(कृपया कालकुपीत बंदिस्त या कथानकातून कुणीही मस्तकदाह करुन घेऊ नये, अथवा विचित्र अन्वयार्थ शोधू नयेत, अन्यथा मनःस्तापाखेरीज काहीही हाती लागणार नाही.)
.................................................................................................................................
एक दीर्घ वळण घेऊन राजरथ इंद्रप्रस्थाच्या बाहेर पडला आणि कुरु राजस्नुषा भानुमतीने अस्वस्थपणे मागे मस्तक टेकले. मोकळ्या वार्याची झुळूकही तिला आता सुखावत नव्हती. संतापाने फुललेले तिचे आरक्त नेत्र आता भरुन आले होते. शेजारी बसलेल्या सखी वृषालीने तिची ही अवस्था जाणली. समजुतीने भानुमतीच्या खांद्यावर हात ठेवत ती म्हणाली, ' राज्ञींना कसला क्षोभ झाला आहे? आपल्या विश्वासू सखीला त्या सांगणार नाहीत का?'
भानुमतीने दीर्घ निश्वास सोडला. आता हिला काय सांगायचं? इंद्रप्रस्थात झालेला अपमान कुरु साम्राज्याची स्नुषा कोणत्या तोंडाने बोलून दाखवणार होती? अपमान केवळ तिचा एकटीचाच नव्हे, तर हस्तिनापूर सम्राज्ञी गांधारीदेवींचाही झाला होता. तिला राहून राहून तो प्रसंग आठवत होता. इंद्रप्रस्थात भव्य राजगृहाची वास्तुशांती असल्याने राजमाता कुंतीदेवींनी सर्व कौरवस्नुषांना आग्रहाने आमंत्रण दिले होते. भानुमतीला खरे तर जाण्याची मुळीच इच्छाच नव्हती, पण सासूबाईंच्या आज्ञेमुळे तिचा निरुपाय झाला. इंद्रप्रस्थात आपल्याला अपमानांच्या मालिकेला तोंड द्यावे लागेल, याची तिला कल्पनाही नव्हती.
सुरवात झाली तीच मुळी त्या महामाया द्रौपदीच्या विखारी नजरेने. प्रवासाने दमलेल्या भानुमतीकडे तिने लक्षही दिले नाही. 'आलात. या.' इतकंच म्हणून ती निघून गेली. वास्तुशांती समारंभात कुंतीदेवींनी भानुमतीला अतिथी राजस्त्रियांना शीतपेय देण्याची जबाबदारी सोपवली होती. समारंभ संपतानाही सुवासिनींची खणानारळाने ओटी भरायला लावले होते आणि ती टवळी द्रौपदी मात्र परतीचे आहेर वाटत मोठ्या मिजासीने मिरवत होती. मधून मधून भानुमतीकडे गर्विष्ठ कटाक्ष टाकत होती. भानुमतीची निकटची सखी वृषालीला आहेरांची नोंद करण्याचे काम दिले होते. 'वृषालीचे ठीक आहे. सूतकन्या असून तिला राजस्त्रियांच्यात उठबस करण्याचा मान मिळाला, ते खूप झाले, पण मी हस्तिनापूरची राजस्नुषा आणि सम्राज्ञी गांधारीदेवींच्या मागे सिंहासनाची उत्तराधिकारी असून मला मात्र शीतपेय वाटण्याचे निम्न काम?' भानुमतीचा संताप वाढू लागला होता.
आणखी एक प्रसंग तिच्या मनावर कायमचा कोरला गेला. नवे राजगॄह फिरुन बघताना एका ठिकाणी पाण्यावर रांगोळीचा गालिचा चितारला होता. ते ध्यानात न येऊन भानुमतीने त्यावर पाय टाकला आणि ती पाण्यात पडली. सावरुन उठत असताना तिला वरच्या कक्षातून हास्याचा कल्लोळ ऐकू आला. पाहते तर तिथे अर्जुन आणि त्याचे चार बंधू उभे होते. अर्जुन छद्मीपणे बंधूंना म्हणाला, 'सासूने डोळ्यावर पट्टी बांधली आणि सूनच धडपडली. मोठा विनोद आहे नाही?' संतापाने भानुमती किंचाळली, ' वाचाळ पुरुषा! एक ना एक दिवस तुझ्याही डोळ्यावर आणि अंगावर पट्ट्या बांधायला लावल्या नाहीत तर कुरुस्नुषा म्हणवून घेणार नाही. सासूने डोळ्यावर पट्टी बांधली तरी सून डोळस असते, हे दाखवून देईन तुला.'
