राष्ट्रद्रोह आणि प्रसिद्धीलोलुपता
राष्ट्रद्रोह कशाला म्हणावे हा प्रश्नच आहे. सरकारविरोधी बोलणे, कृती करणे हा राष्ट्रद्रोह अर्थातच नाही. परंतु स्टेट, राज्य, विरुद्ध सशस्त्र लढा पुकारणे म्हणजे waging war against the state हा कायद्याने गुन्हा आहे. आता असे आहे की असा लढा पुकारणारा हा त्या कायद्याच्या निर्मितीलाच आव्हान देत असतो. त्याने केवळ एक कायदा मोडलेला आहे. या दृष्टीने त्याला राष्ट्रद्रोही म्हणावे तर बाकीचे कायदे मोडणारे पण राष्ट्रद्रोही होतात असे म्हणावे लागेल. त्यामुळे एखादा कायदा मोडणे हा काही राष्ट्रद्रोह म्हणता येणार नाही. नक्षल तर म्हणतात की आम्ही राष्ट्राच्या भल्यासाठीच शस्त्र हातात घेतले आहे. सध्या राष्ट्राचे नियंत्रण करणारी व्यवस्थाच त्यांच्यामते राष्ट्रद्रोही आहे. रॉय बाई म्हणतात की प्रचलित व्यवस्थाच घटनेचे नीट पालन करीत नाही. मग त्या व्यवस्थेला आव्हान देणारे लोक तर घटनेच्या नीट पालनाकरताच लढत आहेत. पुन्हा, राष्ट्र कशाला म्हणावे हे स्पष्ट नाही, एकमत नाही. भारत हे एक राष्ट्र आहे की अनेक हा अजून एक वादाचा विषय. त्यामुळे बाई (किंवा कुणीही) राष्ट्रद्रोही की कसे याविषयी काहीही बोलणे मला योग्य वाटत नाही. (राष्ट्र म्हणजे सकल भारतीय लोक अशा अर्थाने तर मला नक्षलही राष्ट्रद्रोही असावेत का असा प्रश्नच पडतो. चुकीचे अर्थातच वाटतात. अयोग्य मार्गाने सत्तासंघर्ष करणारे आहेत, झालं. हिंसात्मक मार्गामुळे घातक अर्थातच आहेत.)
प्रसिद्धीलोलुपतेविषयी. समजा बाई असल्या प्रसिद्धीलोलुप, तरी त्याने काहीच बिघडत नाही. प्रसिद्धीची हौस असणे बेकायदाही नाही आणि अनैतिकही नाही. निव्वळ प्रसिद्धीसाठी एखादी गोष्ट करत असतील तर त्याने त्यांचे आणि त्यांच्या विचारांचे गांभीर्य आपोआपच कमी होईल. अर्थात, मला त्या प्रसिद्धीलोलुपही वाटत नाही. निव्वळ प्रसिद्ध होण्यासाठी त्यांना अभ्यास करण्याची आणि वणवण भटकण्याची मेहनत करण्याची गरज नाही. अशाही सेलिब्रिटी आहेत. काहीही वेडेवाकडे बोलून झोतात राहणे त्यांना अवघड नाही.
नक्षलवादाविषयी
समस्या आहेत, वंचना आहेत, म्हणून ही व्यवस्थाच बदलायची हा विचार आततायी आहे. ज्या लोकांना, समाजाला घेऊन ही व्यवस्था चालवायची आहे, त्याच लोकांना घेऊन कोणतीही व्यवस्था चालवावी लागणार आहे. समाजातच काही समस्यांची, वंचनांची मुळे असतील तर व्यवस्थेच्या विरुद्ध शस्त्र धरल्याने त्या समस्या कशा काय दूर होतील हे मला समजत नाही. व्यवस्थेत काही दोष असतील, आणि त्यामुळे जर वंचना/ समस्या असतील, तर त्यासाठी आवश्यक ते सुधार झाले पाहिजेत. नक्षलवाद समस्या सोडवण्याऐवजी समस्या वाढवतो. कारण समस्या वाढणे हे त्या वादाला पोषक आहे. समस्या जेवढ्या वाढतील, तेवढे व्यवस्था नाकारायचे समर्थन अधिकच होते. समस्या सुटत गेल्या, वंचना कमी होत गेल्या तर व्यवस्थेचे क्रेडिट वाढते. म्हणूनच नक्षलग्रस्त भागाचा विकास होणे अवघड ठरते. वनाधिकार कायद्याला नक्षलांचा म्हणूनच विरोध असतो. आदिवासींना अधिकार दिले नाहीत तरी ओरडायचे. दिले तरी ओरडायचे. वनाधिकार दिले तर ते म्हणतात, हे कोण आदिवासींना अधिकार देणारे? मुळात सगळीच जंगल जमीन आदिवासींची. मग हे उपकार केल्यासारखे आदिवासींना जमिनीचे छोटे छोटे तुकडे कशाला देताय? हे असं.
रॉय सारख्या मंडळींना हे समजत नसेल असे वाटत नाही. तरीही रोमॅंटिसाइझ करुन नक्षलांचे, त्यांच्या लढ्याचे वर्णन करतात. व्यवस्थेतील दोष दाखवून देणे स्वागतार्हच आहे, आवश्यक आहे. त्यांनी पर्यायी उत्तरे द्यायला हवीत असेही काही नाही. परंतु व्यवहार्य उत्तरांची चर्चा खचितच करु शकतात. त्याऐवजी त्या सरळ असा निष्कर्ष काढतात की अन्य कोणताही पर्याय राहिलेला नाही, आणि व्यवस्थेत बदल अपरिहार्य आहे. त्यासाठी नक्षलवादाला समर्थन. त्या काही एक ठिकाणी अहिंसात्मक मार्गाची टवाळीही करतात. बंदूक घेऊन फिरणाऱ्या (त्यांच्या भाषेत इनोसण्ट - भाबड्या) आदिवासींना इंटर्नल सेक्युरिटी थ्रेट संबोधणाऱ्या गृहमंत्र्यांवर औपरोधिक शैलीत नाराजी व्यक्त करतात. परंतु या भाबड्या आदिवासींचे नक्षल नेतृत्व शोषण करत असेल असे त्यांना चुकुनही वाटत नाही. ध्येयाने प्रेरित होऊन स्वत:च्या मालकीच्या अरण्यात स्वतंत्रपणे हे लोक फिरतात, इथे पोलीसांची सत्ता चालत नाही, असे वर्णन करतात; जसे काही गावागावात राहणारे आदिवासी पारतंत्र्यातच रहात आहेत. नक्षलांच्या आज्ञेत असलेले आदिवासी तरी त्यांना स्वतंत्र कसे वाटतात याचे उत्तर त्यांना देता येईल असे वाटत नाही. नक्षलवाद अजून एका पातळीवर धोकादायक आहे, त्यांना परदेशातून मिळणाऱ्या शस्त्रसहाय्यामुळे. इथे देशाच्या सुरक्षेला नक्कीच धोका पोहोचतो. पण तो भाग तूर्त आपण सोडून देऊ.
नक्षल चालवत असलेल्या शाळेविषयी. तथाकथित मोबाईल स्कूल. त्याला बाई मोबाईल स्कूल म्हणत असल्या तरी ती शाळा आहे असे म्हणता येणार नाही. लिहायला वाचायला शिकवतात. तेवढेच. जसे काही शाळा म्हणजे फक्त लिहायला आणि वाचायला शिकवणे. तेही कशासाठी, तर नक्षल साहित्य वाचता यावे म्हणून. असे कुणी म्हणेल म्हणून बाई लगेच त्यांच्या औपरोधिक शैलीत तसे म्हणतातही – बघा, या शाळांना इन्डॉक्ट्रिनेशन स्कूल म्हणतात, भांडवलशाही ज्या जाहिरातींचे इन्डॉक्ट्रिनेशनचे स्कूल चालवते ते बरे चालते. आता जाहिरातींचे इन्डॉक्ट्रिनेशन वाईट आहे म्हणून नक्षली इन्डॉक्ट्रिनेशन कसे काय चांगले ठरते? आणि स्कूलच चालवायचे असेल तर ते मोबाईल कशासाठी? नक्षलांनी ज्या शाळा आहेत, सरकारच्या, त्यादेखील नीट चालवू दिल्या तरी त्यांचे फार मोठे उपकार होतील. लोकांवर, आदिवासींवर.
