एम.आर.आय.

गवि's picture
गवि in जनातलं, मनातलं
10 Feb 2012 - 5:17 pm

मला क्लॉस्ट्रोफोबिया नाही अशी माझी घट्ट समजूत होती. एम.आर.आय.च्या जीवघेण्या अरुंद बिळात मला सरकवण्यात येईपर्यंत ती टिकूनही होती..

डोक्याचा स्कॅन म्हणून अगदी पूर्ण आतपर्यंत जायला लागणार आहे हे मला माहीत होतं. ओपन एम आर आय म्हणून काहीतरी नवीन निघालंय असं ऐकून होतो पण आम्हाला अव्हेलेबल असलेल्या या एम.आर.आय.मशीनचं बीळ हे माझ्या धुडाच्यापेक्षा जेमतेम एक इंच जास्त व्यासाचं होतं. बाहेर बसून हे पटलं नसतं पण जेव्हा ते मला त्या फळीवर झोपवून आत ढकलायला लागले तेव्हा "गात्रं आत आणि जीव बाहेर उडी मारुन पळू पाहतोय" अशी अवस्था झाली.

"किती वेळ आत रहायला लागेल", मी अडकलेल्या श्वासाने जेमतेम विचारलं.

"पाऊण तास कमीतकमी..ज्यास्ती डाऊट आला तर स्पाईन पण करायला लागेल मग एक तास पण लागू शकतो.."

माझ्या स्पाईनमधून थंड कळ गेली.

ही भीती खरोखर जीवघेणी होती. हार्ट थाड्थाड उडत होतं आणि बाहेर पडेल असं वाटत होतं. इथेच आपण मरणार असं वाटायला लागलं. इलेक्ट्रिक फर्नेसच्या बोगद्यात अनेक आपल्या लोकांना, काही जवळच्याही, शेवटचं ढकललं जाताना बघितलं, किंवा स्वतः ढकललंही होतं. तेच, अगदी तेच फीलिंग्..बोगदा मात्र छातीशी घट्ट आवळल्यासारखा अरुंद..

आता डोळे घट्ट मिटून घ्यायचे आणि परत बाहेर काढल्यावरच उघडायचे असं ठरवून मी गपगार पडलो. डोळे मिटलेले ठेवणं हेच किती कठीण आहे हे कळलं. उघडले तर डोळ्यापासून एक इंचाइतक्या अंतरावर असलेली त्या टनेलची आतली बाजू मरणाहून अक्राळ विक्राळ दिसायची. भेसूर शांतता आणि एम.आर.आय मशीनसाठी लागणारी गोठवणारी थंड खोली.

मग लहानशा हातपंपासारखा आवाज सुरू झाला. "बुचुक बुचुक...".

माझ्या लहानपणी सागर भांडार किराणा दुकानाबाहेर बॅरल्सना हातपंप लावलेले असायचे आणि त्यातून बुचुक बुचुक आवाज करत दुकानदारकाका गोडंतेल हापसायचे. त्याजागी जाऊन पोचलो. थोडं शांत वाटलं.

मग एकदम तो आवाज बंद झाला. शांतता. स्मशान, इलेक्ट्रिक फर्नेस, गुदमरा, मरणभीती सगळं एकदम भॉक करून अंगावर परत आलं. छातीवर बसलं. छातीत गच्च दाब जाणवायला लागला. श्वास कोंडला. ओरडायलाही शब्द फुटेना.

तेवढ्यात थड् ड् ड् ड् ड् ड् ड् ड् ड् ड् ड् ड्..असा एक संततध्वनी सुरु झाला. क्षणभर इतका दचकलो की वाटलं हा आपला शेवटचा श्वास. कसला आहे हा आवाज? मशीन बिघडलंय.. आपण त्या यंत्रात भाजले जातोय, दाबले जातोय, बरगड्या हाडं मोडली जातायत असा पूर्वी कधीही न आलेला फील आला.

थ ड् ड् ड् आवाज माझे काही श्वास ऐकून बंद झाला. मग ग्रिंग ग्रिंग ग्रिंग सुरु झालं. हे त्यातल्यात्यात बरं होतं.

पुन्हा शांतता. माझ्या लक्षात आलं की मला आवाज सुरु होण्यापेक्षा शांतता सुरु होण्याची जास्त भीती वाटतेय.

