नातं

दत्ता काळे's picture
दत्ता काळे in जे न देखे रवी...
28 Oct 2011 - 5:29 pm

नेहमीच येतो मी इथे
रमणीय तळ्याकाठी
इथली खास शांतता अनुभवण्यासाठी

विस्तिर्ण काठाचं हे तळं मला
नेहमीच वेगवेगळ्या रुपात भासतं
काठाच्या दाट शेवाळी पाणवनस्पतीवर
सतत चमचमणार्‍या पाण्याच्या रेघा
त्यावरून डौलाने चालणारे बगळे
मध्येच डुबकी घेणारे पाणपक्षी, बेडूक
आंत पाण्याच्या मोठ्या तुकड्यावर
अमाप छोटी गुलाबी कमळं असतात
त्यावर दिसतात फुलपाखरं, चतुर ह्यांच्या भरार्‍या
हे तळ्याचं नेहमीचं रुप

पण हिवाळ्यात काही काळ हे बदलतं
अचानक एके दिवशी तिथे येतात
देशांतरीत पाहुणे गुलाबी, पांढर्‍या रंगाचे
कलकलाटांनी तळ्याची अभिजात
शांतता भंग करीत.
पानथळीजागेवर पानापानातून त्यांची
मायेची घरटी वसतात.
नवी वीण घालतात.
हवीहवीशी वाटणारी त्यांची लगबग
काही दिवस सुरुच राहते
तळं प्रेक्षणीय बनतं

एके दिवशी हा सगळा बहर ओसरतो.
लगबग थांबते
पाहुणे निघून जातात.
तळं सुन्नं होऊन जातं.

पण ते पुन्हा येतील
पुन्हा, पुन्हा येतील
येतंच राहतील.
त्यांच्या पिलांना ठिकाण माहिती आहे.
तीपण मोठी होऊन येतील
आपल्यासुध्दा पिल्लांना घेऊन..

नात्यांची वीण घट्ट आहे

शांतरसकवितामुक्तक

प्रतिक्रिया

श्रावण मोडक's picture

28 Oct 2011 - 6:00 pm | श्रावण मोडक

कवितेपेक्षा मुक्तक वाटलं. 'दत्ता काळे'! अपेक्षीत अशी तरलता आहे लेखनात.

चित्रा's picture

29 Oct 2011 - 8:15 pm | चित्रा

असेच म्हणते.

आवडले.

दत्ता काळे's picture

28 Oct 2011 - 6:10 pm | दत्ता काळे

मुक्तकच आहे हे. मुख्य साहित्यप्रकार कविता आणि त्यातला 'उपप्रकार मुक्तक' असं.

धमाल मुलगा's picture

28 Oct 2011 - 6:39 pm | धमाल मुलगा

भिगवण का भिगवण? :)

पैसा's picture

29 Oct 2011 - 8:20 pm | पैसा

मुक्तक आवडले.

इंटरनेटस्नेही's picture

29 Oct 2011 - 8:25 pm | इंटरनेटस्नेही

वा! वा! चान!! चान!!