तर ऐशच्या बाळंतपणावर तब्बल शंभर कोटींची ऐष सट्टेबाजांनी केल्याची बातमी त्या बिचारीचा पाळणा हलतो न हलतो तोच कानी आली! ऑनलाईन लॉटरी खेळण्याचे पेव सध्या फुटले आहे. त्यातच ‘ऐश’ नावाच्या व्यक्तीचा फोटो मोबाईलवर असणे म्हणजे कोणेएकेकाळी तरुणांचा ‘मान’बिंदू होता. ताल मधील तिचे अनेक फोटो ‘पाहून’ अनेकांनी भलताच ताल धरला होता. पण ती प्रख्यात कुटुंबाची विख्यात सून झाली अन् अनेकांची अवस्था ‘हम दिल दे चुके सनम..’ सारखी भणंग झाली. त्यामुळेच तिच्या बंगल्यासमोर जाऊन धिंगाणा घालणाऱ्या हिरोची दबंगगिरी पोट्ट्यांना आवडली होती परंतु त्यानंतरही तिच्या मृत्यूपूर्व दान केलेल्या सखोल नयनांतील आशयगर्भ खोलीची काहीच ‘आयडिया’ कुणालाच आली नाही व अचानक तिच्यावर अक्षतांचा अभिषेक झाला! काही दिवस असेतसेच अन् ‘तसे’ही गेलेच म्हणा. बातमी फुटली तेव्हापासून सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली होती. काय होईल, कसं होईल? अशी चिंता स्वतःच्या बायकोच्यावेळी ज्यांनी केली नाही, तितकी ‘तिच्या’ बाबतीत घडोघडी अन् पदोपदी व्यक्त केली जात होती. अशा दोलायमान गंगेत कसलेले सटोडीये हात धुवून गेले नसते तर नवल होते!
सर्वसामान्य क्ष-य-झ नामे व्यक्तीला ‘छ’ नावाचं मूल झालं तर कुणाचं काही बिघडत नसतं. परंतु मोठ्यांच्या गोष्टीच मोठ्या. त्या ऐकून तोट्यात जाण्याचं कारण नाही आणि गोट्या खेळता खेळता त्या घटनांचं इत्यंभूत वर्णन ऐकलं तरी चालू शकतं, इतक्या त्या रंजक असतात. सट्टा लावणं जरी गृहस्थधर्माला धरून नसलं तरी ते अशा जर-तर च्या खेळात मोठ्ठ्या मानधनाचे धनी होण्याचं भाग्य लाभण्याची शक्यता वर्तविली जाते. याकामी सट्टेबाज फार चतुराई दाखवितांना दिसतात. ते आधी विचारतील अमूक किंवा तमूक प्रसिद्ध व्यक्ती फलाण्या किंवा बिस्तान्या दिवशी मुलाला किंवा मुलीला जन्माला घालणार आहे किंवा जुळ्यांना ओटीत जोजविणार आहे किंवा हेही नाही? लावा बोली अन् खेळा सट्टा!
आपल्या एकेकाळच्या आवडत्या माणसावरील प्रेमाखातर काहींनी (दैवावर भरवसा ठेऊन) मोठ्ठा सट्टा लावला. तारीख उलटताच त्यांना सट्ट्याचा दट्ट्या असा काही रुतला म्हणता की पुढे मुलगा होईल की मुलगी? असा सट्टा खेळणं त्यांना सोडूनच द्यावं लागलं. काहींनी जुळे तिळे चौसाळे अशा तिकीटांवर पैसे मोजून गंजलेले खिळे पदरात पाडून घेतले. रात्री डिलीव्हरी होणार की दिवसा? यावरही काहींनी नोटा उडविल्या आणि साखर झोपेतच त्या मोजण्याचा वायफळ प्रयत्न केला. सीजर होणार की नॉर्मल? यालाही अनेकांनी दाद दिली व सर्वकाही जगजाहीर होताच ह्यांची खेळी बाद झाली. ‘च्यामारी मला वाटलं असंच व्हयील, पर झालं उफराटंच..’ म्हणत कपाळावर हात मारुन घेण्यापलिकडे अशांनी काहीच केलं नाही.
कोण कशावर सट्टा खेळेल काही सांगता येत नाही. आजवर क्रिकेटच्या प्रत्येक बॉलवर ग्राहकाला गोल गोल फिरविले जायचे. आता हे नवीनच क्षेत्र सट्टेबाजांच्या हातात सापडलंय. सेलिब्रेटींची कोणतीही ‘जर-तर’ मधली वैयक्तिक गोष्ट अशी सार्वजनिक चर्चेत ओढून त्यावर सट्टा खेळणे कितपत योग्य आहे? बाळ पाळण्यात असतांनाच ते कुणाशी लग्न करेल ह्याच्याशी की तिच्याशी? असाही सट्टा मांडायला ही लोकं मागेपुढे पाहणार नाहीत. सट्टा लावून कुणालातरी नोटांचा गठ्ठा मिळालाय का? तरी ही दैवभोळी लोकं का अशा ‘अर्ध-पडदी’ गाळ्यांत जाऊन गाळात का जातात? न कळे. वेळ आणि पैसा वाया घालविण्याचे हे मार्ग तरुण पिढीकडून का अनुसरले जातात? यामध्ये समाजधुरिणांनी लक्ष घालणे अपेक्षित आहे...
********************************************************************
प्रतिक्रिया
18 Nov 2011 - 1:17 pm | चिरोटा
वाचनिय लेख. ह्या सगळ्या सट्ट्यामागे अभिषेक बच्चन असल्याचे बोलले जाते.अभिनय नाही पण आपल्याला निदान "हे" तरी करता येते हे त्याला जगाला सांगायचे होते.
18 Nov 2011 - 1:27 pm | मदनबाण
छन लिहले आहे...
ऑनलाईन लॉटरी खेळण्याचे पेव सध्या फुटले आहे.
हे का लिहले ते मला नाय समजले. !
सेलिब्रेटींची कोणतीही ‘जर-तर’ मधली वैयक्तिक गोष्ट अशी सार्वजनिक चर्चेत ओढून त्यावर सट्टा खेळणे कितपत योग्य आहे?
अयोग्यच ! अर्थात पैश्याचे वेड असणार्या कुठल्याच गोष्टी गैर वाटत नाही...
18 Nov 2011 - 3:35 pm | मोहनराव
तब्बल ५०० कोटींचा सट्टा खेळला गेला म्हणे!!
कोण म्हणतो रे भारत देश गरिब आहे? ;)
18 Nov 2011 - 9:10 pm | आत्मशून्य
मलाही खेळायचा होता सट्टा, पण,ते बेकायदेशीर असल्याने पास दिला, बाकी लेख मस्तच.
(प्रासंगिक सट्टेबाज - आत्मशून्य)
18 Nov 2011 - 9:17 pm | रेवती
ऐश्वर्याला बाळ होणार असल्याची बातमीच विसरून गेले होते.
ती बाळंत झाल्यावरही सगळ्यात शेवटी कळणारी मीच असेन बहुतेक!;)
बाकी या गोष्टीवर सट्टा वगैरे खेळणारे लोक गाढव म्हटले पाहिजेत.