मास्तर - २

संजय क्षीरसागर's picture
संजय क्षीरसागर in जनातलं, मनातलं
23 May 2012 - 12:13 am

पु. लं. च्या आठवणी लिहिताना सुनीताबाईंनी म्हटलं होतं की हा माणूस कोणत्याही प्रसंगी विनोद करू शकतो! आणि एक किस्सा सांगितला होता.

एकदा वरांदा घाटात सुनीताबाई गाडी चालवत होत्या आणि मागे पु. लं., वसंतराव देशपांड्यांबरोबर गप्पा मारत बसले होते. संध्याकाळ केव्हाच होऊन गेली होती आणि अंधारात गाडी चढणीवर असताना एकदम काही तरी समोर चमकलं म्हणून त्यांनी ब्रेक लावला आणि त्या शहारल्या; समोर एक धिप्पाड गवा गाडीकडे बघत उभा होता! त्यांनी लिहिलंय, समोर साक्षात मृत्यू आणि वरांदा घाटाची चढण, म्हणजे मागे जाण्याची सोय नाही आणि तशात तो गवा गाडीच्या दिशेनं यायला लागला. वसंतरावांना परिस्थितीचं गांभीर्य लक्षात आलं आणि ते म्हणाले, `पी. एल... ही इज मार्चिंग टोवर्डस अस! '
यावर पु. ल. नि काय म्हणावं? `अग सुनीता बघ, रेड्याला कळू नाही म्हणून वसंता इंग्रजीत बोलतोय!'
________________

मास्तरांना एका स्कूटरवाल्यानं उडवलं आणि त्यांच्या मित्रानं त्यांना ससूनला अ‍ॅडमिट केल्याचा मला फोन आला. ससूनला या काय कोणत्याच जन्मात मी गेलो नसतो पण मास्तर म्हटल्यावर कसाबसा धीर करून एका मित्राला घेऊन तिथे पोहोचलो. जनरल वॉर्डमध्ये कॉट्स इतक्या जवळजवळ लावल्या होत्या की एक माणूस दोन कॉट्समध्ये जेमतेम उभा राहू शकेल. वातावरण म्हणजे असं की मला स्मशानाची भीती वाटत नाही पण तिथे मला उभ्या उभ्या चक्कर यायला लागली. मास्तरांच्या हिप बोनचा बॉलच क्रॅक झाला होता आणि पाय समोरच्या बाजूला एका रॉडला टांगून ठेवला होता. त्यांच्या शेजारी त्याच अवस्थेत दुसरा एक पेशंट पहुडला होता आणि कहर म्हणजे तो त्या परिस्थितीत, खुद्द हॉस्पिटलामध्ये, बिनधास्त सिगरेट फुंकत होता!

तीन लहान मुलांचा संसार मास्तरवर टाकून ऐन उमेदीत साध्या न्युमोनियानं बायको गेलेली, हातावर पोट असणारा हा माणूस, कुणाचा म्हणून आधार नाही. मी त्यांच्याकडे बघितलं, मास्तरचा चेहरा मात्र नेहमी सारखा प्रसन्न! मला शब्द फुटेना.

काही तरी बोलायचं म्हणून मी म्हणालो `मास्तर तुमचा जोडीदार बघा सिगरेट ओढतोय'
यावर मास्तरांनी काय म्हणावं? `बरं झालं डॉक्टरचा राउंड नाहीए'
मूड कंटिन्यू करायला मी म्हणालो, `समजा आता डॉक्टर आले तर काय होईल?'
`डॉक्टर म्हणतील बाहेर जा आणि सिगरेट ओढून ये!
______________________

मास्तर म्हणाले 'पोलिस येऊन गेले, मी त्यांना म्हणालो, आपली काही कुणाविषयी तक्रार नाही आणि त्यांना ते म्हणत होते तिथे सही करून दिली'.

मला बुद्धाची तथाता काय आहे माहिती होतं, `प्रसंग काय वाटेल तो असो, मंजूर करायचा', प्रसंगाचा तुमच्यावर शून्य परिणाम होतो. मी स्वतःला त्यांच्या जागी ठेवून बघितलं.. आणखी दहा जन्म जरी साधना केली तरी किमान नियतीला तरी मी दोष दिलाच असता! मला वर्तमानात भविष्य दिसायलाच लागलं असतं. आपली काहीही चूक नसताना, प्रसंगाशी सामना करायची आर्थिक आणि कौटुंबिक परिस्थिती नसताना, रोजच्या जगण्याचे प्रश्न असताना विनाकारण नवा छळ?

______________________

मला नियतीचा डाव कधीही कळला नाही, सत्याचा इतका उघड बोध असताना देखील नियतीला मला हे विचारता येत नाही की तुला किमान तारतम्य तरी नाही का? ओशोंसारखा दुनिया झुलवणारा सिद्ध देखिल जेव्हा फासे उलटे पडायला लागले तेव्हा म्हणाला होता, `प्रकृती अंधी है!', तिथे आपल्या सारख्यांची काय कथा? मला वाटतं उगाच नाही ज्ञानी पुरुषांनी नियतीला स्त्रिधर्मी शब्द निवडला, एखाद्या मूर्ख स्त्रीसारखी , तिला जो रिझवू शकतो त्याच्यावरच नियती वार करते!

