मुंबई ते मैसूर

आनंद घारे's picture
आनंद घारे in जनातलं, मनातलं
26 May 2008 - 7:30 am

स्वतः हे सुंदर शहर पाहण्यासाठी किंवा दुस-या कुणाला दाखवायच्या निमित्याने ते पुनः पाहण्यासाठी मी पूर्वी तीन चार वेळा मैसूरला एक पर्यटक म्हणून येऊन गेलो होतो. त्यातल्या प्रत्येक वेळी इथली प्रेक्षणीय स्थळे एकामागून एक पाहून पुढचे ठिकाण गांठण्यात थोडी घाईगर्दीच झाली होती. त्यासाठी इकडून तिकडे फिरतांना शहराचा जेवढा भाग दिसला होता तेवढा पाहूनच हे गांव माझ्या मनात भरले होते. कधी काळी आपण इथे रहायला येऊ शकू अशी शक्यता त्या वेळेस स्वप्नातसुध्दा दिसत नव्हती त्यामुळे इथल्या रहिवाशांचा थोडा हेवाच वाटला होता. पण अगदी ध्यानी मनी नसलेल्या कांही चांगल्या गोष्टीसुध्दा आपल्या आयुष्यात अचानक घडून जातात तसे झाले आणि या वर्षीच्या उन्हाळ्यात मैसूरला जाऊन रहायची संधी माझ्याकडे चालून आली.

यापूर्वी अनेक वेळा आम्ही उन्हाळ्यात बाहेरगांवी जातच होतो. मुलांच्या शाळांना सुटी लागण्याच्या आधीच सुटीत बाहेरगांवी जायचे वेध घरातल्या सगळ्यांना लागत असत. बहुतकरून मुलांच्या आजोळी म्हणजेच त्यांच्या 'मामाच्या गांवाला' जाणे होई. अधून मधून काका, आत्या, मावशी वगैरेंकडे किंवा कोणा ना कोणाच्या लग्नसमारंभाला जात असू. पण आमचे सारे आप्त भारतात जिथे जिथे राहतात त्या सगळ्या ठिकाणी उन्हाळ्याच्या दिवसात रखरखत्या उन्हात घराबाहेर पडायची सोय नसते आणि घरात असह्य असा ऊष्मा असतो. शिवाय नेमक्या त्याच काळात पाण्याचे दुर्भिक्ष आणि विजेची कपात वगैरे येत असल्यामुळे बरेच वेळा तिथल्या रहिवाशांचा जीवच मेटाकुटीला येत असतो. त्यात "दुष्काळात तेरावा महिना" म्हणतात तसे जाऊन सगळ्यांचेच हाल वाढवण्यापेक्षा थंडीच्या दिवसात त्यांच्याकडे जाण्यात जास्त मजा असते. कधी कधी काश्मीर, उटकमंड यासारख्या थंड हवेच्या जागांची टूर काढली जाई. अशा ठिकाणी जाणेच खूप खर्चाचे असे आणि राहणे तर खिशाला परवडणारे नसायचेच, त्यामुळे तिथले प्रसिध्द असे मोजके निसर्गरम्य पॉइंट्स भराभर पाहून परत यावे लागत असे.

उमरखय्यामच्या चित्रात तो एका रम्य अशा जागी हातात मदिरेचा प्याला घेऊन अर्धवट डोळे मिटून धुंद होऊन बसला आहे आणि शेजारी त्याची कमनीय अशी मदिराक्षी प्रिया त्याच्याकडे मादक कटाक्ष टाकत सुरईने त्याच्या प्याल्यात मदिरेची धार धरत अदबशीरपणे उभी आहे असे दाखवतात. ही(पुरुषाच्या)सुखाची पहाकाष्ठा समजली जाते. मी शायर वगैरे नसल्यामुळे माझ्या सुखाच्या कल्पना जरा वेगळ्या आहेत. कसलाही उद्देश किंवा योजनांचे ओझे मनावर न बाळगता आरामात पाय पसरून आजूबाजूचे निसर्गसौंदर्य पहात नुसते पडून रहावे आणि तिथल्या थंडगार व शुध्द हवेचा मनमुराद आस्वाद घ्यावा, फार तर गरम चहाचा कप हांतात असावा आणि बाजूला बिस्किटे, वेफर, कांद्याची भजी असे कांही तोंडात टाकायला असावे एवढे सुख मला पुरेसे आहे. पण असा योग पूर्वी कधीच आला नाही. त्यामुळे या उन्हाळ्यात मैसूरला जाऊन निव्वळ आराम करायचा विचार चित्तथरारक होता.

