सूडाची ठिणगी - उत्तरार्ध

योगप्रभू's picture
योगप्रभू in जनातलं, मनातलं
1 Apr 2012 - 4:55 am

सम्राज्ञी गांधारीदेवींच्या भेटीला जाताना आपल्या मनातील योजना संशय येऊ न देता कशी मांडायची, यावर भानुमतीने बारकाईने विचार करुन ठेवला होता. राजमाता कुंतीदेवी आणि पांडव स्त्रियांनी आपला अपमान केला, हे गांधारीदेवींना सांगून चालणार नव्हते. तसं सांगितलं असतं तर उलट 'बरी जिरली सुनेची' म्हणून थेरडी मनातून सुखावली असती. त्यातून पांडवस्त्रियांचे एकवेळ ठीक, पण कुंतीदेवींबद्दल उलटसुलट सांगून चालणार नव्हते. सुनांवर दबाव ठेवण्यात या म्हातार्‍या नेहमीच एकमेकींच्या मैत्रिणी असतात. कुंतीमातेला वैधव्य प्राप्त झाल्याने इंद्रप्रस्थाचे सिंहासन ज्येष्ठ स्नुषा द्रौपदीकडे गेले खरे, पण ज्येष्ठत्वाच्या नात्याने अजुनही त्यांचा शब्द तेथे चालतो. हस्तिनापुरात तर काय बोलायलाच नको. अंध आणि वृद्ध का होईना, पण पती जिवंत असल्याने गांधारीदेवी अजुनही सम्राज्ञी होत्या. आपल्या कोणत्याही मागणीला खवट सासू फार विचार केल्याचा आव आणून अखेर ठोकरुन लावते, हे भानुमतीला अनुभवाने पक्के माहीत झाले होते.

'ये भानुमती. कसा झाला वास्तुशांतीचा कार्यक्रम?' गांधारीदेवींनी विचारले. पुढे होऊन सासूला वाकून नमस्कार करत भानुमती गोड हसून म्हणाली, 'हो आई. कार्यक्रम एकदम छान झाला. राजमाता कुंतीदेवींनी तुम्हाला परतीचा आहेरही पाठवला आहे.' तिने बरोबरच्या दासाला खूण केली. एका रत्नजडीत मंजुषेतील तलम वस्त्र उलगडून समोर धरले. ते सुंदर वस्र हाताळताना सम्राज्ञी सुखावल्या. 'किती सुंदर पोत आहे. इंद्रप्रस्थात अशी सुंदर वस्त्रे विणणारे आहेत?' त्या म्हणाल्या. त्यावर भानुमतीने पहिली खेळी खेळली. ती म्हणाली, ' हो आई. आणि असे विणकर अन्यत्र शोधूनही सापडणार नाहीत. राजमाता तर म्हणाल्याही, की गांधार देशातही अशी कलाकारी आढळत नाही, त्यामुळे तुझी सासू नक्की आनंदी होईल.'

आपल्या माहेरचा उल्लेख ऐकताच गांधारीदेवींचे कान तीक्ष्ण झाले. क्षणात ते वस्त्र हाताने दूर सारत त्या म्हणाल्या, ' हं!हस्तिनापूर सम्राज्ञीला असली वस्त्रे दुर्मीळ नाहीत. बरं. आपला आहेर आवडला का त्यांना?' त्यावर संभ्रमशील मुद्रा करुन भानुमती म्हणाली, ' मी तिथे गेल्यापासून कामात व्यग्र होते. मला कुणाशी बोलायला वेळच मिळाला नाही, मग जाणून तरी कसे घेणार?' गांधारीदेवींच्या मुद्रेवर आठी उमटली, 'काम? कसले काम? आणि तुला कुणी सांगितले?' त्यांनी विचारले. त्यावर भानुमती धूर्तपणे म्हणाली, ' नेहमीचेच हो आई. अतिथींचे आगतस्वागत. आहेरांची गणना. शीतपेयांचे वाटप.' पण ते विशेष नाही. समारंभ मात्र अत्युत्तम झाला. असे वैभव भूतलावर कुठेही आढळणार नाही, असे जो तो म्हणत होता. आपल्या द्रोणीमाता आणि कृपीमातांना तर राजमातांनी रत्नजडीत तबकात घालून लक्ष निष्क दक्षिणा म्हणून दिले.'