त्यांना आदिवासी शिकलेले नकोच आहेत. आदिवासींनी “आदिवासीं” सारखेच रहावे, म्हणजे शिकलेल्या शहरी दुटप्पी नक्षली नेतृत्वाला निमित्त आणि संख्याबळ मिळत राहील. “गाव छोडब नाही” सारख्या गाण्यांचे चित्रण करायला कलाकार मिळतील. शिकलेला आदिवासी कशाला म्हणेल, मी गाव सोडणार नाही! तो पहिला गाव सोडून इतरत्र संधी शोधील.
लेखामध्ये बाई नक्षलांनी बांधलेल्या एखाददुसऱ्या तळ्याचा उल्लेख करतात. जी हजारो तळी बांधण्याच्या सरकारच्या योजना असतात त्याविषयी चकार शब्द नाही. त्या असे म्हणाल्या तरी समजण्यासारखे आहे – “सरकार कागदावर बऱ्याच योजना करीत असते, पण प्रत्यक्षात भ्रष्टाचारामुळे ही तळी, रस्ते, शाळा, दवाखाने अस्तित्वात येत नाहीत.” ठीक आहे. पण त्या तसे न म्हणता म्हणतात, सरकार काहीच करत नाही. इंटिग्रेटेड ऍक्शन प्लॅन विषयी बाईंना माहीत नसेल असे नाही. त्याविषयी चकार शब्द नाही. या विभिन्न योजना आदिवासींपर्यंत नीट पोहोचाव्या म्हणून जर नक्षल लढत असतील, तर माझे असे मत आहे, की तुम्ही आम्हीच काय, सरकारनेही नक्षलांना पाठिंबा द्यावा. नक्षली आव्हानाचा सामना करण्यासाठी सरकारने ऑपरेशन ग्रीन हंट सुरु केले त्याचा रॉय आणि तत्समांनी कडकडीत निषेध केला. परंतु त्यासोबत इंटिग्रेटेड ऍक्शन प्लॅन मध्ये सरकारने ओतलेले साठ जिल्ह्यांमधील प्रत्येकी पंचावन्न कोटी रुपये आठवले नाहीत. भ्रष्टाचाराचे आरोप करण्यासाठीही नाही. कारण अगदी सगळेच्या सगळे पैसे राजकारण्यांनी आणि नोकरशाहीने खाल्ले असे म्हणले तरी आदिवासी भागासाठी सरकार काही विचार करते हे मान्य करावे लागले असते.
पोलीस इन्फॉर्मर म्हणून जाहीर करुन नक्षल कुणा सरपंचाला, कुणा स्थानिक नेत्याला गोळ्या घालतात. असे एक उदाहरण दाखवावे, की नक्षलांनी भ्रष्ट आहे म्हणून एखाद्या नेत्याला, अधिकाऱ्याला गोळ्या घातल्या असतील. शाळेत हजर रहात नाही म्हणून एखाद्या शिक्षकाला धमकावले असेल. दवाखान्यात येत नाही म्हणून एखाद्या डॉक्टरला दमात घेतले असेल. नाही. ते असे करणार नाहीत. कारण दवाखाने, शाळा, त्यांच्या नाहीतच मुळी. त्या नीट चालल्या तर त्यांना कोण विचारील? भ्रष्टाचार त्यांच्या पथ्यावर पडणारा आहे. एकेक स्कॅम बाहेर येईल तसतसे ते खुशच होणार आहेत. स्कॅम बाहेर आले म्हणून नाही, तर स्कॅम “झाले” म्हणून. व्यवस्था जेवढी सडेल तेवढे चांगलेच आहे. नक्षलग्रस्त भागात म्हणूनच भ्रष्टाचाराचे प्रमाण प्रचंड आढळते. (प्रत्यक्षात ते स्वत:ही या भ्रष्टाचाराचे भागीदार असतात. पण ते सोडा. सैद्धांतिक पातळीवर पाहिले तरी नक्षलवाद भ्रष्टाचाराला पोषकच आहे.)
बिनायक सेनांना अडकवणाऱ्या न्यायव्यवस्थेचे वाभाडे सगळ्या जगाने काढले. पण जनता अदालत नावाची कांगारु कोर्टे भरवून नक्षली गावोगाव सरेआम लोकांना शिक्षा देतात, झाडाला डांबून गुरासारखे बडवतात, मुलांबायकांसमोर गोळ्या घालतात, तेंव्हा त्या मरणाऱ्या आदिवासीला त्याचे काहीच मानवी अधिकार नसतात. त्याचा कैवार पीयूसीएलला घ्यावा वाटत नाही. पण कुणी नुसते म्हणाले, की पोलीसांनी आदिवासी किशोरीवर बलात्कार केला, की शहानिशा न करताच ते सत्य गृहीत धरुन सरकारला धारेवर धरले जाते. (पोलीसांची पाठराखण करण्याचा उद्देश नाही.)
विनील कृष्णासारखा अधिकारी जिवाची पर्वा न करता नक्षली गढात खोल जातो, नक्षल त्याला पकडून नेतात, तेव्हा त्याच्या मानवी अधिकारांचा कैवार पीयूसीएलला घ्यावा वाटत नाही. बहुदा त्यावेळी तो व्यवस्थेचा मान्यवर गुलाम असतो. त्याचे अपहरण झालेच पाहिजे. जमलेच तर जीवही गेला पाहिजे. त्याशिवाय शोषितांची क्रांती यशस्वी कशी होणार? त्याच्या अपहरणाच्या निषेधासाठी आदिवासी रस्त्यावर येतात, (नंतर इन्फॉर्मर म्हणून जीवही गमावतात), पण तरीही तो भांडवलदारांचा दल्लाच असतो कदाचित. त्याच्यात रॉयबाईंना “होप” दिसत नाही. रॉय यांचे “तत्सम” हे विनीलच्या सुटकेच्या बदल्यात नक्षली हिंसकांना सोडवण्यासाठी मध्यस्थी करतात. कारण “होप” जिवंत राहण्यासाठी नक्षल क्रांतिकारक मोकळे राहिले पाहिजेत. त्याशिवाय आदिवासींना त्यांच्या मालकीच्या अरण्यात स्वतंत्र श्वास घेता येणार नाही.