उन्हाळ्यात मैसूरला जायचे असे तत्वतः ठरले तरी त्याचा नेमका कार्यक्रम ठरत नव्हता त्यामुळे रेल्वेचे रिझर्वेहेशन करता आले नाही. तेवढ्या काळात इतर लोकांनी तिकडे जाणा-या सर्व गाड्यांच्या सर्व वर्गाचे डबे भरून टाकले. त्यामुळे राखीव जागा मिळेपर्यंत थांबायचे झाल्यास तोंपर्यंत उन्हाळा संपून गेला असता. आता काय करायचे हा प्रश्न पडला. माझ्या एका सहका-याचे मैसूर हेच 'होम टौन' असल्याचे आठवले म्हणून त्याच्याकडे चौकशी केली. "आपण तर हल्ली विमानानेच जातो." असे त्याने ऐटीत सांगितले आणि बदलत चाललेल्या परिस्थितीची जाणीव झाली. माझ्या आई वडिलांनी कोणतेही विमान कधीही आतून पाहिले नव्हते. त्यामुळे मलासुध्दा आपण कधी विमानातून प्रवास करू शकू असे लहानपणी वाटत नव्हते. नोकरीला लागल्यानंतर वरिष्ठ अधिकारी कामानिमित्य विमानाने प्रवास करतात हे पाहिले. मला विमानप्रवासाची पात्रता प्राप्त करायला त्या काळात दहा वर्षे लागली. नंतर ते नेहमीचेच झाले असले तरी खाजगी कामाकरता विमानाने जाण्याइतकी आर्थिक परिस्थिती सुधारली नाही. पुढची पिढी मात्र आता सर्रास सहकुटुंब विमानातून हिंडतांना दिसते.

गेल्या कांही वर्षात महागाईमुळे इतर गोष्टींचे भाव वाढत गेले असले आणि त्या प्रमाणात उत्पन्न वाढले असले तरी विमानप्रवासाचे दर कमी कमी होत गेले आहेत. पूर्वी ते बसच्या भाड्याच्या अनेक पटीने महाग होते, आता दुपटीच्या आसपास आले असल्यामुळे एवढे आकाशाला भिडल्यासारखे वाटत नाहीत. त्यामुळे आम्हीही विमानानेच जायचे ठरवले. त्यात वेळ आणि दगदग वाचण्याची सोय तर होतीच, शिवाय पुढे आम्हालाही तसे ऐटीत सांगता येईल! विमानाचे तिकीट काढणे इतके सोपे असेल याची कल्पना नव्हती. ठरवल्यापासून पंधरा मिनिटात इंटरनेटवर बुकिंग झाले आणि ई-तिकीट काँम्प्यूटरवर आलेसुध्दा. लगेच त्याची प्रिंटआउट काढून घेतली.

त्या चतकोर कागदाकडे पाहून मनाचे समाधान मात्र कांही केल्या होत नव्हते. इतके दिवस ज्या प्रकारचे तिकीट पहायची मला संवय होती ते लालचुटुक रंगाच्या गुळगुळीत कागदाच्या वेष्टनात असायचे. त्यात पोथीसारखी दोन चार आडवी पाने असायची आणि त्यावर अतिसूक्ष्म अक्षरात कांहीतरी अगम्य असे लिहिलेले असायचे. मी एकदाच ते वाचायचा प्रयत्न केला. विमानात कोणकोणत्या गोष्टी बरोबर नेणे धोकादायक आहे याची भीती त्यात घातली होती, प्रवासात कांहीही झाले तर त्याला विमान कंपनी जबाबदार नाही वगैरे लिहिले होते आणि तुमचे कांही बरे वाईट झाले तर तुमच्या वारसाला कमीत कमी किंवा जास्तीत जास्त काय मिळेल वगैरेचे नियम होते. मी कांही ते सारे पूर्णपणे वाचू शकलो नाही. वाचले असते तर कदाचित पुन्हा विमानात बसण्याचे धाडस करू शकलो नसतो. मधल्या फ्लाईट कूपन्सवर अनेक चौकोन काढून त्यात कित्येक आंकडे आणि अक्षरे लिहिलेली असत. त्यात आपले नांव, गांव व प्रवासाच्या तारखा कशा पहायच्या एवढे सरावाने जमत होते. इतर अक्षरे व आंकड्यांचा अर्थ समजून घेण्याची गरज कधीच पडली नव्हती.

