पत्रे तुही लिहिली असशील,
शंभरदा ....
लेखणीही बदलली असशील,
हजारदा .....
लिहिलेले शब्दहि खोडले असतील,
कित्येकदा........
पण .......असो....... खुशाली कळवत राहा ........
नशिबाशी भांडलीही असशील,
अगदी नेटाने ......
मग डोळ्यातले अश्रूही पुसले असशील,
स्वच्छ पदराने .......
आणि मग पावसात भिजत चालत असशील,
त्याच रस्त्याने ......
पण .......असो....... खुशाली कळवत राहा ........
गहिवरेलेले श्वास घेऊन ठरलेल्या जागी येत असशील,
नेहमीसारखेच ......
मग ते हतबल चंद्र -तारे पाहत असशील,
नेहमीसारखेच .....
आणि एका हुंदाक्याने स्वतालाच समजावत असशील,
नेहमीसारखेच ........
पण ....असो ....खुशाली कळवत राहा .......
नको रागावू तापलेल्या सूर्याला आता ,
'जळून' जगतोय तो .....
नको रागावू रुसलेल्या चंद्राला आता,
'हरून' जगतोय तो ......
नको रागावू मनातल्या 'मला' आता,
'मरूनही' जगतोय तो .............
पण ....असो ....खुशाली कळवत राहा .......
प्रतिक्रिया
3 Feb 2012 - 11:40 am | मिसळलेला काव्यप्रेमी
मस्त!! सुंदर... खुप आवडले.
3 Feb 2012 - 12:06 pm | गणेशा
कविता पुन्हा सुंदर ...
अप्रतिम
3 Feb 2012 - 4:35 pm | नावातकायआहे
अप्रतिम!
3 Feb 2012 - 4:49 pm | सुहास झेले
व्वा व्वा... ही कविता पण आवडली :) :)
3 Feb 2012 - 6:24 pm | श्रावण मोडक
शेवटचे सप्तक गंडले. मूड बनत जातो आणि एकदम उसळी... मग जमीनदोस्त.
पहिल्या तीन सप्तकात कविता अगदी सहजी अंगात भिनत जाते. कारण तिथल्या प्रतिमाच तशा साध्या, सरळ आहेत. शेवटच्या सप्तकात एकदम सूर्य-चंद्रावर रागावणं हे मात्र उगाच आणलेल्या नाट्यमयतेसारखंच आहे. गरज नव्हती. पुलेशु.
3 Feb 2012 - 6:34 pm | वपाडाव
मिपाकर टोचण देतच असतील,
प्रतिसादातुन...
मापावर माप काढत असतील,
विडंबनातुन...
टिंगल टवाळी करत असतील,
खरडीतुन...
पण... तरीही... तु लिहित रहा...
4 Feb 2012 - 4:21 am | टुकुल
+१
--टुकुल
4 Feb 2012 - 1:12 pm | पक पक पक
खुशाल आळ्वत रहा......
4 Feb 2012 - 8:48 pm | सन्दीप१२३३०
विडंबनकारांच्या कलाकृतींचा मान राखून विडंबनाचा मी केलेला एक छोटासा प्रयत्न.. :)
सचिन तू खेळत राहा.....
फलंदाजी तुही केली असशील
शंभरदा....
ब्याट बदलली असशील
हजारदा...
'सुपर सेन्चुरी' ची स्वप्ने पाहिली असशील
कित्येकदा... :D
पण .. असो ... सचिन तू खेळत राहा..
ब्याटींग साठी भांडला असशील,
अगदी नेटाने....
मग पीच वरचे दगड बाजूला सारले असशील,
बुटाने.....
आणि मग सुपर सेन्चुरी करायला धावला असशील,
त्याच रस्त्याने....
पण .. असो ... सचिन तू खेळत राहा..
सुपर सेन्चुरी झाली नाही कि प्याविलिअन मध्ये परतत असशील
नेहमीसारखेच........
मग जुन्या इनिंग्स चे हायलाईट्स पाहत असशील
नेहमीसारखेच.......
आणि पुढच्या म्याच मध्ये 'सुपर सेन्चुरी' होईल असे स्वताला समजावत असशील
नेहमीसारखेच....... :P
पण .. असो ... सचिन तू खेळत राहा..
नको रागावू तापलेल्या धोनीवर आता ,
तुझ्या रेकॉर्ड्स कडे "जळून" बघतोय तो........
नको रागावू रुसलेल्या फ्यान वर आता,
क्रिकेट ला टाळून जगतोय तो........
नको रागावू मनातल्या क्रिकेटरला आता,
रिटायरमेंट जवळ आली असं सांगतोय तो..
पण .. असो ... सचिन तू खेळत राहा..
5 Feb 2012 - 9:09 am | इन्दुसुता
कविता ( भाग १ आणि २ ) खूप आवडली