भोलू गोपाळाची गोष्ट

हरिकथा's picture
हरिकथा in जनातलं, मनातलं
3 Dec 2011 - 5:40 pm

वृंदावनातल्या श्रुंगारवट या स्थानी नित्यानंदवंशीय श्रीनंदकिशोरदास गोस्वामी यांचा आश्रम आहे. त्यांच्याकडे त्यांच्या गायींच्या देखभालीसाठी भोलू नावाचा एक ब्रजवासी मुलगा राहत होता. भोलू हे काही त्याचं खरं नाव नव्हतं पण लोकं या गुराखी मुलाला भोलूच म्हणायची कारण तो स्वभावाने अतिशय भोळा होता. त्याच्याजवळ फारशी व्यावहारिक चतुराई नव्हतीच पण बुद्धीनेही तो अगदीच सामान्य होता. कुणी त्याला मस्करीतही काही गोष्ट सांगितली तरी तो ती खरी मानायचा. शंकेखोरवृत्ती तर त्याच्याजवळ नावालाही नव्हती. तो रोज आश्रमातून प्रसादाचं जेवून आणि बरोबर बालभोगाची छोटीशी शिदोरी घेऊन श्रीपाद नंदकिशोरदास गोस्वामींच्या गायी चारायला भाण्डिरवनात घेऊन जायचा. कुणीतरी त्याला सांगितलं होतं की स्वतः नंदलाल श्रीकृष्ण आपल्या गोपसखांसोबत तिथे नंदमहाराजांच्या गायी घेऊन येतात. ते ऐकल्यापासून भोलू फार खुशीत तिथे गायी घेऊन जायचा आणि नेहमी विचार करायचा, "कधी तरी भाण्डिरवनात नक्की माझी आणि नंदलालाची भेट होईल. मग आम्ही एकमेकांशी मैत्री करू. त्यांच्या नि माझ्या गायी चरू लागल्या की आम्ही सगळे मिळून एकत्र लपंडाव, सूरपारंब्या नि चेंडूचे खेळ खेळू!"

भोळ्या-भाबड्या भोलूच्या मनीच्या भावना भगवंताच्या मनःपटलावर जाऊन आदळल्या. त्याच्याही मनात भोलूबरोबर मैत्री करून त्याच्यासोबत खेळण्या-बागडण्याचा आनंद घेण्याची इच्छा उत्पन्न झाली.

मग काय, एके दिवशी झाली भोलू आणि नंदलालाची भाण्डिरवनात भेट! दोघांमध्ये अगदी घनिष्ट मैत्री प्रस्थापित होण्यास फार वेळ लागला नाही. आता रोज भोलू खाण्यापिण्याचं जास्तीचं सामान बरोबर घेऊन गायी राखायला जाऊ लागला. नंदलाला आणि त्याचे गोपसखा भोलूबरोबर यमुनेत उड्या मारायचे, खेळायचे, नाचायचे, बागडायचे, खायचे, प्यायचे आणि संध्याकाळी आपापल्या गायींबरोबर दुसर्‍या दिवशी भेटण्याचं ठरवून परतायचे. खूप दिवस हा प्रकार चालू राहिला. श्रीपाद नंदकिशोरदास गोस्वामीही भोलूला अनेक दिवस शिदोरीऐवजी कोरडी शिधासामग्री घेऊन जाताना बघत होते. एक दिवस त्यांनी भोलूला हटकलं आणि विचारलं,

"अरे भोलू, हे काय घेऊन चाललायस रानात?"

त्यावर भोलू उत्तरला, "हा दालबाटीचा शिधा आहे, श्रीपादजी."

"दालबाटी? ती रे कुणासाठी?" श्रीपादजींनी विचारलं.

"नंदलालासाठी आणि त्याच्या गोपाळ मित्रांसाठी. आज आम्ही सगळ्यांनी मिळून दालबाटी बनवून खाण्याचं ठरवलंय." भोलू त्यांना म्हणाला.

श्रीपादजींनी पुन्हा विचारलं, "नंदलाला? कोण रे नंदलाला? कुठे असतो हा?"

"तो बन्सीवाला नंदलाला, भाण्डिरवनात येतो ना तो आपल्या गायी घेऊन. गायी चरायला लागल्या की आम्ही चेंडूने खूप खेळतो, यमुनेमध्ये पोहोतो आणि मग बरोबर आणलेल्या शिदोरीतला खाऊ वाटून खातो." भोलू पुन्हा उत्तरला.

त्यावर श्रीपादजींनी पुन्हा त्याला विचारलं, "असं होय! अच्छा, मला जरा सांग तर, हा नंदलाला दिसतो कसा रे?"

