मारवा !

चैतन्य दीक्षित's picture
चैतन्य दीक्षित in जनातलं, मनातलं
6 Apr 2012 - 3:56 pm

त्या दिवशी संध्याकाळी अचानकच आभाळ दाटलं होतं. नेहमीपेक्षा लवकर, आणि जरा जास्त अंधारून आलं होतं. आणि अशात सीडीवर वसंतरावांचा 'मारवा' लागला होता. 'मदमाती चली चमकत दामनीसी.... ' असे काही तरी बोल असावेत विलंबित ख्यालाचे.वसंतराव मारव्याच एक एक पदर उलगडत होते, आणि इकडे मनःपटलावर वेगवेगळ्या प्रतिमा तयार होत होत्या आणि विरून जात होत्या. कुणी जुना मित्र भेटावा, आणि कुणालाही न सांगता येण्याजोगं काहीतरी गहिरं असं त्यानं आपल्यासमोर मोकळं करावं तसंच झालं होतं अगदी.

मन हळवं झालं होतं. असं म्हणतात की आभाळ दाटलं असताना तुमच्या मनात जी भावना असते ती दुपटीने वाढते, म्हणजे तुम्ही आनंदी असाल तर तो आनंद अजून उत्कट होतो, दु:खी असाल तर दु:खाच्या खोल गर्तेत गेल्यासारखे होते. त्यामुळे की काय कोण जाणे, पण मी जरा जास्तच हळवा झालो, पापण्या ओलावायच्या बाकी होत्या, पण हृदय कधीचं भरून गेलेलं होतं. मारव्याची हुरहूर पण अशी होती, की तानेला दाद जात होती तीसुद्धा मनात खोलवर काहीतरी रुतल्यासारखी 'आह' अशीच ! बाहेर विजा आणि आत वसंतरावांच्या ताना एकीवर एक अशा कडाडत होत्या. मनात वादळच उठलं होतं. मारव्यानं कसल्याशा अपूर्णत्वाची जाणीव करून दिली होती. एरवी ते जाणवत नसल्यानंच पूर्णत्वाच्या भ्रमात आपण जगतो असं वाटलं. मनः पटलावर येण्याऱ्या प्रतिमा काहीशा मूर्त-स्वरूप घेऊ लागल्या होत्या. त्यात तिन्हीसांजेला सौधावर आपल्या प्रियाची वाट बघणारी विरहिणी होती.कृष्णाच्या विरहाने वेडी-पिशी झालेली गौळण होती. ती विरहिणी किंवा गौळण म्हणजे जिवंत हुरहूरच असते जणु. कुठेतरी त्यांच्या मनातलं ते खोल दडून बसलेलं, गहिरं, अनाम, सनातन दुःख कळल्याचं जाणवत होतं; नव्हे मीच ते सोसतोय असाही भास झाला क्षणभर. दुरून कुठूनतरी, अंधारात वाट चुकलेल्या कोकराचं केविलवाणं ओरडणं ऐकू येत होतं.त्या प्रतिमांमध्ये अगदी क्षणभरच, पण मला नोकरीच्या निमित्ताने घरच्यांपासून दूर आलेल्या माझाही चेहरा दिसला!
... पाऊस सुरू झाला होता. मन अजूनच हळवं झालं ...
आत एकतालाची, अन् बाहेर पावसाची लय वाढत होती. वसंतरावांच्या ताना अजूनच आक्रामक होत होत्या.विरहिणीचे अस्पष्टसे हुंदके ऐकू आल्याचा भास झाला. मग जाणवलं, की आपलीच पापणी ओलावली आहे. एक क्षण वाटलं आत जाऊन सीडी थांबवावी. पण तोही धीर होईना. काही वेळातच तिहाईवर येऊन वसंतराव थांबले आणि मारवा संपला ... सीडीतला....

कानात मात्र मारव्याचे सूर अजूनही घुमतच होते, पाऊस पडतच होता...

