तरुणपणी सुरुवात करण्याचा फायदा हा आहे कि, सुरुवातीच्या काळात जास्त जबाबदा-या नसतात तेव्हा जास्तीत जास्त रक्कम या प्रकारे नियमीत दरमहा गुंतवता येईल. तरूण वय असल्यामुळे जोखिम स्विकारण्याकडेही कल असतो. तुमचे उत्पन्न जस जसे वाढत जाईल त्या प्रमाणात गुंतवणूकही वाढवत न्या. लग्ना नंतर व होम लोन वगैरे हप्ते सुरु झाल्यावर गुंतवणूक कमी करावी लागेल, म्हणून आत्ताच सुरुवात करा. तुम्ही फक्त नियमीत शेअर्स खरेदी करत रहा, त्याच्या भावाकडे अजिबात पाहू नका. मनाशी पक्के ठरवा कि तुम्ही तुमच्या भविष्यात चांगली संपत्ती निर्माण करण्यासाठी गुंतवणूक करत आहात.
काय परतावा मिळेल?
१) दर वर्षी या आघाडीच्या कंपन्या, त्याना होणा-या नफ्यापैकी काही रक्कम डिव्हीडंड (लाभांश) म्हणून समभागधारकाना देतात. हे तुमचे करमुक्त उत्पन्न असते. तसे पहाता सुरुवातीला हे उत्पन्न फारच नगण्य वाटेल. चांगले उत्पन्न मिळण्यासाठी काही वर्षे वाट पहावी लागेल.
२) या कंपन्या जेव्हा केव्हा बोनस शेअर देतील तेव्हा तुमच्याकडील शेअर्सची संख्या त्या प्रमाणात वाढेल व मिळणारे लाभांशाचे उत्पन्नही वाढत जाईल.
३) या कंपन्या काही वेळा राईट इशु आणतात, तेव्हा बाजारापेक्षा कमी भावाने तुम्हाला शेअर्स मिळतात.
४) या कंपन्या काही वेळा शेअर्स स्पि्लट करतात, या वेळीही तुमच्याकडील शेअर्सची संख्या वाढेल.
५) तुमच्याकडे जेवढे जास्त शेअर्स तेवढे तुमचे लाभांशाचे उत्पन्न जास्त मिळते.
६) तुम्ही प्रथमत: गुंवणूकीला सुरुवात केल्यानंतर पहिल्यांदा जेव्हा लाभांश मिळेल त्याचे प्रमाण फारच अल्प म्हणजे १.५% ते ३% (तुमच्या गुंतवणूकीच्या तुलनेत) एवढेच मिळेल.
७) जस जसे तुमच्याकडील शेअर्सची संख्या वाढत जाईल व काही (किमान २०) वर्षे निघून जातील तेव्हा मिळणारा वार्षीक लाभांश हा सरासरी २५% ते १००% (किंवा या पेक्षा जास्त सुध्दा) या प्रमाणात (तुमच्या गुंतवणूकीवरील प्रमाणानुसार) काळानुसार वाढत जाईल.
८) जर तुम्ही तुमच्या गुंतवणूकीची सुरुवात वयाच्या २० ते २५ या दरम्याने केलेली असेल व जर तुम्ही नियमीतपणे वयाच्या ५५ व्या वर्षापर्यंत गुंतवणूक करत रहाला तर नंतर दर वर्षी मिळणारे लाभांशाचे उत्पन्न तुमच्या सा-या गरजा भागवू तर शकेलच, परत तुमच्याकडे चांगली संपत्ती (शेअर्सचे मुल्य) निर्माण झालेली असेल.
टिप: मी शेअर ब्रोकर नाही. तुम्ही कोणाकडेही डिमँट खाते उघडा पण शक्यतो बँकेशी संलग्न असणारा ब्रोकर निवडा. सेवा चांगली असल्याची खात्री करा.
