कधीकधी पूर्वी ऐकलेले एखादे गाणे मनात पुन्हा अचानक उतरते. मग ते काही दिवस मनात घर करून बसते. तसे मला अलिकडे मालती पांडेंच्या 'कशी रे तुला भेटू' ने वेढले आहे.
http://www.aathavanitli-gani.com/Song/Kashi_Re_Tula_Bhetu
सुमारे १९४५ नंतर मराठीत भावगीतांचा नवा जमाना आला. ह्याची सुरूवात गजानराव वाटवे ब बबनराव नावाडीकर ह्यांनी केली. नंतर इतर अनेक कवि/ कवयित्रींच्या रचना घेऊन, अनेक नवनव्या गायिकांसह इतर संगीतकार त्यात उतरले. त्या गायिकांतील एक अग्रगण्या नाव म्हणजे मालती पांडे. त्यांनी गायिलेले राजा बढे ह्यांचे हे गीत आहे.
'करिती कुटाळकी तुझे ते टाळकरी
साथीला देई साथ घरची एकतारी
भोवती निंदकांचे वाजती पखवाज
लौकिक तुझा मोठा, आणि तू घरंदाज
कशी रे तुला भेटू, मला वाटे लाज'
आता पुन्हा पुन्हा, व लक्षपूर्वक ऐकतांना मला ह्या गाण्याच्या धीटाईने आशचर्यचकित केले. एका पुरूषास, त्याची लग्नबाह्य संबंधातील प्रेयसी हे गीत म्हणत आहे. बरं, हा पुरुष बर्यापैकी नावलैकिक असलेला, तथाकथित प्रतिष्ठित असावा असे दिसते. तत्कालिन शालिन, घरंदाज वगैरे भावगीतांच्या पुढे हे गीत अगदी वेगळेच ठसले असावे? तेव्हा त्याची अशा तर्हेने काही चर्चा झाल्याचे आठवत नाही. साहित्याच्या क्षेत्रात डोळ्यात तेल घालून बसणारी मंडळी, संगीताच्या प्रांतात बहुधा लुडबुड करत नसावीत. किंवा भावगीते वगैरे सर्व त्यांच्या लेखी 'थिल्लर' असल्याने त्यांनी ह्या गीताला वॉकओव्हर दिला असावा.
गाणे मात्र सर्वाथाने सुंदर जमून आले आहे. श्रीनिवास खळे ह्या अत्यंत गुणी संगीतकाराने संगीत साज चढवला आहे. मालती पांडेंनी ते त्यांच्या नेहमीच्या सुबक गाण्याने सुशिभित केले आहे. पियानोवरील वॉल्ट्झच्या र्हिदममध्ये व्हायोलिन व बांसरीच्या प्रील्यूडने गाणे सुरू करणे ही तेव्हाच्या भावगीतांची टिपिकल व मोहक स्टाईल येथेही दिसून येते, तसेच अनेक व्हेरिएशन्स करणारा, मारूतिराव कीरांचा तबला नेहमीप्रमाणेच गाण्यास खुलवतो.
प्रतिक्रिया
29 Jan 2012 - 8:51 pm | बिपिन कार्यकर्ते
गाणं ऐकतोय. सुंदर आहेच. धन्यवाद.
मात्र, त्याकाळीही काही गाण्यांवरून वादळ झाल्याचे आठवते आहे. 'राधे तुझा सैल अंबाडा' वरून पुण्यातील संस्कृती रक्षकांनी वाटव्यांवर शेण वगैरे फेकले होते असे काहीसे आठवते. तपशीलांशिवायही, त्या गाण्यावरून वादळ उठल्याचे घरातील ज्येष्ठांकडून ऐकले आहे.
29 Jan 2012 - 9:06 pm | शुचि
खूप गोड आहे आवाज मालतीबाईंचा. लौकीक वगैरे शब्द चमकदार वाटतात. गाणे पहील्यांदाच ऐकले. आवडले.
29 Jan 2012 - 9:12 pm | स्मिता.
हे गाणं माहिती नव्हतं, पहिल्यांदाच ऐकलं आणि आवडलं :)
या गाण्याची संस्कृतीरक्षकांकडून चर्चा झाली नसावी कारण त्यात गायिका प्रेयसी आणि तिच्या 'घरंदाज' प्रियकराच्या प्रेमाचा उदात्तिकरण केलेलं नाहिये. उलट समाजाच्या नियमांनुसार ते चूकच आहे आणि म्हणून प्रेयसीला लाज वाटतेय. अर्थात हा एक कयास... माझ्या जन्माच्या कित्येक वर्षाआधीचं ते गाणं आहे.
