- कथेचा पहिला भाग: http://www.misalpav.com/node/21209 इथे आहे..
- कथेचा पहिला भाग: http://www.misalpav.com/node/212५१ इथे आहे..
------------------------------------------------------------------
...भरपुर मालमत्ता घेऊन राजीव घरातून परागंदा झाले... ह्या धक्क्यानेच दादांनी हाय खाल्ली!
त्यांना शोधण्याचे दादांनी सारे प्रयत्न केले, गाव अन् गाव धुंडाळलं..
प्रत्येक वेळेस निराशाजनक खबर ऐकताच ते खचत गेले..... खचतच गेले... दुरावले पार!
"माझ्या हट्टापायी माझ्या मुलाचा संसार मोडला" असा शोक करत-करतच दादांनी जग सोडलं!
होत्याचं 'नव्हतं' झालं!!
घर सोडून जातांना राजीवने माझ्या उशाशी ठेवलेल्या एका पत्राचे, गेल्या १६ वर्षांत मी लाख वेळा पारायणं केली असतील.....
>>>>>>
किशोरी,
तुला 'प्रिय' म्हणण्याइतपतही सख्य जाणवत नाही आज....
मी घर सोडुन जातोय! कदाचित कायमचा! मला माझ्या पद्धतीने जगायचंय,तुझ्या किंवा दादांच्या नाही!
आईमागे 'मला' समजून घेणारं कुणी नाही, समजलंय मला...!
तुझ्या सर्व वेळ मला अन् दादांना एकत्र आणण्याच्या 'भानगडीत' गेला... ते असं अंतर होतं जे आम्ही दोघांनाही 'जपलं' होतं...
भावनिक आधार 'दादा' कधी देऊ शकले नाहीत,
आणि आर्थिक दिला नाही- देऊ शकत असुनही!!
जिथेही जातोय तिथे 'किशोरीबाईंचे पती' किंवा 'सरपंचांचा मुलगा' हीच ओळख आहे! तेच पुसायचंय!
मला शोधु नका, त्याची 'गरज' नाही!
तू माझी 'होऊ' शकली असतीस, तर आज 'सोबत' घर सोडलं असतं..
असो!
प्रसिद्धी मिळवत रहा..
बंगला सोडू नकोस..
झोपडीतून महालात आणलंय.... राणीसारखीच रहा..!
-राजीव
>>>>>>>>
ह्या पत्राने १६ वर्षांत लाख वेळा मला संपवलं!
राजीवच्या घरातून जाण्यानंतर, दादा गेले.... माझं गाणं पुन्हा एकदा उपजिवीकेचं माध्यम झालं!
बंगल्याला "आसरा" नाव दिलं आणि येणार्या- जाणार्या वाटसरुंना 'विश्रामघर' देऊ केलं..
गावात कुणाचं दुखलं खुपलं सांगत लोक येत, मन हलकं करत नी जात... जमेल ती आर्थिक मदत मी करी..
सार्यांना हक्काचं घर मोकळं करून दिलं... माझं साध्वीपण जपत!
आणि आज,
हाच "राजीव" परत आलाय... आसर्यात आलाय...
नदीकाठच्या देवळाच्या पायरीवरून खाटकन उठले.. राजीवने आज सकाळी पुन्हा एक पत्र ठेवलं होतं!
>>>>>>
प्रिय किशोरी,
कुठल्या नात्याने आज 'प्रिय' म्हणतोय, विचारु नकोस!
तब्बल १६ वर्षांनी मी परतलोय अन् तू 'तोच' बंगला किती प्रेमाने सांभाळलास हे जाणवलं! पंचक्रोशीत आजही नाव आहे तुझं ते तुझ्या 'सेवाभावी' वृत्तीनं आणि गायकीनं...!
मला स्विकारशीलच ह्या विश्वासाने आलोय आणि हो खूप पैसा कमावला आहे मी.... नावही!!
सारं तुझ्याचसाठी आहे! आता गाणं करत गावोगाव जाण्याची 'गरज' नाही तुला..
खरं तर माझ्यामागे, दादा गेल्याचं कळालं होतं मला पण आलो नाही मी, माझ्यासाठी जीव जाण्याइतपत प्रेम होतं त्यांच्या मनात, हे पटलंच नाही मला!
असो!
आपल्यासमोर उर्वरित आयुष्य आहे, भुतकाळ विसरुन, तुझा हात हातात घेऊन जगावं म्हणतो.. गरज आहे मला साथीदाराची..
तू फक्त माझी आहेस म्हणून आजवर वाट पहात हे 'एकटीचं जीणं' जगलंस ना?
खरंच "पाण्यासारखी" आहेस तू , पवित्र, निर्मळ.. हव्या त्या रंगात ओतलं की तोच रंग घेणारी...
मी आलोय परत.. तुझा निर्णय वेगळा नसावाच... बोलूच सविस्तर!
-तुझाच, राजीव.
>>>>>>>>>>
तिरस्कार!! तिरस्कार दाटून आला माझ्या मनात.. द्वेष!
'स्वतःचाच'!
कोण मी?
का जगले? का जगतेय? प्रत्येकाने हवं तसं वागवुन घेतलंय!
नियतीनेही!
आज हा परत आलाय, ह्याला मी हवीये कारण; कारण ती त्याची 'गरज' आहे- आयुष्याच्या उतरत्या काळात साथीदाराची गरज आहे!!
माझ हात झिडकारून हा निघून गेला, कारण, तेव्हा 'पैसा- नवा व्यवसाय' ही त्याची गरज होती..
दादा गेल्याचं कळूनही आला नाही कारण, दादांचा फक्त पैसा हवा होता आणि ती गरज भागली होती!