प्रतिक्रिया
1 Jun 2012 - 8:44 pm | सुकामेवा
माझी पद्धत जरा वेगळी आहे, ती खालील प्रमाणे ..
मी १० रु चे १० शेअरस घेतले त्याची किंमत होते १०० रु.
मग मी त्यावर दोन गोष्टी वर लक्ष ठेवतो एकतर त्याची किंमत ५% तोटा किंवा २५% फायदा याची वाट बघतो.
१०० रु १२५ रु होतात त्या वेळेला मी माझे १०० रुपये जी मुद्दल आहे ती काढून घेतो आणि बाकीचे ज्या २५ रु शेअरस ठेवून देतो मग त्याकडे डूकुन पण बघत नाही, मग त्या शेअरसचे काहीही होवो.
2 Jun 2012 - 1:12 pm | सदानंद ठाकूर
याचा अर्थ तुम्ही जास्त जोखीम स्विकारु इच्छीत नाही.
हरकत नाही तुमच्या पध्दतीने का होईना शेअर बाजारात गुंतवणूक करत रहा. नियमीत करा. दिर्घ काळ करत रहा. फायदा होईल.
नुकसानीत विकू नका, सरासरी करा व वाट पहा.
फक्त चांगली कंपनीच निवडा.
सुत्रः
कमी जोखीम - कमी उत्पन्न
मध्यम जोखीम - मध्यम उत्पन्न
जास्त जोखीम - जास्त उत्पन्न
(वरील सुत्र फक्त गुंतवणूकीसाठी वापरावे - जुगारासाठी नको.)
2 Jun 2012 - 11:56 am | विजुभाऊ
काही शंका आहेत कदाचित बाळबोध वाटतील
शेअरची किंमत वाढते कशामुळे?
शेअर बाजारात पैसे प्रत्यक्ष गुंतवणे आणि ते युलिप द्वारे गुंतवणे यात दीर्घ कालीन गुंतवणूक कशात फायदेशीर ठरते? ( युलिप लाईफ रिस्क कव्हर करत नाहीत हे गृहीत धरून)
2 Jun 2012 - 1:00 pm | सदानंद ठाकूर
१) शेअरची किंमत वाढण्याची कारणे
कंपनीची नफा कमावण्याची क्षमता वाढते.
प्रती शेअर मिळणारे उत्पन्न वाढते.
शेअर्स - मागणी वाढते, पुरवठा कमी पडतो.
काहीवेळा सट्टेबाजी परिणाम करते. (तात्पुर्ता परिणाम).
अन्य बरीच टेकनीकल कारणे असतात त्याचा येथे उहापोह करणे शक्य नाही.
२) शेअर बाजारात पैसे प्रत्यक्ष गुंतवणे आणि ते युलिप द्वारे गुंतवणे यात दीर्घ कालीन गुंतवणूक कशात फायदेशीर ठरते?
सर्वात चांगले प्रत्यक्ष शेअर बाजारात गुंतवणूक करणे.
दुसरा चांगला पर्याय म्युच्युअल फंडाच्या डायव्हर्सिफाईड इक्वीटी योजनेत दिर्घ काळासाठी नियमीत गुंतवणूक करणे.
युलीप हे विमा व म्यु.फं. यांचे संकरित उत्पादन आहे, गुंतवणुकीसाठी योग्य समजले जात नाही (कारण अनेक प्रकारचे आकार असतात). युलीप मधून दिर्घ काळात बरा परतावा मिळू शकेल जर दिर्घ काळ नियमीत, शक्यतो दरमहा, गुंतवणूक केली तर, मात्र शक्यतो हा पर्याय निवडू नये.
2 Jun 2012 - 11:27 pm | अमृत
वाचन्खूण साठविली आहे.