हे ई-तिकीट मात्र मुळीसुध्दा तिकीटासारखे दिसत नव्हते. कॉलेजच्या नोटीसबोर्डावर एकाद्या पाहुण्याच्या भाषणाची सूचना लावलेली असावी तसे त्याचे रंगरूप दिसत होते. पण आता यापुढे बहुतेक सर्व खाजगी कंपन्या फक्त ई-तिकीटेच देणार आहेत अशी तळटीप त्यातच दिलेली होती. त्यामुळे घरी बसल्या तिकीट काढा किंवा विमान कंपनीच्या ऑफीसात जाऊन ते काढा, असा चतकोर कागदच मिळणार! असला प्रिंटआऊट तर कोणीही स्वतःच टाईप करून काढून आणू शकेल असे क्षणभर वाटले. पुढची टीप वाचल्यावर ती शंका मिटली. विमानतळावर गेल्यानंतर त्या तिकीटात दिलेल्या नांवाचा प्रवासी तुम्हीच आहात हे तुम्ही फोटोआयडेंटिटी दाखवून सिध्द करायला पाहिजे. ते सिध्द करणारी कागदपत्रे त्यासाठी बरोबर नेणे आवश्यक होते. त्याशिवाय तुम्हाला विमानात प्रवेश मिळणार नव्हता. म्हणजे आता ती कागदपत्रे बरोबर बाळगायची आणि परत येईपर्यंत ती काळजीपूर्वक सांभाळायची एक वेगळी जबाबदारी अंगावर आली. माझे नशीब चांगले असल्यामुळे असे पुरावे माझ्याकडे होते. एकादा गणपत गावडे किंवा सखूबाई साळुंखे या बिचा-यांनी काय करायचे?

विमानाने प्रवास करायचा म्हणजे पाहिजे तेवढे हवे ते सामान बरोबर नेता येत नाही. 'चेक्ड इन बॅगेज'मध्ये काय ठेवायचे आणि केबिनमध्ये बरोबर काय काय नेता येते याचे कडक नियम नीट समजून घेऊन त्यांचे पालन करावे लागते. 'सुरक्षा जाँच' करतांना आक्षेपार्ह असे कांही आढळले तर ते सरळ कच-याच्या टोपलीत टाकतात. जास्तच संशयास्पद असे कांही सांपडले तर मग तुमची धडगत नाही. मग प्रवास बाजूला राहील आणि तपासाचे शुक्लकाष्ठ मागे लागेल. आम्हाला तसे फारसे ओझे न्यायचेच नसल्यामुळे कांही अडचण नव्हती. फक्त औषधे, कागदपत्रे वगैरे अत्यावश्यक गोष्टी तेवढ्या केबिन बॅगेजमध्ये ठेऊन बाकीचे सगळेच सामान चेक इन करायचे ठरवले. मुंबईहून मे महिन्यात कुणाकडे जायचे म्हणजे फळांच्या राजापेक्षा चांगली दुसरी कोणती गोष्ट नेणार? त्यामुळे देवगडच्या उत्तम दर्जाच्या हापूस आंब्याची एक पेटी घेतली खरी, पण ती न्यायची कशी? केबिन बॅगेजमध्ये ती लहान मुलासारखी हातात सांभाळून नेता आली असती पण त्याला परवानगीच नसेल तर काय करायचे? तिचा तो पुठ्ठ्याचा नाजुक खोका चेक-इन करण्यासाठी बेल्टवर ठेवल्यानंतर पुढे ठिकठिकाणी तो कसा हाताळली जाणार आहे हे सांगता येत नाही. त्यामुळे अखेरपर्यंत शाबूत राहून बंगलोरला पोचल्यावर आपल्याला तो व्यवस्थित परत मिळेलच याची शाश्वती नव्हती. शिवाय याच कारणामुळे विमान कंपनीने तो घेण्याचेच नाकारले तर काय करा? ज्या दिवशी आम्ही प्रवासाला निघालो त्या दिवसाच्या सगळ्या वर्तमानपत्रात जयपूरला झलेले भीषण बाँबस्फोट आणि त्यामुळे सगळीकडे बाळगली जात असलेली अधिकच कडक सिक्यूरिटी यांबद्दलच्या बातम्या होत्या. त्यामुळे वातावरणात जास्तच तणाव होता. अखेर त्या पेटीला एका मोठ्या घडीच्या पिशवीमध्ये घुसवून त्याला चारी बाजूंनी नायलॉनच्या जा़ड दोरीने करकचून आवळून त्याचे बोचके तयार केले. फक्त त्याला एक कुलुप लावणे तेवढे बाकी होते. त्याबद्दल कोणी आक्षेप घेतला नाही आणि ते चेक-इन सामनात पट्टयावर आरूढ होऊन पुढे गेले.