29 Jan 2012 - 11:14 pm | chipatakhdumdum
हे गाणं माहिती नव्हतं, पहिल्यांदाच ऐकलं आणि आवडलं
+१
30 Jan 2012 - 6:32 am | इन्दुसुता
एका पुरूषास, त्याची लग्नबाह्य संबंधातील प्रेयसी हे गीत म्हणत आहे.
हे कशावरून ठरविले याबद्दल खरेच कुतुहल आहे.
मला या गाण्याची गोडी माझ्या मोठ्या बहिणीमुळे लागली ( तिलाही ही गोडी तिच्याही नकळत्या वयातच लागली) .. पण मला आत्तापर्यंत कधीच वरील भाव अभिप्रेत आहे असे जाणवले नाही....
'वयात यौवनाचा विखुरला साज' वरून तसे वाटत नाही.
प्रेयसी तेव्हाच्या सामाजिक व्यवस्थे प्रमाणे कदाचित प्रियकराएव्ह्ढी प्रतिष्ठीत नसेल आणि त्यामुळे घरात आणि बाहेर त्याचे निंदक असतील ...
मलातर शेवट्च्या कडव्यात जन्मोजन्मीच्या नात्याच्या ( जे हिंदूंना विवाहानंतर ग्राह्य असते ) उल्लेखामुळे, समाजात बराच विरोध असूनही दोघांनी लग्नाच्या आणाभाका घेतल्या असाव्यात असे वाट्ते... अर्थात हे माझ्या बाळबोध upbringing आणि विचारांमुळेही असेल ( ह्याची शक्यता अजिबात नाकारता येत नाही ..) पण तो काळ देखिल बाळबोधच होता हे विसरून चालणार नाही..
गाणे अतिशय आवडते ... परत ऐकवलेत म्हणून धन्यवाद.
रच्याकने: तुम्ही वर लिहिताना ' आणि तू घरंदाज ' असे लिहिले आहे, ती चुकुन झालेली चूक ( :)) असावी असे वाटते...
30 Jan 2012 - 6:45 pm | मेघवेडा
सुंदर गाणं आहे. मालतीबाईंची बरीचशी गाणी आजीकडून ऐकली लहानपणी. हेही ऐकलंय. सकाळपासून छान छान मराठी गाणी लागलेली असत आमच्याकडे. आज खरंच वाटतं, घरातल्या सगळ्या मोठ्यांनी हा मराठी गाण्यांचा खजिना माझ्यासमोर उघडून ठेवला हे खूप बरं केलं! आमची पिढी कशाला मुकते आहे याची प्रकर्षानं जाणीव होते आज अशी गाणी ऐकली की! हे तरी बरंच अप्रसिद्ध गाणं असावं. कित्येकांना बरीचशी प्रसिद्ध गाणीसुद्धा माहितीच नसतात! आवडच नसते! :)
आणि मलाही हे गाणं लग्नबाह्य संबंधातील प्रेयसी म्हणते आहे हे तुम्ही कशावरून ठरवलं याबद्दल कुतुहल आहे.
अवांतर : मागं नंदननं त्याच्या खवत एक सुरेख व्हिडिओ लावला होता. मालतीबाई, गजानन वाटवे, बबनराव नावाडीकर अशा सगळ्या दिग्गजांची मैफील आहे. मालतीबाईंनी 'गगनि उगवला सायंतारा' गाणं गायलंय. युट्युबवर दत्ताजी यांच्या अकाऊंट वर आहे तो व्हिडिओ. कदाचित इथं असावा.
(हापिसात युट्युब चालत नसल्यानं अंदाजपंचे लिंक देतो आहे)
30 Jan 2012 - 9:31 pm | बिपिन कार्यकर्ते
होय... दत्ताजींच्याच चॅनेलवर आहे तिथे. हा व्हिडिओ.
