शहाण्याने गप्पच बसावे
दीडशहाण्यांनी बजावले
...............................मुर्खांनी विवादात त्याला
...............................दिड शहाणा ठरवले
ह्याला दूरदृष्टी नाही
असे आंधळ्यांना दिसले
...............................बिच्यार्याचा आवाज बसला
...............................मुके ठणाण बोंबलले
कोणाचे ऐकतच नाही
बहिर्यांनी ऐकवले
...............................ह्याचे अंगणच वाकडे
...............................गात लंगडे नाचले
वेड्यांनी वेड पांघरून
पेडगावला पाठवले
...............................चोरांनी उचलून बांधून
...............................तुरुंगात डांबले
इतका का मी वाईट?
त्याने स्वतःला विचारले
...............................मनाच्या आरशात पाहिले
...............................राजहंस रुप दिसले....
प्रतिक्रिया
21 May 2008 - 8:32 am | धनंजय
मोठी कल्पक कविता.
(त्यातल्या त्यात शेवटची ओळ कमजोर वाटते. एवढ्या सशक्त कल्पनेचा शेवट प्रसिद्ध कवितेचे "कोटेशन" करून केलात ते बरे वाटले नाही.)
21 May 2008 - 8:41 am | विसोबा खेचर
मस्त, परंतु वेगळीच कविता..!
अभिनंदन अरूणराव!
तात्या.
21 May 2008 - 8:45 am | अरुण मनोहर
धनंजयजी अगदी मनातल बोलला.
मी ही कविता दोन वर्षांपुर्वी लिहीली. मला शेवटच्या चार ओळीं आवड्ल्याच नाही. त्यानंतर ह्या कवितेच्या त्या चार ओळी बदलण्यासाठी खुपदा विचार केला. पण काहीच जमले नाही. धनंजयांची कौमेन्ट वाचून जुने दुखः पुन्हा भळभळले. ह्या निमित्याने मिपाच्या कवी रसिकांना विनंती करीत आहे. कवितेचा वेधक शेवट कोणी सुचवेल का?
I think I should clarify the central concept of this poem, to find appropriate ending--->
जगात वावरतांना खुपदा असे प्रकर्षाने जाणवते की आपल्यापेक्षा कमी लायक लोकांना खूप काही यश मिळाले आहे. असेच लोक आपल्याला शिकवण देऊन हिणवायलाही कमी करत नाहीत.....
बघुया. मिपावर माझी दोन वर्षांची ख्वाहिश पूर्ण होते का.....
....चातक......
21 May 2008 - 8:52 am | अरुण मनोहर
टंकराक्षसाची गडबड!
...............................ह्याचे अंगणच वाकडे
...............................गात लंगडे नाचले
वाचावे----->
...............................ह्याचे अंगणच वाकडे
...............................गात नाचले लंगडे
21 May 2008 - 10:39 am | आनंदयात्री
अरुणराव नेहमीप्रमाणे वेगळे अन सही, आवडले.
21 May 2008 - 1:10 pm | आनंद
कविता मस्तच आहे.
शेवटच्या चार ओळी काढुन टाकुन कविता तिथेच थांबवली तरी चालेल.
किंवा
शेवट
हे तर असच चालत राहणार आहे.
रामचंद्र सियाला म्हणाले.
------------------------
हा कसा वाटतोय.
---आनंद
21 May 2008 - 11:11 pm | धनंजय
> आपल्यापेक्षा कमी लायक लोकांना खूप काही यश मिळाले आहे. असेच
> लोक आपल्याला शिकवण देऊन हिणवायलाही कमी करत नाहीत.....
ही कल्पना पहिल्या ८ कडव्यात आलेलीच आहे. पण अंत कुठल्या रसात करायचा होता?
१. जगाची ही रीत किती करुण हा रस
२. ही बंधने फोडणार हा वीररस
३. हे समजून उमजून अंतर्मुख असा शांत रस...
तुमच्या दोन वर्षांपूर्वीच्या स्फूर्तीला नीट आठवून त्या प्रकारे अंत करावा.
येथे माझी आशावादी सुचवणी :
--------------------------------------------
तुरुंगातही त्याचे
मन मुक्त राहिले
...............................शहाणे झपाटलेपण
...............................बघ, नाचले, गायले....
--------------------------------------------
पण तुमच्या अनुभवाचा तीव्रपणा, आणि ती स्फूर्ती नसल्यामुळे, माझा सुचवलेला अंत थोडासा मोघम आहे.
22 May 2008 - 12:54 am | चतुरंग
शेवट असा केलात तर ....
नक्की कसा मी?
त्याने स्वतःला विचारले
...............................मनाच्या आरशात त्याला
...............................अदृष्टाचं रुप दिसले....
चतुरंग
23 May 2008 - 7:24 am | अरुण मनोहर
सर्व कल्पनांसाठी आभार.
चतुरंगाचे सजेशन आवडले.
नक्की कसा मी?
त्याने स्वतःला विचारले
"इतका का मी वाईट?
त्याने स्वतःला विचारले" पेक्षा छान आहे.
हा धागा घेऊन शेवट पूर्ण करतो.
नक्की कसा मी?.........त्याने स्वतःला विचारले
जसा तू तसाच तू.........नको मानू प्रमाण उपर्यांचे