गांधारीच्या चेहर्‍यावर आता आठ्यांचे जाळे पसरले. नेत्रांवर पट्टी बांधलेली असल्याने त्यांचे भाव भानुमतीला पाहता आले नाहीत, परंतु सासू अस्वस्थ झाली आहे, हे ओळखून तिने खडा टाकला, ' मला वाटतं आई. या समारंभामुळे सगळ्याच कौरव स्त्रियांना श्रम झालेत. आपण हस्तिनापुरात श्रमपरिहाराचा कार्यक्रम ठेऊया का? तेवढेच सगळ्यांचे मनोरंजन होईल. जमल्यास पांडव स्त्रियांनाही बोलवूया.' त्यावर नेहमीच्या पद्धतीने गांधारीदेवी बोलल्या, 'बघू विचार करते.'

भानुमतीने पहिला डाव जिंकला. गांधारीदेवींनी हस्तिनापुरात श्रमपरिहाराला परवानगी दिली. पांडव स्त्रिया हस्तिनापुरात येऊन दाखल झाल्या. मौजमजा, चांदण्यात विहार, उत्तमोत्तम खाणे, गप्पा यामध्ये काळ कसा जात होता, हे समजतच नव्हते. एक दिवस दुपारच्या भोजनानंतर सगळ्या स्त्रिया एकत्र जमल्या होत्या. बराच वेळ गप्पा झाल्यावर भानुमती म्हणाली, 'कंटाळा आला बाई. काहीतरी खेळ खेळूया का?' त्याला पांडवस्त्रियांनी सहमती दर्शवली. भानुमतीने दासाला सांगून अक्षपट मागवला. द्रौपदी आणि भानुमती दोघीही डावामागून डाव जिंकू-हरु लागल्या. बाकीच्या स्त्रिया उत्सुकतेने डाव बघत होत्या. तेवढ्यात भानुमती म्हणाली, 'श्शी बाई. कसले पांचट डाव खेळतोय आपण? काहीतरी थरारक खेळू या का?' द्रौपदीने विचारले, 'म्हणजे कसे?' त्यावर भानुमती म्हणाली, ' तू तुझे इंद्रप्रस्थ राज्य, स्वतःसकट पांडवस्त्रिया आणि दास पती डावावर लावतेस का? द्रौपदी क्षणभर गांगरली, पण सगळ्या स्त्रियांमध्ये प्रतिष्ठेचा प्रश्न असल्याने अखेर कबूल झाली. दुर्दैवाने तो डाव द्रौपदी हरली.

भानुमतीला पराकोटीचा आनंद झाला. तिने सखी वृषालीला विचारले, ' आता या सगळ्याजणीच आपल्या दास झाल्यात आणि दासांना दास नसतो. त्यामुळे या स्त्रियांचे पती आपलेच दास झाले. आता त्या वाचाळ अर्जुनाला सगळ्यांसमक्ष फटके मारुन अंगावर पट्ट्या बांधायला भाग पाडूया का?' त्यावर वृषालीने आनंदाने होकार दिला. तिचा अर्जुनावर डोळा होताच, पण भानुमतीकडून चतुराईने अर्जुन दास म्हणून मिळवण्याचीही संधी आली होती. पांडवस्त्रिया हरल्याने मान खाली घालून बसल्या होत्या. तेवढ्यात गांधारीदेवी, द्रोणी, कृपी या म्हातार्‍याही काय गंमत झाली ते बघायला येऊन बसल्या. भानुमतीने अर्जुनाला महिलावर्गासमोर येण्याचा आदेश दिला. पण अर्जुनाने उलट निरोप पाठवला, 'आदल्या रात्री चारही स्त्रियांची हौस पुरी करताना मी पारच गळून गेलो असल्याने माझ्या अंगात त्राण उरलेले नाही. त्यातून त्यांच्या झोंबाझोंबीत माझी वस्त्रेही फाटून गेल्याने मी एकवस्त्र आहे. अशा अवस्थेत मला येता येत नाही.' हे ऐकताच भानुमतीचा क्रोध अनावर झाला. तिने नणंद दु:शीलेला आज्ञा केली, 'जा. त्या अर्जुनाला फरपटत इथे घेऊन ये. त्यादिवशी कसा अगदी पोपटासारखा बडबडत होता? आज नाही त्या पोपटाला बाहेर काढले तर नावाची भानुमती नव्हे.'