मग एकदम जोरदार घिंका घिंका अशा नियमित आवाजांनी माझ्याभोवती फेर धरला. हळूहळू मला मशीन विचारायला लागलं..

"घेऊ का..? घेऊ का..? घेऊ का..? घेऊ का..? घेऊ का..?घेऊ का..?"

मला आधी तो विकृत विनोद वाटला. माझा जीव घेऊ का? विचारतंय मशीन. असंही मेंदूचं स्कॅनिंग आहे. ब्रेन ट्यूमर सस्पेक्टेड आहे म्हणून चाललंय. आता मशीनला खरंच ट्यूमर दिसला असेल ..आणि जीव घेऊ का असं विचारतंय..?

तेवढ्यात दुसरीकडून सुरु झालं..एकदम लाउड..

"घे की..घे की..घे की..घे की..घे की..घे की..घे की..घे की.."

मी दचकलो. म्हणजे मशीन स्वतःशीच बोलत होतं. माझ्याशी नव्हेच..

परत जीवघेणी नकोशी थंड शांतता. मी ठरवलं की शांतता झाली की गणपती अथर्वशीर्ष म्हणायचं मनात.. लहानपणी पाठ केलेलं अजून डोक्यात टिकून होतं.. देवाचं अस्तित्व न मानणारा मी क्षणात बाटलो होतो. मला काहीतरी करून मनाला गुंतवून ठेवायचं होतं.

माझ्या अथर्वशीर्षाला छेदून मशीनमधून एकदम "ठो..ठो..ठो..ठो..ठो..ठो.." असे आवाज फास्ट फास्ट सुरु झाले.

स्फोट होतोय का मशीनचा? मॅग्नेटिक पॉवर राक्षसी असते त्याची. नुकतंच एक लहान मूल मशीनच्या बिघाडामुळे मारलं गेलं आतच्..बोगदयातच..

इथून सुटका कधी? झाली असेल का टेस्ट पूर्ण..शक्यच नाही. त्यांनी तासभर लागेल म्हणून सांगितलंय.

पुन्हा बुचुक बुचुक तेलपंप..

पुन्हा शांतता...

काय दिसलं असेल त्यांना माझ्या मेंदूत.. मला वॉर्निंग दिल्यीय आधीच की अजिबात हलू नका. माझं डोकं त्यामुळेच एका खोड्यात अडकवलंय. तरीही हालचाल झाली तर? मग परत स्कॅन करावं लागेल आणि जास्त जास्त वेळ लागत जाईल असं ते म्हणालेत. म्हणजे हललो की अजून तासभर.. मी हललोच असलो आणि ही शिक्षा अजून तासभर वाढवली गेली असेल तरी ते मला कसं कळणार. इंटरनेटवर तर आपण अमेरिकेतल्या एम.आर.आय चे अनुभव वाचले होते. त्यात ते कानाला हेडफोन लावतात. आपल्याशी सतत बोलत राहतात. इथे भारतात, निदान या सेंटरमधे तसलं काय नाय. का नाय?

"गप.. गप.. गप.. गप.."

मी गप्प झालो.

खूप वेळ शांतता. पण बाहेर काढण्याचं नाव नाही. असह्य विलंब..वाट पाहाणं.

भीती हळूहळू परत उसळून वर यायला लागलेली. ट्यूमरची भीतीही त्यात भरीला आलेली. बाहेर गेलो की टेक्निशियन गंभीर चेहर्‍याने उभा असेल. त्याला सगळं कळलंच असेल. पण तो ते सांगणार नाही. "डॉक्टरच काय तो रिपोर्ट देतील", असंच म्हणेल भ**..

"भडवा भडवा भाड्या भाड्या..भडवा भडवा भाड्या भाड्या.."

वेगळाच आवाज सुरु.. आयचा घो. हे मशीन ब्रेनसोबत मनातलंही सगळं वाचतंय आणि मला चिडवतंय की काय?

मशीनच्या शिवराळपणाची हद्द झाली आणि मग एकदम..

"हिक हिक हिक.." उचक्यांचे आवाज देऊन ते परत शांत झालं...

परत हातपंप..बुचुक बुचुक..

परत "घेऊ का..घेऊ का? घे घे घे घे..घे की.. घे की.."
......
......
च्यायला .. काढा आता इथून बाहेर.
..

