मन उधाण वार्‍याचे....

सुचेल तसं's picture
सुचेल तसं in जनातलं, मनातलं
12 Jun 2008 - 11:36 pm

हे गाण जेव्हा जेव्हा ऐकतो तेव्हा तेव्हा अस वाटत की मन खरोखर आपल्याच मस्तीमधे धुंद होऊन, बेभानपणे झुलतय...

इतक्या ठिकाणी ह्या मनाबद्दल ऐकतो/वाचतो की कधी कधी अस वाटत की हे मन आपल्या शरीराचा एक भागच आहे. पण विचार केल्यावर लक्षात येत की ह्रदय म्हणजे काही मन नाही. ह्रदयाला स्पंदन असतात. एका मिनीटामध्ये अमुक अमुक ठोके पडले की समजायच सगळ आलबेल आहे. हे ह्रदय तर मला घडयाळाच्या लंबकासारख वाटत. विशिष्ट गतीन सतत ठोके देत असत. ह्रदयाला मनासारख उधाण होऊन चालत नाही.

मला वाटतं, सर्वप्रथम मनाची ओळख समर्थ रामदास स्वामींनी करून दिली. लहानपणी "मनाचे श्लोक" वाचताना मन म्हणजे नक्की काय हे खचितच कळल नव्हतं. पण जवळ जवळ प्रत्येक श्लोकामध्ये मन हेच कर्ता होतं आणि बहुतेक वेळा "मना" ला "सज्जना" हाच शब्द जोडुन यायचा. त्यामुळे मन ही काहीतरी सरळमार्गी गोष्ट असून तिच्यावर खुप मोठया जबाबदार्‍या आहेत अस माझं मत बनल होत. तेव्हा तरी उधाण मनाशी ओळख झाली नव्हती.

नंतर शाळेमध्ये बहीणाबाईंची "मन वढाय वढाय" अशी एक कविता होती. त्या कवितेतून मनाच्या स्वछंदीपणाची पहिली ओळख झाली. मन "मोकाट","लहरी" आणि "पाखरू" सुद्धा असू शकतं हे त्या कवितेतून कळल.

अस हे मन नंतर वेळोवेळी भेटत राहिलं. "मनासारखं न होणे","मनसुबे रचणे","मनात मांडे खाणे","मनाला येईल तसे वागणे/बोलणे", "मनमुराद हसणे","मनकवडा" अशा अनेक वाक्प्रचारातुन मनाचे संदर्भ येत राहिले.

मनाला सैरभैर,बेफाम,अवखळ अशी विशेषणं जास्त शोभून दिसतात. वेळप्रसंगी त्याला शांत, संयमी, खंबीर अश्या प्रौढ भुमिका पार पाडाव्या लागतात. पण हे त्याच्यावर ओढुन-ताणुन घातलेलं आवरण असतं. गंभीर भुमिकेत असतानाही ते उसळू पहातं, मर्यादा तोडू पहातं.

जेव्हा गाडी प्रेमावर येते तेव्हा मात्र बहुतेक वेळा ह्रदयच बाजी मारून जातं. प्रेमात ह्रदयांचीच देवाणघेवाण होताना दिसते; मग अशा वेळी मन कुठे असते? बहुदा ह्रदयाला स्पंदनाबरोबर वेळ पडली तर दुसर्‍या ह्रदयात स्थलांतर करण्याची सुद्धा कामगिरी नेमून दिलेली असावी. तरीदेखील, ह्रदय मोजुन मापुन बेफ़ाम होतं. सामान्य अवस्थेत असताना जेवढे ठोके पडत असतील त्यापेक्षा थोडेसे जास्त प्रेमावस्थेत पडत असतील. त्यामुळे मर्यादा सोडून काही ह्रदयाला वागता येत नाही. ह्याउलट, मनाला मर्यादेशी काही घेणंदेण नसत. खर पाहता, समोरची व्यक्ती मनात भरल्यानंतरच ह्रदयाची देवाणघेवाण शक्य आहे. त्यामुळे जोवर मन पसंतीचा "ग्रीन सिग्नल" देत नाही तोवर ह्रदय बापुड्याला काहीच करता येत नाही.

शेवटी हा जो मी लेख लिहिला ते देखिल माझ्या मनात आलं म्हणुनच. हा लेख वाचून तुम्हाला मनस्ताप झाला नसेल अशी आशा करतो.

[माझा ब्लॉग पत्ता: http://sucheltas.blogspot.com]

वाङ्मयविचार

प्रतिक्रिया

शितल's picture

13 Jun 2008 - 12:27 am | शितल

तुमचे मिपावर स्वागत.
तुम्ही मनावर छान लिहिले आहे.
पण मनावर कितीही लिहिले तरी मनाचे आपले वेगळेच पत्ताच लागत नाही.

स्वाती राजेश's picture

13 Jun 2008 - 12:31 am | स्वाती राजेश

अगदी मनापासून लिहिल्यामुळे लेख छान झाला आहे..
मि.पा.वर स्वागत....
अशाच लेखाची वाट पाहात आहे....

विसोबा खेचर's picture

14 Jun 2008 - 12:46 am | विसोबा खेचर

हेच म्हणतो..!

सुचेलतसं, तुमचं मिपावर स्वागत...

तात्या.

अनिल हटेला's picture

13 Jun 2008 - 8:34 am | अनिल हटेला

मनाविषयी लिहीलेला लेख मना पासुन आवडला!!!

बाकी मन ह्या विषायावर पी एच डी केली तरी पुर्ण स सन्दर्भ स्पष्टी करण करता येणार नाही...

हे माझ्या ही मनाला माहीती आहे.......

अरुण मनोहर's picture

13 Jun 2008 - 9:11 am | अरुण मनोहर

मनापासून ह्रदयापर्यंत सदभावनांनी सुचेल तस स्वागत.

अवांतर- ह्रदय हे हार्डवेअर आहे आणि मन हे सॉफ्टवेअर आहे. ही गोष्ट अलहिदा की कधी कधी ह्रदय मेणाहून मऊ असते आणि मन दगडासारखे कठीण करावे लागते.

स्वाती दिनेश's picture

13 Jun 2008 - 1:06 pm | स्वाती दिनेश

मनावरचा लेख मनापासून आवडला
असेच म्हणते.
स्वाती

प्राजु's picture

13 Jun 2008 - 1:09 pm | प्राजु

लिहिलेला मनावरचा लेख, मी मनापासून वाचला आणि माझ्या मनाला तो आवडला..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

सुचेल तसं's picture

13 Jun 2008 - 2:23 pm | सुचेल तसं

शितल, स्वाती राजेश, अन्या, अरुण, स्वाती दिनेश आणि प्राजु:

आपण सर्वांनी दिलेल्या प्रोत्साहनाबद्दल आणि प्रतिसादाबद्दल शतशः आभार!!!

काळा_पहाड's picture

13 Jun 2008 - 2:31 pm | काळा_पहाड

मनावर मनापासुन लिहिलेलं मनापासुन आवडले.
आणखी येऊ द्यात.
काळा पहाड