पांडूरंग माझा गरीब राहू द्या

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in जे न देखे रवी...
3 Jan 2012 - 4:40 am

पांडूरंग माझा गरीब राहू द्या

पांडूरंग माझा गरीब राहू द्या
गरीब राहू द्या
गरीबांना पाहू द्या
पांडूरंग माझा गरीब राहू द्या ||धृ||

नका अर्पू त्याला सोने अन नाणे
त्याला नसे त्याचे देणे घेणे
आपलीच श्रीमंती
आपलीच श्रीमंती
उगा जगाला का दावता ||१||

नका लावू त्याला सुखाचे डोहाळे
नका करू त्याचे उत्सवी सोहळे
तोच दाता असता
तोच दाता असता
कशाला त्याला देणगी तुम्ही देता? ||२||

भक्तासाठी देव पहा थांबला विटेवरी
भक्तीसाठी कर दोन्ही ठेवीले कटेवरी
नको दुजे काही देणे
नको दुजे काही देणे
काही न घेण्यासाठी बध्द करी हाता ||३||

- पाभे

शांतरसकवितासमाज

प्रतिक्रिया

अत्रुप्त आत्मा's picture

3 Jan 2012 - 8:14 am | अत्रुप्त आत्मा

छान...गाडगे महाराजांच्या विचारांची थोडिशी अठवण झाली,,,

प्रचेतस's picture

3 Jan 2012 - 8:39 am | प्रचेतस

मस्त हो पाभेमहाराज

निश's picture

3 Jan 2012 - 11:58 am | निश

पाषाणभेद साहेब

अप्रतिम कविता

आज काल देवाच्या नावावर जो काहि दांभिकपणा चालला आहे त्यावर मस्त आसुड ओढला आहे तुम्हि

भले शाब्बास

प्रभाकर पेठकर's picture

4 Jan 2012 - 10:14 am | प्रभाकर पेठकर

विदारक सत्य मांडून कवितेतून समाज प्रबोधनाचा प्रयत्न स्तुत्य आहे.

देव, भक्ती, पुजा, पाप-पुण्य ह्या संकल्पनांचा खोलात शिरुन साकल्याने विचार करण्यापेक्षा देणग्यांचा, देवाला सोन्याने मढविण्याचा उथळ मार्ग अंगीकारून समजात तथाकथित भक्तगण अंधश्रद्धेलाच 'श्रद्धा' असे गोंडस रुप देताना दिसतात.

अविनाशकुलकर्णी's picture

4 Jan 2012 - 10:55 am | अविनाशकुलकर्णी

उलट पांडुरंगाला भरघोस दान करुन त्यातुन मंदीर समीतिने नवे उपक्र्म राब वावेत..
वारीच्या वेळी जि घाण होते त्या वर उपाय शोधावा..
शाळा होस्पिटल्स. काढुन समाजोपयोगी कार्य करावे..
तिरुपति बालाजीचे उदाहरण ..वा सत्य साईबाबांचे सामाजिक कार्य..पाणी योजना नजरेसमोर आणाव्यात..
व त्या नुसार वाट्चाल करावी...

प्रभाकर पेठकर's picture

4 Jan 2012 - 2:18 pm | प्रभाकर पेठकर

आपले विचार उदात्त आहेत ह्यात शंका नाही.

परंतु, प्रत्यक्षात तसे घडताना दिसत नाही. लोकांच्या डोळ्यात धुळ फेकण्यासाठी काही समाजकार्य केले जाते. पण, भरमसाट प्रमाणात गैरव्यवहारही होतात. शिर्डी, सिद्धीविनायक वगैरे देवस्थानांच्या विश्वस्तपदी वर्णी लावण्यासाठी राजकारण्यांमध्ये स्पर्धा असते. देवस्थाने वाटून घेतली जातात. त्यांच्या फायद्यासाठीच ही देवस्थाने 'व्यावसायिक' होत चालली आहेत. रांगांचे, दर्शनाचे, पुजाअर्चांचे वेगवेगळे दर, 'पॅकेजीस्' देऊन देवाच्या पायाशीच भक्ता भक्तात त्याच्या ऐपती नुसार भेदभाव करण्यात येतो. बंदोबस्तावर नेमलेले पोलीस, राजकारण्यांच्या वरदहस्ताने, चिरीमीरी गोळा करणे आणि न देणार्‍या भक्तांवर खेकसणे आदी प्रकार करतात. भक्त सुद्धा रांगेत उभे न राहता वशिले लावून, पैसे देऊन देवाच्या पायावर डोके ठेवण्यासाठी, पुण्य (?) कमविण्यासाठी, ह्या भ्रष्टाचाराला हातभार लावतात.

हे सर्व शिर्डी, तुळजाभवानी इत्यादी ठिकाणी प्रत्यक्ष पाहिले आहे.

गणेशा's picture

4 Jan 2012 - 2:20 pm | गणेशा

काव्य अप्रतिम