"जा की.. जा की.. जा की.. जा की.. जा की.. जा की.." मशीननं सुरु केलं..
..
खरंच जातो मी..जाऊ दे मला..
..

"जा की.. जा की.. जा की.. जा की.. जा की.. जा की.." मशीननं आवाज चढवला.

मग एका शांततेनंतर मला बाहेर ओढून घेण्यात आलं.

थंडीनं कुडकुडत दार लोटून बाहेर आलो तर समोर एम. आर. आय. चा गाऊन घालून आत नागडा असा नवा पेशंट वाट बघत उभा होता.

माझ्या आधी बोगद्यात जाऊन आलेली एक मुसलमान तरुणी अजून बाहेर बाकावर बसली होती.

"हो गया क्या तुम्हारा बी?" तिने मला विचारलं.

"हं", मी म्हणालो.

"मेरी तो जान निकल गयी थी अंदर..भाईजान..डर के मारे हमने मशीन के अंदरही दम तोड दिया तो वो लोग तो हमें उनके टाईम पर ही बाहर निकालेंगे ना? की उनको सम्मजमें आयेगा की हम मरगये..?"

दोघेही छाती भरून हसलो..

"रिपोर्ट लेनेको कल आना पडेगा..", काऊंटरवरचा मॅन ओरडला...

आम्ही दचकलो..

मग हसणं कंटिन्यू केलं.

औषधोपचारतंत्रराहणीप्रकटनविचार

प्रतिक्रिया

पुनर्वाचनायच !
तीच थंड शिरशिरी पुन्हा एकदा.
मागच्या जन्मी बहुतेक तुम्ही भगवान बुद्धांचे भिक्खू असाल. ;-)
प्रेत जळत असताना तिथं बसून भिक्खूंकडून ध्‍यान करुन घेतले जायचे म्हणतात.

अवांतर: आले हे मसणजोगी* मरणाची आठवण करुन द्यायला. ;-)
* अटेंशन मिस्‍टर धमाल मुलगा: यू हॅव गॉट एनादर मसणजोगी कंपॅनियन.

स्वतः अनुभवतोय की काय इतक जिवन्त.

इनोबा म्हणे's picture

11 Feb 2012 - 12:01 am | इनोबा म्हणे

यईच बोल्ताय.

जाई.'s picture

10 Feb 2012 - 5:26 pm | जाई.

_/\_

कोल्हापुरवाले's picture

10 Feb 2012 - 5:36 pm | कोल्हापुरवाले

झाक व्हत राव !!

मोदक's picture

10 Feb 2012 - 5:53 pm | मोदक

अंगावर येणारे वर्णन.

गवि इज बॅक. :-)

रानी १३'s picture

10 Feb 2012 - 5:56 pm | रानी १३

_/\__/\__/\__/\__/\__/\__/\__/\__/\__/\__/\__/\__/\__/\__/\__/\__/\__/\__/\__/\__/\__/\__/\__/\__/\__/\__/\__/\__/\__/\__/\__/\__/\__/\__/\__/\__/\__/\__/\__/\__/\__/\__/\__/\__/\__/\__/\__/\__/\__/\__/\__/\__/\_

पुरेसे आहेत का नमस्कार??????

उदय के'सागर's picture

10 Feb 2012 - 6:13 pm | उदय के'सागर

बापरे... एवढा भयानक प्रकार असतो का हा "एम.आर. आय" प्रकार..... (मला खुप कुतुहल होतं त्या बोगद्यात जायची पण अता जाम फाटली आहे... पण तरीही एकदा जायचं आहेच :P )

बाकि नेहमी प्रमाणे खुपच जिवंत लिखाण... :)

स्वाती२'s picture

10 Feb 2012 - 6:27 pm | स्वाती२

_/\_

चतुरंग's picture

10 Feb 2012 - 6:33 pm | चतुरंग

भलताच भारी अनुभव लिहिला आहेत!
प्रत्येक आवाज आणि त्याचा मनात उमटणारा प्रतिसाद जीवघेणाच.

