अण्णा हजारे, आता बास करा !

अप्पा जोगळेकर's picture
अप्पा जोगळेकर in जनातलं, मनातलं
26 Aug 2011 - 10:54 pm

आदरणीय अण्णा,

गेल्या पंधरा दिवसांमध्ये जनलोकपाल बिल आणि भ्रष्टाचार विरोध हे मुद्दे आधारभूत धरुन तुम्ही जी अभूतपूर्व चळवळ उभी केली आणि त्याला जे जबरदस्त यश मिळाले त्याबद्दल सर्वप्रथम अभिनंदन. सुरुवातीला मुजोर वाटणारे सरकार लोकांच्या दबावामुळे अंशतः का होईना पण झुकले हे या चळवळीचे मोठेच यश म्हटले पाहिजे. पण त्याहीपेक्षा मोठी आणि नमूद करण्याजोगी अ‍ॅचिव्हमेंट ही की या निमित्ताने चेकाळलेल्या सरकारपर्यंत एक धोक्याचा मेसेज गेला. आपण आपल्याला हवे तसे उन्मत्तपणे आणि मस्तवालपणे वागू शकतो, आपल्याला कोण विचारणार अशा मस्तीत सरकार वावरत होते. ती धुंदी उतरली. शिवाय, लोकांच्या मनात आपणदेखील सरकारला जाब विचारु शकतो, आंदोलनाच्या माध्यमातून दणके देऊ शकतो असा विश्वास निर्माण झाला तो वेगळाच. नाहीतर आमच्यासारख्या सामान्य नागरिकांचा आणि चळवळींचा संबंध फक्त इतिहासाच्या पुस्तकांपुरताच होता. इतके मोठे यश तुम्हाला तूर्तास तरी पुरेसे वाटत नाही काय ? तुम्ही स्वतःच या लढ्याचा उल्लेख 'स्वातंत्र्याची दुसरी लढाई' असा करता. शिवाय वेळोवेळी स्वातंत्र्यासाठी लढलेल्या स्वातंत्र्यसैनिकांचे दाखलेसुद्धा देता. मग तेच स्वातंत्र्य मिळवण्यासाठी किती वर्षे झगडावे लागले याची वेगळी आठवण तुम्हाला करुन दिली पाहिजे काय? भ्रष्टाचाराविरुद्धची ही लढाई तुम्ही उपोषणाच्या एका फटकार्‍यामध्येच जिंकाल आणि आसुसलेली विजयश्री ताबडतोब तुमच्या गळ्यामध्ये माळ घालेल असे तुम्हाला वाटत नसेल अशी आशा आहे.