स्वस्तातल्या विमानाच्या प्रवासात कसल्याही सुखसोयी नसतात असे मोघम ऐकले होते. कुठली तरी जुनाट सेकंड हँड विमाने स्वस्तात विकत घेऊन, त्यांची थोडी डागडुजी करून स्वस्तातल्या उड्डाणासाठी ती वापरतात, त्यामुळे ती नेहमी नादुरुस्त होत राहतात आणि वेळापत्रकाप्रमाणे सहसा ती उडत नाहीत असे कोणी म्हणाले आणि कोणी तर त्यात हवाई सुंदरीच नसतात असेही सांगितले. त्यामुळे या प्रवासाबद्दल मनात थोडी धागधुग वाटत होती. पण ज्या अर्थी ती विमाने कोसळल्याच्या बातम्या रोज रोज येत नाहीत त्या अर्थी ती पुरेशी सुरक्षित तरी नक्कीच असावीत असे वाटत होते. पण आमचे विमान तर चक्क ब-यापैकी नवे एअरबस ए ३२० होते आणि ते ठरलेल्या वेळेच्या आधीच मुंबईहून निघाले. विमानात हवाई सुंदरींचा मोठा ताफा नसला तरी आमच्या विभागात एक हंसतमुख युवक आणि एक चुणचुणीत युवती होती. इतक्या मोठ्या प्रमाणावर विमानकंपन्या निघाल्यावर त्यातल्या सगळ्यांना तितक्या लावण्याच्या खणी कोठून मिळणार आहेत? थोडे सौंदर्यप्रसाधन करून आणि सफाईदार बोलण्या वागण्याच्या सरावाने त्यांना एक प्रसन्न असे व्यक्तीमत्व प्राप्त होते आणि सेवावृत्ती, तत्परता, कार्यकुशलता वगैरेचे कसून प्रशिक्षण त्यांना दिले जात असावे.

डेक्कन एअरच्या 'नो फ्रिल्स'चा अनुभव तसा सुरुवातीपासूनच आला. सरसकट सर्व प्रवाशांना लिमलेट, चॉकलेटच्या गोळ्या, कापसाचे बोळे, स्वागतार्थ शीतपेय वगैरे वाटण्याच्या पूर्वापार पध्दतीला पूर्णपणे चाट देण्यात आला होता. उन्हाळ्याचे दिवस असल्याने प्रवासात सगळ्यांना तहान लागणार होती. ती भागवण्यासाठी पिण्याच्या पाण्याची छोटी बाटली तेवढी मिळाली. आधी प्रत्येक प्रवाशांना त्यांची निवड विचारून सर्वांना नाश्ता देणे आणि नंतर रिकाम्या प्लेट्स गोळा करणे हे एक केबिन क्र्यूचे मोठे काम असते. आमच्या विमानात एका छोट्याशा ट्रॉलीवर सँडविच, पेस्ट्रीसारखे दोन तीन खाद्यपदार्थ, चहा कॉफी आणि थंड पेये ठेवून ती फिरवण्यात आली. त्यातून आपल्याला हव्या त्या गोष्टी रोख पैसे मोजून विकत घ्यायच्या होत्या. त्यांच्या अवाच्या सवा किंमती पाहून फारसे कोणी त्या विकत घेत नव्हते. "त्याला एवढं कसलं सोनं लागलं आहे ते पहावं तरी" असे म्हणत आम्ही एक सँडविच विकत घेतले आणि दोघांनी ते वाटून खाल्ले. "यापेक्षा आपण आपल्या घरी किती चविष्ट सँडविच बनवतो" अशी आमच्या मनात उठलेली प्रतिक्रिया आमच्या चेहे-यावर स्पष्ट दिसत असेल.