जगणं हीच त्याची 'गरज' होती..
आणि आता "माझीही"!!!
____________________________________
त्या पत्रांचे तुकडे करून उधळले तिने, हातातला कुंकवाचा खडा त्या शांत नदीत भिरकावून टाकला..!
तरंग उठले! काठापर्यंत येत गेले!
पाणी पुन्हा पूर्ववत झालं!
खडे फेकून मारणाराच असा असतो... शांत "पाण्याला" ढवळणारा, हवं तेव्हा!
काठाशी उभा राहून तो खडा भिरकावतो... तरंग उसळतात.. हळू-हळू शांतही होतात... खडा मारल्याने झालेली खळबळ आणि शांत होण्यासाठी पडलेले प्रयास, हे त्या "पाण्यालाच" ठाऊक.... खडा मारणारा मात्र निर्विकार!
देवळातून बाईसाहेब घरी परतल्या, तो राजीव मालकाचा 'आव' आणून 'आसर्यात' पेपर वाचत बसला होता!
बाईसाहेब प्रवेशताच, हसत- उठून म्हणाला, "होतीस कुठे? किती वेळ झालाय तुला जाऊन? आणि काय, आज शिरा होता.. अजुनही माझी आवड लक्षात आहे? पण अगं आता मी गोड खात नाही, साखर झाली आहे मला.. ते सोड, पत्र वाचलंस ना..? तुझ्या निर्णायाची वाट बघतो आहे, थकलो आहे आता, सहजीवनाची आस बाळगून आहे मी..."
"राजीव, बोलायची इच्छा नाही माझी"
निघून गेल्या त्या तिथून...माळावरच्या खोलीतच... बंद करून घेतले स्वतःला दिवसभर!
राधा बिचारी, सैरभैर.. कशाचा ताळमेळ लागेना तिला.. कोण हा? बाईसाहेबांशी एकेरी कसा बोलतो? अनेक संभ्रमात असावी! बाईंना रात्रीचं जेवणही वर नेऊन दिलं तिने!
रात्री सगळीकडे नीज झाल्यावर एक लहानगी पेटी घेऊन किशोरी खाली उतरली... चार साड्याच्या पलीकडे, तिचं असं होतंच काय? आणि तिचा एकुलता तानपूरा!!
अलगद 'आसर्या' बाहेर पडली ती!
तिथली तिची 'गरज' संपली होती!
त्या घराचा 'मालक' परत आला होता....!
आणि केवळ त्याच्या गरजेपूरतं आता तिला जगायचं नव्हतं!
क्षणभर रेंगाळलीच ती... दादांनी लावलेल्या गुलाबाच्या, जाई-जुईच्या फुलांचा गंध उरात साठवला...
पाय अडखळले ते 'माळी-काकां' साठी...
बंगल्यामागच्या त्यांच्या झोपडीत जाऊन आशीर्वाद घ्यावा का?
म्हणतील, "किशुरी, माजी बाय, जा गं तू ह्या बंगलेतून... जळू नगंस हिथ... सूखी र्हा माय..."
तो क्षण, आला नि गेला, तिने त्या मोहालाही ठरू दिले नाही..झपाझप निघाली, मागे वळूनही न पाहता....
स्वतःला निर्धोकपणे सांगत,
"तुम्हे ना अपनायाँ तो क्या?
कोई मंजील पां ही लुंगी
"आसरा" न रहा तो क्या
बस अब, मैं भी "जीं" लुंगी!!"
उगवणारा सुर्यच ठरवणार होता.... तिचा मार्ग, जगण्याचा!!!
-वेणू
ब्लॉग-वेणूसाहित्य http://venusahitya.blogspot.com/
प्रतिक्रिया
27 Apr 2012 - 6:56 pm | प्रास
काहीसा अपेक्षित शेवट....
तरीही छान लिहिलंय. थोडं आटोपशीर वाटलं पण लेखनाची शैली छानच!
पुलेशु
आणि
अर्थातच पुलेप्र सुद्धा....
27 Apr 2012 - 7:02 pm | प्रचेतस
कथा आवडली.
हे तर सुरेखच.
27 Apr 2012 - 7:22 pm | रेवती
खडा मारल्याने झालेली खळबळ आणि शांत होण्यासाठी पडलेले प्रयास, हे त्या "पाण्यालाच" ठाऊक.... खडा मारणारा मात्र निर्विकार!
मस्तच!
शेवट अपेक्षित होता तरी कथा आवडली.
27 Apr 2012 - 7:44 pm | पैसा
पण कथा आणि सांगायची शैली आवडली.
27 Apr 2012 - 9:43 pm | सानिकास्वप्निल
कथा आवडली :)
"तुम्हे ना अपनायाँ तो क्या?
कोई मंजील पां ही लुंगी
"आसरा" न रहा तो क्या
बस अब, मैं भी "जीं" लुंगी!!"
मन गलबलून गेलं ....
28 Apr 2012 - 4:02 pm | राजघराणं
मजा आली
29 Apr 2012 - 11:07 am | कवितानागेश
सुंदर कथा. थोडक्या, मोजक्या शब्दात आशय मांडलाय, हे आवडले.
29 Apr 2012 - 10:53 pm | जेनी...
आवडेश :)
30 Apr 2012 - 9:55 am | प्यारे१
मस्तच...!
वाचत असताना उगाच बंदिनी, मानिनी, दामिनी, सौदामिनी ह्या सगळ्या 'दूरदर्शन' मालिकांची शीर्षकगीतं बॅकग्राऊंड मध्ये वाजत होती....