नक्षली तत्वज्ञान हिंसाधारित आहे, तिथे सुधारणेला वाव नाही. मुख्य म्हणजे माओच्याच जन्मभूमीत त्याचे अपयश अधोरेखीत झालेले आहे. माओने चीनमधील प्रश्न सोडवणे सोडा, सोपे केल्याचाही इतिहास नाही. पर्याय एवढाच आहे – ती वाईट व्यवस्था की ही वाईट व्यवस्था. ही वाईट व्यवस्था त्यातल्या त्यात दगडापेक्षा वीट मऊ, कारण इथे तोंड उघडायला परवानगी तरी आहे. ज्या कॉम्रेड कमला चे त्या आशा म्हणून वर्णन करतात तिच्यात त्यांना शोषित तरुणी दिसत नाही. प्रचलित व्यवस्थेतही कमला शोषितच राहिली असती कदाचित; पण प्रचलित व्यवस्थेत तिला आदिवासी निवासी शाळेत जायचा पर्याय होता, निवासी शाळेत नसती गेली तर रोज शाळेत जायला एक नवी सायकल मोफत मिळाली असती. निवासी शाळेत दरमहा वेणीफणीला सरकारकडून पैसे मिळाले असते. सॅनिटरी नॅपकिन्सदेखील मिळाले असते, मोफत. भूमीहीन असती तर जमीन मिळण्याचा पर्याय होता, घर नसते तर घर मिळण्याचा पर्याय होता, कुठेतरी शिक्षिका, अंगणवाडी सेविका, पॅरामेडिक होण्याची संधी होती. त्य़ा त्या भागातील ही कामे करणारे सर्व तरुण तरुणी हे त्या भागातीलच आदिवासी असतात, कुणी दुसरे नसतात. लग्नानंतर गरोदरपणी तिला घरपोच पोषक आहार मिळाला असता. तिच्या बाळाला पहिली तीन वर्षे पोषक आहार मिळाला असता. शाळेत चमकली असती तर आरक्षण मिळवून डॉक्टरही झाली असती. (आरक्षण न घेताही होऊ शकेल म्हणा). कुणी म्हणेल हे सगळे सरकारी कागदावरच असते; असेलही कदाचित; पण तरीही शंभरातील वीस-पंचवीस कमलांना तरी ही संधी निश्चितच असते. दुर्गम भागांत स्वत:च्या सोयींची पर्वा न करता काम करत राहणारे अपवादात्मक का होईना डॉक्टर्स असतात, शिक्षक असतात, ते खरी आशा आहेत, आदिवासींसाठी, भारतासाठी, आपल्या सर्वांसाठी. कमलासारखे शोषित अभागी जीव नव्हे. अबोध कमला स्वेच्छेने गेली असेलही नक्षल कळपात, पण तिचा चॉइस इन्फॉर्म्ड चॉईस नाही. कमला ही ट्रॅजेडी आहे. हृदय पिळवटणारी ट्रॅजेडी आहे. तिच्या हसऱ्या फोटोने सत्य बदलत नाही. तिला आशा म्हणणे क्रूर आहे.
रॉय आणि तत्सम हे विचारी लोक आहेत. भ्रष्ट म्हणून त्यांचा दुर्लौकिक नाही. त्यांना, बिनायक सेन, या मंडळींना खरोखर दैन्य, दारिद्र्य, अन्याय याविषयी चीड आहे असे मानायला वाव आहे. अभ्यास आहे, समाजावर प्रभाव आहे, शब्दांमध्ये ताकत आहे. रॉय सारख्यांची ही जबाबदारी आहे, की सडणाऱ्या व्यवस्थेवर आघात करण्यासोबतच, संभाव्य अराजकतेतून निर्माण होणाऱ्या पोकळीमध्ये नक्षली तत्वज्ञानाला थारा मिळू नये यासाठी आहे ती व्यवस्था नीट करण्यासाठी चाललेल्या प्रयत्नांना बळ दिले पाहिजे.
अर्थात, रॉय आणि त्यांच्यासारख्यांना या जबाबदारीचे भान नाही असे खेदाने म्हणावेसे वाटते. माझ्या मते त्या राष्ट्रद्रोही नाहीत, प्रसिद्धीलोलुपही नाहीत. परंतु बेजबाबदार नक्कीच आहेत.
प्रतिक्रिया
23 Jun 2011 - 11:41 pm | आंबोळी
खुप आवडला हा लेख राजे.....
रॉयबाईंपर्यन्त पोचवता आला तर बघा जरा....
24 Jun 2011 - 12:02 am | आनंदयात्री
थोडक्यात नक्षलवाद जिवंत ठेवण्याचा हरतर्हेने प्रयत्न केला जातोय आणि नक्षलवाद्यांचा लोकांना दाखवण्याचा मार्केटिंग अजेंडा आणि अॅक्चुअल अजेंडा वेगवेगळा आहे.
खरेच आहे म्हणा, जयंत उमराणीकर गेल्या दिवाळीच्या अक्षर मध्ये म्हणतात "कोणतीही क्रांति ४० वर्षे चालत नसते" !!
हा लेखही आवडला, माहितीपुर्ण आहे.
28 Jun 2011 - 12:49 am | आळश्यांचा राजा
अनेक लोकांच्या मते भारताचा स्वातंत्र्यलढा नव्वद वर्षे चालला होता. (१८५७ ते १९४७). नक्षलांचे प्रोट्रॅक्टेड वॉर आहे. त्यांच्या मते त्यांची क्रांती यशस्वी होईपर्यंत चालू शकते. मग कितीही वर्षे का लागीनात. बादवे तो लेख जालावर आहे काय?
29 Jun 2011 - 12:01 am | आनंदयात्री
>>अनेक लोकांच्या मते भारताचा स्वातंत्र्यलढा नव्वद वर्षे चालला होता.
बरोबरच आहे, तो स्वातंत्र्यलढा होता. क्रांति म्हणजे तुलनात्मकरित्या लहान कालावधीत होणारी घटना जी प्रिप्लॅन असण्यापेक्षा उत्स्फुर्त अशी घडते किंवा तशी ओळखली जाते (असे वाटते). या पार्श्वभुमीवर मला उमराणीकरांचे वाक्य फार चपखल वाटते, आणि तुम्ही दिलेल्या विवेचनाचा अर्थ मी वर लिहिला आहे तसा घेतो.
>>बादवे तो लेख जालावर आहे काय?
जालावर अंक सापडला नाही. पुस्तकविश्ववर या अंकाची थोडक्यात ओळख वाचायला मिळेल. याच अंकात अरुंधतीबाईंचा "होय मी रोमँटिक आहे" हा लेखही वाचनीय आहे. एकंदरीत अंकच नक्षलवाद याविषयाला वाहिलेला असून वाचनीय आहे.
24 Jun 2011 - 1:41 am | राजेश घासकडवी
लेख आवडला. काहीशा उद्विग्नपणे लिहिलेला आहे, पण आवडला.
सर्वप्रथम तुम्ही राष्ट्रद्रोही, प्रसिद्धीलोलुप वगैरे मुद्दे निकालात काढले हे बरं झालं. लोकांच्या कृतीतून व विचारांतून खरोखरच समाजसुधारणा होत असेल तर वैयक्तिक हेतू काहीही असले, तरी फरक पडत नाही, पडू नये.
व्यवस्था चालत नाही त्यामुळे ती मोडूनच टाकावी, फेकून द्यावी हे क्रांतिकारकांचं ब्रीदवाक्य आहे. हा उपाय पाठिंबा देण्यासाठी सोपा असतो, अमलात आणायला कठीण. व्यवस्था सुधारावी यासाठी प्रयत्न करणं हेदेखील कठीणच, पण त्यातून झटपट यश मिळत नाही. राहुल द्रविड प्रमाणे रन्स काढायला चिकाटी लागते, युसुफ पठाण होऊन दर बॉलला सिक्सर मारून रनरेटमध्ये क्रांती करण्याच्या प्रयत्नांना झळाळी मिळते.
बिल गेट्सने आपला बराचसा पैसा दान केला, तेव्हा या पैशातून नक्की काय काय करता येईल याबद्दल अनेक जण काय काय बोलले. मात्र एक लेख लक्षात आहे. लेखकाने म्हटलं होतं 'अरे, पन्नास बिलियनने एवढं काय होणार आहे मोठंसं? अमेरिकन सरकार दरवर्षी शेकडो बिलियन जनतेच्या भल्यासाठी खर्च करते. ते पैसे योग्य रीतीने खर्च होतात की नाही हे तपासून पहाण्यासाठी यंत्रणा बनव फक्त. जर त्या खर्चाची एफिशियन्सी दोनचार टक्क्यांनी वाढली तरी प्रचंड फरक पडेल.' मुद्दा असा आहे की व्यवस्था सुरळीत चालवण्यासाठी अशा फीडबॅक सिस्टिम्स आवश्यक असतात. ही मोडून स्वतंत्र काहीतरी निर्माण करण्यापेक्षा आहे ती दुरुस्त करणं फायद्याचं ठरू शकतं.
एकदा हे सगळं वाईट, व ते मोडूनच टाकलं पाहिजे असा ठाम विश्वास बसला की मग वैचारिक दुटप्पीपणा सुरू होतो. सुरक्षा व सुव्यवस्थेची जबाबदारी नक्षलांवर आली की त्यांची जी व्यवस्था असेल ती आत्ताच्या व्यवस्थेपेक्षा कितपत वेगळी होईल असाही प्रश्न पडतोच.