(कॅटस्कॅनमधून सहीसलामत सुटलेला क्लॅस्ट्रोफोबिक) रंगा

इष्टुर फाकडा's picture

10 Feb 2012 - 6:51 pm | इष्टुर फाकडा

गेल्याच बुधवारी मीही करून आलो गुडघ्याचा एम आर आय. मलाही बंद जागेची भीती आहे, किंवा तसा माझा समज होता. चाफळ ला समर्थांची ध्यान लावण्याची एक जागा आहे तळघरात एका खोलीमध्ये, एकदम खोलात. त्या जागेत कसेबसे शरीर आकसून बसाल एवढीच जागा आहे. तिथे धड श्वास घ्यायची मारामार होत होती माझी; शांत बसण्याचं नावच नको. तिथे आयुष्यात पुन्हा कधी गेलो नाही. सेम अवस्था कानिफनाथाला झाली होती.
पण आश्चर्य म्हणजे माझ्या एम आर आय च्या वेळेस मी चक्क झोपलो !!! तेही पाऊण तास. सुरुवातीला जाम घुसमट झाली, पूर्ण श्वास भरून घेता येईना. पण मशीन ने परग्रही आवाज काढायला सुरुवात केली आणि चक्क त्यात एक लय सापडली. कधी झोप लागली कळलंच नाही :) तिथल्या काकूंनी मला एक फुगा हातात दिला होता panic अलार्म म्हणून. तो दाबायची काही वेळ आली नाही ;) आणि माझा क्लॉस्ट्रोफोबिया रिलेटिव्ह आहे हे लक्षात आले ;)

तुम्हाला पिंडातून शब्दब्रम्हांड साकार करायची कला अवगत आहे हे पुन्हा एकदा समोर आले .

किचेन's picture

10 Feb 2012 - 10:25 pm | किचेन

माझा डोक्याचा काढायचा होता.तेव्हा मलाही चक्क एवढ्या सगळ्या आवाजात झोप कधी लागली ते कळलच नाही.मेंदूचा आय होता त्यामुळे जेव्हा मी माझा नंबर कधी लागतो याची वाट बघत असताना एक विचार सारखा येत होता.माझ्या डोक्यात काही विचार आले तर एम. आर. .आय.बदलेल का?एकदा मला तिकडच्या बाईला तसं विचारावस पण वाटल.पण आत जाताना मला आपण स्पेस शिप मध्ये जातोय अस वाटल. एवढे पैसे गेले अन काहीच निघाल नाही याचा आनंद माणू कि दुखः? ;)

प्यारे१'s picture

13 Feb 2012 - 2:14 pm | प्यारे१

>>>>माझा डोक्याचा काढायचा होता.
>>>>एवढे पैसे गेले अन काहीच निघाल नाही याचा आनंद माणू कि दुखः?

वाटलेलंच. ;)

मोदक's picture

4 Apr 2012 - 1:07 am | मोदक

:-D

मलाही एमाराय करून घेताना मस्त, शांत झोप लागलेली. आणि त्याआधी स्पेस कॅप्सूल मधून दूरच्या अंतराळ प्रवासाला निघाल्यासारखं भारी वाटत होतं ते वेगळंच!

अरे काय रे एकसे एक आवाज ते. =)) =)) =))
हसुन हसुन फुटलो.

पैसा's picture

10 Feb 2012 - 7:06 pm | पैसा

आजारापेक्षा असल्या तपासण्या आणि उपचार यानीच मी मरेन! मला पण काही कारणाने एम आर आय करून घेण्याचा सल्ला मिळतो आहे,मी ते ऐकलंच नाहीसं करते!

पैसाताई, तपासणी चुकवू नकोस. असं आपल्यालाच नाही सगळ्यांनाच घाबरल्यासारखं होतं हे आता माहीत झालय ना.
गविंचा लेख पाठ करून जा. एखादा आवाज कमी जास्त आला की मनात साठव.;) लेखात शेवटचा आवाज कोणता आहे ते बघ. तो आला की सुटकेची वेळ जवळ आली असं समजायचं.

हॅ हॅ..
ते आवाज आपण मनाने जसे ऐकू तसे
तंतोतंत येतात.

बाकी महत्वाचं.

एम आर आय मधे मानसिक भीती वगळता काही वेदना
त्रास अपाय नाही. उलट सर्वात सेफ आहे ही
टेस्ट

ससां गितली असेल तर तातडीने करा. प्लीज.

