खटला ................भाग-१

जयंत कुलकर्णी's picture
जयंत कुलकर्णी in जनातलं, मनातलं
9 May 2012 - 9:41 pm

खटला..... !

त्या इमारतीच्या चवदाव्या मजल्यापर्यंत चढता चढता माझ्या तोंडाला फेस आला. एक तर या इमारतीतील लिफ्ट कधी चालू नसते त्यामुळे मी हल्ली मिलान व्हॅलेंटाईनकडे यायच्या भानगडीत पडत नाही. तोही आता तसा कमीच भेटतो. त्याची झोपडपट्टी पाडून तेथे २४ मजली इमारत झाली आणि आमच्या गाठीभेटी तशा कमीच झाल्या. आम्ही तसे आठव्ड्यातून एकदा चौपाटीवर कामानिमित्त भेटायचो पण आज जरा वेगळेच आणि अतिशय महत्वाचे काम काढले होते त्याने.

लिफ्ट बंद पडून दोन वर्षे झाली पण मालकाने ती काही दुरूस्त केली नव्हती.
“काय अपेक्षा आहे तुझी ? महानगरपालिकेने भाड्यावर बंधने आणली आहेत. लिफ्टसारख्या चैनीच्या वस्तूंसाठी आता पैसेच उरत नाहीत.” लिफ्टमधे भेटलेला मालकाचा दिवाणजी म्हणाला.
चैन ? त्या दहाव्या मजल्यावरच्या म्हातारीने काय करायचे ? मी विचारले.
“तिचे काय ?”
“आता नव्वदीला आली ती म्हातारी. हे जिने चढताना एकदा हार्ट अ‍ॅटॅकने मरणार आहे ती”
“हंऽऽऽ तिला जर ही भीती वाटत असेल तर तिने ही जागा सोडायला हवी. तिच्यापेक्षा इतरांनाच जास्त काळजी दिसते”

मी यावर वाद घालू शकलो असतो. या म्हातारीने ठरवले असते तरी ती तिचे सामान घेऊन कुठे जाऊ शकली असती? नवर्‍याच्या तुटपुंज्या पेन्शनवर कसेबसे जगत होती ती. ते सामान कोण हलवणार आणि नवीन जागेचे डिपॉझिट तरी कुठून आणणार होती ती ? मी बोललो असतो पण मला माहिती आहे त्याने त्याकडे दुर्लक्षच केले असते. तो दिवाणजी तरी काय करणार ? त्याचा एक मंदबुद्धी मुलगा आणि दमेकरी मुलगी यांच्या मुळे तो आयुष्याची लढाई हरल्यातच जमा होता. एक मोठा मुलगा होता पण तुरूंगात खितपत पडला होता. एकावर चाकूहल्ला केल्यामुळे. त्याच्या कडून काय अपेक्षा करणार .... त्या कुटुंबालाही भेटलो होतो मी अनेकदा. त्याची बायको कधी हसली होती की नाही कोणास ठाऊक...

हा दिवाणजीही आमच्या सारखाच होता आणि आमच्या सारखेच त्यालाही जीवनाची लढाई रोज लढावी लागत होती ज्यात दयेमायेला थारा नव्हता तर कनवाळूपणा कुठला येणार ?