नाश्त्याचे काम पटकन आटोपल्यामुळे केबिन क्र्यूला भरपूर मोकळा वेळ होता. त्या वेळात त्यांनी कांही शोभेच्या, कांही उपयोगाच्या आणि कांही चैनीच्या अशा दहा बारा वस्तू ट्रॉलीवर ठेवून लिलावासाठी फिरवल्या. त्यासाठी प्रवाशांनी एका कागदावर आपली बोली लिहून द्यायची. सर्व कागद गोळा केल्यानंतर ज्या वस्तूसाठी ज्या प्रवाशाची बोली सर्वात अधिक असेल त्याने ती वस्तू तेवढ्या किंमतीला विकत घ्यायची. त्यातल्या कांही वस्तू माझ्याकडे आधीच असल्यामुळे त्याची गरज नव्हती, माझ्याकडे ज्या नव्हत्या त्या माझ्या कांही कामाच्या नव्हत्या आणि कांही वस्तू पाहून तर त्यांचे काय करायचे तेच समजत नव्हते. बहुतेक वस्तूंच्या लिलावातील बोली लावण्यासाठी ठेवलेली कमीत कमी किंमतच आंवाक्याबाहेर वाटत असल्यामुळे उगाच गंमत म्हणून हा खेळ खेळण्यात अर्थ नव्हता. त्यामुळे मी कशावरच बोली लावली नाही.

विमानात काय चालले आहे हे पाहण्यात थोडा वेळ गेला, थोडा पेपर वाचण्यात आणि उरलेला त्यातले सुडोकू कोडे सोडवण्यात. ते कोडे सुटत आले होते तेवढ्यात विमान खाली येऊ लागले आणि एक दोन गिरक्या घेऊन बंगलोरच्या एचएएल विमानतळार उतरले. या विमानतळाचे हे बहुधा माझे शेवटचेच दर्शन असावे. बंगलोरजवळ देवनहळ्ळी इथे बांधलेला नवा अद्ययावत विमानतळ सुरू होऊन सर्व उड्डाणे आता तिथून निघणार आणि तिथेच उतरणार असल्याची बातमी आधीच पसरली होती. आमचे विमान ठरलेल्या वेळेआधीच उडाले होते आणि दहा मिनिटे आधीच बंगलोरला पोचलेसुध्दा. म्हणजे डेक्कन एअरने त्यांचे काम चोख बजावले होते. पण विमानतळावरील कर्मचारी सहकार्य करीत नव्हते की त्यातले बरेचसे लोक नव्या विमानतळाचे काम पहायला तिकडे गेले होते कोण जाणे, आमचे सामन कांही येता येत नव्हते. त्या वेळेला दुसरे कोठलेही विमान तिथे उतरलेले नव्हते त्यामुळे फक्त आमच्या विमानातले प्रवासीच सामानाची वाट पहात उभे होते आणि ते सुध्दा सगळे मिळून फार फार तर चाळीस पन्नास लोक असतील. बाकीचे प्रवासी हातातल्या बॅगा घेऊन बाहेर चालले गेले होते. म्हणजे विमानात असे कांही फार सामान नसणार. तरीही विमानतून उतरवून घेऊन ते अर्ध्या तासानंतर फिरत्या पट्ट्यावर आले आणि गोगलगायीच्या गतीने येत राहिले.