सरकारतर्फे मिळणाऱ्या सोयींविषयी तुम्ही लिहिलेलं आहे. याबाबतीत अधिक विस्ताराने लिहावं अशी विनंती. इथे
असं म्हणता ते खूपच बचावात्मक वाटतं. असा फायदा घेऊन पुढे आलेल्या कमलांविषयी लिहा. इंटिग्रेटेड अॅक्शन प्लॅनविषयी विस्ताराने लिहा. जनता अदालत विषयीही लिहा.
हे वाक्य खूप काही सांगून जातं.
24 Jun 2011 - 7:25 am | सहज
पटण्यासारखाच लेख.
24 Jun 2011 - 9:23 am | विवेक मोडक
>रॉय आणि तत्सम हे विचारी लोक आहेत. भ्रष्ट म्हणून त्यांचा दुर्लौकिक नाही. त्यांना, बिनायक सेन, या मंडळींना खरोखर दैन्य, दारिद्र्य, अन्याय याविषयी चीड आहे असे मानायला वाव आहे<
रॉय आणि विनायक सेन यांना एकाच पातळीवर आपण तोलु शकतो? शहरात राहुन बोलणं आणि त्या भागात राहुन कार्य करणं वेगळं आहे असं मला वाटतं
28 Jun 2011 - 12:45 am | आळश्यांचा राजा
त्या भागात राहून कार्य करणारा माणूस अधिक परिपक्व विचार करु शकतो एवढाच फरक आहे. करेलच असे काही नाही. काही वेळा शहरात राहून बोलणारा माणूस हा त्या भागात कार्य करणार्या माणसापेक्षा अधिक समज राखून असू शकतो. अर्थात मला रॉय आणि सेन यांची तुलना करायची नाहीये. दोघेही व्यवस्थेच्या विरोधात, समाजातील दैन्य, दारिद्र्य यांच्या संदर्भात, सखोल अभ्यास करुन बोलत असतात हे नाकारता येत नाही.
24 Jun 2011 - 11:41 am | विसुनाना
लेख उत्तमच आहे. शिवाय आदिवासी अथवा अन्य कोणत्याही शोषित वर्गाला न्याय मिळाला पाहिजे याबाबत दुमत नाही. किंबहुना सद्यव्यवस्था जर व्यवस्थित झाली तर अनेक प्रश्न आपोआपच सुटतील असे वाटते.
लेखकाने नक्षलवादाबद्दल अजूनही खोलात उतरायला हवं. नक्षली चळवळीचा एक एक पापुद्रा सुटा करणारी लेखमाला यावी असे वाटते.
मला नेहमी कोडे पडते ते असे की नक्षली चळवळीने कोणता फायदा होतो आणि कोणाला होतो?
या प्रश्नाचे थेट उत्तर मिळत नाही.
कुणाचाच फायदा होत नसेल तर ही चळवळ सुरू कशी राहते? त्यासाठी केवळ शस्त्र बाळगण्याचा आणि त्याच्या जोरावर अन्य समाजाला कह्यात ठेवण्याचा उन्माद पुरेसा आहे काय?
(ही सुद्धा एकप्रकारची सत्तेची नशा आहे काय?)
25 Jun 2011 - 12:11 am | श्रावण मोडक
हे दुपारी लिहिले - वाचतो आहे. विचार करावयास लावणारे लेखन.
आता हा सविस्तर प्रतिसाद -
आरांच्या अनेक मुद्द्यांशी (तत्वतः तर नक्कीच) सहमत. कारणपरंपरेबाबत थोडी मतभिन्नता असू शकते. काही ठिकाणी थोडी पुरवणी देतोय. ती बहुदा त्यांनाही मान्य व्हावी.
ही संधी व्यवस्थेनेच दिली. हा प्रश्न आजचा नाही. वनकायद्याचा इतिहास पाहिला की हे ध्यानी येते. एक दिवस अचानक उठून, जिथं पिढ्यान् पिढ्या माणसं रहात होती, ती जमीन जंगलं असल्यानं जंगलजमीन ठरते, सरकारी होते, मग तिथं पूर्वापार कसणारे अतिक्रमणदार ठरतात आणि पुढं व्यवस्थेकडून होणाऱ्या अन्याय-अत्याचारांची एक प्रदीर्घ मालिका उभी राहते. त्याची प्रतिक्रिया म्हणून काही वर्षांचा अहिंसक लढाच होतो. त्याला दाद न मिळाल्याने सुप्रीम कोर्टापर्यंतचे लढे होतात. अशा दर वेळी अर्ध्या मुर्ध्या स्वरूपात सरकार गाजरं दाखवत जातं. प्रश्न तसेच राहतात. या आदिवासींचे जंगल जमिनीवरचे अधिकार मान्य केल्यानंच ही जंगलं उजाड होणार आहेत, असल्या काही भंपक (आणि जे खातं जंगलं उजाड करत होतं, त्या खात्यानं ठरवलेल्या) धारणांतून ही प्रक्रिया चिघळत जाते, हा इतिहास 1890 नंतरचा आहे. फार जुना नाही. अगदी अलीकडचे वनाधिकार विधेयक मंजूर होताना वनवाद्यांनी (म्हणजे प्रामुख्याने सुसंघटित सरकारी वनखातेच) आणि टायगर लॉबीने केलेल्या विरोधांची मोर्चेबांधणीही नीट पाहिली तरी काही गोष्टी स्पष्ट होतील. त्याहीपलीकडे, आजही या वनाधिकार कायद्याच्या अंमलबजावणीची माओवादग्रस्त नसलेल्या भागातील स्थिती पहावी. तिथं माओवाद्यांसाठी सुपीक भूमी तयार करून देतो आहोतच.
ही आणि अशी कारणपरंपरा ध्यानी घेतली तर माओवादी दोन्ही बाजूंनी आणि तेही टोकाचे ओरडण्यात कसे यशस्वी होतात हे कळते. इथं अर्ध्याहून अधिक रस्ता नेहमीपेक्षा अधिक किंमत मोजत चालण्याची तयारी आहे का व्यवस्थेची? ती नाही. केवळ उदाहरणादाखल एक प्रश्न (फक्त आरांना नाही), बोर्डर रोडकडून हिमालयात होणाऱ्या रस्त्यांचे कौतूक आपण करतो; आपल्या अंतर्गत भागातील दुर्गमता हिमालयापेक्षा आपल्याला भारी कधीपासून ठरू लागली?
हे तुम्हीही इतकं सुलभ करू नका. अरुंधतीच्या लेखनावरची माझी मते मागच्या भागांत मी मांडली आहेत. ती कायम ठेवूनही काही गोष्टी नाकारता न येण्याजोग्या आहेत त्यांची दखल इथं घेतो. अरुंधतीच्या या लेखत्रयीतील शेवटचा लेख आहे 'द ट्रिकल डाऊन रिव्होल्यूशन'*. चर्चा सुलभ व्हावी म्हणून या लेखातील काही मजकूर (हा मजकूर सोयीपुरता घेतलेला नाही) इथं मुद्दाम देतो (ठळक ठसा माझा):
अरुंधती यानंतर माओवाद्यांकडे या खनिच समृद्ध भागाचे नियंत्रण दिले गेल्यास ते काय करतील याविषयी काही प्रश्न उपस्थित करते आणि पुढे त्याचे उत्तर देते.
इथं ती माओवाद्यांच्या जवळच्या, किंवा त्यांच्या मूळच्या विचारसरणीवरही टीकेचाच सूर लावते.
पण... हा पण आहेच इथं. मी आधीच्या भागात म्हटलं तसं, तिच्या लेखनातील ही शैली घातक आहे. ही प्रभावी शैली आहे. पण प्रभावी विचारांची प्रभावी मांडणी नव्हे. हे लेखन उद्विग्नतेतून अधिक आल्यासारखे आहे. मग अशा घासून पाहण्याच्या अंगाने जाणाऱ्या मुद्यांवरचे ध्यानच उडते. बाकी गोष्टी प्रभावी ठरतात. वाचकाला रोमॅंटिसाईज करणाऱ्या ठरतात.