मी मिलानच्या दरवाजावर ठोठावले. त्याच्या दरवाज्यावरचे बेलचे बटन केव्हाच तुटून लोबंत होते. त्याच्या मुलीने, एंजेलाने दार उघडले. आमच्यात नट्यांची नावे ठेवायची फॅशन केव्हा आली ते सांगता येणार नाही पण मी म्हणतो काय वाईट आहे त्यात ? चांगली नावे आहेत.. ती माझी वाटच बघत असावी. मिलान माझा मित्र असला तरी वयाने मोठा होता ही त्याची मुलगी होती १७ वर्षाची माझ्यापेक्षा तीन एक वर्षाने लहान असेल. चणीने नाजूक, काळाकुळकुळीत रंग आणि तिची ठेवण थेट आफ्रिकन वंशाची आठवण करून देत होती.
“मि. वेन...!असे म्हणून तिने हस्तांदोलनाला हात पुढे केला.
मी तो हातात घेतला आणि तिच्याकडे बघून हसलो.
“बाबा स्वयंपाकघरात वाट बघताएत सर !” ती म्हणाली.
“हे काय चालवलय, मिस्टर, सर मी एवढा का म्हातारा झालोय ? नाही ना ?” मी.
ती हसली. हसताना तिची मान तिच्या डाव्या खांद्याकडे आकर्षकपणे झुकत होती हे माझ्या लक्षात आले. मोठी लाघवी लकब !
“आई कुठे आहे तुझी ?” मी विचारले.
“ती मावशीकडे रहायला गेली. ममाला हे काही पसंत नाही म्हणून तीच गेली.”
मी मान डोलावली आणि त्या हॉलमधून उजव्या बाजूला असलेल्या स्वयंपाकघरात घुसलो.
फिकट पिवळ्या प्रकाशात ते अस्ताव्यस्त स्वयंपाकघर सावल्यांमुळे अजूनच अस्ताव्यस्त दिसत होते. तडे गेलेल्या बेसीन वर मिलान एका लाल रंगाच्या प्लास्टीकच्या मगमधून पाणी पीत उभा होता.. त्याचे पोट सुटले होते आणि ते तडे त्याच्या अंगातून फांद्या फुटाव्यात असे पसरले होते. कोपर्‍यातील एका टेबलावर मिणमिणत्या प्रकाशात विल्फ्रेड अर्ना बसला होता. त्याच्या मांडीवर एक मोठा लिफाफा त्याने काळजीपूर्वक हातात धरला होता. त्याची मान छातीवर झुकलेली होती. बारीक कापलेले केस आणि करपलेला गव्हाळ वर्ण. तो शहराच्या दक्षिण भागातून आलेला एक मजूर आहे हे सहज समजत होते. असे लाखो लोक त्या भागात राहून जगण्यासाठी कष्ट उपसत होते.

मिलानने त्याच्या सुकलेल्या जाड ओठांवरून आपली जिभ फिरवली आणि त्याने मानेनेच मला खूण केली.
“पाऊण एक तासात येतीलच सगळे”
“साक्षिदार ?” मी विचारले.
“ती माझ्याच खोलीत आहे”.
“लार्कचे वकीलपत्र कोण घेतय ?” मी विचारले.
हा प्रश्न ऐकल्याबरोबर विल्फ्रेडने मान वरती उचलली. त्याच्या डोळ्याखाली काळ्या वर्तूळांमधे लाचारी उमटली.
“मी ! “ मिलान म्हणाला “मी ही तुझ्याइतकेच कॉलेजमधे गेलो आहे. माझे शालेय शिक्षणही चांगल्या शाळेतून झाले आहे. एक्रा भागातील एक उच्च नितीमत्ता शिकवणार्‍या ख्रिश्चन शाळेत.
“त्याला इथे काही किंमत नाही हे मला वाटते मी सांगायला नको.” मी हसून त्या घानामधे जन्मलेल्या वाण्याला म्हणालो.
“का आजकाल त्यालाच किंमत आहे ? “ असे म्हणून तो मोकळेपणाने हसला.

मिलानचे हास्य म्हणजे शहरातील कडेवरच्या सर्व बालकांचे हास्य. जेव्हा तो हसे तेव्हा तुम्हाला सुखाची अपेक्षा करायला हरकत नाही असे वाटायचे. त्याचा पुरावाच तुमच्या समोर उभ असे.
“तुम्ही एंजेलाची खोली वापरू शकता” त्याने मला सांगितले. रात्री ती वनिताच्या सोबतीला झोपायला जाणार आहे”.
एवढे बोलून तो त्या खोलीतून निघून गेला. आता त्या खोलीत मी अणि तो विल्फ्रेड असे दोघेच उरलो. मी त्या बेसीनच्या वरच्या फळीवरून एका लाल रंगाच्या भांड्यातून औषधाचा वास येणारे शहरी पाणी एका ग्लासमधे ओतले आणि त्यातील थोडे पिऊन उरलेले त्या जुनाट बेसीनमधे ओतून दिले.
“विलफ्रेड मला वाटते आपण सुरवात करावी हे बरे” मी शक्य तितक्या सहज स्वरात हे म्हणायचा प्रयत्न केला पण त्यामुळे ते वाक्य अधिकच हास्यास्पद झाल्याचे मलाच जाणवले.