दु:शीला ही अर्धवट डोक्याची आणि माथेफिरु होती. तिने अर्जुनाला केसाला धरुन फरपटत आणले. विकट हसून भानुमती म्हणाली, ' डोळस सून काय करु शकते, हे आज तुला कळेल दासा.' ती अर्जुनाला म्हणाली, ' तुला आमच्या कौरवस्त्रियांपैकी कुणाचाही दास म्हणून राहाता येईल. बोल तुला कोण आवडेल?' त्यावर अर्जुन म्हणाला, 'मी केवळ चार स्त्रियांचा दास राहिलो आहे. मी त्यांच्याशीच एकनिष्ठ राहाणार. मी व्यभिचारी नाही' संतप्त भानुमती अर्जुनाला झोडपण्याचा आदेश देणार तोच वृषालीने सूत्रे आपल्या हाती घेतली. ती भानुमतीला म्हणाली, ' राज्ञी. याचे काय ऐकता? चार चार स्त्रियांनी दास म्हणून ठेवलेला हा पुरुष आणि म्हणे व्यभिचारी नाही. याच्यापेक्षा देहविक्रय करणारा पुरुष बरा. तो निदान उघड व्यवसाय करतो.'

इतकावेळ उभे राहिल्याने अर्जुनाच्या पायाला कळ लागली होती. तो म्हणाला, 'आधीच माझ्या अंगात त्राण नाही आणि त्यातून उभा. निदान बसायला जागा तरी द्या.' त्यावर छद्मी हसून भानुमती म्हणाली, ' या इतक्या बायकांनी जागा व्यापल्यानंतर तुला बसायला काय चौरंग मांडू का? की आमच्या छोट्या लक्ष्मणासारखा मांडीवर घेऊन बसू? निर्लज्ज कुठला?' वृषालीने यावेळी एक औचित्याचा मुद्दा उपस्थित केला. ती भानुमतीला म्हणाली, 'राज्ञी! हा पुरुष निर्लज्जच नव्हे तर उर्मटही आहे. याच्या अंगावर अद्याप पांडवांचे वस्त्र आहे. अक्षपट खेळात हरल्याने हा आता कौरवांचा दास झालाय. तेव्हा त्याला ते वस्त्र उतरावयाला सांगावे.' वृषालीचा यात आणखी एक हेतू होता. द्रौपदीच्या या पती-दासाच्या अंगावर कुठेही केस नाहीत आणि त्याची त्वचा नीतळ सुवर्णझळाळी मिरवणारी आहे, शिवाय त्याच्या अंगाला नैसर्गिक सुगंध आहे, असे वृषालीने ऐकले होते. कपिसम केसाळ, अजागळ आणि अंगाकाखांना घर्माचा कुबट वास मारणारे पुरुष वारंवार नजरेला पडल्याने तिला हा चमत्कार बघण्याची खूप काळापासून इच्छा होती. भानुमतीला वृषालीची सूचना इतकी पटली, की डोळ्यासमोर पती-दासाला निर्वस्त्र केलेले पाहून द्रौपदीच्या अंगाची कशी लाही होईल, हे बघण्यास ती आतुर झाली. तिने अर्जुनाला आदेश दिला, ' ते वस्त्र काढून टाक आणि कौरवांचे वस्त्र घाल.' त्यावर अर्जुन थरथर कापू लागला. त्याने अंगावरचे वस्त्र हाताने घट्ट धरुन ठेवले.

अर्जुन ऐकत नाही म्हटल्यावर भानुमतीने दु:शीलेला आदेश दिला, की तू स्वतः ते वस्त्र हिसकावून घे. यावेळी पांडवस्त्रिया प्रचंड क्षुब्ध झाल्या. हिडिंबा उठून म्हणाली, ' भानुमती. तुझ्या झिंज्या उपटून टाकीन, ही माझी प्रतिज्ञा आहे.' त्यावर वृषाली पुढे सरसावली आणि म्हणाली, ' ए टवळे! झिंज्या कुणाच्या उपटणार तू?' आधी स्वत:च्या मस्तकावर बोटभर केस उरलेत तिकडे बघ. खादाड मेली. जेव्हा बघावं तेव्हा ही , तिचा दास भीम आणि मुलगा घटोत्कच सारखे चरत असतात. खाऊन खाऊन माजलेत नुसते. एक बाळंतपण काय झालं तर हत्तीण बरी इतकी अवाढव्य फुगलीय नुसती. आणि तू कशाला द्रौपदीच्या दासासाठी कंठशोष करतीयस. तुझा तो वृकोदर दास भीम संभाळून ठेव. पुन्हा आपल्या आकाराचा दास मिळणार नाही तुला. जा वजन कमी कर आधी. नाहीतर कोपर्‍यात घोरत पड.'