तुमच्या उपोषणाच्या वाढणार्‍या एकेका दिवसाच्या समप्रमाणात आणि घटणार्‍या एकेका किलोग्रॅमच्या व्यस्त प्रमाणात आम्हा सामान्य नागरिकांची चिंता वाढत चालली आहे. आणि अनेक दशकांनंतर देशाला राष्ट्रीय पातळीवरचे नेतॄत्व मिळाले ते महिन्या- पंधरा दिवसांपुरतेच टिकणार की काय अशी भीती मनात डोकवायला लागली आहे. 'जनलोकपालच्या निमित्ताने केलेल्या मागण्या पूर्ण होणार नाहीत पण या निमित्ताने झोपलेल्या सरकारला जाग येईल आणि नंतर वेळोवेळी चळवळी करुन सरकारला वठणीवर आणता येईल' हे वास्तव तुम्ही मनामध्ये गॄहीत धरले असेल असे आजपर्यंत वाटत होते. पण तुमचा इरेला पेटल्यासारखा आविर्भाव पाहून वस्तुस्थिती काही वेगळीच असावी असे वाटते. शिवाय काल बाळ ठाकरे यांनी 'आता केजरीवाल,बेदी,भूषण यांना उपोषणाला बसू द्या आणि तुम्ही उपोषण सोडा' अशी जी खोचक सूचना केली त्यामध्येसुद्धा बरेचसे तथ्य असावे अशी शंका येते. आमचे दाढीवाले मामा म्हणतात त्याप्रमाणे या चळवळीमध्ये बॅड एलिमेण्ट्स घुसवण्याचा सरकारी प्रयत्नसुद्धा अंशतः यशस्वी होतो आहे. हे असे आणखीन किती दिवस चालू राहणार? चिघळत गेलेली चळवळ म्हणजे नाद गेलेलं भांडं. लोकं वाट बघून बघून कंटाळतील आणि नंतर आपापल्या मार्गाने चालू पडतील. चुकूनसुद्धा जर असे झाले तर तुम्ही इतक्या मेहनतीने आणि कष्टाने उभा केलेला हा सगळा डोलारा बघता बघता जमीनदोस्त होईल आणि जर का दुर्दैवाने तुमच्या जीवाचे काही बरेवाईट झाले तर नंतर जनतेमध्ये इतके नैराश्य पसरेल की पुढची आणखीन काही दशके दुसरा कोणताही अण्णा असे आंदोलन करण्याची हिंमत करु शकणार नाही. तुम्ही घोड्यावर बसून लढताहात, तुमचे सहकारी आरामशीरपणे अंबारीत बसून गगनभेदी आरोळ्या ठोकताहेत पण सत्य जमिनीवर आहे असे राहून राहून वाटते. तेंव्हा फक्त तुमच्या स्वतःसाठीच नाही तर तुमच्याकडे आशेने डोळे लावून बसलेल्या आमच्यासारख्या सामान्य माणसांकडे आणि तुमच्या लाडक्या राळेगण वासीयांकडे बघून तरी हे उपोषण तुम्ही सोडावे असे कळकळीने सांगावेसे वाटते.

तुमचा निस्सीम चाहता,
सौरभ जोगळेकर

राजकारणप्रकटन

प्रतिक्रिया

छोटा डॉन's picture

26 Aug 2011 - 11:00 pm | छोटा डॉन

लेखाशी बर्‍याच अंशी सहमत.
मुळात ह्या आंदोलनाकडुनच आम्हाला जास्त अपेक्षा नसल्याने १००% सहमत होता आले नाही इतकेच.

आण्णांनी आता शक्य तितक्या लवकर उपोषण सोडावे ही इच्छा.

- छोटा डॉन

अण्णा हजारे, आता बास करा !

हा लेख नावावरून
बाबा रामदेव वेळीच जागा हो
परवेझ मुशर्रफ माझे ऐक नाहीतर परिणामांना तयार हो
ओबामा ........

या धर्तीचा वाटला

पण आतील आशय वाचल्यावर वाटले हा लेख म्हणजे भरल्यापोटी दिलेला ढेकर नाही
टाईम पास नाही

माहितीपूर्ण आणि अभ्यासपूर्ण आहे
(हे मिसळीवर जरा दुर्मिळ आहे)

छान वाटला लेख

चिरोटा's picture

27 Aug 2011 - 12:00 am | चिरोटा

सहमत.
आता उपोषण मागे घ्यावे असे वाटते. टी.व्ही. वरच्या बातम्या पाहून असे वाटते आहे की आता हा इगो इश्यु झाला आहे. मनमोहन आणि कंपनी सरळ बोलायला तयार नाही आणि प्रत्येक दिवशी चर्चा झाली की अण्णांच्या सहकार्‍यांची "आता सरकारला अद्दल घडवतोच' च्या थाटात भाषणे. परवा प्रणव मुखर्जी व्यवस्थित बोलले पण बाहेर आल्यावर अण्णांच्या सहकार्‍यांनी त्यात मसाला भरून प्रणवदांना व्हीलन बनवायचा प्रयत्न केला असे मला वाट्ले.

अर्धवटराव's picture

27 Aug 2011 - 6:12 am | अर्धवटराव

भारतात वीसर पडलेल्या लोकचळवळीच्या शक्तीला पुन्हा एकदा घुमारे फुटताहेत. बाकी सर्व चळवळींप्रमाणे ही चळवळ देखील स्वतःचे अंगीभूत बरे-वाईट स्वभाववैशिषिट्ये घेऊन आकार घेतेय. भविष्यात या चळवळीकडे एक रेफरन्स म्हणुन बघण्यात येईल. तेंव्हा हि चळवळ ईप्सीत साध्य झाल्या बिगर थांबता कामा नये. दुर्दैवाने अण्णांचे उपोषण हा या चळवळीचा प्राणवायु बनलाय. म्हणुन मला तरी (भरल्यापोटी, निर्लज्जपणे) सांगावेसे वाटते कि अण्णांनी उपोषण मागे घेऊ नये.