तो क्षणभर स्तब्ध बसला जणू काही त्यानी मी म्हटलेले ऐकलेच नव्हते. मग तो तसाच शांतपणे उठला, त्याचे खांदे तसेच पडलेले होते. शिक्षा झालेला एखादा आरोपी फासाकडे चालला आहे तसा...

२.
त्याला मी सगळी हकिकत सुरवातीपासून ते शेवटपर्यंत परत एकदा सांगायला सांगितली. अगदी त्या दिवसापासून जेव्हा लार्क थाईन्स त्या इमारतीत G६ नंबरच्या त्या छोट्या प्लॅटमधे रहायला आला होता ते आज सकाळी जे झाले तेथपर्यंत. ते झाल्यावर त्याच्या त्या कळकट्ट खाकी रंगाच्या लिफाफ्यातील सगळे कागद आम्ही नजरेखालून घातले. ते झाल्यावर त्याने शांतपणे .२५ बोअरचे पिस्तूल मला काढून दिले.

विलफ्रेड एंजेलाच्या गुलाबी रंगाच्या कॉटवर जरा उंचावर बसला होता तर मी गुबगुबीत गादी लावलेल्या तिच्या प्रसाधनाच्या आरश्यासमोरच्या एका स्टूलावर बसलो होतो. मी खोलीवर नजर फिरवली. सगळ्या भींती धावपटूंच्या आणि क्रिडापटूंच्या छायाचित्रांनी भरल्या होत्या. हंऽऽऽऽ सगळ्या मुली या वयात हेच करतात पण इतर बापांसारखे हिच्याही बापाला त्याच्या मुलीत काही विशेष आहे असे वाटत होतेच.

“तुझ्या मनात त्यावेळी निश्चित काय चालले होते ? मी विचारले. “तू कायद्याच्या वरती आहेस असे वाटते का तूला ? मंत्री बिंत्री आहेस की काय तू !”

आम्ही परत परत त्याने सांगितलेल्या कहाणीची उजळणी केली. उगच एखादा मुद्दा सुटायला नको. तो बिचारा सारखा रडत डोळे पुसत होता पण मी त्याला म्हणालो “या अश्रूंना आवर. त्याचा आज रात्रीतरी काही उपयोग होईल असे वाटत नाही”. मी त्या गोष्टीची वारंवार उजळणी करत होतो कारण जरी काय झाले आहे हे मला माहीत असले तरी मला माझे मत त्या माहितीने कलुषीत व्हायला नको.

मिलान,ज्या दिवशी माझ्या घरी मला या कामासाठी नेमण्यासाठी आला तेव्हा मी त्याला विचारले “आज तू, मला का बोलावतो आहेस ?”
“कारण तुझ्याकडे विद्यापीठाची पदवी आहे आणि तरीसुद्धा तू आमच्यातच रहातोस. तू दोन्ही बाजूने विचार करू शकतोस. तुझ्यासारखी माणसे असतील तर आम्ही प्रामणिक रहायचा प्रयत्न तरी करू शकतो”
“पण काही लोक याला कटही म्हणू शकतात हं”. मी म्हणालो.
“त्यांना काय म्हणायचय ते म्हणू देत. मला आणि तुला येथे रहायचे म्हणजे कशा कशातून जावे लागते हे चांगलेच माहीत आहे. या वस्तीत न्याय पोहोचेपर्यंत तो नुसता आंधळाच रहात नाही तर मुका नी बहिराही होतो.”.

मिलानचा स्वत:चाच एक रुबाब होता. त्याचा उदात्त विचारांवर भयंकर विश्वास होता. खरे तर हे विशेष होते कारण आम्ही रहातो त्या वस्तीत वेश्याव्यवसाय, गुंडागिरी, टोळ्या, अंमली पदार्थांचे यांचेच राज्य होते. कधी कोणाचा कशावरून खून पडेल हे कोणीही सांगू शकत नव्हते. पण मिलानचे सगळेच वेगळे होते. हे सगळे तात्कालिक आहे आणि समाज सुधारण्याच्या मार्गावर आहे यावर त्याचा ठाम विश्वास होता.

