एक महाभयंकर जात
खरे पाहता, "जात" हा शब्द दर्शवितॊ ते वर्गीकरण. जसे की सजीवांमध्ये - प्राणी, पक्षी, माणूस, वनस्पती वगैरे. यामध्येही अनेक पोट जाती असू शकतात जसे की, शिकार करणारे प्राणी, शाकाहारी वगैरे. माणसाने हि आपापल्या जाती बनविल्या. माणसाच्या जाती मुख्यत: त्याचे स्थळ, तो करतॊ ते काम, त्यानुसार रहाणीमान दर्शविण्यासाठीच होता. पण या जातीचा चुकिचा अर्थ ज्यांनी पसरविला, वाढवला व पॊसला ती एक महाभयंकर जात आहे. ती कशी ओळखायची हे पुढे वाचा म्हणजे कळेलच...
सत्याला सारुन मागे,
असत्याला मिळाली वाट
उदया आली नवी जमात
ती होती राजकारण्यांची जात
मानवतेला संपवाया
कलियुगी अवतरले हे खास,
जी सैतानाचि औलाद
हि तर राजकारण्यांची जात !
मेलेल्यांच्या टाळूवरचे
लोणी खाऊन झाले मॊठे,
आता विकतात ते स्वतात
हि तर राजकारण्यांची जात !
दुर्गुण बरेच करुन गोळा
केले ज्यांनी आत्मसात,
तरी म्हणतील आम्ही साफ
हि तर राजकारण्यांची जात !
मते मागाया येतो एक
दुजाला खुर्चीत बसवितात,
अन तिसरेच देश चालवितात
हि तर राजकारण्यांची जात !
दिले ज्यांनी त्या निवडून
त्यांच्या पोटावर बसतात,
अन नरड्याचे घोट घेतात
हि तर राजकारण्यांची जात !
घेऊन तुम्हा विश्वासात
पाठित खंजिर खुपसतात,
मालकावर पलटवार करतात
अरे हि तर राजकारण्यांची जात !
साप विषारी परवडला
पण हे भिनले अंगात
तर मनुष्य मनुष्य नाही रहात
हि तर राजकारण्यांची जात !
वेळीच सोला या सापाना
जोवर आहे शेपूट हातात
तरच टिकेल माणूस जमात
काढून टाका अ-सत्याची कात