31 Jan 2012 - 1:11 am | मेघवेडा
येस! हाच. हेच गाणं म्हटलंय की मालतीबाईंनी या व्हिडिओत! :) सायंतारा वाटवेंनी म्हटलंय, बरोबर. त्यांचंच आहे गाणं ते. :)
मैफील मस्तच आहे एकूण. बबनरावांचा निर्मळ आवाज, वाटवेंच्या सुरेख चाली, गोविंदरावांची सडेतोड मतं आणि लोकुरबाईंचे खरपूस पंचेस यांनी मस्त रंग भरलाय! "शब्दरचना चांगली असली, वृत्तबंधात असली, आणखी आशय चांगला असला की मग गायकासमोर कागद आला की आपोआप चाल सुचते!", "हल्ली मुक्तछंदात लिहितात, तुम्हीही त्यातल्याच आहात" जी. एन. भारीच आहेत! लोकूरबाई सुद्धा सॉल्लिड आहेत! त्या मालतीबाईंकडे वळल्यावर "बाई, माझ्यावर वाटतं संक्रांत आता!" असं मालतीबाईंनी म्हटलेलं पाहून हसायलाच आलं!
"इतर वाद्यांचा केवढा तो गोंधळ", "सिंथेसाईझर नी हल्ली आपल्यापर्यंत सूर पोचतात!" वगैरे प्रतिक्रिया वाचून गंमत वाटली..
30 Jan 2012 - 12:37 pm | कॉमन मॅन
गाणे ऐकू येत नाही. काय करावे?
30 Jan 2012 - 8:05 pm | मी-सौरभ
डॉक्टरांना भेटा (कानाच्या) नाहीतर संगणकाच्या.....
30 Jan 2012 - 7:00 pm | श्रावण मोडक
गाण्याची चाल जशी जाते, तशी शब्दरचना किंवा शब्दांचा प्रवाह नाही. त्यामुळं वळणं आहेत. ती वळणं असूनही टोकदारपणा न आणणं हे खळे यांचं सामर्थ्य. आठवणीतील गाणी या संस्थळावर गाण्याचा आधार पहाडी राग असल्याचं नमूद केलं आहे. पहाडीचा एकूण स्मूथ असणारा फ्लो (ही माझ्या ऐकण्याची मर्यादा असू शकते) पेलताना शब्दांचा उच्चार करतानाची कसरत जाणवते.
पण त्यामुळंच एक प्रश्न आला. ही चाल आधी ठरली, मग त्यावर शब्द आरोपीत झाले असे झाले असावे का? चालीनुरूप गीतरचना असा प्रकार तेव्हा केला जायचा का? तसे नसेल तर मात्र संगीतकाराचं कर्तृत्त्व आणखी ठशठशीतपणे पुढं येतं.
30 Jan 2012 - 7:01 pm | तिमा
प्रदीपजी,
हे गाणं माझं आवडतंच आहे. पण कधी अर्थाकडे लक्ष दिले नव्हते. तरीसुद्धा माझे मत इन्दुसुतांशी जास्त जुळते.
एका चांगल्या गाण्याची नवीन पिढीला ओळख करुन दिल्याबद्दल धन्यवाद.
30 Jan 2012 - 8:00 pm | सन्जोप राव
ही चाल अगदी परिचित आहे. बहुदा एखाद्या प्रसिद्ध हिंदी गाण्याची. ते गाणे कोणते कुणाला आठवते काय?
30 Jan 2012 - 9:17 pm | रामदास
त्यामुळे कदाचीत चाल ओळखीची वाटत असावी.
31 Jan 2012 - 9:24 pm | बहुगुणी
जवां है मुहब्बत, हसीं है ज़माना
30 Jan 2012 - 9:38 pm | प्रदीप
स्मिता म्हणतात की कदाचित ह्या गीतात विवाहबाह्य संबंधाचे उदात्तिकरण झालेले नाही, ह्या कारणास्तव संस्कृतिसंरक्षकांचे इथे लक्ष गेले नसावे. हे गीत ह्या संबंधावर आधारीत आहे असे मानले तर त्यात त्याचे उदात्तिकरणच झाले आहे, असे मलातरी वाटते.
पण इन्दुसुता व मेघवेडा ह्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नास मी माझ्या तर्हेने उत्तर देण्याचा प्रयत्न करतो. 'साथीला साथ देई घरची एकतारी' ह्या वाक्यावरून मी माझे अनुमान बांधले. आता अर्थात इन्दुसुता म्हणतात त्याप्रमाणे हे असे मानणे 'फार- फेच्ड' असावेही! कदाचित 'घरच्या एकतारी'चा निर्देश नायकाच्या आईकडेही असावा. तेव्हा तुमच्या म्हणण्यात तथ्य आहेच.