याच लेखातील आणखी एक परिच्छेद देतो. जो तिने लेखात कंसात टाकला आहे. इथं त्यातील काही वाक्ये मी ठळक केली आहेत. ती स्वयंस्पष्ट आहेत. बोलकी आहेत.
अरुंधतीची पंचाईत आहे ती हीच. हिंसा की अहिंसा - विवेकी फैसला नाही. विवेकाने हिंसेचा पुरस्कार करायचा असेल तर तिने खुश्शाल हाती बंदूक घेऊन लढावे. तिचाही तसाच मृत्यू होईल जसा तिच्या बंदुकीच्या गोळीने कोणाचा तरी होईल. विवेकाने तिने अहिंसेचा स्वीकार केला तर तिला बोडिली हल्ल्याचा निषेध करावाच लागेल. तो न करता फक्त 'माओवादी सत्तेत आले तर आधी मलाच मारतील' असे म्हटल्याने काही साध्य होणार नाही. ती तिच्या मांडणीचे महत्त्व इथंच गमावून बसते.
इथं इतिहास वनाधिकारांसारखाच आहे. 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी म्हणजे शाळा, येथपासून ते शाळा म्हणजे पोलिसी कँप, आणि आता शाळा नको, इथंपर्यंत आपण आलो आहोत. आता या भागात निवासी शाळांची मोठी योजना नेण्यापर्यंत आपण जाणार आहोत. ते असो.
झालंय असं की, ते युद्धाला उतरले आहेत. त्या भागाचे राज्यच आपण गमावल्यासारखे आहे. मग तिथं त्यांनी काय करावे हे कसे सांगतो आपण? आपली नाक वर करून दिलेली उत्तरे कशी असतात - "मी युद्ध म्हणत नाही. तेच म्हणतात." (हे चिदंबरम यांचे उत्तर आहे). त्यांनी ज्या बेमुर्वतपणे युद्ध म्हटलं, त्या पद्धतीने युद्ध म्हणायला एक 'धाडस' लागतं. ते तर नसतंच. असते ती फक्त लबाडी. या लबाडीतून याच भागात (जिथं आधी वनाधिकार दिले गेले पाहिजेत, ते न करता) खाणी करण्याचे एमओयू सुखेनैव व्हावेत याची व्यवस्था केली जाते. तेही असो. मुद्दा हा की, गमावलेल्या भागात काय करावयाचे हे ठरवता येणार नाही. त्यासाठी तो भाग पुन्हा कमवावा लागेल. दोन मार्ग आहेत - 1. सफाया करून, 2. सफाया न करता अधिक किंमत देत तो भाग जिंकून घेऊन (इथं जिंकण्यामध्ये मन जिंकणं हे अपेक्षीत आहे). निवड खुली आहे. लबाडी अशी की, सलवा जुडूमच्या नावाखाली लबाडीने पहिला मार्गच पत्करला जात असतो.
ही अपेक्षा आहे? मी असहमत.
सहमत. तो सारा शैलीबाजपणाचा, उद्विग्नतेतून आलेल्या प्रतिक्रियेचा परिणाम आहे. तो असता कामा नये. लेखनातील जबाबदारी इथंच येत असते. अरुंधती लिहितेय. कोणी स्ट्रिंजर रिपोर्टर नाही.
असे मत बनवण्याचा तुम्हाला अधिकार आहे. आपल्या लेखनातून त्या ती संधी उपलब्ध करून देतातच. पण, वर्गमूळ काढण्याची तयारी असेल तर, मी हे असे लेखन अधिक पत्करेन, कारण ते किमान आत जाऊन काही अनुभवून केले असते.
हे सारे लिहिताना माओवादी आणि त्यांच्यामागे जाणारे आदिवासी या दोघांना मी वेगळे मानले आहे आणि मानतोही. माओवाद्यांमागे जाताना ती त्या आदिवासींची इन्फॉर्म्ड चॉईस नसते हे गृहितक त्यामागे आहे.
*अरुंधतीच्या मूळ लेखांची शीर्षके -
१. Mr Chidambaram’s War
२. Walking with the Comrades
३. Trickledown Revolution
याच शब्दांनी गुगल केल्यास 'आऊटलुक'मध्ये प्रसिद्ध झालेले तिन्ही लेख उपलब्ध आहेत. वाचून तपासणी करता येते.
25 Jun 2011 - 10:57 am | विसुनाना
सखोल प्रतिसाद.
'नक्षलवादातून फायदा कोणता आणि कुणाचा होतो?' या प्रश्नाचे उत्तर दिलेत तर आभारी राहीन.
25 Jun 2011 - 1:45 pm | श्रावण मोडक
हिंसेच्या तत्वज्ञानातून फायदा होतो हे मला तरी कल्पनेपुरतेही स्वीकारता येत नाही. तिथं फक्त तोटाच असतो. हानी असते. स्वार्थ साधला जातो. त्याला फायदा कसे म्हणणार?
स्वार्थ काहींचा साधतो. माओवाद्यांचा आणि व्यवस्थेतील काही अनीष्ट घटकांचाही. माओवाद्यांची 'कर'वसुली होते, ज्याला बाहेरून 'खंडणी' म्हटले जाते. व्यवस्थेतील अनीष्ट घटकांची घरभरणी होत असते. मरतो तो ज्यांच्या नावे हे सारे सुरू असते तो अनइन्फॉर्म्ड वंचित समुदाय.
26 Jun 2011 - 12:18 am | आळश्यांचा राजा
(विचार करायला लावणारा प्रतिसाद!)
संपूर्णपणे सहमत आहे. तुमची मांडणी स्पष्टपणे हिंसेचा निषेध करते हे एक बरे आहे. कारण तुम्ही तो तसा केला नाहीत, तर ज्या टोकाला जाऊन व्यवस्थेच्या गलथानपणाचा आणि अन्यायाचा निषेध करावा लागतो, त्यातून नकळतच या व्यवस्थेच्या विरुद्ध उभे राहिलेल्यांचे समर्थन होऊ लागते. मग ते नक्षल का असेनात. असो.माझ्या काही वाक्यांवर तुम्ही दिलेल्या टिप्पण्यांबाबत -
अन्यत्र दिलेल्या माझ्या प्रतिसादातील काही भाग इथे देतो - " स्वतंत्र भारतामध्ये काही प्रमाणात त्यांच्या नावे जमिनी सेटल झाल्या. बऱ्याच प्रमाणात झाल्या नाहीत. मग जरी ते वर्षानुवर्षे एखाद्या ठिकाणी रहात असले, तरी कायद्याने बेकायदेशीर लोक ठरले. हा व्यवस्थेचा/ व्यवस्था राबवणाऱ्यांचा धडधडीत अन्याय होता. त्यावर उतारा म्हणून वनाधिकार कायदा आला. वनाधिकार कायद्याच्याही अगोदर काही राज्यांमध्ये असे कायदे केले गेले, की ज्यानुसार आदिवासींची जमीन विकत घ्यायला सरकारची परवानगी लागे. आता तर (ओरीसामध्ये) आदिवासींची जमीन गैर आदिवासीला विकत घेताच येत नाही. आता हे त्यांना व्यवस्थेने दिलेले रक्षण म्हणायचे, की व्यवस्थेचा (आदिवासींनाच) जाच म्हणायचा हा मोठाच प्रश्न आहे. "
शाळांचा इतिहास वनाधिकारासारखाच आहे याच्याशी एकशे एक टक्के सहमत. अगोदर काम करायचं नाही. माओवादाला चांगलंच निमित्त देऊन ठेवायचं. मग माओवाद आला की खडबडून जागं व्हायचं, काम करायला जावं म्हणायचं, माओवाद काही तिथे शिरु देत नाही, मग माओवादाच्या नावाने बोटं मोडायची. म्हणजे विकास नाही झाला तर माओवादालाच जबाबदार धरायचं. सरकारची काहीच जबाबदारी नाही का? आता मी हे जे जाड ठशातलं लिहिलं आहे, ते वाचलं की कुणालाही वाटेल, मी माओवादाची पाठराखणच करतोय. त्यामुळे या प्रश्नाला एकूणच फार काळजीपूर्वक हाताळले पाहिजे.