अमृत
3 Jun 2012 - 1:05 pm | मराठी_माणूस
लेखा बद्दल धन्यवाद
प्रत्येक आघाडीमधुन प्रमुख/गुंतवणूक योग्य अशा २ ते ३ कंपन्यांची नावे सुचवु शकाल का
3 Jun 2012 - 3:15 pm | निनाद मुक्काम प...
चांगला लेख व तुमचा ब्लॉग सुद्धा लय भारी
एक शंका आहे
मी अनिवासी भारतीय आहे: व आपण जसे लिहिले आहे: कि शेअर मधील गुंवणूक *
ही २० ते पंचवीस वर्ष ठेवल्यावर मग तिचे रिटर्न चांगले येतात:
मग मी दीर्घ कालावधी साठी स्थावर मालमत्तेत जर गुंवणूक केली तर फायदा तर नक्की पण भाडेकरू ठेवून उत्पन्न सुध्दा मिळू शकेन:
मग फंड किंवा शेअर मध्ये गुंवणूक करण्याचा अतिरिक्त फायदा काय
3 Jun 2012 - 3:39 pm | दादा कोंडके
परतावा म्हणून विचार करण्याइतपतच शेअर्स आणि स्थावर मालमत्ता यांची तुलना होउ शकते. पण स्थावर मालमत्तेवर, भाडेकरू ठेउन उत्पन्न मिळवणं एक डोकेदुखी ठरू शकते. तुम्ही त्या जागेपासून दूर असाल तर मग विचारच करू नका.
त्यामानाने शेअर्स क्लीन इन्वेस्टमेंट असेल.
4 Jun 2012 - 10:32 am | उदय
काही मते जरा टोकाची वाटली, उदा. शेअर्स विकू नका.
१ मत पटले नाही: या कंपन्या काही वेळा शेअर्स स्पि्लट करतात, या वेळीही तुमच्याकडील शेअर्सची संख्या वाढेल. >> शेअर २:१ स्प्लिट झाला तर स्प्लिटनंतर शेअर्सची संख्या दुप्पट होते, पण शेअर्सची किम्मत निम्मी होते. टेक्निकली याचा काही फायदा नाही.
@ विजुभाऊ,
आपण कंपनीचा शेअर घेतो, तेव्हा आपण कंपनीचे अंशतः मालक होतो. कंपनीच्या भविष्यातील पैशाचा ओघ (future cash flow) साठी आपण भांडवल दिले आहे, असे समजा. भविष्यात कंपनीचा व्यवसाय वाढेल, कंपनी अधिक नफा मिळवेल अशी आपली अपेक्षा असते. जसा नफा वाढेल, तशी शेअर्सची किम्मतही वाढते. (आवड असेल तर मोहनीश पबराय याचे "धंधो इन्वेस्टर" हे पुस्तक जरूर वाचावे, असे मला सांगावेसे वाटते. त्यामध्ये cash flow, discounted cash flow, NPV इ. माहिती व how to analyse a stock याची माहिती सरळ सोप्या भाषेत दिली आहे.)
@ निनाद,
स्थावर मालमत्ते (real estate) मुळे ४ प्रकारे फायदा होऊ शकतो, 1. Cash flow 2. Equity build-up 3. Tax benefits 4. Price appreciation
माझ्या मते, स्थावर मालमत्ता आणि शेअर मार्केट हे asset allocation चे २ प्रकार आहेत. दोन्हीचे काही फायदे आहेत, काही लिमिटेशन्स आहेत, पण हा एक वेगळा विषय होऊ शकतो, म्हणून इथे फार काही लिहित नाही. (व्य. नि. करावा.)
4 Jun 2012 - 10:43 am | निनाद मुक्काम प...
पण मंदीच्या काळात शेअर मार्केट पडले. व पण रियल इस्टेट जगात पडले तरी भारतात त्यामानाने....
कदाचित काळा पैसा गुंतला असेल
पण जगातील सर्वात आकर्षक व तेजेईने वाढणारे रियल इस्टेट म्हणून भारताचा लौकिक आहे.