सावरकर आणि क्रांती

अभिषेक९'s picture
अभिषेक९ in जनातलं, मनातलं
19 Nov 2011 - 4:54 pm

pic

देशावर उत्कट प्रेम, इंग्रजांविषयी चीड आणि बलिदानाची तयारी ह्या तीन गोष्टींपलीकडे बघण्याची आवश्यकता होती. संह्याद्रीच्या कुशीतील चार-दोन किल्ले जिंकून स्वातंत्र्याची ज्योत फुंकणे ह्यात व्यवहार्यता होती पण ती मोगलांविरुद्ध! हाच मार्ग इंग्रजांच्या विरोधात केवळ अव्यवहार्यचं नाही तर भाबडेपणाचा होता. लांब पल्ल्याच्या तोफा, संपर्काची अत्याधुनिक साधने आणि सैन्य-रचनेची भौगोलिक पद्धत ह्या गोष्टी समजून घेतल्याशिवाय इंग्रजांना पळवून लावणे शक्य नव्हते. त्यामुळेच वासुदेव बळवंत फडक्यांचा बंड एका जिल्ह्यापुरताच राहिला आणि तो तिथेच मोडला गेला. रेंड ला गोळी घालून किंवा गव्हर्नर वर बॉम्ब फेकून केवळ चीड व्यक्त करता येते, पण इंग्रजी राज्य समाप्त करता येणार नव्हते ही कठोर वास्तव होते. सावरकरांचे वैशिष्ट्य येथे आहे. हे वास्तव जसे जसे त्यांच्या लक्षात गेले, तसे तसे ते अधिक प्रगल्भ होत गेले. सावरकर स्वातंत्र्य ज्योतीने प्रज्वलित होऊन स्वतःच एक मशाल झाले, पण बुद्धीने पाश्चात्य विद्येचे व इंग्रजी राज्याचे वास्तववादी अभ्यास करून एक महान क्रांतीचे योजकही झाले होते. येथे सावरकरांचे वेगळेपण आहे.

'सशस्त्र क्रांती भारतात शक्य होती का?' ह्या प्रश्नावर अनेक मत प्रवाह असतील, कदाचित 'नाहीच' हा गट अधिक बलवान असेल. पण त्यामुळे क्रांतीची पहिली व्यवहार्य, सुसूत्र व अखिल भारतीय पातळीची योजना सावरकरांनी प्रगल्भ पणे रचली होती हे इतिहासाला दुर्लक्षित करून चालणार नाही. भारतात सशत्र क्रांती करावयाची असेल तर ते काम एका व्यक्तीचे किंवा व्यक्तीसमूहाचे नसून अखिल भारतव्यापी संघटनेचे आहे, ही गोष्ट सावरकरांनी प्रथम ओळखली. त्यासाठी 'अभिनव भारत' संघटना उभारली. संघटनेच्या शाखा केवळ भारतातच नाही तर ब्रिटन, जर्मनी, फ्रांस या राष्ट्रांमध्ये स्थापन केल्या. त्यातून आकारल्या गेली क्रांतीची एक प्रगल्भ योजना. त्यांच्या योजनेचे स्वरूप असे होते -
सर्व भारताच्या ३०० वर जिल्ह्यात एकाच दिवशी, एकाच वेळी रेल्वेपूल उध्वस्त करणे, विजेच्या तारा तोडणे, मोटारपूल उध्वस्त करणे, बातम्या मिळवणे व सेना संचलन अशक्य करणे, देशात सर्वत्र छोटी शस्त्रागारे लुटणे. यासाठी मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे हवी व ती विदेशी राष्ट्रांकडून मिळवणे आवश्यक आहे, हे सावरकरांनी ओळखले होते. शत्रूचा शत्रू हा आपला मित्र असतो, ह्या नात्याने त्यांनी रशियाचा साम्राज्यवादी झार आणि प्रशियाचा हुकुमशहा कैसर यांच्याशी संधान बांधले होते. भारतात क्रांतीची उठावणी होताच क्रांतिकारक सरकारला 'भारत सरकार' म्हणून जर्मनी व रशिया मान्यता देतील ह्याची हमी सावरकरांनी मिळवली होती. क्रांतीच्या ठरलेल्या दिवशी मित्र राष्ट्रांकडून शस्त्रास्त्रांनी भरलेले जहाज भारतात येऊन पोहचतील, अशी आश्वासने इंग्लंडमधील विविध राष्ट्रांच्या वकीलातींकडून त्यांनी मिळवून ठेवली होती. भारत क्रांतीचा स्पोट होताच भारतीय क्रांतिकारकांचा ध्येय-धोरणविषयक जाहिरनामा जगातील सर्व प्रमुख राष्ट्रांत प्रकाशित होईल, ह्याची सोय त्यांनी करून ठेवली होती. आणि एवढी प्रदीर्घ योजनासुद्धा विफल होईल हे आधीच हेरून परागंदा क्रांतीकारकांना जपान, जर्मनी, मेक्सिको, अफगाणिस्तान, तुर्कस्तान, रशिया व अमेरिका येथे आश्रय मिळेल ह्याची हमी सावरकरांनी घेतली होती.

विमाने, रडार अजूनही उपलब्ध न झालेल्या जगांत भारताच्या पंचविशीतल्या या पोराने अखिल भारतीय पातळीवर आंतरराष्ट्रीय संबंध लक्षात घेऊन एवढी भव्य कल्पना आखावी ही कल्पनाची किती रोमांचक आहे. म्हणूनच कदाचित पुनर्जन्म ना मानणाऱ्या ब्रिटीश शासनाने त्यांना दोन जन्मठेपेची शिक्षा सुनावली असावी!!