वपाडाव's picture

10 Feb 2012 - 7:14 pm | वपाडाव

घेउ का... घेउ का... घे की... घे की... सगळ्यात जास्त आवडेश...

गणेशा's picture

10 Feb 2012 - 7:20 pm | गणेशा

जबरदस्त लेखन !

स्मिता.'s picture

10 Feb 2012 - 7:21 pm | स्मिता.

एम. आर. आय. च्या त्या अरूंद बोगद्याची मलाही TV मधे बघूनच भिती वाटते. त्यामुळे आत काय वाटत असेल याची मी कल्पना करू शकते. वर्णन तर असं झालंय की मलाच त्या बोगद्यात जावून आल्यासारखं वाटलं.

चार महिन्यापुर्वीच जाउन आलोय या अनुभवातुन, पण जाणवली ती प्रचंड थंडी अन कॉलेज मध्ये पुस्तकात पाहिलेल्या अन ड्राइंग वर काढलेल्या मॅगनेटिक रेज प्रत्यक्ष दिसायला लागल्या होत्या.

असंच एखादं मशीन तयार करायचा विचार आहे, ज्यात एका बाजुनं आत घातलं की सगळी फॅट काढुन घेउन दुस-या बाजुनं बाहेर काढता येईल.

बाकी, गविंच्या लिहिण्याबद्दल काय लिहिणार आम्ही.

गवि, जे काय झालं आहे त्यातुन लवकर बरे व्हा ह्या शुभेच्छा.

प्रचेतस's picture

10 Feb 2012 - 7:58 pm | प्रचेतस

भन्नाट लिखाण

सानिकास्वप्निल's picture

10 Feb 2012 - 8:34 pm | सानिकास्वप्निल

बापरे भितीच वाटली वाचता वाचता ....
तुमच्या लेखनाबद्दल काय वेगळे लिहायचे...नेहेमीप्रमाणेच जबरदस्त

अगदी शब्दाशब्दाशी सहमत.
फरक एवढाच की लेख लिहिण्याइतपतही शक्ती (घाबरल्यामुळे) शिल्लक नव्हती.
आधी माहिती होतं मी क्लॉस्ट्रोफोबिक आहे त्यामुळे साक्षात्कार नव्हता तो.
श्वास बंद पडेल असं अख्खा पाऊण तास वाटत होतं म्हणून मशिनात घातल्याघातल्या येत असतील नसतील ती सगळी स्तोत्रे म्हणून टाकली. इतक्या उत्साहात पहिल्यांदाच म्हटली असतील.;) डोळे उघडल्यावर अगदी पापणी टेकेल की काय इतक्या जवळ ते यंत्र होतं. रोगानं नाही पण थंडीनं माणूस अर्धमेला होईल असं वाटत होतं. जाऊ दे! नकोच असलं काही.
आणि हो, मला काहीच झालं नव्हतं......देवाच्या कृपेनं.:)

भीमाईचा पिपळ्या.'s picture

10 Feb 2012 - 9:22 pm | भीमाईचा पिपळ्या.

आयला ह्या गविचा गंडा बांधायचा आहे ह्या पिपळ्याला.
ङूॠ ञॅळ आआ।अ‍ॅ णा?

भीमाईचा पिपळ्या.'s picture

10 Feb 2012 - 9:24 pm | भीमाईचा पिपळ्या.

।आआ ङावी ंईपाआच्।अ‍ॅ ़आबार्‍आडास्ट फाञादॅअ‍ॅम्ङ आआ।अ‍ॅ.

सोत्रि's picture

10 Feb 2012 - 10:56 pm | सोत्रि

गविजी,

खरंतर काय लिहावे हेच कळत नाहियेय. तुफान ताकदीने केलेल लेखन.

- ( निशब्द झालेला आणि फूलस्पिड गविपंखा ) सोकाजी

कौशी's picture

10 Feb 2012 - 11:37 pm | कौशी

आवडले...

पुन्हा शांतता. माझ्या लक्षात आलं की मला आवाज सुरु होण्यापेक्षा शांतता सुरु होण्याची जास्त भीती वाटतेय.
देवाचं अस्तित्व न मानणारा मी क्षणात बाटलो होतो. मला काहीतरी करून मनाला गुंतवून ठेवायचं होतं.
तरीही हालचाल झाली तर? मग परत स्कॅन करावं लागेल आणि जास्त जास्त वेळ लागत जाईल असं ते म्हणालेत.
थंडीनं कुडकुडत दार लोटून बाहेर आलो तर समोर एम. आर. आय. चा गाऊन घालून आत नागडा असा नवा पेशंट वाट बघत उभा होता.