भोलूने लगेच वर्णन केलं, "श्रीपादजी, तो दिसायला भारी सुंदर आहे हो! डोक्यावर मोराचं पिस लावतो, कानांमध्ये लटकती कुण्डलं घालतो, गळ्यामध्ये मोठ्ठीच्या मोठ्ठी जंगलातल्या फुलांची माळ घालतो. त्याचे झळाळत्या पिवळ्या रंगाचे कपडे त्याला मस्त शोभून दिसतात."

श्रीपाद गोस्वामी आश्चर्यचकित होऊन भोलूकडे बघतच राहिले. त्यांचा या गोष्टीवर विश्वासच बसत नव्हता पण ते यावर अविश्वासही दाखवू शकत नव्हते कारण भोलू कधी खोटं बोलणार नाही, हे त्यांना माहित होतं. त्यांनी भोलूला विचारलं,

"बरं भोलू, एक काम करशील? आजच्या दिवशी नंदलाला आणि त्याचे गोपाळ मित्र यांना इथे घेऊन येशील? त्यांना म्हणावं, श्रीपादजींनी त्यांना इथेच दालबाटी खाण्यासाठी निमंत्रण दिलेलं आहे. येतील का रे ती मंडळी?"

"का नाही येणार? नंदलालाला भरपूर साजूक तूप घालून दिलेली दालबाटी फार आवडते. मी घेऊनच येईन नंदलालाला नि बाकी सगळ्यांनाही!" भोलू आनंदाने म्हणाला.

त्या दिवशी भाण्डिरवनात जाता जाता भोलू विचार करू लागला की आता भेटल्यावर लगेचच नंदलालाला श्रीपादजींचं निमंत्रण देईन मग श्रीपादजींकडे स्वादिष्ट दालबाटीची मेजवानी खाऊन त्याला किती आनंद होईल वगैरे वगैरे पण जेव्हा भोलूने मेजवानीच्या निमंत्रणाचा विषय काढला तसं नंदलाला म्हणाला, "ए, आम्ही नाय बा तिथे दालबाटी खायला येणार."

नंदलालाचं हे बोलणं ऐकून भोलूचा चेहरा एकदम पडला. तो त्याला म्हणाला, "नाही नाही नंदलाला, असं नाही चालणार. तुला आणि तुम्हा सर्वांना यावंच लागेल. मी तर श्रीपादजींना सांगून बसलोय की स्वतःच तुम्हाला बरोबर घेऊन येईन म्हणून."

त्यावर तोंड वेंगाडून आणि मान हलवून नंदलाला म्हणाला, "आम्ही नाही येणार तिथं मेजवानीला, आमचा काय संबंध श्रीपादजींशी?"

नंदलालाच्या या उत्तराने एरवी कधीही न चिडणार्‍या भोलूला एकदम राग आला. त्याने नंदलाला किंवा कुणाशीही काहीही न बोलता आपल्या गायी गोळ्या केल्या आणि दुसर्‍या ठिकाणी त्यांना हाकून नेऊ लागला. जणु नंदलालाला म्हणत होता की जर तुझा श्रीपादजींशी संबंध नाही तर माझाही तुझ्याशी काही संबंध नाही. तुटली आपली मैत्री.

आपल्या गायी गोळा करून भोलू निघाला तशी नंदलालाने त्याला हाक मारली, "अरे भोलू, जरा ऐक तर!"

पण आता भोलू कसला ऐकतोय, तो तर मग आणखीन वेगाने गायी हाकून नेऊ लागला. तो जर ऐकत नव्हता तर भगवंतही थोडेच त्याला तसे सोडणार होते? ते ही त्याच्या मागे धावू लागले. अनन्तकोटी ब्रह्माण्डाचे सृष्टी, स्थिती आणि प्रलयकर्ता, ब्रह्मदेव, विष्णु आणि महादेव ज्यांचे अंशावतार आहेत ते स्वतः एका साध्या ब्रजवासी मुलाच्या पाठी धावत होते जणु ती त्यांची गरज होती आणि त्या मुलाच्या नाराजीमुळे त्यांचं त्रिलोकाचं साम्राज्य हिरावून घेतलं जाणार होतं! पण ते ज्याच्या पाठी धावत होते तो जाऊन जाऊन कुठे जाणार होता? नंदलाला उभा राहिला भोलूची वाट अडवून आणि त्याला मोठ्याने पण नम्र आवाजात म्हणाला, "ऐकलं नाहिस का रे, मी कधीच्या हाका मारतोय?"

भोलूने त्याच्याकडे अश्रुभरल्या नजरेने बघितलं, त्याला नंदलालाचे डोळेही तसेच दिसले. त्याने नंदलालाला विचारलं, "बोल, आता काय?"