यावर नागकन्या उलुपि पुढे सरसावली. ती वृषालीला म्हणाली, 'तू निम्न जातीची बाई. तुझा काय राजस्त्रियांमध्ये बोलण्याचा संबंध? हिडिंबा काय तुझ्या बापाचं खाते का? तू मात्र कौरवांचे खरकटे खाऊन जगतेस आणि नखरा केवढा गावभवानीचा?' जातीवरुन हिणवल्याने वृषाली संतापली. पण तिला मागे सारत भानुमती म्हणाली, ' अगं हडळे! वृषाली निदान मानवातील निम्न जातीची तरी आहे. तुम्ही नागलोक म्हणजे मानवापेक्षाही खालच्या योनीचे आहात. जरा बरोबर बसवलं की माजलेच हे नागडे.'

ही भांडाभांडी अजून पेटली असती, पण द्रौपदी इतक्या वेळपासून प्रथमच बोलली, ' माझं द्रौपदी नाव 'द' अक्षराने सुरु होते. तेव्हा मी दानी आहे आणि भानुमती तुझं नाव 'भ' पासून सुरु होते त्यामुळे तू भिकारी आहेस. मी माझं राज्य तुला दानात दिलंय ते पुरेसं नाही का? तुझी माझ्या पती-दासावर नजर का? तुला जास्त दास गरजेचे होते तर तसं सांगायचं मला. दिले असते.'

त्यावर दु:शीला उसळून म्हणाली, ' समजलं गं सटवे तुझं कुजकं बोलणं. पण एक लक्षात ठेव. आमच्या वैन्यांना प्रत्येकी एक पती-दास दिलाय करुन आम्ही. तुमच्यासारखं एक तीळ सातजणांत वाटून खाण्याची वेळ आलेली नाही अजून कौरवांवर. हे असले एका ताटात सगळ्यांनी जेवायचे प्रकार भिकार्‍यांमध्ये असतात. तेव्हा समजतंय का, कोण भिकारी आहे ते.'

दु:शीलेने पुढे होऊन अर्जुनाचे वस्त्र अंगावरुन खेचून काढले. सगळी सभा स्तब्ध झाली. गंमत बघायला मिळणार, या अपेक्षेत असलेल्या वृषालीचा भ्रमनिरास झाला. अर्जुनाने आतून कमरेला एक शेला बांधलेला होता तो सगळ्यांना दिसला. वृषाली दातओठ खात भानुमतीला म्हणाली, ' हा नीच आपल्याशी खोटं बोलला. एकवस्त्र आहे असं म्हणाला होता. मग आता हे दुसरं वस्त्र आलं कुठून?

'मी दिलं'... एक अपरिचित धारदार आवाज आला. सगळ्यांचे लक्ष तिकडे गेले. अर्जुनाच्या लगत बसलेली एक स्त्री उठून उभी राहिली होती. महिलावर्गात एकदम कुजबूज सुरु झाली. 'अगंबाई. ही तर रुक्मिणी. द्वारकेची राणी. पण ही इथं कशी?' पांडवस्त्रियांनी रुक्मिणीकडे धाव घेतली आणि 'अय्या! रुक्मे तू? अगदी ऐनवेळी आलीस गं.' म्हणत तिच्या गळ्यात हात टाकले. सुभद्रेला आपल्या वैनीचा विलक्षण अभिमान वाटला.

भानुमतीकडे बघून रुक्मिणी म्हणाली, ' तुम्ही अर्जुनाच्या अंगावरचे पांडवांचे वस्त्र काढून घेतले आहे. आता त्याच्या कटीला जो शेला आहे तो माझा आहे, यादवांचा आहे. त्याला हात तर लाऊन बघा. नाही एकेकीच्या कमरेत लाथा घातल्या तर नावाची रुक्मिणी नाही. बिनकामाच्या अवदसा मेल्या!' रुक्मिणीचा तो आवेश बघून भानुमती गांगरली.