गवि साहेब?
तुमच्या वर्णन शैली बद्दल काय बोलावे? विमानांचे अपघात झाले, सेफ लॅन्डींग पण झाले. पण असा अनुभव वेगळाच.
तुमचा सर्व लेख एका दमात वाचूच शकलो नाही. दोन तीन पॉज घेऊनच वाचन केले.वैकुंठ मध्ये विद्युतदाहिनी मध्ये ढकलण्याची कल्पना तर अशक्य होती. (फक्त नुसते वाचताना फा S S ट S ली म्हणजे काय याचा अनुभव आला.)
मी आत्ताच माझा स्वतःचा एम आर आय काढला आहे असे वाटावा इतका जिवंत अनुभव.
तुमच्या अनुभवाला, विचार करण्याच्या पध्दतीला, आणि शब्द प्रभुत्वाला लाख लाख सलाम!!
हा सर्व प्रसंग काल्पनिक असेल अशी आशा करतो.

मस्त मस्त मस्त!
'घेउ का.. घे की' हे तर तुफान!

श्यामल's picture

11 Feb 2012 - 12:10 pm | श्यामल

गवि, __/\__ जबरदस्त लेखन!

मराठी_माणूस's picture

11 Feb 2012 - 12:42 pm | मराठी_माणूस

भयंकर अनुभव.

क्लॉस्ट्रोफोबिया वर काही उपाय आहे का ?

सस्नेह's picture

11 Feb 2012 - 12:49 pm | सस्नेह

क्लॉस्ट्रोफोबिया या नावापेक्षा अनुभव भय॑कर दिसतोय...
बेहद्द भन्नाट लेखन. खुप आवडल॑. मशीनच्या आवाजा॑विषयी एखाद्या डॉक्टरच॑ मत वाचायला आवडेल...

चिगो's picture

11 Feb 2012 - 1:46 pm | चिगो

एकदम अंगावर येणारं लिखाण... बापरे !! जबरा, गवि..

(गविंचा फुलटू फॅन) चिगो..

आनंद's picture

11 Feb 2012 - 4:37 pm | आनंद

ह्या असल्या आवाजानी आणि भितीनेच वांजळे गेले असतील का?

कवितानागेश's picture

11 Feb 2012 - 5:24 pm | कवितानागेश

रीपोर्ट नॉर्मल आला ना?
मग झाले तर. .. :)
कशाला त्या बोगद्याची चर्चा तरी करायची??? :(

- (क्लॉस्ट्रोफोबिक ) माउ

चौकटराजा's picture

11 Feb 2012 - 7:29 pm | चौकटराजा

गवि, आतापर्यन्त अनेक आत्मकथने वाचली .पण " या" पोलादी बोळात आल्मकथन जन्मते हे कल्पनातीत आहे हो ! जो संवेदनाशील आहे तो
किती उत्कटपंणे आयूष्याचा धांदोळा घेउ शकतो. याचे हे उदाहरण ठरावे. यंत्रांची मनोगते असा नवीन धागा ही यातून सुचू शकतो. मला आमच्या
मुंजीच्या पत्रिकेच्या छपाईची आठवण झाली. ते ट्रेडल मशीन म्हणायचे " आता पुरे ... मग या : एक पत्रिका..... पुन्हा आता पुरे मग या दुसरी पत्रिका......
मैफलीच्या भाषेत या भयप्रद( असूनसुद्धा ) अनुभवाचे उत्तर देतो .... क्या बात है ! वा ह !

तिमा's picture

11 Feb 2012 - 7:53 pm | तिमा

मी कधी एमाराय केला नाहीये. पण अनुभव जबरदस्त आणि जर खरा नसेल तर कल्पनाशक्तीची भरारी जबरदस्त.
मी नेहमीच एम. आर. आय. ला 'मराय' असे मराठीत म्हणतो. आत जाणारे पेशंट नातेवाईकांचा शेवटचा निरोप घेतल्यासारखे 'बराय' च्या ऐवजी 'मराय' म्हणत असावेत.