ही लढाई व्यवस्था विरुद्ध माओवादी अशी नाहीच मुळी. ती आहे तिरंगी लढत. व्यवस्थेतील लबाड विरुद्ध नक्षल लबाड, आणि दोहोंच्या विरुद्ध तुम्ही आम्ही. आपल्याच अस्तित्वासाठी झगडणारे. भल्याबुर्याची थोडीफार चाड असणारे.
छे! हिंसेचा मीही निषेधच करतो. माझे म्हणणे माझ्या आर्ग्युमेंटच्या काँटेक्स्टमध्ये पहावे. नक्षल गोळ्या घालणारेच आहेत, पण त्यातल्या त्यात त्यांच्या गोळ्या त्यांच्याच मताने तरी जस्टिफाइड होतात का, कशासाठी ते गोळ्या घालतात, टु व्हॉट एण्ड; अशा अर्थाने ते वाक्य आहे. नक्षलांकडून काहीच अपेक्षा नाही. त्यांनी विकासकामाला सहकार्य करावे हीदेखील अपेक्षा नाही, ते करणार नाहीत हे ठाऊक आहे. झालेच विकासकाम तर ते त्यांच्या बॅनरखाली व्हायला हवे अशी त्यांचीच अपेक्षा असेल. अलीकडे काही नक्षलग्रस्त भागांत सिव्हिल सप्लायचा तांदूळ आम्ही वाटणार असे म्हणू लागले आहेत. म्हणजे आयत्या बिळावर नागोबा. असाही त्यांचा शिधा या सिव्हिल सप्लायमधूनच जातो म्हणा. पण क्रेडिट घ्यायला हवेच आहे त्यांना.
गृहीतकाशी सहमत.
26 Jun 2011 - 3:13 pm | श्रावण मोडक
यामध्ये दोन भिन्न गोष्टी आहेत. वनाधिकार कायदा हा अतिक्रमणदार ठरलेल्या जंगलखेडूंना लागू होतो. अतिक्रमणदार नसलेलेही आहेत. त्यांच्या जमिनीवरील हक्कांची नोंद पूर्वापार किंवा कालौघात झालेली आहे. त्यांच्या जमिनी बिगरआदिवासींनी खरेदी करू नयेत यासाठीची ती कायदेशीर व्यवस्था आहे (असा कायदा महाराष्ट्रातही आहे. त्यानुसार आदिवासीची जमीन बिगरआदिवासीने खरेदी करावयाची असेल तर त्यासाठी कलेक्टरची परवानगी लागते. आता लवासासारख्या कंपनीलाही अशी परवानगी मिळते वगैरे तपशील आहेतच. ते असोत). या व्यवस्थेचे भान आहेच. मुद्दा कळीचा आहे तो वनाधिकार कायद्यासंबंधातील. या जंगलखेडूंना एकदा अतिक्रमणदार ठरवले गेले आणि मग मी पुढे म्हणालो तशी अन्याय-अत्याचाराची मालिका. आता कायदा झाला आहे तर त्याची तरी नीट अंमलबजावणी? तीही नाही. आज हे जे वर्तमान लिहितो आहे, ते उद्याच्या एका अशाच उग्र समस्येचा भूतकाळ ठरेल. त्यावेळी पुन्हा त्या समस्येवर मात करण्यासाठी काढलेल्या उपायाला आजच्यासारखाच विरोध होईल आणि मग हा ओरडा दोन्ही बाजूंचा ठरेल. हे असले दुष्टचक्र आहे.
आत्ता हे लिहितोय तेव्हाची खबर - जळगाव जिल्ह्यातील एका गावातील चारशेच्या चारशे वनाधिकाराचे दावे वनखात्याने फेटाळून लावले. आता त्यांना (या मंडळींच्या किमान चारेक पिढ्या तरी तेथे आहेत) गावातून हुसकून लावण्याचे काम सुरू झाले आहे. अशा रीतीने कोपऱ्यात रेटले गेल्यावर काय होईल?
आले लक्षात. मान्य.
त्यांच्या मताचे जस्टिफिकेशनही तुम्ही तुमच्या चष्म्यातून शोधू पाहता. ते युद्ध करताहेत. त्यामुळं आत्ता या घडीला बाकीच्यांना गोळ्या घालायच्या नाहीत. शत्रू कमकुवत करत न्यायचा असेल तर विनीलचे अपहरण करायचे असते; एखाद्या भ्रष्ट माणसाचे नाही. हे त्यांना कळते. ते आपल्या नेतृत्त्वाइतके/सारखे मूर्ख नाहीत (हे वाक्य उद्विग्न्नतेतून आलेले नाही). युद्ध आहे, तेही पारंपरिक नव्हे; आतले युद्ध आहे हे.
26 Jun 2011 - 3:59 pm | आळश्यांचा राजा
हे असले प्रकार उघडकीला आल्यानंतर ओरीसामध्ये परवानगीचा क्लॉजच काढून टाकला. आता कलेक्टरच काय मुख्यमंत्रीपण परवानगी देऊ शकत नाहीत. प्रॉब्ल्मे इथे कॉम्प्लिकेटेड व्हायला लागतो. परवानगीचा क्लॉज असला तरी प्रॉब्लेम; नसला तरी प्रॉब्लेम. खाण बहुल भागातील एक उदाहरण देतो. सगळी जमीन आदिवासींचीच. खाणीतून काढलेले खनिज रेल्वेत चढवण्याअगोदर एका कंपनीला एका ठिकाणी डम्प करुन ठेवायचे असे. ती जागा आदिवासींची होती. मध्येच कधीतरी कलेक्टरांचा आदेश निघाला, आणि प्रदूषण नियंत्रण मंडळानं सांगितलं त्या कंपनीला सांगितलं, की ती जमीन वापरायच्या अगोदर परवानगी घ्या सबकलेक्टरची. कारण इथे जमीन हस्तांतरणाचा प्रश्न होता. कायद्याने लीज/ भाडे यालादेखील मनाई आहे, केवळ विक्री नव्हे. (कसल्याही प्रकारचे हस्तांतरण). शेतजमीन ती. आता महिन्याला दोन तीन लाख भाडे मिळत असेल एका एकराला तर शेती कोण करणार आहे? तर इथे परवानगी देता येत नाही. याला काय म्हणावे? परवानगी दिली तरी लवासा. नाही दिली तरी आदिवासीचे नुकसानच एका परीने. परवानगी दिली तर आदिवासी भूमीहीन होण्याची शक्यता असतेच असते. तर इथे आदिवासीच भांडू लागले सरकारशी हा क्लॉज काढून टाका म्हणून.
मला ही बातमी माहीत नाही. परंतु, इथे तुम्ही गृहीत धरुन बोलताय की ते दावे फेटाळण्यायोग्य नव्हते. दावे फेटाळण्याची सोय कायद्यात आहे, म्हणजे दावा फेटाळला जाऊ शकतो. केवळ दावा फेटाळला म्हणून कुणाला त्या जमिनीवरुन हुसकाऊन लावत नसतात. या बातमीतील तपशील समजले पाहिजेत. असे असू शकते, की ती जमीन जंगल जमीन नसेल, रेव्हेन्यू जमीन असेल, तर तो दावा फेटाळला जातो. किंवा दावेदार आदिवासी नसतील, (एस सी असतील) तर त्यांच्या तीन पिढ्यांचा त्या जागी असण्याचा काही पुरावा असावा लागतो, जो मिळणे अवघड असते. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे, हे दावे केवळ वनविभाग पास करत/ फेटाळत नसते. गावपातळीला वनाधिकार कमिटी असते. त्यात लोक असतात. गावातीलच. आदिवासी सक्तीने असतात त्यात.त्यावर सबकमिटी असते. त्यात सबकलेक्टर, रेंज ऑफिसर, आणि आदिवासी नॉमिनेटेड असतात. त्यावर जिल्हा कमिटी असते, त्यात कलेक्टर, डीएफओ आणि नॉमिनेटेड सदस्य - आदिवासी असतात. दावा फेटाळला गेला तर तो या स्टेजेसमधून जाऊन मग फेटाळला जातो. त्यानंतर लगेच हुसकाऊन लावण्याची प्रक्रिया सुरु होणे आश्चर्यकारक बाब वाटते. तपशील समजले पाहिजेत.