आपली बालमैत्रिण आणि हितचिंतक असलेली रुक्मिणी संकटकाळी मदतीला धावल्याने अर्जुन कृतकृत्य झाला. रुक्मिणीने सम्राज्ञी गांधारीदेवींना चांगलेच फैलावर घेतले. 'भरतखंडात स्त्रीसत्ताक पद्धती असली तरी दुर्बल, एकवस्त्र अशा दास पुरुषाची मानखंडना करण्यात कसला आलाय स्त्रियार्थ?' ती कडाडली. 'गांधारीदेवी. सुनांना आवरा. यातच स्त्रियांच्या हेव्यादाव्याची बीजे आहेत.' गांधारीदेवींनी नेत्रावर पट्टी असल्याने आपल्याला काही दिसत नाही, असा पवित्रा घेतला आणि अर्जुनाला तेथून घेऊन जाण्यास सांगितले. रुक्मिणी तेथून जाताच पांडवस्त्रियाही उठल्या. भानुमती मात्र दातओठ खात उभी होती. तरीही तिने द्रौपदीला एक शेवटचे आव्हान दिले. 'फक्त एकच डाव खेळ. जिंकलीस तर तुझे राज्य तुला अन्यथा पांडवस्त्रियांनी दास-पतींसह वनवासात जायचे.' लोभाने खेळलेली द्रौपदी तोही डाव हरली.

सूर्य अस्ताला जात असताना पांडवस्त्रिया आणि त्यांचे दास पती असा एक जथा नगरवेशीच्या बाहेर पडत होता. कुंतीदेवींचे सांत्वन करणारी रुक्मिणी गंभीर झाली होती. सूडाची ही ठिणगी उग्र रुप धारण करुन किती स्त्रियांना एकमेकींचे शत्रू बनवेल, हे चित्र तिला डोळ्यापुढे दिसत होते. लाखो स्त्रिया एकमेकींसमोर उभ्या राहून एकमेकींना यथेच्छ शिव्या देतील, हे दृश्य नियती बघत होती. पुढील हजारो वर्षानंतरही समाज या महामायायुद्धाला 'बोरीचा बार' म्हणून ओळखेल, हे नियतीलाही ठाऊक होते.

(समाप्त)

विनोदविडंबनमौजमजाविरंगुळा

प्रतिक्रिया

सहज's picture

1 Apr 2012 - 5:18 am | सहज

व्यासप्रभुंना साष्टांग प्रणाम!

सही आहे!

अयायाया... महाभारतातला बाजार उठवला... दंडवत स्वीकारा प्रभू.. _/\_

- पिंगू

शिल्पा ब's picture

1 Apr 2012 - 6:56 am | शिल्पा ब

अगदी हेच मनात आलं...

अत्रुप्त आत्मा's picture

1 Apr 2012 - 7:13 am | अत्रुप्त आत्मा

+१

जबरा, मस्तच झालंय,

बहुधा असंच झालं असावं प्रत्यक्ष, पंण ते पुढं पुरुषप्रधान समाज , लेखक वगैरे वगैरे.

अमृत's picture

1 Apr 2012 - 7:49 am | अमृत

प्रभुजी झकास.

अमृत

पैसा's picture

1 Apr 2012 - 8:46 am | पैसा

पार बाजार उठवला शब्दप्रभू! फक्त त्या संस्कृतोद्भव शिव्या रहिल्या की वो!

सोत्रि's picture

1 Apr 2012 - 10:13 am | सोत्रि

फक्त त्या संस्कृतोद्भव शिव्या रहिल्या की वो!

त्याबरोबरच भाषेचा बाज आणि तडका पहिल्या भागापेक्षा जरा कमी वाटला.

- (प्रभूपंखा) सोकाजी

योगप्रभू's picture

1 Apr 2012 - 12:02 pm | योगप्रभू

सोका,
अरे भाषेचा फुलोरा दाखवण्यापेक्षा मला नौटंकी सादर करायची होती.
आणि तसाही हा उत्तरार्ध लांबत चालल्याने शेवटी विनोदावर लक्ष केंद्रित केले.
पण आपले निरीक्षण एकदम मान्य (टकिलाचा शॉट कमी बसला) :)

योगप्रभू's picture

1 Apr 2012 - 12:11 pm | योगप्रभू

देवी,
पुरुषांच्या कोमल मनावर वाईट संस्कार होऊ नयेत म्हणून (आणि आपल्याला माझ्यावर कारवाईची संधी मिळू नये म्हणूनही) मी वृषालीच्या तोंडच्या शिव्या टाळल्या. क्षमस्व. :)

सहज's picture

1 Apr 2012 - 2:10 pm | सहज

अगदी! मिपाकर पुरुष सदस्यांचे वडीलधारे तसेच सख्खे, चुलत, आत्ये, मावस, मामे भाऊ वाचन करतात त्यामुळे शिव्या टाळल्यात ते उत्तमच!
मिपाकरांच्या वडील, बंधु यांना शरमेने मान खाली घालायला लागू नये याकरता खरे तर संपादक कटीबद्ध हवेत.