मराठमोळा's picture

11 Feb 2012 - 8:17 pm | मराठमोळा

हाहाहा... लेख मस्तच..
माणूस सर्वात जास्त भितो ते म्हणजे जीवाचे बरेवाईट होण्यालाच.. ;)
माझ्याही नुकत्याच फुल बॉडी चेकअप टेस्ट झाल्या.. त्यात एमआरआय तेवढी नव्हती.. पण कोणत्याही टेस्ट करण्यापेक्षा त्या टेस्टचे रिपोर्ट घ्यायलाच जास्त धास्ती वाटली.. विषेशतः एड्सची.. कारण आयुष्यात तुम्ही कितीही सरळ असलात ;) तरी या रिपोर्ट्ची का कुणास ठाउक मनात भिती जास्तच असते.. पण सगळे रिपोर्ट नॉर्मल आल्यावर एकदम जीव भांड्यात पडतो.. :)

बहुगुणी's picture

12 Feb 2012 - 12:41 pm | बहुगुणी

गविंनी ऐकलेले (प्रत्यक्ष किंवा उत्कृष्ट कल्पनाविलासाने!) आणि आपल्याला शब्दांतून ऐकवलेले हे काही आवाज इथे प्रत्यक्ष ऐकायला मिळतीलः

"

‘BIDE’

Diffusion Tensor Imaging

Gradient

K.I.S.S.

R.A.G.E.

T1


T2

या संज्ञांची Physics च्या परिभाषेत आधिक माहिती हवी असल्यास ती इथे मिळेल, अर्थात ही क्लिष्ट माहिती physicist वाचकांनाच कळेल असं वाटतं (तो मी नव्हेच ;-) )
आणि एम आर आय या तंत्रज्ञानाची थोडीशी माहिती देणारे दोन व्हिडिओज पुढे:
"

[सीमेन्स या जगद्विख्यात कंपनीच्या अरलँगेन (Erlangen, Germany) -स्थित एम आर आय मशिन्सच्या निर्मितीत महत्वाच्या कारखान्यात जायचा योग आला होता, त्याची माहिती जमलं तर कधीतरी देईन.]

नगरीनिरंजन's picture

13 Feb 2012 - 12:38 pm | नगरीनिरंजन

एमाराय करून घ्यायची कधी वेळ आलेली नाही सुदैवाने पण त्याचा अनुभव नाही असे आता हे वाचल्यावर म्हणू शकत नाही. :)
अक्षरशः त्या एमारायच्या गोल बीळात डोकं घालून बसल्यासारखं अस्वस्थ वाटत होतं वाचताना.

स्पा's picture

13 Feb 2012 - 12:55 pm | स्पा

जब्राट

सर्व प्रतिसादकांना एक गोष्ट सांगावीशी वाटते की सध्यातरी एमाराय "क्लिअर" आहे. त्यामुळे काळजी नसावी..

ओपन "एम आर आय"चं तंत्रही आलेलं आहे. पूर्वी ते भारतात नव्हतं. आता मुंबईततरी नक्की काही ठिकाणी उपलब्ध आहे.
यात नळकांडीऐवजी तीन बाजूंनी उघड्या प्लॅटफॉर्मवर वरुन गोल चुंबकाची प्लेट पुढेमागे होते. यातही ती अवजड प्लेट नजरेजवळून फिरत असल्याने क्लॉस्ट्रोफोबिया येतोच पण बोगद्याइतका नाही. याचा आवाजही खूपच कमी असतो.

फक्त या ओपन एम आर आयची ताकद/कपॅसिटी (रेझोल्युशन किंवा क्लॅरिटी) कमी असल्याने अनेक केसेसमधे क्लोज्ड एम आर आयच करुन घ्या अशी सूचना कम सक्ती डॉक्टर करतात. त्यामुळे बर्‍याच पेशंटसना अजूनही तीच नळकांडी एम आर आय करावी लागते.

लहान मुलांना वगैरे ओपन एम आर आय बरी पडते. त्यांना तर सिडेटिव्ह देऊन झोपवूनच करावी लागते टेस्ट.