त्यावर नंदलाला त्याला म्हणाला, "अरे भोलू, श्रीपादांचं निमंत्रण मी कुठे नाकारलंय? मी म्हणतोय की श्रुंगारवटावर मी सगळ्यांच्या बरोबर येणार नाही. भोलू लेका, किती भोळा रे तू! अरे, श्रुंगारवट हे राधाराणीचं स्थान नाही का? तिथे दाऊभय्या कसे येणार? माझे गोपाळ मित्र कसे येणार? त्यापेक्षा असं कर, श्रीपादजींना सांग, इथेच दालबाटीची मेजवानी करु या! उद्या त्यांना स्वतःच्या डोक्यावरून सगळा शिधा इथे घेऊन येऊ दे आणि स्वतःच्या हाताने इथेच दालबाटी बनवू दे. मग खेळून झालं की सगळेजण मिळून दालबाटीचा फडशा पाडूया, कसं?"

नंदलालाच्या या बोलण्याने भोलू एकदम आनंदला. त्याने ती बातमी श्रीपादजींना सांगितली. दुसर्‍या दिवशी श्रीपाद नंदकिशोरदास गोस्वामी स्वतःच्या डोक्यावरून सारा शिधा घेऊन भाण्डिरवनात आले आणि त्यांनी आपल्या हाताने दालबाटी बनवली. श्रीकृष्ण-बलराम आणि गोपाळांच्या खेळांचा त्यांनी यथेच्छ आनंद लुटला आणि सगळ्यांबरोबर दालबाटीची मेजवानीही केली. थोड्यावेळातच सर्व अन्तर्धान पावलं आणि त्याबरोबरच श्रीपादजींना दु:खाचा मोठा उमाळा फुटला. त्यांच्या चित्तवृत्ती थार्‍यावर राहू शकल्या नाहित, ते सैरभैर झाले तेव्हा त्यांना भगवंतांचा आदेश मिळाला, माझ्या ब्रजलीला तू पाहिल्यास, आता दु:ख न करता माझ्या अशा लीला आणि लीलास्थानांचा लोकांमध्ये प्रचार कर, त्यांना लोकांपर्यंत पोहोचव.

या आदेशाचं श्रीपाद नंदकिशोरदास गोस्वामींनी यथायोग्य पालन केलं. त्यांनी 'श्रीवृन्दावनलीलामृत' आणि 'श्रीरसकलिका' हे दोन ग्रंथ लिहून आणि प्रकाशित करून भगवंतांच्या लीला आणि लीलास्थानांचा जनसामान्यांमध्ये भरपूर प्रचार केला.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
ब्रजभक्तमालेतील कथेचा स्वैर अनुवाद

कथाप्रकटनआस्वादभाषांतर

प्रतिक्रिया

देवळात कथेकरी वुबांनी सांगावी अशी कथा आवडली.

मनीषा's picture

3 Dec 2011 - 7:04 pm | मनीषा

हरीकथा आवडली .

ओळखीची ... म्हणजे कुठेतरी ऐकली असावी असे वाटले.

अजूनही अशाच आणखी कथा सांगाव्यात ... म्हणजे 'श्री हरी चरित्' चे आमचे ज्ञान वाढेल.

पैसा's picture

3 Dec 2011 - 8:16 pm | पैसा

पण त्या गोष्टीत कृष्णाने "भोलू" (गोष्टीतला गोपाळ बहुधा) च्या गुरुजीना दर्शन दिलं नव्हतं.

मन१'s picture

3 Dec 2011 - 9:24 pm | मन१

पहिले तीनही प्रतिसाद काकू लोकांचे आले म्हणजे बायका अधिक भाविक असतात किंवा अधिक बायका भाविक असतात ह्या समजाला पुष्टी मिळते काय?

अन्या दातार's picture

3 Dec 2011 - 9:33 pm | अन्या दातार

पण माझ्या मते "बुवा तेथे बाया" या समजाला बळकटी मिळत असल्याचे नमूद करतो

अत्रुप्त आत्मा's picture

3 Dec 2011 - 11:40 pm | अत्रुप्त आत्मा

"बुवा तेथे बाया" अगागागागागागागागा... सांबाळुन वो अणिल राव .. :-)

तीनही प्रतिसाद काकू लोकांचे
काकू? अहो साहेब, आम्ही मुली आहोत म्हटलं!

देविदस्खोत's picture

3 Dec 2011 - 10:02 pm | देविदस्खोत

मागिल महिन्यातच गोकुळ मथुरा व्रुन्दावन पाहिले हि कथा वाचुन त्या आट्वणी ताज्या झाल्या.