रमताराम's picture

1 Apr 2012 - 7:56 pm | रमताराम

सहजराव म्हणजे एक लुहार की
अवांतरः मिसळपाववर मातृसत्ताक पद्धती आहे हे ठाऊकच नव्हतं. यापुढ इथे येताना शिरोवस्त्र परिधान करूनच कळफलकाला हात लावायला हवा. चार बायांसमोर तसं कसं यायचं.

पैसा's picture

1 Apr 2012 - 9:09 pm | पैसा

र. रा. मिपा मातृसत्ताक असो किंवा नसो, तुमचा आंतरजालीय इतिहास पाहता तुम्ही आंजावर कुठेही वावरताना शिरोवस्त्रच काय, हेल्मेट वापरलेलं बरं असा प्रेमळ सल्ला आहे!

रमताराम's picture

2 Apr 2012 - 3:28 pm | रमताराम

काय उगाच बदनामी करताय हो? आम्ही काय केले. एक विडंबन टाकले तर एवढा राग? उलट इथे एवढ्या शालीनतेने बायकांसमोर येताना डोक्यावर पदर घेऊन येऊ असं चांगलं 'परंपराप्रेमी', कॉन्फॉर्मिस्ट आश्वासन देतोय यातच आम्ही स्त्रियांचा किती मान राखतो हे सिद्ध होत नाही काय.
(कितीही करा, कसली कदर म्हणून नाही मेली या बायांना.)

बाकी दीपकने दिलेले चिलखत कायम बरोबर असतेच त्यामुळे असल्या धमक्यांना आम्ही भीक घालित नाही.

पैसा's picture

2 Apr 2012 - 4:13 pm | पैसा

अजून तुमच्या आंतरजालीय कारवाया सगळ्या मिपाकरांना माहिती नाहीत म्हणून हा शालीन अवतार काय! असो, प्रीतमोहरचा मोर्चा कुठपर्यंत आला जरा बघून येते हां! ;)

यापुढ इथे येताना शिरोवस्त्र परिधान करूनच कळफलकाला हात लावायला हवा.

=)) =)) =)) =)) =))

ररा, कृपया शिरोवस्त्रांची घाऊक ऑर्डर देऊन ठेवा ;-)
आणि आधी एक इकडेही फेका ;-)

मन१'s picture

2 Apr 2012 - 12:01 pm | मन१

वृषाली ह्या नावाचीच जराsssशी तोडमोड केली तर एक अस्सल गलिच्छ,संस्कृत शिवी येउ शकते.
झालच तर बिरुटे सरांनी प्रसिद्ध केले माताय्,भगिनीभोगी, वगैरे वगैरे विशेषणे आहेतच.

नगरीनिरंजन's picture

1 Apr 2012 - 10:17 am | नगरीनिरंजन

गमतीदार आहे!
कौंतेयांना पांडव आणि गांधारैयांना कौरव म्हणून लेखकाने त्यातल्या त्यात एमसीपीपणा दाखवून घेतला आहे असे आमचे स्पष्ट मत आहे. ;-)

तिमा's picture

1 Apr 2012 - 10:42 am | तिमा

नागांना 'नागडे' म्हणून प्रभूंनी एक नवीन प्रथा पाडली आहे.
'इनव्हर्स' महाभारत आवडले. महाभारत असे मधेच संपवता येत नाही. तरी यापुढील भाग लिहून आम्हाला त्या मोठ्या स्त्रीयुद्धाचे दर्शन घडवावे. तसेच दु:शीलाची छाती फाडून हिडिंबेने तिचे रक्त कसे प्यायले ते वाचण्यासही आम्ही उत्सुक आहोत.

श्रावण मोडक's picture

1 Apr 2012 - 8:39 pm | श्रावण मोडक

खपलो. तूर्त इतकेच!
वरचे तीन शब्द दुपारी लिहिले. आत्ता थोडा सावरलो आहे. आता या लेखातील काही माणिकमोती झळाळून डोळ्यांपुढे आले आहेत.