ऑर्थोपेडिक सर्जरीजमध्ये कधी घडू नाही ती गोष्ट मास्तरच्या बाबतीत घडली, मास्तरच्या संपूर्ण व्यवस्थित झालेल्या सर्जरीत इन्फेक्शन झालं आणि ते ही ससूनमध्ये! आता परत सगळं ओपन करायचं आणि अँटिबायोटिक्स देत इन्फेक्शन जाण्याची फक्त वाट बघायची की मग परत सर्जरी, किती वेळ लागेल काही सांगता येत नाही.

माझ्या क्लायंटचं ऑर्थोपेडिक हॉस्पिटल आहे मी त्याच्याशी बोललो आणि मास्तरांच्या मुलाला त्यांना ताबडतोप ससून मधनं तिकडे हालवायला सांगितलं. मास्तरच निव्वळ नशीब की ससूनच्या पॅनेलवरचा एक स्किनस्पेशॅलिस्ट आमच्या क्लबला यायचा आणि त्याची ओळख लावून मी तिथून 'अगेंस्ट मेडिकल अ‍ॅडवाइस' डिस्चार्ज मिळवला. ससूनमधनं नुसतं बाहेर पडणं सुद्धा जिकिरीच काम होतं. मी संध्याकाळी हॉस्पिटलला फोन केला तेव्हा कळलं की ससूनमधनं त्या हॉस्पिटलमध्ये जायला अँब्युलन्सचे देखील पैसे मास्तरांकडे नव्हते, पाय तुटलेल्या अवस्थेत मास्तर रिक्शानं हॉस्पिटलमध्ये आले होते.

मी डॉक्टरला सांगितलं, `आश्विन ट्रीट हिम ऍज इफ आय एम ऑन द बेड'
तो म्हणाला, `संजय, तू आहेस म्हणून सांगतो, फार काँप्लिकेशन्स आहेत, किती वेळ लागेल, किती खर्च होईल आणि यश येईल की नाही काहीच सांगता येत नाही'
मी म्हणालो, `काय करतात अशा वेळी?
तो म्हणाला, `वी अँप्युट द लेग! '
मी क्षणभर विचार केला आणि म्हणालो, `आश्विन आय स्टँड बाय हिम, गिव्ह हिम द बेस्ट पॉसिबल ट्रीटमंट, यू हॅव अ‍ॅन ओपन अकाउंट सो फार मनी इज कन्सर्न्ड '
आश्विन माझ्याकडे बघत राहिला, `कोण आहेत हे? '
मी म्हणालो, `मला शब्दात सांगता येणार नाही'

__________________________

मास्तरच्या घरनं वेळेवर डबा येणं शक्य नव्हतं, जवळच्या कँटिनला जाऊन मालकाला मी माझा फोन नंबर दिला आणि मास्तरचा रूम नंबर देऊन सांगितलं त्यांना वेळच्या वेळी खायला घालण्याची जवाबदारी तुमची, त्या रूमचा सगळा खर्च माझ्या नावावर लिहून ठेवा.

मानवी मनाबद्दल मला एक कुतूहल कायम आहे सहा-सहा वेळा फोन करून त्यांचा बँडमालक काय की त्यांनी तयार केलेला, लावणीसाम्राज्ञी बरोबर अमेरिकाला जाऊन आलेला शिष्य काय, की नातेवाईक काय, सगळ्यांना परिस्थितीचा अचूक अंदाज आला होता, एकजण हॉस्पिटलला फिरकला नाही, नुसत्या फोन वरून मास्तरच्या मुलीकडे जिव्हाळ्याच्या चौकश्या! मी मास्तरला म्हणालो 'मास्तर काय हो हे?

मास्तर म्हणाले 'लोक कामात असतील', मी त्यांच्याकडे बघतच राहिलो, शब्दातला एकही स्वर हालला नव्हता, सम चुकण्याची तर बातच सोडा!

कथा

प्रतिक्रिया

बॅटमॅन's picture

23 May 2012 - 1:01 am | बॅटमॅन

...............सध्या इतकेच म्हणतो.

भारी दिसतात मास्तर !!

अर्धवटराव

मी-सौरभ's picture

23 May 2012 - 1:07 pm | मी-सौरभ

सहमत

चौकटराजा's picture

23 May 2012 - 12:53 pm | चौकटराजा

संजय शेट ,आपण व्यक्तिगत आयुष्यात पैशा संबंधी व्यवसायात आहात. पण हे संदेवन शील
पणे लिहिता कसे काय ? फार उत्तम लिहिता आपण !

संजय क्षीरसागर's picture

23 May 2012 - 4:02 pm | संजय क्षीरसागर

मला असंच जुगार्‍यासारखं जगायची सवय आहे, माझी एक गजल आहे :

एका क्षणावरी या आयुष्य तोलुनी मी
चुकता हिशेब केला सार्‍याच जिंदगीचा...

पण तरी देखिल आपण हातात पत्ते असताना जुगार खेळतो आणि मास्तर हातात काही नसताना जुगार खेळू शकतात ही कमाल आहे!

सर्वांचे मनःपूर्वक आभार

प.पु.'s picture

23 May 2012 - 3:15 pm | प.पु.

एका क्षणावरी या आयुष्य तोलुनी मी
चुकता हिशेब केला सार्‍याच जिंदगीचा...