भानुमतीला आश्चर्य वाटत होते. द्रौपदी आपला पाणउतारा करण्याची संधी कधीच सोडत नाही, पण अर्जुनाला उपरोधिक बोलण्याचे काय कारण? मातृसत्ताक आणि स्त्रीप्रधान व्यवस्थेत पुरुषाने स्त्रीचा अपमान करणे हे नैतिकतेला धरुन नव्हे.'
भानुमतीचा तसा अर्जुनाशी क्वचितच संपर्क आला होता. तिची सखी वृषाली मात्र अर्जुनाची कधीपासून अभिलाषा धरुन होती. भानुमतीला हे ठाऊक होते. वृषालीशी सख्य करण्याचे एक कारण होते. ते भानुमतीने कधी उघड बोलून दाखवले नव्हते. वृषाली ही सूतकन्या असल्याने तिचा वावर जनसामान्यांत होता आणि त्यामुळे तिला ज्या भलभलत्या शिव्या ठाऊक होत्या त्या राजघराण्यातील स्त्रियांनी क्वचितच ऐकल्या असाव्यात. वृषाली वेळप्रसंगी अचकट विचकट शिव्या देण्यात द्रौपदीला भारी पडू शकेल, या हेतूने भानुमतीने वृषालीला जवळ केले होते. शिवाय इकडचे तिकडचे चावट किस्से भानुमतीला अन्य कोण सांगणार होते?
'राज्ञी भानुमतींच्या मनःस्थितीचा अंदाज मला आला आहे, पण याक्षणी आपण क्षुब्ध होऊ नये. अपमानाचे उट्टे काढण्याची संधी प्रत्येक स्त्रीला मिळत असते, हे ओळखून आपण संधीची वाट पाहावी.' वृषालीच्या या बोलण्याने भानुमती विचारातून बाहेर आली. 'खरंच मला संधी मिळेल? तसं झालं ना तर एक ना एक दिवस मी पांडव साम्राज्याच्या अधिपती असलेल्या द्रौपदी, सुभद्रा, हिडिंबा, उलुपि, चित्रांगदा आणि इतर स्त्रियांना धडा शिकवीनच. आणि पुरुषी सौंदर्याचा दिमाख मिरवणार्या त्या अर्जुनालाही अशी जबरदस्त अपमानित करेन, की भानुमतीचा हिसका त्यांना कळलाच पाहिजे.'
भानुमतीने शांतपणे वृषालीकडे पाहिले आणि हसून म्हणाली, 'खरं आहे तुझं वृषाली. पण मी संधीची वाट पाहाणार नाही. संधी निर्माण करीन.' भानुमतीच्या डोळ्यांत आता वेगळीच चमक आली होती आणि मनात एक योजना आकाराला येऊ लागली होती.
भगवान सहस्ररश्मी अस्ताचलाला जात असताना रथ हस्तिनापूरच्या राजप्रासादाच्या प्रांगणात शिरला. एका निश्चयाने भानुमती स्वतःच्या विश्रामकक्षाकडे वळली. तिथे स्वागताला तिचा पती आणि दास असलेला दुर्योधन सस्मित आणि विनयशील मुद्रेने उभा होता.
(उत्तरार्ध नंतर कधीतरी...)
प्रतिक्रिया
30 Mar 2012 - 2:29 am | प्राजु
'महामाया'भारत होणार वाटतं अता!
30 Mar 2012 - 10:16 am | स्वाती दिनेश
'महामाया'भारत होणार वाटतं अता!
हो ग, असंच वाटतंय ..
स्वाती
30 Mar 2012 - 8:37 am | अमितसांगली
पुढील भागाच्या प्रतीक्षेत....
30 Mar 2012 - 8:42 am | पैसा
महाभारतातील उपेक्षितांचे अंतरंग फार छान उलगडून दाखवले आहेत हो प्रभूदेवा! त्या मेल्या अर्जुनाची ही हिंमत की महाराज्ञी भानुमतीचा घोर अपमान? पुढचा भाग लिहाच तुम्ही, वृषालीला कोणत्या शिव्या येत होत्या याची उत्सुकता लागून राहिली आहे. शिवाय भानुमतीने त्या दुष्टांना कसा धडा शिकवला तेही वाचायचं आहेच्च!
30 Mar 2012 - 2:30 pm | प्रीत-मोहर
अगदी अगदी!!!
अश्या वस्ताद बायकांमुळेच आज पाशवी धर्म टिकुन राहिला आहे असेही जाता जाता नमूद करते.