सुनांवर दबाव ठेवण्यात या म्हातार्‍या नेहमीच एकमेकींच्या मैत्रिणी असतात.
या इतक्या बायकांनी जागा व्यापल्यानंतर तुला बसायला काय चौरंग मांडू का?
तुझ्या झिंज्या उपटून टाकीन, ही माझी प्रतिज्ञा आहे.
ए टवळे! झिंज्या कुणाच्या उपटणार तू?
एक बाळंतपण काय झालं तर हत्तीण बरी इतकी अवाढव्य फुगलीय नुसती.
खरकटे खाऊन जगतेस आणि नखरा केवढा गावभवानीचा?
समजलं गं सटवे तुझं कुजकं बोलणं.
अय्या! रुक्मे तू? अगदी ऐनवेळी आलीस गं.
बिनकामाच्या अवदसा मेल्या!

आणि शेवटी -

भरतखंडात स्त्रीसत्ताक पद्धती असली तरी दुर्बल, एकवस्त्र अशा दास पुरुषाची मानखंडना करण्यात कसला आलाय स्त्रियार्थ?

कळसाध्याय -

सूर्य अस्ताला जात असताना पांडवस्त्रिया आणि त्यांचे दास पती असा एक जथा नगरवेशीच्या बाहेर पडत होता. कुंतीदेवींचे सांत्वन करणारी रुक्मिणी गंभीर झाली होती. सूडाची ही ठिणगी उग्र रुप धारण करुन किती स्त्रियांना एकमेकींचे शत्रू बनवेल, हे चित्र तिला डोळ्यापुढे दिसत होते. लाखो स्त्रिया एकमेकींसमोर उभ्या राहून एकमेकींना यथेच्छ शिव्या देतील, हे दृश्य नियती बघत होती. पुढील हजारो वर्षानंतरही समाज या महामायायुद्धाला 'बोरीचा बार' म्हणून ओळखेल, हे नियतीलाही ठाऊक होते.

च्यायला... बोरीचा बार चा हा इतिहास तुला बरा गवसला! 'नियती'ही स्त्रीच असावी... छ)

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

1 Apr 2012 - 9:25 pm | निनाद मुक्काम प...

वाचून नुसता खदा खदा हसतोय.

ज्या वाक्यासरशी हास्यस्फोट झाला ती येते आधीच आली आहेत पण त्यात अजून भर

हिडिंबा उठून म्हणाली, ' भानुमती. तुझ्या झिंज्या उपटून टाकीन, ही माझी प्रतिज्ञा आहे.

' ए टवळे! झिंज्या कुणाच्या उपटणार तू?' आधी स्वत:च्या मस्तकावर बोटभर केस उरलेत तिकडे बघ

.हिडिंबा काय तुझ्या बापाचं खाते का? तू मात्र कौरवांचे खरकटे खाऊन जगतेस आणि नखरा केवढा गावभवानीचा?'

महाभारत हा विषय मिपावर चघळला गेला ह्याचे ह्या लेखाने सार्थक झाले आहे असे वाटते.

आमच्या डोंबिवलीत रामनवमी दणक्यात साजरी झ्याल्याचे रिपोर्टिंग मोतोश्रीने केले.

आमची आजी गणेशमंदिरात खास आयोजित केलेल्या धार्मिक कार्यक्रमात गेली होती.

समजा तेथे ह्या लेखावर आधारित एक अंकी नाट्य पर्योग सादर झाला असता तर ...

ह्या कल्पनेने हसू फुटतंय

काव्यवेडी's picture

1 Apr 2012 - 11:33 am | काव्यवेडी

छान मनोरन्जन झाले वाचून !!!

jaypal's picture

1 Apr 2012 - 12:17 pm | jaypal

माझ्या आयुश्यात हा लेख वाचण्याचा जबरदस्त योग यावा ही तो त्या प्रभुची क्रुपा. धन्य जाहलो --^--
वस्त्रहरण आवडल ;-)

प्रकाश घाटपांडे's picture

1 Apr 2012 - 12:26 pm | प्रकाश घाटपांडे

जर अशा महाभारताची मालिका बनली तर पहिले हक्क योगप्रभुचे!

बॅटमॅन's picture

1 Apr 2012 - 1:59 pm | बॅटमॅन

योगप्रभू, जिंकलात बघा!!!!! येकच नंबर _/\_

जाई.'s picture

1 Apr 2012 - 2:47 pm | जाई.

हा हा
गंमतीशीर एकदम

रमताराम's picture

1 Apr 2012 - 8:00 pm | रमताराम

ठार मेलो, खपलो, वारलो. अहो हे महाभारत व्यासमहर्षींची संहिता नक्कीच नाही, मग लेखिका कोण याची, व्यासमाता मत्स्यगंधा की काय?