27 Jun 2011 - 9:44 am | श्रावण मोडक
हे माझे नेहमीचेच. :) हो, ते गृहीत धरले आहे कारण माझ्यादृष्टीने सकृतदर्शनी ते दावे फेटाळण्यायोग्य नाहीत. तरीही फेटाळले गेले तेव्हा त्याची कारणमीमांसा नीट झाली पाहिजे. ती झालेली नाही. तपशील नंतर कळवतो.
जमीन जंगल जमीनच आहे. वनखात्याची आहे.
आदिवासीच आहेत.
या दाव्यांबाबत तुम्ही दिलेली प्रक्रिया बरोबर आहे. यातील गावपातळीवरच जेव्हा दावे फेटाळले जातात तेव्हा काही प्रश्न येतात. त्यात गावकीचे राजकारण असतेच. पण त्या पलीकडे वनखात्याची भूमिका हा एक मुद्दा होतो आहे सध्या, निदान महाराष्ट्रातील काही गावांत. तुम्ही हे जाणताच, की गावस्तरावर गावच्या मुखंडांना विरोध करतही काही माणसे उभी राहतात. अशांचे हे दावे फेटाळण्याचे प्रमाण अधिक असते, आणि तिथे ही गावसमिती प्रशासनापेक्षा वेगळी असत नाही संवेदनेच्या संदर्भात. गावस्तरावरून दावे फेटाळल्यानंतर अपील वगैरे चक्रात जेव्हा तो सामान्य माणूस सापडतो तेव्हा त्याचे काय होत असेल याची तुम्हीही कल्पना करू शकता. इथे अपेक्षा असते ती गावसमितीबरोबरच प्रशासनाच्या, म्हणजेच आधी वनखाते आणि नंतर इतर यांच्या, संवेदशीलतेची. ती या अशा प्रकरणात अनेकदा नसते. त्याचे कारण वनखात्याची या वनाधिकारांसंबंधातील मूळ भूमिकाच. असे अधिकार दिले तर वनखात्याचा सध्या त्या समुदायांवर असलेला वरचष्मा संपेल, हे त्या खात्याला नकोसे आहे. त्यामुळे मग आदिवासींना वनाधिकार दिले तर ते जंगले संपवतील वगैरे युक्तिवाद पुढे येतात आणि पुढे काय घडले ते काही प्राचीन इतिहासातील नाहीच. :)
तपशील नंतर कळवेनच.
मेंढालेखा येथे अलीकडचे जयराम रमेश यांच्या दौऱ्यावेळी घडलेले नाट्य पुरेसे बोलके आहे.
28 Jun 2011 - 12:07 am | आळश्यांचा राजा
मेंढालेखाचे नाट्य म्हणजे तेच ना, वनखात्याला ट्रान्झिट पास देण्याचा अधिकारच मुळात नसताना बांबूसाठी पास द्यायचे नाकारले, आणि ग्रामपंचायतीने दिलेले पास मानायला नकार दिला, ते? की आणखी वेगळे काही? अजून काही असल्यास सांगावे. माहीत नाही. असो. एक महत्वाचा पैलू यानिमित्ताने समोर आलेला आहे.
असे म्हणता. अर्थात, हे मान्य करता की गाव गाव म्हटले तरी तिथे(ही) भयानक राजकारण असतेच. सगळा गाव एक असा नसतोच. तेंव्हा "गावाला" किंवा "ग्रामपंचायतीला" जेंव्हा काही अधिकार दिले जातात, तेंव्हा ते "काही" लोकांना दिले जातात. अर्थात मुखंडांना दिले जातात. हे मुखंड काही वनखात्यातील चोरांपेक्षा अधिक पवित्र नसतात. तेंव्हा हे भांडण दोन चोरांमधले आहे.
माझ्या मते ग्रामपंचायतीला असले अधिकार दिल्याने जंगल नष्ट होण्याची प्रक्रिया वाढणारही नाही, की त्याला आळाही बसणार नाही. जे जसे चालले आहे, तसेच चालू राहणार आहे. फक्त एका चोराचे चोरीचे हक्क कमी करुन दुसर्या चोराला देण्यात आले आहेत.
पश्चिम महाराष्ट्रातील वाळूचे प्रकरण तुम्हाला माझ्यापेक्षा अधिक चांगले माहीत असेल. अगोदर (फक्त) तहसीलदार चोरी करत असे. आता "मुखंड" देखील करतात. "गावाच्या" नावाखाली.
हे गावाला अधिकार देणे वगैरे फेसवॉश आहे. समस्येला भिडणे नाही. वळसा घालून जाणे आहे. असो. अपरिपक्व लोकशाहीकडून काय अपेक्षा करावी म्हणा. (इथे सगळ्या कामांसाठी किमान क्वालिफिकेशनची अट आहे. पण पंतप्रधान, मुख्यमंत्री, मंत्री या एक्झिक्युटिव्ह पोस्ट्ससाठी, तसेच, आमदार/ खासदार या कायद्यांची निर्मिती करणार्या पोस्ट्ससाठी ना किमान शिक्षणाची अट आहे, ना किमान कौशल्याची. मुखंड असणे पुरेसे आहे.)
थोडक्यात, हे गावाला अधिकार देणे वगैरे शुद्ध ढोंग आहे. काहीच अकौंटिबिलिटी नसणार्या मुखंडांना कुरण उपलब्ध करुन देणे आहे, बास. (याला पर्याय म्हणून "अकौंटिबिलिटी" असलेला सरकारी चोर असतो, जो कधीच अकौंटेबल नसतो. त्यामुळे याला विरोध करण्याचे काहीही नैतिक समर्थन सरकारकडे/ वनखात्याकडे नाही.)
28 Jun 2011 - 11:28 pm | श्रावण मोडक
गावकी कुठंही चुकलेली नाही. पण म्हणून गावाला अधिकार देणं वगैरे ढोंग असे मी म्हणणार नाही. आत्ता इथं तपशिलात लिहीत नाही.
जाताजाता - गावकी चुकलेली नाही असं म्हणतो म्हणून विचारतो आदिवासी ही होमोजीनस आयडेंटीटी आहे का? त्यात आतमध्ये काय-काय चालतं?
असो, आता आपली चर्चा पार्श्वभूमीवर करूया. :)
24 Jun 2011 - 12:59 pm | प्रास
कुर्निसात!
नेमकं आम्हाला काय म्हणायचं आहे हे जे आत्तापर्यंत कळत नव्हतं, कुठला स्टँड घेणं योग्य आहे आणि का या प्रश्नांची उत्तरं जुळवणं जे आत्तापर्यंत कठीण वाटत होतं, त्याला बर्यापैकी स्पष्टता या आपल्या दोन भागांतील लेखांनी आलेली आहे असं सहर्ष म्हणता येतंय!
आमच्या खूपशा कल्पना चांगल्याच स्पष्ट करून दिल्याबद्दल मनापासून आभारी आहे.
धन्यवाद!
27 Jun 2011 - 12:49 pm | प्रास
माझ्याच प्रतिसादाला मीच प्रतिसाद देतोय याला कारण वरच्या राजासाहेब आणि श्रावणजींचे अभ्यासपूर्ण प्रतिसाद आहेत.
ही असली प्रशासकीय आणि राजकीय चर्चा या दोन दिग्गजांमुळे वाचायला मिळाली आणि तीही शुद्ध मराठीत.