जेव्हा तो समाज म्हणायचा तेव्हा तो फक्त आमच्या बद्दल किंवा गोर्‍यांबद्दलच बोलायचा असे नाही. कोणाच्याही वेदना तो आमच्यात पाहू शकत असे. माझ्याकडे दुसरा कोणी या कामासाठी आला असता तर मी त्याला सरळ नाहीच म्हणून सांगितले असते पण मिलानला नाही म्हणणे माझ्या आवाक्याच्या बाहेर होते. नाही म्हणणे म्हणजे एखाद्याला त्याच्या जीवनाची संधी नाकारणे, असा त्याने सरळ अर्थ काढला असता.

विलफ्रेडची कहाणी सहा वेळा ऐकून झाल्यावर मी त्याच्या कागदपत्रांकडे वळालो. त्याने पोलिसांकडे नोंदवलेली तक्रार, पाच आठवड्यापूर्वीच त्याने जाहीर केलेले पेटिशन, ते जोसेट्टेचा ती पदवीधर झाली तेव्हाचा मोठा फोटो पर्यंत. तिच्या रोजनिशीची काही पानेही त्या कागदपत्रात होती.

ते बघून मला फार वाइट वाटले. त्या कागदपत्रांचा अभ्यास करायला मला अजून थोडे दिवस मिळाले असते तर बरे झाले असते असे वाटले तेवढ्यात दरवजावर टकटक झाली आणि माझी या त्रासदायक विचारातून मुक्तता झाली.

एंजलाने आत डोकावले अणि म्हणाली “ डॅडींचा निरोप आहे – वेळ झालीए मि. वेन..म्हणजे रॉबर्ट....
“ठीक आहे ठीक आहे... आलोच आम्ही” मी हसून म्हणालो. तिनेही माझ्याकडे बघत हसून दार बंद करून घेतले.
विल्फ्रेडच्या खांद्यावर हात ठेवत मी म्हटले “चल जायची वेळ झाली आहे”.
न उठता त्याने नुसतेच माझ्याकडे बघितले...
“तू माझ्यासाठी जे काय करतो आहेस त्यासाठी मी तुझा खरेच आभारी आहे. नाहीतर तू मला पोलिसांच्या ताब्यात देऊन हात झटकू शकला असतास. तेच तुझ्यासाठी बरं होते..”
“बरे असणे हे सर्वोत्तम असतेच असे नाही” मी माझ्या एका जून्या मित्राचे, मार्क्विसचे वाक्य त्याच्या तोंडावर फेकले. त्याला ही अशी वाक्ये तयार करायचा छंद होता. ते वाक्य उच्चारल्यावर मला अगदी बरे वाटले. खरे तर काहीच कारण नव्हते. माणसाचा ईगो कशाने सुखावला जाईल हे सांगता येत नाही.

विलफ्रेडने एक मोठा आवंढा गिळला आणि थरथरत्या हाताने तो लिफाफा घट्ट धरून तो उभा राहिला.......

क्रमश:....

खटला....भाग-२

जयंत कुलकर्णी.
एक अनुवाद (धाडस करून) कशाचा ते शेवटी लिहेन...

कथाभाषांतर

प्रतिक्रिया

मी-सौरभ's picture

9 May 2012 - 9:52 pm | मी-सौरभ

अनुवादाची सुरवात वाचून अजुन तरी काही बोध झाला नाही. त्यामुळे पु. भा.प्र.
ईतक्या वेळ काकांच्या मराठी कहाणीत ही अमेरिकन नावे कशाला याचाच विचार करत बसलो होतो :)

मन१'s picture

9 May 2012 - 9:57 pm | मन१

.

सुधीर१३७'s picture

9 May 2012 - 9:58 pm | सुधीर१३७

वाचत आहे. .............

.... सध्याच्या भाषांतराच्या काळात हे वेगळेपण नक्कीच सुखावते.

.....कथा गुंतवून ठेवते आहे, पु.भा.प्र.....................

.....लवकर येऊ द्या ................. :)

रामपुरी's picture

9 May 2012 - 10:16 pm | रामपुरी

हेच म्हणतो

रणजित चितळे's picture

10 May 2012 - 11:14 am | रणजित चितळे

वाचतो आहे. .................. पुढचा भाग येऊ दे लवकर.

जयंत कुलकर्णी's picture

11 May 2012 - 7:14 am | जयंत कुलकर्णी

सगळ्यांना धन्यवाद !