30 Mar 2012 - 4:15 pm | कवितानागेश
वृषालीला कोणत्या शिव्या येत होत्या याची उत्सुकता लागून राहिली आहे. >
अगदी माझ्या मनातले...
माझे शिव्यांचे नॉलेज ब्रश अप करायची वेळ आलीये! ;)
30 Mar 2012 - 9:53 am | नगरीनिरंजन
अर्जुनाचे वस्त्रहरण होणार का चुडेभरण होणार?
पुढच्या भागात कळेल का?
अवांतरः जुन्या सामानातून नवी पाकृ. याला म्हणतात पुराणातल्या वांग्याचे बेक्ड चीज ब्रिंजल इन मश्रूम सॉस. ;-)
30 Mar 2012 - 10:03 am | पिवळा डांबिस
जुन्या सामानातून नवी पाकृ. याला म्हणतात पुराणातल्या वांग्याचे बेक्ड चीज ब्रिंजल इन मश्रूम सॉस.
सहमत आहे.
महाभारत इन पॅरलल युनिव्हर्स!
अर्जुनाला पुढे बृहन्नडा म्हणून काळ का व्यतित करावा लागला याचा उलगडा झाला...
:)
पुढला भाग लवकर येऊ द्या....
30 Mar 2012 - 10:04 am | सूड
भन्नाट !!
30 Mar 2012 - 10:06 am | इरसाल
मला, सोनाली कुलकर्णी "गाढवाचं लग्न" मधील गेटपात हातात चांदीचे तबक घेवून कोल्ड्रिंक वाटताना कशी दिसेल असा विचार आला.
इथे,
सोनाली कुलकर्णी = भानुमती.
30 Mar 2012 - 10:11 am | प्यारे१
___/\___
योगप्रभू 'शब्दप्रभू' आहेत याची पुन्हा खात्री ....
31 Mar 2012 - 11:13 am | सोत्रि
प्यार्या माझ्या मनातला प्रतिसाद नेमका मांडलास!
उगाच नाय आपण योगप्रभूंचे फॅन!
प्रभू, पुढचा भाग लवकर येऊद्यात!
- (प्रभूपंखा) सोकाजी
30 Mar 2012 - 10:12 am | मूकवाचक
सुरुवात तर छान झाली. ठिणगी मस्त चकाकली. (आता वणवानलाच्या प्रतिक्षेत ....)
30 Mar 2012 - 10:31 am | सहज
योगप्रभू ओहोहो म्हणजे रामायण जसे मंथरा, कैकयी, शुर्पणखा, सीता (बघा ही चार पात्रे काढली तर काय उरते रामायणात, राम वनवास व सीताहरण घडलेच नसते तर काही लक्षात राहीले असते? आणी लोक त्या एकता कपूरला नावे ठेवतात) मुळे घडले
तसे महाभारत पण कुंती, द्रौपदी, भानुमती व वास्तुशांती...
30 Mar 2012 - 10:44 am | श्रावण मोडक
हं... चालू द्या. जमतंय. पुढचा भाग लवकर टाकला नाही तर मात्र तुझी खैर नाही.
पण मला एक सांग, योग सोडून प्रभूलीला का सुरू केल्यास तू? बहुदा, काल रात्री तू, धम्या, विनोबा, पऱ्या, डान्या वगैरे... एकत्र असावे. धागा पहाटेच प्रकाशित झालेला दिसतोय म्हणून म्हणतोय... ;)
30 Mar 2012 - 11:21 am | जाई.
पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत
30 Mar 2012 - 11:57 am | बॅटमॅन
सही...'पर्व' सारखी स्टाईल वाटते थोडीफार.. म्हणजे वेगळ्या अँगलने सांगितलेय. येऊद्या लौकर पुढचा भाग!
30 Mar 2012 - 12:03 pm | परिकथेतील राजकुमार
पुढचा पेग कधी? ;)
आणि त्या स्पार्टनवरच्या लेखमालेची सुरुवात कधी करणार आहे ?
पराहेक्टर
30 Mar 2012 - 12:14 pm | मन१
:)
30 Mar 2012 - 12:23 pm | आत्मशून्य
:D :D :D
30 Mar 2012 - 1:14 pm | मदनबाण
पुढच्या भागाची वाट पाहतोय !
30 Mar 2012 - 2:02 pm | मनीषा
या भागात जितकी कथा आहे त्यावर आधारित एक छान हिंदी सिरियल होऊ शकेल .. कमीत कमी दोन वर्षे तरी चालेल . अगदी नक्की ! तुम्ही एकता मॅडमना ही कथा वाचायला नक्की द्या.