श्रावण मोडकांची चालीच्या काठीण्याविषयीची टिपण्णी मर्मिक आहे. ह्या गीतात नक्की चाल पहिली की शब्द हे सांगता येणार नाही. पण त्या सुमारास मराठीत, व विशेषत: खळेंच्या बाबतीत (जेव्हा ते बहुधा नुकतेच एच. एम. व्ही. त लागले असावेत) चाल पहिली असण्याची शक्यता कमी वाटते. संगीतकारास स्वतःच्या चालीवरून तेव्हा बर्यापैकी प्रतिष्ठीत असलेल्या बढेंसारख्या कविकडून शब्दरचना करून घेण्यास जी 'पत' लागेल, ती तेव्हा खळेंकडे असण्याची शक्यता कमीच असावी.
मेघवेडांनी निर्देशित केलेला दुवा हा आहे का?:
http://www.youtube.com/watch?feature=endscreen&v=RU1TlDYZqjA&NR=1
१३:५५ च्या सुमारास मालतीबाई गाण्यास सुरूवात करतात. त्यांनी तेव्हा 'लपविलास तू हिरवा चाफा' काय अप्रतिम गायिले आहे!!
कॉमन मॅन, मी लेखात दिलेल्या दुव्यात उजवीकडे एका चौकटीत गाण्याच्या मुखड्याचे शब्द आहेत, व त्याच्या डावीकडे '>' असा दुवा आहे. त्यावर क्लिक केल्यास गाणे ऐकता यावे.
संजोप राव बहुधा नूरजहॉचे 'आवाज दो, कहाँ है' निर्देशीत असावेत?
31 Jan 2012 - 4:02 pm | मेघवेडा
'बढेंसारख्या गीतकाराकडून चालीवर गीत लिहून घेण्याएवढी खळेंची तेव्हा पत नसावी' हा युक्तिवाद योग्यच आहे! तसंच वरील युट्युब व्हिडियोत गोविंदराव जोशींनी चाल-शब्द यांवर मार्मिक टिप्पणी केलेली आहे. "शब्दरचना चांगली असली, वृत्तबंधात असली, आणखी आशय चांगला असला की मग गायकासमोर कागद आला की आपोआप चाल सुचते!"असं ते म्हणतात. चालीवर गीतं लिहून घेण्याचं 'फॅड'च तेंव्हा नव्हतं. गाण्याच्या शब्दांना मान होता. गीतकार हा कवी होता! त्यानं त्या काव्यात जे शब्द गुंफले आहेत त्यांना चाल 'लावली' जायची! चाल आधी तयार करून तीवर गाणं 'बसवलं' जायचं नाही. बाबुजींचाही या चालीवर गीत 'बसवण्याच्या' प्रकाराला बराच विरोध होता असं ऐकलं होतं.
31 Jan 2012 - 7:22 am | इन्दुसुता
१३:५५ च्या सुमारास मालतीबाई गाण्यास सुरूवात करतात. त्यांनी तेव्हा 'लपविलास तू हिरवा चाफा' काय अप्रतिम गायिले आहे!!
अगदी खरे आहे.
तसेही 'लपविलास तू हिरवा चाफा' हे काय अल्टिमेट गाणे आहे ना? मला फार आवडते. आमच्या पीढीनेही हे सर्व मुकले आहे असे खेदाने म्हणावे लागते.
31 Jan 2012 - 7:44 am | नंदन
काय सुरेख, निर्मळ चालीचं गाणं आहे! गाण्याची आठवण पुन्हा जागवल्याबद्दल आभार. बाकी काही गाण्यांचे शब्द वाचून ते किती निराळी भावना व्यक्त करणारे आहेत, हे (किंचित उशीराच) लक्षात येतं, हे खरं. प्रेम आणि वियोग ह्या दोन भावना प्रामुख्याने व्यक्त करणार्या गाण्यांच्या गर्दीत 'सारे जरी ते तसेच, धुंदी आज ती कुठे' किंवा 'उमलण्याचे सुख फिरुनी या फुला सोसेल का?' यासारख्या ओळी कशा उठून दिसतात.