संदर्भ -
१. समग्र सावरकर
२. नरहर कुरुंदकर
३. इतर वाचन

अभिषेक म. चौधरी

http://mazeguru.blogspot.com/

इतिहासविचार

प्रतिक्रिया

विकास's picture

19 Nov 2011 - 5:14 pm | विकास

सावरकरांनी पारतंत्र्यातील एक गरज म्हणून सशस्त्र क्रांतीचा पुरस्कार आणि मारता मारता, मरेतो झुंजण्याची शपथ घेतली होती, हे जरी खरे असले तरी त्यांच्या दृष्टीने / शब्दात क्रांतीची व्याख्या काय होती हे पाहीले तर त्यांचे विचार स्पष्ट होतातः (आठवणीतून देत आहे)

"गतीशून्य माणसाच्या किंवा कुजू पाहणार्‍या राष्ट्राच्या पायात बद्ध असलेल्या शॄंखला, प्रगतीच्या घणाखाली तुटू लागतात, तेंव्हा होणार्‍या आवाजाला क्रांती असे म्हणतात."

अप्पा जोगळेकर's picture

19 Nov 2011 - 5:18 pm | अप्पा जोगळेकर

अत्यंत रोचक माहिती दिल्याबद्दल आभार. क्रांतीची इतकी भव्य योजना आखली गेली होती हे ठाउक नव्हते.

दुर्दैवाने सावरकरांच्या विचारांवर आधारीत लेखन फारसं वाचनात आलेलं नाही. त्यामुळे तुम्ही टंकलेल्या योजनेतली सत्याअसत्यता यावर भाष्य करणे योग्य ठरणार नाही.
पण एक लेख म्हणुन हा धागा आवडला.
धन्यवाद.

सुदैवाने मागील पिढीसारखे आपल्याला एक एक पुस्तक अन् एक एक पान शोधण्यासाथी वर्षेच्या वर्षे खर्ची करावे लागत नाहित. तंत्रज्ञानाने पुस्तकेच्या पुस्तके जणू अलिबाबाच्या गुहेप्रमाणे एका टिचकीतच उपलब्ध करुन दिली आहेत.
सावरकरलिखित जवळ जवळ सर्व काही जालावर पुष्कळ उपलब्ध आहे.
त्यांच्याविषयी वाचू इच्छिणार्‍यांसाठी http://www.misalpav.com/node/17495 इथे प्रचंड मोठा लिकांचा खजिना आहे. इतिहासविषयक वाचण्यात एखाद्याला रस नसेल हे समजू शकतो. पण निदान विज्ञाननिष्ठ निबंध तरी सर्वांनी अवश्य वाचावेत असं माझं समस्त भारतीयांना आग्रहाचं सांगणं आहे. सहा सोनेरी पाने, हिंदु पदपादशाही वगैरे ठिक आहेत हो.
पण ते निबंध किंवा स्वातंत्र्यपूर्व काळातील (त्यांना) समकालीन घटनांचा एक वेगळाच कंगोरा त्यातून दिसतो.
अवश्य वाचावेत.
मूळ लेखाबद्दल तक्रार हीच की भलताच त्रोटक आहे.

अभिषेक,
तुमच्याकडे संदर्भ उपलब्ध आहेत तर लेख एवढा आवरता का घेतलाय असा प्रश्न पडला. (फक्त एकच परिच्छेद???)
हवं तर आणखी संदर्भ पाहून ही क्रांती कशी आखण्यात आली होती आणि ती कशामुळे वास्तवात उतरू शकली नाही हे पाहून आणखी एक सर्वसमावेशक लेख लिहा.
प्रतिक्षा करीत आहोत.

आनंदी गोपाळ's picture

19 Nov 2011 - 9:56 pm | आनंदी गोपाळ

सफल होगी तेरी आराधना!
काहेको रोये?

चालू द्या!

सर्वसाक्षी's picture

20 Nov 2011 - 9:06 am | सर्वसाक्षी

स्वा. सावरकरांविषयी रशिया, प्रशिया संबंधांबाबत अधिक वचायला आवडेल. स्वा. सावररकर यांचे रशियन क्रांतिकारकांशी संधान होते हे ठाऊक आहे. या विषयावर सविस्तर लेखमाला सुरू करावी ही विनंती

अभिषेक९'s picture

21 Nov 2011 - 1:11 pm | अभिषेक९

धन्यवाद...

'अजून वाचायला आवडेल' हे एकूण खूप बरे वाटले. हुरूप आला.
पण ह्या छोट्याश्या लेखाचा आणि ब्लोगचा उद्देशच मुळी वेगळा आहे. इतिहास सांगणे, किंवा फारश्या प्रसिद्ध नसलेल्या गोष्टी सांगणे, हा उद्देश नव्हता. माझ्या ब्लोग च्या मुळी नावच फार मर्यादित आहे - 'सावरकर मला समजलेले'. त्यात लिहिलेला हा पहिलाच लेख / ब्लोग. सुचेल तसे लिहित आहे.
पण आपण सगळ्यांनी सुचवलेल्या गोष्टींवर नक्कीच विचार आणि लिहायला आवडेल. प्रयत्न करीन...

धन्यवाद.