आज (पुन्हा एकदा) मिपा परिवारात सामील झाल्याचं सार्थक झालं.....
25 Jun 2011 - 2:23 pm | परिकथेतील राजकुमार
सुंदर आणि समतोल लेखन.
हा भाग देखील आवडला.
26 Jun 2011 - 2:34 pm | चेतन
लेख चांगला झालाय तरीसुद्धा काही भागांशी असहमत.
>>राष्ट्रद्रोह कशाला म्हणावे हा प्रश्नच आहे
शब्दांचा खेळ करुन वाद घालायचा असेल तर मला असे प्रश्न पडतात. अरुंधती जेव्हा काश्मीरप्रश्नी कश्मीरमध्ये जे काही बोलते (स्वतः भारतीय नागरीक असुन- ती ते मानते की नाही हे दुय्यम आहे) तेव्हा मला तरी असा प्रश्न पडला नाही.
>> समजा बाई असल्या प्रसिद्धीलोलुप, तरी त्याने काहीच बिघडत नाही
ठीक. पण त्यांना प्रसिद्धीलोलुप म्हणण्यानेदेखील काही बिघडत नाही.
वनाधिकाराबद्दल काही मतं मान्य. पण जेव्हा सरकारी लँड एक्वजायझेशन होते कुठेही तेव्हा हा मुद्दा असतोच मग ते रेल्वेसाठी असो वा धरणासाठी वा अणुप्रकल्पासाठी.
बाकीचा भाग आवडला कारण तो त्रयस्थ संस्थाचा दुटप्पीपणा दाखवतो. आणि त्यात काही नवीन नाही (तसही कम्युनल व्हॉयलन्स बील येतयंच) जिथे पब्लिसिटी जास्त तिथे लोक उड्या मारणारचं
>>झालंय असं की, ते युद्धाला उतरले आहेत.
तर मग सरकारनेही सरळसरळ युध्दाला उतरावं बोलणी करण्यात काहीच अर्थ नाही (सेम विथ पाकिस्तान). पण येथेही ऑपरेशन ग्रीन हंटचा अनेक बुध्दीवादी विरोध करतील निदर्शने/टीका करतील. (दुर्लक्ष करावे - ट्रीविलाईजचा मुद्दा लक्षात आहे तरीही).
मी इथे शहरात बसुन बोलतोय अरुंधती तेथे जाउन बोलते म्हणुन ती बरोबर हा न्याय असेल तर चर्चाच नको. शिवाय असे असेल तर अशीही बरीच माणसं आहेत की ति तिथेच राहतात आणि विरुध्द बोलतात आणि काही दिवसांनी मारली जातात.
तसा मी हिंसेला अस्प्रुश्य मानत नसल्याने मी अगदीच ते चुकीच मानत नाही (तेही युध्द पुकारल्यावर). पण हे युध्द कुणाचं आहे? नक्षलवादी आणि सरकार यांमध्ये जर सामन्य माणुस (आदिवासी आणी इतरही जसे ट्रॅक काढ्ल्याने रेल्वेत मरणारे) जर मरतं असतील तर त्यावर टीका होणारच,
ती टिका तथाकथीत बुध्द्दीवाद्यांकदुन दोन्ही गोष्टींवर होईल याबद्दल मात्र साशंक आहे.
माझा नक्षलसमस्ये बाबत फारसा अभ्यास नाही हे मान्य पण ही माझी मत आहेत कुणी लादलेली नव्हे
असो काही गोष्टींबाबत माहिती दिलीत तर अजुन .आवडेल
१. सालवा ज्युडम
२. नक्षलांना पोसतं कोण (सामग्री पैसा मिळतो कुठुन?)
३. खाणव्यवसायामध्ये स्पर्धा येउ नये म्हणुन नक्षलांतर्फे प्रयत्न होतात का?
४. एव्हढा मोठा भाग नक्षल नियंत्रणाखाली असताना त्यांना निवडुन येणे कठीण नाही
(निर्बुध्द)चेतन
नक्षलांबद्दल माहिती देणारी एक लिंक
28 Jun 2011 - 12:33 am | आळश्यांचा राजा
उलट्या क्रमाने उत्तरे द्यायचा प्रयत्न करतो.
४. कुणाला निवडून येणे कठीण नाही? नक्षलांना? ते ही व्यवस्थाच मानत नाहीत. त्यामुळे निवडणुक लढवण्याचा प्रश्नच येत नाही.
३. खाणव्यवसायामध्ये स्पर्धा येऊ नये असे नक्षलांना का वाटावे, हे समजले नाही. (प्रश्न समजला नाही.)
२. नक्षलांना पैसा विविध मार्गांनी मिळतो असे ऐकून आहे. यात खंडणी, (रॉय बाई याला कदाचित नक्षली टॅक्स म्हणतील), अफूविक्री, परकीय सहाय्य, आणि ऐच्छिक दान यांचा समावेश होत असावा. (असा कयास आहे.)
१. सलवा जुडुम. नक्षली चालीला त्यांच्याच भाषेत उत्तर द्यायचा छग सरकारने केलेला प्रयत्न. आदिवासींना शस्त्रे देऊन नक्षल वर्चस्वाला शह देणे. नक्षल म्हणतात आदिवासी सरकारविरुद्ध उठलेत आपणहून, त्याच चालीवर म्हणायचं, आदिवासी नक्षलांविरुद्ध उठलेत आपणहून. (रॉय बाईंनी सलवा जुडूम नावाची सरकारची "युद्ध नीति" सखोल विशद केलेली आहे. दुर्गम जंगलांतील खेडी उठवून हायवेच्या कडेला आणून बसवणे, लष्कराच्या देखरेखीखाली, म्हणजे त्यात नक्षली शिरकाव होणार नाही, इत्यादि.)
28 Jun 2011 - 12:59 am | चेतन
>> खाणव्यवसायामध्ये स्पर्धा येऊ नये असे नक्षलांना का वाटावे, हे समजले नाही.
अस्तित्वात असलेल्या खाणमालकांशी नक्षलांचे असलेले लागेबांधे किंवा हे खाणमालक नक्षलांचा वापर करतात का?
>> सलवा जुडुम बद्द्ल जी माहिती नेट्वर आहे ती कितपत खरी आहे हे खरतरं विचारायचं होतं
अजुन बरेच प्रश्न आहेत (तुमच्या आणि श्रावण सरांच्या पोतडीतुन अधिक माहितीची आवश्यकता आहे)
जसे नक्षल
१. एल् टी टी ई संबध,
२. नक्षल आणि स्वतंत्र तेलंगणाची मागणी,
३. ओरीसामधील विहीपच्या स्वामींची झालेली हत्या आणि त्यावरुन थोडिफार दुभंगलेली नक्षल चळ्वळ.
४. नेपाळ मधील नक्षल चळ्वळ आणि त्यांचा भारतातील नक्षलांशी संबंध
चेतन
27 Jun 2011 - 11:19 am | llपुण्याचे पेशवेll
भारत हे एक राष्ट्र आहे की अनेक हा अजून एक वादाचा विषय. त्यामुळे बाई (किंवा कुणीही) राष्ट्रद्रोही की कसे याविषयी काहीही बोलणे मला योग्य वाटत नाही.
यामुळेच आम्ही भारताचे नाव "रीपब्लिक ऑफ इंडिया" च्या ऐवजी "युनायटेड स्टेट्स ऑफ इंडिया" असे म्हणावे.
27 Jun 2011 - 6:28 pm | फारएन्ड
हाही भाग आवडला.
28 Jun 2011 - 12:49 am | इष्टुर फाकडा
"कोणतीही क्रांति ४० वर्षे चालत नसते"
+१ !!!
बाकी मिपा वर आल्याची धन्यता पुन्हा एकदा प्रत्ययास आली.
हा लेख इन्गर्जि मध्ये भाशान्तरीत कोणी करेल काय? तसे करण्याला लेखकाची परवानगी मिळेल काय?