आत्मशून्य's picture

1 Apr 2012 - 8:20 pm | आत्मशून्य

.

यकु's picture

1 Apr 2012 - 9:23 pm | यकु

__________/\_________!!!!!!!
शब्द संपले.
माझा तर पक्का संशय आहे, मूळ महाभारत तुम्हीच लिहीलंय ;-)

पिवळा डांबिस's picture

1 Apr 2012 - 11:09 pm | पिवळा डांबिस

ज ब रा हा!!!!!
:)
जियो!!!

सूड's picture

2 Apr 2012 - 11:40 am | सूड

हा हा हा !!

प्रीत-मोहर's picture

2 Apr 2012 - 12:02 pm | प्रीत-मोहर

प्रभुगुर्जी __/\__ स्वीकारा!!!!

मन१'s picture

2 Apr 2012 - 12:03 pm | मन१

कहर आहे ....

योगप्रभु साहेब, अफाट भारि आहे हे.

आमची मान वंदना स्वीकार करा.

बिपिन कार्यकर्ते's picture

2 Apr 2012 - 12:15 pm | बिपिन कार्यकर्ते

हाहाहा! एकच नंबर! =))

बादवे, गणपती कोणाला केला होता हो?

मन१'s picture

2 Apr 2012 - 12:27 pm | मन१

गणपती नाय हो.
हे गणपतीच्या रिद्धी-सिद्धी ह्या स्त्रियांनी किंवा साक्षात सरस्वतीनं लिहिलेलं असणार आहे.

बिपिन कार्यकर्ते's picture

2 Apr 2012 - 1:35 pm | बिपिन कार्यकर्ते

आयला मग योगप्रभूही चेंज झाले का काय? ;)

पैसा's picture

2 Apr 2012 - 1:39 pm | पैसा

लेख कदाचित योगमायेने कथन केला असेल!

बिपिन कार्यकर्ते's picture

2 Apr 2012 - 1:47 pm | बिपिन कार्यकर्ते

म्हणजे योग्याच गणपती! =))

योगप्रभू's picture

2 Apr 2012 - 2:35 pm | योगप्रभू

योग्याच गणपती म्हणून छान करताय आमचा गणपतीबाप्पा मोरया.. :)
योगमाया निद्रिस्त असताना आमच्या छोट्या मूषकाने रात्री खुडबूड सुरु केल्याने हे लेखन स्फुरले आहे.

रमताराम's picture

2 Apr 2012 - 3:31 pm | रमताराम

तुमच्या या मूषकाचे आभार मानावेत तेवढे थोडेच आहे. चांगला पायगुण म्हणायचा की त्याचा.

बिपिन कार्यकर्ते's picture

2 Apr 2012 - 4:06 pm | बिपिन कार्यकर्ते

+१

तुमचा मूषक असाच नेहमी खुडबुडो!

JAGOMOHANPYARE's picture

2 Apr 2012 - 1:26 pm | JAGOMOHANPYARE

आता रामायणाकडे वळा.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

2 Apr 2012 - 4:52 pm | निनाद मुक्काम प...

एकेकाळी गाजलेल्या घोष वाक्याला स्मरून

महाभारत तो झाकी हे, अभी रामायण और समस्त पुराण बाकी हे.

असे झाले
तर आम्ही म्हणू " प्रभू अजी गमला, मनी तोषला"

रणजित चितळे's picture

2 Apr 2012 - 2:21 pm | रणजित चितळे

मस्त मजा आली वाचून

रेवती's picture

2 Apr 2012 - 7:08 pm | रेवती

धन्य आहात योगप्रभू.

स्वछन्दि's picture

2 Apr 2012 - 7:37 pm | स्वछन्दि

"त्याच्या अंगाला नैसर्गिक सुगंध आहे, असे वृषालीने ऐकले होते. कपिसम केसाळ, अजागळ आणि अंगाकाखांना घर्माचा कुबट वास मारणारे पुरुष वारंवार नजरेला पडल्याने तिला हा चमत्कार बघण्याची खूप काळापासून इच्छा होती "

.....पोट दुखायला लागल..(हसुन ).

मूकवाचक's picture

3 Apr 2012 - 11:16 am | मूकवाचक

_/\_