अर्थात मानसिक भीती, कानठळ्या बसवणारे आवाज वगैरे सोडले तर हे धोकाविरहीत तंत्र आहे. यात सीटी / एक्सरेसारखी आयनायझिंग रेडिएशन्स नाहीत. प्रतिमाही जणू थेट फोटो काढावा अशी आणि थ्री डी.. शरीराचे वांग्यासारखे बारीक काप काढल्यासारख्या थरांमधे. म्हणजे दोष सापडण्याची जास्तीतजास्त खात्री..

ज्याने एम आर आय तंत्र शोधून काढलं त्याला नोबेल पारितोषिक मिळालं होतं.

रेवती's picture

18 Feb 2012 - 9:42 am | रेवती

एमाराय "क्लिअर"
बरं झालं.

मस्तच जीवघेणं प्रकरण दिसतंय हे...!

मिरची's picture

18 Feb 2012 - 9:09 am | मिरची

भयानक अनुभव असतो राव...परत कधी घेण्याची अजिबात हिंमत नाही.....

मराठी_माणूस's picture

18 Feb 2012 - 11:04 am | मराठी_माणूस

अ‍ॅनेस्थेशिया देउन एम आर आय केला जात नाही का ?

लहान मुलांना सेडेट करतात पण अनेस्थेशिया दिल्याचं ऐकलं नाही. भरपूर थंडीत मात्र जीव जातो.;)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

18 Feb 2012 - 9:54 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

च्यायला, लंबर एक लिहिलं आहे. वर चौकटराजा प्रतिसादात म्हणतात तसेच म्हणतो- पोलादी बोळातलं आत्मकथन आवडलं :)

एमरायच्या ठिकाणची भयाण शांतता आणि तिथे काम करणारे कोणत्या तरी ग्रहावरचे भयाण गंभीर कर्मचारी यांना पाहून अर्धा जीव जातो आणि राहीलेला अर्धा जीव एमरायाच्या बीळात जातो की अशी अवस्था तिथे असते. एका मित्रासाठी गेलो होतो. वातावरणात इतका गंभीरपणा असतो की विचारु नका.

-दिलीप बिरुटे

मन१'s picture

19 Feb 2012 - 12:59 am | मन१

सदर लेखकांस नक्की किती वेळेस मरण्याचा व मरण्यापूर्वीच्या तपासण्या करून घेण्याचा अनुभव आहे हे जाणून घेण्यास उत्सुक आहे. जेव्हा पहावे तेव्हा आमचं उंदराचं असलेलं काळिज अजूनच बारिक करुन जातात, झालं.

दादा कोंडके's picture

20 Feb 2012 - 2:10 pm | दादा कोंडके

सचिनला पण एम आर आय स्कॅनींग करावं लागणार आहे म्हणे आता. (श्री सत्य साईंबाबांचा आता आधार नसल्यामुळे) परमेश्वरच त्याला बळ देवो. :)

http://www.esakal.com/esakal/20120220/5622315969213921821.htm

बाळ सप्रे's picture

12 Apr 2012 - 12:56 pm | बाळ सप्रे

यात फक्त वेगवेगळे आवाज आहेत घाबरवायला.. EMG NCV म्हणून एक प्रकार असतो तो फारच भयंकर असतो.. सुया टोचून शॉक देउन स्नायूंची टेस्ट.. तासभर असा छळ करून मग "everything OK" ऐकल्यावर हसावं की रडावं तेच कळतं नाही :-(

काहीतरी दुसरं शोधताना आज हे घेऊ का..? घेऊ का..? घेऊ का..? घेऊ का सापडले आणि दिन बन गया :)
भारीच लिहलयं, थँक्यु गवि!

खर्र खर्र सांगा, बोगद्याबद्दल शोधत होतात की नाही ? लब्बाड ! ;)

सखी's picture

16 Oct 2014 - 9:21 pm | सखी

:))

अत्रुप्त आत्मा's picture

15 Oct 2014 - 10:09 pm | अत्रुप्त आत्मा

@मग लहानशा हातपंपासारखा आवाज सुरू झाला. "बुचुक बुचुक...". =))) =))
प्रचंड ह.ह.पु.वा. झाली वाचताना! =))

राजेश घासकडवी's picture

17 Oct 2014 - 1:28 am | राजेश घासकडवी

वेगवेगळे आवाज वाचूनच खपलो. अशा जीवघेण्या प्रसंगातूनही लोकांचं मनोरंजन करावं तर ते गविंनीच.