-चैतन्य

संगीतलेखअनुभव

प्रतिक्रिया

मी-सौरभ's picture

6 Apr 2012 - 4:46 pm | मी-सौरभ

भावना फार मोजक्या आणि अचूक शब्दात पकडल्यात :)

तिमा's picture

6 Apr 2012 - 4:54 pm | तिमा

प्रकटन आवडले. तुम्ही संगीताचा असा आनंद घेऊ शकताय म्हणजे तुम्ही फारच सुदैवी आहात. कल्पना करा, ज्यांना असे संगीत 'अपील' होत नाही ते किती दुर्दैवी असतील ?
पु.ले.शु.

प्यारे१'s picture

6 Apr 2012 - 5:07 pm | प्यारे१

>>>त्या प्रतिमांमध्ये अगदी क्षणभरच, पण मला नोकरीच्या निमित्ताने घरच्यांपासून दूर आलेल्या माझाही चेहरा दिसला!

होतं हळवं मन कधी कधी.
खूप तरल लिहीलंय! कवितेसारखं

>>>मन हळवं झालं होतं. असं म्हणतात की आभाळ दाटलं असताना तुमच्या मनात जी भावना असते ती दुपटीने वाढते,

थोडी दूरूस्ती करून म्हणेन "असं म्हणतात की आभाळ दाटलं असताना, तसेच सुर्यास्ताचे वेळेस मारवा ऐकताना तुमच्या मनात जी भावना असते ती दुपटीने वाढते"

सुधीर's picture

6 Apr 2012 - 6:20 pm | सुधीर

छान लिहिलयत, भावनांना सुंदररित्या शब्दात बद्ध केलंयत!

बहुगुणी's picture

6 Apr 2012 - 6:31 pm | बहुगुणी

चैतन्यराव,

इतकं सुरेख शब्दचित्र उभं केलंयत की ते रेकॉर्डिंग शोधून काढायला आणि ऐकायला लावलंत! क्या बात है!

पुनःप्रत्ययासाठी इथेच दुवा देतो आहे, ज्यांना हवं असेल त्यांनी उतरवून घ्यावं.

(बाकी वरती तिरशिंगरावांनी म्हंटलंय तसं तुम्ही सुदैवी आहात असा संगीताचा आस्वाद घेऊ शकताय म्हणून, आम्हाला केवळ या महान गायकांनी काही तरी सुंदर 'जागा' घेतलीय इतकंच कळतं, त्यापलिकडे काही ज्ञान कधीतरी मिळेल अशी आशा ठेवून आहे....)

पैसा's picture

6 Apr 2012 - 7:50 pm | पैसा

सुंदर लिहिलंयत!

श्रावण मोडक's picture

6 Apr 2012 - 8:27 pm | श्रावण मोडक

तुझं नाव पाहून धागा उघडल्याचं सार्थक झालं असली घीसीपीटी कमेंट न करता म्हणतो, वा!
इथं हा आटोपशीरपणा उत्तमच. मारव्यातलं एखादं गाणं ऐकल्यासारखा पुरेसा. पण... मारवा इतका छोटा निश्चित असू शकत नाही. तेव्हा, आणखी येऊ द्या... :)

जाई.'s picture

6 Apr 2012 - 9:41 pm | जाई.

सुंदर आणि नेमक लिहीलत

>> असं म्हणतात की आभाळ दाटलं असताना तुमच्या मनात जी भावना असते ती दुपटीने वाढते >>
कोण म्हणतं असं?
नाही कारण जे कोणी हे वाक्य बोलले आहे ते खरे आहे.

चैतन्य दीक्षित's picture

8 Apr 2012 - 5:39 pm | चैतन्य दीक्षित

प्रतिसादाबद्दल सर्वांचे मनापासून आभार.
वसंतरावांची मुलाखत इथे ऐकता येईल.
(इथे ते मारव्याबद्दल जे बोललेत, ते मारव्याचं यथार्थ वर्णन आहे)