अर्धवटराव

अगदि परफेक्ट इगो इश्यु झालेला आहे, आणि तो पण अण्णांचा नाही तर त्यांच्या साथीदारांचा, आपणच देशाचे तारणहार हा भाव घेउन निघालेले आहेत आणि आता श्याट् सरकार ऐकणार नाही हे समजलेल आहे.

लग्नात कसं नवरामुलाच्या नावावर त्याचे सगळे नातेवाईक आपले लाड करुन घेतात तसं चाललं आहे,

अगदी अण्णा वारले आणि जनलोकपाल आहे तसे पास होईपर्यंत त्यांचे पार्थिव उचलणार नाही असा जरी पवित्रा घेतला कै.अण्णाटिमने घेतला तरी, जनलोकपाल आहे तसे पास होत नाही, अगदी सरकारला वाटले तरी, कारण तसे करायचे म्हणले तरी भ्रष्टाचारविरोधी कायदा पास करुन घ्यायला बाकी पक्षाच्या खासदारांना पैसे द्यावे लागतील.

पंतप्रधानंना त्या कक्षेत आणण्यापेक्षा सिटिझन चार्टर जास्त उपयोगी आहे, कारण तो मुळावर घाव आहे पण ते होणं शक्य नाहि. लोअर ब्यूरोक्रसी ही कलेक्शन पोईंट आहे, ती तोडुन चालणार नाही.

नगरीनिरंजन's picture

27 Aug 2011 - 9:09 am | नगरीनिरंजन

सहमत आहे. तुटेपर्यंत ताणू नये. नंतर ताणायला काहीच उरणार नाही. पंप्रनी संसदेत सलाम ठोकून चर्चा करण्याचे वचन दिले एवढे यश रग्गड झाले. बाकी मुद्दे वर तुम्ही यथार्थ मांडलेतच.

मराठी_माणूस's picture

27 Aug 2011 - 12:08 pm | मराठी_माणूस

लेखा मधे , अण्णांनी आंदोलन थांबवल्याने काय होणार आहे ते पुरेसे स्पष्ट होत नाही.

पून्हा पहीले पाढे पंचावन. सरकारला माहीत आहे अण्णा १० दीवस अरामात उपोषण करतील म्हणूनच त्यांनी भिक घातली नाही. अण्णांनी जर उपोषण सोडले तर त्यांची नाचक्की होइल व सरकारचा जनलोकपाल उधळून लावायचा डावही यशस्वि होइल. उपोषण सूरू करताना ज्या मागण्या होत्या त्यावरच अण्णा ठाम असल्याने किंबहूना त्यात लवचिकता दाखवायचीही तयारी दाखवल्याने उपोषण मागे घेणे चूकच. आता सामान्य जनतेनेही असहकाराचे आंदोलन करावे.

बाळकराम's picture

28 Aug 2011 - 2:14 am | बाळकराम

याऐवजी " कलमाडी/शरद पवार/ ए राजा इ. आता (खाणे) बास करा" असा लेख असता तर फार बरे वाटले असते! असो.
आण्णांच्या चळवळीला आता कुठे यश मिळालेय ते पाहून अनेक नेत्यांचा छुपा पोटशूळ उपटलाय, बगळ्यांच्या या भोळ्या बतावणीला तुम्ही फसलात हे पाहून वाईट वाटले. आण्णांच्या "बास" करण्याने नक्की कुणाला आणि कसा फायदा होईल ते जरा प्लीज समजावून सांगाल का? आण्णांबद्दल भोंगळ पुळका आणून एका उभरत्या चळवळीला अपशकुन करण्याचे काम शिवसेनादि पक्ष आणि बाळासाहेबादि नेते मोठ्या प्रेमाने करत आहेत, त्याला नकळत का होईना आपला हातभार लागतो आहे का?