बंगलोरहून मैसूरला जाण्यासाठी गाडीची सोय केलेली होती. बाहेर आमचा चालक 'घोरे' असे नांव लिहिलेला फलक हांतात घेऊन उभा होता. तो आमच्यासाठीच असणार हे मी त्याला पाहतांच ओळखले. यापूर्वीसुध्दा 'गारे', गोरे', 'घाटे', 'घासे' वगैरे आडनांवे मला मिळालेली आहेत. एकदा तर मला 'घोष' करून टाकले होते आणि 'गर्ग' नांवाच्या माझ्या सपका-याला 'जॉर्ज'. इतकेच नव्हे तर त्याला फॉरेनर समजून त्याच्यासाठी वातानुकूलित लिमोसिन पाठवलेली होती. पण गोरा साहेब न आल्याचे पाहून तिचा ड्रायव्हर आपली गाडी रिकामीच परत घेऊन गेला. 'घोष' साहेबासाठी आलेल्या गाडीने आम्हा दोघांना गेस्टहाउसपर्यंत पोचवले. आता दूरसंचारव्यवस्थेत प्रगती झालेली असल्यामुळे आम्हाला न्यायला आलेल्या गाडीचा नंबर, रंग, त्याची मेक, ड्रायव्हरचे नांव, त्याचा मोबाईल फोन नंबर वगैरे सर्व इत्थंभूत माहिती मुंबईहून निघण्यापूर्वीच मिळालेली होती. त्यामुळे त्याला शोधता आले असते. पण त्याची गरज पडली नाही.

दुपारची वेळ असल्यामुळे बंगलोरचे रस्ते तुडुंब भरलेले नव्हते, पण ते रिकामेही नव्हते. त्यामुळे शहरातले रस्ते पार करून बाहेर पडण्यातच पाऊण तास गेला. ट्रॅफिक जॅम असता तर आणखी किती वेळ लागला असता कोण जाणे. बंगलोर ते मैसूरचा हमरस्ता मात्र फारच सुरेख आहे. रस्त्यात कसलेही खाचखळगे किंवा अडथळे नाहीत आणि दोन्ही बाजूला मे महिन्यातसुध्दा हिरवी गर्द अशी वनराई. मध्येच एकादा गुलमोहर लाल चुटुक फुलांनी बहरलेला दिसायचा. कांही झाडांर पांढ-या किंवा पिवळ्या फुलांची नक्षी दिसायची. अधून मधून लहान मोठी गांवे लागत होती, त्यात दोन तीन ब-यापैकी मोठी होती. तिथे कॉलेजे, हॉस्पिटले वगैरे दिसली. रस्त्यात माणसांची गर्दी होती, पण कुठेही त्यातून जाणारा रस्ता अरुंद झाला नव्हता की त्यात वाहनांची कोंडी होत नव्हती. अपेक्षेप्रमाणे तीन साडेतीन तासात मैसूरला जाऊन पोचलो.

प्रवासलेख

प्रतिक्रिया

अनिल हटेला's picture

26 May 2008 - 10:17 am | अनिल हटेला

मग काय झाल !!!!!

पुढील भागाच्या प्रतीक्षेत !!!!!

स्वाती दिनेश's picture

26 May 2008 - 12:12 pm | स्वाती दिनेश

सुरुवात छान झाली आहे,पुढचे भाग लवकर येऊ द्या..
स्वाती

अभिज्ञ's picture

26 May 2008 - 12:58 pm | अभिज्ञ

वाचतोय्,पुढील भाग येउ द्यात.
अर्थातच छान लिहिलेय हे वे.सां.न.ल.

अभिज्ञ

आंबोळी's picture

26 May 2008 - 1:20 pm | आंबोळी

वाचतोय् ,पुढील भाग येउ द्यात.
अर्थातच छान लिहिलेय हे वे.सां.न.ल.

सहमत

आनंद घारे's picture

28 May 2008 - 9:13 am | आनंद घारे

लवकरच देण्याचा प्रयत्न करीत आहे. धन्यवाद.

आनंद घारे's picture

28 May 2008 - 9:13 am | आनंद घारे

लवकरच देण्याचा प्रयत्न करीत आहे. धन्यवाद.

वरदा's picture

29 May 2008 - 12:23 am | वरदा

मग काय झाल !!!!!

पुढील भागाच्या प्रतीक्षेत !!!!!

प्राजु's picture

29 May 2008 - 12:08 pm | प्राजु

क्रमशः लिहायला विसरलात की काय??

लेख सुंदर... आवडला.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/